*रेणूका मातेचा चैत्र नवरात्रोत्सव*
भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली . रामायण महाभारत या अवश्य महाकाव्यातही दुर्गा अंबिका आदी मातृदेवतांच्या पूजनाचा उल्लेख आढळतो . पुरानात महिषासुरमर्दिनीचे विजयगाना सह महाकाली तथा सप्तमातृकेचे महत्व दिसून येते .
संपूर्ण भारतात एकूण 51 शक्तीपीठे सांगितले जातात . आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी आई माहूरची रेणुकाई हे तीन पूर्ण शक्तिपीठे आहेत आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध पीठ समजल्या जाते . मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेले जालना जिल्ह्यामधील पिंपळगाव हे गाव रेणुकाई मातेच्या नावानेच ओळखले जाते . अगदी माहूरच्या रेणुकाई पासूनचा प्रवास आपण बघितला तर या मार्गाने अनेक रेणुकाई मातेची ठाणी दिसून येतात यामध्ये चिखली- मर्दडी माता - पिंपळगाव रेणूकाई - बाजारसावंगी- ते वणीच्या अर्ध पीठा पर्यन्त जाऊन पूर्णत्वास जाते .ही ज्या त्या प्रदेशातील शक्ती पिठांवर स्थानिक मोठ्या भक्ती भावाने त्यांची पूजा अर्चना करत असतात . पिंपळगाव रेणुकाई हे आईचं ठाणही अगदी तसेच आहे . या गावातील प्रत्येक माणूस हा सकाळी आईच्या दर्शनानेच आपल्या नित्य कामास सुरुवात करतो .
चैत्र शुद्ध षष्ठी पासून या चैत्र नवरात्री उत्सवास सुरुवात होते आणि पौर्णिमेस हनुमान जयंती या उत्सवाची सांगता होते . मुख्य उत्सवास पहिल्या दिवशी पालखी सोहळा आयोजित केला जातो . पालखीत रेणूकाई मातेचा चांदीच्या मुकुटासह सर्व परंपरगत श्रृंगारासह संपूर्ण गावास प्रदक्षिणा घातली जाते खांदयावर अगदी मोठ्या भक्ती भावाने ही पालखी घेतली जाते .सनई - संबळ . शंखं आदि पारंपारीक वाद्यासह बॅण्ड बाजासह दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यन्त हा उत्सव चालतो . संबळ हे विधिनाट्यातील वादय संपूर्ण परिसर भक्तीमय करून टाकते . संबळ या वाद्याबाबत एक कथा सांगितली जाते यामध्ये महिषासुराचे दोन शिष्य म्हणजे चंड आणि मुंड या दैत्याचा देवीने वध केला त्यावेळी ते दोन शिष्य म्हणाले हे देवी तू आम्हाला मारण्याआधी तुझ्या कामी आमचा देह वाजवा अशी आमची इच्छा आहे म्हणून चंड व मुंड दैत्याच्या शीर व कातडी पासून संबळ तयार केले गेले आणि हे संबळ वाजून देवीला शांत केले जाते अशी परंपरा आहे .यामध्ये ज्योत पेटवून यात्रेत दिवटी फिरवली जाते . या .पालखी सोहळ्यात दृष्य स्वरुपात भारूड तथा तगदराव व वाघ्या मुरळी ह्या अंगीभूत कौशल्य असलेल्या, पारलौकिक तत्वज्ञान सांगत पुढच्या पीढीत संस्कारातून संक्रमित होत चाललेल्या प्राचीन लोक परंपरेच्या झाँकी अगदी रात्रभर चालतात . या उत्सवात लेकी- बाळी दरवर्षी न विसरता आपल्या मुला बाळासह हजर असतात . मातृशक्तीचा समृद्धी रुपी यशवंत कीर्तीवंत घडविणारा कृपायुक्त आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव अखंडीतपणे असाच राहू दे अशी या प्रसंगी प्रार्थना करतात . पंचक्रोशीतील अनेक लोक सहकुटुंब या उत्सवात सहभागी होताना दिसतात ही परंपरा गेल्या तीनशे वर्षांपासून या गावात सुरू आहे . गावातील लहान मुले तथा तरुण वर्ग या पालखी सोहळ्यात लाठीकाठी सारखे मर्दानी खेळ रात्रभर खेळताना दिसतात .
महोत्सवाचा दुसरा दिवस हा वगदा -वगदी आणि मल्लखांब तथा कुस्ती या सोहळ्याने गजबजलेला असतो . वीरतेचे व शौर्याचे प्रतीक असलेले हे खेळ आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेत अगदी प्राचीन काळापासून खेळले जातात आणि हे जपण्याचं काम हे गाव या निमित्ताने करताना दिसते . कुस्ती मध्ये मोठी बक्षीसे या उत्सवात दिली जातात . महाराष्ट्र भरातून नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात . परिसरातील हजारो लोक या स्पर्धेचा सतत दोन दिवस न चुकता आनंद लुटतात . यात्रेच्या तिसऱ्या दिवशी उर्वरीत कुस्ती सामने व सायं रेणुकाई माते समोर पारंपारीक पद्धतीने वाद्या सह पोत खेळला जातो . देवीचा भंद फिरविला जातो.परिसरातील वादय वादक सतत तीन दिवस आईच्या सेवेत असतात . मातृ देवतेची उपासना करणारी शक्ती प्रेरणा ही शेकडो वर्षाच्या परंपरा जपण्यासाठी प्रचंड गर्दी उसळते . शेवटच्या दिवशी पौर्णिमेस म्हणजे हनुमान जयंतीस भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते .
रेणुकाई मातेच्या मंदिर परिसरात प्राचीन दगडी कोरीव मंदिराचे अवशेष आढळतात शिवाय मंदिराच्या दक्षिणेस वीटांनी बाधलेली सुंदर प्राचीन बारव आहे . गावाच्या पूर्वेस अवघडराव सावंगी येथील प्राचीन पाताळेश्वर मंदिर व पश्चिमेस असलेले अन्वा येथील प्राचीन मंदिर या गावाचे धार्मिक व प्राचीन महत्व विषद करतात . श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नागनाथ महाराजांचे मंदिर , भैरवनाथ मंदिरामुळे धार्मिक परंपरा या गावाला आहे . मारोती मंदिरा बाहेर असलेली वीरगळ या गावच्या शौर्याची परंपरा सिद्ध करते .
भूमीदेवता, युद्धदेवता , आरोग्यदेवता, सुबध्दतेचीदेवता, जलदेवता, नवनिर्मिर्तीदेवता , पुनरुत्पादनदेवता असलेल्या रेणुकाई मातेसोबतच जोगेश्वरी , तुकाई या मातृदेवतांचे पूजनही मोठ्या मनोभावे या परिसरातील स्थानिक करतात . अठरा परगड जाती धर्मास सोबत घेऊन महाराष्ट्राची प्राचीन लोकपरंपरा जपणाऱ्या पिंपळगाव रेणुकाई गावाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संजय खांडवे
9011971122

