वऱ्हाडातील प्राचीन वारसा - पातुर लेणी*
--------------------------
स्थान : ता पातुर जि अकोला , अकोल्यापासून ३३ कि .मी , खामगावपासून ६९ कि .मी .
➖➖➖➖➖➖➖➖➖
इस पूर्व २रे ३ रे शतकापासून इ स १४ व्या शतकाचा कालखंड म्हणजे आपल्या भारतवर्षात शिल्पकलेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. या काळात विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अनेक प्राचीन भव्य दिव्य अश्या वास्तूंची निर्मिती झाली . यात अंजिठा ,वेरुळ , पितळखोरा लेणी म्हणजे शिल्प कलेचा अप्रतिम खजिनाच .....! अगणित प्राचीन शिव मंदिरे , विष्णु मंदिरे तथा देवी -देवतांची ., यक्ष , यक्षिणी , गधर्व , सुरसुंदरी अशी अनेक इतिहासाची ठोस पुरातत्व सामुग्री असलेली प्राचीन वारसा सांगणारी महाभूमिची वारसा स्थळे आपल्या भूमित बघायला मिळतात .यापैकी शैलगृहे म्हणजे लेणी सर्वाधिक आहेत . अनेक ठिकाणी या लेण्याचे कमी अधिक खोदकामाचे पुरावे आजही आहेत. यापैकी बरीच ठिकाणे दुर्लक्षित आहेत , काही तर अजून डोंगर कपारात अन दाट जंगलात शोध लागण्याची वाट पाहून आहेत . काही लेण्या अश्या आहेत की पर्यटक जवळून जातात पण माहीती अभावी ते त्या ठिकाणी पोहचू शकत नाही .
अशीच एक विदर्भातील अकोला जिल्हयातील पातूर येथील लेणी ! विदर्भाला वऱ्हाड असेही म्हणतात . अगदी पुरानातही विदर्भाला उल्लेख आढळतो . वऱ्हाडावर पहीले दोन शतके मौर्य राजवंशाचे अधिपत्य होते नंतर आध्रवंशीय व पुढे तीसऱ्या ते सहाव्या शतकापर्यन्त वाकाटक त्यानंतर पहिले चालुक्य त्यानंतर राष्ट्कुट व पुढे दुसरा चालुक्याच्या ताब्यात होते पुढच्या काळात यादवांच्या देवगिरीच्या अधिपत्याखाली विदर्भ होता . पातुर हे
बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .पातूरला सुवर्णनगरीच म्हणतात याचे कारण बोर्डी नदीच्या पात्रात ३१ मे १९७४ अचानक सोन्याची नाणी सापडायला लागली संपूर्ण पातुरच नाही तर आजुबाजुच्या परिसरातीत लोकांनी या नदीपात्रात प्रचंड गर्दी केली प्रशासनाला सतर्क होऊन मोठी कसरत करावी लागली होती . सुरत येथील टाकसाळात बनविलेल्या व फारशी भाषेत त्यावर प्रार्थना असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या होत्या . शाहजहानच्या एका सरदाराची छावणी त्या काळी येथे पडली होती व तो मुघलांचा खजाना येथून घेऊन जात असतांना या ठिकाणी काही कारणामुळे जमीनीत गाडला गेला होता व तेव्हा तो नदीच्या पात्रातील थोड्या फार फरकाने उघडा पडला होता . याचे एक नाणे दहा ते बारा ग्रॅमचे होते. त्यावेळी ३६ किलो येवढी नाणी प्रशासनाने जमा केली होती . या ठिकाणी सापडलेली एक पार्वतीची तीन फुटाची मूर्ति देखील होती ह्या वस्तु नागपूरच्या संग्राहालयात पाहण्यास मिळते.
शहराच्या पश्चिम भागात बाळापूर मार्गावर उंच टेकडीवर मुख्य रस्त्याला लागूनच आता पुरातत्व खात्याने पक्के कुंपन केलेले निदर्शनास येते .समोरच रेणूका देवीचे बाजूच्या उंच टेकडीवर मंदीर आहे . मुख्य रस्त्याला गाडी पार्क करून लेणीकडे जाता येते, पुरातत्व खात्याचा त्या ठिकाणी वॉचमन असल्याने लेणीचे बरेपैकी काळजी घेतलेली दिसते या टेकडीवरून संपूर्ण पातुर शहराचे दर्शन होते .
लेणीत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत .सुरक्षेसाठी दोन्ही बाजूने भिंतीचे बांधकाम आहे .वळण घेताच लेणीच दर्शन होते . लेणी समोर टेकडी खोदून मोठे प्रांगण दिसून येते .काळा पाशान असलेला हा काहीसा दगड आहे त्यात इतर झीज होणाऱ्या दगडांचे चरे दिसतात .गारगोटीचा चरी असलेला पदरही दिसतो .मुख्य लेणी प्रशस्त आहे .भव्य खांबावर उभी असलेली दिसते . खांबाच्या वर कडा तुटलेंल्या आहे पुर्वी येथे एक संस्कृत शिलालेख होता असे सांगितले जाते .मुख्य लेणीत पायऱ्या असून बाहेर आयताकृती व्हरांडा आहे .आत मुख्य ठिकाणी मध्यभागी ओटया सारखा भाग आहे .दरवाज्याच्या बाजूला ब्राम्ही लिपीमधील शिलालेख आहे . अशीच बाजूला एक लेणी आहे पुरातत्व विभागाकडून येथे संवर्धन काम सुरु असल्याचे दिसते . लेणी च्या डाव्या व उजव्या बाजूस दोन लहान खोल्या कोरलेल्या आहेत पूर्वी यात मूर्ती असाव्यात असे दिसते .इतिहास कारांच्या मते इ स ४ थे ,५ व्या.शतकात ह्या लेणीच्या निर्माणाचे काम झाले असावे .या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजा हरीसेन व त्याचा प्रधान वराहदेव यांनी केले असावे . याच वराहदेवाने अजिंठयातील १६ व १७ क्रमांकाची लेणी व घटत्कोच लेणी देखील त्यानेच निर्माण केल्याचे ब्राम्ही शिलालेख त्या ठिकाणी आढळतात .या लेणीची माहीती १७३० मध्ये ब्रिटिश पुरातत्वज्ञ एंडमन लायन व राबर्ड गील यांनी गोळा केली .पाली लिपीतील शिलालेखाचे फोटो त्यांनी घेतले होते त्याचा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला होता सध्या तो ब्रिटिश लायब्ररी लंडन येथे उपलब्ध आहे .१९०२ साली कुझेन्स हेन्री भारतात आला होता त्याने आपल्या अहवालात पातुरच्या लेण्या बुध्द लेण्या असल्याचे म्हटले आहे .भारताच्या इंडीयन प्रिस्टाईन हिस्ट्री या संकेतस्थळावरही हा अहवाल पाहयाला मिळतो .मुख्य लेणीच्या बाजूला आणखी दोन छोटया लेण्या आहे .या संपूर्ण लेणीत मूर्त्या सध्या नाहीत पण त्या पूर्वी असाव्यात असे जाणवते .लेणी ही अपूर्ण असावी त्या ठिकाणचा दगडाचा दर्जा किंवा त्या काळच्या काही अडचणीने काम बंद पडले असावे . लेणी अभ्यासक महेद्र शेगावकर सर व विवेक चांदुरकर यांनी या लेणी विषयी लेखन केले आहे .
प्राचीन वास्तुशी निगडित काही पौरानिक दंतकथाही तशी या बाबतीतही काही दंतकथा सांगितल्या जातात कालायन नावाचा राक्षस महादेवाची आराधना करुन अमरत्व प्राप्त झाला होता तो सर्वाना त्रास देवू लागला तेव्हा श्रीकृष्णाने कालायनाशी युद्ध पुकारले पण कालायनाशी आपण जिंकू शकत नाही हे पाहता श्रीकृष्ण याच पातुर लेण्यात येवून लपला होता तेव्हा पाराशर ऋषी या लेणीत तपचर्या करत होते .कालायन तेथे आला असता त्याने पाराशरांची तपचर्या भंग केली त्यांनी डोळे उघडताच तो भस्म झाला .या पाराशर ॠषीच्या नावावरून पातुर हे नाव पडले अशी दंतकथा आहे .या लेणीचा संदर्भ महाभारतातील दंतकथेतही येतो पण हा संदर्भ केवळ दंतकथेशीच निगडित आहे.
हा परिसर चक्रधरस्वामीच्या पद स्पर्श लाभलेला ही भूमी आहे . वाकाटकाची वत्सगुल्म म्हणजे आताचे वाशिम येथून जवळच आहे . रेणूका माता मंदिर व त्याच्या खाली असलेला नानासाहेबांचा वाडा असे अनेक ऐतिहासिक वास्तु या परीसरात आहे .
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा