शनिवार, ६ जून, २०२६

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*




 ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः ।

मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापकै रपि॥

बिरुदैश्च ध्वजैरुच्चै: कोषेणापि च भूयसा ।

तथा परिजनैरन्यैरनन्यसमकर्मभिः ॥

समवेतममुं शाह भूपतिश्शोभने दिने ।

प्रारिणोत्पुण्यदेशाय पुण्यकारिणमात्मजम् ॥


         छत्रपती शिवाजी महाराजांनी कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांच्याकडून शिवभारत हा ग्रंथ लिहून घेतला ह्या समकालीन ग्रंथामध्ये कवी परमानंद लिहितो की, काही हत्ती, घोडे व पायदळ या समवेत पिढीजात व विश्वासू अमात्य त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक,बिरुदे,उंच ध्वज, विपुलद्रव्ये त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजीराजे यांनी शुभदिनी पुणे प्रांती पाठविले. स्वराज्याची संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आपल्या मनात संकल्पीली होती  ते स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांनी शिवरायांच्या वयाच्या १२ व्या वर्षीच एक स्वतंत्र राजे म्हणूनच व्यवस्था केली होती . हा आत्मविश्वास शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांना होता  शहाजीराजांकडे कर्नाटकातील बेंगळूर येथे असतांना शिवरायांना एक कुशल रयतवत्सल सम्राट होण्यास आवश्यक असलेल्या शिक्षणाची विविध निष्णात अध्यापकांची तथा प्रशिक्षकांची नियुक्ती केली होती शहाजी राजे स्वतः संस्कृत पंडीत, अर्थज्ञ तथा धुरंदर राजनितीतज्ञ होते.परमानंदांनी शिवभारतात शहाजीराजांच्या अनेक पैलूंविषयी नोंद केलेली दिसते यामध्ये हे त्यांना इंगित तज्ञ, सुधी म्हणजे उत्तम बुद्धि असलेले, पटू ,आत्म प्रतापी, विविध विजयश्रीचे निवासस्थान असणारे, मोठे चिलखत धारण करणारे, महोत्सायी ,मानी आणि गरुडाप्रमाणे शक्ती असलेलेले असे वर्णन केलेले आढळते.

     शहाजी राजांनी शिवरायांना पुण्याकडे पाठविले त्यावेळेस शहाजी राजांचे द्रष्टेपण कसे व्यक्त झाले हे सांगताना परमानंद त्यांना अर्कद्युतिमत (सुर्याच्या तेजाने युक्त )अर्कज्ञ (सूर्याला जाणनारे) अशी विशेषणे लावली आहे.

संधी (तह करणे )विग्रह

( सघर्ष वा युद्ध करणे )यान

 (शत्रुवर केलेली स्वारी )आसन

(प्रत्यक्षरित्या कोणतीही हालचाल न करता परिस्थितीचे निरक्षण करत शांत राहणे) सश्रय

(गरज पडल्यास आपल्यापेक्षा अधिक बलवान राजाचा आश्रय घेणे) द्वैध ( रक्षणासाठी वा आक्रमणासाठी सैन्याच्या दोन आघाड्या करणे ) या षाङगुण्याच्या आधारावर आपले वर्चस्व सिध्द करत असतांना निश्चितच आबासाहेबा कडून ह्या युद्धनितीमधे महाराज कुशल झाले होते . 

      राजमाता जिजाऊ अन शिवरायांसह मातब्बर विश्वासु सरदार,अमात्य, बिरुदे, ध्वज व राजमुद्रा देऊन  पुणे,इंदापूर,सुपे,चाकण व बारामावळ प्रांताच्या जहागिरीवर पाठवून स्वतंत्र राज्यकारभाराची सुरवात तर राज्याभिषेकाच्या ३०-३२ वर्षापूर्वीच झाली होती हे यावरून स्पष्ट होते .परकिय भाषेने घातलेला विळखा तोडत संस्कृत भाषेतील राजमुद्रा हे स्वंतत्र लोककल्याणकारी राजकारभार चालविण्याचाच एक भाग होता .

*प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।*


शहाजींचे पुत्र जे शिवाजीराजे, त्यांची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.असे हे लोककल्याणकारी राजांना साजेसी व सपूर्ण मानवता जपणाऱ्या राजमुद्रेतील संदेश हा कुण्या एका जहागिर किंवा सुभ्या येवढा मर्यादित नव्हता तर एका विश्ववंदनीय छत्रपतींच्या महान रयतेच्या राज्याची अर्थात स्वराज्याची प्रेरणा देणारा होता . अगदी बालपणापासून हया मुद्रेचा अर्थ आबासाहेबानंतर भोसलेवंशीयांचा मना मनात संस्कारीत झालेला दिसतो . मॉ साहेबांच्या सहा अपत्यांचा क्रमवार मृत्युनंतरही शिवरायांचे जेष्ठ बंधु शंभू म्हणजे संभाजी राजे हे शेकडो मैलावर शहाजीराजे अन तुकाईआईसाहेबासोबत कर्नाटकी दुसरी बाजू सांभाळत आहेत तसे अन बाल शिवराय जिजाऊ साहेबा समवेत पुण्यात आहेत . हा संघर्ष अन त्याग आपल्या मातीत आपल्याच माणसांच अन आपल्याच लोककल्याणकारी कायदयाने चालणारे राज्य निर्माण व्हावे की जे स्वांतत्र्य अन स्वाभिमान जपणारे असेल ही प्रेरणा जिजाऊ मॉ साहेब बाल शिवरायात रुजवितात . पूर्वी शापीत असलेल्या पुण्यात जिजाऊंनी लालमहाल बांधला तो बाल शिवरायांना व्यक्तीगत पातळीवर राजेपण हवे असे म्हणून नाही पुण्यासारखा सुपीक भूमीतून अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती आणि शेतकरी समृद्ध झाला पाहिजे म्हणजे तो स्वराज्याच्या कार्यास हातभार लावेल ही पुण्यातून झालेली सुरुवात होती . स्वराज्याचं पहिलं क्रांतीकेंद्र म्हणजे लालमहालच होता .

    एत्तद्देशिंयामधे एक्य भावना निर्माण करून आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ प्रचंड विश्वास निर्माण केला एक कुशल राजकारण खेळण्या इतके सामर्थ्य आपल्या बुद्धी कौशल्यावर शिवरायांनी पुणे प्रांती येताच अवघ्या सात-आठ वर्षांतच प्राप्त केले होते सुपे,जुन्नर, नगर, कोंढाणा, पुरंदर, कल्याण,भिवंडी, माहुली,मुसलदेव डोंगर, मुरुंगड राजगड, हा प्रवास करत, जावळी स्वराज्यास जोडली प्रतापगडांसारखे अभेद्य दुर्गही उभे केले अफ्जली संकट पार करून तेलंगणा प्रांतातील सिद्धीसही पन्हाळ्याच्या वेढ्यातून मोठा धडा शिकवला, शाहिस्तेखानाची बोटे सोडून त्याला इथूनच पळून जावं लागलं,मिर्झाराजे दिलेरखान हे संकटही महाराजांनी पार केलं पुरंदरच्या तहातून दोन पावले मागे येऊन पुन्हा स्वराज्य नव्या जोमाने उभं केलं . दिल्लीच्या तक्तापुढे सिंहगर्जना संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी ठरली .आदिलशहा, डच,इंग्रज,पोर्तुगीजांशी, सिद्धी अन प्रसंगी स्वराज्य आड येणाऱ्या स्वकीयांशी देखील हा संघर्ष सतत महाराजांनी असाच सुरू ठेवला होता . एवढ्यात काही शिवरायांचे कार्य मांडणे अशक्यच आहे 6 जून 1674 रोजी 32 मण सोन्याच्या सिंहासनावर छत्रचामर व बिरुदे,राजचिन्हे धारन करत महाराज सिंहासनाधीश्वर झाले . हा आबासाहेबांचा संकल्प आई जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी प्रत्यक्षात उतरविला . आबासाहेब तर या सुवर्णक्षणास उपस्थित नव्हते परंतु मॉसाहेबांच्या डोळ्यांनी निश्चितच आबासाहेब बघत होते . राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेवर जाणे हा शहाजीराजेच्या दक्षिणेतील पूर्वी असलेली जहागिरीस लोककल्याणकारी स्वराज्यास जोडत जाणे हीच होती .

कांचनबारीचा रणसंग्राम

 

कांचनबारीचा रणसंग्राम


स्थान : ता. चांदवड जि . नाशिक

मार्ग नाशिक - चांदवड महामार्गावर वडाळे भोई फाट्यापासून आत


बुधभूषण या संस्कृत ग्रंथात छत्रपती संभाजीराजे स्वकुलातील आपल्या आजोबांचे वर्णन करतांना त्यांना "अभवतअर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासवः" म्हणजे अर्थकारण व विविध कलामधील विशारद असे शाह नृप थोर असे संबोधतात . संस्कृत भाषेचे महापंडीत असलेले आजोबा व पुढे किशोर वयातच संस्कृत भाषेत पारंगत झालेले बुधभूषणकार शंभू राजे हे भोसले वंशीयांचे संस्काराचे अप्रतिम उदाहरण आहे . अर्थकारणातही पारंगत असलेले  अर्कज्ञ, सहस्रकरविक्रमी, महाबली शहाजी राजे आपल्या समोर कुणी मांडले नाही . आबासाहेबांचे हाच आदर्श शिवरायांनी पुढे जोपासला . स्वराज्य उभं करत असतांना अर्थ कारण किती महत्वाचे याची जाणिव महाराजांना ही वंश परंपरेच्या संस्कारातूनच मिळाली . महाराज जेवढे शूर योद्धे होते तेवढेच ते साहसी,बुद्धीवान व जाणते अर्थतज्ञही होते . राजकिय अर्थकारण ते चांगलेच समजून होते . वेळे अगोदरच त्यांनी स्वराज्यासाठी शाश्वत अर्थकारण उभे केले . त्यासाठी योग्य वेळी सल्लामसलतीने योग्य निर्णय घेऊन तश्याच मोहिमा आखल्या . शहाजीराजे यांनी स्वराज्यासाठी दिलेली  संस्कृत राजमुद्रेचा  दुसरा अर्थ देखील भरभराटी व वैभव असाच निघतो . ज्यावेळी स्वराज्यावरती परकीय आक्रमणे होत त्यावेळी स्वराज्याच्या अर्थकारणाचे झालेले नुकसान महाराजांनी लगेच भरून काढलेले दिसते . अफजली संकटाने स्वराज्यात केलेली प्रचंड नासधूस अन त्यानंतर लगेच त्याला याच मातीत गाडल्यानंतर त्याच्या सैन्यातील हत्ती, घोडे, शस्त्र, तोफा, दारगोळा,मौल्यवान रसद भरपाईचेच एक तंत्र होते . हेच उंबरखिंडीच्या लढाईचा देखील हिशोब महाराजांनी लगेच पूर्ण केलेला दिसून येतो . शाहिस्ताखानाच्या वेळेसही तसाच पूर्ण केला .

        मोगली आक्रमणे सतत स्वराज्यावर चालून येत असत त्यामुळे स्वराज्याचे सर्वच बाजूने नुकसान होत असे . रयतेच्या रक्षणार्थ उभारलेल्या सैन्याचा खर्चही स्वराज्याला उभारावा लागत असे म्हणून महाराजांनी मोगलांना तशी भरपाई देण्याची देखील मागणी केली होती . हे न ऐकल्याने मोगलांची जागतिक व्यापारपेठ असलेली सुरती व्यापारीपेठेवर दोन  वेळेस महाराजांनी मोहिम आखलेली दिसते . पहिली मोहिम ६ ते १० जाने १६६४ व दुसरी ३ ते ५ आक्टो १६७० म्हणजे अश्विन शुध्द अमवस्येचा काळ येतो अर्थात लक्ष्मीपूजनचा दिवस . दुसऱ्या मोहिमेत १ करोडचा ऐवज स्वराज्यात आला होता .

       अखंड सावधानता हा शिवचरित्रातील एक महत्त्वाचा पैलू . तत्कालीन राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास महाराजांचा होता कोणत्या वेळी कोणत्या स्वराज्य हिताच्या योजना आखायच्या हे महाराजांना त्यांच्या बुद्धीमत्ता व चिकित्सक धोरणामुळे सहज कळायचे .  तेवढेच स्वराज्याचे गुप्तहेर खाते देखील अधिक सक्रिय होते .महाराजांच्या सुरतेच्या दुसऱ्या मोहिमे अगोदर औरंगजेब हा काबुल कंधार मधील पठाणांच्या झालेल्या बंडात गुंतलेला होता . दिलेरखान आणि औरंगजेब पुत्र मुअज्जम या दोघांमधील दुही देखील महाराजांना माहीत होती . सुरत कारावरच्या नोंदीमध्ये देखील मुअज्जम शिवाजी राजांना मिळून हा मोगला विरुद्ध बंड करत असल्याच्या नोंदी आढळतात . दिलेरखान देखील औरंगजेबाकडे तशी तक्रार करतो . कल्याण - भिवंडी -तलासरी मार्गे सुरत वर स्वारी करून महाराज बागलाण मधून साल्हेर -मुल्हेर -ताहराबाद- कांचनबारी जुन्नर ते पुणे असे सुखरूप पोहचतात . या संपूर्ण मोहिमे दरम्यान कांचनबारी या खिंडीमध्ये मुगल आणि मराठ्यांमध्ये घनघोर लढाई झाली . नाशिक शहरापासून (६०किमी) चांदवड मुख्य महामार्गाने समोर गेल्यावर वडाळी भोई फाट्यापासून आत जावे लागते . या खिंडीमधून मुख्य डांबरी सडक जाते त्याच्या बाजूलाच कानमंडाळे गावातील दुर्गप्रेमी तथा गावकऱ्यांनी मिळून शौर्य स्मारकाची उभारणी केली आहे . उजव्या हाताला उंच कांचन गड आहे .मुघलांविरुद्ध महाराजांनी स्वतः या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजवला म्हणून या जागेचे वेगळे महत्त्व आहे .

               महाराज सुरतेवरून निघाले त्या अगोदरच दाऊदखान कुरेशी हा खान्देश- बुऱ्हानपूरचा सुभेदार औरंगजेब पुत्र शहजादा मुअज्जमला भेटला होता त्याच्या  लव्याजम्या सह १६ आक्टो . १६७० रोजी चांदवडला येऊन पोहोचला त्यावेळी चांदवडचा किल्लेदार बागीखान हा भयभीत झाला पण दाऊदखान असल्यामुळे त्याच्या जीवात जीव आला . महाराज सुरतेकडून येताना कांचनबारी वरून जाणार  ही खबर गुप्त हेरा मार्फत मुघलांना मिळाली होती . इकलास खान मकरंद,खत्री दाऊद खानचा भाऊ शेख शफी, बसवंत राय,अब्दुल वधुत या सरदारासह ते कांचन बारीकडे निघाले . तारीख - ए- दिलखुशा लिहिणारा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना देखील त्यांच्यासोबत होता .दोन तुकड्यात त्यांनी सैन्य विभागणी केली ही इकलास खान याच्याकडे तोफखाना सोपवल्या गेला त्याच वेळी मराठ्यांच्या बाजूने युद्धाचे नेतृत्व स्वतः शिवराय करत होते त्यांच्यासोबत प्रतापराव गुजर आनंदराव वरकड,व्यंकोजी दत्तो, बाळाजी आवजी, मोरोपंत पिंगळे हे पराक्रमी सरदार होते . दोन प्रहर म्हणजे सहा तास हे युद्ध चालले मराठ्यांच्या युद्ध तंत्रापुढे मुघल नेहमीच हतबल होत असत या युद्धातही अगदी तसेच झाले समोरासमोरील लढाईत मराठे घारी सारख्या घिरट्या घालून शत्रूला कमकुवत करत . मराठे कोठून आणि कसा हल्ला करत हे देखील त्यांना कळत नव्हते .ही परिस्थिती पाहून अनेक मोगली सैन्य सैरावैरा पळायला लागले . मोगलांचे दहा हजार सैन्य व त्यासोबतच मराठ्यांचे दहा हजाराचे घोडदळ या दोघांचीही घनघोर युद्ध या खिंडीत चालले . मराठ्यांचा मोठा विजय या लढाईत झाला .

   कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या बखरीत याची नोंद केली आहे "खासा राजा घोड्यावर बसून, बख्तर घुग्गी घालून, हाती पट्टे चढवून, मालमत्ता घोडी पाईचे लोक पुढे रवाना करून, आपण दहा हजार स्वारांशी सडे सडे राऊत उभे राहिले ". महाराज स्वतः दोन्ही हातामध्ये दानपट्टा घेऊन अंगात चिलखत व शिरस्त्रान सह या युद्धात लढत आहेत . दहा हजार राऊत म्हणजे घोडेस्वार हे त्यांच्यासोबत आहेत . त्याचवेळी सुरतेवरून आणलेला खजाना हा कोणत्या मार्गे आणि कसा पुढे गेला हे एक मोठे कोडेच होते युद्धात लढणाऱ्या मावळ्यांना देखील कदाचित ते माहीत नसावे . या लढाईस वणी दिंडोरीची लढाई देखील म्हणतात . उंबरखिंडी प्रमाणेच महाराज या लढाईत लढले . जेधे शकावली नुसार कार्तिक शुदध चर्तुदर्शीस हा संग्राम घडला  म्हणजेच १७ आक्टो १६७० रोजी हा रणसंग्राम घडला .

News

 








शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...