मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

महा वारसा

*महा वारसा*

विश्वाची निर्मिती संदर्भात चर्चा करतांना जो महत्वाचा विचार समोर येतो की,   एका मोठ्या महाविस्फोटातून विश्वाने आकार घेतला . अगणित धुलीकण व वायु पासून ही आकाशगंगा तयार झाली .आईनस्टाईन व स्टिफन हॉकीन्स सारख्या जगविख्यात शास्त्रज्ञांनी याची मांडणी केली . असंख्य कोटी वर्षाच्या कालखंडाच्या उत्क्रांती नंतर पाणी- सूक्ष्मजीव - जलचर आदि जीवांचे स्थित्यांतरे होऊन मानवी उत्क्रांती होत मानव अश्मयुगापर्यन्त आला . निर्सग शक्ती पुढे लीन होत ताम्रपाशान काळापर्यन्त आला .पृथ्वी , जल , वायू, अग्नी या निर्गुण शक्ती ची उपासना करत जंगलात समूहाने पर्वत गुहा आदि अधिवासात राहू लागला . मध्यप्रदेशातील  भोपाळ जवळील भिमबेटका या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यावर दहाहजार वर्षापूर्वीचा मानवी संस्कृतीची कल्पना येते . आजही शाबूत असलेल्या भित्ती चित्रावरून त्या काळच्या लोकजीवनाची प्रचीती येते . पुढे हाच मानव वसाहतीच्या समृध्दी बरोबरच सृजन व सुफलतेच्या मातृदेवतांचे उपासना करत तो निर्गुण उपासनेकडे वळू लागला . मग याच गरजेतून कृत्रीम अधिवास , वर्षावास , शैलगृहे , लेणी , मंदिरे , सुरक्षितते साठी  दुर्ग, गावांना तटबंदी ,प्रार्थना स्थळे आदि निर्माण झाली विविध राजवटीत त्यांच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक तथा सुरक्षाविषयक व सांस्कृतीक परिस्थिती नुसार वास्तु निर्माण कार्य केले गेले .
      ऋग्वेदामधे तटबंदी करून लोक राहत व ही तटबंदी जल , गिरी , वाळवंट, खंदक, कृत्रीम तटबंदी , विषारी वनस्पती याची असत व त्या अधिवासास 'पूर ' म्हणत . सिंधू संस्कृतीमधेही अशीच कृत्रीम  तटबंदी पूरांना होती. ही पूर म्हणजे दुर्गच !  महाभारतातही शांतीपर्वात दुर्गाची माहिती येते . रामायणातही दुर्गाचा उल्लेख आलेला आहे . कौटिल्याच्य अर्थशास्त्रात सुद्धा अध्याय 2 मधे दुर्गरचना व किल्याची नगररचनेचे विवेचन केले गेले आहे . 'अभिलाषितार्थचिंतामणी ' या ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर दुर्गाचे नऊ प्रकार सांगतो .रघुनाथपंत हनुमंते कृत 'राज्यव्यवहारकोषात ' दुर्गवर्ग म्हणून स्वंतत्र प्रकरण आहे . 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग ' असे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहलेल्या आज्ञापत्रातील दुर्ग या प्रकरणात येते.
धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।
वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥
छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .
           लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली . सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो.   दुर्ग हे व्यापारी मार्गावरील पहारेकरी तर लेणी ह्या आश्रयगृहे म्हणून होती . नाणे घाटाच्या व्यापारी मार्गातील सर्वच किल्ले व लेणी याची साक्ष देतात . लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला . सातवाहन , वाकाटक ,गुप्त , राष्ट्रकूट , चालुक्य , यादव आदि काळात अनेक मंदिर व शिल्पे निर्माण झाली. पुढील काळात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार केला. शेकडो बारव, तलाव घाट व पाणवठे लोकोपयोगासाठी  बांधले . अशा या समृध्द व भव्य निर्माणा मागे आपल्या पूर्वजांची एकजूट दिसते . हजारो वर्षानंतर आजही टिकून असल्याने या निर्माण कार्यातील प्रामाणिकपणा, वैज्ञानिक अचूकता , स्थापत्य निपुणता , भौगोलिक ज्ञानाची परिपूर्णता जाणवते . हा आपल्या महाभूमिचा समृद्ध वारसा आहे. आज मात्र हा काळाच्या ओघात नष्ट होत आहे . गडकोट, बुरुज ' तटबंदी ढासाळतांना दिसत आहे . बहुतेक वारसास्थळे तर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली दिसतात .अनेक प्राचीन मंदिरे व लेण्या सर्वधनाच्या प्रतिक्षेत आहेत .लेण्या मधील प्राचीन चित्रशैली पुसत चालली आहे. कोणे एके काळी मुबलक पाणी पुरवणारी प्राचीन बारव , पुष्कर्णी व तलाव गाळवटत आहेत . प्राचीन मंदिराचे सिमेंटीकरण व त्यावरील आधुनिक रंगलेपन हे मूळ वास्तु पासून दूर घेवून जात आहे . स्मृतीपटलातून दूर होत आहे . आपल्या पूर्वजांच्या डोळयांनी जे पाहीले ते पुढच्या पिढीतील डोळ्यांना आता आहे तसे तरी  बघायला मिळेल की नाही याची शाश्वती कमीच वाटायला लागली आहे . *दै महाभूमि मध्ये प्रत्येक सोमवारला " महा वारसा " या साप्ताहिक सदरामध्ये आपल्या महाराष्ट्र भूमितील प्रत्यक्ष भेटी दिलेल्या गड किल्ले ,लेणी , मंदिरे , बारव आदि प्राचीन वारसा स्थळांचे ऐतिहासिक महत्व विश्वासर्ह संदर्भासह आम्ही वाचकापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत . गड किल्ले ,लेणी ,मंदिरे या विषयी सविस्तर माहिती सह भ्रमंतीकारांना पोहचण्याचा मार्ग व त्या ठिकाणची महत्वाची ठिकाणे , संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आदि विषयी माहिती देणार आहे या माध्यमातून आपल्या प्राचीन महा वारसा  संवर्धन व जतनाच्या कार्याची छोटीशी सुरुवात करत आहोत .*


संजय खांडवे
इतिहास अभ्यासक 
9011971122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...