सत्यशोधक विचार पेरणारे महात्मा फुले........
एका अविद्येने किती मोठं अनर्थ घडू शकते हे विद्येविना मती गेली....... यातून सतत आम्ही सांगत असतो .अज्ञानातून अस्तित्व संपते आणि गुलामगिरी येते हा संदेश महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यातून दिला.केवळ लिहून ते थांबले नाही तर मानवाचे कल्याण साधनारे हे विचार ते प्रत्यक्ष समाजात घेऊन गेले कृतीतून त्यांनी आपले काम चालू ठेवले आणि या कार्यात त्यांना साथ मिळाली ती सावित्रीबाई फुले यांची . कर्मठ व्यवस्थेमध्ये सुधारणावादी विचार रुजविणे ही काही सोपी गोष्ट नव्हती . त्याकाळात अस्पृश्यता,बालहत्या ,जातीभेद, शिक्षण घेण्यास भेदाभेद ,विधवा वरील अन्याय अत्याचार अश्या अनंत समस्या सामाजिक स्तरावर वंचीत,शोषित घटकावर अन्याय करत होत्या .सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न यामधून संवादात्मक शैलीतून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिकित्सा करत प्रस्थापित व्यवस्थेवर प्रचंड घाव घातले. स्त्री- पुरुष समानतेचा मंत्र देऊन संपूर्ण देशभर मानव समूहाच्या जातपात विरहित समाज जागृतीचे कार्य केले. कृषीच्या आधुनिकीकरणाचा आग्रह धरत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला .आजही शेतकऱ्यांचा संघर्ष काळात या महात्म्याच्या आसुडाचा आवाज कानात कडाडतांना दिसतो . समाजातील शोषित घटकांचे जीवनमान बदलले पाहिजे यासाठी व्यवस्थेविरुध्द विद्रोह केला . ज्योतीबांनी अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजापुढे सत्याचे महत्व ठेवले . सत्य वर्तन केल्या शिवाय मानवी प्राणी जगात सुखी होणार नाही असे सांगितले .
सत्य सर्वांचे आदी घर ॥ सर्व धर्माचें माहेर ॥
जगांमाजीं सुख सारें॥ खास सत्याचीं तीं पोरें॥
सत्य सुखाला आधार ॥ बाकी सर्व अंधकार॥
आहे सत्याचा बा जोर॥ काढी भंडाचा तो नीर ॥
सत्य आहे ज्याचे मूळ॥ करी धुर्तांची बा राळ॥
बळ सत्याचें पाहुनी॥ बहुरूप जळे मनी ॥
खरे सुख नटा नोव्हे॥सत्य ईशा वर्जू पाहे॥
ज्योती प्रार्थी सर्व लोकां ॥व्यर्थ डंभा पेटूं नका ॥
सत्यशोधक विचाराची पेरणी करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात केली . पुण्यात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसाठी बैठकीस 50 ते 60 मंडळी उपस्थित होती या सभेत खजिनदार म्हणून ज्योतिरावांना नेमण्यात आले त्याचबरोबर नारायणराव गोविंदराव कडलक यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली . सत्यशोधक समाजाने एक नवीन दिशा दिली ईश्वर हा एकच असून तो सर्वव्यापी निर्विकार निर्गुण व सत्त्यरूप आहे व सर्व मनुष्यप्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत हा मानवतावादी संदेश या समाजाने दिला . या ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे ज्याप्रमाणे आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनविण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते त्याचप्रमाणे सर्व साक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही . मनुष्य हा जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनी श्रेष्ठ ठरतो . माणसाला माणूस म्हणून जगविणारे विचार यातून समाजास मिळाले . आताच्या आधुनिक काळात ज्या काळाला आपण विज्ञानयुग समजतो या सुशिक्षितांच्या गर्दीत घडत असलेल्या घटना पाहून निश्चितच ज्योतिराव फुले यांनी हे पाऊल शेकडो वर्षांपूर्वीच उचलले होते पण आपण त्यांच्या या विचारावर चालण्यास हतबल ठरलो असेच म्हणता येईल . महात्मा फुले यांच्यावर लिहत असताना माझ्यासारखा एक छोटासा दवबिंदू हा अत्यंत तोडका आहे . एवढे व्यापक आणि महान कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आहे .
आपल्या बुलढाणा जिल्ह्याची सत्यशोधकी चळवळीशी जवळचे नाते आहे. 1882 साली सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांनी वयाच्या विसाव्या वर्षी विदर्भातील पहिली सत्यशोधक परिषद घेतली ही परिषद मलकापूर तालुक्यातील वरखेड येथे 13 मे 1923 रोजी झाली या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे श्रीमंत यमनाजीराव आमले हे होते . स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासू शैलीतून सत्यशोधकी विचार अत्यंत प्रभावीपणे मांडले या परिषदेसाठी 5000 च्या वर सत्यशोधकांची उपस्थिती होती पुढच्या काळात सावळा ,हिंगणे ,कारेगाव,सावता किन्होळा, केळवद या ठिकाणी देखील त्यांनी सत्यशोधकी सभा घेतल्या . येथूनच त्यांचा सत्यशोधकी झंजावात सुरू झाला तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला . ते म्हणत " खरोखरच फुले हे राष्ट्रीय बाग फुलविणारे माळी होते फुलेंच्या हातून गुलामगिरीच्या नरड्याला फास लावून लाखो दिन दुबळ्यांचा उद्धार करावा असा भविष्यकाळाचा संकेत होता आणि म्हणून या तरुण वीराने आपल्या वयाच्या 21व्या वर्षी सार्वजनिक कार्यात पाऊल टाकून राष्ट्रकार्य करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली ."
आज डोळ्यात अंजन घालणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या या सत्यशोधक विचाराची खरी गरज समाजाला आहे . व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविणारे अनेक मेसेजेस आपण कॉपी-पेस्ट करून पाठवू शकतो पण हे सत्यशोधन होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शेतकरी प्रत्यक्ष शेताची मशागत करून त्याच्या बियाणांची पेरणी शेतात करतो,मेहनत घेतो आणि त्यानंतरच त्या एका बिजाच्या झालेल्या नाशातून अनंत बीजे तयार होतात . जर व्हाट्सअप फेसबुक वर तो शेतकरी पेरणी व मशागती सदर्भात कितीही मेसेज पाठवत बसला तर तो बीजाची अनंत बिजे कधीच करू शकनार नाही .त्यासाठी त्याला प्रत्यक्ष जमिनीवरच यावे लागेल अगदी चळवळीचेही तसेच आहे मी सत्यशोधक विचाराचा आहे हे म्हणण्यापेक्षा मी सत्यशोधकी कसा होऊ शकतो ही खरी काळाची गरज आहे आणि आपल्या महामानवांनी हे विचार आपल्यासाठी पेरून ठेवले आहेत . प्रत्येकाने चिकित्सा करून व आपल्या सदसदविवेक बुद्धीने हा सत्यशोधक विचार अंगीकारला पाहीजे . हीच खरी आदरांजली महात्मा फुले यांच्या कार्यास ठरेल .
संजय खांडवे
