स्वराज्याशी नातं सांगणारी - करवंडभूमि
स्थान : बुलढाण्याहून वरवंड मार्गे 2८ कि.मी., चिखली वरून पेठ शेलसूर मार्गे २३ कि.मी.
स्वराज्यजननि राजमाता राष्ट्रमाता जिजाबाईसाहेबांचे माहेर सिंदखेडराजा हे विदर्भातील बुलढाणा जिल्हयात येते . मातृतिर्थ जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हयास ही ओळख आपल्या समृद्ध व गौरवशाली इतिहासामुळे प्राप्त झाली आहे . देवगिरीच्या यादवांचे वंशज राजे लखुजीराव जाधव यांनी आपल्या रयतवत्सल कार्य कर्तुत्वाने स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. जिजामातेच्या जन्म प्रसंगी याच विदर्भभूमीत हत्तीवरुन साखर वाटली गेली होती . पुढे जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शेकडो वर्षाची गुलामगिरी या शिवतेजाने मोडीत काढत रयतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान जागृत करणारे स्वराज्य उभारले .
स्वराज्याचं विदर्भाशी नातं फार जुनं आहे . आज भारतभरातून मातृतिर्थ सिंदखेडराजास १२ जानेवारीस लाखो स्वराज्य प्रेमी राजमाता जिजाऊ जन्मस्थळावर व जिजाऊ सृष्टीवर नतमस्तक होण्यासाठी येतात .विदर्भाचे नाव अगदी पुराणातही सापडते . श्रीमत भागवत महापुराणात श्रीकृष्णाचा विवाह राजा भिष्म काची कन्या रुख्मिणीशी झाला होता .भौमासुराच्या वधाची कथा यात येते व त्याच्या कैदेतून १६१०० कन्येची सुटका करून त्यांच्याशी विवाह कथा सांगितली जाते . श्रीकृष्णास १६१०८ पत्नी असल्याचं सांगितले जाते त्यापैकी मुख्य आठ पत्नी त्यांना होत्या त्यांच्या नावाचा उल्लेखही पुराण करते . छत्रपती शिवरायांना देखील एकूण आठ पत्नी होत्या . जिजाऊआई साहेबांनी महाराजांचे आठ विवाह घडवून आणले . आईसाहेबांची पूर्वानुमान या मागे होते . फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाईसाहेब (१६४०) ह्या पहिल्या पत्नी होय . त्यानंतर शिर्के घराण्यातील सगुणाबाईसाहेब (१६४१),मोहिते घराण्यातीत सोयराबाईसाहेब(१६५० ), मोहिते घराण्यातीत पुतळाबाईसाहेब(१६५३ ), विचारे घराण्यातील लक्ष्मीबाईसाहेब (१६५६ ),गायकवाड घराण्यातील सकवारबाईसाहेब (१६५७ ), जाधव घराण्यातील काशीबाईसाहेब(१६५७), इंगळे घराण्यातीत गुणवंताबाईसाहेब (१६५७) असे विवाह महाराजांचे झाले . या मध्ये महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार घराण्याशी भोसलेवंशीयांचे नातेसंमध निर्माण झाले होते व स्वराज्य कार्यास त्याचा हातभारही लागत होता . विदर्भातीलच करवंड येथील इंगळे घराण्या मधीत गुणवंताबाई राणीसाहेबांशी महाराजांचा विवाहामुळे करवंड ही छत्रपती शिवरायांची सासुरवाडी ठरते .इतिहासाची अशी सोनेरी किनार ती पण छत्रपती शिवरायांशी निगडीत असल्याने फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे .येवढेच नाही तर महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांच्या राणीसाहेब दिपाबाईसाहेब ह्या देखील करवंडच्या इंगळे घराण्यांच्याच आहे म्हणजेच राजमाता जिजाउंच्या दोन सूना ह्या आपल्या विदर्भातील करवंड या गावच्याच आहेत .शिवरायांच्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर दिड महिना अगोदर पासून व्यंकोजी राजे सोबत दिपाराजे यांचे वास्तव्य होते .
समकालिन शिवभारतात परमानंदाने वर्णिलेली स्वराज्यातील पहिली मोठी लढाई शिरवळ ठाणे , सुभान मंगल किल्ला व बेलसर छावणी परिसरातील लढाई फतेहखाना सोबत झाली होती.बाजी पासलकरांच्या नेतृवात मोठा विजय प्राप्त झाला होता . स्वराज्यनिष्ठेसाठी बाजी पासलकरांचे पहिले मोठे बलिदान या लढाईत झाले . या वेळी शिवरायांचे वय केवळ १८ वर्षाचे होते या लढाईचे परमानंद शिव भारतात वर्णन करतांना "शृंगारस्यगरांगानामिंगालकुलसंभव " यमाप्रमाणे भयंकर युद्धांगाचा शृंगार ज्याचे भाल्याचे टोक असे शिवाजी इंगळे असा उल्लेख करतो . या पराक्रमी सरदाराचा उल्लेख करतांना त्यांचा अतुलनिय पराक्रम दिसून येतो . दुसऱ्या एका श्लोकात इंगळे यांनी २५ , पोळांनी १२, चोरांनी १४ , घाटग्यांनी २३, वाघाने १६ असे वीर एका क्षणात ठार मारिले असे वर्णन करतो .या लढाईत गोदाजी जगताप , भिमाजी वाघ , संभाजी काटे , भिकाजी चोर , वीर कावजी या शूर वीरांनी आपले शौर्य दाखविले . आदिलशाहिला वचक बसविणाऱ्या या लढाईत शिवाजी इंगळे या सरदाराची भूमिका महत्वाची होती .या शिवाय अफजलखान प्रसंगा वेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या स्थानी अभिमानी काताजी इंगळे हे देखील नाव येते .परमानंद "कावुकियेनकंकाभ्यामिंगालेनाभिमानिना" या शद्बात वर्णन करतो .संभाजी कावजी , येसाजी कंक , कोंडाजी कंक , जीवा महाला, विसाजी मुरंबक , संभाजी करवर , सुरजी काटे, कृष्णाजी गायकवाड व इब्राहिम सिंद्धी यांच्या सोबत त्यांनी शिवरायांचे अंगरक्षक म्हणून रक्षण केले या वीरा पैकी जीवा महाला यांच्या सतर्कतेने महारांजांचे पुढील २१ वर्ष स्वराज्यास मिळाले . अजून असे अनेक संदर्भ इतिहासात मिळू शकतात .निश्चीतच स्वराज्याप्रति स्वामिनिष्ठ असलेल्या या इंगळे घराण्याचा इतिहास उलगडणे अधिक महत्वाचे वाटते .तीनशे वर्षापूर्वी हे इंगळे राजवंशीय तंजावर स्थलांतरीत झाल्यामुळे येथील वतन हे दुर्लक्षित राहीले .बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव देखील जाधव - भोसले वंशीयांच्या नाते संमधातील महत्वाचे आहे . आज हे आपण एक गाव म्हणून बघतो, पण कधी काळी ५२ बुरुजी करवंड म्हणून ओळख असलेले आता केवळ अवशेष घेऊन शेवटच्या घटका मोजत आहे . बुरुजी या करवंड वतनातील परीसरात अनेक संदर्भ सापडू शकतांत . या परिसरात अशी कागदपत्रे वा अन्य भौतिक संदर्भ साहित्य असल्यास स्वतःहून समोर येणे गरजेचे आहे . यातून स्वराज्याच्या एका मोठ्या निष्ठावान घराण्याचा इतिहास विदर्भातून समोर येऊ शकतो . जिजाऊ मातेच्या या दोन कर्तुत्ववान सूनांचे माहेर आजही उपेक्षितच आहे . या दोनही राणी साहेबांचे स्मारक या ठिकाणी उभे राहिले पाहिजे त्याच बरोबर आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या गढी, बुरुज व तेथील समकालिन अवशेष संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत . बावन्न बुरजी करंवंड बचाव समितीच्या माध्यमातून इतिहासप्रेमी संघटन उभे केले आहे . बुलढाणा - उदयनगर मार्गावर असलेल्या करवंड गावाच्या उत्तरेस मुख्य मार्गवरून शेवटच्या घटका मोजणाऱ्या बुरुजांचे दर्शन होते . गावाच्या बसथांब्या पासून मंदिरा जवळील उत्तरेकडील मार्गाने या गढी जवळ पोहचतो . संपूर्ण गावाला पूर्वी मजबूत अशी तटबंदी होती व त्याला ५२ बुरुज होते त्यापैकी आता काही शिल्लक दिसतात .
एक शतं योधयति प्राकारस्थो धनुधरः।
शतं दशसहस्त्राणि तस्मादुर्गं समाश्रयेत ॥
बुधभूषण हया संस्कृत ग्रंथात साहित्यवीर सकलशास्त्रकोविद् ज्ञानवंत युवराज संभाजी राजे हे दुर्ग निरुपण या भागात विषद करतात की ,तटांनी सरक्षित असलेला एक लढवय्या १०० सैनिकाबरोबर लढू शकतो .तसेच १०० योध्ये १०,००० सैन्याशी लढू शकतात म्हणूनच दुर्गाचा आश्रय घ्यावा . यावरून त्या काळातील या करवंडच्या भूईकोट दुर्गाची ताकद किती मोठी होती हे लक्षात येते. या ठिकाणी बारवेत एक शिवमंदिर आहे . विटांनी बांधकाम केलेल्या या बारवेचे स्थापत्य त्या काळातील त्या क्षेत्रातील प्रगल्भता दाखविते . विटा पासून घुमटाकार छत आजही टिकून आहे . बारवेत गाळ साचलेला आहे त्याचे व परिसराचे उत्खलन इंगळे घराण्याच्या इतिहासाला वेगळी दिशा देवू शकते . मध्यभागी उंच बुरजा मधे मातीची मोठी गढी आहे त्यावर पूर्वी वाडा असावा . दोन बुरुजा मधून वर जाण्यास मार्ग होता आता मात्र तेथे झुडूपे वाढलेली आहे . वर जाताना काळजी घ्यावी लागते कोणताही भाग केव्हाही खचू शकतो .या बुरुजावरून ३६० अंशात अगदी दूर पर्यन्त नजर जाते . बुरुजावर विहीरी सारखा बुजलेला एक अवशेषही दिसून येतो .या परिसरातील अनेक अठरा - परगड जाती -धर्माचे सैनिक हे इंगळे सरदारांच्या फौजेत निश्चितच होते व इंगळे घराण्याची स्वराज्याप्रति निष्ठा होती .म्हणजेच हे विदर्भातील करवंडभूमिचे नाते स्वराज्याचे मावळे म्हणून देखील होते . आज त्या मावळ्यांचे वंशज तुम्ही आम्ही आहोतच ! आज फारसे इथे शिल्लक दिसत नाही पण या करवंडभूमिचा इतिहास मात्र निश्चितच खूप मोठा आहे . कर्तुत्ववान व महापराक्रमी व छत्रपती भोसले वंशीयांचे ऋणानुंबंध या मातीशी असल्याने या भूमीचा आम्हास सार्थ अभिमान आहे आणि वाटत राहील .
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा