लाडखेडचा दक्षेश्वर
स्थान :- ता . दारव्हा जि. यवतमाळ
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।
उज्जयिन्यां महाकालमोंकारे परमेश्वरम् ॥
केदारं हिमवत्पृष्ठे डाकिन्यां भीमशंकरम् ।
वाराणस्यां च विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ॥
वैद्यनाथं चिताभूमौ नागेशं दारुकावने ।
सेतुबंधे च रामेशं घुश्मेशं तु शिवालये ॥
द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ।
सर्वपापैर्विनिमुक्तः सर्वसिद्धिफलं लभेत् ॥
भगवान शिवशंकराच्या बारा ज्योर्तिलिंगाची नामावळी वरील श्लोकामधून मिळते . सौराष्ट्रा मधील सोमेश्वर हा पहिला अवतार, मल्लिकार्जुन नावाचा दुसरा अवतार श्रीशैलावर झाला . शिवाचा महाकाल नावाचा तिसरा अवतार उज्जयनि नगरीमधील आहे . विध्यंगिरीवर ओंकार नावाचा चौथा अवतार शिवांनी धारण केला . हिमालयात प्रगटलेला केदार हा पाचवा अवतार मानला जातो . सहावा अवतार भिमाशंकर हा भीमा सूराच्या वधानंतर निर्माण झाला . काशीपूरीत विश्वेश्वर रुपाने सातवा रुपाने स्थिर झाले . गौतमी ऋषीच्या प्रार्थनेवरुन गौतमी तटावर आठवा अवतार त्र्यंबक झाला . नववा अवतार वैदयनाथ या नावे प्रगटला . दहावा अवतार नागेश्वर व प्रभू रामचंद्राचा कल्याण करणारा रामेश्वर हा अकरावा अवतार ठरला . वेरुळ येथील घृष्णेश्वर हा शिवांचा बारावा अवतार ठरतो . या धार्मिक तिर्थस्थळांना भारतीय धार्मिक परंपरतेत अत्यंत महत्वाचे मानले जाते . आकाश, पृथ्वी, दिशा, जल, तेज व काल ही ज्यांची रूपे आहेत असे निराकार व ज्ञानगम्य सदैव भक्तवत्सल शिवांचे मनोभावे पूजन होत नसेल असा कुठलाच भाग भारतवर्षात राहिलाच नसेल . प्राचीन काळापासून अगदी हिमालया ते कन्याकुमारी पर्यन्त व गोवा ते गुहाहाटी पर्यन्त सर्वत्र वातावरण शिवमयच झालेले दिसून येते . अवघे विश्व शिवपुराणाने व्यापले आहे शिवा शिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही . शिवपुराणातील अभ्यासाने हे स्पष्ट होतेच पण त्याही पेक्षा गावा गावात असलेली शिव मंदिरे व त्यातही प्राचीन शिवमंदिरे शिव सर्व दिशांमध्ये व्यापले आहे हे सिद्ध होते.
यवतमाळ जिल्ह्यात फिरत असतांना दारव्हा जवळील तपोनेश्वर भूमिस भेट दिल्यावर याच मार्गावर अजुनही शिवाचे प्राचीन मंदिरे आहेत ही माहिती मिळाली . पुढे याच मार्गावर लाडखेड गाव असून तेथे दक्षेश्वर महादेवाचे प्राचीन शिवमंदिर सुंदर बारवेसह आहे ही माहिती मिळाली म्हणून लाडखेड गावातुन मुख्य महामार्गावर यवतमाळ कडे जातांना डाव्या हातास वळन घेऊन अवघ्या एक कि . मी . अंतरावर असलेल्या दक्षेश्वर मंदिरात पोहचलो . आता या मंदिरांचे व्यवस्थापन स्थानिक संस्थानकडे आहे . सध्या चांगल्या स्थितीत असलेले अत्यंत सुंदर मंदिर शिल्प लाडखेड मध्ये बघायला मिळाले . मजबूत दगडी नक्षीयुक्त खांबावर हे मंदिर उभे आहे . आधुनिक काळात दगडी खांब बांधून छताची मजबूती करुन घेतल्याचे दिसते . देवगिरीच्या यादवांच्या काळात हे मंदिर बांधल्या गेले अशी माहीती यवतमाळ जिल्हयाच्या गॅझेट मधून मिळते . मुख्य द्वार - सभा मंडप - अंतराळ - गाभारा अशी या मंदिराची रचना असून मुख्य खांबावर चारही बाजूनी संपूर्ण मंदिराचा भार आपल्या खांद्यावर तोलून धरणारी यक्ष ही कुबेराची श्रमजीवी सेना अगदी मंदिर निर्माणा पासून व याच्याही पुढे हा डोलारा समर्थपणे तोलून धरतांना दिसतात . या यक्षाच्या पत्नीस यक्षिणी म्हटले जाते प्राचीन कथा, नाटकामध्ये यांचा उल्लेख येतो . औषध उपचारांचे जाणकार त्यांना मानले जायचे . खांबावर चौरसात सुरेख हंस युगल तथा हत्ती सोबत द्वव्द करतांनाचे शिल्प आहे . सभामंडपाचे छत चौरसाकृती शिळा वापरत निमुळते होत गेलेले आहे .अंतराळातून गर्भगृहात जाणाऱ्या द्वारावर सुंदर नक्षीयुक्त आकृत्यासह खांब आहे . उंबरठ्यावर दोन किर्तिमुख कोरली आहेत . चौरसाकृती गाभाऱ्यात दक्षेश्वर महादेव शिव लिंग स्वरूपात विराजमान आहे . या मंदिराचे मूळ स्वरूप मात्र आता संपूर्ण मंदिरास दिलेल्या आईल पेन्टने झाकाळले गेले आहे . बाहेर अनेक मुर्ती शिल्प आहेत यामध्ये लढाई करतांनाचे धर्नुधारी स्त्री शिल्प, सतीशिळा समुह तथा ध्यानस्त ऋषीचे शिल्प देखील आहे . मंदिराच्या पाठीमागे अष्टकोनी आकाराची भव्य बारव आहे . आता मात्र लोखंडी जाळीने ती बंदिस्त करून ठेवली आहे यामुळे कुठेतरी या वास्तुचे सौदर्य हरवल्या सारखे वाटते .मंदिराचा संपूर्ण परीसर आता कुंपनाने बंदिस्त असून मंदिरास जोडून आधुनिक भव्य सभागृह उभारले गेले आहे . परिसरातील हजारो भक्त येथे नियमित दर्शनास येतात .
दक्षेश्वर महादेव हे नाव शिव महादेवांचे सासरे राजा दक्ष यावरून पड़ले असावे अशी मान्यता आहे शिवपुरानात दक्षाची कन्या सतीचा विवाह शिवाशी होतो .यात दक्षाची नाराजी असते . एकदा कनखल या राजधानीच्या ठिकाणी दक्ष महायज्ञाचे आयोजन करतो . ब्रम्हा, विष्णु सह सर्व ऋषीगण त्याच्या स्री पुत्रासह सर्व देवता या यज्ञास आमंत्रीत होते . अठ्याऐंशी हजार ऋत्विजासह चौसष्ट हजार उदगाते होते मात्र या महायज्ञात आपले पती शिव आमंत्रित नसल्याने सती क्रोधित होऊन आपल्या पित्यास जाब विचारण्यास कनखल तिर्थस्थानी पोहचून यज्ञात आहुती दिली यामुळे शिव प्रचंड बेचेन व क्रोधित होऊन त्यांच्या विरभद्र या पहिल्या गणाने दक्षाचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला त्याचे वर्णन शिव पुराणात येते पुढे वीरभद्र दक्षाचे शिर कापून अगिकुंडात टाकून दिले . पुढील काळात सर्व देवदेवतांच्या विनवनीवरुन यज्ञपशु बकऱ्याचे शिर दक्षाच्या धडास भगवान शिव जोडून देतात . दक्षाच्या देहात प्राण येऊन त्याला त्याची चूक कळते त्याच्या मनात जिव्हाळा निर्माण होतो . देवादिदेव महादेव हे करुणसागर रूप दक्षेश्वर रुपाने या तिर्थक्षेत्री प्रगटले अशी स्थानिकांची मान्यता आहे. उत्तराखंडातील हरीद्वारला लागून कनखल या ठिकाणी दक्षाने महायज्ञ केल्याचे सांगितले जाते आजही भारतभरातून कनखल येथील दक्षेश्वराची आराधना करतात . जळगाव जिल्हयातील शिरसोली येथे देखील दक्षेश्वर महादेव मंदिर आहे . हे मंदिर देखील यादव कालिन असून प्राचीन आहे . या मंदिराचे वैशिट्य म्हणजे गाभाऱ्या समोरील नंदि शिल्पा सोबत मेंढा शिल्प देखील आहे . हा मेंढा म्हणजे शिवपुराना नुसार शिवांचा सासरा राजा दक्ष सांगितला जातो . विरभद्राने दक्षाचे शिर कापून अग्नीत टाकले होते म्हणून या गावास शिरसोली हे नाव पडले अशी तेथील ग्रामस्थाची मान्यता आहे .
शिवाची अशी अनंत रुपे आहेत की जी सृष्टी संचलनार्थ कार्य करते नमः शिवाय .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा