*सनदी अधिकारी अन उदयोजका पलिकडचे सुनिल शेळके.........*
माणसाला एखादया गोष्टीची आवड आहे म्हणजे त्या विषयी निश्चीतच खोलवर कुठेतरी एक नाळ जुळलेली असते व ती आपल्या आंतरीक प्रेरणेशी देखील तेवढीच जुळलेली असते . आवड असली की सवड मग आपसुखच निर्माण होते .आपल्या व्यस्ततेमधून ही सवड काढणे हे देखील एक कौशल्यच असते व ते ज्याचे त्याच्यावर अवलंबुन असते . असेच एक बहुपैलू व्यक्तीमत्व म्हणजे सुनिल शेळके साहेब ! मराठा सेवा संघाच्या सुरुवातीच्या काळात साहेबांशी संपर्क आला व केडर बेस तालमीतून आम्ही फुले -शाहू-आंबेडकर चळवळीशी जोडले गेलो . अत्यंत मितभाषी , शांत व संयमी अधिकारी तथा सेवा संघाचा एक चेहरा म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत होतो हे अगदी जवळून आम्ही अनुभवले . अधिकारी म्हणून ते आमच्याशी त्या वेळी देखील वागत नसत . चळवळीच्या विचारांची नाळ त्यांच्या बोलण्यातून कमी अन कृतीतून आजही जाणवते.
सल्ला मसलतीतून पुढे जात राहणे ही त्यांची सामाजिक तथा औद्योगिक यशाची गुरुकिल्लीच हे त्यांच्या सहवासातून आम्हाला सदैव जाणवत राहते . ओ.बी.सी.समूहाच्या अनेक समस्याचा त्यांनी अभ्यास केला व येणारा काळात अधिकारी तथा कर्मचारी स्तरावर ओबीसी बांधवाच्या समस्या सोडविणारे हक्काचे विचारमंच असावा हा उद्देश ठेवत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून यावर चिंतन केले. अनेक ठिकाणी चर्चासत्रे घेतली व या विचारमंथनातून ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची स्थापना महाराष्ट्र स्तरावर केली . आज छत्रपती संभाजी नगर ,मुंबई तथा शेगाव या ठिकाणी भव्य असे राज्यस्तरीय अधिवेशने घेऊन ओबीसीना संघटीत करून विचारमंथनाचे काम या माध्यमातून करत आहे . संपूर्ण राज्यभर विभाग व जिल्हावार कार्यकारणी स्थापन करत काळाची गरज ओळखत ऑनलाइन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर एक फार मोठी चळवळ ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर आज उभी राहिली आहे . अधिकारी आणि कर्मचारी यांचे यांचे प्रशासनिक, न्यायीक तथा वैय्यक्तीक स्तरावरील समस्या हे संघटन सोडवत आहे .विद्यार्थी- पालक यांच्या साठी शिबिरे घेऊन त्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्याचं काम आता आपोआपच घडतांना दिसत आहे आहे .आवडीमुळेच ही सवड ते काढतात यात शंका नाही .
सनदी अधिकारी असतांना ते मंत्री महोदयाचे ओ एस डी होते . ते आम्हाला नेहमी म्हणत तुम्ही गड किल्ले भ्रमंती करता आणि त्या माध्यमातून इतिहास समजून घेत आहात आम्हालाही एकदा तुमच्या सोबत गड कोट दाखवा ही इच्छा व्यक्त केली . हिंदवी परिवाराच्या उंबर खिंड ,सुधागड आणि सरसगड या मोहिमेमध्ये ते सहकुटुंब आमच्या सोबत होते . पहिल्यांदाच सतत दोन दिवस त्यांचा सहवास लाभणार होता , त्यांनी सनदी अधिकारी असल्याची मूळ ओळख या ठिकाणी लपवली आणि एक सामान्य शिवरायांचा मावळा म्हणून दोन दिवस ते मोहिमेतून उंबरखिड उतरून इतिहास समजून घेतला . मुंबईवरून ते मुलगा शिवबा सह लोणावळ्यात आम्हाला भल्या पाहटेच भेटले ताई महत्वाच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी येणार होत्या. त्यांच्या सोबत १५ ते १८ कि . मी चा उंबरखिंड पर्यन्तचा ट्रेक पूर्ण करता आला ज्या वाटेने हे सैन्य उतरले तो मार्ग आजही घनदाट अरण्य व जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेला आहे . लोणावळयातून कुरवंडे गावात वाहने सोडून ट्रेक सुरु होतो . गावातून उंच टेकडीवर पोहचल्यावर समोर उंच डोंगरी टोक दिसते तोच नागफणी डोंगर आहे .एका तासाची चढाई याची आहे . त्याच्या खालीच इंद्रायणी मातेचे उगम स्थान आहे . नागफणी टेकडीवर महादेव मंदिर आहे . पण आम्ही उंबरखिंडीत उतरत असल्याने टेकडीच्या पायथ्याशी डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने कडे डोंगर कड्यांचा आसरा घेत घटदाट जंगल पार करत दोन तासात एका पठारावर पोहचलो व तेथून पुन्हा घनदाट व जाळी मधून वाट काढत उतरून नदीच्या पात्रात उतरलो व समोर चावणी गाव दिसले . तेथुन पुढे पकक्या वाटेने उंबरखिंडीत पोहचता येते .हा ६ ते ७ तासाचा प्रवास आहे . हाच रस्ता पुढे शेंबडी फाट्यावर जाऊन पाली महामार्गाला मिळतो . हा चित्तथरारक असा अनुभव प्रत्यक्ष उंबरखिंडीत उतरतांना वेगळाच वाटतो . नेताजी पालकरासह स्वतः शिवाजी महाराज या लढाईत उतरले होते . सपूर्ण चिलखती पोषाख व डोक्यावर शिरस्त्रान घालून हातात भाला कमरेस तलवार पाठीवर ढाल अन धनुष्य बाणासह शत्रुच्या वधासाठी घोड्यावर आरूढ होऊन महाराज स्वतः लढले होते अशी शिव स्पर्शान पावन भूमीत एक वेगळाच अनुभव येतो .साहेब एका मावळ्या सारखे वाटेत चर्चा करत इतिहास समजून घेत होते. या वाटेत आमदार बच्चु कडु , पोपटराव पवार व अशी अनेक अनामिक मावळे आपली ओळख न दाखवता समरभूमिला नतमस्तक होत होते .
दुसरा दिवस हा सुधागड मोहिमेचा होता रात्री मुंबई जाऊन पुन्हा सकाळी ७ वाजता ताई अभिता व शिवबासह मोहिमेत येणार होते .अत्यंत घनदाट जंगलांत असलेला सुधागडास जाण्यास दोन मार्ग आहेत पहिला धोंडसे गावातून महादरवाजा मार्ग व दुसरा पाश्चापूर ठाकूरवाडी मार्ग आम्ही धोंडसे मार्गे निघालो व त्यांना उशीर झाल्याने मागे होते होते . दाट जंगलातून जातांना मोबाईल नेटवर्क बंद पडले व यातच त्यांचा मार्ग चुकला व उलटया बाजूने ते गडावर चढू लागले . दाट जंगलातून मोठ्या हिम्मतीने त्यांनी अभिता , शिवबा व ताई सह लटकणाऱ्या लोखंडी पायऱ्या चढून चिलखती बुरुजा खाली पोहचले . संपूर्ण निर्मनुष्य परिसरात आमचा नेटवर्क मिळाल्यान कसातरी संपर्क झाला व स्थिती कळाली . आम्ही एकमेकांच्या विरुध्द दिशेने चढत असल्याने दोघामधले अंतर बरेच होते त्यावेळी अभिता थकल्याने पुन्हा खाली उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला . त्या दिवशी आम्हाला गड उतरून ठाकूरवाडीत उतरायलाच रात्रीचे आठ वाजले होते . त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच ठरला . मोठ्या धैर्याने आम्ही पुढे गेलोय या आशेने ते निर्मनुष्य घनदाट वाटेतून भ्रमंती ते करत परत गेले . कोणी एकेकाळी स्वराज्याच्या राजधानी साठी विचार केलेल्या सुधागडाची चढाई त्यांनी केली . त्यामुळेच कुठलंही भय त्यांना या पावन भूमित वाटलं नाही . ही महाराजाप्रतीची त्यांची निष्ठाच म्हणावी लागेल हे साहेब कधी आम्ही अनुभवलेच नाही .
आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची सत्यशोधकी चळवळीशी जवळचे नाते आहे. 1882 साली याच विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! त्यांच्यासोबतच पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी समाजासाठी आपला देह झिजवण्याचे काम केले आहे . अभिता फिल्मच्या माध्यमातून त्यांचा आलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे सत्यशोधक ! या चित्रपटाने त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला अनेक भाषांमध्ये याचे डबिंगही झाले . मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे महात्मा फुले आणि ज्योतिबा यांचे चरित्र त्यांनी उभे केले . आगामी काळात त्यांचा येणारा महापरिनिर्वाण हा चित्रपट देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असणार आहे त्याचं कामही आता पूर्ण होऊन रिलिजच्या प्रतिक्षेत आहे. प्रत्यक्ष चित्रपटाच्या सेटवर अनुभवलेले साहेब तेही एक वेगळच चित्र होतं . हे त्यांचे क्षेत्र नव्हतं पण त्या क्षेत्रातही ते काही कमी नाही हे त्यांनी यावरून दाखवून दिले . सनदी अधिकारी असताना आणि अधिकारी पदाचा राजीनामा दिल्या नंतर एक मोठे उद्योजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठी उद्योजकात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली . त्याच्याही पलीकडचे असलेले सुनील शेळके साहेब हे एक वेगळेच अवलिया व्यक्तिमत्व त्यांच्या या बहुपैलु व्यक्तीमत्वाचा केवळ काही अंश अनुभवातून लिहीत असताना त्यांना या कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही जिजाऊ चरणी प्रार्थना .
संजय खांडवे
बुलढाणा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा