तपोन्याचा तपोनेश्वर महादेव
स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ, दारव्हापासून १५ कि.मी.
'तपोवन ' या पाली भाषेतील शद्बाचा अर्थ तपश्चर्येची जागा असा होतो . तसाच 'तप्पन ' हा शब्द देखील पाली भाषेतील आहे त्याचा अर्थ संतोष , आनंद, समाधान अश्या अर्थाने येतो . या दोन्ही पाली भाषेतीत शब्दाचा अर्थ हा तपोवन या पवित्र धार्मिक स्थळाशी जोडला तर त्या स्थळा विषयी माहीती मिळते . यवतमाळ जिल्हयातील तपोना या दारव्हा ते यवतमाळ मार्गावर दारव्हा पासून अवघ्या १५ कि.मी . अंतरावर तपोनेश्वर हे प्राचीन शिव मंदिर आहे . मुख्य महामार्गापासून १ कि. मी . अंतरावर हे प्राचीन वारसा स्थळ आहे . यवतमाळ जिल्हयात वाकदचा विश्वेशर, रुद्रेश्वर महादेव, सोनवाढोना, अंबाळी, कमलेश्वर, ढोकी, पांढरदेवी, मोहा - इजारा (पुसद), यवतमाळ शहरातील लोहाऱ्याचा कमलेश्वर, चिकणी कसबा (आर्णी ) उमरखेड तालुक्यातील पोफळी, केशवराज मंदिर, कुर्रहाड, सायतखर्डा, वघारटाकळी अशी अनेक प्राचीन शिवमंदिरांचा वारसा आहे . अजूनही काही प्राचीन शिवमंदिरे या भागात आढळतात . तपोना येथील पुरातत्व विभागाने मंदिर परिसरातील सर्व जागा लोखंडी जाळीने बंदिस्त करून सुरक्षित केली आहे . हा परिसर प्रचंड मोठा आहे .पूर्वी या ठिकाणी अजूनही लहान -लहान मंदिर समूह असावेत असे दिसून येते . याशिवाय येथे पुर्वी वस्ती देखील असावी असे वाटते . गावाच्या बाहेर निसर्गरम्य असे वातावरण या मंदिर परिसरास आहे. पुरातत्व विभागाच्या मुख्य लोखंडी गेटमधून आत गेल्यावर अंत्यत रमनिय वातावरण या परिसराचे वाटते . मंदिराच्या मागील भागाकडून हे गेट आहे समोरच पिंपळ वृक्ष असून त्या ठिकाणच्या दगडी ओट्यावर शिवलिंग व त्या बाजूला शेंदूर लावलेले प्राचीन दगडी नाग शिल्प आहे . या नागाची मनोभावे स्थानिक लोक पूजा करतात .
समोरच पूर्वमुखी दोन समांतर असलेली अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहेत व मंदिराच्या अगदी पाठीमागे एक सुंदर दगडी बारव आहे . ३० ते ३५ फुट खोल असलेल्या या बारवेचा काही भाग खचलेला असून यात अजूनही जीवंत पाणी आहे . बारवेच्या बाजुलाच एक विहिर देखील आहे . या बारवेस स्थानिक लोक अनुसया कुंड म्हणतात . प्राचीन स्थानिक दंत कथेनुसार अनुसयाने या तपोभूमिवर तपस्या केली होती अशी मान्यता आहे . सपूर्ण परिसर पाहता प्राचीन काळी या शांत व निर्सगरम्य ठिकाणास तप करण्यासाठीचे पवित्र स्थान असल्यानेच या धार्मिक स्थळास तपोना हे नाव पडले असावे . यादव काळातील या प्राचीन मंदिराचे बांधकाम झाले असावे असे बांधकाम शैलीवरून दिसून येते . दोन मोठ्या मंदिराच्या मध्ये मोकळी जागा आहे . उजव्या बाजूकडील मंदिराच्या बाहेरील बाजूस भैरवाची मूर्ती आहे संपूर्ण चर्तुभुज असलेल्या या देवतेने हातात डमरू, कपाल आदि धारन केले आहे . याच मंदिराच्या प्रवेश द्वारावर अगदी भव्य अशी दोन चर्तुभुज असलेली हातात कपाल, डमरु व खालील एका हातात शस्त्र व दुसरा हात त्यावर ठेवलेले आनखी दोन भैरव देवतेचे शिल्पे आहेत . भैरवास शिवपुराणात शिवाचे पूर्ण रुप मानले गेले आहे. अंधकासुर वधात शिवतत्वा पासून आठ भैरव निर्माण झाले . महाभैरव, संहारभैरव, असितांगभैरव,रुरूभैरव,कालभैरव, क्रोधभैरव, कपालभैरव, चंद्रचूडभैरव अशी काही भैरवदेवाचा उल्लेख पुराण ग्रंथामधे आढळतो . भैरवमूर्ती संपूर्ण भारतभर आढळतात गडचिरोली जिल्हयातील मार्कडेश्वर येथे सुंदर भैरव शिल्पे आहेत . वेरूळ येथील दशावतार लेणी मध्ये देखील भैरवाचे शिल्प आहे . येथे देखील मंदिरा समोरच काल भैरवाचे मंदिर आहे . तपोनेश्वर येथील दोन्ही शिव मंदिर आजही दगडी मजबूत व कोरीव अश्या खांबावर मजबुतीने उभे आहे . सभामंडप, अंतराळ, गाभारा अशी रचना आहे. सभा मंडपाचे छत चौरसाकृती दगडी शिळेच्या रचनेचे असून मध्य भागी चक्राकार कमळ शिल्प आहे. अंतराळातील गर्भगृहाचा दरवाजा सुंदर दगडी नक्षीकामाने युक्त आहे . चौरसाकृती गाभाऱ्यात खाली उतरावे लागते . अनुसया कुंड पूर्ण भरलेले असले की गाभाऱ्यात पाणी असते .प या गाभाऱ्यात तपोनेश्वर शिवलिंग स्थापित आहे .या मंदिरास लागून एका छोट्या मंदिरात उमामहेश्वर शिल्प असून भाविक त्याची नियमित पूजन करतात . मंदिरा समोर अत्यंत सुबक कोरीव नक्षी काम रेखीव असे नंदी शिल्प आहे . अंगावरील घुंगर माळा, डोळे, शिंगे यामधे आजही जिवंतपणा जाणवतो . अगदी असाच नंदी पुढच्या मंदिरा समोर आहे. कालभैरव मंदिर व त्या पाठीमागे हनुमानाचे आत्ताच्या काळातीत मंदिर आहे . या ठिकाणी एक सतीशिळा देखील आहे . दुसरे शिवमंदिर गाभारा सोडला तर हे पहिल्या मंदिरा प्रमाणेच आहे . मजबूत नक्षीदार खांबावर सभामंडप, अंतराळ, गाभारा उभा आहे . खांबावर असलेले कोरीव यक्ष हे संपूर्ण छताचा भार तोलून धरलेला आहे . छत चौराकृती रचनेच्या दगडी शिळेवर रचलेले आहे . अंतराळात मध्यभागी छतावर एक मूर्ती शिल्प आहे . गाभाऱ्याच्या द्वारावर सुंदर नक्षीकाम व मध्यभागी छोटे गणेश शिल्प आहे . गाभारा खोलगट नसून शिवलिंग स्थापित केले आहे . मंदिराच्या आतील खांबावर आमलका सारखी गोलाकार नक्षी कोरलेली आहेत .
मंदिराच्या पाठीमागे आनखी लहान - लहान मंदिराचे अवशेष दिसून येतात . भव्य दिव्य दगडी शिळा एकमेकावर रचून दोन लहान मंदिरे आहेत ही दोन्ही मंदिरे अनुसया कुंडाच्या अगदी काठावर आहेत . या दोन्ही मंदिरात शिवलिंग स्थापित केलेले आहेत . आता मोठी पडझड या मंदिराची झाली आहे . या परिसरात मंदिराचे खांब, आमलक, छत, नर्तकी मूर्ती शिल्पे, कमान आदिंचे अत्यंत सुबक व कोरीव दगडांचे अवशेष परिसरात पडलेले आहेत . परिसरात इमारतीच्या पायाचे अवशेषही आढळतात . प्राचीन काळी या ठिकाणी मोंठा मंदिर समूह अस्तीत्वात असावा असे दिसून येते . काळाच्या ओघात याचे अस्तीत्व नष्ट होत गेले . आज या प्राचीन वास्तुचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे . प्राचीन पाण्याचे स्त्रोत असलेली बारव म्हणजे अनुसया कुंड संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे . प्राचीन धर्म परंपरेनुसार पवित्र जल असलेल्या या कुंडाचे अस्तीत्व आपण एकत्र येऊन टिकविले पाहिजे . महाशिवरात्रीस तथा श्रावणमासात येथे शिव भक्ताची मोठी भक्ती भावाने यात्रा भरते . या तपोभूमिस लाखो लोक दरवर्षी भेट देतात .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा