शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

ओबीसी अधिकारी कर्मचारी - चिंतन शिबिर*

 *


ओबीसी अधिकारी कर्मचारी -  चिंतन शिबिर*


➖➖➖➖➖➖➖   


 संजय खांडवे,बुलढाणा


*तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव*




      वारकरी पंथातील सर्वच संतांचे विचार हे मानवतावादी आणि माणसाला माणूस घडवणारे आहेत प्रसंगी आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे हे विचार पेरणारे आहेत . हीच मानवतावादी माणूसधर्म शिकविणाऱ्या संस्कृतीचे आपण सर्व पाईक आहोत . प्रत्येकाला त्याच्या परीने फुलण्याचा ,बहरण्याचा अधिकार मिळालेला आहे स्वातंत्र्य, समता ,बंधुता व न्याय हे आपल्याला आपल्या भारतीय संविधानातूनच मिळाले . हा आपल्या लोकशाही भारत देशाचा आत्मा आहे .याची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे आहे . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी या संविधानिक तत्वाचे महत्व संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात संकेत देत विषद केली आहे . प्रत्येक संविधान प्रेमींने हे भाषण ऐकलंच पाहिजे . भारतमातेला स्वतंत्र करण्या साठी अनेक क्रांतीवीरांनी सर्वस्वाचा त्याग करत भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले .फक्त स्वतःला मुक्त करविणे हा अर्थ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नव्हताच ! राजकिय स्वांतत्र्याबरोबरच सामाजिक तथा आर्थिक स्वांतत्र्यही तेवढेच महत्वाचे होते . हे त्यांच्या कार्यातून दिसून येते .  स्वातंत्र्यानंतर सामाजिक उतरंडीचा विचार करत संविधानिक तत्वानुसार सामाजिक तथा आर्थिक समानतेसाठी आरक्षणाची तरतूद केली गेली .  पुढील काळात या संपूर्ण प्रवासात

ओ बी सी आरक्षण हा मोठा संघर्षाचा विषय होता .या व्यवस्थेत या समुदायाला स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा काळ गेला .आज स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानंतरही परिस्थिती फारशी बदलली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल .

       या घटनेतील ३३० व ३३२ अधिनियमातून आणि १५(४) व १६(४)नुसार नोकरी मधे  एस सी ,एस टी साठी आरक्षणाची तरतुद केली गेली.त्याच बरोबर ३४० अधिनियमातील तरतूद नुसार ओबीसी आरक्षणासाठी आयोग गठीत करण्यात यावा व त्यानुसार ओबीसी प्रवर्ग ठरविण्यात यावा अशी तरतुद करण्यात आली होती .याला अनुसरुन काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. या नुसार त्यावेळी  ओबीसी मधे २२१८ जाती ठरविण्यात आल्या होत्या. देशात बहुसंख्येने  असलेल्या समाज वर्गाची हककाच्या लढाईचाच तो काळ होता असेच म्हणावे लागेल .१९७७ मधे  मा. मोरारजी देसाई सत्तेवर आले व त्यांनी बी.पी.मंडल कमीशनची स्थापणा केली.मोरारजी देसाई सरकार गेल्यानंतर मा  इंदिराजी गांधी सरकार सत्तेत असतांना १९८१ मधे मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला .यानुसार ३७४३ जातींचा समावेश करण्यात आला.त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या ओबीसी चळवळीना त्या ज्ञात आहे.पुढे मा. व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना मंडल कमीशन लागू झाले .त्यानंतरही क्रिमिलेअरचा संघर्ष सुरुच होता .९० च्या दशकात ओबीसी समुदाय हया संविधानाने दिलेल्या हककाचा लाभार्थी ठरला .२७% आरक्षणाने भारतातील कान्याकोपऱ्यात असलेल्या शेवटच्या घटकाचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली .आजही बहुसंख्येने असलेला ओबीसी घटक जात- धर्म सोड्रून आपल्या न्याय्य हकक,अधिकारासाठी एकत्र येत आहे पण तो अधिक संघटीत होणे गरजेचे आहे.  

        आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या अधिकारी व कर्मचारऱ्यांचे अधिष्ठाण असलेली मजबूत संघटना  मा .सुनिल शेळके यांनी स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना  ही संघटना स्थापन केली होती . या संघटनाचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला  येणाऱ्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.  ओबीसी विदयार्थी तथा पालकांना हे संघटन एका क्लीकवर  सामावून घेवून त्याच्या विदयालयीन,महाविदयालयीन शिष्यवृत्ती,प्रवेश तथा क्रिमिलेअर विषयक समस्या अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यन्त असलेल्या बांधवाला क्षणात सोडविण्यास मार्गदर्शक ठरणार आहेत . स्वतःची स्वंतत्र वेबसाईट व अँप या प्रसंगी सुरू होणार आहे .यामधे सर्व प्रकारचे शासकिय आदेश व माहीती मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहेत या साठी या संघटनेचे तज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत .  बेखबर असलेला ओबीसी आता सोशलमिडीया , तंत्रज्ञानाच्या व स्पर्धात्मक युगात बाखबर करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे . तीन वर्षा पूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे पहिले अधिवेशन पार पडले होते या वेळी  उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते झाले होते. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू होते . ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करुन. दिशा दाखविली .प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने काय राहतील यावर चिंतन घडविले होते. त्यानंतर २०२४ मध्ये दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले या अधिवेशनात संपूर्ण राज्यभरातून या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . या चिंतन शिबिरात अध्यक्ष म्हणून ख्यातमान लेखक तथा विचारवंत  कांचा इल्लैया हे उद्घघाटक म्हणून लाभले होते . भारतातील जवळपास सर्वच जातींचा व त्यांच्या संस्कृतीचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याने या चिंतन शिबिरात त्यांच्या अभ्यासातून विचार मांडला होता . यावेळी माजी आमदार डॉ . नारायणराव मुंडे हे देखील उपस्थित होते . असे राष्ट्रीय स्तरावरील विचारवंत तथा अभ्यासकांच्या मदतीने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हा ओबीसींच्या हक्कासाठी सदैव लढत आहे याच उद्देशाने या 2026 मधील तिसरे अधिवेशन हे संत नगरी शेगावला होऊ घातले आहे . या अधिवेशनात प्रमुख वक्ते राष्ट्रीय युनिटी ऑफ मूलनिवासी समाज चे मा कमलकांत काळे हे ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थिती या विषयावर ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत . तसेच एससी एसटी ओबीसी वेलफेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय थुल हे येणाऱ्या काळात ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर येणारी आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत . याचवेळी ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होणार आहे अशा या चिंतन बैठकी तून गेल्या तीन वर्षापासून एक विचार मंथनाची चांगली परंपरा या संघातर्फे सुरू झाली आहे ही एक अभिनंदनिय बाब आहे .

सहयाद्रीचा अप्रतिम दागिना - हरिशचंद्रगड

 


सहयाद्रीचा अप्रतिम दागिना - हरिशचंद्रगड


स्थान : ता . अकोले जि . अहिल्यादेवीनगर , संगमनेर - अकोले - राजुरवरुन पुढे २७ कि.मी.



 हरिश्चंद्रेश्वराच्या नावाने प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड हा सह्याद्री पर्वत रांगेतील सह्याद्रीचा एक अप्रतिम दागिना आहे . इतिहास आणि अप्रतिम निसर्ग या दोन्ही गोष्टीचे मिलन असलेला हा गड भटक्यांची पंढरी देखील मानल्या जातो . पुणे ,ठाणे आणि अहिल्यादेवी नगर या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटाच्या डाव्या बाजूला व संगमनेर - अकोले -राजुर पासून पुढे 27 किलोमीटरचे अंतर घाट माथ्यावरून डोंगर दर्यातून , निसर्गाचं अप्रतिम लेणं असलेल्या सह्याद्रीतून घनदाट कळसूबाई - हरिशचंद्रगड अभयारण्यातून पाचनई गावापर्यंत घेऊन जातो . या गावात पोहोचल्यावर अजस्त्र अश्या हरिश्चंद्रेश्वर गडाचे दर्शन होते . तसे हरिश्चंद्रगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहे त्यापैकीच हा एक मार्ग याशिवाय माकड नाळ , नळीची नाळ आणि खिरेश्वर मार्गे सुद्धा या गडावर पोहोचता येते . पण हा मार्ग सोपा आहे . पाचनई गावामध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्थानिकांच्या मदतीने होते या गावात वाहने उभी करून गडाची चढाई करता येते एका कमानी मधून डोंगर चढाईला सुरुवात होते ही चढाई मध्यम स्वरूपाची असल्याने वाटेत मध्ये काही लोखंडी जिने सुद्धा लावण्यात आलेले आहे . कातळ कड्याच्या कपारीतून जातांना उजव्या बाजूला खोल दरी व त्या साठी सुरक्षा म्हणून लोखंडी रिलिंग लावण्यात आलेली आहे . लहान मोठे झरे व ओहळांना ओलांडत या पाऊलवाटेने आपण एका धबधब्याजवळ पोहोचतो निसर्गाचं सौंदर्य खरचं येथून न्याहाळत जात असताना पुन्हा एका लाकडी पुलावरून दाट जंगलातून चढाई करत एका उंच टेकड्यावर पोहोचतो ही दोन अडीच तासाची चढाई करून आपल्याला हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन घडते . या हरिश्चंद्रेश्वराची माहिती आपण मागील भागात घेतली आहे .

            या गडाचा घेर खूप मोठा आहे गडावरील तारामती शिखर आणि बालेकिल्ला ही महत्त्वाची दोन उंच ठिकाणे असून या सोबतच प्रसिद्ध असा कोकणकडा हा मनाला भुरळ लावून जातो . गडावर येण्याचे मार्ग बरेच असल्याने या गडावर अनेक वाटा दिसून येतात . साहसी गिर्यारोहक या वाटेचा वापर करतात परंतु कोणतीही माहिती नसलेल्यांनी याचा वापर करू नये . याचबरोबर दाट झाडी मधून जाणाऱ्या वाटा या भुलभुलैय्या सारख्या वाटतात त्यामुळे स्थानिकांची मदत घेऊनच बालेकिल्ला किंवा तारामती शिखर गाठावे . दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या एका कंपनीत काम करणारे सहा जण ऑगस्ट महिन्यातच या गडाचे सोशल मीडियातील आकर्षणातून कसलीही माहिती न घेता भर पावसात खिरेश्वर मार्गाने चढाई करत वर आले आणि दाट झाडी मधील पाऊल वाटा चुकल्याने गडावर जंगलात अडकून राहिले यामध्ये उपासमारी व पाऊसामुळे एकाचा दुदैवी मृत्यू झाला होता नंतर स्थानिकांच्या अथक परिश्रमातून इतरांना वाचविण्यात यश आले होते . निसर्ग हा एवढा भुरळ घालतो की या गडावर पोहोचल्यावर फिरतच राहावंसं वाटते . पाच वर्षांपूर्वी या गडास पहिल्यांदा भेट दिली होती त्यावेळेस   सर्वप्रथम हरिशचंद्रेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा पूर्वेकडील भागात असलेला बालेकिल्ला पाहण्याची इच्छा झाली तारामती शिखराच्या पायथ्याला लागून दाट जंगलातून बालेकिल्ल्याकडे आम्ही निघालो या गड भ्रमंतीत आम्ही चार जण होतो बालेकिल्लाविषयी कोणतीही माहिती नव्हती फक्त स्थानिकांच्या मदतीने आणि गुगल मॅप चा वापर करून आम्ही निघालो होतो. अर्ध्या तासाच्या भ्रमंती नंतर घनदाट झाडी मधून अनेक वाटा या दिसत होत्या त्यावेळेस बालेकिल्ल्याच्या रोखाने आम्ही चालत जाऊन संपूर्ण बालेकिल्ल्याला गोल फेरा मारला तरी देखील बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आम्हाला सापडली नव्हती . एवढ्या घनदाट जंगलात शेवटी एका स्थानिकाने आम्हाला पुसदशी पाऊलवाट दाखवली आणि त्या वाटेने बालेकिल्ल्यावर पोहोचलो होतो बालेकिल्ल्यावर आजही दगडी इमारतीचे संपूर्णपणे कोसळलेले अवशेष आहेत त्याचबरोबर एवढ्या उंचावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत . बाले किल्ल्यावरील शिखरावर फारशी जागा नाही एक दोन लहान इमारती उभ्या राहतील व  तीन चार पाण्याच्या टाकीची एवढीच जागा बालेकिल्ल्यावर आहे . येथून तारामती शिखराचे आणि खालील कोकण भागाचे दिव्य दर्शन घडते .

      येथून पुन्हा परत मंदिर परिसरात यावे लागते या ठिकाणी गडावर स्थानिकांनी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या अगदी वरच्या भागात भव्य दिव्य असे तारामती शिखर दिसते या तारामती शिखराच्या पायथ्याशीच प्राचीन काताळात कोरलेल्या  लेणींचा समूह असून या ठिकाणी पर्यटक विसावा घेताना दिसतात. हजारो वर्षांपूर्वीची असलेली ही लेणी समूहांची मांडणी या गडाचे प्राचीनत्व सिद्ध करते या लेणीला गणेशलेणी असेही म्हणतात. लेणीमध्ये सात ते आठ फूट उंचीची दगडी काताळात कोरलेली सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे . या लेणीच्या वरच्या भागातूनच तारामती शिखराकडे जाता येते .  शिखरावर जाताना खूप काळजी घ्यावी लागते अरुंद अशा पाऊलवाटेने तारामती शिखरावर चढत असताना घनदाट झाडी व प्रचंड डोंगर चढाईचा सामना करत जावे लागते. सर्वोच्च भागावर पोहोचल्यावर प्रचंड वाऱ्याचा वेग सांभाळावा लागतो तारामती शिखराच्या पलीकडच्या बाजूस कातळकडा आहे शिखरावर फारच कमी जागा असून जमिनीतील कातळावर कोरलेले महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी दिसून येते . आता हौशी पर्यटकांनी भगवा ध्वज लावलेला आहे .  किल्ल्याचे आणखी मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा, येथून त्याचे भव्य दर्शन घडते .  तेथे या ठिकाणाहूनही जाण्यास मार्ग आहे परंतु ज्यांना याविषयी काहीही माहिती नाही त्यांनी असे नवीन नवीन मार्ग स्वतःच्या मनाने येथे निवडू नये स्थानिक सोबत असेल तरच अशा मार्गाने जावे कारण या मार्गाने हजारो फूट खोल दरीमध्ये अगदी काठावरून जाणारी ही पाऊलवाट आहे .

            गणेश लेणी जवळून पुन्हा वर पठारावर चालत जात पाऊण - एका तासाच्या वाटेने कोकणकड्याकडे जाता येते. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या ठिकाणावर कातळ कड्याला लागून लोखंडी रेलिंग सुरक्षासाठी लावण्यात आलेले आहे दोन अडीच किलोमीटरचा हा सी आकारात असलेला महाकाय कडा आहे .  ज्यावेळेस ढगांचा समूह आलेले असतात त्यावेळेस येथील दृश्य पाहण्यासारखे असते . दूरपर्यंतचा परिसर येथून न्याहाळता येतो . प्रशिक्षित गिर्यारोह याठिकाणी हा कडा उतरण्याचे साहसही करतात . 1835 मध्ये येथे एक घटना घडली हे इंग्रज अधिकारी कर्नल साईक्स येथे आला होता व सकाळच्या धुक्यातून वाट काढत हा घोड्यावरून कोकणकड्याच्या वर आला आणि या कड्यावरून तो खाली बघत असताना आद्र ढगांवर पाठीमागून असलेल्या सूर्यामुळे त्याची सावली धुक्यावर पडली आणि या सावलीत त्याच्या मस्तकाभोवती गोल इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रव्रज फेरा निर्माण झाला हे पाहून तो चकित झाला . हा सृष्टीचा एक चमत्कार या ठिकाणी बघायला मिळतो इंद्रव्रज बघण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येतात . रात्री इथे मुक्कामही करतात या कड्यावरून  फिरतांना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे .  5 व्या शतकात कलचुरी राजाच्या काळात हरीशचंद्रेश्वराचे मंदिर तथा त्या ठिकाणची पुष्करणी आदींचे  वास्तुंचे निर्माण झाले . स्वराज्यातही हा किल्ला असावा परंतु त्याचे फारसे पुरावे मिळत नाहीत . 1747 -48 मध्ये मुघलांकडून मराठ्यांनी हा गड मिळवला आणि त्यानंतर कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदारी सुरू झाली . 1775 - 76 मध्ये संताजी सावंत हरिश्चंद्रगडाची हवालदारी असल्याची नोंद मिळते . इंग्रजांनी देखील या ठिकाणाला महाबळेश्वर सारखे ठिकाण विकसित करण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुढे पूर्ण होऊ शकला नाही . या गडाची भ्रमंती करण्या अगोदर पूर्व नियोजन करूनच जावे या गडावरील तारामती शिखर, बालेकिल्ला, कोकणकडा हरिचंद्रेश्वर मंदिर ,केदारेश्वर गुफा ,गणेश लेणी आदी ठिकाणी पाहण्यासाठी वेळेचेही नियोजन असणे आवश्यक आहे तेव्हाच ही भ्रमंती पूर्ण होऊ शकते .



संजय खांडवे

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

महाराष्ट्र बारव मोहिम

 



महाराष्ट्र बारव मोहिम 

  


 पाणी हे जगातील सर्वात मोठी समस्या आहे . त्यातच शुद्ध पिण्यायोग्य पाणी ही त्याही पेक्षा मोठी समस्या आज जगापुढे सर्वात मोठे संकट उभे करत आहे .संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जल विकास अहवाल 2024 नुसार पाणी हे समृद्धी आणि शांतीसाठी  आपल्या जीवन आणि उपजीविकेसाठी  व्यापक महत्त्व अधोरेखित करते. जगातील अर्ध्या लोकांना वर्षातून केव्हा ना केव्हातरी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावेच लागते अशी परिस्थिती आहे जलवायू परिवर्तनामुळे जगात जलचक्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या संकटाला येणाऱ्या काळात सामोरे जावे लागेल . कोणत्याही राष्ट्रात त्या राष्ट्राची जलसमृद्धी ही त्या राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करते त्याच बरोबर त्या राष्ट्राचा आर्थिक , विकास शेतीचा विकास , उद्योगधंद्याचा विकास हा अधिक वेगाने होतो आणि ही जलसमृद्धी म्हणजे त्या राष्ट्रांमधील एक प्रकारची प्रगत  जलसाक्षरताच असते . अश्या प्रकारची जलसाक्षरता प्राचीन काळापासून दिसून येते .सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अशी  सिंधू संस्कृती उदयास आली . या संस्कृतीमधील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाचे आहे . खरी जलसाक्षरता ही त्या संस्कृतीला कळाली होती . अगदी सांडपाण्याच्या व्यवस्थापनापासून पाणी साठवण्याच्या व्यवस्थापनापर्यंत उत्खलनामध्ये अनेक पुरावे आढळलेले आहेत . साती आसरा या आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पानवट्याच्या ठिकाणी आढळतात तळे, नदी नाले, कुंड , झरे, बारव आधी ठिकाणी साती - आसराचे अस्तित्व आढळून येते . मनोभावे स्थानिक त्यांची पूजा  करतात पर्यायाने ह्या जलदेवता आहे . जलसंरक्षण हे त्याचे चालत आलेले कार्य आहे . सिंधू संस्कृतीच्या पुष्करणी मध्ये देखील यांचे अस्तित्व दिसून आले आहे अगदी सातवाहन काळापासून साती - आसरांना विशेष असे महत्त्व दिसून येते . दोन हजार वर्षा पूर्वी पासून गडकोट किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापनाचे अचूक नियोजन ठेवले जात असे . आजही आपण गडकोट -किल्ल्यावर गेल्यावर अत्यंत उंच अशा ठिकाणी दगडी कातळात पाण्याची अनेक टाकी कोरलेली दिसतात . किल्ले चावंड या ठिकाणी सात टाक्यांचा भव्यसमूह आणि त्या टाक्यांच्या बाजूला प्राचीन शिवमंदिराची एक पुष्करणी आजही दिसून येते . एवढ्या उंचावरही प्रचंड उन्हाळ्यातही पाण्याचे अस्तित्व दिसून येते हे त्या काळच्या पाणी व्यवस्थापनाचे अत्यंत समृद्ध असे उदाहरण आहे . अनेक प्राचीन लेण्यांमध्ये देखील कुंड व पानपोढी याची व्यवस्था केलेली दिसून येते . या लेण्यांमध्ये अनेक लोकांनी पानपोढी तयार करण्यासाठी दान दिल्याचेही माहिती मिळते . शिवकाळातील पाणी व्यवस्थापन महाराजांनी अत्यंत चोखपणे केलेले दिसून येते . रायगडाची बांधणी करताना रायगडावरील गंगासागर तलाव कुशावर्त तलाव हत्ती तलाव आणि इतर पाणी टाक्यांचा समूह हे त्याचे उदाहरण आहे . पुढच्या काळात थोरले शाहू महाराज व राजर्षी शाहू महाराजांनी देखील पाणी व्यवस्थापणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. 

       गंगाजलनिर्मल लोक कल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांनी तर त्यांच्या काळात अनेक पाणवठे , नदी घाट , बारव यांची नव निर्मिती केली . बहुतेक ठिकाणी जोर्णोद्धारही केला . सरकारी तिजोरीवर कसलाही भार पडू न देता अगदी स्वखर्चातून अहिल्यादेवींनी हे निर्माण कार्य घडविले . प्राचीन काळातील मुख्य रस्ते यावर देखील अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी बारव किंवा पानवठे आदींची निर्मिती केल्याचे उल्लेख आहेत . महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी एक गोमुखी धारेची पुष्करणी आहेत . जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पुष्करणी मधील गोमुखी धार हे प्राचीन पाणी व्यवस्थेचे आजही एक जिवंत असलेले उदाहरण आहे . मराठवाड्यातील वालूर येथील चक्राकार बारव त्याचबरोबर चारठाणा येथील पुष्करणी हे आजही आपल्याला खुणवते . महाराष्ट्रातील अशी कितीतरी सुंदर सुंदर बारवांचे उदाहरणे देता येतील . हे प्राचीन भारतातील त्या कालच्या पाणी व्यवस्थापनाचे मुख्य साधन होते . गाव -वाडी वस्ती त्या परिसराला पाणी पुरवण्याचे काम त्या काळात केले जायचे व काही ठिकाणी आजही होत आहे . त्याकाळच्या तंत्रज्ञानाने जमिनीतील पाण्याचा प्रवाह शोधून ही पुष्करणी / बारव तयार केली जायची . आज आपण पाहतो बहुतेक ठिकाणच्या बारव स्थानिकांनी कचराकुंडी म्हणून उपयोगात आणलेल्या दिसतात. काही ठिकाणच्या बारव या काळाच्या ओघात गाडल्या गेले आहेत . 

            रोहन काळे या मुंबईच्या नव-तरुणाने या बारवांचे महत्त्व जाणले . आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्र बारव मोहीम या रूपाने एक लोक चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून बारवांचा शोध घेण्याचं काम रोहन काळे यांनी केले . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आतापर्यंत दोन हजाराच्या वर बारव त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बारवांचे गुगल मॅपिंग केले . स्थानिक लोकांमध्ये जाऊन लोकप्रबोधनाच्या माध्यमातून लोक जागृती केली आणि त्या परिसरातील बारवांची स्वच्छता मोहीम राबवली . बहुतेक बारव ह्या गाळाने गाळवटल्या होत्या त्या बारवांमधील गाळ काढणे ही फार मोठी कसरत होती स्थानिक लोकांच्या मदतीने हे फार मोठे कार्य रोहन काळे यांच्या प्रेरणेनेने सुरू झाले . वालूरची बारव ही स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेली वास्तू कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर आली आणि आज पोस्टाच्या तिकिटावर ती झळकत आहे . या लोकजागृतीची दखल मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात घेण्यात आली 87 व्या भागामध्ये महाराष्ट्र बारव मोहिमेचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला आणि या स्वच्छता मोहिमेच्या चळवळीस शुभेच्छा देऊन ही लोक चळवळ झाली पाहिजे असे सांगितले . पुढे मन की बात च्या शंभराव्या भागातही रोहन काळे यांना प्रत्यक्ष आमंत्रित करण्यात आले होते . संपूर्ण महाराष्ट्रभर महाशिवरात्रीला बारवांची स्वच्छता करून त्या ठिकाणी दीपोत्सव देखील स्थानिकांच्या मदतीने रोहन काळे यांनी घडून आणले . आज बारव /पुष्करणी आदींच्या बाबतीमध्ये जी जागृती झाली ती या मोहिमेच्या माध्यमातून झाल्याची दिसून येते याचबरोबर बहुतेक बारवांचे मॅपिंगसह , दस्ताऐवजीकरणाचे काम आर्किऑलॉजिकल कॉलेजच्या मदतीने त्या बारवांचे मोजमाप घेऊन त्यांचा इतिहास शोधण्याचे काम देखील या मोहिमेच्या माध्यमातून हाती घेतले गेले आहे . 

रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री निमित्ताने महाराष्ट्र बारव दीपोत्सव.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या ३०१ वी जयंती निमित्ताने ३०१ बारव वर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे . आपल्या गावात परिसरात अशा प्रकारची बारव अथवा पुष्करणी असल्यास त्या परिसरातील नव तरुणांनी समोर यावे . याशिवाय त्या परिसरातील सेवाभावी संस्था तथा प्रतिष्ठान यांनी देखील या कार्यात आपला हातभार नोंदवावा आणि आपल्या परिसरातील आपल्या पूर्वजांनी फार मेहनतीने व त्यांच्या तंत्रज्ञाने उभे केलेल्या या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता करून संवर्धन करावे आणि या भव्य दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे अपेक्षा या महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून केली जात आहे .



संजय खांडवे

शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*

 *शिवरायांचे सिंहासनाधिश्वर होणे हे पूर्वसंकल्पित होते ..............*  ततः कतिपयैरेव गजवाजि पदातिभिः । मौलेराप्तेरमात्यैच्श्र ख्यातैरध्यापक...