सोमवार, ९ जून, २०२५

महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

 



महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - जि . अहिल्यादेवी नगर ता. अकोले ,समृद्धी महामार्गाच्या भारवीर पॉईन्ट पासून ४८ कि.मी

➖➖➖➖➖➖➖➖➖

        निऋत्तीने सर्व प्रथम शेतीचा शोध लावला . नवनिर्मिती व सृजनशीलतेचे प्रतीक ही स्त्रीच आहे . माणुस भटक्या अवस्थेत असतांना स्त्रीवरच सर्व जबाबदारी असायची व ती सक्षमपणे पार पाडत असतांना अनेक शोध लागत गेले . निसर्गातील निरिक्षणातून शेती व संगोपणातून वनस्पती औषधी सारखे शोध स्रीनेच लावले . भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

        जगातील अनेक प्राचीन संस्कृतीत नदीला मातेचे रूप मानत पूजन केले जाते. नदिचे स्री रुपातील शिल्पे देखील प्राचीन लेणी मंदिरात दिसून येतात .मातृपरंपरेत जलदेवता , सप्तमातृका म्हणजे साती आसरा , गावाबाहेर , चौरस्त्यावर , नदिकाठी असलेल्या मातृ देवता आदि भूमातांचे पूजन आपल्या कृषी परंपरेत होत आलेले दिसते . माय किंवा आई या नामस्मरणातून सुरक्षितता व जगण्याची प्रेरणा मिळत गेली . सटवाई, इंगलाई , कडजामाई, कमळाजाई, कानुबाई,कृष्णाई, खेडजाई , गडीआई ,चौंडाई, शिवाई ,हरणाई ,  शितलाई , शिरकाई , रेणुकाई, रंभाई, येडाई, मसाई, मुंबादेवी अशी अनेक मातृदैवते मोठ्या भक्ती भावे पूजली जातात . माय धुरपता या ग्रंथात संजीव भागवत यांनी तळेगावची राजमाय( नांदेड ) रामपुरीतील भागामाय(परभणी )शेलगावची यमुनामाय( नांदेड) इरळद - नळरदची देवयमाय ( परभणी ) दैठाण्याची विठामाय( परभणी ) अशी अलीकडच्या काळातील मातृ देवतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या लोकसंस्कृतीचा परंपरेने चालत आलेल्या गाणी यावरून अभ्यासपूर्ण अशी माहीती या ग्रंथातून दिली आहे .

      महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर कळसूबाईचे मंदिर आहे .कळसू नावाच्या मुलीची दंतकथा या शिखराशी जोडली जाते . सर्वांना मदत करणारी दुःख निवारण करणारी आईचे म्हणजेच मातृदैवताचे नाव ह्या सर्वोच्च शिखरास आहे . या ठिकाणी कळसू आईचा तांदळा मंदिरात स्थापित केलेला दिसतो . याची उंची १६४६ मी. आहे महाराष्ट्रात त्या खालोखाल असलेले साल्हेर (१५६७ मी), गळदेव(१५२२ मी), हरिशचंद्रगड तारामती (१४२४मी) ही शिखरे येतात . पुणे ,मुंबई , नाशिक ही महानगरे येथून जवळच आहेत आणि आता समृद्धी महामार्गामुळे कळसूबाई महाभूमिशी कमी वेळात जोडली गेली आहे . साहसी ट्रेक म्हणून नेहमीच पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे दिसून येते . साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यन्तचा काळ हा ट्रेक साठी अनुकुल मानला जातो . पर्यटक अगदी मध्यरात्री नंतर पर्यटक येथून ट्रेकला सुरवात करून कुठेही दिसणार नाही असा सुर्योदय अनुभवतात . कळसूबाई  सर करण्यासाठी सर्वात सोर्ईस्कर वाट ही बारी गावातून जाते बारी हे गाव भंडारदरा - घोटी महामार्गावर आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनही येथून जवळ आहे. बारी गावात सायं पर्यन्त पोहचले तर गावात मुककामाची सोय होते शिवाय ट्रेक वरील मार्गावर छोट्या हॉटेल असून स्थानिकांचा टेन्ट सह जेवण - चहा-नास्ता मिळतो यातून त्यांना रोजगार मिळतो . भात शेतीतून मार्ग काढत दाट जंगलातून चढाई करत पाऊल वाटेने जावे लागते आम्ही सकाळीच पाच वाजता ट्रेक चालू केल्याने  करवंदींच्या गर्द जाळीतून अंधारात काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा आनंद घेत जाता आले . स्थानिकाची मदत घेऊनच अंधारातून बॅटरीच्या मदतीने चालावे कारण जंगलातून अनेक वाटा आहेत व त्या रात्रीच्या अंधारात लवकर लक्षात येत नाही .पायथ्याशी डोंगर उतारावर भात शेती करतात . पायथ्याशी कळसू आईचे छोटे मंदिर आहे . समोर कमान लागते पायऱ्या - पायऱ्याची भात शेती, दाट जांभुळ ,करवंदी , आंबा आदि दाट झाडीतून प्रचंड चढाईचा मार्ग लागतो . लोंखडी सरक्षक कठडे केले असल्याने सुरक्षित पणे चालता येते काही ठिकाणी दगडी पायऱ्या व कोरलेल्या पायऱ्या आहेत . सर्वात अवघड लोखंडी पायरीचा मार्ग लागतो या ठिकाणी काळजी पूर्वक चालावे लागते . येथून निर्सगाचं अप्रतिम सौदर्य न्याहळता येते . कळसूबाईचे मुख्य शिखरही येथून नजरेस पडते . मोठ मोठ्या शिळा मधून प्रवास करत पहिल्या घाट माथ्यावर पोहचतो या ठिकाणी पाण्याची एक विहिर आहे व स्थानिकांची छोटी हॉटेल आहेत . समोरच उंच शिखर दिसते . लोखंडी रिलिंग व मुख्य शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत येथून लक्ष पूर्वकच चढाई करावी लागते . मग आपण पोहचतो मुख्य शिखरावर येथून समग्र अंशातून  निसर्ग फुललेला दिसतो अगदी विमानात बसल्याचा अनुभव येतो प्रचंड वारा आणि  ढगात गेल्याचा अनुभव मिळतो .शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिर आपलं  लक्ष्य वेधून घेते, मंदिरा शेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हढीच जागा  आहे. या ठिकाणी एक साखरदंड असून तो खाली सोडून पुन्हा वर ओढला की कळूसआई आपली मनोकामना पूर्ण करते अशी भावना आहे .कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये मोठे घनदाट अभयारण्य आहे. येथे बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू मांजर, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. शिवाय मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरुड, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, खंड्या, याशिवाय स्थानिक तसेच परदेशी पक्षांचा मुक्त विहार येथे असतो . येथून साणंददरी , अमृतेश्वर मंदिर ,रतनगड,  भंडारदरा धरण , हरिशचंद्रगड, रंधा फॉल ही पर्यटन स्थळे जवळच आहेत .



संजय खांडवे

सोमवार, २ जून, २०२५

राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*

 




*राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*


➖➖➖➖➖➖➖➖➖

*२१ व्या शतकातील आव्हाने स्वीकारणारा सक्षम नागरीक घडविण्याचे उद्दीष्ट आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक मोठी आव्हाने आपण संधी रुपाने स्वीकारण्यासाठी विदयार्थ्यांचा बोधात्मक , भावात्मक व कौशल्याधिष्ठीत विकास साधून त्यांची बलस्थाने ,आवडी - निवडी व छंद याचा विचार करून AI तंत्रज्ञानाच्या साहयाने समग्र मूल्यांकन पद्धतीतून  शिक्षणक्रांती घडविणार आहोत .*

➖➖➖➖➖➖➖➖

 व्यक्ती पासून कुटुंब बनते व अनेक कुटुंबापासून समाज व या विविध समाजापासून राष्ट्र बनते . राष्ट्राचा विकास हा शिक्षणाचा दर्जा कसा आहे यावरून ठरतो. स्वामी विवेकानंदाच्या मते माणुस घडविणे म्हणजे शिक्षण. शिक्षण हे केवळ ज्ञान किंवा पदव्या मिळविण्या येवढे मर्यादित नसून यातून घडलेला माणुस हा स्वतः च्या बौध्दीक , शारीरिक , भावनात्मक व व्यावसायिक कौशल्या बरोबरच राष्ट्राच्या निर्मिती साठी हातभार लावण्याची क्षमता प्राप्त करून राष्ट्राचा दर्जा उंचावतो .

       भारतातीत शैक्षणिक क्रांतीचा मागोवा घेतल्यास १९६४ - ६६ या काळात शिक्षणाच्या विकासासाठी कोठारी आयोगाची स्थापना झाली . त्यानंतर १९६८ च्या शैक्षणिक धोरणात शैक्षणिक समानतेचा विचार करत राष्ट्रीय धोरण आखले गेले .१९८६ च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर भर दिला गेला . १९९२ मधे या धोरणाचे अधिक अभ्यास करून महिला शिक्षणासह अधिकच्या सुधारणा केल्या गेल्या .१९९७ मध्ये स्मार्ट पी .टी . शिक्षक क्षमता समृद्धी सारखे कार्यक्रम राबवत दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रीकरणावर भर दिला गेला .१ ली पासून इंग्रजी विषयावर भर दिला गेला . प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून २००९ शिक्षणाचा अधिकार अधिनियम पारित केला गेला .ऑगष्ट २०१० च्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची योजना सुरु झाली इय्यत्तावार अध्ययन निष्पतीवर भर दिला गेला व आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पोहचत आहोत .

         राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला गेला आहे . यानुसार भारतीय परंपरेचा पाया असलेला'पंचकोश विकास ' ही संकल्पना समोर ठेवून काम केले आहे . अगदी पायाभूत स्तरावरून विद्यार्थ्याचा विचार करून समग्र शिक्षणाची योजना याद्वारे आखली गेली आहे . ही पंचकोश म्हणजे पाच आवरणे आहेत .

१ ) अन्नमय कोश

२) प्राणमय कोश

३ ) मनोमय कोश

४ ) विज्ञानमय कोश

५) आनंदमय कोश

   या पंचकोशाचे भाष्य तैतरिय उपनिषदात केले आहे . पिता वरून समोर भृगुऋषीने याचे निरुपण केले आहे .७व्या भागात शिक्षावल्ली मधे या कोशा विषयीचा उल्लेख येतो . अन्न कोश हे शारीरिक आवरण आहे यामधे शारीरिक व इंद्रिय विकास येतो प्राणमय कोश हा पुढचा टप्पा जीवन शक्ती देणारा व उर्जा वाढविणारा आहे . मनोमय कोश हे मनाशी संमधीत भाव -भावना विकसित करण्या संदर्भात आहे . विज्ञानमय कोश हा बौध्दीक विकासाशी सलग्न आहे .आनंदमय कोश हा आंतरीक स्व ची जाणिव करुण देणारा आनंद , प्रेम , करुणा ,उस्फुर्तता , स्वातंत्र्य, सौदर्य विषयक जाणिव निर्माण करून देणारा आहे . शरीर व मन यांच्या समन्वयातून मानवाचे आकलन व अनुभव या पंचकोशातून परिपूर्ण होतात . 'घोका आणि ओका ' ह्या अध्ययन -अध्यापन व्यवस्थेत आमुलाग्र बदल या भारतीय ज्ञान प्रणालीच्या पंचकोशातून होतांना दिसतो .

      शारीरीक ,मानसिक, बौद्धीक व अध्यात्मिक विकासातून एक सक्षम भारतीय नागरीक ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून होणार आहे . भारतीय ज्ञान परंपरेचा इतिहास आपण पाहिला तर संत परंपरेतून आलेला विचार आपण आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून बौद्धीक ,मानसिक व अध्यात्मिक विकास साधू शकतो. तुकोबारायांचे " मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण " ज्ञानेश्वर माऊलींचे " भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे " या पसायदान व इतर वारकरी संत साहित्यात अगाध आनंदमय कोश व विज्ञान मय कोश दडलेला आहे . स्वराज्याची स्थापणा करणारे छत्रपती शिवरायांची शहाजी राजे यांनी कर्नाटकात केलेली शिक्षण व्यवस्था ,छत्रपती शिवरायांचे गड स्थापत्य , शिवकालिन पाणी साठवण व्यवस्था , स्वराज्यातील आर्थिक , सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्था, शेतकरी विषयक धोरण , पर्यावरण विषयक महाराजांचे धोरण , कुशल प्रशासन व्यवस्था आदि विषयावर महाराजांचे अनेक शिवकालिन पत्रे देखील उपलब्ध आहेत .ही भारतीय ज्ञान प्रणालीची उत्तम विषय ठरू शकतात . भारतीय संविधानाची संविधानिक मूल्ये , या शिवाय अगदी सातवाहन , वाकाटक , चालुक्य , गुप्त , यादव आदि राजवंशीयांचे  जागतिक दर्जाचे स्थापत्य लेणी व मंदिर समुहातून आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत या अलौकिक वारश्यांचा समावेश अभ्यासक्रमात निश्चितच भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होऊ शकतो .



संजय खांडवे

शिक्षक

दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा

 



दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

स्थान :-  दुर्ग रायगड , संपूर्ण रायगडास घनदाट जंगलातून १६ कि.मी. पदभ्रमंती

➖➖➖➖➖➖➖➖➖

परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो . हिंदू ,बौद्ध , शीख , मुस्लीम , जैन या धर्माच्या प्राचीन परंपरा आपण अभ्यासल्या तर परिक्रमेस एक पवित्र असे महत्व आहे . गणेश पुराणा मध्ये गणेशाची एक कथा येते, सर्व देवता मध्ये प्रथम पूजन कोणत्या देवतेचे व्हावे म्हणून भगवान शिव देवतांना एक परिक्षा सांगतात की जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून अगोदर येईल त्या देवतेचा पूजनाचा मान पहिला असेल मग बंधू भगवान कार्तिकेय सह सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणे साठी निघतात पण बुद्धीची देवता गणेश आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घालून केवळ शिव पार्वतीच हे विश्व आहे हे सिद्ध करून मान मिळवितात . हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मंदिर प्रदक्षिणा , नदी प्रदक्षिणा ,वटवृक्ष प्रदक्षिणा तसेच विवाह संस्कारातील सात फेरे ही पवित्र मानली जातात . चार्तुमासाच्या शेवटी हजारो वर्षा पासून नर्मदा माता परिक्रमेस एक वेगळे महत्व आहे . बहुधा ही ओंकारेश्वर वरून कठिण तपश्चर्यने सुरुवात करून हजारो कि मी चे अंतर पायी भाविक पूर्ण करत असतात . नाशिक मधील ब्रम्हगिरी परिक्रमेला देखील एक धर्मिक महत्व आहे . पवित्र श्रावण मासामध्ये हजारे भक्त ही परिक्रमा पूर्ण करतात . बौद्ध हिनयान लेणी मधील प्राचीन चैत्यस्तुपाला सुद्धा गोल असा परिक्रमा मार्ग प्राचीन लेणी समूहात दिसून येतो .इस्लाम धर्मा मध्ये आयुष्यातून एकदा तरी  हजयात्रे साठी मक्का -मदिना या पवित्र धार्मिक स्थळी जावे अशी परंपरा आहे . मक्का या ठिकाणी इस्लाम मान्यतेनुसार जगाचा मध्य समजला जातो या ठिकाणी असलेलेल्या काबा  या पवित्र स्थळास सात वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे . अश्या विविध जाती धर्मात परंपरा आढळतात या परिक्रमे वेळी प्रत्येक भाविक आपल्या धर्म परंपरेच्या मान्यतेनुसार आपली देवतेसमोर नतमस्तक होत असतात .

            आताच्या काळात रायगडास परिक्रमेचे शिवकार्य अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहात करतात .भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात असे फार कमी  शासक असतील की ज्यांना रायगड माहीत नव्हता . इंग्रज , डच , पोर्तुगीज सारख्या परकियांनी देखीत रायगडाची धास्ती घेतली होती . युरोपीय लोक तर रायगडास पूर्वेकडील जिब्राल्टर म्हूणून संबोधतात . अठरा - परगड जाती धर्माची एक वज्रमूठ बांधून एतद्देशिंयांचे हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतीस याच रायगडी राज्यभिषेक होऊन समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा पालन हार म्हणून लोकमान्यता मिळाली होती . हिंदवी परिवाराच्या मदतीने रायगड चरणी घनदाट जंगलातून गडाच्या अगदी पायथ्याशी चहूदिशांनी नतमस्तक होणाची संधी रायगड परिक्रमेच्या मोहिमेच्या रुपाने मिळाली . हदयात छत्रपती घेऊन त्यांच्या अन मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून चालण्याची संधी ही आयुष्यातील एक अवस्मरनिय प्रसंग होता . १६ ते १८ कि. मी ची ही परिक्रमा स्थानिक अन मान्यता प्राप्तसंस्थेसहच करावी . एकट्यानं वा कुटुंबाने किंवा मित्र समूहाने हे धाडस करु नये .

           पाचाड या राजमाता  जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नमन करून वाहनाने चित दरवाज्याच्या पायरी मार्गा पर्यन्त पोहचता येते  . वर दिसणारा बुरूज हा खुबलढा बुरूज असून त्या बाजूस आता तुटलेला चित दरवाजा आहे. परिक्रमा मार्ग मात्र टकमक टोक दिसते त्या बाजूने थोडे पुढे जाऊन जंगलातून पाऊल वाटेने सुरु होतो . येथून रायगड वाडी  पासून येणारा रस्ता पुढे वर नानात (नाणे) दरवाजा कडे जातो हा पुढे महादरवाज्या कडे जातो .याच मार्गाने मुंबई इंग्रज कर हेन्री ऑक्झेंडन राज्याभिषेक प्रसंगी या मार्गाने रायगडावर जाण्याची नोंद करतो . परिक्रमेचा मार्ग मात्र पायथ्याला लागून दाट जंगलातून सुरु होतो सकाळचे साडे आठ वाजले तरी प्रचंड महाकाय रायगडाच्या सावलीतूनच चालावे लागत होते सूर्य दर्शन होण्यास तास दिड तास तरी लागणार होता . रायगड हा सह्याद्री पर्वत रांगेत असून मध्यभागी स्वतंत्र महाकाय असा दिसतो त्यामुळे संपूर्ण परिक्रमा पूर्वेकडील खिंड सोडली तर उंच सखल भागातून अत्यंत घनदाट जंगलातून होते .  टकमक टोक व हिरकणी बुरुजावरून रायगड अगदी दूर वरून सहज ओळखता येतो . हिरकणी बुरुज - महादरवाजा - टकमक टोक याच्या अगदी पायथ्यापासूनचा हा परिक्रमा मार्ग हा रायनाकच्या समाधी पर्यन्त घेऊन जातो .अत्यंत किर्र असे जंगल आंबा ,फणस , वड करवंदी व इतर अश्या घनदाट जाळीतून सुर्य प्रकाशही जमीनी पर्यन्त पोहचत नाही .तास - दिड तास चालून झाल्यावर टकमक टोकाच्या पायथ्याशी येतो .या ठिकाणा हून कडेलोट झालेला आरोपी दाट झाडीत वरच जाळीतच अडकत असावा येवढी ही दाट झाडी आहे .थोड़े पुढं चालत गेल्यावर दोन चार घरे असलेली टकमक वाडी लागते या वाडीला गाव म्हणून कोणत्याच सुविधा नाही .  शिवकाळापासून आमचे पूर्वज स्वराज्यासाठी काम करत असत असे हे आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने सांगतात . येथून पुढचा रस्ता अजून अवघड होत जातो मोठ मोठी वृक्ष कोसुळून त्यावर जाळी -झुडपे वाढलेली आहेत बहुतेक ठिकाणाहून खाली बसत , सरपटतही जावे लागते . रायगडाच्या कडा वरून कोसळलेले महाकाय दगडही वाटेत दिसतात . डाव्या हाताला दोन कोसावर लिंगाना किल्ला दिसतो . भवानी बुरुजाच्या बाजूची असलेली खिंडीच्या वाटेची चढाई सुरु होते . ही चढाई खूप अवघड आहे एकेरी व दाट झाडीतून दुपार एक वाजे पर्यन्त आम्ही त्या खिंडीत पोहचलो . अर्धी परिक्रमा येथे पूर्ण होते . खिंडीतून खाली उतरणीची वाट पुन्हा अवघड आहे काही ठिकाणी अगदी बसूनही खरकत -खरकत ही जावे लागते हाती काठी असल्यावर पायावर जास्त तान पड़त नाही . अत्यंत घनदाट जंगलातून  दोन -अडीच तासाचा प्रवास बाकी राहतो . निर्सगाच अप्रतिम कधीही न पाहिलेले सौदर्य अनुभवत झाडाझुडपातून खिंड मिळेल तेथून रायगडास चौफेर न्याहळता येते . होळीच्या माळाच्या खाली असलेल्या कुशावर्त तलावातून उगम पावत वाघ दरवाज्या जवळून खाली कोसळणारी जलधारेचे नदीचे स्वरूप या दाट जंगलात अक्राळ -विक्राळ दगडी शिळाचा नदीपात्रातील रुप पाहून वेगळाच अनुभव येतो . "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. येथून दिसणारा रायगडाचा दक्षिणेकडीत वाघ दरवाजा याची साक्ष देतो . शौर्य , साहस , बुद्धी या बरोबर पूर्वानुमानाचे अलौकिक कौशल्य शिवरायांमधे होते . स्वराज्यासाठी असलेली अखंड सावधानता त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती . वाघ दरवाजा त्याचीच साक्ष देतो . शंभू महाराजांच्या बलिदानानंतर झुल्फिकार खानाचा वेढा रायगडास बसला . त्याला केवळ एकच दरवाजा माहित होता बाकी अजस्र रायगडा पुढे तो वेढा दिल्या शिवाय काहीच करु शकत नव्हता . त्यावेळी घनदाट जंगलात कातळा अवतरण करूनच या दरवाज्याचा मार्ग होता . खरच वाघाचं काळीज असणाराच हजारो फुट कातळ कडा उतरु शकतो . त्यावेळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी साहेब व त्यांचे सहकारी याच मार्गाने वेढयातून बाहेर पडले होते. दाट अंधारलेल्या झाडीमधून चढाईची वाट तासाभरात पूर्ण करतांच डांबरी रस्ता पाहताच हायसे वाटते . डाव्या बाजुस श्रीगोंदे टोक दिसते येथून पश्चिमेकडे डाबरी रस्ता रोप - वे पर्यन्त पोहचतो याचे अंतर दोन किं मी . पर्यान्तचे आहे . दक्षिणे कडील रायगडाचे महाकाय रूप अगदी जवळून स्पष्टपणे न्याहळता येते . परिक्रमा पूर्ण झाल्याचे समाधान रोप वे पाहताच जाणवते .  साधणतः सतत आठ तासाचा पायी प्रवासातून ही परिक्रमा पूर्ण होते .



संजय खांडवे

रविवार, २५ मे, २०२५

महायान लेणी समूहातील पहिली - घटत्कोच लेणी


 महायान लेणी समूहातील पहिली - घटत्कोच लेणी

➖➖➖➖➖➖➖

स्थान :- ता .सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ,बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .

➖➖➖➖➖➖➖


 छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा महाराष्ट्रात असा एकमेव जिल्हा आहे की त्या जिल्हयास जागतिक वारसा स्थळे ठरलेली अजिंठा - वेरुळ सारख्या लेणी समूहाचा वारसा लाभलेला असून जागतिक स्तरावर त्याची ओळख निर्माण झाली आहे . या सोबतच अगदी सुरुवातीस निर्माण झालेल्या पितळखोरा व घटत्कोच लेणी समूह देखील याच जिल्हयात आहे . पितळखोरा हा पहिला प्रयोग होता हे हिनयान लेणी समूह असल्याचे दिसून येते . त्यानंतर महायानांनी त्यामधे अत्यंत मनमोहक व सामाजिक , सास्कृतिक , धार्मिक  चित्र उभे करणारे व सर्वात महत्वाचे बुद्धांच्या विविध मुद्रेतील चित्रे काढण्यात आली . त्यांनंतर महायानांनी पहिला लेणी समूह  घटत्कोच लेणी समूहाच्या रुपाने निर्माण केला ही महायानांची पहिली लेणी असावी असे दिसते . अजिंठा लेणी समूहातील १६ क्रमांकाची लेणी याच लेणी सोबत निर्माण झाली .

           महामार्ग व वास्तु याचे फार जवळचे नाते आहे प्राचीन काळात मार्ग तयार झाल्यावर त्या मार्गावर वास्तु निर्माण केल्या गेल्या. आधुनिक काळ हा समिश्र स्वरुपाचा आहे आताच्या काळात वास्तुच्या सोईने मार्ग निर्माण झालेले आहे पण मार्गाचा मुख्य उद्देश व्यापार व दळणवळणाच्या सोईने असतो . उत्तर -मध्य भारतातीत उज्जैन या प्राचीन शहरा पर्यन्त पोहचणारे प्राचीन मार्ग आपण पाहीले तर उज्जैन - (महिष्मती ) महेश्वर- बऱ्हाणपूर - घटत्कोच लेणी - अजिंठा - भोकरदन - औरंगाबाद - पैठण- तेर असा मार्ग होता . यात घटत्कोचच्या बाजूला पितळखोरा - बाजुला नाशिक असा व्यापरी संपर्क दिसून येतो . भोकरदन - वेरुळ -पैठण - नेवासा - भांजे - सोपारा असाही मार्ग होता .नाणे घाटातून येणारा जुन्नर - भोकरदन - पैठण असे हे प्राचीन मार्गाचे जाळे होते . बऱ्हाणपूर -भोपाळ - सांची असाही प्राचीन मार्गांचा संपर्क होता . या मार्गात घटत्कोच लेणी समूह आपण पाहीला तर असे लक्षात येते की या ठिकाणी सुद्धा अजिंठा-वेरुळ लेणी समूहा सारखी भव्य वास्तु उभी राहिली असती पण त्या ठिकाणच्या दगडाच्या दर्जा पाहून काम सोडलेले दिसते. जंजाळा गावातून उत्तरेला पाऊल वाटेने दोन शेतांचा बंधारा ओलांडून डोंगर उतारावरून पुरातत्व खात्याने तयार केलेल्या पायरी मार्गाने खाली उतरत जातांना अगदी अजिंठा लेणी प्रमाणे डोंगराच्या मध्यात ही लेणी नजरेस पडते . या लेणीत तीन वेळेस भेट दिली पण लॉकडाऊन काळात इतिहास अभ्यासक विवेक चांदुरकरांसोबत गेलो असता वर्षभर पर्यटक न गेल्याने या मार्गावर प्रचंड पाला पाचोळा जमा झाला होता संपूर्ण जंगल निर्मणुष्य होते लेणी जवळ जाऊनही आमची आत जाण्याची हिम्मत झाली नव्हती शिवाय लेणीचे लाकडी द्वार तुटलेले असल्याने आम्ही आत जाणे टाळले होते आता मात्र पर्यटक ये - जा सुरु असते .  विविध अंगाने नटलेल्या निर्सगाच्या सानिध्यात लेणी समुहाचा अभ्यास करताना भेटीचा दिवसही अपुर्ण पडतो . लेणीत पोहचताच डोळे मूर्ती शिल्पाकडे एकवटतात जणू काही त्या देखील आपल्याला काहितरी सांगतात याची जाणिव होते आणि ते सत्य आहे . प्राचीन काळात अनेक लहान मोठ्या शिल्पाची निर्मिती ही दिखाऊ किंवा भव्य दिव्यतेच्या दर्शनासाठी मुळीच नव्हती तर त्या प्रत्येक शिल्पात एक गहन तत्व- विचार - संदेश दडलेला असे . या लेणीचे वैशिष्ट्ये म्हणजे तथागतांची विविध मुद्रेतील अनेक शिल्पे येथे आहेत . लेणीजवळ पोहचताच उजव्या बाजूस वर पायऱ्या चढून गेल्यावर हात तुटलेले नागराजाचे सुंदर शिल्प आहे . अलंकृत केलेल्या दोन खांबाच्या कमानीत सुंदर नक्षी काम दिसून येते त्याच्या खालीच एक जीवंत पाण्याचे टाके आहे त्यावरही असेच तुटलेल्या  खांबासह सुंदर नक्षीकाम दिसून येते. मुख्य लेणीच्या डाव्या व उजव्या कोणाड्यात दोन खोल्या आहेत . डाव्या बाजुच्या खोलीच्या वर एक ब्राम्ही लिपित शिलालेख आहे आता हा अर्धाच उरला आहे . इ .स .४ थ्या - ५ व्या शतकात वाकाटक  नरेश हरिसेन याचा प्रधान वराहदेव याने या लेणीचे निर्माण केले असे समजते . या सोबतच त्याने अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या लेणीचे निर्माण केले होते . लेणीच्या मुख्य दरवाज्यावर चार चौकटीत कोरीव काम दिसते . दोन्ही बाजूस स्वागतासाठी द्वारपाल आहे.मुख्य चौकटीस्तंभावर दोन्ही बाजुस स्त्री शिल्पे आहे . दरवाज्याच्या वर तीन ध्यानस्त बुद्धशिल्पासह नक्षी काढलेले आहे .

    लेणीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भिंतीमध्ये उठावदार पद्धतीने कोरलेले बौद्धस्तुप आहे . खाली बसलेल्या यक्षाने ते एका हातावर उचलून धरले आहे . त्यावर गोलाकार घुमटाखाली बुद्धांची प्रभावळी असलेली ध्यानस्त मूर्ती आहे . उभी असलेली अभय मुद्रेतील व आसनस्त असेल्या अनेक बुद्धमूर्ती शिल्पे या ठिकाणी दिसून येतात .२० अष्टकोनी व अलंकृत केलेल्या खांबावर हा प्रशस्त असा चौकोनी आकाराचा सभामंडप आहे . पाठीमागे तीन गर्भगृहे आहेत त्यात मध्यभागी मुख्य गर्भगृहात दहा फुट उंच असलेली तथागतांची धम्म चक्र मुद्रेतील भव्य मुर्ती आहे . दोन्ही बाजूने दोन चामरधारी सेवेकरी आहेत वरच्या बाजूस विद्याधर ,यक्ष असून पायथ्याशी अनेक बौद्ध उपासकांची शिल्पे आहे . हरिण व वृषभ शिल्पदेखील आहेत . मुख्य गर्भ गृहाच्या चौकटीवर नागराजाचे शिल्प असून त्यावर स्त्री पुरुषांचे शिल्पे काढलेली आहेत . लेणीच्या आत डाव्या बाजूस सात व उजव्या बाजूस पाच बौद्ध भिक्कू साठी गुफा आहेत . आत असलेल्या काही खांबाचे नक्षीकाम अपूर्ण दिसून येते . काही कारणास्तव त्या काळी काम थांबले असल्याचे दिसते .  मुख्य दरवाज्या सह दोन गवाक्ष व इतर दोन लहान दरवाजे आहेत . या लेणीच्या बाजूला आणखी काही लेणी निर्माणचा प्रयत्न झाला पण दगडाचा दर्जा हा निकृष्ठ असल्याने तो थांबल्याचे दिसते . लेणी समोर प्रचंड खोल दरी आहे. या समोरील काताळावरही काही छोट्या गुफा दिसतात पण पोहचता येत नाही त्यावर समोर जंजाळा किल्ला दिसतो . पावसाळ्यात या लेणीला भेट द्यावी या ठिकाणी वाहणाऱ्या धबधब्यामुळे ही लेणी अधिक आर्कर्षित करते .



संजय खांडवे

मंगळवार, २० मे, २०२५

वऱ्हाडातील प्राचीन वारसा - पातुर लेणी*



वऱ्हाडातील प्राचीन वारसा - पातुर लेणी*

--------------------------

स्थान : ता पातुर जि अकोला , अकोल्यापासून ३३  कि .मी , खामगावपासून ६९ कि .मी .

➖➖➖➖➖➖➖➖➖


इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन  भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा ,वेरुळ , पितळखोरा लेणी  म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....! अगणित प्राचीन शिव मंदिरे , विष्णु मंदिरे तथा देवी -देवतांची ., यक्ष , यक्षिणी , गधर्व , सुरसुंदरी अशी अनेक इतिहासाची ठोस पुरातत्व सामुग्री असलेली प्राचीन वारसा सांगणारी महाभूमिची वारसा स्थळे आपल्या भूमित बघायला मिळतात .यापैकी शैलगृहे म्हणजे लेणी सर्वाधिक आहेत . अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत. यापैकी बरीच ठिकाणे दुर्लक्षित आहेत , काही तर अजून डोंगर कपारात अन दाट जंगलात शोध लागण्याची वाट पाहून आहेत . काही लेण्या अश्या आहेत की पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचू शकत नाही .

    अशीच एक विदर्भातील  अकोला जिल्हयातील  पातूर  येथील लेणी ! विदर्भाला वऱ्हाड असेही म्हणतात . अगदी पुरानातही विदर्भाला उल्लेख आढळतो . वऱ्हाडावर पहीले दोन शतके मौर्य राजवंशाचे अधिपत्य होते नंतर आध्रवंशीय व पुढे तीसऱ्या ते सहाव्या शतकापर्यन्त वाकाटक त्यानंतर पहिले चालुक्य त्यानंतर राष्ट्कुट व पुढे दुसरा चालुक्याच्या ताब्यात होते पुढच्या काळात यादवांच्या देवगिरीच्या अधिपत्याखाली विदर्भ होता . पातुर  हे

बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले  प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात याचे कारण बोर्डी नदीच्या पात्रात ३१ मे १९७४ अचानक सोन्याची नाणी सापडायला लागली संपूर्ण पातुरच नाही तर आजुबाजुच्या परिसरातीत लोकांनी या नदीपात्रात प्रचंड गर्दी केली  प्रशासनाला सतर्क होऊन मोठी कसरत करावी लागली होती . सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या होत्या . शाहजहानच्या एका सरदाराची छावणी त्या काळी येथे पडली होती व तो मुघलांचा खजाना येथून घेऊन जात असतांना या ठिकाणी काही कारणामुळे जमीनीत गाडला गेला होता व तेव्हा तो नदीच्या पात्रातील थोड्या फार फरकाने उघडा पडला होता . याचे एक नाणे दहा ते बारा ग्रॅमचे होते. त्यावेळी ३६ किलो येवढी नाणी प्रशासनाने जमा केली होती . या ठिकाणी सापडलेली एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळते.

     शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर  उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे जाता येते, पुरातत्व खात्याचा  त्या ठिकाणी वॉचमन  असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसते  या टेकडीवरून  संपूर्ण पातुर शहराचे दर्शन होते .

     लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते . लेणी समोर टेकडी खोदून मोठे प्रांगण दिसून येते .काळा पाशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे  दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते . खांबाच्या वर कडा तुटलेंल्या आहे पुर्वी येथे एक  संस्कृत शिलालेख होता असे सांगितले जाते  .मुख्य लेणीत पायऱ्या असून बाहेर आयताकृती व्हरांडा आहे .आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे . अशीच बाजूला एक लेणी आहे पुरातत्व विभागाकडून येथे संवर्धन काम सुरु असल्याचे दिसते . लेणी च्या डाव्या व उजव्या बाजूस दोन लहान खोल्या कोरलेल्या आहेत पूर्वी यात मूर्ती असाव्यात असे दिसते .इतिहास कारांच्या मते इ स  ४ थे ,५ व्या.शतकात ह्या लेणीच्या निर्माणाचे काम झाले असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे . याच वराहदेवाने अजिंठयातील १६ व १७ क्रमांकाची लेणी व घटत्कोच लेणी देखील त्यानेच निर्माण केल्याचे ब्राम्ही शिलालेख त्या ठिकाणी आढळतात .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत  पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगडाचा दर्जा किंवा त्या काळच्या  काही अडचणीने काम बंद पडले असावे  . लेणी अभ्यासक महेद्र शेगावकर सर व विवेक चांदुरकर यांनी या लेणी विषयी लेखन केले आहे .

     प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात  कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.

 हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे . वाकाटकाची वत्सगुल्म म्हणजे आताचे वाशिम येथून जवळच आहे . रेणूका माता मंदिर व त्याच्या खाली असलेला नानासाहेबांचा वाडा असे अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे .







संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

बुधवार, १४ मे, २०२५

पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज*

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज*


                *- संजय खांडवे*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 छत्रपती संभाजी महाराजांच्या घोडदळ आणि पायदळाने  गोवा प्रांतामध्ये घुसून  आक्रमणाला सुरुवात केली होती यात त्यांनी चौल ,वसई ,दमण वगैरे पोर्तुगीजांची ठाणे घेतली आणि चौलचा वेढा मजबूत केला . साष्टी व बारदेश प्रांतासह ' सा इश्तेव्हाव' ( सेन्ट स्टिफन उर्फ जुवे ) या बेटात शिरले  . ओहटीच्या वेळी या बेटावर पायवाटेने जाता येत असे . कमी शिबंदी व शत्रुच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन मोठ्या शिताफीने या बेटावरील किल्ला घेतला . एका फ्रेंच प्रवाश्याने आपल्या वर्णनात म्हटले आहे की हा किल्ला पाहून संभाजी राजांनी त्याचे दगड व इतर सामान नेऊन फोंडे येथे मर्दनगड किल्ला बांधला . संभाजी राजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी अगदी वाऱ्याच्या वेगाने गोव्यात पसरली . हे बेट गोव्याला लागून असल्याने मराठे केव्हाही हल्ला करतील म्हणून 

 छत्रपती संभाजी महाराजांचे घोडदळ आणि पायदळ हे गोवा प्रांतामध्ये घुसून  आक्रमणाला सुरुवात केली होती यात त्यांनी चौल ,वसई ,दमण वगैरे पोर्तुगीतांची ठाणे घेतली आणि चौलचा वेढा मजबूत केला . साष्टी व बारदेश प्रांतासह ' सा इश्तेव्हाव' ( सेन्ट स्टिफन उर्फ जुवे ) या बेटात शिरला  . ओहटीच्या वेळी या बेटावर पायवाटेने जाता येत असे . कमी शिबंदी व शत्रुच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन मोठ्या शिताफीने या बेटावरील किल्ला घेतला . एका फ्रेंच प्रवाश्याने आपल्या वर्णनात म्हटले आहे की हा किल्ला पाहून संभाजी राजांनी त्याचे दगड व इतर सामान नेऊन फोंडे येथे मर्दनगड किल्ला बांधला . संभाजी राजांनी जुवे बेट घेतल्याची बातमी अगदी वाऱ्याच्या वेगाने गोव्यात पसरली . हे बेट गोव्याला लागून असल्याने मराठे केव्हाही हल्ला करतील म्हणून व्हिसेरेईने बंदोबस्त वाढवून मराठ्यांना जुवे बेटावरून हुसकाऊन लावण्यासाठी २५ नोव्हे .१६८३ ला ४०० लोकासह स्वतः बेटावर उतरला  .  त्याला कुणीच विरोध केला नाही तो थेट सेन्ट स्टिफन च्या चर्च पर्यन्त गेला . जनरल रुद्रिगु द काश्त याने येथूनच तोफा डागण्याचा सल्ला दिला पण त्याने तो ऐकला नाही मराठ्यांची पुढे ८०० शिबंदी होती . व्हिसेरेईने मराठ्यावर हल्ला चढविला . तोफांचा मारा सुरु झाला हे पाहून मराठ्यांनी पळ काढायला सुरुवात केली होती पण त्याच क्षणी मराठ्यांना ३०० घोडेस्वारांची कुमक मिळाली हे पाहताच व्हिसेरेईने आपल्या सैन्यास माघार घेण्याची सूचना देता न देता  त्याच्या सैन्याने पळ काढायला सुरु केली त्याची इच्छा असतांनाही तो रोखू शकला नाही .येवढी धास्ती मराठ्यांची बसलेली होती . या घोडेस्वारांनी व्हिसेरेईसह पोर्तुगीजांचा आपल्या नंग्या तलवारी घेऊन पाठलाग सुरु केला . यात दिडशे पोर्तुगीज सैनिक मारले गेले अनेक जखमी झाले त्यापैकी चार घोडेस्वारांनी व्हिसेरेईचा पाठलाग सुरुच ठेवला होता त्याने बंदुकीने दोन घोडेस्वारांना मारले नंतर त्याने दुसरे जोडनळीचे पिस्तुल काढून एकाच वेळी चाप दोन्ही चाप ओढल्या गेल्याने एका घोडेस्वारास गोळी लागून तो जखमी झाला . आता व्हिसेरेई  जवळ केवळ तलवार उरली होती त्यालासुद्धा गोळी लागून तो जखमी झाला होता . त्याचा घोडाही मराठ्यांच्या ताब्यात आला होता .  जुवे बेटावर पोर्तुगीज सैनिक आले त्यावेळी ओहटी होती आता नदी किनाऱ्यावर पोहचल्यावर मात्र भरती आल्याने त्यांच्या बोटी मधेच पाण्यावर तरंगत होत्या . पाठलाग सुरु असल्याने ओहटी येईपर्यन्त थांबणे शक्य नसल्याने बोटी पर्यन्त पोहत जाणे आवश्यक होते . अनेकांनी पाण्यात उड्या घेतल्या ज्यांना पोहता येत होते ते पोहचले मात्र पोहता न येणारे मात्र बुडून मेले . काही दलदलीत अडकले त्यांना मराठ्यांनी कापून काढले . व्हिसेरेई व जनरल रुद्रुगु द काश्त मोठ्या प्रयत्नाने बोटी पर्यन्त पोहचते झाले . पोर्तुगीजांची शोकांतिका बघण्यासाठी जुवे बेटावरील अनेक नागरीक किनार्‍यावर गर्दी करून जमले होते . पलिकडच्या बाजूला गोवा शहरातील लोकांनाही ती दिसत होती . मराठ्यांच्या इतिहासातील गोवा प्रांतात आपला वचक बसविणारा हा मोठा प्रसंग होता. विशेष म्हणजे या पोर्तुकिजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज जातीने हा पाठलाग करत होते. संभाजी महाराज येवढे बेभान झाले होते की व्हिसेरेईची नदीत पुढ गेलेल्या नौकेचा पाठलाग करतांना अगदी दूर पर्यन्त स्वतः घोडयासह पाण्यात उतरले . खंडो बल्लाळ चिटणिस यांनी प्रसंगवधान साधत महाराजांच्या घोडयाचा लगाम पकडून घोडा थांबविला नाही तर काहीही होऊ शकले असते . हा प्रसंग गोवेकरांनी जीवंत पाहीला त्यामुळे संभाजी राजे यांच्या पराक्रमाची प्रचीती त्यांना आली .

     जुवे बेटात पोर्तुगीजांची वाताहत झाल्याची बातमी पसरली यात व्हिसेरेई आणि जनरल रुद्रिगु दि काश्त हे दोघेही ठार झाले म्हणून नागरीकांनी ' जेरेनिमु द मेंदोसा ' याची गव्हर्नर म्हणून नेमणुकीची घोषणा करण्याची तयारी केली होती पण अचानक व्हिसेरेई जीवंत परत आल्याने घोषणा टळली .  महाराज साहेबा प्रमाणेच संभाजीराजे देखील स्वराज्याचे शत्रू ओळखून होते फिरंगी टोपीकरांबरोबरच पोर्तुगीज , डज देखील पुढ्च्या काळात आपल्या भूमिस विळखा घालून गुलाम करतील याचे पूर्वानुमान त्यांना होते .  मोगला सोबतच या परकियांना देखील लगाम घातला गेला पाहिजे हे स्वराज्यांच्या छत्रपतींचे धोरण होते .


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*संदर्भ : पोर्तुगीज -मराठा संबंध*

          *स .श. देसाई*

दोन हजार वर्षा पूर्वीचा व्यापारी मार्ग - नाणेघाट

 




दोन हजार वर्षा पूर्वीचा व्यापारी मार्ग - नाणेघाट


स्थान : जि . पुणे ता जुन्नर , जुन्नरहून 30  किं .मी .




इतिहास .चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या काळात वापरले जाणारे मार्ग-रस्ते समजून घेणे गरजेचे असते .यामुळे इतिहास समजून घेण्यास अधिक चांगली मदत होते.  आज जसे आपण दळण-वळणाच्या सोईसाठी महामार्ग बघतो अगदी तसेच महामार्ग प्राचीन काळी देखील अस्तित्वात होते . फक्त दळण - वळणाची साधने बदलत गेली .आधुनिक काळात असलेला समृध्दी महामार्ग हा त्याचे अलीकडचे उदाहरण आहे . ज्या -त्या काळातील मार्ग त्यांच्या आर्थिक , राजकिय , सामाजिक, सांस्कृतिक तथा व्यापार विषयक भरभराटीचे संकेत देत असतात . महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्र किनाऱ्या वरील प्राचीन बंदरातून ग्रीक , रोम , इजिप्तशियन आणि इतर युरोपियन व आफ्रीकन राष्ट्राचा  कोकण भागातून देशावर व्यापार चालत असे . अत्यंत प्राचीन व्यापरी मार्गाचे निर्माण सातवाहन काळात केले गेले . हा व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट आहे .  २२०० वर्षापूर्वीचा देशातून -कोकणात जाण्याचा महामार्ग होता .महाराष्ट्रात सातवाहनाचे अत्यंत प्रभावशाली अशी राजसत्ता होऊन गेली .कला,साहित्य,व्यापार, उदयोग आदि क्षेत्रात या काळात खूप भरभराटी मिळाली होतीं .महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर सोपरिय,कलियण या सारखे बंदरे विकसित झाली .या बंदरात येणारा माल देशावरच्या प्रमुख शहरात जाण्यासाठी सह्याद्रीच्या महाकाय डोंगर रांगेतून वाट करुन आणने गरजेचे असल्याने नाणेघाट मधे डोंगर कोरुन हा मार्ग काढण्यात आला .या वाटेने वर आल्यावर त्या काळात व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले शहर जुन्नर लागते .नाणेघाट -जुन्नर -पैठण - तेर हा त्याकाळचा व्यापारी मार्ग  होता .पैठण तर सातवाहनांची राजधानीच ! त्याच भागात प्राचीन व्यापारी पेठ असलेले , नेवासा, भोकरदनही येते . अश्या प्रकारचा हा घाट मार्ग होता . आता आधुनिक काळा पर्यन्त  अनेक घाट निर्माण झाले . पनवेल खोपोली वरून लोणावळा येणारा खंडाळा घाट , माळशेज घाट , ताम्हणी घाट , भोर घाट अशी अनेक घाट आत्ताच्या काळात तंत्रतानाचा उपयोग करुन आधुनिक दळण-वळण करू लागली . आजही लोणावळ्यातून कुरवंडे गावातून नागफणी टेकडी जवळून उंबरखिंडीत उतरणारा कुरवंडे घाट असो की, धोंडसे, ठाणाळे लेणी जवळून सुधागड- तैला बैला जवळून जाणारा वाघजई घाट हे प्राचीन काळा पासून देशावर येण्यासाठी वापरात होते. नाणे घाट हा असा घाट होता की हजारो वर्षा पूर्वी काळा दगड खोदून तयार केला गेला . आज खाली असलेला दगड वापरातून अगदी गुळगुळीत झाला आहे .

     नाणेघाटा बाबत जुन्नर परीसरात एक दंतकथा संगितली जाते की नाना व गुणा या दोन भावांनी ही वाट डोंगर फोडून तयार केली . नाना- गुणा हे त्या काळातील मोठे व्यापारी होते . त्यासाठी दोन भावांनी स्वतंत्र ठिकाणी खोदकाम सुरु केले यात नानाने दक्षिणबाजूकडून व गुणाने उत्तर बाजूकडून काम सुरू केले .नानाने काम पूर्ण केले जो मार्ग आज दिसतो पण गुणा मात्र अपयशी ठरला त्याची वाट अपूर्ण राहिली .अपूर्ण वाट जीवधन किल्याच्या बाजूस दिसते .नानाची वाट पूर्ण झाली म्हणून त्याला नाणेघाट म्हणतात पण ही दंतकथा आहे याला ऐतिहासिक आधार नाही .ही दंतकथा मात्र प्राचीन काळापासून प्रचलीत आहे .

     गुणा व नाना या दोघांच्या मधे प्रचंड उंच कडा आहे त्या कड्याला नानाचा अंगठा म्हणतात .हजारो फुट खोल दरी आहे त्या कडयावरून खूप मोठा परीसर पाहता येतो पण पर्यटकांनी या ठीकाणी अत्यंत सावधनतेने वागावे अशी ही जागा आहे .

   डॉ शोभना गोखले यांच्या मते  'नना'ही कुषाणाच्या नाण्यावरील देवता होती .ही नाणी भारतात खूप प्रसिद्ध होती .पुढे या देवतेचा नना वरून नाणे असा अपभ्रंश झाला त्यावरून नाणे हा शब्द तयार झाला व ढोबळमानाने असे म्हणतायेईल की नाणे घाट ही एक पैसे देवाण घेवाणीची जागा असल्याने त्याला नाणेघाट असे नाव पडले .या घाटात उतरतांना सुरूवातीलाच एक दगडी रांजणं आहे सातवाहन काळात या वाटेने जाणाऱ्यास व व्यापाऱ्यास या राजणात कर ,जकात रुपाने नाणे टाकावे लागत असे .असे सांगतात दिवसातून दोन वेळेस हा रांजंणं चांदीच्या नाण्यानी भरून जायचा . ( असाच दगडी रांजण बुलढाणा जिल्ह्यातील धोत्रा नंदई या गावाच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात आहे .) सातकर्णी राजा व नाणेघाट मधील व्यापारासंमधी माहीती इतिहासात आढळते.ही वाट म्हणजे महाराष्ट्र व पाश्चात्य देश यांचा संबंध जोडणारी होती त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची बरीच  ओळख झाली .

     नाणे घाटाच्या वाटेने उतरतांना डाव्या बाजूच्या अंगठ्याच्या काताळात काही पाण्याची टाकी आहे व छोट्या गुफा देखील कोरलेल्या आहे . खाली उतरत गेल्यावर दोन्ही बाजूने काही लेण्या दिसतात .याला वर्षावास असे म्हणता येईल .लयनम् असे संस्कृत मध्ये ,प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणे म्हटल्या जाते .प्रवासात  व्यापारी वर्गास मुककाम  यासाठी ही बनविली गेली असावी यात शंका नाही .पाण्याच्या व्यवस्थेसाठी काही हौद देखील या ठीकाणी आहेत .डाव्या बाजूस  दोन महत्वपूर्ण लेण्या आहेत यामधे नयनिका हीचा ब्राम्ही लिपी मधील माहीतीपूर्ण शिलालेख भिंतीवर कोरण्यात आला आहे.सातवाहन राजवंशीय हा भारतीय इतिहासातील पहिल्या ज्ञात राजवंशीया पैकी एक आहे . यांचे नागवंशीयांशी संबंध प्रस्तापीत झालेले होते . ब्राम्ही लिपि ही भारतात वाचता आलेली सर्वात प्राचीन लिपि आहे व हा दक्षिण भारतातील लेणी मधील डाव्या व उजव्या भिंती वरील हा सर्वात मोठा शिलालेख आहे .या शिलालेखात यज्ञ व दान दिलेल्या मौल्यवान देणग्यांचे सविस्तर वर्णन आलेले आहे. अंकांचा वापर झालेला हा लेख आहे. सातवाहनांनी बौध्द धर्मास आश्रय देऊन परिसरातील बौद्ध लेणी खोदण्यास उदारपणे मदत केलेली दिसते.या शिलालेखावरून नयनिका /नागनिका ही सातवाहनाचा मूळ पुरूष सिमूर /सिमूक /श्रीमुख याची सून आहे,सार्वभौम सम्राट सातकर्णीची पत्नी,महारठी त्रणकथिर यांची कन्या आणि भायल ,वेदश्री व शक्तीश्री या सातवाहन पुत्राची माता होती .नागनिकेचे वर्णन करतांना प्राचीन काळातील स्त्रीयांच्या आदर्श प्रतिमेंचे चित्र उभे केले आहे.नागनिका या नावातच नाग स्त्री ही माहीती मिळते , नागकुलउत्पन्न श्रेष्ठ स्त्री ,ती महारथी त्रणकथिर नावाच्या महारठीची कन्या होतीं .नाग ही एक जमात होतीं .सातवहन काळात महाराठी ,महाजन ही पदे होतीं. त्या काळात पराक्रमी सरदारांच्या मुलीशी विवाह केली जात असत. नागनिकाचा एक वेगळा प्रभाव त्या काळात होता .तिच्या लेखावरून व शिल्पावरून हे लक्षात येते.नागनिकाशी संमधीत अनेक नाणी या परीसरात सापडली आहे .या ठिकाणच्या लेण्यात सातवाहन राजवंशांच्या मूर्ति व त्यांची नावे कोरली आहे मात्र काळानुसार आता केवळ पाय शिल्लक दिसतात .यामधे सिमूक,नागनिका,श्रीसातकर्नी,कुमार भायल,महारठी,त्रणकथिर,कुमार हुकश्री,कुमार सातवाहन यांचे अवशेष दिसतात .

      कोकणातून देशांवर येणारा हा मुख्य रस्ता म्हणजे नाणेघाट याच्या रक्षणार्थ बाजूलाच जीवधन किल्ला बांधलेला आहे .पुढे याच मार्गाच्या रक्षणार्थ हडसर ,चावंड,शिवनेरी या किल्याची निर्मिती याच काळात झाली .या मार्गाने सातवाहन राजधानी पैठण पर्यन्त व्यापारी राबता चाललेला दिसतो . हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अतिक्षय मनमोहक आहे . जुन्नर परिसरातीत गड किल्ले व असंख्य लेणी समूह त्याच बरोबर ढगांना चिरणारे उंच - उंच शिखरे निर्सगाच्या अप्रतिम सौदर्यची उधळण करतांना दिसतात . त्यातच स्थानिकांचे पर्यटकांना असलेले सहकार्य व त्यांनी केलेल्या घरघुती अप्रतिम मेजवाणीची आठवण तर सालोसाल विसरत नाही आणि पुन्हा - पुन्हा आपली पाऊले सह्याद्रीच्या दिशेने ओढत राहतात .



संदर्भ

नाणेघाट -श्री लहु गायकवाड

लेणी महाराष्ट्राची -डॉ दाऊत दळवी



संजय खांडवे

बुलढाणा

सोमवार, ५ मे, २०२५

स्वराज्याशी नातं सांगणारी - करवंडभूमि

 



स्वराज्याशी नातं सांगणारी - करवंडभूमि


स्थान : बुलढाण्याहून  वरवंड मार्गे 2८ कि.मी., चिखली वरून पेठ शेलसूर मार्गे २३ कि.मी.



 स्वराज्यजननि राजमाता राष्ट्रमाता जिजाबाईसाहेबांचे माहेर सिंदखेडराजा हे विदर्भातील बुलढाणा जिल्हयात येते . मातृतिर्थ जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हयास ही ओळख आपल्या समृद्ध व गौरवशाली इतिहासामुळे प्राप्त झाली आहे .  देवगिरीच्या यादवांचे वंशज राजे लखुजीराव जाधव यांनी आपल्या रयतवत्सल कार्य कर्तुत्वाने स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. जिजामातेच्या जन्म प्रसंगी याच विदर्भभूमीत हत्तीवरुन साखर वाटली गेली होती . पुढे जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शेकडो वर्षाची गुलामगिरी या शिवतेजाने मोडीत काढत रयतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान जागृत करणारे स्वराज्य उभारले .

           स्वराज्याचं विदर्भाशी नातं फार जुनं आहे . आज भारतभरातून मातृतिर्थ सिंदखेडराजास १२ जानेवारीस लाखो स्वराज्य प्रेमी राजमाता जिजाऊ जन्मस्थळावर व जिजाऊ सृष्टीवर नतमस्तक होण्यासाठी येतात .विदर्भाचे नाव अगदी पुराणातही सापडते . श्रीमत भागवत महापुराणात श्रीकृष्णाचा विवाह राजा भिष्म काची कन्या रुख्मिणीशी झाला होता .भौमासुराच्या वधाची कथा यात येते व त्याच्या कैदेतून १६१०० कन्येची सुटका करून त्यांच्याशी विवाह कथा सांगितली जाते . श्रीकृष्णास १६१०८ पत्नी असल्याचं सांगितले जाते त्यापैकी मुख्य आठ पत्नी त्यांना होत्या त्यांच्या नावाचा उल्लेखही पुराण करते . छत्रपती शिवरायांना देखील एकूण आठ पत्नी होत्या . जिजाऊआई साहेबांनी महाराजांचे आठ विवाह घडवून आणले . आईसाहेबांची पूर्वानुमान या मागे  होते . फलटणच्या  निंबाळकर घराण्यातील सईबाईसाहेब (१६४०) ह्या पहिल्या पत्नी होय . त्यानंतर शिर्के घराण्यातील सगुणाबाईसाहेब (१६४१),मोहिते घराण्यातीत सोयराबाईसाहेब(१६५० ), मोहिते घराण्यातीत पुतळाबाईसाहेब(१६५३ ), विचारे घराण्यातील लक्ष्मीबाईसाहेब (१६५६ ),गायकवाड घराण्यातील सकवारबाईसाहेब (१६५७ ), जाधव घराण्यातील काशीबाईसाहेब(१६५७), इंगळे घराण्यातीत गुणवंताबाईसाहेब (१६५७) असे विवाह महाराजांचे झाले . या मध्ये महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार घराण्याशी भोसलेवंशीयांचे नातेसंमध निर्माण झाले होते व स्वराज्य कार्यास त्याचा हातभारही लागत होता . विदर्भातीलच करवंड येथील इंगळे घराण्या मधीत गुणवंताबाई राणीसाहेबांशी महाराजांचा विवाहामुळे करवंड ही छत्रपती शिवरायांची सासुरवाडी ठरते .इतिहासाची अशी सोनेरी किनार ती पण छत्रपती शिवरायांशी निगडीत असल्याने  फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे .येवढेच नाही तर महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांच्या राणीसाहेब दिपाबाईसाहेब ह्या देखील करवंडच्या इंगळे घराण्यांच्याच आहे म्हणजेच राजमाता जिजाउंच्या दोन सूना ह्या आपल्या विदर्भातील करवंड या गावच्याच आहेत .शिवरायांच्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर दिड महिना अगोदर पासून व्यंकोजी राजे सोबत दिपाराजे यांचे वास्तव्य होते .

              समकालिन शिवभारतात परमानंदाने वर्णिलेली स्वराज्यातील पहिली मोठी  लढाई शिरवळ ठाणे , सुभान मंगल किल्ला व बेलसर छावणी परिसरातील  लढाई फतेहखाना सोबत झाली होती.बाजी पासलकरांच्या नेतृवात  मोठा विजय प्राप्त झाला होता . स्वराज्यनिष्ठेसाठी बाजी पासलकरांचे पहिले मोठे बलिदान या लढाईत झाले . या वेळी शिवरायांचे वय केवळ १८ वर्षाचे होते या लढाईचे परमानंद शिव भारतात वर्णन करतांना "शृंगारस्यगरांगानामिंगालकुलसंभव " यमाप्रमाणे भयंकर युद्धांगाचा शृंगार ज्याचे भाल्याचे टोक असे शिवाजी इंगळे असा उल्लेख करतो . या पराक्रमी सरदाराचा उल्लेख करतांना त्यांचा अतुलनिय पराक्रम  दिसून येतो .  दुसऱ्या एका श्लोकात  इंगळे यांनी २५ , पोळांनी  १२, चोरांनी १४ , घाटग्यांनी २३, वाघाने १६ असे वीर एका क्षणात ठार मारिले असे वर्णन करतो .या लढाईत गोदाजी जगताप , भिमाजी वाघ , संभाजी काटे , भिकाजी चोर , वीर कावजी या शूर वीरांनी आपले शौर्य दाखविले . आदिलशाहिला वचक बसविणाऱ्या या लढाईत शिवाजी इंगळे या सरदाराची भूमिका महत्वाची होती .या शिवाय अफजलखान प्रसंगा वेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या स्थानी अभिमानी काताजी इंगळे हे देखील नाव येते .परमानंद     "कावुकियेनकंकाभ्यामिंगालेनाभिमानिना" या शद्बात वर्णन करतो .संभाजी कावजी , येसाजी कंक , कोंडाजी कंक , जीवा महाला, विसाजी मुरंबक , संभाजी करवर , सुरजी काटे, कृष्णाजी गायकवाड व इब्राहिम सिंद्धी यांच्या सोबत त्यांनी शिवरायांचे अंगरक्षक म्हणून रक्षण केले या वीरा पैकी जीवा महाला यांच्या सतर्कतेने  महारांजांचे पुढील २१ वर्ष स्वराज्यास मिळाले . अजून असे अनेक संदर्भ इतिहासात मिळू शकतात .निश्चीतच स्वराज्याप्रति स्वामिनिष्ठ असलेल्या या इंगळे घराण्याचा इतिहास उलगडणे अधिक महत्वाचे वाटते .तीनशे वर्षापूर्वी हे इंगळे राजवंशीय तंजावर स्थलांतरीत झाल्यामुळे येथील वतन हे दुर्लक्षित राहीले .बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव देखील जाधव - भोसले वंशीयांच्या नाते संमधातील महत्वाचे आहे . आज हे आपण एक गाव म्हणून बघतो, पण कधी काळी ५२ बुरुजी करवंड म्हणून ओळख असलेले आता केवळ अवशेष घेऊन शेवटच्या घटका मोजत आहे . बुरुजी या करवंड वतनातील परीसरात अनेक संदर्भ सापडू शकतांत . या परिसरात अशी कागदपत्रे वा अन्य भौतिक संदर्भ साहित्य असल्यास स्वतःहून समोर येणे गरजेचे आहे . यातून  स्वराज्याच्या एका मोठ्या निष्ठावान घराण्याचा इतिहास विदर्भातून समोर येऊ शकतो . जिजाऊ मातेच्या या दोन कर्तुत्ववान सूनांचे माहेर आजही उपेक्षितच आहे . या दोनही राणी साहेबांचे  स्मारक या ठिकाणी उभे राहिले पाहिजे त्याच बरोबर आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या गढी, बुरुज व तेथील समकालिन अवशेष संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत . बावन्न बुरजी करंवंड बचाव समितीच्या माध्यमातून इतिहासप्रेमी संघटन उभे केले आहे . बुलढाणा - उदयनगर मार्गावर असलेल्या करवंड गावाच्या उत्तरेस मुख्य मार्गवरून शेवटच्या घटका मोजणाऱ्या बुरुजांचे दर्शन होते . गावाच्या बसथांब्या पासून मंदिरा जवळील उत्तरेकडील मार्गाने या गढी जवळ पोहचतो . संपूर्ण गावाला पूर्वी मजबूत अशी तटबंदी होती व त्याला ५२ बुरुज होते त्यापैकी आता काही शिल्लक दिसतात .

एक शतं योधयति प्राकारस्थो धनुधरः।

शतं दशसहस्त्राणि तस्मादुर्गं समाश्रयेत ॥

बुधभूषण हया संस्कृत ग्रंथात साहित्यवीर सकलशास्त्रकोविद् ज्ञानवंत युवराज संभाजी राजे हे दुर्ग निरुपण या भागात विषद करतात की ,तटांनी सरक्षित असलेला एक लढवय्या १०० सैनिकाबरोबर लढू शकतो .तसेच १०० योध्ये १०,००० सैन्याशी लढू शकतात म्हणूनच दुर्गाचा आश्रय घ्यावा . यावरून त्या काळातील या करवंडच्या भूईकोट दुर्गाची ताकद किती मोठी होती हे लक्षात येते. या ठिकाणी बारवेत एक शिवमंदिर आहे . विटांनी बांधकाम केलेल्या या बारवेचे स्थापत्य त्या काळातील त्या क्षेत्रातील प्रगल्भता दाखविते . विटा पासून घुमटाकार छत आजही टिकून आहे . बारवेत गाळ साचलेला आहे त्याचे व परिसराचे उत्खलन इंगळे घराण्याच्या इतिहासाला वेगळी दिशा देवू शकते . मध्यभागी उंच बुरजा मधे मातीची मोठी गढी आहे त्यावर पूर्वी वाडा असावा . दोन बुरुजा मधून वर जाण्यास मार्ग होता आता मात्र तेथे झुडूपे वाढलेली आहे . वर जाताना काळजी घ्यावी लागते कोणताही भाग केव्हाही खचू शकतो .या बुरुजावरून ३६० अंशात अगदी दूर पर्यन्त नजर जाते . बुरुजावर विहीरी सारखा बुजलेला एक अवशेषही दिसून येतो .या परिसरातील अनेक अठरा - परगड जाती -धर्माचे सैनिक हे इंगळे सरदारांच्या फौजेत निश्चितच होते व इंगळे घराण्याची स्वराज्याप्रति निष्ठा होती .म्हणजेच हे विदर्भातील करवंडभूमिचे नाते स्वराज्याचे मावळे म्हणून देखील होते . आज त्या मावळ्यांचे वंशज तुम्ही आम्ही आहोतच ! आज फारसे इथे शिल्लक दिसत नाही पण या करवंडभूमिचा इतिहास मात्र निश्चितच खूप मोठा आहे . कर्तुत्ववान व महापराक्रमी व छत्रपती भोसले वंशीयांचे ऋणानुंबंध या मातीशी असल्याने या भूमीचा आम्हास सार्थ अभिमान आहे आणि वाटत राहील .



संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...