शुक्रवार, २२ मे, २०२६

सुरतेवर वचक बसविणारी साल्हेरची लढाई

 सुरतेवर वचक बसविणारी  साल्हेरची लढाई





बागलाण प्रांतात प्रवेश करून विजय संपादन करणे हा स्वराज्यासाठी फार महत्वाचा विषय होता . प्रत्यक्ष त्या प्रांतात घुसून समोरा समोरची लढाई करुन मराठ्यांनी विजय मिळविणे हा त्या काळात उत्तरेकडील भागाशी जुळलेल्या भूभागामुळे एक प्रकारे घरात घुसुन आपले वर्चस्व सिद्ध करत बलाढ्य मोगली साम्राज्याची दहशत संपविणारा होता. येथूनच सुरत जाणारा मार्ग असल्याने सुरतेवर वचक निर्माण होऊन . खान्देशाकडून स्वराज्याकडे येणारी संकटे देखील थांबण्यास मदत झाली. ह्या मोहिमे पूर्वी म्हणजे १६७० मध्येच सुरतेवर छापा टाकून महाराजांनी  औरंगजेबाला मोठा धक्का दिला . ६६ लक्षाची लुट स्वराज्यासाठी मोगली प्रांतांतून मिळाली होती होती . सुरतेवरून पुढे त्या काळात असलेल्या मुल्हेरच्या व्यापारी पेठावरही छापे घातले . वाटेत वणी - दिंडोरीची प्रसिध्द असलेली मोठी लढाई झाली . महाराज स्वतः ह्या लढाईत पराक्रम गाजवत पुन्हा मोगलांचा मोठा पराभव केला . वऱ्हाडातील कारंज्यात मोहिम फत्ते करत खान्देश, बागलाणही मराठ्यांनी लुटले हे ऐकून आता औरंगजेब अधिकच हतबल झाला होता .

           औरंगजेबाने १६७१ मध्ये महाबतखानास दक्षिणेत पाठविले तो बऱ्हाणपूर ओलांडण्याच्या आतच मराठयांनी बऱ्हाणपूरासही मोठा धक्का देत पुन्हा बागलाण प्रांत गाठला होता .महाबतखान येताच त्याने बागलाणातील किल्ले घेण्यास सुरुवात केली . कन्हेरगडाच्या पायथ्याशी झालेली लढाई प्रसिध्द आहे या लढाईत उवघे ६०० मावळे रामजी पांगेरा यांच्या नेतृत्वात मोठ्या पराक्रमाने लढले . दिलेरखान या पराक्रमाने अचंबीत झाला होता. महाबतखान बागलाणात मराठ्यांना गुंतवून दिलेरखान पुण्यावर चालून येत होता . बागलाणात सुरु असलेल्या मराठ्यांच्या कोंडीस तोडण्यासाठी अजिंठा घाट -चाळीसगाव - सटाणा मार्गे प्रतापराव गुजर तर त्र्यंबकमार्गे मोरोपंत पिंगळे यांनी किल्ले जिंकत बागलाणात घुसण्याची योजना आखली . याच वेळी मुघलाकडून इकलासखानाने साल्हेरास वेढा दिला होता . त्याच्या बाजूने  औरंगजेबाचा दुध भाऊ बहादुरखान, राव अमरसिंग चंद्रावत, मोहकमसिग सह ४० ते ५०००० चे सैन्य होते . दुसऱ्या बाजूने मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले,सिदोजी निंबाळकर,खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, सूर्याजी काकडे, मुकुंद बल्लाळ, नागनाथ ही सरदारासह केवळ १०००० चे सैन्य होते . फेब्रु १६७२ मध्ये झालेले हे युद्ध समोरा समोर लढले गेले पण मराठ्यांची सैन्य क्षमता कमी असल्याने नेहमी प्रमाणे व्युहरचना करून चारही बाजुने हल्ला चढवून शत्रूस हतबल केले . बारा तास ही लढाई चालली . सभासद  या लढाईच वर्णन करतांना म्हणतो " युद्ध होताच पृथ्वीचा असा धुरळा उडाला की तीन कोर्स औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा झाले घोडी उंट हत्ती याची गणना नाही रक्ताचे पूर वाहिले रक्ताचे चिखल झाले त्यामध्ये लोक रुतो लागले .मोरोपंतांना प्रचंड लूट मिळाली 6000 घोडे सव्वाशे हत्ती सहा हजार उंट आणि अगणित बिछायत कापड चोपड मालमत्ता जवाहर खजिना  हाताशी लागला . वजीर नामांकीत धरले . खासा इकलास व बेलोलखान पाडाव झाला ".

     या लढाईत शिवरायांचे बालपणीचे साथीदार सूर्याजी काकडे स्वराज्याच्या कामी आले . महाराजांना याचे खुप दुःख झाले , " माझा सूर्यराज म्हणजे महाभारतातील कर्ण " असे गौरव उदगार त्यांनी  वीर सुर्याजी साठी काढले . या लढाईने बागलाण प्रांतामधील मोगली दहशत पूर्णपणे संपून मराठ्यांची उत्तरेत वचक निर्माण झाली . मदतीला आलेला दिलेरखान बातमी मिळताच धास्तावून चांदवड कडे निघून गेला .इकलासखान जखमी होऊन पळाला,राव अमरसिह चंद्रावत मारला गेला . औरंगजेब त्याच्या हरलेल्या सरदारांना संतापाने म्हणाला " साल्हेरीच्या युद्धात तुम्ही मेला का नाहीत ?" अशी मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ठरलेली साल्हेरची लढाई सूर्याजींसह अनेक स्वराज्य वीरांच्या रुपाने अमर ठरली . वीर सुर्याजी काकडे यांची वीर भूमी ठरली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...