*सह्याद्रीचा मुकुट - किल्ले साल्हेर*
स्थान :- छत्रपती संभाजी नगरहून २०० कि.मी ता. सटाणा जि नाशिक
जागतिक वारसा स्थळे म्हणून महाराष्ट्रातील अकरा किल्ले जुलै २५ मध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आली ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे . स्वराज्याच्या स्वाभिमानी क्रांतीकारी कालखंडात राजधानीचा दर्जा मिळालेला व शिवरायांच्या किर्तीने दुमदुमलेला तामिळनाडू मधील जिंजीचा किल्ला देखील याच वेळी या यादीत आला. या वारसा स्थळात असलेला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे किल्ले साल्हेर . महाभूमितील कळसूबाईच्या सर्वोच्च शिखरानंतर साल्हेरची उंची क्रमांक दोन वर येते . १५६७ मीटर उंच असलेल्या या किल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथामधेही आढळतो . तंजावरचे राजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या आज्ञेने कवी जयराम पिंडये यांनी पर्णालयपर्वतग्रहण्याख्यान या ग्रंथाची रचना केली या ग्रंथात स्वराज्यातील इतर किल्ल्या सोबतच साल्हेरचाही उल्लेख आढळतो . सहयाद्रीचा मुकुट म्हणून या सर्वोच्च दुर्गास शेकडो वर्षापूर्वी सन्मानित केले गेले . उत्तर दक्षिण पसरलेल्या सहयाद्रिच्या कुशीत रयतेचे राज्य सर्व अंगाने फुलले याच सह्याद्रिच्या सर्वात उत्तरे कडील टोकावर अगदी मुकुटा सारखा हा साल्हेर दिसतो .
बागलाण प्रांतात बागुल राजाचे वर्चस्व होते त्याच बागुल घराण्याच्या ताब्यात हा किल्ला होता . मुघलांनी जेव्हा हा किल्ला घेतला त्यावेळी सुलतान गड असे नाव मुघलांनी दिले होते .५ जानेवारी १६७१ मधे हा किल्ला स्वराज्यात आला .त्यानंतर मुघलांशी या प्रांतात सतत संघर्ष सुरुच होता होता . पुढे फेब्रुवारी १६७२ ला साल्हेरची लढाई झाली .या लढाईत मोगली दहशत संपून साल्हेरच्या पराभवाने औरंगजेब हतबल झाला होता . येथूनच सुरत कडे जाण्याचा मार्ग येतो. सुरतेची स्वारी वेळी महाराजांनी याच मार्गाचा वापर केला होता .कांचनघाट , तेलतवाघाट, बाभुळनेघाटातून गुजरात मध्ये उतरता येते. मुघलाच्या आर्थिक संपन्न असलेल्या सुरत या व्यापारी पेठेवर येथून बऱ्यापैकी नियंत्रण मिळवता येत होते त्यामुळे बागलान प्रांत स्वराज्यात येणे ही स्वराज्यासाठी मोठी उपलब्धी होती .उत्तरेतही यामुळे स्वराज्याचा प्रभाव वाढला .
नाशिक जिल्हयातील सटाणा तालुक्यात असलेला साल्हेर परिसर हा अत्यंत निसर्गरम्य आहे . सटाणा - ताहराबाद - मुल्हेर मार्गे वाघांबे गावात पोहचता येते . पुढे हाच पक्का डांबरी रस्ता साल्हेर गावाकडे जातो . किल्ल्यावर पोहचण्यासाठी आजच्या परिस्थितीत दोन मार्ग बर्यापैकी आहेत . साल्हेर गावातून जाणारा मार्ग अधिक सुरक्षित आहे . वाघांबे गावातूनही जाता येते मात्र हा थोडा अवघड मार्ग आहे . आम्ही वाघांबे गावातून किल्ला चढाईस सुरुवात केली .गावातून किल्ल्याकडे जातांना उजव्या बाजूस महाकाय साल्हेर व डाव्या बाजुस सालोटा किल्या दिसतो . दोन्ही च्या मध्ये एक खिंड आहे त्या खिंडीत हा मार्ग जातो . साधारणतः एक ते दिड तासाची चढाई करत या वाघांबा खिंडीत पोहचता येते . ही खिंड किल्ल्याच्या पूर्व बाजूस आहे . खिंडीत दोन्ही बाजुस खोल दरी आहे . डाव्या बाजुची पाऊल वाट सालोटा किल्ल्यावर घेवून जाते . उजव्या बाजूस वळसा घेत एकेरी पाऊल वाट झिकझॅक वळण घेत वर जाते येथून एकेरी वाट असल्याने प्रत्येक पाऊल हे सावधानतेनेच टाकावे लागते . सह्याद्रीच्या प्रचंड मजबूत अग्नीजन्य खडकावर वाट निमुळती जरी असली तरी ती आजीबात ढळणार नाही या मोठ्या विश्वासाने प्रत्येक पाऊल आपसूखच पुढं पडत जाते . काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या लागतात व समोरच या वाटेतील पहिला दरवाजा लागतो . शत्रूला पायथ्यापासून या दरवाज्याचे दर्शन दुर्लभच अशी रचना आहे . समोर सालोटा व दक्षिण पूर्व भागातून येणाऱ्या शत्रूवर येथून अत्यंत बारीक नजर ठेवता येते असे . दरवाजा लहान असून त्यावर नक्षी काम दिसून येते . दरवाज्यातून येणारा शत्रु गडाच्या आतील बाजूकडून सहज टिपता यावा अशी स्थापत्य रचना असून सैनिकांना थांबण्यास त्या ठिकाणी जागा केलेली आहे . काळ्या अखंड दगडात पुन्हा पायऱ्या कोरलेल्या आहेत तोफांच्या माऱ्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी त्या तुटलेल्या आहेत . ही मोठी चढाईकरत दुसरा दरवाजा लागतो येथून किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूकडे दुरवर लक्ष ठेवता येते. ज्या गावातून चढाईस सुरवात केली ते वाघांबे गाव येथून नजरेस पडतो व दोन तासा पासून च्या वाटेने आपण वर आलो ती वाट स्पष्टपणे न्याहळता येते . साल्हेर - सालोटा खिंडीतील वरच्या बाजूस हा दरवाजा असल्याने खिंडीतून जाणारी हवा ही प्रचंड वेगाने वाहते . या दरवाज्यावरही बरीच नक्षीकामे व तासिव दगड आहेत . याच ठिकाणी हा दगड फोडत मधून पायरी मार्ग काढला असून या ठिकाणी निघालेले दगड दरवाजा, बुरुज व तटबंदीस वापरलेले दिसतात . काळाच्या ओघात वरुन घरंगळत आलेल्या महाकाय शीळा या पायरी वाटेत पडलेल्या आहेत .चढाई करत पुढे गेले की तिसरा दरवाजा लागतो हा देखील मजबूतपणे उभा आहे .
या पुढचा मार्ग किल्ल्याच्या काताळात कोरलेल्या प्राचीन लेण्या व पाण्याच्या टाकी जवळून जातो . काही ठिकाणी ही वाट अत्यंत अरुंद आहे व खाली हजारो फुट खोल दरी आहे त्यामुळे सावधानता ही प्रमुखता या ठिकाणी ठेवावी लागते . माकडांचा वावरही येथे बराच आहे . काताळात कोरलेली ही बरीच पाण्याची टाकी व वास्तव्यास उपयोगी अशी रचना असलेली गुफा प्राचीन काळापासून किल्ल्यावरील वास्तव्यास व पाण्याच्या नियोजनासाठी वापरात येत असावी . उत्तर बाजूस असलेल्या काताळातील हया गुफा दुरवरून लक्षात देखील येत नाही . पुढे चालत गेल्यावर वळण घेऊन लगेच किल्ल्याचा चौथा दरवाजा लागतो . हा दरवाजा लहान असून त्यावर नक्षीकाम केलेल्या दगडी शीळा आहेत . या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण पूर्व -पश्चीम लांबट पसरलेल्या साल्हेरच्या पहिल्या पठारावर पोहचतो . डाव्या बाजूस एक वाट सर्वोच्च शिखर असलेल्या परशुराम मंदिराकडे जाते व पश्चीमेकडून समोर जाऊन देखील या ठिकाणी पोहचता येते . साल्हेर वरील या पहिल्या पठारावरच किल्ल्यातील महत्वाच्या इमारती होत्या आता केवळ त्यांचे अवशेष आहे . या पुढील प्रवास आपण साल्हेर गावाच्या बाजूने कसे उतरायचे, सर्वोच्च शिखरावर असलेल्या परशुराम मंदिरा संदर्भातील अख्यायिका व स्वराज्यात गाजलेली साल्हेरची लढाई पुढच्या भागात भाग -2 मध्ये बघू या! क्रमशः
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा