शनिवार, ६ जून, २०२६

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*




 ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः ।

मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापकै रपि॥

बिरुदैश्च ध्वजैरुच्चै: कोषेणापि च भूयसा ।

तथा परिजनैरन्यैरनन्यसमकर्मभिः ॥

समवेतममुं शाह भूपतिश्शोभने दिने ।

प्रारिणोत्पुण्यदेशाय पुण्यकारिणमात्मजम् ॥


         छत्रपती शिवाजी महाराजांनी कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांच्याकडून शिवभारत हा ग्रंथ लिहून घेतला ह्या समकालीन ग्रंथामध्ये कवी परमानंद लिहितो की, काही हत्ती, घोडे व पायदळ या समवेत पिढीजात व विश्वासू अमात्य त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक,बिरुदे,उंच ध्वज, विपुलद्रव्ये त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजीराजे यांनी शुभदिनी पुणे प्रांती पाठविले. स्वराज्याची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आपल्या मनात संकल्पीली होती  ते स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांच्या वयाच्या १२ व्या वर्षीच एक स्वतंत्र राजे म्हणूनच व्यवस्था केली होती . हा आत्मविश्वास शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांना होता  शहाजीराजांकडे कर्नाटकातील बेंगळूर येथे असतांना शिवरायांना एक कुशल रयतवत्सल सम्राट होण्यास आवश्यक असलेल्या शिक्षणाची विविध निष्णात अध्यापकांची तथा प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती शहाजी राजे स्वतः संस्कृत पंडीत, अर्थज्ञ तथा धुरंदर राजनितीतज्ञ होते.परमानंदांनी शिवभारतात शहाजीराजांच्या अनेक पैलूंविषयी नोंद केलेली दिसते यामध्ये हे त्यांना इंगित तज्ञ, सुधी म्हणजे उत्तम बुद्धि असलेले, पटू ,आत्म प्रतापी, विविध विजयश्रीचे निवासस्थान असणारे, मोठे चिलखत धारण करणारे, महोत्सायी ,मानी आणि गरुडाप्रमाणे शक्ती असलेलेले असे वर्णन केलेले आढळते.

     शहाजी राजांनी शिवरायांना पुण्याकडे पाठविले त्यावेळेस शहाजी राजांचे द्रष्टेपण कसे व्यक्त झाले हे सांगताना परमानंद त्यांना अर्कद्युतिमत (सुर्याच्या तेजाने युक्त )अर्कज्ञ (सूर्याला जाणनारे) अशी विशेषणे लावली आहे.

संधी (तह करणे )विग्रह

( सघर्ष वा युद्ध करणे )यान

 (शत्रुवर केलेली स्वारी )आसन

(प्रत्यक्षरित्या कोणतीही हालचाल न करता परिस्थितीचे निरक्षण करत शांत राहणे) सश्रय

(गरज पडल्यास आपल्यापेक्षा अधिक बलवान राजाचा आश्रय घेणे) द्वैध ( रक्षणासाठी वा आक्रमणासाठी सैन्याच्या दोन आघाड्या करणे ) या षाङगुण्याच्या आधारावर आपले वर्चस्व सिध्द करत असतांना निश्चितच आबासाहेबा कडून ह्या युद्धनितीमधे महाराज कुशल झाले होते . 

      राजमाता जिजाऊ अन शिवरायांसह मातब्बर विश्वासु सरदार,अमात्य, बिरुदे, ध्वज व राजमुद्रा देऊन  पुणे,इंदापूर,सुपे,चाकण व बारामावळ प्रांताच्या जहागिरीवर पाठवून स्वतंत्र राज्यकारभाराची सुरवात तर राज्याभिषेकाच्या ३०-३२ वर्षापूर्वीच झाली होती हे यावरून स्पष्ट होते .परकिय भाषेने घातलेला विळखा तोडत संस्कृत भाषेतील राजमुद्रा हे स्वंतत्र लोककल्याणकारी राजकारभार चालविण्याचाच एक भाग होता .

*प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।*


शहाजींचे पुत्र जे शिवाजीराजे, त्यांची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.असे हे लोककल्याणकारी राजांना साजेसी व सपूर्ण मानवता जपणाऱ्या राजमुद्रेतील संदेश हा कुण्या एका जहागिर किंवा सुभ्या येवढा मर्यादित नव्हता तर एका विश्ववंदनीय छत्रपतींच्या महान रयतेच्या राज्याची अर्थात स्वराज्याची प्रेरणा देणारा होता . अगदी बालपणापासून हया मुद्रेचा अर्थ आबासाहेबानंतर भोसलेवंशीयांचा मना मनात संस्कारीत झालेला दिसतो . मॉ साहेबांच्या सहा अपत्यांचा क्रमवार मृत्युनंतरही शिवरायांचे जेष्ठ बंधु शंभू म्हणजे संभाजी राजे हे शेकडो मैलावर शहाजीराजे अन तुकाईआईसाहेबासोबत कर्नाटकी दुसरी बाजू सांभाळत आहेत तसे अन बाल शिवराय जिजाऊ साहेबा समवेत पुण्यात आहेत . हा संघर्ष अन त्याग आपल्या मातीत आपल्याच माणसांच अन आपल्याच लोककल्याणकारी कायदयाने चालणारे राज्य निर्माण व्हावे की जे स्वांतत्र्य अन स्वाभिमान जपणारे असेल ही प्रेरणा जिजाऊ मॉ साहेब बाल शिवरायात रुजवितात . पूर्वी शापीत असलेल्या पुण्यात जिजाऊंनी लालमहाल बांधला तो बाल शिवरायांना व्यक्तीगत पातळीवर राजेपण हवे असे म्हणून नाही पुण्यासारखा सुपीक भूमीतून अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे म्हणजे तो स्वराज्याच्या कार्यास हातभार लावेल ही पुण्यातून झालेली सुरुवात होती . स्वराज्याचं पहिलं क्रांतीकेंद्र म्हणजे लालमहालच होता .

    एत्तद्देशिंयामधे एक्य भावना निर्माण करून आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ प्रचंड विश्वास निर्माण केला एक कुशल राजकारण खेळण्या इतके सामर्थ्य आपल्या बुद्धी कौशल्यावर शिवरायांनी पुणे प्रांती येताच अवघ्या सात-आठ वर्षांतच प्राप्त केले होते सुपे,जुन्नर, नगर, कोंढाणा, पुरंदर, कल्याण,भिवंडी, माहुली,मुसलदेव डोंगर, मुरुंगड राजगड, हा प्रवास करत, जावळी स्वराज्यास जोडली प्रतापगडांसारखे अभेद्य दुर्गही उभे केले अफ्जली संकट पार करून तेलंगणा प्रांतातील सिद्धीसही पन्हाळ्याच्या वेढ्यातून मोठा धडा शिकवला, शाहिस्तेखानाची बोटे सोडून त्याला इथूनच पळून जावं लागलं,मिर्झाराजे दिलेरखान हे संकटही महाराजांनी पार केलं पुरंदरच्या तहातून दोन पावले मागे येऊन पुन्हा स्वराज्य नव्या जोमाने उभं केलं . दिल्लीच्या तक्तापुढे सिंहगर्जना संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी ठरली .आदिलशहा, डच,इंग्रज,पोर्तुगीजांशी, सिद्धी अन प्रसंगी स्वराज्य आड येणाऱ्या स्वकीयांशी देखील हा संघर्ष सतत महाराजांनी असाच सुरू ठेवला होता . एवढ्यात काही शिवरायांचे कार्य मांडणे अशक्यच आहे 6 जून 1674 रोजी 32 मण सोन्याच्या सिंहासनावर छत्रचामर व बिरुदे,राजचिन्हे धारन करत महाराज सिंहासनाधीश्वर झाले . हा आबासाहेबांचा संकल्प आई जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी प्रत्यक्षात उतरविला . आबासाहेब तर या सुवर्णक्षणास उपस्थित नव्हते परंतु मॉसाहेबांच्या डोळ्यांनी निश्चितच आबासाहेब बघत होते . राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जाणे हा शहाजीराजेच्या दक्षिणेतील पूर्वी असलेली जहागिरीस लोककल्याणकारी स्वराज्यास जोडत जाणे हीच होती .

कांचनबारीचा रणसंग्राम

 

कांचनबारीचा रणसंग्राम


स्थान : ता. चांदवड जि . नाशिक

मार्ग नाशिक - चांदवड महामार्गावर वडाळे भोई फाट्यापासून आत


बुधभूषण या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजीराजे स्वकुलातील आपल्या आजोबांचे वर्णन करतांना त्यांना "अभवतअर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासवः" म्हणजे अर्थकारण व विविध कलामधील विशारद असे शाह नृप थोर असे संबोधतात . संस्कृत भाषेचे महापंडीत असलेले आजोबा व पुढे किशोर वयातच संस्कृत भाषेत पारंगत झालेले बुधभूषणकार शंभू राजे हे भोसले वंशीयांचे संस्काराचे अप्रतिम उदाहरण आहे . अर्थकारणातही पारंगत असलेले  अर्कज्ञ, सहस्रकरविक्रमी, महाबली शहाजी राजे आपल्या समोर कुणी मांडले नाही . आबासाहेबांचे हाच आदर्श शिवरायांनी पुढे जोपासला . स्वराज्य उभं करत असतांना अर्थ कारण किती महत्वाचे याची जाणिव महाराजांना ही वंश परंपरेच्या संस्कारातूनच मिळाली . महाराज जेवढे शूर योद्धे होते तेवढेच ते साहसी,बुद्धीवान व जाणते अर्थतज्ञही होते . राजकिय अर्थकारण ते चांगलेच समजून होते . वेळे अगोदरच त्यांनी स्वराज्यासाठी शाश्वत अर्थकारण उभे केले . त्यासाठी योग्य वेळी सल्लामसलतीने योग्य निर्णय घेऊन तश्याच मोहिमा आखल्या . शहाजीराजे यांनी स्वराज्यासाठी दिलेली  संस्कृत राजमुद्रेचा  दुसरा अर्थ देखील भरभराटी व वैभव असाच निघतो . ज्यावेळी स्वराज्यावरती परकीय आक्रमणे होत त्यावेळी स्वराज्याच्या अर्थकारणाचे झालेले नुकसान महाराजांनी लगेच भरून काढलेले दिसते . अफजली संकटाने स्वराज्यात केलेली प्रचंड नासधूस अन त्यानंतर लगेच त्याला याच मातीत गाडल्यानंतर त्याच्या सैन्यातील हत्ती, घोडे, शस्त्र, तोफा, दारगोळा,मौल्यवान रसद भरपाईचेच एक तंत्र होते . हेच उंबरखिंडीच्या लढाईचा देखील हिशोब महाराजांनी लगेच पूर्ण केलेला दिसून येतो . शाहिस्ताखानाच्या वेळेसही तसाच पूर्ण केला .

        मोगली आक्रमणे सतत स्वराज्यावर चालून येत असत त्यामुळे स्वराज्याचे सर्वच बाजूने नुकसान होत असे . रयतेच्या रक्षणार्थ उभारलेल्या सैन्याचा खर्चही स्वराज्याला उभारावा लागत असे म्हणून महाराजांनी मोगलांना तशी भरपाई देण्याची देखील मागणी केली होती . हे न ऐकल्याने मोगलांची जागतिक व्यापारपेठ असलेली सुरती व्यापारीपेठेवर दोन  वेळेस महाराजांनी मोहिम आखलेली दिसते . पहिली मोहिम ६ ते १० जाने १६६४ व दुसरी ३ ते ५ आक्टो १६७० म्हणजे अश्विन शुध्द अमवस्येचा काळ येतो अर्थात लक्ष्मीपूजनचा दिवस . दुसऱ्या मोहिमेत १ करोडचा ऐवज स्वराज्यात आला होता .

       अखंड सावधानता हा शिवचरित्रातील एक महत्त्वाचा पैलू . तत्कालीन राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास महाराजांचा होता कोणत्या वेळी कोणत्या स्वराज्य हिताच्या योजना आखायच्या हे महाराजांना त्यांच्या बुद्धीमत्ता व चिकित्सक धोरणामुळे सहज कळायचे .  तेवढेच स्वराज्याचे गुप्तहेर खाते देखील अधिक सक्रिय होते .महाराजांच्या सुरतेच्या दुसऱ्या मोहिमे अगोदर औरंगजेब हा काबुल कंधार मधील पठाणांच्या झालेल्या बंडात गुंतलेला होता . दिलेरखान आणि औरंगजेब पुत्र मुअज्जम या दोघांमधील दुही देखील महाराजांना माहीत होती . सुरत कारावरच्या नोंदीमध्ये देखील मुअज्जम शिवाजी राजांना मिळून हा मोगला विरुद्ध बंड करत असल्याच्या नोंदी आढळतात . दिलेरखान देखील औरंगजेबाकडे तशी तक्रार करतो . कल्याण - भिवंडी -तलासरी मार्गे सुरत वर स्वारी करून महाराज बागलाण मधून साल्हेर -मुल्हेर -ताहराबाद- कांचनबारी जुन्नर ते पुणे असे सुखरूप पोहचतात . या संपूर्ण मोहिमे दरम्यान कांचनबारी या खिंडीमध्ये मुगल आणि मराठ्यांमध्ये घनघोर लढाई झाली . नाशिक शहरापासून (६०किमी) चांदवड मुख्य महामार्गाने समोर गेल्यावर वडाळी भोई फाट्यापासून आत जावे लागते . या खिंडीमधून मुख्य डांबरी सडक जाते त्याच्या बाजूलाच कानमंडाळे गावातील दुर्गप्रेमी तथा गावकऱ्यांनी मिळून शौर्य स्मारकाची उभारणी केली आहे . उजव्या हाताला उंच कांचन गड आहे .मुघलांविरुद्ध महाराजांनी स्वतः या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजवला म्हणून या जागेचे वेगळे महत्त्व आहे .

               महाराज सुरतेवरून निघाले त्या अगोदरच दाऊदखान कुरेशी हा खान्देश- बुऱ्हानपूरचा सुभेदार औरंगजेब पुत्र शहजादा मुअज्जमला भेटला होता त्याच्या  लव्याजम्या सह १६ आक्टो . १६७० रोजी चांदवडला येऊन पोहोचला त्यावेळी चांदवडचा किल्लेदार बागीखान हा भयभीत झाला पण दाऊदखान असल्यामुळे त्याच्या जीवात जीव आला . महाराज सुरतेकडून येताना कांचनबारी वरून जाणार  ही खबर गुप्त हेरा मार्फत मुघलांना मिळाली होती . इकलास खान मकरंद,खत्री दाऊद खानचा भाऊ शेख शफी, बसवंत राय,अब्दुल वधुत या सरदारासह ते कांचन बारीकडे निघाले . तारीख - ए- दिलखुशा लिहिणारा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना देखील त्यांच्यासोबत होता .दोन तुकड्यात त्यांनी सैन्य विभागणी केली ही इकलास खान याच्याकडे तोफखाना सोपवल्या गेला त्याच वेळी मराठ्यांच्या बाजूने युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवराय करत होते त्यांच्यासोबत प्रतापराव गुजर आनंदराव वरकड,व्यंकोजी दत्तो, बाळाजी आवजी, मोरोपंत पिंगळे हे पराक्रमी सरदार होते . दोन प्रहर म्हणजे सहा तास हे युद्ध चालले मराठ्यांच्या युद्ध तंत्रापुढे मुघल नेहमीच हतबल होत असत या युद्धातही अगदी तसेच झाले समोरासमोरील लढाईत मराठे घारी सारख्या घिरट्या घालून शत्रूला कमकुवत करत . मराठे कोठून आणि कसा हल्ला करत हे देखील त्यांना कळत नव्हते .ही परिस्थिती पाहून अनेक मोगली सैन्य सैरावैरा पळायला लागले . मोगलांचे दहा हजार सैन्य व त्यासोबतच मराठ्यांचे दहा हजाराचे घोडदळ या दोघांचीही घनघोर युद्ध या खिंडीत चालले . मराठ्यांचा मोठा विजय या लढाईत झाला .

   कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बखरीत याची नोंद केली आहे "खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुग्गी घालून, हाती पट्टे चढवून, मालमत्ता घोडी पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार स्वारांशी सडे सडे राऊत उभे राहिले ". महाराज स्वतः दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन अंगात चिलखत व शिरस्त्रान सह या युद्धात लढत आहेत . दहा हजार राऊत म्हणजे घोडेस्वार हे त्यांच्यासोबत आहेत . त्याचवेळी सुरतेवरून आणलेला खजाना हा कोणत्या मार्गे आणि कसा पुढे गेला हे एक मोठे कोडेच होते युद्धात लढणाऱ्या मावळ्यांना देखील कदाचित ते माहीत नसावे . या लढाईस वणी दिंडोरीची लढाई देखील म्हणतात . उंबरखिंडी प्रमाणेच महाराज या लढाईत लढले . जेधे शकावली नुसार कार्तिक शुदध चर्तुदर्शीस हा संग्राम घडला  म्हणजेच १७ आक्टो १६७० रोजी हा रणसंग्राम घडला .

News

 








मंगळवार, २६ मे, २०२६

बागुलराजवंशांचा राजदुर्ग - मुल्हेर

 बागुलराजवंशांचा राजदुर्ग - मुल्हेर



स्थान:- ता .सटाणा जि . नाशिक

मार्ग - नाशिक - सटाणा - ताहराबाद - मुल्हेर


बागलाण प्रांतामधील अत्यंत समृद्ध अशी बाजारपेठ म्हणून मुल्हेर प्रसिद्ध होते . सुरत मार्गावरील असल्याने देखील एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते . सुमारे ३५० वर्ष बागलाण मधील राठोड वंशीय बागुल राजांचे राज्य होते त्यामुळे बागलाण नाव या विस्तीर्ण भागास पडले . बागुल राजांच्या राजधानीचा हा दुर्ग होता .बागुल राजानंतर मुघलांच्या ताब्यात हा प्रांत गेला . औरंगजेब जेव्हा दक्षिणेचा सुबेदार होता तेव्हा त्याने हा किल्ला जिंकून याचे नाव औरंगगड ठेवले होते . १६७२ मध्ये मोरोपंत पेशव्यांच्या नेतृत्वात मुल्हेर दुसऱ्यांदा स्वराज्यात आला होता . मोरागड - मुल्हेर - हरगड असे तीन किल्ले एकाच रांगेत आहेत त्यापैकी मुल्हेर हा बालेकिल्ला आहे . मुल्हेच्या पोटाशी मुल्हेर मोरा खिंडीच्या खालच्या भागात असलेली तटबंदी व नैर्सगिक समृद्धी लाभलेली सुसज्ज मुल्हेर माची या किल्याचे महत्व अधिकच वाढविते .

        मुल्हेर गावापासून तीन कि.मी अंतरावर हा किल्ला येतो . गाव प्राचीन बाजारपेठ असल्याने जुन्या इमारती आहेत शिवाय उद्धव महाराजांचा मठही या ठिकाणी आहे . खाजगी वाहन असल्यास अगदी पायथ्या पर्यन्त आपले चारचाकी वाहन घेऊन जाता येते. पायथ्यापासून चढाईची पाऊलवाट आहे आता रस्ता बनविण्याचे काम सुरु आहे. मुल्हेर माची बुरुज व तटबंदीचे संवर्धनाचे कामही सुरु आहे पुन्हा तसेच बनविने शक्य नाही पण त्या सारखे बुरूज व तटबंदीचे काम सुरु दिसते .

        मुल्हेर माचीवर पोहचण्यासाठी तीन दरवाजे पार करावी लागतात सर्वच दरवाजे आता कोसळलेल्या अवस्थेत आहेत . या तीनही दरवाज्याची बुरुजांची रचना ही शत्रूंवर बारीक नजर ठेवण्याच्या योजनेने बनविण्यात आली आहे . तिसरा कमानयुक्त दरवाजा पार केल्यानंतर समोरच गणेश मंदिराचे दर्शन होते  मंदिरा समोरच तटबंदीला समांतर असलेले दगडी भिंत बांधून मोठा तलाव दिसतो . प्राचीन काळातील पाणी व्यवस्थापनाचे तंत्र यावरून लक्षात येते . तलावाच्या काठावरच कमान युक्त नक्षीकाम केलेले गणेश मंदिर आहे या मंदिरावर मुघल शैलीची छाप दिसून येते मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग व श्री गणेशाची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. मंदिरावर अत्यंत बारीक कलाकुसरीचे नक्षीकाम केलेले दिसते शिवाय या ठिकाणी एक शिलालेख आहे राजा प्रतापशहा बागुल यांनी १६१२ मध्ये या मंदिराची निर्माण केले असावे असे सांगितले जाते . याच मंदिराच्या पाठीमागे अत्यंत दाट झाडी मधून आणखी एका प्राचीन जीर्ण मंदिराकडे एक पाऊलवाट आपल्याला घेऊन जाते या ठिकाणी जाताना खूप काळजी घ्यावी लागते. हत्तीची अत्यंत सुंदर शिल्पाकृती कोरलेले रामेश्वर मंदिर त्या दाट झाडीमध्ये आहे . बाजूला भव्य असे पाण्याचे टाके देखील आहे आजही त्या टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी असते . पुन्हा त्याच वाटेने परत येऊन अगदी जवळच एका ओट्यावर महिषासुर मर्दिनी मातेचे छोटे खाणी शिल्प आहे मनोभावे त्या ठिकाणी स्थानिक लोक या मातृदेवतेची पूजा करतात त्याच वाटेने समोर चालत गेल्यावर या माचीवर काही सिमेंटची सभागृह उभारण्यात आली आहे याच दाट झाडी मधून पुढे सोमेश्वर मंदिराकडे रस्ता जातो प्रचंड मोठी आंबे आधी फळांची वृक्ष या माचीवर दिसून येतात . अत्यंत गर्द झाडीमध्ये लुप्त पावलेली एक षटकोनी आकाराची बारव आम्ही बघितली . जमिनीमध्ये सुंदर नक्षी कामासह उतरण्यासाठी पायऱ्या असलेली बारव ही जवळपास अर्धी केरकचरा व गाळाने भरलेली त्या ठिकाणी दिसली .

         समोरच दोन तोफा ठेवलेल्या दिसतात . ओतीव स्वरूपाच्या या तोफा आजही त्या ठिकाणी शाबूत आहेत या तोफेवर रामप्रसाद व शिवप्रसाद असे त्यांची नावे कोरलेली आहेत . या तोफेच्या वरील बाजूस सोमेश्वर मंदिर आहे मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या असून संपूर्ण मंदिराला दगडी कुंपण केलेले आहे . सहा कमानीवर भव्य सभामंडप आणि या सभामंडपामध्ये सुंदर असा नंदी आहे . मंदिराची गाभाऱ्याची रचना ही अलौकिकच आहे द्वारा समोरील छोट्याशा दगडी खिडकीतून शिवलिंगाचे दर्शन होते डाव्या बाजूला गर्द अंधारातून एकच व्यक्ती जाईल अशी एल आकाराची दगडी पायऱ्यांचा जिना त्या गाभाऱ्यात घेऊन जातो गाभाऱ्यातून दर्शन झाल्यावर पुन्हा त्याच वाटेने वर यावे लागते मंदिर परिसरामध्ये अनेक प्राचीन देवदेवतांची शिल्पे आहेत. मंदिराच्या अगदीच पाठीमागे प्रचंड असे गुलाब टाके आहे . या ठिकाणावरून दोन बाजूने मूल्यांच्या बालेकिल्ल्यावर जाता येते डाव्या बाजूची मोराखिंड व उजव्या बाजूने राज मार्गाने पोहोचता येते . राज मार्गाने मंदिराच्या उजव्या बाजूने पाऊल वाट दाट झाडीतून एका पाण्याच्या टाक्या जवळ पोहचते . या ठिकाणचे मजबूत दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरून तलाव तयार केले . या तलावात वरून काताळातील तुटलेल्या महाकाय व अजस्र अश्या शिळा पडलेल्या आहेत उजव्या बाजूस कपारात कोरलेले मोठे व खोल व स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे . येथून खडी चढाई करत राजमार्गावरील दरवाज्यांसमोर येऊन पोहचतो . उजव्या बाजूस काताळावर कोरलेले वीर हनुमंताचे शेंदूर लावलेले शिल्प आहे . अगरी त्यावरच काताळात कोरलेल्या लेणी आहेत . राज मार्गावरील घळीत एक आड एक दरवाजा आहे आता मात्र त्याची खूप मोठी पडझड झाली आहे . बाजूलाच काताळात कोरलेले मोठे पाण्याचे टाके आहे आहे .सर्वात वरील भागातील दोन दरवाजे मात्र अजूनही मजबूत आहेत . नक्षीदार कमानी व दोन ठिकाणी चढत्या पायऱ्या सह काटकोनात वळावे लागते गडावर येणारा शत्रू येथे सहज गाठता येतों . या दरवाज्यातून वर येताच पाठीमागे बालेकिल्ल्यावरील लांब व निमुळती माची आहे . समोरच चिरेबंदी तलाव व त्या समोर पाण्याची ८ मोठी टाकी आहेत . या सर्वोच्च पठारावर इमारतीचे काही अवशेष आहे . समोरच राजवाडयाचे एकमेव सुंदर नक्षीयुक्त दरवाजा पर्यटकांना आकर्षीत करतो. समोर मोरगड दिसतो त्या दिशेने जातांना काही गाळलेली पाण्याची टाकी आहेत . उजव्या बाजूस दोन मोठी तलाव आहे किल्ल्याच्या अगदी तटबंदीच त्या तलावांची भिंत आहे त्यापैकी एका तलांवात पाणी आहे . दोन्ही तलावात मधोमध पाणी मोजण्यासाठी उंच शीळा कोरल्या आहेत . किल्ल्याच्या सर्वोच्च भागवर एकमेव औंदुबर वृक्ष आहे . वृक्षा खाली श्री भडगनाथाचे छोटे मंदिर असून त्यात तांब्याचा मुखवटा आहे .आजुबाजूला मूर्तीचे अवशेष पड़लेले आहेत . मोरगडच्या बाजूने या खिंडीत उतरणारा एक चोर दरवाजा आहे . या दरवाज्यात महाकाय शिळा पडलेल्या आहे . तेथून खाली उतरणाऱ्या पायऱ्या आता तुटलेल्या आहेत . या ठिकाणी खूप काळजी घ्यावी लागते . समोरच मोरागडाचा दरवाजा व पायऱ्या दिसतात .

शुक्रवार, २२ मे, २०२६

सहयाद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*

 *सहयाद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*



भाग -2


मागील भागात आपण वाघांबे गावातून चढाई करत सालोटा किल्ल्याच्या बाजूने चढाई करत  चौथ्या दरवाज्यापर्यंत आलो होतो .   हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . पश्चीमेकडे जात असतांना उजव्या बाजूस प्रचंड खोल दरी आहे. साल्हेरास अशी नैर्सगिकच सुरक्षा सर्वांगाने लाभलेली आहे त्यामुळे हा अत्यंत अवघड आहे . या पठारावरच राजवाड्यासह गडावरील आवश्यक असलेल्या इमारतींचे केवळ दगडी अवशेष शिल्लक आहेत . किल्ल्यावर बाराही महिने पाणी असणे ह्यावरून त्या गडाचे महत्व,जसे पाणी तसा किल्ला अधिक उपयोगी म्हणून साल्हेर त्यापैकीच एक आहे . समोरच प्रचंड उंचीवर असलेला काताळ कोरून व आवश्यक त्या ठिकाणी दगडी चिरेबंदी करून शेकडो वर्षापासून पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ न देणारा गंगासागर तलाव आहे . बाजूलाच दोन आयाताकृती समांतर असलेली पाण्याची टाकी आहे . आजही अत्यंत थंडगार व काचासारखे पारदर्शक पिण्यायोग्य पाणी त्या टाक्यात आहे . बाजुला एक उंबराचे झाड असून त्या ठिकाणी गुफेसारखा भाग आहे . दगडी शिळेमध्ये अत्यंत कलाकुसरीने कोरलेले रेणूका देवीचे मंदिर आहे .मंदिरासमोरच काताळात कोरलेल्या दोन मोठ्या लेण्या आहेत . किल्ल्यावर थांबणाऱ्यासाठी हे विसाव्याचे ठिकाण आहे. येथून पुन्हा वर सर्वोच्च शिखराकडे जाणारी पाऊल वाट आहे . खडी चढाई करत वेडे वाकडे वळण घेत अर्ध्या तासात दुसऱ्या पठारावर पोहचतो . हे लांबट निमुळते पठार विश्रामगडा सारखेच असून येथे हवेचा वेग प्रचंड वाढतो . दक्षिण बाजूस तर कोकण कड्यासारखीच प्रचंड काताळकडा आहे . पूर्वेस पुन्हा एक निमुळते शिखर दिसते व अशीच थोड़ी चढाई करणारी पाऊलवाट या  दुसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर घेऊन जाते . येथे पाच पन्नास लोक थांबू शकेल येवढीच जागा असून परशुरामाचे छोटेसे मंदिर असून त्या ठिकाणी दगडी मुर्ती देखील आहे . परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनास येतात .

        येथून संपूर्ण बागलान प्रांत न्याहाळता येतो . मोरागड -मुल्हेर व हारगड हे त्रिकूट त्याचबरोबर रतनगड ,सालोटा ,भिलाई ,चौल्हेर मांगीतुंगी ,पिंडवल, धोडप,कन्हेरा, देरमाळ, पिसोळं,अचला आदि किल्ले इथून स्पष्ट दिसतात गडपारखी ते  लगेच ओळखू शकतात . धामन्या दिघई डोंगर देखील समोरच दिसतो .पुन्हा याच पाऊलवाटेने रेणुका माता मंदिरापर्यंत खाली परत यावे लागते आणि मग साल्हेर गावाच्या बाजूने असणाऱ्या दुसऱ्या मार्गाने खाली उतरता येते . वाटेत पहिल्या पठारावर असलेले पाण्याच्या टाक्यांचा समूह लागतो बाजूलाच एक यज्ञ कुंड सदृश्य जागा आहे . स्थानिकांच्या माहितीनुसार वैशाख शुद्ध तृतीयेस या ठिकाणी परशुराम जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरण्याची परंपरा आहे ती याच पठारावर भरते . या परिसरातही अनेक इमारतींचे अवशेष दिसून येतात . किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडून साल्हेर गावात उतरताना एकूण सहा ते सात दरवाजे लागतात उतरण्यासाठी मध्यम गतीने उतरत गेल्यास दोन तासही लागू शकतात . साल्हेराची उंची आणि या किल्ल्याची अभेद्यता, प्राचीन कातळात अत्यंत अवघड ठिकाणी असलेला लेणी समूह व पाण्याची सुबद्धता व साल्हेर गावाकडून उतरत असताना असलेले दगडी स्थापत्य शैली यामुळे या साल्हेरास जागतिक वारसा स्थळात जागा मिळाली असावी . साल्हेरचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला असलेले द्वार हे बरीच लहान आहेत . एक आड एक द्वारानंतर तिथून खाली असलेल्या शत्रूवर नजर ठेवून या ठिकाणाहूनही त्याला भेदता येते अशी रचना दिसून येते .

        खाली उतरत असताना ह्या पहिल्या द्वारातच नागदेवतेचे शिल्प आहे छोटी कमानीदार नक्षीयुक्त दरवाज्यातून पुन्हा दगडी पायऱ्याने खाली उतरल्यानंतर पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याच्या बाजूसही पहारेकऱ्यांसाठी बसण्या उठण्यासाठी गुहा कोरलेली आहे. पुन्हा वळण घेत आणखी पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याची उंची फार कमी आहे एक व्यक्ती बऱ्यापैकी जाऊ शकेल अशी त्या दरवाजाची रचना आहे .पुढे तीव्र उतार असलेल्या दगडातच कोरलेल्या पायऱ्या लागतात आता काही पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते . वाटेत काताळात कोरलेल्या पायऱ्या पूर्वी होत्या पण आता काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अवघड जागेतून उतरत गडाच्या तिसऱ्या मानवनिर्मित तटबंदीकडे आपण येतो . किल्ल्याच्या पश्चिम बाजूस साल्हेरवाडीच्या  असलेला तटबंदीने पूर्णपणे घेरलेला आहे . शत्रूला साल्हेर सर करायचा असेल तर ही पहीली तटबंदी पार करावी लागते . येथेच शत्रू हतबल होतो या वरचा टप्पा गाठणे तर अशक्यच आहे . आयताकृती मोठ्या विस्तीर्ण पठारावरुन तटबंदी व बुरुजावरून दूर पर्यन्त व अधिककाळ शत्रूस थांबवता येते. यापठारावरही बऱ्याच इमारतीचे अवशेष आढळतात  येथे किल्ल्यावरील अनेक सैन्यांचा किंवा कारागिरांचा राबता असावा बऱ्यापैकी मोठी फळ झाडेही या ठिकाणी दिसून येतात . तरबंदी सोबत दक्षिणेकडे जातांना उजव्या बाजूस साल्हेरवाडी व डाव्या बाजूस साल्हेरची महाकाय कातर कडा दिसते . अर्ध्या तासाची या पठारावरील पायपीट तरबंदी लगत दरवाज्याकडे घेवून जाते . हा दरवाजा आकाराने मोठा व याची दिशा किल्ल्याच्या बाजूने आहे समोरच भव्य सदरीचा खुला भाग आहे पुढे यु आकारात वळण घेऊन पुढचा दरवाजा लागतो . या दोन्ही दरवाज्यात आलेला शत्रू वरील तटबंदीमुळे सहज काबूत ठेवता येतो . येथे एक देवनागरी लिपी मधील शिलालेखही आढळून येतो . आजही ही तरबंदी अगदी अभेद्य आहे . खडकात कोरलेल्या पायऱ्या काही ठिकाणी वेडेवाकडे वळण घेत खाली जातांना दिसतात . दरवाज्यांची मालिका अजूनही संपत नाही पुढे साल्हेर गावातून येणारे पहिले द्वार लागते . उतरत असतांना डाव्या बाजूला दाट जंगलात मंदिराच्या घंटयाचा आवाज ऐकू येतो . आता आधुनिक काळातील सिमेन्ट मंदिर असून आजू बाजूला मात्र  प्राचीन मंदिराचे अवशेष दिसून येतात . अनेक वीरगळ या परिसरात आहेत म्हणजे या ठिकाणी अनेक मोठ्या लढाई झाल्याची साक्ष देतात . अजूनही आपला पूर्ण गडउतार होत नाही तोच दाट करवंदीचे दाट जाळवण पुढे येते व खाली पुन्हा तीव्र उतारावरून साल्हेर वाडी व तेथील हॉटेल दिसताच जीवात जीव येतो कारण वाघंबे गावातून चढून साल्हेरवाडीत उतरणे हा साधा ट्रेक नाही व साल्हेर सर केल्याच समाधान डाबरी रोडवर आल्यावर जाणवते . पुढील भागात आपण पाहू या इतिहासात गाजलेली अन शिवरायांच्या पराक्रमाची उत्तरेत वचक निर्माण करणारी साल्हेरची लढाई .



क्रमशः

सुरतेवर वचक बसविणारी साल्हेरची लढाई

 सुरतेवर वचक बसविणारी  साल्हेरची लढाई





बागलाण प्रांतात प्रवेश करून विजय संपादन करणे हा स्वराज्यासाठी फार महत्वाचा विषय होता . प्रत्यक्ष त्या प्रांतात घुसून समोरा समोरची लढाई करुन मराठ्यांनी विजय मिळविणे हा त्या काळात उत्तरेकडील भागाशी जुळलेल्या भूभागामुळे एक प्रकारे घरात घुसुन आपले वर्चस्व सिद्ध करत बलाढ्य मोगली साम्राज्याची दहशत संपविणारा होता. येथूनच सुरत जाणारा मार्ग असल्याने सुरतेवर वचक निर्माण होऊन . खान्देशाकडून स्वराज्याकडे येणारी संकटे देखील थांबण्यास मदत झाली. ह्या मोहिमे पूर्वी म्हणजे १६७० मध्येच सुरतेवर छापा टाकून महाराजांनी  औरंगजेबाला मोठा धक्का दिला . ६६ लक्षाची लुट स्वराज्यासाठी मोगली प्रांतांतून मिळाली होती होती . सुरतेवरून पुढे त्या काळात असलेल्या मुल्हेरच्या व्यापारी पेठावरही छापे घातले . वाटेत वणी - दिंडोरीची प्रसिध्द असलेली मोठी लढाई झाली . महाराज स्वतः ह्या लढाईत पराक्रम गाजवत पुन्हा मोगलांचा मोठा पराभव केला . वऱ्हाडातील कारंज्यात मोहिम फत्ते करत खान्देश, बागलाणही मराठ्यांनी लुटले हे ऐकून आता औरंगजेब अधिकच हतबल झाला होता .

           औरंगजेबाने १६७१ मध्ये महाबतखानास दक्षिणेत पाठविले तो बऱ्हाणपूर ओलांडण्याच्या आतच मराठयांनी बऱ्हाणपूरासही मोठा धक्का देत पुन्हा बागलाण प्रांत गाठला होता .महाबतखान येताच त्याने बागलाणातील किल्ले घेण्यास सुरुवात केली . कन्हेरगडाच्या पायथ्याशी झालेली लढाई प्रसिध्द आहे या लढाईत उवघे ६०० मावळे रामजी पांगेरा यांच्या नेतृत्वात मोठ्या पराक्रमाने लढले . दिलेरखान या पराक्रमाने अचंबीत झाला होता. महाबतखान बागलाणात मराठ्यांना गुंतवून दिलेरखान पुण्यावर चालून येत होता . बागलाणात सुरु असलेल्या मराठ्यांच्या कोंडीस तोडण्यासाठी अजिंठा घाट -चाळीसगाव - सटाणा मार्गे प्रतापराव गुजर तर त्र्यंबकमार्गे मोरोपंत पिंगळे यांनी किल्ले जिंकत बागलाणात घुसण्याची योजना आखली . याच वेळी मुघलाकडून इकलासखानाने साल्हेरास वेढा दिला होता . त्याच्या बाजूने  औरंगजेबाचा दुध भाऊ बहादुरखान, राव अमरसिंग चंद्रावत, मोहकमसिग सह ४० ते ५०००० चे सैन्य होते . दुसऱ्या बाजूने मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले,सिदोजी निंबाळकर,खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, सूर्याजी काकडे, मुकुंद बल्लाळ, नागनाथ ही सरदारासह केवळ १०००० चे सैन्य होते . फेब्रु १६७२ मध्ये झालेले हे युद्ध समोरा समोर लढले गेले पण मराठ्यांची सैन्य क्षमता कमी असल्याने नेहमी प्रमाणे व्युहरचना करून चारही बाजुने हल्ला चढवून शत्रूस हतबल केले . बारा तास ही लढाई चालली . सभासद  या लढाईच वर्णन करतांना म्हणतो " युद्ध होताच पृथ्वीचा असा धुरळा उडाला की तीन कोर्स औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा झाले घोडी उंट हत्ती याची गणना नाही रक्ताचे पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले त्यामध्ये लोक रुतो लागले .मोरोपंतांना प्रचंड लूट मिळाली 6000 घोडे सव्वाशे हत्ती सहा हजार उंट आणि अगणित बिछायत कापड चोपड मालमत्ता जवाहर खजिना  हाताशी लागला . वजीर नामांकीत धरले . खासा इकलास व बेलोलखान पाडाव झाला ".

     या लढाईत शिवरायांचे बालपणीचे साथीदार सूर्याजी काकडे स्वराज्याच्या कामी आले . महाराजांना याचे खुप दुःख झाले , " माझा सूर्यराज म्हणजे महाभारतातील कर्ण " असे गौरव उदगार त्यांनी  वीर सुर्याजी साठी काढले . या लढाईने बागलाण प्रांतामधील मोगली दहशत पूर्णपणे संपून मराठ्यांची उत्तरेत वचक निर्माण झाली . मदतीला आलेला दिलेरखान बातमी मिळताच धास्तावून चांदवड कडे निघून गेला .इकलासखान जखमी होऊन पळाला,राव अमरसिह चंद्रावत मारला गेला . औरंगजेब त्याच्या हरलेल्या सरदारांना संतापाने म्हणाला " साल्हेरीच्या युद्धात तुम्ही मेला का नाहीत ?" अशी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ठरलेली साल्हेरची लढाई सूर्याजींसह अनेक स्वराज्य वीरांच्या रुपाने अमर ठरली . वीर सुर्याजी काकडे यांची वीर भूमी ठरली .

मंगळवार, ५ मे, २०२६

सह्याद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*

 *सह्याद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*




स्थान :- छत्रपती संभाजी नगरहून २०० कि.मी ता. सटाणा जि नाशिक


जागतिक वारसा स्थळे म्हणून महाराष्ट्रातील अकरा किल्ले जुलै २५ मध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आली ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे . स्वराज्याच्या स्वाभिमानी क्रांतीकारी कालखंडात राजधानीचा दर्जा मिळालेला व शिवरायांच्या किर्तीने दुमदुमलेला तामिळनाडू मधील जिंजीचा किल्ला देखील याच वेळी या यादीत आला. या वारसा स्थळात असलेला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे किल्ले साल्हेर . महाभूमितील कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरानंतर साल्हेरची उंची क्रमांक दोन वर येते . १५६७ मीटर उंच असलेल्या या किल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामधेही आढळतो . तंजावरचे राजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या आज्ञेने कवी जयराम पिंडये यांनी पर्णालयपर्वतग्रहण्याख्यान या ग्रंथाची रचना केली या ग्रंथात स्वराज्यातील इतर किल्ल्या सोबतच साल्हेरचाही उल्लेख आढळतो . सहयाद्रीचा मुकुट म्हणून या सर्वोच्च दुर्गास शेकडो वर्षापूर्वी सन्मानित केले गेले . उत्तर दक्षिण पसरलेल्या सहयाद्रिच्या कुशीत रयतेचे राज्य सर्व अंगाने फुलले याच सह्याद्रिच्या सर्वात उत्तरे कडील टोकावर अगदी मुकुटा सारखा हा साल्हेर दिसतो .

       बागलाण प्रांतात बागुल राजाचे वर्चस्व होते त्याच बागुल घराण्याच्या ताब्यात हा किल्ला होता . मुघलांनी जेव्हा हा किल्ला घेतला त्यावेळी सुलतान गड असे नाव मुघलांनी दिले होते .५ जानेवारी १६७१ मधे हा किल्ला स्वराज्यात आला .त्यानंतर मुघलांशी या प्रांतात सतत संघर्ष सुरुच होता होता . पुढे फेब्रुवारी १६७२ ला साल्हेरची लढाई झाली .या लढाईत मोगली दहशत संपून साल्हेरच्या पराभवाने औरंगजेब हतबल झाला होता . येथूनच सुरत कडे जाण्याचा मार्ग येतो. सुरतेची स्वारी वेळी महाराजांनी याच मार्गाचा वापर केला होता .कांचनघाट , तेलतवाघाट, बाभुळनेघाटातून गुजरात मध्ये उतरता येते. मुघलाच्या आर्थिक संपन्न असलेल्या सुरत या व्यापारी पेठेवर येथून बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येत होते त्यामुळे बागलान प्रांत स्वराज्यात येणे ही स्वराज्यासाठी मोठी उपलब्धी होती .उत्तरेतही यामुळे स्वराज्याचा प्रभाव वाढला .

    नाशिक जिल्हयातील सटाणा तालुक्यात असलेला साल्हेर परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे . सटाणा - ताहराबाद - मुल्हेर मार्गे वाघांबे गावात पोहचता येते . पुढे हाच पक्का डांबरी रस्ता साल्हेर गावाकडे जातो . किल्ल्यावर पोहचण्यासाठी आजच्या परिस्थितीत दोन मार्ग बर्‍यापैकी आहेत . साल्हेर गावातून जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आहे . वाघांबे गावातूनही जाता येते मात्र हा थोडा अवघड मार्ग आहे . आम्ही वाघांबे गावातून किल्ला चढाईस सुरुवात केली .गावातून किल्ल्याकडे जातांना  उजव्या बाजूस महाकाय साल्हेर व डाव्या बाजुस सालोटा किल्या दिसतो . दोन्ही च्या मध्ये एक खिंड आहे त्या खिंडीत हा मार्ग जातो . साधारणतः एक ते दिड तासाची चढाई करत या वाघांबा खिंडीत पोहचता येते . ही खिंड किल्ल्याच्या पूर्व बाजूस आहे . खिंडीत दोन्ही बाजुस खोल दरी आहे . डाव्या बाजुची पाऊल वाट सालोटा किल्ल्यावर घेवून जाते . उजव्या बाजूस वळसा घेत एकेरी पाऊल वाट झिकझॅक वळण घेत वर जाते येथून एकेरी वाट असल्याने प्रत्येक पाऊल हे सावधानतेनेच टाकावे लागते . सह्याद्रीच्या प्रचंड मजबूत अग्नीजन्य खडकावर वाट निमुळती जरी असली तरी ती आजीबात ढळणार नाही या मोठ्या विश्वासाने प्रत्येक पाऊल आपसूखच पुढं पडत जाते . काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या लागतात व समोरच या वाटेतील पहिला दरवाजा लागतो . शत्रूला पायथ्यापासून या दरवाज्याचे दर्शन दुर्लभच अशी रचना आहे . समोर सालोटा व दक्षिण पूर्व भागातून येणाऱ्या शत्रूवर येथून अत्यंत बारीक नजर ठेवता येते असे . दरवाजा लहान असून त्यावर नक्षी काम दिसून येते . दरवाज्यातून येणारा शत्रु गडाच्या आतील बाजूकडून सहज टिपता यावा अशी स्थापत्य रचना असून सैनिकांना थांबण्यास त्या ठिकाणी जागा केलेली आहे . काळ्या अखंड दगडात पुन्हा पायऱ्या कोरलेल्या आहेत तोफांच्या माऱ्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी त्या तुटलेल्या आहेत . ही मोठी चढाईकरत दुसरा दरवाजा लागतो येथून किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूकडे दुरवर लक्ष ठेवता येते. ज्या गावातून चढाईस सुरवात केली ते वाघांबे गाव येथून नजरेस पडतो व दोन तासा पासून च्या वाटेने आपण वर आलो ती वाट स्पष्टपणे न्याहळता येते . साल्हेर - सालोटा खिंडीतील वरच्या बाजूस हा दरवाजा असल्याने खिंडीतून जाणारी हवा ही प्रचंड वेगाने वाहते . या दरवाज्यावरही बरीच नक्षीकामे व तासिव दगड आहेत . याच ठिकाणी हा दगड फोडत मधून पायरी मार्ग काढला असून या ठिकाणी निघालेले दगड दरवाजा, बुरुज व तटबंदीस वापरलेले दिसतात . काळाच्या ओघात वरुन घरंगळत आलेल्या महाकाय शीळा  या पायरी वाटेत पडलेल्या आहेत .चढाई करत पुढे गेले की तिसरा दरवाजा लागतो हा देखील मजबूतपणे उभा आहे .

       या पुढचा मार्ग किल्ल्याच्या   काताळात कोरलेल्या प्राचीन लेण्या व पाण्याच्या टाकी जवळून जातो . काही ठिकाणी ही वाट अत्यंत अरुंद आहे व खाली हजारो फुट खोल दरी आहे त्यामुळे सावधानता  ही प्रमुखता या ठिकाणी ठेवावी लागते . माकडांचा वावरही येथे बराच आहे . काताळात कोरलेली ही बरीच पाण्याची टाकी व वास्तव्यास उपयोगी अशी रचना असलेली गुफा प्राचीन काळापासून किल्ल्यावरील वास्तव्यास व पाण्याच्या नियोजनासाठी वापरात येत असावी . उत्तर बाजूस असलेल्या काताळातील हया गुफा दुरवरून लक्षात देखील येत नाही . पुढे चालत गेल्यावर वळण घेऊन लगेच किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो . हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . साल्हेर वरील या पहिल्या पठारावरच किल्ल्यातील महत्वाच्या इमारती होत्या आता केवळ त्यांचे अवशेष आहे . या पुढील प्रवास आपण साल्हेर गावाच्या बाजूने कसे उतरायचे, सर्वोच्च शिखरावर असलेल्या परशुराम मंदिरा संदर्भातील अख्यायिका व स्वराज्यात गाजलेली साल्हेरची लढाई  पुढच्या भागात भाग -2 मध्ये बघू या! क्रमशः




संजय खांडवे

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

सत्यशोधक विचार पेरणारे महात्मा फुले........

 सत्यशोधक विचार पेरणारे महात्मा फुले........




 एका अविद्येने किती मोठं अनर्थ घडू शकते हे विद्येविना मती गेली....... यातून सतत आम्ही सांगत असतो .अज्ञानातून अस्तित्व संपते आणि गुलामगिरी येते हा संदेश महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यातून दिला.केवळ लिहून ते थांबले नाही तर मानवाचे कल्याण साधनारे हे विचार ते प्रत्यक्ष समाजात घेऊन गेले कृतीतून त्यांनी आपले काम चालू ठेवले आणि या कार्यात त्यांना साथ मिळाली ती सावित्रीबाई फुले यांची . कर्मठ व्यवस्थेमध्ये सुधारणावादी विचार रुजविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती . त्याकाळात अस्पृश्यता,बालहत्या ,जातीभेद, शिक्षण घेण्यास भेदाभेद ,विधवा वरील अन्याय अत्याचार अश्या अनंत समस्या सामाजिक स्तरावर वंचीत,शोषित घटकावर अन्याय करत होत्या .सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न यामधून संवादात्मक शैलीतून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिकित्सा करत प्रस्थापित व्यवस्थेवर प्रचंड घाव घातले. स्त्री- पुरुष समानतेचा मंत्र देऊन संपूर्ण देशभर मानव समूहाच्या जातपात विरहित समाज जागृतीचे कार्य केले. कृषीच्या आधुनिकीकरणाचा आग्रह धरत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला .आजही शेतकऱ्यांचा संघर्ष काळात या महात्म्याच्या आसुडाचा आवाज कानात कडाडतांना दिसतो . समाजातील शोषित घटकांचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी व्यवस्थेविरुध्द विद्रोह केला . ज्योतीबांनी अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजापुढे सत्याचे महत्व  ठेवले . सत्य वर्तन केल्या शिवाय मानवी प्राणी जगात सुखी होणार नाही असे सांगितले .


 सत्य सर्वांचे आदी घर ॥ सर्व धर्माचें माहेर ॥

जगांमाजीं सुख सारें॥ खास सत्याचीं तीं पोरें॥ 

सत्य सुखाला आधार ॥ बाकी सर्व अंधकार॥

 आहे सत्याचा बा जोर॥ काढी भंडाचा तो नीर ॥

 सत्य आहे ज्याचे मूळ॥ करी धुर्तांची बा राळ॥

 बळ सत्याचें पाहुनी॥ बहुरूप जळे मनी ॥

 खरे सुख नटा नोव्हे॥सत्य ईशा वर्जू पाहे॥

ज्योती प्रार्थी सर्व लोकां ॥व्यर्थ डंभा पेटूं नका ॥

      सत्यशोधक विचाराची पेरणी करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात केली . पुण्यात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसाठी बैठकीस 50 ते 60 मंडळी उपस्थित होती या सभेत खजिनदार म्हणून ज्योतिरावांना नेमण्यात आले त्याचबरोबर नारायणराव गोविंदराव कडलक यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली . सत्यशोधक समाजाने एक नवीन दिशा दिली ईश्वर हा एकच असून तो सर्वव्यापी निर्विकार निर्गुण व सत्त्यरूप आहे व सर्व मनुष्यप्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत हा मानवतावादी संदेश या समाजाने दिला . या ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे ज्याप्रमाणे आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनविण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही . मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनी श्रेष्ठ ठरतो .  माणसाला माणूस म्हणून जगविणारे विचार यातून  समाजास मिळाले . आताच्या आधुनिक काळात ज्या काळाला आपण विज्ञानयुग समजतो या सुशिक्षितांच्या गर्दीत घडत असलेल्या घटना पाहून निश्चितच ज्योतिराव फुले यांनी हे पाऊल शेकडो वर्षांपूर्वीच उचलले होते पण आपण त्यांच्या या विचारावर चालण्यास हतबल ठरलो असेच म्हणता येईल . महात्मा फुले यांच्यावर लिहत असताना माझ्यासारखा एक छोटासा दवबिंदू हा अत्यंत तोडका आहे . एवढे व्यापक आणि महान कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आहे .

       आपल्या बुलढाणा जिल्ह्याची  सत्यशोधकी चळवळीशी  जवळचे नाते आहे. 1882 साली सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील  की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांनी वयाच्या विसाव्या वर्षी विदर्भातील पहिली सत्यशोधक परिषद घेतली ही परिषद मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे 13 मे 1923 रोजी झाली या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे श्रीमंत यमनाजीराव आमले हे होते . स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासू शैलीतून सत्यशोधकी विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले या परिषदेसाठी 5000 च्या वर सत्यशोधकांची उपस्थिती होती पुढच्या काळात सावळा ,हिंगणे ,कारेगाव,सावता किन्होळा, केळवद या ठिकाणी देखील त्यांनी सत्यशोधकी सभा घेतल्या .  येथूनच त्यांचा सत्यशोधकी झंजावात सुरू झाला तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला . ते म्हणत " खरोखरच फुले हे राष्ट्रीय बाग फुलविणारे माळी होते फुलेंच्या हातून गुलामगिरीच्या नरड्याला फास लावून लाखो दिन दुबळ्यांचा उद्धार करावा असा भविष्यकाळाचा संकेत होता आणि म्हणून या तरुण वीराने आपल्या वयाच्या 21व्या वर्षी सार्वजनिक कार्यात पाऊल टाकून राष्ट्रकार्य करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली ."

      आज डोळ्यात अंजन घालणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या या सत्यशोधक विचाराची खरी गरज समाजाला आहे . व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविणारे अनेक मेसेजेस आपण कॉपी-पेस्ट करून पाठवू शकतो पण हे सत्यशोधन होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शेतकरी प्रत्यक्ष शेताची मशागत करून त्याच्या बियाणांची पेरणी शेतात करतो,मेहनत घेतो आणि त्यानंतरच त्या एका बिजाच्या झालेल्या नाशातून अनंत बीजे तयार होतात .  जर व्हाट्सअप फेसबुक वर तो शेतकरी पेरणी व मशागती सदर्भात कितीही मेसेज पाठवत बसला तर तो बीजाची अनंत बिजे कधीच करू शकनार नाही .त्यासाठी त्याला प्रत्यक्ष जमिनीवरच यावे लागेल अगदी चळवळीचेही तसेच आहे मी सत्यशोधक विचाराचा आहे हे म्हणण्यापेक्षा मी सत्यशोधकी कसा होऊ शकतो ही खरी काळाची गरज आहे आणि आपल्या महामानवांनी हे विचार आपल्यासाठी पेरून ठेवले आहेत . प्रत्येकाने चिकित्सा करून व आपल्या सदसदविवेक बुद्धीने हा सत्यशोधक विचार अंगीकारला पाहीजे . हीच खरी आदरांजली महात्मा फुले यांच्या कार्यास ठरेल .



संजय खांडवे

सोमवार, ३० मार्च, २०२६

रेणूका मातेचा चैत्र नवरात्रोत्सव

 *रेणूका मातेचा चैत्र नवरात्रोत्सव*





भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली . रामायण महाभारत या अवश्य महाकाव्यातही दुर्गा अंबिका आदी मातृदेवतांच्या पूजनाचा उल्लेख आढळतो . पुरानात महिषासुरमर्दिनीचे विजयगाना सह महाकाली तथा सप्तमातृकेचे महत्व दिसून येते .

       संपूर्ण भारतात एकूण 51 शक्तीपीठे सांगितले जातात . आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी आई माहूरची रेणुकाई हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहेत आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध पीठ समजल्या जाते . मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेले जालना जिल्ह्यामधील पिंपळगाव हे गाव रेणुकाई मातेच्या नावानेच ओळखले जाते . अगदी माहूरच्या रेणुकाई पासूनचा प्रवास आपण बघितला तर या मार्गाने अनेक रेणुकाई मातेची ठाणी दिसून येतात यामध्ये चिखली- मर्दडी माता - पिंपळगाव रेणूकाई - बाजारसावंगी- ते वणीच्या अर्ध पीठा पर्यन्त जाऊन पूर्णत्वास जाते .ही ज्या त्या प्रदेशातील शक्ती पिठांवर स्थानिक मोठ्या भक्ती भावाने त्यांची पूजा अर्चना करत असतात . पिंपळगाव रेणुकाई हे आईचं ठाणही अगदी तसेच आहे . या गावातील प्रत्येक माणूस हा सकाळी आईच्या दर्शनानेच आपल्या नित्य कामास सुरुवात करतो .

    चैत्र शुद्ध षष्ठी पासून या चैत्र नवरात्री उत्सवास सुरुवात होते आणि पौर्णिमेस हनुमान जयंती या उत्सवाची सांगता होते . मुख्य उत्सवास पहिल्या दिवशी पालखी सोहळा आयोजित केला जातो .  पालखीत रेणूकाई मातेचा चांदीच्या मुकुटासह सर्व परंपरगत श्रृंगारासह संपूर्ण गावास प्रदक्षिणा घातली जाते खांदयावर अगदी मोठ्या भक्ती भावाने ही पालखी घेतली जाते .सनई - संबळ . शंखं आदि पारंपारीक वाद्यासह बॅण्ड बाजासह दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यन्त हा उत्सव चालतो . संबळ हे विधिनाट्यातील वादय संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकते . संबळ या वाद्याबाबत एक कथा सांगितली जाते यामध्ये महिषासुराचे दोन शिष्य म्हणजे चंड आणि मुंड या दैत्याचा देवीने वध केला त्यावेळी ते दोन शिष्य म्हणाले हे देवी तू आम्हाला मारण्याआधी तुझ्या कामी आमचा देह वाजवा अशी आमची इच्छा आहे म्हणून चंड व मुंड दैत्याच्या शीर व कातडी पासून संबळ तयार केले गेले आणि हे संबळ वाजून देवीला शांत केले जाते अशी परंपरा आहे .यामध्ये ज्योत पेटवून यात्रेत दिवटी फिरवली जाते . या .पालखी सोहळ्यात दृष्य स्वरुपात भारूड तथा तगदराव व वाघ्या मुरळी ह्या अंगीभूत कौशल्य असलेल्या, पारलौकिक तत्वज्ञान सांगत पुढच्या पीढीत संस्कारातून संक्रमित होत चाललेल्या प्राचीन लोक परंपरेच्या झाँकी अगदी रात्रभर चालतात . या उत्सवात लेकी- बाळी दरवर्षी न विसरता आपल्या मुला बाळासह हजर असतात . मातृशक्तीचा समृद्धी रुपी यशवंत कीर्तीवंत घडविणारा कृपायुक्त आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव अखंडीतपणे असाच राहू दे अशी या प्रसंगी प्रार्थना करतात . पंचक्रोशीतील  अनेक लोक सहकुटुंब या उत्सवात सहभागी होताना दिसतात ही परंपरा गेल्या तीनशे वर्षांपासून या गावात सुरू आहे . गावातील लहान मुले तथा तरुण वर्ग या पालखी सोहळ्यात लाठीकाठी सारखे मर्दानी खेळ रात्रभर खेळताना दिसतात .

      महोत्सवाचा दुसरा दिवस हा वगदा -वगदी आणि मल्लखांब तथा कुस्ती या सोहळ्याने गजबजलेला असतो . वीरतेचे व शौर्याचे प्रतीक असलेले हे खेळ आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेत अगदी प्राचीन काळापासून खेळले जातात आणि हे जपण्याचं काम हे गाव या निमित्ताने करताना दिसते . कुस्ती मध्ये मोठी बक्षीसे या उत्सवात दिली जातात . महाराष्ट्र भरातून नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात . परिसरातील हजारो लोक या स्पर्धेचा सतत दोन दिवस न चुकता आनंद लुटतात . यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उर्वरीत कुस्ती सामने व सायं रेणुकाई माते समोर पारंपारीक पद्धतीने वाद्या सह पोत खेळला जातो .  देवीचा भंद फिरविला जातो.परिसरातील वादय वादक सतत तीन दिवस आईच्या सेवेत असतात . मातृ देवतेची उपासना करणारी शक्ती प्रेरणा ही शेकडो वर्षाच्या परंपरा जपण्यासाठी  प्रचंड गर्दी उसळते . शेवटच्या दिवशी पौर्णिमेस म्हणजे हनुमान जयंतीस भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते . 

      रेणुकाई मातेच्या मंदिर परिसरात प्राचीन दगडी कोरीव मंदिराचे अवशेष आढळतात शिवाय मंदिराच्या दक्षिणेस वीटांनी बाधलेली सुंदर प्राचीन बारव आहे . गावाच्या पूर्वेस अवघडराव सावंगी येथील प्राचीन पाताळेश्वर मंदिर व पश्चिमेस असलेले अन्वा येथील प्राचीन मंदिर या गावाचे धार्मिक व प्राचीन महत्व विषद करतात . श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नागनाथ महाराजांचे मंदिर , भैरवनाथ मंदिरामुळे धार्मिक परंपरा या गावाला आहे . मारोती मंदिरा बाहेर असलेली वीरगळ या गावच्या शौर्याची परंपरा सिद्ध करते . 

       भूमीदेवता, युद्धदेवता , आरोग्यदेवता, सुबध्दतेचीदेवता, जलदेवता, नवनिर्मिर्तीदेवता , पुनरुत्पादनदेवता असलेल्या रेणुकाई मातेसोबतच जोगेश्वरी , तुकाई या मातृदेवतांचे पूजनही मोठ्या मनोभावे या परिसरातील स्थानिक करतात . अठरा परगड जाती धर्मास सोबत घेऊन महाराष्ट्राची प्राचीन लोकपरंपरा जपणाऱ्या पिंपळगाव रेणुकाई गावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



संजय खांडवे

9011971122

रविवार, २९ मार्च, २०२६

सनदी अधिकारी अन उदयोजका पलिकडचे सुनिल शेळके.........*

 



*सनदी अधिकारी अन उदयोजका पलिकडचे सुनिल शेळके.........*


माणसाला एखादया गोष्टीची आवड आहे म्हणजे त्या विषयी निश्चीतच खोलवर कुठेतरी एक नाळ जुळलेली असते व ती आपल्या आंतरीक प्रेरणेशी देखील  तेवढीच जुळलेली असते . आवड असली की सवड मग आपसुखच निर्माण होते .आपल्या व्यस्ततेमधून ही सवड काढणे हे देखील एक कौशल्यच असते व ते ज्याचे त्याच्यावर अवलंबुन असते . असेच एक बहुपैलू व्यक्तीमत्व म्हणजे सुनिल शेळके साहेब ! मराठा सेवा संघाच्या सुरुवातीच्या काळात साहेबांशी संपर्क आला व केडर बेस तालमीतून आम्ही फुले -शाहू-आंबेडकर चळवळीशी जोडले गेलो . अत्यंत मितभाषी , शांत व संयमी अधिकारी तथा सेवा संघाचा एक चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो हे अगदी जवळून आम्ही अनुभवले . अधिकारी म्हणून ते आमच्याशी त्या वेळी देखील वागत नसत . चळवळीच्या विचारांची नाळ त्यांच्या बोलण्यातून कमी अन कृतीतून आजही जाणवते.

           सल्ला मसलतीतून पुढे जात राहणे ही त्यांची सामाजिक तथा औद्योगिक यशाची गुरुकिल्लीच हे त्यांच्या सहवासातून आम्हाला सदैव जाणवत राहते . ओ.बी.सी.समूहाच्या अनेक समस्याचा त्यांनी अभ्यास केला व येणारा काळात अधिकारी तथा कर्मचारी स्तरावर ओबीसी बांधवाच्या समस्या सोडविणारे हक्काचे विचारमंच असावा हा उद्देश ठेवत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून यावर चिंतन केले. अनेक ठिकाणी चर्चासत्रे घेतली व या विचारमंथनातून ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची स्थापना महाराष्ट्र स्तरावर केली . आज छत्रपती संभाजी नगर ,मुंबई तथा शेगाव या ठिकाणी भव्य असे राज्यस्तरीय अधिवेशने घेऊन ओबीसीना संघटीत करून विचारमंथनाचे काम या माध्यमातून करत आहे . संपूर्ण राज्यभर विभाग व जिल्हावार कार्यकारणी स्थापन करत काळाची गरज ओळखत ऑनलाइन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर एक फार मोठी चळवळ ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर आज उभी राहिली आहे . अधिकारी आणि कर्मचारी यांचे यांचे प्रशासनिक, न्यायीक तथा वैय्यक्तीक स्तरावरील समस्या हे संघटन सोडवत आहे .विद्यार्थी- पालक यांच्या साठी शिबिरे घेऊन त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्याचं काम आता आपोआपच घडतांना दिसत आहे आहे .आवडीमुळेच ही सवड ते काढतात यात शंका नाही .

          सनदी अधिकारी असतांना ते मंत्री महोदयाचे  ओ एस डी होते . ते आम्हाला नेहमी म्हणत तुम्ही गड किल्ले भ्रमंती करता आणि त्या माध्यमातून इतिहास समजून घेत आहात आम्हालाही एकदा तुमच्या सोबत गड कोट दाखवा ही इच्छा व्यक्त केली . हिंदवी परिवाराच्या उंबर खिंड ,सुधागड आणि सरसगड या मोहिमेमध्ये ते सहकुटुंब आमच्या सोबत होते . पहिल्यांदाच सतत दोन दिवस त्यांचा सहवास लाभणार होता , त्यांनी सनदी अधिकारी असल्याची मूळ ओळख या ठिकाणी लपवली आणि एक सामान्य शिवरायांचा मावळा म्हणून दोन दिवस ते मोहिमेतून उंबरखिड उतरून इतिहास समजून घेतला . मुंबईवरून ते मुलगा शिवबा सह लोणावळ्यात आम्हाला भल्या पाहटेच भेटले ताई महत्वाच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी येणार होत्या. त्यांच्या सोबत १५ ते १८ कि . मी चा उंबरखिंड पर्यन्तचा ट्रेक पूर्ण करता आला ज्या वाटेने हे सैन्य उतरले तो मार्ग आजही घनदाट अरण्य व जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेला आहे . लोणावळयातून कुरवंडे गावात वाहने सोडून ट्रेक सुरु होतो . गावातून उंच टेकडीवर पोहचल्यावर समोर उंच डोंगरी टोक दिसते तोच नागफणी डोंगर आहे .एका तासाची चढाई याची आहे . त्याच्या खालीच इंद्रायणी मातेचे उगम स्थान आहे . नागफणी टेकडीवर महादेव मंदिर आहे . पण आम्ही उंबरखिंडीत उतरत असल्याने टेकडीच्या पायथ्याशी डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने कडे डोंगर कड्यांचा आसरा घेत घटदाट जंगल पार करत दोन तासात एका पठारावर पोहचलो व तेथून पुन्हा घनदाट व जाळी मधून वाट काढत उतरून नदीच्या पात्रात उतरलो व समोर चावणी  गाव दिसले . तेथुन पुढे पकक्या वाटेने उंबरखिंडीत पोहचता येते .हा ६ ते ७ तासाचा प्रवास आहे . हाच रस्ता पुढे शेंबडी फाट्यावर जाऊन पाली महामार्गाला मिळतो . हा चित्तथरारक असा अनुभव प्रत्यक्ष उंबरखिंडीत उतरतांना वेगळाच वाटतो . नेताजी पालकरासह स्वतः शिवाजी महाराज या लढाईत उतरले होते . सपूर्ण चिलखती पोषाख व डोक्यावर शिरस्त्रान घालून हातात भाला कमरेस तलवार पाठीवर ढाल अन धनुष्य बाणासह शत्रुच्या वधासाठी घोड्यावर आरूढ होऊन महाराज स्वतः लढले होते अशी शिव स्पर्शान पावन भूमीत एक वेगळाच अनुभव येतो .साहेब एका मावळ्या सारखे वाटेत चर्चा करत इतिहास समजून घेत होते.  या वाटेत आमदार बच्चु कडु , पोपटराव पवार व अशी अनेक अनामिक मावळे आपली ओळख न दाखवता   समरभूमिला नतमस्तक होत होते . 

         दुसरा दिवस हा सुधागड मोहिमेचा होता रात्री मुंबई जाऊन पुन्हा सकाळी ७ वाजता ताई अभिता व शिवबासह मोहिमेत येणार होते .अत्यंत घनदाट जंगलांत असलेला सुधागडास जाण्यास दोन मार्ग आहेत पहिला धोंडसे गावातून महादरवाजा मार्ग व दुसरा पाश्चापूर ठाकूरवाडी मार्ग  आम्ही धोंडसे मार्गे निघालो व त्यांना उशीर झाल्याने मागे होते होते . दाट जंगलातून जातांना मोबाईल नेटवर्क बंद पडले व यातच त्यांचा मार्ग चुकला व उलटया बाजूने ते गडावर चढू लागले . दाट जंगलातून मोठ्या हिम्मतीने त्यांनी अभिता , शिवबा व ताई सह लटकणाऱ्या लोखंडी पायऱ्या चढून चिलखती बुरुजा खाली पोहचले . संपूर्ण निर्मनुष्य परिसरात आमचा नेटवर्क  मिळाल्यान  कसातरी संपर्क झाला व स्थिती कळाली . आम्ही एकमेकांच्या विरुध्द दिशेने चढत असल्याने दोघामधले अंतर बरेच होते त्यावेळी अभिता थकल्याने पुन्हा खाली उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला . त्या दिवशी आम्हाला गड उतरून ठाकूरवाडीत उतरायलाच रात्रीचे आठ वाजले होते . त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच ठरला . मोठ्या धैर्याने आम्ही पुढे गेलोय या आशेने ते निर्मनुष्य घनदाट वाटेतून  भ्रमंती ते करत परत गेले . कोणी एकेकाळी स्वराज्याच्या राजधानी साठी विचार केलेल्या सुधागडाची चढाई त्यांनी केली . त्यामुळेच कुठलंही भय त्यांना या पावन भूमित वाटलं नाही . ही महाराजाप्रतीची त्यांची निष्ठाच म्हणावी लागेल हे साहेब कधी आम्ही अनुभवलेच नाही .

         आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची  सत्यशोधकी चळवळीशी  जवळचे नाते आहे. 1882 साली याच विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील  की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! त्यांच्यासोबतच पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी समाजासाठी आपला देह झिजवण्याचे  काम केले आहे . अभिता फिल्मच्या माध्यमातून त्यांचा आलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे सत्यशोधक ! या चित्रपटाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला अनेक भाषांमध्ये याचे डबिंगही झाले . मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे महात्मा फुले आणि ज्योतिबा यांचे चरित्र त्यांनी उभे केले . आगामी काळात त्यांचा येणारा महापरिनिर्वाण हा चित्रपट देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असणार आहे त्याचं कामही आता पूर्ण होऊन रिलिजच्या प्रतिक्षेत आहे. प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवर अनुभवलेले साहेब तेही एक वेगळच चित्र होतं . हे त्यांचे क्षेत्र नव्हतं पण त्या क्षेत्रातही ते काही कमी नाही हे त्यांनी यावरून दाखवून दिले .   सनदी अधिकारी असताना आणि  अधिकारी पदाचा राजीनामा दिल्या नंतर एक मोठे उद्योजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठी उद्योजकात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली . त्याच्याही पलीकडचे असलेले सुनील शेळके साहेब हे एक वेगळेच अवलिया व्यक्तिमत्व त्यांच्या या बहुपैलु व्यक्तीमत्वाचा केवळ काही अंश अनुभवातून लिहीत असताना त्यांना या कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही जिजाऊ चरणी प्रार्थना .



संजय खांडवे

बुलढाणा

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...