मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

शिवमंदिर समुहाचे गाव - धोत्रा नंदई भाग -2

 




शिवमंदिर समुहाचे गाव - धोत्रा नंदई   भाग -2


स्थान :- ता देऊळगावराजा जि . बुलढाणा, चिखली - जालना महामार्गावर चिखली पासून ३५ कि.मी .



शिवपुराणात अशी कथा सांगितली जाते की, ब्रम्हदेवाची मानसपुत्री संध्या हीने भगवान शंकराची तपश्चर्या करून भक्तवत्सल शिव शंकररास या तपश्चेतून प्रसन्न केले . शिवस्तवन करतांना म्हटले की " भगवान, आपण निराकार आहात .परम ज्ञानगम्य आहात मापण स्थूल नाहीत की सूक्ष्मही नाहीत . आपण शर्व, शांत स्वरूप आहात .निर्मल,निर्विकार आहात .आपणचं अद्वितीय शुद्ध, सच्चीदानंदमय, सहज निर्विकार आहात आपलं रूप शुद्ध,मनोहर, रत्नमय, आभूषिनांनी भूषित कर्पूराप्रमाणे गौर वर्ण आहे . आकाश, पृथ्वी, दिशा, जल, तेज, काल ही सर्व आपलीच रुपे आहेत . सृष्टीचा निर्माता व संहारकर्ता, सर्व दिशांनी नेत्र व मुखे,हात, पाय, देवाचे निर्माते व या परमात्मा पालिकडे दुसरी कोणतीच वस्तु नाही ते निष्कल, सर्वज्ञ, त्रिगुणाधिश्वर साक्षात परब्रम्ह आहेत . सर्व विश्व त्यांचेच रूप आहे . " संध्येच्या तपश्चचर्या पाहून शिव शंकरांनी सृष्टी संचलनार्थ वर दिले . मेधातिथी ऋषीच्या ज्योतिष्टोम यज्ञात पूर्वजन्मीची प्रतिज्ञा ही यज्ञात शरीर समर्पन करून पूर्ण होईल असा वर दिला . तिचे शरीर या यज्ञात दग्ध होऊन त्याचा अलक्षित गंध सर्वत्र पसरला सपूर्ण शरीरास सूर्यमंडलात पोहचविले . सूर्याने पितर व देवांना तृप्त करण्यास दोनभागात विभक्त केल . प्रातः संध्या देवांना प्रसन्न करणारी झाली व सायं संध्या पितरांता आनंद देणारी ठरली . पुढे हीच मेगतिथीची बुद्धीमती पुत्री अरुंधती या नावाने विख्यात झाली . पुराणामधील या मिथकामधे अर्थ दडलेला असतो व त्याचे शास्त्र म्हणजे मिथकशास्र होय . जगभरात आता या शास्त्रास महत्व प्रात्प झाले आहे .

         प्राचीन मंदिर निर्माणावर याचा प्रचंड प्रभाव दिसून येतो . धोत्रा येथे तीन अत्यंत प्राचीन व भव्य शिव मंदिरे आहेत . विशेष म्हणजे तीनही मंदिरे पूर्वमुखीच आहेत . गावाबाहेर पूर्व दिशेलाच असलेले शिव मंदिर हे प्राचीन वास्तुशिल्पाचे अप्रतिम नमुना आहे. गावाबाहेर एका शेतात हे मंदिर असून आता पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे . या वास्तुच्या पाठीमागाच्या  म्हणजे पश्चीम बाजुला लोखंडी गेट मधून  प्रवेशा करून मंदिराला वळसा घालून मुख्यद्वारावर पोहचतो . मंदिराच्या अगदी समोरच पश्चिम दिशेस मुख असलेला नंदीशिल्प नंदि मंडपात विराजमान झालेला आहे . पूर्वी चार दगडी स्थंभावर हा नंदीमंडप दगडी गोलाकार छतासह उभा असावा हे तेथील अवशेषावरून लक्षात येते . नंदी मंडपाचा चौथरा आता शिल्लक असून या मध्ये कोरीव नक्षीकाम केलेल्या दगडी शिळा दिसून येतात . पायऱ्यावर  समभूज चौकोनांची उठावदार पट्टयाच्या रांगा कोरलेल्या आहेत . शिव आज्ञेचे पालन करत मंदिरापुढे हे नंदीशिल्प  शांतपणे न्याहळतांना शिवभक्तीची एक निर्मळ, स्वच्छ, निर्हेतूक,अलौकिक छटा मनात निर्माण झाल्याशिवाय राहवत नाही .

    पूर्वमुखी मंदिरास अगदी नंदी मंडपाच्या पायऱ्या प्रमाणेच नक्षीयुक्त पायऱ्या आहेत .या पायऱ्या आपल्याला २.२० मी x२.०० मी मापाच्या व्हरांड्यात घेऊन जातात . अगोदर येथे खांबावर उभे असलेला मंडप होता . समोरच सभामंडपात जाण्यासाठी द्वार आहे . द्वारावर दोन्ही बाजूस लाकडी खांबास जशी नक्षी असते तशी दगडी खांब कोरलेली आहेत . या दरवाज्यातून आपण सभामंडपात पोहचतो . हा मंडप नक्षीयुक्त भक्कम खांबावर उभा आहे . सभामंडपाचे माप ५ मी x ५मी असे असून मध्यवर्ती चौथरा २ .८० x २.८० मी मापाचा आहे . हा चौरसाकृती भाग सभामंडपात लक्षात येतो . दोन्ही बाजूस पुन्हा १ मीx १ मी चे चौरसाकृती कोनाडे असून त्यामध्ये सुंदर नक्षी युक्त देवकोष्टके असून आता ती रिकामी आहेत . अंतराळातही अशीच देवकोष्टके आहेत . अंतराळत गर्भ गृहाचे द्वार आहे . गर्भगृह देखील २.०५ मी २.o५ मी.चे चौरसाकृती आहे अंतराळ व गर्भगृह प्रचंड अंधार आहे . या ठिकाणी बॅटरी आवश्यक आहे . गर्भगृहाच्या द्वारावर अगदी व्हरांड्यातीत मुख्य द्वारा सारखेच नक्षीकाम केलेले दिसून येते . उबंरठ्यावर दोन बाजूस दोन किर्तीमुखे अगदी शोभमान वाटतात .  भूमीगत गर्भगृहाच्या मध्यभागी धोत्रा नंदाईचे शिवलिंग शेकडो वर्षा पासून विराजमान आहे . या मंदिरात आल्यावर सभामंडपात शांत डोळे बंद करून बसल्यावर मनाचा थकवा निश्चीतच कमी झाल्या सारखा होतो . हजारो वर्षा पासून हा सभामंडपाचा भाग याच कार्यासाठी आपले पूर्वज नित्य नियमाने करत होते . मंदिरावरील प्रत्येक शिल्पास एक अर्थ असतो . आपण आपली एखादी संस्था,संघटना वा पक्ष उभा करतांना त्याचा लोगों बनवितो यामधे प्रत्येक बारीक गोष्टीचा आपण अर्थ लावतो . मग अशा मंदिरावरील शिल्पे तयार होण्यास अनेक वर्षे लागली ती कोरतांना प्रत्येकामागे एक विचार, एक तत्व निश्चीतच असावे . छत देखीत झीक झॅक चौरसाकृतीने निमुळते होत गेलेले आहे .

      सपूर्ण मंदिर बाहेरून अत्यंत आर्कषक दिसते . त्यावरील सूक्ष्म उठावदार व एकसंघ मापात असलेली नक्षी अत्यंत मोहक वाटतात . पदम कंस, नागफणी असलेले आडवे कंस व समभूज चौकोणाची उठावदार पट्टया पावर दिसून येतात . मंदिराची उंची यापेक्षाही अधीक असावी असा अंदाज बांधता येतो . साधारणपणे १ .३० मी उंचीचा या मंदिराचा चौथरा आहे . नित्य नियमाने पूर्व दिशेची पहीली सूर्य किरणे या मंदिरावर पोहचतात जणू काही या मंदिराची प्रेमरूपी पहीली साऊली या गावावर शिवतत्वाने पडते . हा कृपा आर्शिवाद शिवाचा आहे तो गावकऱ्यांनी जपला पाहीजे आपल्या समृद्ध वारश्याचे सिमेंटीकरण अन ऑईलपेन्टीकरण होऊ न देणे ही त्यांची जबाबदारी आहे .



संजय खांडवे

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

शिवमंदिर समुहाचे गाव - धोत्रा नंदई

 



शिवमंदिर समुहाचे गाव - धोत्रा नंदई


स्थान :- ता देऊळगावराजा जि . बुलढाणा, चिखली - जालना महामार्गावर चिखली पासून ३५ कि.मी .



बुलढाणा जिल्ह्यातील साकेगाव, सातगाव भुसारी,कोथळी, लोणार, सिंदखेडराजा, ह्या ठिकाणी प्राचीन मंदिरांचे समुह आहेत . आजही ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. असेच एका ठिकाणाची त्यामध्ये भर पडते ते म्हणजे धोत्रा नंदई येथील प्राचीन शिवमंदिरांचा समूह . चिखली - देऊळगावराजा महामार्गावरून धोत्रा नंदई फाटयावरुन पूर्वेस दोन कि .मी अंतरावर हे गाव आहे . गावात शिरतांना उजव्या बाजूस एक प्राचीन शिवमंदिर नजरेस पड़ते . पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने या ठिकाणच्या तीनही शिव मंदिरास लोखंडी कुंपण केले आहे . आत मध्ये पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण ३८ मी x ३० मी मंदिरास दगडी तटबंदीचे अवशेष दिसून येतात . अगदी मधोमध २०मीx ११ मी च्या भक्कम दगडी पाया ज्याची उंची १मी पर्यन्त आहे . मध्ये आयताकृती उंचवटा आहे . मुख्य प्रवेशद्वारावर खांब उभे असून त्यावर केवळ आडव्या दगडी नक्षीयुक्त शिळा दिसून येतात . मुख्य दरवाज्याच्या खालील भागात दोन किर्तीमुखांची शिल्पे कोरलेली आढळतात . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस अप्रतिम मूर्तिशिल्प कोरलेली आहेत . यामध्ये उजव्या बाजूस एक चामरधारी स्त्री चे सुंदर शिल्प असून त्यावर चक्र कोरलेले आहे . अजूनही दोन्ही बाजूचे शिल्प खूप आर्कषक वाटतात . या कमानीवरील छत आता पडलेले आहे . दरवाज्यावरील भागात समभूज चौकोनी आकार कोरलेली नक्षी व त्यावर बदकांची सलग रांग कोरलेली असून मध्ये एक ध्यानस्त मूर्ती शिल्प आहे व त्याच्या अगदी खालोखाल दरवाच्याच्या चौकटीच्या मधोमध गणेश शिल्प कोरलेले आहे . इतर ठिकणी पाने फुले देखील कोरलेली दिसतात .पूर्वी पूर्ण स्वरूपात असलेले हे मंदिर सुंदर नक्षीयुक्त असावे व त्यावर अनेक अशी सुंदर मूर्तीशिल्पे असावीत असे मंदिर परिसरात पडलेल्या नक्षीयुक्त शिळावरून जाणवते . सदयस्थितीमध्ये डाव्या बाजूस अलीकडच्या काळात बसविलेली ग्राम सरक्षक देवता वीर हनुमानांची शेंदूर लावलेली मूर्ती आहे . या द्वारातून प्रवेश मुख्य सभामंडपात होतो . ह्या मंडपाचे छत आता पूर्णपणे नष्ट झालेले असून उत्तर दक्षिण बाजूकडील दोन्ही भिंती पूर्णपणे कोसळलेल्या आहेत . सभा मंडपाचा आकार ६.१५ मी X ६ .१५मी आहे . पुढे  दोन खांबावर उभा असलेला मंदिराच्या अंतराळाचा भाग आहे . मुख्य गाभाऱ्याच्या चौकटीवर कोरीव नक्षीकाम दिसून येते . उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस किर्तीमुखे कोरलेली आहेत . गर्भगृहातील भिंती सपाट दगडाच्या आहेत . गाभाऱ्याच्या छताचा भाग लहान -लहान होत जाणाऱ्या चौरसाकृतीने बनलेला असून मध्यभागी कमलपदक कोरलेले आहे . मध्यभागी दगडी शिवलिंग असून त्याची मनोभावे पूजा केली जाते . मंदिराच्या बाजूला आयताकृती गाळलेल्या स्वरुपातील एक बारव आहे . समोरच एक दगडी रांजण आहे . २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन  गेली .कला,साहित्य,व्यापार,उद्योगया क्षेत्रात त्या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली होती या साठी नाणेघाट हा महामार्ग या घाटातून खोदण्यात आला व या महामार्गावर अगदी अशाच प्रकारचा दगडी रांजण हा धोत्रा नंदई गावात या ठिकाणी आहे . आकाराने त्या रांजणापेक्षा थोड़ा लहान आहे . नाणेघाटात हा रांजण टोल जमा करण्यासाठी वापरला जात असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे .या रांजणाच्या बाबतीतही संशोधन होणे गरजेचे आहे .

         धोत्रा या गावात शिवाची तीन मंदिर आहेत त्यापैकी दुसरे अगदी गावाच्या मध्य वस्ती मध्ये आहे . या मंदिरासही प्राचीन दगडी तटबंदी होती . पूर्वी याची उंची खूप मोठी असावी असे दिसते . पहिल्या मंदिराप्रमाणेच ही तटबंदी आहे . याचे माप २५ मी x १७.५० मी आहे .बाहेरील भागावरील शिळा पूर्णपणे खचल्या आहेत बाहेरील भाग पाहीला तर एकावर एक शिळा रचल्या असे वाटते .आतील सभामंडप व गाभारा दगडी खांबावर उभा आहे  . सभामंडप ४.६०मीx ४.६० मी आकाराचा असून मुख्य दरवाज्यावर किर्तिमुखे व नक्षीकाम केले आहे . आत प्रवेश करताच खांबावर कोरलेली किर्तिमुखे बहुतेक खांबावर आहेत . अंतराळात देवकोष्टके असून  ती आता रिकामी आहेत .गाभाऱ्याचे प्रवेशद्वारा वर  नऊ मुखवटे कोरलेली आहे काही मुखवटयांना सुळे आहेत  अश्या प्रकारची नऊ मुखवटे पिशोर ता कन्नड येथील मंदिरावर आहे. खाली दोन किर्तिमुख कोरली आहेत . एक आड एक वेल, प्राणी शिल्प, विविध आकृत्या यावर कोरल्या आहेत .वराहीचे व हातात आयुधे असलेले भैरवाचे सुंदर शिल्प यावर कोरले आहे .गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान आहे . या मंदिरांची प्रचंड पडझड झाली आहे . मंदिर परिसरातही अनेक शिल्पे पडलेली आहे .याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे येथील बारवांच देखील पुनर्जीवन होणे गरजचे आहे . हा आपला महावारसा टिकला पाहिजे पुढच्या भागात याच गावातील प्राचीन शिवमंदीराची माहिती घेऊ या .




संजय खांडवे

आंतरीक ऐक्याने स्वातंत्र्याचा गोडवा वाढतो

 



आंतरीक ऐक्याने स्वातंत्र्याचा गोडवा वाढतो



भूतलावरील अगदी कोणताही सजीव घ्या त्याला मुक्त राहणे यामध्येच सर्वोच्च सुख प्राप्त होते . यालाच स्वातंत्र्य असे म्हणतात कोणत्याही जीवाला बंदिस्त राहणे हे त्याच्या मनाविरुद्ध ठरते . आपण आपल्या मान्यतेनुसार मोक्ष हा सर्वोच्च ठरवितो खर तर स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन जी सर्वोच्च पातळी प्राप्त होते ती स्वातंत्र्याची असते व हाच खरा मोक्ष म्हणावा लागेल . थोर विचारवंत डॉ आ . ह. साळुंखे यांनी " मानवी बुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष " अशी सविस्तर मांडणी त्यांच्या साहित्यातून केली आहे . महर्षी चार्वाकांनी देखील मानवी मनाच्या स्वातंत्र्यास विशेष महत्व दिले आहे .स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे अशीही काळजी त्यांनी घेतल्याचे दिसते . आजही प्रत्येकास ते हवे हवेसे वाटते . स्वांतत्र्यातही आपल्याला जबाबदारीचे भान असावेच लागते . आपली ठरवून दिलेली कर्त्यव्ये प्रामाणिकपणे पाळावी लागतात व हे सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून पार पाडत गेलो तर स्वातंत्र्य अबादीत राहते . आपला हजारो वर्षांचा इतिहास पाहिला तर आपल्या भूमित राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अश्या स्वरूपाची अनेक स्थित्यांतरे होत गेलेली दिसून येतात . विविधतेने नटलेल्या आपल्या भारतवर्षाने विविध संस्कृतीमधून प्रवास केलेला दिसून येतो .

          २५०० वर्षांपूर्वी तथागत गोतमबुद्धांनी प्रज्ञेला कवटाळून व बुद्धीचा अंगीकार करत विवेकाला हाक दिली अन संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग दाखविला . सर्वोत्तम भूमिपुत्र हया अर्थाने डॉ आ .ह साळुंखे सरांनी गोतम बुद्ध अगदी सविस्तर मांडले . या पुस्तकातील एका भागात  गृहस्थ जीवनाचा आदर व राष्ट्रजीवनाची काळजी या भागात ते बुद्ध विचारांची मांडणी करतांना म्हणतात . " राष्ट्राचे खरे संरक्षण आंतरिक

 ऐक्यामुळे होते " असे बुद्ध म्हणतात . तथागत गौतम बुद्धांनी लिच्छवींना ऐक्य राखण्याचा सल्ला दिला होता . त्या काळामध्ये गणव्यवस्था अस्तित्वात होती हा एक गण होता आणि या लिच्छवि यांना  वज्जी असे देखील म्हणत . एकदा तथागत वैशाली मधील सारन्दद चैत्यामध्ये विहार करत असताना अनेक लिच्छवी त्यांच्याकडे आले त्यावेळेस तथागत त्यांना म्हणाले, "लिच्छवीनो मी तुम्हाला अशा सात गोष्टींचा उपदेश देतो की ज्याचे पालन केले असता तुमचा पराभव होणार नाही त्या गोष्टी ऐकून घ्या मनात नीट धारण करा . " तथागतांनी त्यांना सांगितले जोपर्यंत तुम्ही अखंडपणे एकत्रित जमत राहाल व विशाल संख्येने  तुमचे ऐक्य राखाल तोपर्यंत तुमची वृद्धी होईल . जोपर्यंत तुम्ही एकजुटीने वज्जीच्या प्रजेबद्दलची कर्तव्य पार पाडाल. ठरवून दिलेल्या सर्व कायद्यास कायदा म्हणून अंमलबजावणी कराल . वयस्कर लोकांचा मान राखाल कुल स्त्रियांना, कुलकुमारींना सन्मान द्याल . गावातील गावाबाहेरील चैत्याचा सत्कार कराल अरहंतांना धम्म विषयक संरक्षण द्याल तोपर्यंत तुमची वृद्धी होईल . नियमित एकत्रित जमत राहून एकमेकांचे सुखदुःख समजून घ्याल तो पर्यन्त तुमचे राज्य राहील . थोडक्यात अंतरिक ऐक्य किती महत्त्वाचे आहे आणि या आंतरिक ऐक्यातून राज्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहते . पुढील काळात हेच वज्जींचे राज्य    वस्सकार या पंडिताच्या सहाय्याने अजातशत्रूने वज्जीमधील आंतरिक ऐक्यात फुट पाडून जिंकून घेतले. अशी परिस्थिती निर्माण केली की त्यांचा एकमेकांवर विश्वास देखील राहिला नाही आणि ऐन युद्धाच्या प्रसंगी ते युद्धात उतरले नाही आणि त्यांचे स्वातंत्र्य गमावून बसले . यातून हेच लक्षात येते की गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे हे अनेक कुटुंब आणि त्या कुटुंबांची मिळून एक राज्य होते त्यांच्या मधील परस्पर असहकार्यामुळे त्यांना ते गमवावे लागले .

      चक्रवर्ती सम्राट अशोकांचे मौर्य साम्राज्य त्यांच्या मानवतावादी धोरण व आंतरीक ऐक्या मुळे आदर्श महान राष्ट्र निर्माण करू शकले . आपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात तो काळ आंतरिक ऐक्य जपणारा होता . मध्ययुगीन कालखंडातील छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊ व शहाजीराजे यांच्या प्रेरणेने ऐतद्देशियांचे हिंदवी स्वराज्य उभे केले . ऐतद्देशिय म्हणजे या भूमित राहणारे या माती विषयी प्रेम असणारे सर्व जाती,धर्म व पंथाचे लोक . या सर्वांना आपल्या आचरणातून  भोसले - जाधव वंशीयांनी विश्वास दिला व मातृभूमिच्या रक्षणार्थ आपला स्वाभिमान जागृत ठेवत एकतेची वज्रमुठ बांधली . समाजातील अगदी शेवटच्या घटकास स्वातंत्र्याची जाणिव करुन दिली . याच आंतरीक ऐक्यातून व परस्परावरील विश्वासातून शिवरायांनी रयतेचे राज्य उभे केले . छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ही गोष्ट काही सामान्य नव्हती कारण शेकडो वर्षानंतर या कालखंडातील आंतरिक ऐक्य शिवरायांच्या बुद्धीचार्तुय,शौर्य, अखंड सावधानता व रयतवत्सल लोककल्याणकारी धोरणामुळेच स्वांतंत्र्याचा गोडवा रयतेस मिळाला होता . राजकीय सामाजिक सांस्कृतिक तथा धार्मिक क्षेत्रात त्या काळात शिवरायांनी केलेली एक महान क्रांति होती . आधुनिक काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हीच आंतरीक एकता बघायला मिळाली . भारतीय स्वांतत्र्यलढा हा कश्मिर ते कन्याकुमारी,गोवा ते गुवाहाटी पर्यन्त प्रत्येक गावातून एकजुटीने लढला गेला. अनेक क्रांतिवीरांच्या बलिदानातून त्यांच्या प्रेरणेतून आंतरीक ऐक्यास बळकटी मिळाली त्याची फलस्वरूप आपण आज स्वातंत्र्यात जगतोय . राष्ट्र हितार्थ आज हे आंतरीक ऐक्य टिकविणे हे आपल्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे . अन्यथा कुठलीही बाहयशक्ती आपल्यावर शिरजोर होण्यास वेळ लागणार नाही .


संजय खांडवे

    

      .

लाडखेडचा दक्षेश्वर

  लाडखेडचा दक्षेश्वर स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालमोंकारे परमेश्वरम् ॥ ...