कांचनबारीचा रणसंग्राम
स्थान : ता. चांदवड जि . नाशिक
मार्ग नाशिक - चांदवड महामार्गावर वडाळे भोई फाट्यापासून आत
बुधभूषण या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजीराजे स्वकुलातील आपल्या आजोबांचे वर्णन करतांना त्यांना "अभवतअर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासवः" म्हणजे अर्थकारण व विविध कलामधील विशारद असे शाह नृप थोर असे संबोधतात . संस्कृत भाषेचे महापंडीत असलेले आजोबा व पुढे किशोर वयातच संस्कृत भाषेत पारंगत झालेले बुधभूषणकार शंभू राजे हे भोसले वंशीयांचे संस्काराचे अप्रतिम उदाहरण आहे . अर्थकारणातही पारंगत असलेले अर्कज्ञ, सहस्रकरविक्रमी, महाबली शहाजी राजे आपल्या समोर कुणी मांडले नाही . आबासाहेबांचे हाच आदर्श शिवरायांनी पुढे जोपासला . स्वराज्य उभं करत असतांना अर्थ कारण किती महत्वाचे याची जाणिव महाराजांना ही वंश परंपरेच्या संस्कारातूनच मिळाली . महाराज जेवढे शूर योद्धे होते तेवढेच ते साहसी,बुद्धीवान व जाणते अर्थतज्ञही होते . राजकिय अर्थकारण ते चांगलेच समजून होते . वेळे अगोदरच त्यांनी स्वराज्यासाठी शाश्वत अर्थकारण उभे केले . त्यासाठी योग्य वेळी सल्लामसलतीने योग्य निर्णय घेऊन तश्याच मोहिमा आखल्या . शहाजीराजे यांनी स्वराज्यासाठी दिलेली संस्कृत राजमुद्रेचा दुसरा अर्थ देखील भरभराटी व वैभव असाच निघतो . ज्यावेळी स्वराज्यावरती परकीय आक्रमणे होत त्यावेळी स्वराज्याच्या अर्थकारणाचे झालेले नुकसान महाराजांनी लगेच भरून काढलेले दिसते . अफजली संकटाने स्वराज्यात केलेली प्रचंड नासधूस अन त्यानंतर लगेच त्याला याच मातीत गाडल्यानंतर त्याच्या सैन्यातील हत्ती, घोडे, शस्त्र, तोफा, दारगोळा,मौल्यवान रसद भरपाईचेच एक तंत्र होते . हेच उंबरखिंडीच्या लढाईचा देखील हिशोब महाराजांनी लगेच पूर्ण केलेला दिसून येतो . शाहिस्ताखानाच्या वेळेसही तसाच पूर्ण केला .
मोगली आक्रमणे सतत स्वराज्यावर चालून येत असत त्यामुळे स्वराज्याचे सर्वच बाजूने नुकसान होत असे . रयतेच्या रक्षणार्थ उभारलेल्या सैन्याचा खर्चही स्वराज्याला उभारावा लागत असे म्हणून महाराजांनी मोगलांना तशी भरपाई देण्याची देखील मागणी केली होती . हे न ऐकल्याने मोगलांची जागतिक व्यापारपेठ असलेली सुरती व्यापारीपेठेवर दोन वेळेस महाराजांनी मोहिम आखलेली दिसते . पहिली मोहिम ६ ते १० जाने १६६४ व दुसरी ३ ते ५ आक्टो १६७० म्हणजे अश्विन शुध्द अमवस्येचा काळ येतो अर्थात लक्ष्मीपूजनचा दिवस . दुसऱ्या मोहिमेत १ करोडचा ऐवज स्वराज्यात आला होता .
अखंड सावधानता हा शिवचरित्रातील एक महत्त्वाचा पैलू . तत्कालीन राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास महाराजांचा होता कोणत्या वेळी कोणत्या स्वराज्य हिताच्या योजना आखायच्या हे महाराजांना त्यांच्या बुद्धीमत्ता व चिकित्सक धोरणामुळे सहज कळायचे . तेवढेच स्वराज्याचे गुप्तहेर खाते देखील अधिक सक्रिय होते .महाराजांच्या सुरतेच्या दुसऱ्या मोहिमे अगोदर औरंगजेब हा काबुल कंधार मधील पठाणांच्या झालेल्या बंडात गुंतलेला होता . दिलेरखान आणि औरंगजेब पुत्र मुअज्जम या दोघांमधील दुही देखील महाराजांना माहीत होती . सुरत कारावरच्या नोंदीमध्ये देखील मुअज्जम शिवाजी राजांना मिळून हा मोगला विरुद्ध बंड करत असल्याच्या नोंदी आढळतात . दिलेरखान देखील औरंगजेबाकडे तशी तक्रार करतो . कल्याण - भिवंडी -तलासरी मार्गे सुरत वर स्वारी करून महाराज बागलाण मधून साल्हेर -मुल्हेर -ताहराबाद- कांचनबारी जुन्नर ते पुणे असे सुखरूप पोहचतात . या संपूर्ण मोहिमे दरम्यान कांचनबारी या खिंडीमध्ये मुगल आणि मराठ्यांमध्ये घनघोर लढाई झाली . नाशिक शहरापासून (६०किमी) चांदवड मुख्य महामार्गाने समोर गेल्यावर वडाळी भोई फाट्यापासून आत जावे लागते . या खिंडीमधून मुख्य डांबरी सडक जाते त्याच्या बाजूलाच कानमंडाळे गावातील दुर्गप्रेमी तथा गावकऱ्यांनी मिळून शौर्य स्मारकाची उभारणी केली आहे . उजव्या हाताला उंच कांचन गड आहे .मुघलांविरुद्ध महाराजांनी स्वतः या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजवला म्हणून या जागेचे वेगळे महत्त्व आहे .
महाराज सुरतेवरून निघाले त्या अगोदरच दाऊदखान कुरेशी हा खान्देश- बुऱ्हानपूरचा सुभेदार औरंगजेब पुत्र शहजादा मुअज्जमला भेटला होता त्याच्या लव्याजम्या सह १६ आक्टो . १६७० रोजी चांदवडला येऊन पोहोचला त्यावेळी चांदवडचा किल्लेदार बागीखान हा भयभीत झाला पण दाऊदखान असल्यामुळे त्याच्या जीवात जीव आला . महाराज सुरतेकडून येताना कांचनबारी वरून जाणार ही खबर गुप्त हेरा मार्फत मुघलांना मिळाली होती . इकलास खान मकरंद,खत्री दाऊद खानचा भाऊ शेख शफी, बसवंत राय,अब्दुल वधुत या सरदारासह ते कांचन बारीकडे निघाले . तारीख - ए- दिलखुशा लिहिणारा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना देखील त्यांच्यासोबत होता .दोन तुकड्यात त्यांनी सैन्य विभागणी केली ही इकलास खान याच्याकडे तोफखाना सोपवल्या गेला त्याच वेळी मराठ्यांच्या बाजूने युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवराय करत होते त्यांच्यासोबत प्रतापराव गुजर आनंदराव वरकड,व्यंकोजी दत्तो, बाळाजी आवजी, मोरोपंत पिंगळे हे पराक्रमी सरदार होते . दोन प्रहर म्हणजे सहा तास हे युद्ध चालले मराठ्यांच्या युद्ध तंत्रापुढे मुघल नेहमीच हतबल होत असत या युद्धातही अगदी तसेच झाले समोरासमोरील लढाईत मराठे घारी सारख्या घिरट्या घालून शत्रूला कमकुवत करत . मराठे कोठून आणि कसा हल्ला करत हे देखील त्यांना कळत नव्हते .ही परिस्थिती पाहून अनेक मोगली सैन्य सैरावैरा पळायला लागले . मोगलांचे दहा हजार सैन्य व त्यासोबतच मराठ्यांचे दहा हजाराचे घोडदळ या दोघांचीही घनघोर युद्ध या खिंडीत चालले . मराठ्यांचा मोठा विजय या लढाईत झाला .
कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बखरीत याची नोंद केली आहे "खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुग्गी घालून, हाती पट्टे चढवून, मालमत्ता घोडी पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार स्वारांशी सडे सडे राऊत उभे राहिले ". महाराज स्वतः दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन अंगात चिलखत व शिरस्त्रान सह या युद्धात लढत आहेत . दहा हजार राऊत म्हणजे घोडेस्वार हे त्यांच्यासोबत आहेत . त्याचवेळी सुरतेवरून आणलेला खजाना हा कोणत्या मार्गे आणि कसा पुढे गेला हे एक मोठे कोडेच होते युद्धात लढणाऱ्या मावळ्यांना देखील कदाचित ते माहीत नसावे . या लढाईस वणी दिंडोरीची लढाई देखील म्हणतात . उंबरखिंडी प्रमाणेच महाराज या लढाईत लढले . जेधे शकावली नुसार कार्तिक शुदध चर्तुदर्शीस हा संग्राम घडला म्हणजेच १७ आक्टो १६७० रोजी हा रणसंग्राम घडला .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा