*राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*२१ व्या शतकातील आव्हाने स्वीकारणारा सक्षम नागरीक घडविण्याचे उद्दीष्ट आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक मोठी आव्हाने आपण संधी रुपाने स्वीकारण्यासाठी विदयार्थ्यांचा बोधात्मक , भावात्मक व कौशल्याधिष्ठीत विकास साधून त्यांची बलस्थाने ,आवडी - निवडी व छंद याचा विचार करून AI तंत्रज्ञानाच्या साहयाने समग्र मूल्यांकन पद्धतीतून शिक्षणक्रांती घडविणार आहोत .*
➖➖➖➖➖➖➖➖
व्यक्ती पासून कुटुंब बनते व अनेक कुटुंबापासून समाज व या विविध समाजापासून राष्ट्र बनते . राष्ट्राचा विकास हा शिक्षणाचा दर्जा कसा आहे यावरून ठरतो. स्वामी विवेकानंदाच्या मते माणुस घडविणे म्हणजे शिक्षण. शिक्षण हे केवळ ज्ञान किंवा पदव्या मिळविण्या येवढे मर्यादित नसून यातून घडलेला माणुस हा स्वतः च्या बौध्दीक , शारीरिक , भावनात्मक व व्यावसायिक कौशल्या बरोबरच राष्ट्राच्या निर्मिती साठी हातभार लावण्याची क्षमता प्राप्त करून राष्ट्राचा दर्जा उंचावतो .
भारतातीत शैक्षणिक क्रांतीचा मागोवा घेतल्यास १९६४ - ६६ या काळात शिक्षणाच्या विकासासाठी कोठारी आयोगाची स्थापना झाली . त्यानंतर १९६८ च्या शैक्षणिक धोरणात शैक्षणिक समानतेचा विचार करत राष्ट्रीय धोरण आखले गेले .१९८६ च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर भर दिला गेला . १९९२ मधे या धोरणाचे अधिक अभ्यास करून महिला शिक्षणासह अधिकच्या सुधारणा केल्या गेल्या .१९९७ मध्ये स्मार्ट पी .टी . शिक्षक क्षमता समृद्धी सारखे कार्यक्रम राबवत दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रीकरणावर भर दिला गेला .१ ली पासून इंग्रजी विषयावर भर दिला गेला . प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून २००९ शिक्षणाचा अधिकार अधिनियम पारित केला गेला .ऑगष्ट २०१० च्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची योजना सुरु झाली इय्यत्तावार अध्ययन निष्पतीवर भर दिला गेला व आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पोहचत आहोत .
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला गेला आहे . यानुसार भारतीय परंपरेचा पाया असलेला'पंचकोश विकास ' ही संकल्पना समोर ठेवून काम केले आहे . अगदी पायाभूत स्तरावरून विद्यार्थ्याचा विचार करून समग्र शिक्षणाची योजना याद्वारे आखली गेली आहे . ही पंचकोश म्हणजे पाच आवरणे आहेत .
१ ) अन्नमय कोश
२) प्राणमय कोश
३ ) मनोमय कोश
४ ) विज्ञानमय कोश
५) आनंदमय कोश
या पंचकोशाचे भाष्य तैतरिय उपनिषदात केले आहे . पिता वरून समोर भृगुऋषीने याचे निरुपण केले आहे .७व्या भागात शिक्षावल्ली मधे या कोशा विषयीचा उल्लेख येतो . अन्न कोश हे शारीरिक आवरण आहे यामधे शारीरिक व इंद्रिय विकास येतो प्राणमय कोश हा पुढचा टप्पा जीवन शक्ती देणारा व उर्जा वाढविणारा आहे . मनोमय कोश हे मनाशी संमधीत भाव -भावना विकसित करण्या संदर्भात आहे . विज्ञानमय कोश हा बौध्दीक विकासाशी सलग्न आहे .आनंदमय कोश हा आंतरीक स्व ची जाणिव करुण देणारा आनंद , प्रेम , करुणा ,उस्फुर्तता , स्वातंत्र्य, सौदर्य विषयक जाणिव निर्माण करून देणारा आहे . शरीर व मन यांच्या समन्वयातून मानवाचे आकलन व अनुभव या पंचकोशातून परिपूर्ण होतात . 'घोका आणि ओका ' ह्या अध्ययन -अध्यापन व्यवस्थेत आमुलाग्र बदल या भारतीय ज्ञान प्रणालीच्या पंचकोशातून होतांना दिसतो .
शारीरीक ,मानसिक, बौद्धीक व अध्यात्मिक विकासातून एक सक्षम भारतीय नागरीक ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून होणार आहे . भारतीय ज्ञान परंपरेचा इतिहास आपण पाहिला तर संत परंपरेतून आलेला विचार आपण आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून बौद्धीक ,मानसिक व अध्यात्मिक विकास साधू शकतो. तुकोबारायांचे " मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण " ज्ञानेश्वर माऊलींचे " भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे " या पसायदान व इतर वारकरी संत साहित्यात अगाध आनंदमय कोश व विज्ञान मय कोश दडलेला आहे . स्वराज्याची स्थापणा करणारे छत्रपती शिवरायांची शहाजी राजे यांनी कर्नाटकात केलेली शिक्षण व्यवस्था ,छत्रपती शिवरायांचे गड स्थापत्य , शिवकालिन पाणी साठवण व्यवस्था , स्वराज्यातील आर्थिक , सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्था, शेतकरी विषयक धोरण , पर्यावरण विषयक महाराजांचे धोरण , कुशल प्रशासन व्यवस्था आदि विषयावर महाराजांचे अनेक शिवकालिन पत्रे देखील उपलब्ध आहेत .ही भारतीय ज्ञान प्रणालीची उत्तम विषय ठरू शकतात . भारतीय संविधानाची संविधानिक मूल्ये , या शिवाय अगदी सातवाहन , वाकाटक , चालुक्य , गुप्त , यादव आदि राजवंशीयांचे जागतिक दर्जाचे स्थापत्य लेणी व मंदिर समुहातून आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत या अलौकिक वारश्यांचा समावेश अभ्यासक्रमात निश्चितच भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होऊ शकतो .
संजय खांडवे
शिक्षक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा