दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
स्थान :- दुर्ग रायगड , संपूर्ण रायगडास घनदाट जंगलातून १६ कि.मी. पदभ्रमंती
➖➖➖➖➖➖➖➖➖
परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो . हिंदू ,बौद्ध , शीख , मुस्लीम , जैन या धर्माच्या प्राचीन परंपरा आपण अभ्यासल्या तर परिक्रमेस एक पवित्र असे महत्व आहे . गणेश पुराणा मध्ये गणेशाची एक कथा येते, सर्व देवता मध्ये प्रथम पूजन कोणत्या देवतेचे व्हावे म्हणून भगवान शिव देवतांना एक परिक्षा सांगतात की जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून अगोदर येईल त्या देवतेचा पूजनाचा मान पहिला असेल मग बंधू भगवान कार्तिकेय सह सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणे साठी निघतात पण बुद्धीची देवता गणेश आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घालून केवळ शिव पार्वतीच हे विश्व आहे हे सिद्ध करून मान मिळवितात . हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मंदिर प्रदक्षिणा , नदी प्रदक्षिणा ,वटवृक्ष प्रदक्षिणा तसेच विवाह संस्कारातील सात फेरे ही पवित्र मानली जातात . चार्तुमासाच्या शेवटी हजारो वर्षा पासून नर्मदा माता परिक्रमेस एक वेगळे महत्व आहे . बहुधा ही ओंकारेश्वर वरून कठिण तपश्चर्यने सुरुवात करून हजारो कि मी चे अंतर पायी भाविक पूर्ण करत असतात . नाशिक मधील ब्रम्हगिरी परिक्रमेला देखील एक धर्मिक महत्व आहे . पवित्र श्रावण मासामध्ये हजारे भक्त ही परिक्रमा पूर्ण करतात . बौद्ध हिनयान लेणी मधील प्राचीन चैत्यस्तुपाला सुद्धा गोल असा परिक्रमा मार्ग प्राचीन लेणी समूहात दिसून येतो .इस्लाम धर्मा मध्ये आयुष्यातून एकदा तरी हजयात्रे साठी मक्का -मदिना या पवित्र धार्मिक स्थळी जावे अशी परंपरा आहे . मक्का या ठिकाणी इस्लाम मान्यतेनुसार जगाचा मध्य समजला जातो या ठिकाणी असलेलेल्या काबा या पवित्र स्थळास सात वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे . अश्या विविध जाती धर्मात परंपरा आढळतात या परिक्रमे वेळी प्रत्येक भाविक आपल्या धर्म परंपरेच्या मान्यतेनुसार आपली देवतेसमोर नतमस्तक होत असतात .
आताच्या काळात रायगडास परिक्रमेचे शिवकार्य अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहात करतात .भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात असे फार कमी शासक असतील की ज्यांना रायगड माहीत नव्हता . इंग्रज , डच , पोर्तुगीज सारख्या परकियांनी देखीत रायगडाची धास्ती घेतली होती . युरोपीय लोक तर रायगडास पूर्वेकडील जिब्राल्टर म्हूणून संबोधतात . अठरा - परगड जाती धर्माची एक वज्रमूठ बांधून एतद्देशिंयांचे हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतीस याच रायगडी राज्यभिषेक होऊन समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा पालन हार म्हणून लोकमान्यता मिळाली होती . हिंदवी परिवाराच्या मदतीने रायगड चरणी घनदाट जंगलातून गडाच्या अगदी पायथ्याशी चहूदिशांनी नतमस्तक होणाची संधी रायगड परिक्रमेच्या मोहिमेच्या रुपाने मिळाली . हदयात छत्रपती घेऊन त्यांच्या अन मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून चालण्याची संधी ही आयुष्यातील एक अवस्मरनिय प्रसंग होता . १६ ते १८ कि. मी ची ही परिक्रमा स्थानिक अन मान्यता प्राप्तसंस्थेसहच करावी . एकट्यानं वा कुटुंबाने किंवा मित्र समूहाने हे धाडस करु नये .
पाचाड या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नमन करून वाहनाने चित दरवाज्याच्या पायरी मार्गा पर्यन्त पोहचता येते . वर दिसणारा बुरूज हा खुबलढा बुरूज असून त्या बाजूस आता तुटलेला चित दरवाजा आहे. परिक्रमा मार्ग मात्र टकमक टोक दिसते त्या बाजूने थोडे पुढे जाऊन जंगलातून पाऊल वाटेने सुरु होतो . येथून रायगड वाडी पासून येणारा रस्ता पुढे वर नानात (नाणे) दरवाजा कडे जातो हा पुढे महादरवाज्या कडे जातो .याच मार्गाने मुंबई इंग्रज कर हेन्री ऑक्झेंडन राज्याभिषेक प्रसंगी या मार्गाने रायगडावर जाण्याची नोंद करतो . परिक्रमेचा मार्ग मात्र पायथ्याला लागून दाट जंगलातून सुरु होतो सकाळचे साडे आठ वाजले तरी प्रचंड महाकाय रायगडाच्या सावलीतूनच चालावे लागत होते सूर्य दर्शन होण्यास तास दिड तास तरी लागणार होता . रायगड हा सह्याद्री पर्वत रांगेत असून मध्यभागी स्वतंत्र महाकाय असा दिसतो त्यामुळे संपूर्ण परिक्रमा पूर्वेकडील खिंड सोडली तर उंच सखल भागातून अत्यंत घनदाट जंगलातून होते . टकमक टोक व हिरकणी बुरुजावरून रायगड अगदी दूर वरून सहज ओळखता येतो . हिरकणी बुरुज - महादरवाजा - टकमक टोक याच्या अगदी पायथ्यापासूनचा हा परिक्रमा मार्ग हा रायनाकच्या समाधी पर्यन्त घेऊन जातो .अत्यंत किर्र असे जंगल आंबा ,फणस , वड करवंदी व इतर अश्या घनदाट जाळीतून सुर्य प्रकाशही जमीनी पर्यन्त पोहचत नाही .तास - दिड तास चालून झाल्यावर टकमक टोकाच्या पायथ्याशी येतो .या ठिकाणा हून कडेलोट झालेला आरोपी दाट झाडीत वरच जाळीतच अडकत असावा येवढी ही दाट झाडी आहे .थोड़े पुढं चालत गेल्यावर दोन चार घरे असलेली टकमक वाडी लागते या वाडीला गाव म्हणून कोणत्याच सुविधा नाही . शिवकाळापासून आमचे पूर्वज स्वराज्यासाठी काम करत असत असे हे आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने सांगतात . येथून पुढचा रस्ता अजून अवघड होत जातो मोठ मोठी वृक्ष कोसुळून त्यावर जाळी -झुडपे वाढलेली आहेत बहुतेक ठिकाणाहून खाली बसत , सरपटतही जावे लागते . रायगडाच्या कडा वरून कोसळलेले महाकाय दगडही वाटेत दिसतात . डाव्या हाताला दोन कोसावर लिंगाना किल्ला दिसतो . भवानी बुरुजाच्या बाजूची असलेली खिंडीच्या वाटेची चढाई सुरु होते . ही चढाई खूप अवघड आहे एकेरी व दाट झाडीतून दुपार एक वाजे पर्यन्त आम्ही त्या खिंडीत पोहचलो . अर्धी परिक्रमा येथे पूर्ण होते . खिंडीतून खाली उतरणीची वाट पुन्हा अवघड आहे काही ठिकाणी अगदी बसूनही खरकत -खरकत ही जावे लागते हाती काठी असल्यावर पायावर जास्त तान पड़त नाही . अत्यंत घनदाट जंगलातून दोन -अडीच तासाचा प्रवास बाकी राहतो . निर्सगाच अप्रतिम कधीही न पाहिलेले सौदर्य अनुभवत झाडाझुडपातून खिंड मिळेल तेथून रायगडास चौफेर न्याहळता येते . होळीच्या माळाच्या खाली असलेल्या कुशावर्त तलावातून उगम पावत वाघ दरवाज्या जवळून खाली कोसळणारी जलधारेचे नदीचे स्वरूप या दाट जंगलात अक्राळ -विक्राळ दगडी शिळाचा नदीपात्रातील रुप पाहून वेगळाच अनुभव येतो . "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. येथून दिसणारा रायगडाचा दक्षिणेकडीत वाघ दरवाजा याची साक्ष देतो . शौर्य , साहस , बुद्धी या बरोबर पूर्वानुमानाचे अलौकिक कौशल्य शिवरायांमधे होते . स्वराज्यासाठी असलेली अखंड सावधानता त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती . वाघ दरवाजा त्याचीच साक्ष देतो . शंभू महाराजांच्या बलिदानानंतर झुल्फिकार खानाचा वेढा रायगडास बसला . त्याला केवळ एकच दरवाजा माहित होता बाकी अजस्र रायगडा पुढे तो वेढा दिल्या शिवाय काहीच करु शकत नव्हता . त्यावेळी घनदाट जंगलात कातळा अवतरण करूनच या दरवाज्याचा मार्ग होता . खरच वाघाचं काळीज असणाराच हजारो फुट कातळ कडा उतरु शकतो . त्यावेळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी साहेब व त्यांचे सहकारी याच मार्गाने वेढयातून बाहेर पडले होते. दाट अंधारलेल्या झाडीमधून चढाईची वाट तासाभरात पूर्ण करतांच डांबरी रस्ता पाहताच हायसे वाटते . डाव्या बाजुस श्रीगोंदे टोक दिसते येथून पश्चिमेकडे डाबरी रस्ता रोप - वे पर्यन्त पोहचतो याचे अंतर दोन किं मी . पर्यान्तचे आहे . दक्षिणे कडील रायगडाचे महाकाय रूप अगदी जवळून स्पष्टपणे न्याहळता येते . परिक्रमा पूर्ण झाल्याचे समाधान रोप वे पाहताच जाणवते . साधणतः सतत आठ तासाचा पायी प्रवासातून ही परिक्रमा पूर्ण होते .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा