*सहयाद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*
भाग -2
मागील भागात आपण वाघांबे गावातून चढाई करत सालोटा किल्ल्याच्या बाजूने चढाई करत चौथ्या दरवाज्यापर्यंत आलो होतो . हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . पश्चीमेकडे जात असतांना उजव्या बाजूस प्रचंड खोल दरी आहे. साल्हेरास अशी नैर्सगिकच सुरक्षा सर्वांगाने लाभलेली आहे त्यामुळे हा अत्यंत अवघड आहे . या पठारावरच राजवाड्यासह गडावरील आवश्यक असलेल्या इमारतींचे केवळ दगडी अवशेष शिल्लक आहेत . किल्ल्यावर बाराही महिने पाणी असणे ह्यावरून त्या गडाचे महत्व,जसे पाणी तसा किल्ला अधिक उपयोगी म्हणून साल्हेर त्यापैकीच एक आहे . समोरच प्रचंड उंचीवर असलेला काताळ कोरून व आवश्यक त्या ठिकाणी दगडी चिरेबंदी करून शेकडो वर्षापासून पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ न देणारा गंगासागर तलाव आहे . बाजूलाच दोन आयाताकृती समांतर असलेली पाण्याची टाकी आहे . आजही अत्यंत थंडगार व काचासारखे पारदर्शक पिण्यायोग्य पाणी त्या टाक्यात आहे . बाजुला एक उंबराचे झाड असून त्या ठिकाणी गुफेसारखा भाग आहे . दगडी शिळेमध्ये अत्यंत कलाकुसरीने कोरलेले रेणूका देवीचे मंदिर आहे .मंदिरासमोरच काताळात कोरलेल्या दोन मोठ्या लेण्या आहेत . किल्ल्यावर थांबणाऱ्यासाठी हे विसाव्याचे ठिकाण आहे. येथून पुन्हा वर सर्वोच्च शिखराकडे जाणारी पाऊल वाट आहे . खडी चढाई करत वेडे वाकडे वळण घेत अर्ध्या तासात दुसऱ्या पठारावर पोहचतो . हे लांबट निमुळते पठार विश्रामगडा सारखेच असून येथे हवेचा वेग प्रचंड वाढतो . दक्षिण बाजूस तर कोकण कड्यासारखीच प्रचंड काताळकडा आहे . पूर्वेस पुन्हा एक निमुळते शिखर दिसते व अशीच थोड़ी चढाई करणारी पाऊलवाट या दुसऱ्या क्रमांकाच्या शिखरावर घेऊन जाते . येथे पाच पन्नास लोक थांबू शकेल येवढीच जागा असून परशुरामाचे छोटेसे मंदिर असून त्या ठिकाणी दगडी मुर्ती देखील आहे . परिसरातील लोक या ठिकाणी दर्शनास येतात .
येथून संपूर्ण बागलान प्रांत न्याहाळता येतो . मोरागड -मुल्हेर व हारगड हे त्रिकूट त्याचबरोबर रतनगड ,सालोटा ,भिलाई ,चौल्हेर मांगीतुंगी ,पिंडवल, धोडप,कन्हेरा, देरमाळ, पिसोळं,अचला आदि किल्ले इथून स्पष्ट दिसतात गडपारखी ते लगेच ओळखू शकतात . धामन्या दिघई डोंगर देखील समोरच दिसतो .पुन्हा याच पाऊलवाटेने रेणुका माता मंदिरापर्यंत खाली परत यावे लागते आणि मग साल्हेर गावाच्या बाजूने असणाऱ्या दुसऱ्या मार्गाने खाली उतरता येते . वाटेत पहिल्या पठारावर असलेले पाण्याच्या टाक्यांचा समूह लागतो बाजूलाच एक यज्ञ कुंड सदृश्य जागा आहे . स्थानिकांच्या माहितीनुसार वैशाख शुद्ध तृतीयेस या ठिकाणी परशुराम जयंतीनिमित्त मोठी यात्रा भरण्याची परंपरा आहे ती याच पठारावर भरते . या परिसरातही अनेक इमारतींचे अवशेष दिसून येतात . किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडून साल्हेर गावात उतरताना एकूण सहा ते सात दरवाजे लागतात उतरण्यासाठी मध्यम गतीने उतरत गेल्यास दोन तासही लागू शकतात . साल्हेराची उंची आणि या किल्ल्याची अभेद्यता, प्राचीन कातळात अत्यंत अवघड ठिकाणी असलेला लेणी समूह व पाण्याची सुबद्धता व साल्हेर गावाकडून उतरत असताना असलेले दगडी स्थापत्य शैली यामुळे या साल्हेरास जागतिक वारसा स्थळात जागा मिळाली असावी . साल्हेरचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला असलेले द्वार हे बरीच लहान आहेत . एक आड एक द्वारानंतर तिथून खाली असलेल्या शत्रूवर नजर ठेवून या ठिकाणाहूनही त्याला भेदता येते अशी रचना दिसून येते .
खाली उतरत असताना ह्या पहिल्या द्वारातच नागदेवतेचे शिल्प आहे छोटी कमानीदार नक्षीयुक्त दरवाज्यातून पुन्हा दगडी पायऱ्याने खाली उतरल्यानंतर पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याच्या बाजूसही पहारेकऱ्यांसाठी बसण्या उठण्यासाठी गुहा कोरलेली आहे. पुन्हा वळण घेत आणखी पुढचा दरवाजा लागतो या दरवाज्याची उंची फार कमी आहे एक व्यक्ती बऱ्यापैकी जाऊ शकेल अशी त्या दरवाजाची रचना आहे .पुढे तीव्र उतार असलेल्या दगडातच कोरलेल्या पायऱ्या लागतात आता काही पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे उतरताना काळजी घ्यावी लागते . वाटेत काताळात कोरलेल्या पायऱ्या पूर्वी होत्या पण आता काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अवघड जागेतून उतरत गडाच्या तिसऱ्या मानवनिर्मित तटबंदीकडे आपण येतो . किल्ल्याच्या पश्चिम बाजूस साल्हेरवाडीच्या असलेला तटबंदीने पूर्णपणे घेरलेला आहे . शत्रूला साल्हेर सर करायचा असेल तर ही पहीली तटबंदी पार करावी लागते . येथेच शत्रू हतबल होतो या वरचा टप्पा गाठणे तर अशक्यच आहे . आयताकृती मोठ्या विस्तीर्ण पठारावरुन तटबंदी व बुरुजावरून दूर पर्यन्त व अधिककाळ शत्रूस थांबवता येते. यापठारावरही बऱ्याच इमारतीचे अवशेष आढळतात येथे किल्ल्यावरील अनेक सैन्यांचा किंवा कारागिरांचा राबता असावा बऱ्यापैकी मोठी फळ झाडेही या ठिकाणी दिसून येतात . तरबंदी सोबत दक्षिणेकडे जातांना उजव्या बाजूस साल्हेरवाडी व डाव्या बाजूस साल्हेरची महाकाय कातर कडा दिसते . अर्ध्या तासाची या पठारावरील पायपीट तरबंदी लगत दरवाज्याकडे घेवून जाते . हा दरवाजा आकाराने मोठा व याची दिशा किल्ल्याच्या बाजूने आहे समोरच भव्य सदरीचा खुला भाग आहे पुढे यु आकारात वळण घेऊन पुढचा दरवाजा लागतो . या दोन्ही दरवाज्यात आलेला शत्रू वरील तटबंदीमुळे सहज काबूत ठेवता येतो . येथे एक देवनागरी लिपी मधील शिलालेखही आढळून येतो . आजही ही तरबंदी अगदी अभेद्य आहे . खडकात कोरलेल्या पायऱ्या काही ठिकाणी वेडेवाकडे वळण घेत खाली जातांना दिसतात . दरवाज्यांची मालिका अजूनही संपत नाही पुढे साल्हेर गावातून येणारे पहिले द्वार लागते . उतरत असतांना डाव्या बाजूला दाट जंगलात मंदिराच्या घंटयाचा आवाज ऐकू येतो . आता आधुनिक काळातील सिमेन्ट मंदिर असून आजू बाजूला मात्र प्राचीन मंदिराचे अवशेष दिसून येतात . अनेक वीरगळ या परिसरात आहेत म्हणजे या ठिकाणी अनेक मोठ्या लढाई झाल्याची साक्ष देतात . अजूनही आपला पूर्ण गडउतार होत नाही तोच दाट करवंदीचे दाट जाळवण पुढे येते व खाली पुन्हा तीव्र उतारावरून साल्हेर वाडी व तेथील हॉटेल दिसताच जीवात जीव येतो कारण वाघंबे गावातून चढून साल्हेरवाडीत उतरणे हा साधा ट्रेक नाही व साल्हेर सर केल्याच समाधान डाबरी रोडवर आल्यावर जाणवते . पुढील भागात आपण पाहू या इतिहासात गाजलेली अन शिवरायांच्या पराक्रमाची उत्तरेत वचक निर्माण करणारी साल्हेरची लढाई .
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा