शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

लाडखेडचा दक्षेश्वर

 

लाडखेडचा दक्षेश्वर


स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ



सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।

उज्जयिन्यां महाकालमोंकारे परमेश्वरम् ॥

केदारं हिमवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।

वाराणस्यां च विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ॥

वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने ।

सेतुबंधे च रामेशं घुश्मेशं तु शिवालये ॥

द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ।

सर्वपापैर्विनिमुक्तः सर्वसिद्धिफलं लभेत् ॥

    भगवान शिवशंकराच्या बारा ज्योर्तिलिंगाची नामावळी वरील श्लोकामधून मिळते . सौराष्ट्रा मधील सोमेश्वर हा पहिला अवतार, मल्लिकार्जुन नावाचा दुसरा अवतार श्रीशैलावर झाला . शिवाचा महाकाल नावाचा तिसरा अवतार उज्जयनि नगरीमधील आहे . विध्यंगिरीवर ओंकार नावाचा चौथा अवतार शिवांनी धारण केला . हिमालयात प्रगटलेला केदार हा पाचवा अवतार मानला जातो . सहावा अवतार भिमाशंकर हा भीमा सूराच्या वधानंतर निर्माण झाला . काशीपूरीत विश्वेश्वर रुपाने सातवा   रुपाने स्थिर झाले . गौतमी ऋषीच्या प्रार्थनेवरुन गौतमी तटावर आठवा अवतार त्र्यंबक झाला . नववा अवतार वैदयनाथ या नावे प्रगटला . दहावा अवतार नागेश्वर व प्रभू रामचंद्राचा कल्याण करणारा रामेश्वर हा अकरावा अवतार ठरला . वेरुळ येथील घृष्णेश्वर हा शिवांचा बारावा अवतार ठरतो . या धार्मिक तिर्थस्थळांना भारतीय धार्मिक परंपरतेत अत्यंत महत्वाचे मानले जाते . आकाश, पृथ्वी, दिशा, जल, तेज व काल ही ज्यांची रूपे आहेत असे निराकार व ज्ञानगम्य सदैव भक्तवत्सल शिवांचे मनोभावे पूजन होत नसेल असा कुठलाच भाग भारतवर्षात राहिलाच नसेल . प्राचीन काळापासून अगदी हिमालया ते कन्याकुमारी पर्यन्त व गोवा ते गुहाहाटी पर्यन्त सर्वत्र वातावरण शिवमयच झालेले दिसून येते . अवघे विश्व शिवपुराणाने व्यापले आहे शिवा शिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही . शिवपुराणातील अभ्यासाने हे स्पष्ट होतेच पण त्याही पेक्षा गावा गावात असलेली शिव मंदिरे व त्यातही प्राचीन शिवमंदिरे शिव सर्व दिशांमध्ये व्यापले आहे हे सिद्ध होते.

       यवतमाळ जिल्ह्यात फिरत असतांना दारव्हा जवळील तपोनेश्वर भूमिस भेट दिल्यावर याच मार्गावर अजुनही शिवाचे प्राचीन मंदिरे आहेत ही माहिती मिळाली . पुढे याच मार्गावर लाडखेड गाव असून तेथे दक्षेश्वर महादेवाचे प्राचीन शिवमंदिर सुंदर बारवेसह आहे ही माहिती मिळाली म्हणून लाडखेड गावातुन मुख्य महामार्गावर यवतमाळ कडे जातांना डाव्या हातास वळन घेऊन अवघ्या एक कि . मी . अंतरावर असलेल्या दक्षेश्वर मंदिरात पोहचलो . आता या मंदिरांचे व्यवस्थापन  स्थानिक संस्थानकडे आहे . सध्या चांगल्या स्थितीत असलेले अत्यंत सुंदर मंदिर शिल्प लाडखेड मध्ये बघायला मिळाले . मजबूत दगडी नक्षीयुक्त खांबावर हे मंदिर उभे आहे . आधुनिक काळात दगडी खांब बांधून छताची मजबूती करुन घेतल्याचे दिसते . देवगिरीच्या यादवांच्या काळात हे मंदिर बांधल्या गेले अशी माहीती यवतमाळ जिल्हयाच्या गॅझेट मधून मिळते . मुख्य द्वार - सभा मंडप - अंतराळ - गाभारा अशी या मंदिराची रचना असून मुख्य खांबावर चारही बाजूनी संपूर्ण मंदिराचा भार आपल्या खांद्यावर तोलून धरणारी यक्ष ही कुबेराची श्रमजीवी सेना अगदी मंदिर निर्माणा पासून व याच्याही पुढे हा डोलारा समर्थपणे तोलून धरतांना दिसतात . या यक्षाच्या पत्नीस यक्षिणी म्हटले जाते प्राचीन कथा, नाटकामध्ये यांचा उल्लेख येतो . औषध उपचारांचे जाणकार त्यांना मानले जायचे . खांबावर चौरसात सुरेख हंस युगल तथा हत्ती सोबत द्वव्द करतांनाचे शिल्प आहे . सभामंडपाचे छत चौरसाकृती शिळा वापरत निमुळते होत गेलेले आहे .अंतराळातून गर्भगृहात जाणाऱ्या द्वारावर सुंदर नक्षीयुक्त आकृत्यासह खांब आहे . उंबरठ्यावर दोन किर्तिमुख कोरली आहेत . चौरसाकृती गाभाऱ्यात दक्षेश्वर महादेव शिव लिंग स्वरूपात विराजमान आहे . या मंदिराचे मूळ स्वरूप मात्र आता संपूर्ण मंदिरास दिलेल्या आईल पेन्टने झाकाळले गेले आहे . बाहेर अनेक मुर्ती शिल्प आहेत यामध्ये लढाई करतांनाचे धर्नुधारी स्त्री शिल्प, सतीशिळा समुह तथा ध्यानस्त ऋषीचे शिल्प  देखील आहे . मंदिराच्या पाठीमागे अष्टकोनी आकाराची भव्य बारव आहे . आता मात्र लोखंडी जाळीने ती बंदिस्त करून ठेवली आहे यामुळे कुठेतरी या वास्तुचे सौदर्य हरवल्या सारखे वाटते .मंदिराचा संपूर्ण परीसर आता कुंपनाने बंदिस्त असून मंदिरास जोडून आधुनिक भव्य सभागृह उभारले गेले आहे . परिसरातील हजारो भक्त येथे नियमित दर्शनास येतात .

      दक्षेश्वर महादेव हे नाव शिव महादेवांचे सासरे राजा दक्ष यावरून पड़ले असावे अशी मान्यता आहे शिवपुरानात दक्षाची कन्या सतीचा विवाह शिवाशी होतो .यात दक्षाची नाराजी असते . एकदा कनखल या राजधानीच्या ठिकाणी दक्ष महायज्ञाचे आयोजन करतो . ब्रम्हा, विष्णु सह सर्व ऋषीगण त्याच्या स्री पुत्रासह सर्व देवता या यज्ञास आमंत्रीत होते . अठ्याऐंशी हजार ऋत्विजासह चौसष्ट हजार उदगाते होते मात्र या महायज्ञात आपले पती शिव आमंत्रित नसल्याने सती क्रोधित होऊन आपल्या पित्यास जाब विचारण्यास कनखल तिर्थस्थानी पोहचून यज्ञात आहुती दिली यामुळे शिव प्रचंड बेचेन व क्रोधित होऊन त्यांच्या विरभद्र या पहिल्या गणाने दक्षाचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला त्याचे वर्णन शिव पुराणात येते पुढे वीरभद्र दक्षाचे शिर कापून अगिकुंडात टाकून दिले . पुढील काळात सर्व देवदेवतांच्या विनवनीवरुन यज्ञपशु  बकऱ्याचे शिर दक्षाच्या धडास भगवान शिव जोडून देतात . दक्षाच्या देहात प्राण येऊन त्याला त्याची चूक कळते त्याच्या मनात जिव्हाळा निर्माण होतो . देवादिदेव महादेव हे करुणसागर रूप दक्षेश्वर रुपाने या तिर्थक्षेत्री प्रगटले अशी स्थानिकांची मान्यता आहे. उत्तराखंडातील हरीद्वारला लागून कनखल या ठिकाणी दक्षाने महायज्ञ केल्याचे सांगितले जाते आजही भारतभरातून कनखल येथील दक्षेश्वराची आराधना करतात . जळगाव जिल्हयातील शिरसोली येथे देखील दक्षेश्वर महादेव मंदिर आहे . हे मंदिर देखील यादव कालिन असून प्राचीन आहे . या मंदिराचे वैशिट्य म्हणजे गाभाऱ्या समोरील नंदि शिल्पा सोबत मेंढा शिल्प देखील आहे . हा मेंढा म्हणजे शिवपुराना नुसार शिवांचा सासरा राजा दक्ष सांगितला जातो . विरभद्राने दक्षाचे शिर कापून अग्नीत टाकले होते म्हणून या गावास शिरसोली हे नाव पडले अशी तेथील ग्रामस्थाची मान्यता आहे .

    शिवाची अशी अनंत रुपे आहेत की जी सृष्टी संचलनार्थ कार्य करते नमः शिवाय .

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६

तपोन्याचा तपोनेश्वर महादेव

 तपोन्याचा तपोनेश्वर महादेव



स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ, दारव्हापासून १५ कि.मी.



'तपोवन ' या पाली भाषेतील शद्बाचा अर्थ तपश्चर्येची जागा असा होतो . तसाच 'तप्पन ' हा शब्द देखील पाली भाषेतील आहे त्याचा अर्थ संतोष , आनंद, समाधान अश्या अर्थाने येतो . या दोन्ही पाली भाषेतीत शब्दाचा अर्थ हा तपोवन या पवित्र धार्मिक स्थळाशी जोडला तर त्या स्थळा विषयी माहीती मिळते . यवतमाळ जिल्हयातील तपोना या दारव्हा ते यवतमाळ मार्गावर दारव्हा पासून अवघ्या १५ कि.मी .  अंतरावर तपोनेश्वर हे प्राचीन शिव मंदिर आहे . मुख्य महामार्गापासून १ कि. मी . अंतरावर हे प्राचीन वारसा स्थळ आहे . यवतमाळ जिल्हयात वाकदचा विश्वेशर, रुद्रेश्वर महादेव, सोनवाढोना, अंबाळी, कमलेश्वर, ढोकी, पांढरदेवी, मोहा - इजारा (पुसद), यवतमाळ शहरातील लोहाऱ्याचा कमलेश्वर, चिकणी कसबा (आर्णी ) उमरखेड तालुक्यातील पोफळी, केशवराज मंदिर, कुर्रहाड, सायतखर्डा, वघारटाकळी अशी अनेक प्राचीन शिवमंदिरांचा वारसा आहे . अजूनही काही प्राचीन शिवमंदिरे या भागात आढळतात . तपोना येथील पुरातत्व विभागाने मंदिर परिसरातील सर्व जागा लोखंडी जाळीने बंदिस्त करून सुरक्षित केली आहे . हा परिसर प्रचंड मोठा आहे .पूर्वी या ठिकाणी अजूनही लहान -लहान मंदिर समूह असावेत असे दिसून येते . याशिवाय येथे पुर्वी वस्ती देखील असावी असे वाटते . गावाच्या बाहेर निसर्गरम्य असे वातावरण या मंदिर परिसरास आहे.  पुरातत्व विभागाच्या मुख्य लोखंडी गेटमधून आत गेल्यावर अंत्यत रमनिय वातावरण या परिसराचे वाटते . मंदिराच्या मागील भागाकडून हे गेट आहे समोरच पिंपळ वृक्ष असून त्या ठिकाणच्या दगडी ओट्यावर शिवलिंग व त्या बाजूला शेंदूर लावलेले प्राचीन दगडी नाग शिल्प आहे . या नागाची मनोभावे स्थानिक लोक पूजा करतात .

       समोरच पूर्वमुखी दोन समांतर असलेली अत्यंत प्राचीन शिवमंदिर आहेत व मंदिराच्या अगदी पाठीमागे एक सुंदर दगडी बारव आहे . ३० ते ३५ फुट खोल असलेल्या या बारवेचा काही भाग खचलेला असून यात अजूनही जीवंत पाणी आहे . बारवेच्या बाजुलाच एक विहिर देखील आहे . या बारवेस स्थानिक लोक अनुसया कुंड म्हणतात . प्राचीन स्थानिक दंत कथेनुसार अनुसयाने या तपोभूमिवर तपस्या केली होती अशी मान्यता आहे . सपूर्ण परिसर पाहता प्राचीन काळी या शांत व निर्सगरम्य ठिकाणास तप करण्यासाठीचे पवित्र स्थान असल्यानेच या धार्मिक स्थळास तपोना हे नाव पडले असावे . यादव काळातील या प्राचीन मंदिराचे बांधकाम झाले असावे असे बांधकाम शैलीवरून दिसून येते . दोन मोठ्या मंदिराच्या मध्ये मोकळी जागा आहे . उजव्या बाजूकडील मंदिराच्या बाहेरील बाजूस भैरवाची मूर्ती आहे संपूर्ण चर्तुभुज असलेल्या या देवतेने हातात डमरू, कपाल आदि धारन केले आहे . याच मंदिराच्या प्रवेश द्वारावर अगदी भव्य अशी दोन चर्तुभुज असलेली हातात कपाल, डमरु व  खालील एका हातात शस्त्र व दुसरा हात त्यावर ठेवलेले आनखी दोन भैरव देवतेचे शिल्पे आहेत . भैरवास शिवपुराणात शिवाचे पूर्ण रुप मानले गेले आहे. अंधकासुर वधात शिवतत्वा पासून आठ भैरव निर्माण झाले . महाभैरव, संहारभैरव, असितांगभैरव,रुरूभैरव,कालभैरव, क्रोधभैरव, कपालभैरव, चंद्रचूडभैरव अशी काही भैरवदेवाचा उल्लेख पुराण ग्रंथामधे आढळतो . भैरवमूर्ती संपूर्ण भारतभर आढळतात गडचिरोली जिल्हयातील मार्कडेश्वर येथे सुंदर भैरव शिल्पे आहेत . वेरूळ येथील दशावतार लेणी मध्ये देखील भैरवाचे शिल्प आहे . येथे देखील मंदिरा समोरच  काल भैरवाचे मंदिर आहे . तपोनेश्वर येथील दोन्ही शिव मंदिर आजही दगडी मजबूत व कोरीव अश्या खांबावर मजबुतीने उभे आहे . सभामंडप, अंतराळ, गाभारा अशी रचना आहे. सभा मंडपाचे छत चौरसाकृती दगडी शिळेच्या रचनेचे असून मध्य भागी चक्राकार कमळ शिल्प आहे. अंतराळातील गर्भगृहाचा दरवाजा सुंदर दगडी नक्षीकामाने युक्त आहे . चौरसाकृती गाभाऱ्यात खाली उतरावे लागते . अनुसया कुंड पूर्ण भरलेले असले की गाभाऱ्यात पाणी असते .प या गाभाऱ्यात तपोनेश्वर शिवलिंग स्थापित आहे .या मंदिरास लागून एका छोट्या मंदिरात उमामहेश्वर शिल्प असून भाविक त्याची नियमित पूजन करतात . मंदिरा समोर अत्यंत सुबक कोरीव नक्षी काम रेखीव असे नंदी शिल्प आहे . अंगावरील घुंगर माळा, डोळे, शिंगे यामधे आजही जिवंतपणा जाणवतो . अगदी असाच नंदी पुढच्या मंदिरा समोर आहे. कालभैरव मंदिर व त्या पाठीमागे हनुमानाचे आत्ताच्या काळातीत मंदिर आहे . या ठिकाणी एक सतीशिळा देखील आहे . दुसरे शिवमंदिर गाभारा सोडला तर हे पहिल्या मंदिरा प्रमाणेच आहे . मजबूत नक्षीदार खांबावर सभामंडप, अंतराळ, गाभारा उभा आहे . खांबावर असलेले कोरीव यक्ष हे संपूर्ण छताचा भार तोलून धरलेला आहे . छत चौराकृती रचनेच्या दगडी शिळेवर रचलेले आहे . अंतराळात मध्यभागी छतावर एक मूर्ती शिल्प आहे . गाभाऱ्याच्या द्वारावर सुंदर नक्षीकाम व मध्यभागी छोटे गणेश शिल्प आहे . गाभारा खोलगट नसून शिवलिंग स्थापित केले आहे . मंदिराच्या आतील खांबावर आमलका सारखी गोलाकार नक्षी कोरलेली आहेत . 

        मंदिराच्या पाठीमागे आनखी लहान - लहान मंदिराचे अवशेष दिसून येतात . भव्य दिव्य दगडी शिळा एकमेकावर रचून दोन लहान मंदिरे आहेत ही दोन्ही मंदिरे अनुसया कुंडाच्या अगदी काठावर आहेत . या दोन्ही मंदिरात शिवलिंग स्थापित केलेले आहेत . आता मोठी पडझड या मंदिराची झाली आहे . या परिसरात मंदिराचे खांब, आमलक, छत, नर्तकी मूर्ती शिल्पे, कमान आदिंचे अत्यंत सुबक व कोरीव दगडांचे अवशेष परिसरात पडलेले आहेत . परिसरात इमारतीच्या पायाचे अवशेषही आढळतात . प्राचीन काळी या ठिकाणी मोंठा मंदिर समूह अस्तीत्वात असावा असे दिसून येते . काळाच्या ओघात याचे अस्तीत्व नष्ट होत गेले . आज या प्राचीन वास्तुचे संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे . प्राचीन पाण्याचे स्त्रोत असलेली बारव म्हणजे अनुसया कुंड संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे . प्राचीन धर्म परंपरेनुसार पवित्र जल असलेल्या या कुंडाचे अस्तीत्व आपण एकत्र येऊन टिकविले पाहिजे . महाशिवरात्रीस तथा श्रावणमासात येथे शिव भक्ताची मोठी भक्ती भावाने यात्रा भरते . या तपोभूमिस लाखो लोक दरवर्षी भेट देतात .



संजय खांडवे

लाडखेडचा दक्षेश्वर

  लाडखेडचा दक्षेश्वर स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् । उज्जयिन्यां महाकालमोंकारे परमेश्वरम् ॥ ...