शिवमंदिर समुहाचे गाव - धोत्रा नंदई
स्थान :- ता देऊळगावराजा जि . बुलढाणा, चिखली - जालना महामार्गावर चिखली पासून ३५ कि.मी .
बुलढाणा जिल्ह्यातील साकेगाव, सातगाव भुसारी,कोथळी, लोणार, सिंदखेडराजा, ह्या ठिकाणी प्राचीन मंदिरांचे समुह आहेत . आजही ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. असेच एका ठिकाणाची त्यामध्ये भर पडते ते म्हणजे धोत्रा नंदई येथील प्राचीन शिवमंदिरांचा समूह . चिखली - देऊळगावराजा महामार्गावरून धोत्रा नंदई फाटयावरुन पूर्वेस दोन कि .मी अंतरावर हे गाव आहे . गावात शिरतांना उजव्या बाजूस एक प्राचीन शिवमंदिर नजरेस पड़ते . पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने या ठिकाणच्या तीनही शिव मंदिरास लोखंडी कुंपण केले आहे . आत मध्ये पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण ३८ मी x ३० मी मंदिरास दगडी तटबंदीचे अवशेष दिसून येतात . अगदी मधोमध २०मीx ११ मी च्या भक्कम दगडी पाया ज्याची उंची १मी पर्यन्त आहे . मध्ये आयताकृती उंचवटा आहे . मुख्य प्रवेशद्वारावर खांब उभे असून त्यावर केवळ आडव्या दगडी नक्षीयुक्त शिळा दिसून येतात . मुख्य दरवाज्याच्या खालील भागात दोन किर्तीमुखांची शिल्पे कोरलेली आढळतात . दरवाज्याच्या दोन्ही बाजूस अप्रतिम मूर्तिशिल्प कोरलेली आहेत . यामध्ये उजव्या बाजूस एक चामरधारी स्त्री चे सुंदर शिल्प असून त्यावर चक्र कोरलेले आहे . अजूनही दोन्ही बाजूचे शिल्प खूप आर्कषक वाटतात . या कमानीवरील छत आता पडलेले आहे . दरवाज्यावरील भागात समभूज चौकोनी आकार कोरलेली नक्षी व त्यावर बदकांची सलग रांग कोरलेली असून मध्ये एक ध्यानस्त मूर्ती शिल्प आहे व त्याच्या अगदी खालोखाल दरवाच्याच्या चौकटीच्या मधोमध गणेश शिल्प कोरलेले आहे . इतर ठिकणी पाने फुले देखील कोरलेली दिसतात .पूर्वी पूर्ण स्वरूपात असलेले हे मंदिर सुंदर नक्षीयुक्त असावे व त्यावर अनेक अशी सुंदर मूर्तीशिल्पे असावीत असे मंदिर परिसरात पडलेल्या नक्षीयुक्त शिळावरून जाणवते . सदयस्थितीमध्ये डाव्या बाजूस अलीकडच्या काळात बसविलेली ग्राम सरक्षक देवता वीर हनुमानांची शेंदूर लावलेली मूर्ती आहे . या द्वारातून प्रवेश मुख्य सभामंडपात होतो . ह्या मंडपाचे छत आता पूर्णपणे नष्ट झालेले असून उत्तर दक्षिण बाजूकडील दोन्ही भिंती पूर्णपणे कोसळलेल्या आहेत . सभा मंडपाचा आकार ६.१५ मी X ६ .१५मी आहे . पुढे दोन खांबावर उभा असलेला मंदिराच्या अंतराळाचा भाग आहे . मुख्य गाभाऱ्याच्या चौकटीवर कोरीव नक्षीकाम दिसून येते . उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस किर्तीमुखे कोरलेली आहेत . गर्भगृहातील भिंती सपाट दगडाच्या आहेत . गाभाऱ्याच्या छताचा भाग लहान -लहान होत जाणाऱ्या चौरसाकृतीने बनलेला असून मध्यभागी कमलपदक कोरलेले आहे . मध्यभागी दगडी शिवलिंग असून त्याची मनोभावे पूजा केली जाते . मंदिराच्या बाजूला आयताकृती गाळलेल्या स्वरुपातील एक बारव आहे . समोरच एक दगडी रांजण आहे . २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन गेली .कला,साहित्य,व्यापार,उद्योगया क्षेत्रात त्या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली होती या साठी नाणेघाट हा महामार्ग या घाटातून खोदण्यात आला व या महामार्गावर अगदी अशाच प्रकारचा दगडी रांजण हा धोत्रा नंदई गावात या ठिकाणी आहे . आकाराने त्या रांजणापेक्षा थोड़ा लहान आहे . नाणेघाटात हा रांजण टोल जमा करण्यासाठी वापरला जात असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे .या रांजणाच्या बाबतीतही संशोधन होणे गरजेचे आहे .
धोत्रा या गावात शिवाची तीन मंदिर आहेत त्यापैकी दुसरे अगदी गावाच्या मध्य वस्ती मध्ये आहे . या मंदिरासही प्राचीन दगडी तटबंदी होती . पूर्वी याची उंची खूप मोठी असावी असे दिसते . पहिल्या मंदिराप्रमाणेच ही तटबंदी आहे . याचे माप २५ मी x १७.५० मी आहे .बाहेरील भागावरील शिळा पूर्णपणे खचल्या आहेत बाहेरील भाग पाहीला तर एकावर एक शिळा रचल्या असे वाटते .आतील सभामंडप व गाभारा दगडी खांबावर उभा आहे . सभामंडप ४.६०मीx ४.६० मी आकाराचा असून मुख्य दरवाज्यावर किर्तिमुखे व नक्षीकाम केले आहे . आत प्रवेश करताच खांबावर कोरलेली किर्तिमुखे बहुतेक खांबावर आहेत . अंतराळात देवकोष्टके असून ती आता रिकामी आहेत .गाभाऱ्याचे प्रवेशद्वारा वर नऊ मुखवटे कोरलेली आहे काही मुखवटयांना सुळे आहेत अश्या प्रकारची नऊ मुखवटे पिशोर ता कन्नड येथील मंदिरावर आहे. खाली दोन किर्तिमुख कोरली आहेत . एक आड एक वेल, प्राणी शिल्प, विविध आकृत्या यावर कोरल्या आहेत .वराहीचे व हातात आयुधे असलेले भैरवाचे सुंदर शिल्प यावर कोरले आहे .गाभाऱ्यात शिवलिंग विराजमान आहे . या मंदिरांची प्रचंड पडझड झाली आहे . मंदिर परिसरातही अनेक शिल्पे पडलेली आहे .याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे येथील बारवांच देखील पुनर्जीवन होणे गरजचे आहे . हा आपला महावारसा टिकला पाहिजे पुढच्या भागात याच गावातील प्राचीन शिवमंदीराची माहिती घेऊ या .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा