शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५

ओबीसी अधिकारी कर्मचारी - चिंतन शिबिर*

 *


ओबीसी अधिकारी कर्मचारी -  चिंतन शिबिर*


➖➖➖➖➖➖➖   


 संजय खांडवे,बुलढाणा


*तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव*




      वारकरी पंथातील सर्वच संतांचे विचार हे मानवतावादी आणि माणसाला माणूस घडवणारे आहेत प्रसंगी आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे हे विचार पेरणारे आहेत . हीच मानवतावादी माणूसधर्म शिकविणाऱ्या संस्कृतीचे आपण सर्व पाईक आहोत . प्रत्येकाला त्याच्या परीने फुलण्याचा ,बहरण्याचा अधिकार मिळालेला आहे स्वातंत्र्य, समता ,बंधुता व न्याय हे आपल्याला आपल्या भारतीय संविधानातूनच मिळाले . हा आपल्या लोकशाही भारत देशाचा आत्मा आहे .याची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे आहे . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी या संविधानिक तत्वाचे महत्व संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात संकेत देत विषद केली आहे . प्रत्येक संविधान प्रेमींने हे भाषण ऐकलंच पाहिजे . भारतमातेला स्वतंत्र करण्या साठी अनेक क्रांतीवीरांनी सर्वस्वाचा त्याग करत भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले .फक्त स्वतःला मुक्त करविणे हा अर्थ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नव्हताच ! राजकिय स्वांतत्र्याबरोबरच सामाजिक तथा आर्थिक स्वांतत्र्यही तेवढेच महत्वाचे होते . हे त्यांच्या कार्यातून दिसून येते .  स्वातंत्र्यानंतर सामाजिक उतरंडीचा विचार करत संविधानिक तत्वानुसार सामाजिक तथा आर्थिक समानतेसाठी आरक्षणाची तरतूद केली गेली .  पुढील काळात या संपूर्ण प्रवासात

ओ बी सी आरक्षण हा मोठा संघर्षाचा विषय होता .या व्यवस्थेत या समुदायाला स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा काळ गेला .आज स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानंतरही परिस्थिती फारशी बदलली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल .

       या घटनेतील ३३० व ३३२ अधिनियमातून आणि १५(४) व १६(४)नुसार नोकरी मधे  एस सी ,एस टी साठी आरक्षणाची तरतुद केली गेली.त्याच बरोबर ३४० अधिनियमातील तरतूद नुसार ओबीसी आरक्षणासाठी आयोग गठीत करण्यात यावा व त्यानुसार ओबीसी प्रवर्ग ठरविण्यात यावा अशी तरतुद करण्यात आली होती .याला अनुसरुन काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. या नुसार त्यावेळी  ओबीसी मधे २२१८ जाती ठरविण्यात आल्या होत्या. देशात बहुसंख्येने  असलेल्या समाज वर्गाची हककाच्या लढाईचाच तो काळ होता असेच म्हणावे लागेल .१९७७ मधे  मा. मोरारजी देसाई सत्तेवर आले व त्यांनी बी.पी.मंडल कमीशनची स्थापणा केली.मोरारजी देसाई सरकार गेल्यानंतर मा  इंदिराजी गांधी सरकार सत्तेत असतांना १९८१ मधे मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला .यानुसार ३७४३ जातींचा समावेश करण्यात आला.त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या ओबीसी चळवळीना त्या ज्ञात आहे.पुढे मा. व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना मंडल कमीशन लागू झाले .त्यानंतरही क्रिमिलेअरचा संघर्ष सुरुच होता .९० च्या दशकात ओबीसी समुदाय हया संविधानाने दिलेल्या हककाचा लाभार्थी ठरला .२७% आरक्षणाने भारतातील कान्याकोपऱ्यात असलेल्या शेवटच्या घटकाचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली .आजही बहुसंख्येने असलेला ओबीसी घटक जात- धर्म सोड्रून आपल्या न्याय्य हकक,अधिकारासाठी एकत्र येत आहे पण तो अधिक संघटीत होणे गरजेचे आहे.  

        आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या अधिकारी व कर्मचारऱ्यांचे अधिष्ठाण असलेली मजबूत संघटना  मा .सुनिल शेळके यांनी स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना  ही संघटना स्थापन केली होती . या संघटनाचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला  येणाऱ्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.  ओबीसी विदयार्थी तथा पालकांना हे संघटन एका क्लीकवर  सामावून घेवून त्याच्या विदयालयीन,महाविदयालयीन शिष्यवृत्ती,प्रवेश तथा क्रिमिलेअर विषयक समस्या अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यन्त असलेल्या बांधवाला क्षणात सोडविण्यास मार्गदर्शक ठरणार आहेत . स्वतःची स्वंतत्र वेबसाईट व अँप या प्रसंगी सुरू होणार आहे .यामधे सर्व प्रकारचे शासकिय आदेश व माहीती मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहेत या साठी या संघटनेचे तज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत .  बेखबर असलेला ओबीसी आता सोशलमिडीया , तंत्रज्ञानाच्या व स्पर्धात्मक युगात बाखबर करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे . तीन वर्षा पूर्वी छत्रपती संभाजी नगर येथे पहिले अधिवेशन पार पडले होते या वेळी  उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते झाले होते. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू होते . ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करुन. दिशा दाखविली .प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने काय राहतील यावर चिंतन घडविले होते. त्यानंतर २०२४ मध्ये दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले या अधिवेशनात संपूर्ण राज्यभरातून या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते . या चिंतन शिबिरात अध्यक्ष म्हणून ख्यातमान लेखक तथा विचारवंत  कांचा इल्लैया हे उद्घघाटक म्हणून लाभले होते . भारतातील जवळपास सर्वच जातींचा व त्यांच्या संस्कृतीचा त्यांचा सखोल अभ्यास असल्याने या चिंतन शिबिरात त्यांच्या अभ्यासातून विचार मांडला होता . यावेळी माजी आमदार डॉ . नारायणराव मुंडे हे देखील उपस्थित होते . असे राष्ट्रीय स्तरावरील विचारवंत तथा अभ्यासकांच्या मदतीने ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ हा ओबीसींच्या हक्कासाठी सदैव लढत आहे याच उद्देशाने या 2026 मधील तिसरे अधिवेशन हे संत नगरी शेगावला होऊ घातले आहे . या अधिवेशनात प्रमुख वक्ते राष्ट्रीय युनिटी ऑफ मूलनिवासी समाज चे मा कमलकांत काळे हे ओबीसी आरक्षण : सामाजिक लढा व आताची परिस्थिती या विषयावर ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत . तसेच एससी एसटी ओबीसी वेलफेअर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजय थुल हे येणाऱ्या काळात ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोर येणारी आव्हाने या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत . याचवेळी ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार होणार आहे अशा या चिंतन बैठकी तून गेल्या तीन वर्षापासून एक विचार मंथनाची चांगली परंपरा या संघातर्फे सुरू झाली आहे ही एक अभिनंदनिय बाब आहे .

सहयाद्रीचा अप्रतिम दागिना - हरिशचंद्रगड

 


सहयाद्रीचा अप्रतिम दागिना - हरिशचंद्रगड


स्थान : ता . अकोले जि . अहिल्यादेवीनगर , संगमनेर - अकोले - राजुरवरुन पुढे २७ कि.मी.



 हरिश्चंद्रेश्वराच्या नावाने प्रसिद्ध असलेला हरिश्चंद्रगड हा सह्याद्री पर्वत रांगेतील सह्याद्रीचा एक अप्रतिम दागिना आहे . इतिहास आणि अप्रतिम निसर्ग या दोन्ही गोष्टीचे मिलन असलेला हा गड भटक्यांची पंढरी देखील मानल्या जातो . पुणे ,ठाणे आणि अहिल्यादेवी नगर या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटाच्या डाव्या बाजूला व संगमनेर - अकोले -राजुर पासून पुढे 27 किलोमीटरचे अंतर घाट माथ्यावरून डोंगर दर्यातून , निसर्गाचं अप्रतिम लेणं असलेल्या सह्याद्रीतून घनदाट कळसूबाई - हरिशचंद्रगड अभयारण्यातून पाचनई गावापर्यंत घेऊन जातो . या गावात पोहोचल्यावर अजस्त्र अश्या हरिश्चंद्रेश्वर गडाचे दर्शन होते . तसे हरिश्चंद्रगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहे त्यापैकीच हा एक मार्ग याशिवाय माकड नाळ , नळीची नाळ आणि खिरेश्वर मार्गे सुद्धा या गडावर पोहोचता येते . पण हा मार्ग सोपा आहे . पाचनई गावामध्ये पर्यटकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्थानिकांच्या मदतीने होते या गावात वाहने उभी करून गडाची चढाई करता येते एका कमानी मधून डोंगर चढाईला सुरुवात होते ही चढाई मध्यम स्वरूपाची असल्याने वाटेत मध्ये काही लोखंडी जिने सुद्धा लावण्यात आलेले आहे . कातळ कड्याच्या कपारीतून जातांना उजव्या बाजूला खोल दरी व त्या साठी सुरक्षा म्हणून लोखंडी रिलिंग लावण्यात आलेली आहे . लहान मोठे झरे व ओहळांना ओलांडत या पाऊलवाटेने आपण एका धबधब्याजवळ पोहोचतो निसर्गाचं सौंदर्य खरचं येथून न्याहाळत जात असताना पुन्हा एका लाकडी पुलावरून दाट जंगलातून चढाई करत एका उंच टेकड्यावर पोहोचतो ही दोन अडीच तासाची चढाई करून आपल्याला हरिश्चंद्रेश्वराचे दर्शन घडते . या हरिश्चंद्रेश्वराची माहिती आपण मागील भागात घेतली आहे .

            या गडाचा घेर खूप मोठा आहे गडावरील तारामती शिखर आणि बालेकिल्ला ही महत्त्वाची दोन उंच ठिकाणे असून या सोबतच प्रसिद्ध असा कोकणकडा हा मनाला भुरळ लावून जातो . गडावर येण्याचे मार्ग बरेच असल्याने या गडावर अनेक वाटा दिसून येतात . साहसी गिर्यारोहक या वाटेचा वापर करतात परंतु कोणतीही माहिती नसलेल्यांनी याचा वापर करू नये . याचबरोबर दाट झाडी मधून जाणाऱ्या वाटा या भुलभुलैय्या सारख्या वाटतात त्यामुळे स्थानिकांची मदत घेऊनच बालेकिल्ला किंवा तारामती शिखर गाठावे . दोन वर्षांपूर्वी पुण्याच्या एका कंपनीत काम करणारे सहा जण ऑगस्ट महिन्यातच या गडाचे सोशल मीडियातील आकर्षणातून कसलीही माहिती न घेता भर पावसात खिरेश्वर मार्गाने चढाई करत वर आले आणि दाट झाडी मधील पाऊल वाटा चुकल्याने गडावर जंगलात अडकून राहिले यामध्ये उपासमारी व पाऊसामुळे एकाचा दुदैवी मृत्यू झाला होता नंतर स्थानिकांच्या अथक परिश्रमातून इतरांना वाचविण्यात यश आले होते . निसर्ग हा एवढा भुरळ घालतो की या गडावर पोहोचल्यावर फिरतच राहावंसं वाटते . पाच वर्षांपूर्वी या गडास पहिल्यांदा भेट दिली होती त्यावेळेस   सर्वप्रथम हरिशचंद्रेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा पूर्वेकडील भागात असलेला बालेकिल्ला पाहण्याची इच्छा झाली तारामती शिखराच्या पायथ्याला लागून दाट जंगलातून बालेकिल्ल्याकडे आम्ही निघालो या गड भ्रमंतीत आम्ही चार जण होतो बालेकिल्लाविषयी कोणतीही माहिती नव्हती फक्त स्थानिकांच्या मदतीने आणि गुगल मॅप चा वापर करून आम्ही निघालो होतो. अर्ध्या तासाच्या भ्रमंती नंतर घनदाट झाडी मधून अनेक वाटा या दिसत होत्या त्यावेळेस बालेकिल्ल्याच्या रोखाने आम्ही चालत जाऊन संपूर्ण बालेकिल्ल्याला गोल फेरा मारला तरी देखील बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आम्हाला सापडली नव्हती . एवढ्या घनदाट जंगलात शेवटी एका स्थानिकाने आम्हाला पुसदशी पाऊलवाट दाखवली आणि त्या वाटेने बालेकिल्ल्यावर पोहोचलो होतो बालेकिल्ल्यावर आजही दगडी इमारतीचे संपूर्णपणे कोसळलेले अवशेष आहेत त्याचबरोबर एवढ्या उंचावर कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत . बाले किल्ल्यावरील शिखरावर फारशी जागा नाही एक दोन लहान इमारती उभ्या राहतील व  तीन चार पाण्याच्या टाकीची एवढीच जागा बालेकिल्ल्यावर आहे . येथून तारामती शिखराचे आणि खालील कोकण भागाचे दिव्य दर्शन घडते .

      येथून पुन्हा परत मंदिर परिसरात यावे लागते या ठिकाणी गडावर स्थानिकांनी राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या अगदी वरच्या भागात भव्य दिव्य असे तारामती शिखर दिसते या तारामती शिखराच्या पायथ्याशीच प्राचीन काताळात कोरलेल्या  लेणींचा समूह असून या ठिकाणी पर्यटक विसावा घेताना दिसतात. हजारो वर्षांपूर्वीची असलेली ही लेणी समूहांची मांडणी या गडाचे प्राचीनत्व सिद्ध करते या लेणीला गणेशलेणी असेही म्हणतात. लेणीमध्ये सात ते आठ फूट उंचीची दगडी काताळात कोरलेली सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे . या लेणीच्या वरच्या भागातूनच तारामती शिखराकडे जाता येते .  शिखरावर जाताना खूप काळजी घ्यावी लागते अरुंद अशा पाऊलवाटेने तारामती शिखरावर चढत असताना घनदाट झाडी व प्रचंड डोंगर चढाईचा सामना करत जावे लागते. सर्वोच्च भागावर पोहोचल्यावर प्रचंड वाऱ्याचा वेग सांभाळावा लागतो तारामती शिखराच्या पलीकडच्या बाजूस कातळकडा आहे शिखरावर फारच कमी जागा असून जमिनीतील कातळावर कोरलेले महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी दिसून येते . आता हौशी पर्यटकांनी भगवा ध्वज लावलेला आहे .  किल्ल्याचे आणखी मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा, येथून त्याचे भव्य दर्शन घडते .  तेथे या ठिकाणाहूनही जाण्यास मार्ग आहे परंतु ज्यांना याविषयी काहीही माहिती नाही त्यांनी असे नवीन नवीन मार्ग स्वतःच्या मनाने येथे निवडू नये स्थानिक सोबत असेल तरच अशा मार्गाने जावे कारण या मार्गाने हजारो फूट खोल दरीमध्ये अगदी काठावरून जाणारी ही पाऊलवाट आहे .

            गणेश लेणी जवळून पुन्हा वर पठारावर चालत जात पाऊण - एका तासाच्या वाटेने कोकणकड्याकडे जाता येते. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या ठिकाणावर कातळ कड्याला लागून लोखंडी रेलिंग सुरक्षासाठी लावण्यात आलेले आहे दोन अडीच किलोमीटरचा हा सी आकारात असलेला महाकाय कडा आहे .  ज्यावेळेस ढगांचा समूह आलेले असतात त्यावेळेस येथील दृश्य पाहण्यासारखे असते . दूरपर्यंतचा परिसर येथून न्याहाळता येतो . प्रशिक्षित गिर्यारोह याठिकाणी हा कडा उतरण्याचे साहसही करतात . 1835 मध्ये येथे एक घटना घडली हे इंग्रज अधिकारी कर्नल साईक्स येथे आला होता व सकाळच्या धुक्यातून वाट काढत हा घोड्यावरून कोकणकड्याच्या वर आला आणि या कड्यावरून तो खाली बघत असताना आद्र ढगांवर पाठीमागून असलेल्या सूर्यामुळे त्याची सावली धुक्यावर पडली आणि या सावलीत त्याच्या मस्तकाभोवती गोल इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रव्रज फेरा निर्माण झाला हे पाहून तो चकित झाला . हा सृष्टीचा एक चमत्कार या ठिकाणी बघायला मिळतो इंद्रव्रज बघण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येतात . रात्री इथे मुक्कामही करतात या कड्यावरून  फिरतांना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे .  5 व्या शतकात कलचुरी राजाच्या काळात हरीशचंद्रेश्वराचे मंदिर तथा त्या ठिकाणची पुष्करणी आदींचे  वास्तुंचे निर्माण झाले . स्वराज्यातही हा किल्ला असावा परंतु त्याचे फारसे पुरावे मिळत नाहीत . 1747 -48 मध्ये मुघलांकडून मराठ्यांनी हा गड मिळवला आणि त्यानंतर कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदारी सुरू झाली . 1775 - 76 मध्ये संताजी सावंत हरिश्चंद्रगडाची हवालदारी असल्याची नोंद मिळते . इंग्रजांनी देखील या ठिकाणाला महाबळेश्वर सारखे ठिकाण विकसित करण्याचा प्रयत्न केला परंतु तो पुढे पूर्ण होऊ शकला नाही . या गडाची भ्रमंती करण्या अगोदर पूर्व नियोजन करूनच जावे या गडावरील तारामती शिखर, बालेकिल्ला, कोकणकडा हरिचंद्रेश्वर मंदिर ,केदारेश्वर गुफा ,गणेश लेणी आदी ठिकाणी पाहण्यासाठी वेळेचेही नियोजन असणे आवश्यक आहे तेव्हाच ही भ्रमंती पूर्ण होऊ शकते .



संजय खांडवे

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

महाराष्ट्र बारव मोहिम

 



महाराष्ट्र बारव मोहिम 

  


 पाणी हे जगातील सर्वात मोठी समस्या आहे . त्यातच शुद्ध पिण्यायोग्य पाणी ही त्याही पेक्षा मोठी समस्या आज जगापुढे सर्वात मोठे संकट उभे करत आहे .संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जल विकास अहवाल 2024 नुसार पाणी हे समृद्धी आणि शांतीसाठी  आपल्या जीवन आणि उपजीविकेसाठी  व्यापक महत्त्व अधोरेखित करते. जगातील अर्ध्या लोकांना वर्षातून केव्हा ना केव्हातरी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावेच लागते अशी परिस्थिती आहे जलवायू परिवर्तनामुळे जगात जलचक्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या संकटाला येणाऱ्या काळात सामोरे जावे लागेल . कोणत्याही राष्ट्रात त्या राष्ट्राची जलसमृद्धी ही त्या राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करते त्याच बरोबर त्या राष्ट्राचा आर्थिक , विकास शेतीचा विकास , उद्योगधंद्याचा विकास हा अधिक वेगाने होतो आणि ही जलसमृद्धी म्हणजे त्या राष्ट्रांमधील एक प्रकारची प्रगत  जलसाक्षरताच असते . अश्या प्रकारची जलसाक्षरता प्राचीन काळापासून दिसून येते .सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अशी  सिंधू संस्कृती उदयास आली . या संस्कृतीमधील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाचे आहे . खरी जलसाक्षरता ही त्या संस्कृतीला कळाली होती . अगदी सांडपाण्याच्या व्यवस्थापनापासून पाणी साठवण्याच्या व्यवस्थापनापर्यंत उत्खलनामध्ये अनेक पुरावे आढळलेले आहेत . साती आसरा या आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पानवट्याच्या ठिकाणी आढळतात तळे, नदी नाले, कुंड , झरे, बारव आधी ठिकाणी साती - आसराचे अस्तित्व आढळून येते . मनोभावे स्थानिक त्यांची पूजा  करतात पर्यायाने ह्या जलदेवता आहे . जलसंरक्षण हे त्याचे चालत आलेले कार्य आहे . सिंधू संस्कृतीच्या पुष्करणी मध्ये देखील यांचे अस्तित्व दिसून आले आहे अगदी सातवाहन काळापासून साती - आसरांना विशेष असे महत्त्व दिसून येते . दोन हजार वर्षा पूर्वी पासून गडकोट किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापनाचे अचूक नियोजन ठेवले जात असे . आजही आपण गडकोट -किल्ल्यावर गेल्यावर अत्यंत उंच अशा ठिकाणी दगडी कातळात पाण्याची अनेक टाकी कोरलेली दिसतात . किल्ले चावंड या ठिकाणी सात टाक्यांचा भव्यसमूह आणि त्या टाक्यांच्या बाजूला प्राचीन शिवमंदिराची एक पुष्करणी आजही दिसून येते . एवढ्या उंचावरही प्रचंड उन्हाळ्यातही पाण्याचे अस्तित्व दिसून येते हे त्या काळच्या पाणी व्यवस्थापनाचे अत्यंत समृद्ध असे उदाहरण आहे . अनेक प्राचीन लेण्यांमध्ये देखील कुंड व पानपोढी याची व्यवस्था केलेली दिसून येते . या लेण्यांमध्ये अनेक लोकांनी पानपोढी तयार करण्यासाठी दान दिल्याचेही माहिती मिळते . शिवकाळातील पाणी व्यवस्थापन महाराजांनी अत्यंत चोखपणे केलेले दिसून येते . रायगडाची बांधणी करताना रायगडावरील गंगासागर तलाव कुशावर्त तलाव हत्ती तलाव आणि इतर पाणी टाक्यांचा समूह हे त्याचे उदाहरण आहे . पुढच्या काळात थोरले शाहू महाराज व राजर्षी शाहू महाराजांनी देखील पाणी व्यवस्थापणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. 

       गंगाजलनिर्मल लोक कल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांनी तर त्यांच्या काळात अनेक पाणवठे , नदी घाट , बारव यांची नव निर्मिती केली . बहुतेक ठिकाणी जोर्णोद्धारही केला . सरकारी तिजोरीवर कसलाही भार पडू न देता अगदी स्वखर्चातून अहिल्यादेवींनी हे निर्माण कार्य घडविले . प्राचीन काळातील मुख्य रस्ते यावर देखील अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी बारव किंवा पानवठे आदींची निर्मिती केल्याचे उल्लेख आहेत . महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी एक गोमुखी धारेची पुष्करणी आहेत . जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पुष्करणी मधील गोमुखी धार हे प्राचीन पाणी व्यवस्थेचे आजही एक जिवंत असलेले उदाहरण आहे . मराठवाड्यातील वालूर येथील चक्राकार बारव त्याचबरोबर चारठाणा येथील पुष्करणी हे आजही आपल्याला खुणवते . महाराष्ट्रातील अशी कितीतरी सुंदर सुंदर बारवांचे उदाहरणे देता येतील . हे प्राचीन भारतातील त्या कालच्या पाणी व्यवस्थापनाचे मुख्य साधन होते . गाव -वाडी वस्ती त्या परिसराला पाणी पुरवण्याचे काम त्या काळात केले जायचे व काही ठिकाणी आजही होत आहे . त्याकाळच्या तंत्रज्ञानाने जमिनीतील पाण्याचा प्रवाह शोधून ही पुष्करणी / बारव तयार केली जायची . आज आपण पाहतो बहुतेक ठिकाणच्या बारव स्थानिकांनी कचराकुंडी म्हणून उपयोगात आणलेल्या दिसतात. काही ठिकाणच्या बारव या काळाच्या ओघात गाडल्या गेले आहेत . 

            रोहन काळे या मुंबईच्या नव-तरुणाने या बारवांचे महत्त्व जाणले . आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्र बारव मोहीम या रूपाने एक लोक चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून बारवांचा शोध घेण्याचं काम रोहन काळे यांनी केले . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आतापर्यंत दोन हजाराच्या वर बारव त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बारवांचे गुगल मॅपिंग केले . स्थानिक लोकांमध्ये जाऊन लोकप्रबोधनाच्या माध्यमातून लोक जागृती केली आणि त्या परिसरातील बारवांची स्वच्छता मोहीम राबवली . बहुतेक बारव ह्या गाळाने गाळवटल्या होत्या त्या बारवांमधील गाळ काढणे ही फार मोठी कसरत होती स्थानिक लोकांच्या मदतीने हे फार मोठे कार्य रोहन काळे यांच्या प्रेरणेनेने सुरू झाले . वालूरची बारव ही स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेली वास्तू कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर आली आणि आज पोस्टाच्या तिकिटावर ती झळकत आहे . या लोकजागृतीची दखल मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात घेण्यात आली 87 व्या भागामध्ये महाराष्ट्र बारव मोहिमेचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला आणि या स्वच्छता मोहिमेच्या चळवळीस शुभेच्छा देऊन ही लोक चळवळ झाली पाहिजे असे सांगितले . पुढे मन की बात च्या शंभराव्या भागातही रोहन काळे यांना प्रत्यक्ष आमंत्रित करण्यात आले होते . संपूर्ण महाराष्ट्रभर महाशिवरात्रीला बारवांची स्वच्छता करून त्या ठिकाणी दीपोत्सव देखील स्थानिकांच्या मदतीने रोहन काळे यांनी घडून आणले . आज बारव /पुष्करणी आदींच्या बाबतीमध्ये जी जागृती झाली ती या मोहिमेच्या माध्यमातून झाल्याची दिसून येते याचबरोबर बहुतेक बारवांचे मॅपिंगसह , दस्ताऐवजीकरणाचे काम आर्किऑलॉजिकल कॉलेजच्या मदतीने त्या बारवांचे मोजमाप घेऊन त्यांचा इतिहास शोधण्याचे काम देखील या मोहिमेच्या माध्यमातून हाती घेतले गेले आहे . 

रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री निमित्ताने महाराष्ट्र बारव दीपोत्सव.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या ३०१ वी जयंती निमित्ताने ३०१ बारव वर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे . आपल्या गावात परिसरात अशा प्रकारची बारव अथवा पुष्करणी असल्यास त्या परिसरातील नव तरुणांनी समोर यावे . याशिवाय त्या परिसरातील सेवाभावी संस्था तथा प्रतिष्ठान यांनी देखील या कार्यात आपला हातभार नोंदवावा आणि आपल्या परिसरातील आपल्या पूर्वजांनी फार मेहनतीने व त्यांच्या तंत्रज्ञाने उभे केलेल्या या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता करून संवर्धन करावे आणि या भव्य दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे अपेक्षा या महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून केली जात आहे .



संजय खांडवे

शनिवार, ९ ऑगस्ट, २०२५

विश्व आदिवासी दिवस

 


विश्व आदिवासी दिवस

➖➖➖➖➖➖➖➖


आज विश्व आदिवासी दिवस

विश्वाची निर्मिती कशी झाली ,माणूस कसा तयार झाला याबाबत असंख्य संशोधने आहेत ,संकल्पणा आहेत पण या पृथ्वीवरील पहिला मानवी वंश विकसित होत समुहाने राहू लागला तो म्हणजे आदिवासी ! स्वतः च्या संस्कृतीचा तोच शिल्पकार झाला . निर्सगाच्या शाळेत त्याने असंख्य संशोधने केली अन प्रतिकुलतेत अनुकुलता शोधत गेला .

आपल्या मातृभूमीत आपल्या मातीशी एकनिष्ठ असलेला समाज !

महाराष्ट्रात उत्तर दक्षिण पसरलेल्या भव्यदिव्य अश्या सहयाद्रीमध्ये  पदभ्रमंती करत असतांना नगर जिल्हयातील अकोले तालुक्यात ,नेम राजुर परिसरात तीन दिवस भ्रमंती करतांना आदिवासी समाजातील क्रांतीकारी क्रांतीवीरांचा अपरिचित इतिहास प्रथमच स्थानिक व इतर संदर्भतून कळाला .पराक्रमी व वैभवशाली इतिहासापासून आपण अनभिज्ञ राहिलो याची जाणिव मात्र नककीच झाली .

    आदयक्रांतीवीर राघोजी भांगेरे यांची मातृभूमी म्हणजे हा परिसर ,कळसूबाई परिसरातील देवगाव हे त्यांचे जन्मगाव .

रमाबाई व रामजी यांच्या पोटी राघोजीचा जन्म झाला ,बालपणापासूनच विविध शस्त्र चालविण्यात त्यांना त्यांच्या वडीलांनी पारंगत केले होते .त्या परिसरातील डोंगरदऱ्या, गड कोट,कातरकडा,वाटा,पडवाटा ,गुफा आदि राघोजीनी बालपणीच पिंजून काढल्या होत्या .

    क्रांतीकारी विचारांची बीजे आपल्या मनात घेत ,स्वराज्याचा विचार म्हणजे स्वाभीमान बाळगणारा हा मावळा आपल्या मातृभूमी व माणसे यांच्या रक्षणार्थ सज्ज झाला होता .उंचपुरे पिळदार शरीर ,धारदार डोळे ,शञूला पाहूनच धडकी भरायला लावणारे होते ,नुसत्या नावाने थरकाप उडायचा असे व्यक्तीमत्व !

       "इंग्रजांचा येथे अधिकार नाही ,ही मावळी मायभूमी आहे आमची तिच्या रक्षणाची जबाबदारी आमची आहे " 

पारतंत्र्याच्या जोखंडाला उलटविणारा हा क्रांतीकारक होता . जीवाला जीव देणारे साथीदार म्हणजे घेवाजी आव्हाळ,बाळा ठाकूर,धर्मा मुंडा,राया ठाकर,शिवा न्हावी,जाणकु धौंडगा,अंतोबा लाटे ,खंडू साबा,देवाजी नाना अशी कितीतरी क्रांतीकारकांची नावे स्थानिक पटा पटा सांगत होती .

    रतनगडावर राघोजीने पहिले बंड केले .जुलमी सरकार व सावकाराविरोधात राघोजी व त्यांच्या साथीदारांनी पहीले बंड केले .राघोजी कुणावरही अन्याय होऊ नये या मताचा होता .स्त्रियाबद्दल त्याच्या मनात अत्यंत आदराची भावना होती .त्या परिसरात राघोजीचे शौर्य व कार्य दुमदमू लागले .

*राघोजीने केला बंड*

*बागडीच्या पाण्यापाशी !*

हे गाणे गुणगुणले जाते .बागडीची माची त्या परिसरात प्रसिद्ध आहे .उंच अश्या भव्य डोंगरावर हा सपाट भाग ,या ठीकाणी गुरे चरायला असतात .त्या ठिकानी असलेल्या गुहामध्ये राघोजी व त्यांच्या सहकार्याचे वास्तव्य होते .इंग्रजाना अश्या ठिकाणी पोहचणे फार कठिण ! ही जागा त्यांच्या वास्तव्यासाठी त्यांनी काही काळ निवडली .त्या माथ्यावर वर्षभर पिण्याचे पाणी त्या बागडीत असते .बागडी म्हणजे भांडे ,भाडयासारखा तो पाणी साठविण्याचा भाग  त्या माचीवर आहे .याच ठिकाणाहून त्यांनी इंग्रजाविरूद्ध,जुलमी सावकाराविरूद्ध  बंड पुकारले .

     त्यांचा तळकोकणातील प्रसंग,गौरीपुरी येथील इंग्रजांच्या छावणी वरील हल्ला ,नाशीक हवेली वरील आदी प्रसंग स्थानिक सांगतात .सामान्याच्या न्याय हककासाठीचे हे कार्य दिसून येते .

     त्यांचा बुधा नावाचा साथीदार इंग्रजांनी पकडले होते ,रघुजीचा पत्ता सांग त्यांना पकडून दया यासाठी पाच हजार देऊ केले .नाहीतर गोळया खा अशी धमकी दिली .जीवाचा जीवलग इंग्रजांना उंच टेकडी कडयावर घेऊन गेला व वरुन शेकडो फुट दरीत उडी मारून मृत्यु पत्कारला पण दगाबाजी केली नाही .या मातीला राघोजीची गरज आहे याचे भान या बुधाजीला होते .अशी माणसे तयार केली राघोजीने .

   सातऱ्याचे प्रतापसिहराजे भोसले यांनी राघोजीचे कार्य बघून त्यांना सातऱ्याला आमत्रित केले .त्यांना शस्त्र सैन्य आदीची मदतही केली होती त्यांचा आदर सत्कारही केला होता.

     १८४५ साली जुन्नर येथे इंग्रजाविरूद्ध  उठाव केला यात मुंबई प्रांतापासून इंग्रजांनी दखल घेत १०००० सैन्य तोफगोळयासह राघोजी व त्यांच्या सहकार्या विरोधात उभे केले .मैदानी भागात आल्याने त्यांचे असंख्य साथीदार मातीसाठी कामी आले .हतबल होऊन राघोजीनी त्या ठिकाणाहून आपली सुटका केली .पुढे गोसाव्याच्या वेषात भूमीगत राहून आपले कार्य सुरू ठेवले .इंग्रज त्यांच्या मागावर सुरुच होते .त्या भागातील अनेक गडाच्या पायऱ्या इंग्रजांनी ब्लास्टीग करून उडविल्याच्या खुणा आहेत .आजही अंनंद,मदन,कुलंग यासारख्या गडावर सामान्य माणूस सहज जाऊचं शकत नाही .

        ह्माच स्वातंत्र्यंच्या लढाईत ,भूमीगत असतांना इंग्रजांनी पंढ़रपूर येथे राघोजीना कैद केले .एकतर्फि निर्णय देत त्यांना फाशी सुनवली .२ मे १८४८ ला आदयक्रांतीकारक राघोजी भांगेरे या मातीसाठी शहीद झाले .



ब्रॅकेट मध्ये घेण्यासाठी👇



*दै महाभूमिचा वर्धापन दिवसही आजचाच......!!*

➖➖➖➖➖➖➖➖

आज ऑगष्ट् क्रांती दिवसही आहे ,भारतीय स्वातंत्र्य लढयाचे " चले जावो " हे रनशींग  आजच्याच दिवशी फुंकले गेले. तसाच विश्व आदिवासी दिवसह आजचं आहे . मराठवाडा अन विदर्भ या सिमावर्ती जिल्हयात अल्प कालावधितच जनमानसात लोकप्रिय ठरलेला दैनिक महाभूमिचा वर्धापन दिवसही आजच ! आदिती अर्बन परिवाराच्या माध्यमातून अर्थक्रांती बरोबरच तुकोबारायांच्या शब्दरूपी शस्त्रांची शब्दक्रांती देखील घडावी या उद्देशाने मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी दैनिक महाभुमिचा हा महायज्ञ सुरू केला . आज हे शब्द रुपी शस्त्र जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्मळ , निकोप  आणि निपक्षपणे लोकांच्या सेवेत  अगदी शिस्तबद्धपणे काम करत आहे . नवोदित लेखक व कवींची ओळख निर्माण करत आजच्या डिजिटल काळात वाचन संस्कृतीमध्ये क्रांति करत आहेत .

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

सिन्नरचा श्रीगोंदेश्वर महादेव

 



सिन्नरचा श्रीगोंदेश्वर महादेव

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान :-  ता . सिन्नर जि. नाशिक , नाशिक वरून ३० कि.मी ., समृद्धी महामार्गावरील  सिन्नर हेच इंटरचेंज आहे .

➖..➖➖➖➖➖➖


सर्वेश्वर महादेव हे सर्वव्यापी समजले जातात .आज आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की भगवान शिव शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये अगदी मनोभावे भक्त शिवाची भक्ति करत असतात . यामध्ये पुरुष असो वा स्त्री  हे दोघेही तेवढीच श्रद्धा शिवशंकरावर ठे वतात .अनेक ठिकाणी यात्रा उत्सवही अगदी प्राचीन काळापासून सुरू आहेत .शिवलिंगाच्या रूपाने सर्वत्र शिवउपासना होते . हे  शक्तीचे प्रतीक मानले जाते . स्वर्ग व पृथ्वीची निर्मिती करून त्याचे संचलनार्थ सर्व दिशांनी मुख असलेले सर्व दिशांना हात व पाय असलेले भगवान शिव हे महान असे महादेव ठरतात .भगवान महादेवाच्या डाव्या अंगातून विष्णू म्हणजेच श्रीहरीची तथा उजव्या अंगातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आहे या ब्रह्मदेवांना नारायणाच्या नाभीत त्यांनी स्थापित केले आहे ब्रह्मदेव पुढे शिवांच्या प्रेरणेनेच देव, असूर, मनुष्य आदी सृष्टीची रचना करतात .असे शिवपुराण सांगते .भगवान शिव शंकराचा पुराण व इतर आधुनिक साहित्यातून अभ्यास केल्या नंतर त्यांच्या केलेल्या कार्यानुसार मान्यता पावलेल्या नावांची एक मोठी यादीच तयार होते .आदिनाथ, आदी योगी या नावाने ते प्रसिध्दच आहे .आदी हा शब्द त्यांचे प्राचीनत्व सिद्ध करतो .गंजांतक,  जिमूतवाहन, सदाशिव , वृषभध्वज ,परमात्मा , परब्रम्ह ,श्रीनिलकंठ ,ईश्वर , शंभू  , महेश्वर , हर ,चिदानंदस्वरूप अशी कितीतरी नावे शिवाची आहेत .निर्विकार, प्रकाशपूर्ण, करुणामय , चंद्रकला विभूषण, विष्णूकमल, विष्णूक्षेत्र, वेदांतवेद्य ,जटाजुटधारी, त्रिगुणातीत,भ्रमणशील, भक्तवत्सला, दयासिंधू , शंभू ,जितेंद्रिय , महेश , सृष्टीकर्ता , दुर्गेश, जगन्नाथ , मृत्युंजय , दीनबंधू ,दयासिंधू ,शर्वा, , परमतत्वमय, अविनाशी , सर्वेश्वर सहारा कर्ता, दिनबंधू ,पशुपतीनाथ,भैरव , वीरभद्र अशी अनंत नावे त्यांच्या कार्यसिद्दी मुळेच त्यांना प्राप्त झाली आहेत . ' "सर्वो वै रूद्र: " रुद्रच सर्व आहे या महा वाक्यातून ते सिध्द होते . स्थानिक भूप्रदेशातही त्या भागाच्या नावानुसार त्यांना ओळखले जाते जसे सिध्देश्वर ,मानकेश्वर ,बुदनेश्वर,पाताळेश्वर ,केहाळेश्वर ,रामेश्वर., खिद्रेश्वर , केदारेश्वर, हरिशचंद्रेश्वर अशी अनेक नावे आहेत . असेच एक प्राचीन मंदिर म्हणजे सिन्नरचा गोंदेश्वर  होय . त्याला गोविंदेश्वर असेही संबोधतात .

          महाभूमिमधील हे मंदिर त्याच्या शिल्परचनेवरून  प्रमुख शिव मंदिरापैकी एक समजले जाते . भूमिज स्थापत्य शैलीचे हे मंदिर यादव काळात निर्माण झाले . कोणत्याही प्रकारच्या चुना ,रेती , माती किंवा इतर गोष्टीचा उपयोग बांधकामात दिसत नाही . तासिव व अप्रतिम शिल्पीत केलेले दगड आपसात (लॉकिंग ) खाचेबद्ध करून उभारलेले असून त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्राच्या नियमाने ही वास्तु आजही भक्कमपणे पुढचे शेकडो वर्षाचे ऋतुमान सोसण्यास उभी आहे  हे पाहताच क्षणी लक्षात येते . या वास्तुसाठी लागलेले दगड हे बाजूच्याच तलावातून काढलेले दिसतात . संपूर्ण मंदिरास दगडी मजबूत तटबंदी आहे अशीच तटबंदी गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडेय मंदिरास दिसून येते . या संपूर्ण मंदिर समूहास दक्षिण दिशेचे एक आणि पूर्व दिशेचे एक अशी दोन प्रवेशद्वार आहेत प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते मधोमध गणपतीचे शिल्प असून डाव्या बाजूला दगडी आसन तयार करण्यात आलेले आहे या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आठ खांबावर उभा असलेला नक्षीसह सुंदर असा प्रवेशद्वार बघायला मिळतो . या द्वारातूनच आयताकृती दगडी चौथर्‍यावर उभे असलेले शिवपंचायातन नजरेस पडते . मुख्य प्रवेश द्वाराच्या बाजूला तटबंदीस लागूंन दगडी इमारत आहे त्यास ओवरी म्हणतात . मंदिर परिसरात अनेक मूर्ती शिल्प तथा मंदिराचे दगडी अवशेषही दिसून येतात संपूर्ण मंदिरात खूप मोठे प्रांगण आहे पूर्व दिशेचे द्वार हे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरा च्या स्वर्ग मंडपाची आठवण करून देते या स्वर्ग मंडपास गोलाकार सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे या प्रवेशद्वारास अनेक शिल्पांनी अलंकृत केलेले आहे . पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या अगदी समोर नंदी मंडप आहे हा नंदी मंडप मुख्य शिव मंदिराच्या समोर आहे . चार खांबावर उभा असलेल्या नंदी मंडपावर नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. चारही बाजूने सूरसुंदरींचे शिल्प यावर कोरलेले आहे . मुख्य शिव मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने द्वार आहेत या द्वारा मधून आपण मुख्य मंडपात पोहोचतो त्यातल्या पूर्वेकडील द्वारावर द्वारपालाचे शिल्प अंकित केले आहे असेच शिल्प सर्वच द्वारा वर  दिसून येतात बहुतेक ठिकाणी प्रवेशद्वारावर श्रीविष्णूचे शिल्प अंकित आहेत .यावर कीर्तीमुख सुद्धा कोरलेले असून एका शिल्पामध्ये हत्तीला व्याळाने पायाखाली दाबलेले दिसते असे शिल्प मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने नजरेस पडते काही ठिकाणची शिल्प आता नष्ट झालेले आहेत . रामायण ,महाभारत  मधील प्रसंगाचे शिल्प देखील या मंदिरावर दिसून येतात . यक्ष , यक्षी,श्री गणेश , श्री विष्णू अवतार, भैरव , गंधर्व तथा सुरसुंदरीचे अनेक शिल्प मंदिरावर आहेत . मुख्य शिव मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की हे संपूर्ण मंदिर एका हत्ती पट्टीकेवर उभे आहे जणूकाही या हत्तीच्या समूहाने आपल्या पाठीवर या मंदिराचे ओझे तोलून धरले आहे असे दिसते . मराठवाड्यातील पितळखोरा लेणी समूहात देखील मुख्य लेणे हे भव्य दिव्य हत्तीच्या पाठीवर उभी आहे असे  असल्याचे त्या लेणीमध्ये दिसते . मुख्य सभामंडपात भार तोडूल धरलेल्या खांबावर अनेक सुंदर शिल्प आहेत ही शिल्प देखील आन्वा येथील शिव मंदिराच्या खांबावर असलेल्या शिल्पा सारखेच आहेत . खांबाच्या पायथ्याशी देवतांची शिल्पे अंकित आहेत . सभा मंडपात संपूर्ण शिल्पाचे बारीक निरीक्षण केल्यानंतर त्याकाळच्या कला संस्कृतीचे दर्शन या सभा मंडपात घडते येथे देव कोष्टके देखील आहेत . एका ठिकाणी गणेश व त्याच्या बाजूने दोन सेवेकरी असून त्याखाली कीर्तीमुख आहे . सभा मंडपात जमिनीवर कासवाचे शिल्प आहे त्याच्यासमोर अंतराळ आहे अंतराळात दोन्ही बाजूंनी आता रिकामे असलेले देवकोष्टके आहेत .  अंतराळात असलेल्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील सुंदर अशी शिल्पांची रचना करण्यात आलेली आहे . या ठिकाणी देखील द्वारपालांचा समूह दिसून येतो. या उंबरठ्यावर नृत्य व वादकांचे शिल्प आहेत  अंतराळातील छत हे नंदीमंडप  व सभामंडपा प्रमाणेच सुंदर अशा दगडी गोलाकार झुंबराने सजविले  आहे .द्वारातून पुढे आपण गाभाऱ्यात पोहोचतो गाभाऱ्यात श्री गोदेश्वराचे शिवलिंगाचे दर्शन घडते .

      या मंदिराच्या नंदी मंडप असो की सभामंडप त्याचबरोबर मुख्य गाभाऱ्याचे शिखर हे अत्यंत सुंदर अशा कला कृतीने दगडी शिल्पामध्ये कोरलेले आहे . मंदिराची खरी ओळख या मंदिराचे हे उंच शिखर आहेत गाभाऱ्यावरील नक्षीकाम हे शिखरी शिखरांचा समूह असे दिसते सर्वात वर आमलक आहे त्या वरील असलेला कळस आता तुटलेला दिसतो . मंदिराच्या उत्तर बाजूस मकरमुखातून श्री गोंदेश्वरावर झालेल्या जलाभिषेकाचे तीर्थ बाहेर येते मकर मुखावर सुंदर नक्षीकाम केलेले असून त्यावर श्रीविष्णूचे शिल्प कोरलेले असून त्यावर एक देव कोष्टक आहे .

        शिवपंचायतन स्वरूप असलेल्या सिन्नरचा श्रीगोंदेश्वर याच्या चार उपदिशेस  चौथऱ्यावरच आणखी चार मंदिरांचा समूह आहे . यामध्ये ईशान्येस सूर्य मंदिर , आग्नेय दिशेस श्रीविष्णू मंदिर ही समोरील बाजूस असून मध्ये नंदिमंडप व समोरच मुख्य शिव मंदिराचे प्रवेशद्वार ही रचना खूप सुंदर आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या पाठीमागील बाजूस म्हणजे नैऋत्य दिशेस श्री गणेशाचे वायव्य दिशेस देवीचे मंदिर आहे . संपूर्ण मंदिर समूह व त्यावरील शिल्पकाम समजून घेण्यासाठी एक दिवसही अपूर्ण पडतो प्रस्तुत लेखांमध्ये केवळ ही वर-वरची माहिती आहे .प्रत्येक शिल्पा मागे एक भाव दडलेला आहे त्या पाठीमागे असलेले तत्वज्ञानही आहे . मंदिर परिसरातील असलेल्या वास्तू वरून असे दिसते की या ठिकाणी आणखीही छोटे-मोठे सुंदर इमारतींचे समूह असावे परंतु काळाच्या ओघात ते आता नष्ट झालेले दिसून येतात . परिसरात तुटलेले नंदी शिल्पासह इतरही अवशेष दिसून येतात . अश्या अलौकिक शिव मंदिरास आपण जरूर भेट द्यावी .


संजय खांडवे

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०२५

 



हरिश्चंद्र पर्वतावरील - श्री हरिश्चंद्रेश्वर

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान : ता . अकोले जि . अहिल्यादेवी नगर , संगमनेर - अकोले - राजुरवरुन पुढे २७ कि.मी.

➖➖➖➖➖➖➖➖

अनेक पुराण ग्रंथामध्ये सह्याद्री मधील हरिश्चंद्र पर्वताचा उल्लेख आढळतो . मत्स्यपुराणात तर पुण्यक्षेत्र म्हणून हा पर्वत मानला गेला आहे . कळसुबाई - साल्हेर - महाबळेश्वर नंतर हरिश्चंद्रपर्वताचा महाभूमितील सर्वोच्च गिरिशिखरात क्रम लागतो . तारामती - रोहिदास व बालेकिल्ला ही या पर्वताची उंच शिखरे गगणभेदी आहेत . या पर्वतावर असलेले  हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन शिव मंदिर ही या पर्वताची ओळख आहे .निर्सगाचं अप्रतिम सौदर्य लाभलेल्या या ठिकाणास हरिश्चंद्रगड या नावाने या  नावाने ओळखले जाते . रोज हजारो पर्यटक या स्थळास भेट देतांना दिसून येतात . हरिश्चंद्रगड अभयारण्य  परिसरात येणाऱ्या या महाकाय पर्वतावर हरिश्चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी पोहचण्यासाठी सहा वाटा आहेत . राजूर या गावातून २७ कि.मी डोंगर रांगा ओलांडत घनदाट जंगलातून पाचनई या पायथ्याच्या गावात पोहचता येते .या गावात मुक्कामास देखील राहता येते . येथून चढाईस सुरुवात होते दाट जंगलातून चढाई करत कड्या कपाऱ्यातून निर्सगाचा मनमुराद आस्वाद घेत दोन अडीच तासात गड सर करता येतो . चढाई फारशी अवघड नाही पण सराव आवश्यक आहे व बहुतेक ठिकाणी काळजी घेत जावे लागते . छोटे मोठे धबधबे हे सतत स्वागतासाठी वाटेत जागोजागी हजर असतात . डोंगर माथ्यावर पोहचताच एका पराड्यात हरिश्चंद्रेश्वराच्या कळसाचे दर्शन होते .एवढा प्रचंड डोंगर चढूनही पुढे  तारामती शिखराचे महाकायरुप दर्शन देते . त्याच्या पायथ्याशी स्थानिकांच्या पर्यटकांच्या सोईसाठी छोट्या घरघुती हॉटेल आहेत . येथून मंदिराकडे चालत जात असताना प्रत्येक जण चौफेर दिसणारा निसर्ग न्याहाळतच मंदिरात जवळ येऊन पोहोचतो . सुरुवातीस कातळात कोरलेल्या काही पाण्याची टाकी निदर्शनास येतात त्याच्या समोरच निळ्याशार पाण्याने भरलेली चौरसाकृती सप्ततीर्थ पुष्कर्णी दिसते . याचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की ही पूर्वी पूर्णपणे भिंतीने बंदिस्त होती . दोन ठिकाणी उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत व तारामती शिखराच्या बाजूने 14 देव कोष्टके आहेत या देवकोष्टकामध्ये बघितल्यास मूर्ती ठेवण्यासाठी ची दगडांमधे खाच या ठिकाणी करण्यात आलेली आहे बहुतेक कोष्टकामध्ये मूर्ती आता शिल्लक नाहीत व पाठीमागेच तारामती शिखरातून उगम पावणारी मंगल गंगा वाहत येते . परिसरात छोटी उध्वस्त मंदिर समुह दिसून येतात . काताळात खोल पाण्याची टाकी खोदलेली आहेत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत . तेथून समोर गेल्यावर आपण हरिश्चंद्रेश्वराच्या गोपुरा समोर पोहचतो . पाठीमागे देखील दोन छोटी दगडी मंदिर आहे परिसरात अनेक मूर्तिशिल्पे दिसून येतात . हरिश्चद्रेश्वराचे मंदिर या खोल घळीत आहे . हजारो वर्षा पूर्वीच्या दगडी पुला खालून मंगळगंगा केदारेश्वर गुफेकडे वाहत जाते . बाहेर दोन किर्तिमुखे आहेत व देवनागरी लिपि मधील शिलालेख दिसून येतो आत देखील मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या लेणीच्या दर्शनी खांबावर शिलालेख आहे . याच खांबावर डावी कडील बाजूस देखील एक शिलालेख आहे .संपूर्ण मंदिरास पूर्वी चारही बाजूने सुरक्षात्मक योजना होती समोरून दरवाज्यातून खाली उतरल्यावर डाव्या बाजूस श्री विष्णू मंदिर व पाठीमागे जमीनीत पाण्याची टाकी व त्यावर लेणी समूह आहे . या टाक्यामधील पाणी अत्यंत थंड व पिण्यायोग्य आहे . ११ व्या १२ व्या शतकात या मंदिराचे निर्माण कलचुरी घराण्याच्या काळात झाले असावे असे जाणकारांचे मत आहे . सर्वतोवज्ञ या प्रकारात येणाऱ्या मंदिरास चारही बाजूने दरवाजे असतात . या मंदिरास समोरा -समोर दोन दरवाजे व मधे शिवलिंग आहे . इतर दोन बाजूस दगडी लाकडी दरवाज्या सारखी भासणारी  दरवाज्यांची अप्रतिम प्रतिकृती दिसून येते . मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर द्वारपालाचे शिल्प आहे . चारही बाजूने कोनाड्यात हत्ती व माहुताचे उठावदार शिल्प असूून एका ठिकाणी माहूतास सोंडेत पकडल्या सारखे दिसते . अनेक यक्ष, गंधर्व शिल्प मंदिरावर आहेत . डाव्या बाजूस एक छोटे मंदिर व त्या बाजूस सुंदर गणेशाची मूर्ती आहे पूर्वी यास दगडी मंडप होता आता केवळ नक्षीयुक्त खांब उभे आहे . गाभाऱ्याच्या मागच्या दरवाज्यासमोर सुंदर नक्षी युक्त खांब व दोन्ही बाजूस ७ फुट उंच स्वतंत्र दगडात कोरलेल्या मुर्ती असून लागुनच लेणी आहे व त्या कमानीत नंदी शिल्प आहे . या गुफे मधे राहून संत ज्ञानेश्वरांचे बंधू योगीराज वटेश्वर चांगदेव यांनी तपश्चर्या केली . येथेच त्यांनी "तत्वसार" या महाकाव्याची रचना केली . त्यांचे शिलालेखही याची साक्ष देतात . या काव्यात ते म्हणतात

 *हरिश्चंद्र नामु पर्वतु तेथ महादेओ भक्तु, सुर सिद्धगणी विख्यातु सेविजे जो, हरिश्चंद्र देवता मंगळ गंगा सरित सर्व तीर्थ पुरविता सप्तस्नान.*

मंदिरा मागे असलेल्या गुफा , पाण्याची टाकी व पुष्करणी मधील दगड या मंदिरा साठी वापरलेले आहेत . द्रविडी शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो १६ मीटर पर्यन्त उंच गालाऱ्यावरील मंदिर शिखर व त्यावर दगडी आमलक व आता स्थापीत असलेला धातु कलश आहे .

     येथून खाली वाहत जाणारी मंगळगंगेच्या सुंदर धबधब्याच्या बाजूला केदारेश्वर गुफा मंदिर आहे या केदारेश्वर गुफेला सुंदर अशा पाच सुंदर नक्षी युक्त कमानी आहे आत शिरताच भव्य असे पाच मीटर उंचीचे शिवलिंग नजरेस पडते या शिवलिंगाला चार स्तंभ दिसून येतात त्यापैकी तीन स्तंभ आता तुटलेले आहेत एका स्तंभावर जणू काहीही गुफा उभी आहे असे जाणवते प्रशस्त अशा गुफेमध्ये असलेले पाणी अत्यंत थंड असून या पाण्यात उतरल्यानंतर  पुन्हा वर येतो तेव्हा पाय सुन्न होतात . डाव्या बाजूला भिंतीवरती शिवपार्वतीचे शिल्प कोरलेले आहे . गुफे समोरून वाहत जाणारी मंगळ गंगा पुढे पाचनई गावातून जाते . या ठिकाणी पर्यटन करतांना काळजी घ्यावी स्थानिकांची मदत घ्यावी व हे करत असतांना निर्सगाच पावित्र्य जपावे .भगवान शिव कि जे आदिनाथ आहेत , आदय गुरु आहेत . कल्याणकारी तथा ज्ञान - भक्ती - वैराग्य हे सार त्यांच्यात सामावलेले आहे. मानवी जीवनास योग व अध्यात्माची प्रेरणा शरणागतवत्सल , त्रिगुणातीत, जितेंद्रिया कडून मिळत राहते त्या दयासिंधू चरणी नतमस्तक होण्यास हरिश्चंद्रगडा शिवाय दुसरी कुठे जागा असेल असे मला तरी वाटत नाही .




संजय खांडवे

सोमवार, २१ जुलै, २०२५

पातुर येथील नानासाहेबांचा वाडा



पातुर येथील नानासाहेबांचा वाडा

➖➖➖➖➖➖

स्थान : ता पातुर जि अकोला , अकोल्यापासून ३३  कि .मी , खामगावपासून ६९ कि .मी .

➖➖➖➖➖➖➖

पाणिनीच्या अष्टाधायी नुसार वास्तु हा ' वस' या धातू पासून आला आहे . वसन्ति यत्र मानवा: अश्या अर्थाने देखिल वास्तु हा शब्द  वापरला जातो . अगदी झोपडी पासून सदन , भवन, वाडा , हवेली,महल, प्रासाद , राजमहल ही मानवी अधिवासाच्या वास्तु आहेत . यामध्ये  महल हा अरबी शब्द आहे . हवेली हा फार्शी मधून आलेला शद्ब आहे या दोन्हीचा अर्थ मंदिर , वाडा अथवा सुशोभित , सुरक्षेसह सर्व सुख सोईने युक्त अशी त्या स्थानिक परिसरातील महत्वाच्या कुंटुंबाचा वंश परंपरेनुसार चालत असलेला अधिवास असतो . ग्रीक व रोमन संस्कृतीत मधे उघडा चौक  ठेवून प्रासाद व चारही बाजूने इमारतीची रचना ठेवण्याची पद्धत होती हवा खेळती राहणे व सुरक्षा हा त्या मागचा उद्देश राहत असे .

      नैसगिक गुहा ,वर्षावास, मानव निर्मित शैलगृहे , लेणी , गड दुर्ग, मंदिरे  या क्रमाने मानवी अधिवासाचा प्रवास स्थानिक परिस्थिती नुसार राहीलेला दिसून येतो . मध्ययुगीन कालखंडात हवेली , महल, वाडा या सारख्या वास्तु मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या त्या काळच्या सामाजिक , राजकीय परिस्थिती नुसार राजे , अमात्य, 'सरदार , जहागीरदार , मामलेदार आदि महत्वाचा लोकांनी याचे निर्माण केले . एखादा सरदार मोहीमेवर जातांना घरातील कुटुबियांच्या सुरक्षेसाठी वाडा , गढी यासारख्या मजबुत तटबंदी , बुरूज व दरवाज्यासह सज्ज असलेल्या वाडयात वास्तव्य करत असत . वेळ प्रसंगी त्या ठिकाणाहून बाहेर पडण्यासाठी भुयारी मार्ग देखील अनेक वाड्या मधून काढलेले असत . घडीव दगड , विटा , जुना, माती तथा सागवानी लाकडांचा कलात्मक पद्धतीने वापर करून वाडे बनविले जात असत . महाराष्ट्रातील सर्वच भागात असे वाडे आजही बघायला मिळतात .राजस्थान , मध्यप्रदेश , गुजरात मध्ये राजघराण्यांचे मोठे सुसज्ज तथा शिल्पकलेचा अप्रतीम संगमातून महल तथा राजवाडे आजही चांगल्या स्थितीत आहेत . इंदौरचा होळकरांचा वाडा त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्रातही चांदवड येथील भव्यदिव्य वास्तु मन प्रसन्न करते.येवल्यामधील दगडी वाडे , सासवड तथा पुणे परिसरात ही अश्या सुंदर वास्तु आहेत . पैठण , परभणी, जालना , पंढरपूर , सोलापूर, सातारा, सांगली या भागातही भ्रमंती करतांना अश्या अनेक वास्तु आहेत बहतेक वाड्यामधे वंशपरंपरेने वास्तव्य देखील सुरु आहे . व्यक्ती अथवा घराण्याच्या नावाने वाड्यांची ओळख दिली जाते .

        अशीच एक सुंदर वास्तु आकाराने जरी मोठ मोठ्या वाड्या पेक्षा लहान असली तरी वास्तुशास्त्राचे सुंदर रूप वऱ्हाड प्रांतात बघायला मिळाले .पातुर येथील प्राचीन लेणी समूहाला भेट देण्यासाठी गेलो असता  बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले  प्राचीन शहर आहे या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे असे पातुर शहर की ज्याला  सुवर्णनगरीदेखील म्हणतात .याच पातुरला नानासाहेबांचे पातुर असेही ओळखतात . लेणीच्या समोरच उंच टेकडीवर रेणुका आईचे ठाणे आहे . या ठिकाणी आईचा मोठा उत्सव असतो . त्याच्याच पाठीमागे नानासाहेबांचा प्राचीन वाडा आहे . वास्तुकलेचा हा अप्रतीम नमुना आहे .वीटा,दगड,चुना व माती मध्ये  बांधकामशैली असलेले हे ठिकाण आहे .टेकडीवरील प्रसिध्द रेणूका देवीच्या मंदीराजवळून हा वाडा प्रतिकृती रुपाने अगदी सुंदर दिसतो  .आता नवीन बाळापूर वरून नांदेडकडे जाणाऱ्या बायपास ला लागूनच हा वाडा आहे .

    वाड्याचे मुख्य द्वार पूर्वेला आहे मजबूत लाकडात हे बनविले गेले आहे .त्यावर नगारखाना आहे .सपूर्ण वाडा हा बंदीस्त असून , त्या बंदिस्त तरबंदी वर ऐसपैस जागा आहे व त्या खाली सुंदर विटांचे छत कमानी सह आहे . वर जाण्या साठी पायऱ्या आहेत .चार कोपऱ्यावर चार मजबूत बुरुज आहे .वाडयाच्या मध्यभागी मंदीर आहे व गाभाऱ्यात नानासाहेबांची समाधी आहे .नानासाहेब हे पातुर येथील श्रद्धास्थान (संत विभूती)मानले  जातात त्यांची समाधी म्हणजे हा मंदीर स्वरूपाचा वाडा आहे त्याला स्थानिक लोक नानासाहेबाचे मंदीर किंवा नानासाहेबांचा वाडा असेही म्हणतात . स्थानिकाच्या माहीतीनुसार या ठिकाणी  मोठी यात्रा  भरायची ती यात्रा एक महीना चालायची बाहेर सभामंडप आहे त्यात बांधकामाच्या सुंदर नक्षिकामासह कमानी आहेत .मंदीराला देवळ्या असून त्यात आता तुटलेल्या अवस्थेतील मूर्ति आहेत्त .सभामंडपातच गोड पाणी असलेली बंदीस्त विहीर आहे.मंदिराच्या बाजूला मुकुंदराज महाराजांची समाधी सांगितली जाते .त्या पाठीमागे त्यांच्या शिष्याच्या आनखी दोन समाधी आहेत त्यावर एक दगडात कोरीव नक्षीकाम केलेली अंबारीसह अशी सुंदर हत्तीची मूर्ती आहे .ही मुर्ती शिल्प कलेच अप्रतीम उदाहरण आहे .

संपूर्ण वाड्याला मजबूत कोट आहे .या कोटात कमानीसह बांधकाम करुन त्यावर वीटाचेंच छत असलेले निवासादी साठी तयार केलेले दिसतात .एकाच वेळी शेकडो व्यक्ती सुरक्षितपणे राहतील अशी व्यवस्था या वाड्याचा बांधकाम रचनेनुसार आहे .कमानीच्या खोलीमधून अरुंद असा जीना वर कोटावरील छतावर घेऊन जातो .या छतावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते .याच इमारतीचा तळघरही असल्याचे दिसते पण त्याचा रस्ता बंद आहे .मंदिरासमोर तीन एकत्र स्वरूपाच्या दिपमाळा आहे .या वाडयात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पूर्वी झालेले आहे.नानासाहेबांचे पातुर अशी या शहराची ओळखच आहे .या वाटेवरून जात असतांना  अवश्य बघावा असा हा वाडा आहे. अश्या वास्तुंचे जतन व संवर्धन झाले पाहीजे .


संजय खांडवे

मंगळवार, १५ जुलै, २०२५

लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहिर

 


लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहिर

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - पांढरेपाणी , ता . शाहूवाडी , जि . कोल्हापूर


पाणी.......!! हा जगभरातील प्राचीन संस्कृतीच्या भरभराटी मधील मुख्य गाभा आहे . यामुळे हजारो वर्षापूर्वीच्या अनेक ज्ञात - अज्ञात संस्कृती या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाल्या . सुपीक जमीन , दळणवळण आदि बाबी हया नदीच्या परिसरात मानवी जीवन अधिक सुखकर बनवितात व यापुढे जाऊन व्यापार वाढतो संस्कृतीचे देवान घेवान होऊन कला , साहित्य , स्थापत्य याचा विकास होत जातो . मेसोपोटामिया  सभ्यता ही नील नदीच्या कुशीत वाढली . सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अश्या सिंधू संस्कृती जन्मास आली . पीली नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृती वाढली असे जगभरात अनेक सभ्यता सांगता येतील त्याचा मूळ आधार पाणी हाच राहीला आहे . भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळापासून असलेले अवशेष आजही सापडतात . भिमबेटका हे ठिकाण त्याच परिसरात येते . माणूस भटक्या अवस्थेत होता तेव्हाचे अवशेष आजही तेथे चित्ररूपाने कायम आहेत . गंगा , ब्रम्हपुत्रा आदि नदयांच्या खोऱ्यातही हजारो वर्षापासून असेच होते . नदीच्या प्रलयात अनेक अज्ञात अवशेष हजारो वर्षापासून जमीनीत गडप झालेले आहेत. सिंधु नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो ' हडप्पा या ठिकाणी उत्खलनात प्राचीन शहरे वर आली . त्यांची त्या काळची नगर रचना , पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था ही आजही आदर्श मानली जाते . २९ x २३ फुट असलेले पाण्याचे कुंड हा त्या ठिकाणचा पाण्याचा पाणवठा हा विशेष आहे . ४०० वर्षापूर्वी दक्षिणेचे प्रवेशद्वारा असलेल्या बऱ्हाणपूर या शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी कुण्डी भंडारा हया वास्तुचे निर्माण झाले .

*रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून*

*पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।*

                                पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.

        सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या. आजही ती योजना बऱ्याच अंशी कार्यान्वित आहे . पूर्वीचे औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेली पवनचक्की व या शहरातून काढलेल्या जमिनीतून भूमिगत असलेल्या प्राचीन पाण्याच्या नहरी हे त्याकाळच्या प्रगत व्यवस्थेचे उदाहरण म्हणावे लागेल . कन्नड तालुक्यातील पितळखोरा या लेणीमध्ये देखील डोंगर उतारावरून वाहत आलेले पाणी एकत्रित करून त्याचा वापर कसा करावा याचे वास्तुशिल्प आजही त्या ठिकाणी जिवंत आहे . 

         जागतिक दर्जाचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी असलेले गोमुखातून पडणारे पाणी हा देखील त्या काळातील वास्तुशिल्पाचा तसेच प्रगत जल व्यवस्थापनाचा अद्भुत नमुना आहे असे लहान मोठे अनेक गोमुख रचना असलेले पाण्याचे स्त्रोत महाराष्ट्रात आहेत . याची भूमिगत रचना अजूनही आपच्या स्थापत्यशास्त्रास पूर्णपणे समजू शकली नाही .

          शिवजन्म पूर्व काळ आणि शिव जन्मानंतरच्या काळातही महाराष्ट्रात पाणी या स्त्रोतासाठी फार महत्त्व दिले गेले . गडकोटावर गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारे पाणी असो किंवा जनसामान्यांच्या रोज रहाटी साठी लागणारे पाणी असो या दोन्हीचे व्यवस्थापन त्या काळातील जाधव -भोसले वंशियामधील रयत वत्सल लोकांनी केले .

         राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचे जन्मस्थळ असलेले राजे लखोजी राजे जाधव यांच्या सिंदखेडराजात पाणी व्यवस्थापनाचे अनेक उदाहरणे सापडतात त्या ठिकाणी निर्मिलेल्या वास्तु ह्या केवळ राजवंशीयांसाठी नसून त्या जनसामान्यांच्या उपयोगात कशा येतील याची व्यवस्था केलेली दिसते . यामध्ये चांदणी तलाव, सजना बारव, मोती तलाव , पुतळा बारव ही आजही जिवंत अवस्थेतील पाणी व्यवस्थापनाच्या वास्तू जनतेच्या सेवेत दिसून येतात . १६०६ मध्ये मालोजीराजे भोसले यांनी पाणी व्यवस्थापणार्थ शिंगणापुरी तळे बांधिले असा उल्लेख आढळतो . आक्टो . १६५४ मध्ये दक्षिण भारतात मल्लसमुद्र शिलेवर मोजे . मुंदुवाडी ता . कोलार येथे संभाजीराजे यांच्या प्रतिनिधिने तलाव बांधण्यासाठी जमीन दिल्याचा उल्लेख येतो. स्वराज्यात 350 च्या वर गडकोट किल्ले होते त्यापैकी अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले व अनेक किल्ल्यांचा डागडुगी करून ते अधिक बळकट करण्याचे काम महाराजांनी केले . गड किल्ल्यावर पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे शिवकालीन पाणीसाठवण योजना ही अत्यंत काटेकोरपणे पाळली जायची . दुर्ग दुर्गेश्वर रायगड आपण जर बघितला तर यावर गंगासागर तलाव, हत्ती तलाव ,कोळींबतलाव, त्याचबरोबर कुशावर्त तलाव यासह बारा टाकी समूहासारखी अनेक प्राचीन पाण्याची स्त्रोत रायगडावर आहेत . अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही रायगडावर पाणी शिल्लक असल्याची दाखले आढळतात . वाघ दरवाज्याच्या बाजूने असलेला कुशावर्त तलाव त्याची भिंत जर आपण बघितली तर त्या भिंतीच्या मधोमध खाली गोमुख बसवलेले आहे . ही रचना अजूनही आपल्या विचार कक्षेच्या पलीकडची आहे .एखाद्या गावात जर थांबले तर पाणवठ्या वरचे पाणी गरजे पेक्षा जास्त घेऊ नका... वापरू..... नका अशी सक्त ताकिद महाराजांनी आपल्या मावळयांना दिलेली होती .

       रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात सांगितले आहे . "तैसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा . पाणी नाही आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी .गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीही पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानिता उद्योग करावा . कीनिमित्त की, जुझामध्ये भांडियाचे आवाजा खाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो , तेव्हा संकट पडते . याकरिता तैसे जागा जकिरियाचे पाणी म्हणोन ,दोन-चार तळी टाकी बांधोन ठेवून त्यातील पाणी खर्च होऊ द्यावे . गडाचे पाणी बहुत जतन राखावे . " एवढे सूक्ष्म नियोजन शिवरायांचे होते महाराज जलतज्ञ होते त्यांना भूगर्भाचाही तेवढाच अभ्यास होता . भूगर्भानुसार कोणत्या ठिकाणी कोणती पाण्याची योजना राबवावी हे त्यांना ज्ञात होते .

         रयतेच्या कल्याणार्थ झटणाऱ्या छत्रपतींना राज्य व्यवस्था सांभाळतांना युद्धादि धामधुमितही रयतेच्या प्रश्नाची जाण होती . याची प्रचीती पावनखिंड जवळच असलेल्या पांढररेपाणी  गावात असलेल्या एका छोटयाश्या विहिरीवरून येते . पन्हाळयाच्या वेढ्यातून रात्रीच्या प्रहरी बाहेर पडून मसाई पठार - धनगरवाडी या मार्गाने महाराज सकाळी तांबड फुटतांना या गावात पोहचले होते . येथून चार-पाच किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे त्या पावनखिंडीतच स्वराज्याच्या मावळ्यांनी  स्वामीनिष्ठतेची कसोटी दिली आणि स्वराज्यासाठी महान बलिदान देवून महाराजांना सुखरूप विशालगडी पाठवले . पांढरपाणी गावात पावनखिंडीकडे जात असताना गावातुन उजव्या बाजूला शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर असा फलक दिसतो. तेथून थोडं खाली गेल्यानंतर ती विहीर दिसते विहीर अगदी छोटी आहे परंतु दगडाने मजबूत अशी बांधलेली ही विहीर पाणी घेण्यासाठी खाली उतरण्यास गोलाकार पायऱ्या सुद्धा आहेत . आजही त्या विहिरीचे स्वच्छ सुंदर निर्मळ पाणी महाराजांचे आठवण करून देते . स्थानिकांनुसार अशी आख्यायिका सांगितली जाते की महाराज एकदा विशाल गडी जात असताना या गावात थांबले असता एका वृद्ध महिलेने महाराजास भाकरी खाण्यास दिली त्यावेळेस महाराजांनी त्या वृद्ध महिलेस काय पाहिजे आहे हे विचारले असता तिने सांगितले की ,महाराज उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई आहे म्हणून पाण्याची  काही तरी व्यवस्था करावी  .महाराजांनी विशालगड घेतल्यानंतर त्या ठिकाणी ही विहीर बांधून दिली असे सांगितले जाते . स्वराज्यातील लेखी बाळींना पाण्यासाठी वन वन करायला लागू नये म्हणून महाराजांनी स्वतः ही विहीर बांधून दिली आणि या भागातील ले की बाळींचा पाण्याचा प्रश्न सोडवला  . पावनखिंड मोहिमेवर जाणाऱ्या प्रत्येक मावळ्याने या विहिरीस जरूर भेट द्यावी आणि महाराजांच्या जनसामान्यांसाठी असलेल्या पाणी व्यवस्थापनाचे हे वैश्विक स्थापत्य सर्वांना ज्ञात करून आपले राजे हे रयतेच्या अगदी शेवटच्या घटकाचाही विचार किती सूक्ष्म पद्धतीने करायचं हे दाखवून द्यावे .



संजय खांडवे

मंगळवार, ८ जुलै, २०२५

बुधभूषणकार शंभूछत्रपतींचे दुर्ग निरुपण ➖➖➖➖➖➖➖➖➖

 


बुधभूषणकार शंभूछत्रपतींचे दुर्ग निरुपण

➖➖➖➖➖➖➖➖➖

सकलशास्त्रकोविद छ्त्रपती संभाजी राजे भोसले यांनी बुधभूषण या संस्कृत ग्रंथांच्या द्वितिय अध्यायात दुर्ग निरूपण आले आहे .

        'दुर्ग 'या शब्दाचा मूळ अर्थच दुर्गम असलेला ,जाण्या येण्यास अत्यंत कठीण,अवघड असा हा दुर्ग असतों दुर्गाला किल्ला असेही म्हटले जाते या सर्व बाबींचे विवेचन संभाजीराजे दुर्गाविषयी देतात .तो कसा असावा ,गडाचा कुठला भाग कोठे असावा याचे शास्त्र शुद्ध विवेचन  छत्रपती शंभू राजांनी केले आहे.


धन्विदुर्गं महीदुर्ग नरदुर्ग तथैव च ।

वार्क्ष चैवाम्बुदुर्गं च गिरिदुर्ग तथैव च ॥


छत्रपती संभाजी राजे आपल्या बुधभूषण या ग्रंथात दुर्ग निरूपण या भागात दुर्गाचे सहा प्रकार सांगतात .

 १)नरदुर्ग

 २)वार्क्षदुर्ग

 ३)धन्विदुर्ग

 ४)अम्बु दुर्ग

 ५)महीदु र्ग

 ६)गिरि दु र्ग

त्याचे विवेचन खालिल प्रमाणे करतात .

  *नरदुर्ग*

हा दुर्ग म्हणजे माणसांनी वेढलेला ,शूरविरांची दुर्गम व्युहरचना केलेला,गूढ भूलभुलैय्या ,चक्रव्युव्हाप्रमाणे एकमार्गी लढवैय्यानी तटासह वेढलेला किल्ला तर्क चतुरंगसैन्याने तयार होतो

*वार्क्षदुर्ग (वनदु र्ग )*

घनदाट जंगलाचे सरक्षण असणारा दुर्ग ,वन ह्या दुर्गाचे सरक्षण करतो .हा गर्द झाडी मध्ये सशस्त्र सैन्याने सज्ज असा किल्ला असत्तो .

 *धन्विदुर्ग*

हा दुर्ग म्हणजे धर्नूधारींनी सुसज्ज असा असतो .हा अनेक प्रकारच्या प्रगट -अप्रगट योध्यानी व्युहरचना केलेला असतो.     

*अब्दुर्ग (जलदुर्ग)*

चारही बाजूने पाण्याने वेढलेला हा दुर्गप्रकार आहे .पाण्यामधील मजबूत खडक असलेल्या बेटावर हा दुर्ग उभारला जातो.शेकडो वर्षापासून अश्या दुर्गाची प्रचंड दगडापासून बनविलेली तटबंदी या दुर्गाचीं वादळ वाऱ्यात ,प्रचंड लाटातही सरक्षण करत असतात .पिण्याच्या गोड्या पाण्यासह लागणाऱ्या इतर सर्व सोयी गडावर आढळतात .जंजीरा ,विजयदुर्ग,खांदेरी,सिधुदुर्ग ही महाराष्ट्रातील जलदुर्ग होय .जंजीरा स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजे यांनी त्याचा बाजूलाच पदम् दुर्गाची निर्मिती केली होती .

*महीदुर्ग*

हा भूईकोट किल्याचा प्रकार आहे.खंदकांनी वेढलेला जमीनीवरील हा भूईकोट किल्ला असतो .बारा हात उंच बुरुज /तटबंदी त्यावर फिरण्यास प्रशस्त फांजी व तटबंदीवरील चर्या किल्ला अजिंक्य बनवतात .चाकण ,अहमदनगर ,सोलापूर येथील किल्ले भूईकोट प्रकारात येतात .

लाल किल्ला याच प्रकारात येतो .किल्याच्या चारही बाजूने खंदक खोदून त्यात सुसर मगरी सोडून त्याला अधिक दुर्गम केले जात असे .नळदुर्ग हा भूईकोट किल्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे .

*गिरिदुर्ग*

या प्रकारात किल्याच्या चारही बाजूने पर्वत ,दरी,कातरकडा असतात .चारही बाजूने दुर्गसरक्षणार्थ तटबंदी व बुरुज असतात .

संभाजी राजे यांनी गिरिदुर्ग हा अत्यंत प्रशंसनिय मानला आहे .गिरिदूर्गाविषयी विवेचन करतांना स्वतंत्र श्लोक बुधभूषण मध्ये आला आहे.


सर्वेषामेव दुर्गाणां गिरिदुर्ग प्रशस्यते ।

दुर्ग च परिखोयेतं वप्राट्टालकसंयुतम ॥


या सहा दुर्गामध्ये गिरिदुर्ग हा प्रशंसनिय व प्रशस्त मानला जातो .दुर्ग हा वप्र आणि अट्टालक यांनी युक्त असावा .असे शंभूराजे म्हणतात  .स्वराज्याची पहीली राजधानी राजगड हा गिरिदुर्गच !

दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगड हा सुद्धा गिरिदूर्ग प्रकारातच येतो .स्वराज्यातील बहुतेक किल्ले हे गिरिदुर्ग प्रकारात येतात .

     असे सहा दुर्गप्रकाराचे विश्लेषण शंभूराजे यांनी केले आहे .महाराष्ट्राचे खरे वैभव या दुर्गातच आहे .हे शंभूनृपाने जाणले होते .

         या व्यतिरिक्त दुर्गाचे त्यांच्या वैशिष्टयावरून इतर प्रकार पडतात .

*मृददुर्ग*

मातीपासून तयार केलेला किल्ला

*अश्मदुर्ग*

निव्वळ दगडापासून तयार केलेला किल्ला.

*इष्टीकादुर्ग*

विटा व चुन्यामध्ये बांधलेला किल्ला.

*मरुदुर्ग*

वाळवंटात बांधलेला किल्ला.

*दारूदुर्ग व मेंढेकोट*

वेळू व लाकडांनी बांधलेला किल्ला .

*नृदुर्ग*

हत्ती,घोडे,रथ,पायदळ असे चतुरंग सेनेचे सरक्षण असलेला किल्ला.

असे इतरही प्राचीन ग्रंथात दुर्गाविषयी नोंदी आहेत . शंभूराजानी दुर्गावरील प्रत्येक भागाचे महत्व व उपयोगीतेचे विवेचन केले आहे शिवाय गडाचे प्रत्येक भाग व त्याचे महत्व संभाजी राजेंनी केले आहे.त्यांनी मांडलेले बारकावे हे आजच्या हजारो अभियंत्यानी व शास्त्रज्ञानी एकत्रीत येऊन मांडणी करता येणार नाही ती केवळ एकटया शंभूराजेंनी केलेली दिसते. यामध्ये या दुर्ग निरुपमातील प्रत्येक श्लोकातील शब्द अन शब्द बरेच काही सांगून जातो . एका झुंजार योध्यातील अपूर्व वास्तुविशारदता की जी शास्त्राच्या कसोटीवर टिकते ,यातील बारकावे हे सटीकतेने अभेद्यता वाढवितांना दिसतात .एक दुर्ग आपल्या राज्यासाठी कश्या पद्धतीने सज्ज असावा याचे भाष्य करताना संभाजीराजे पुढे म्हणतात -

         दुर्गावर एकाच वेळी १०० च्या वर लोकांचा नाश करणारी  यंत्रे दुर्गावर असावी शेकडो यंत्रानी तो दुर्ग सगळीकडून सज्ज असावा .राजाने या किल्याच्या मधोमध संपूर्ण साधनांनी युक्त असा ,सर्व बाजूनी काळजीपूर्वक विचार करुन विविध आयुधे,सुरक्षितते साठी गुप्त असा ,सर्व ॠतुमध्ये फळे ,फुले ,वृक्ष व जल देणारा शुभ्र असा राजवाडा तयार करावा.असा राजवाडा हा किती सुरक्षित असेल याची आपण कल्पना करू शकतो .अश्या देश कोश आदि सर्व साधने व वस्तु याच्या योगाने सुरक्षित झालेल्या उत्तम,स्वच्छ ,निर्मल,शुभ्र गुणांनी युक्त अर्थात पवित्र नगरात ,राजकीय चिन्हे संपन्न अश्या राजमंदिरात राजाने वास करावा.

       दुर्गामध्ये लांबलचक आयाताकार रांगा तयार कराव्यात .त्यापैकी एका पत्किंच्या टोकास चौथऱ्यावर प्रार्थनास्थळ असावे .दुसऱ्या रांगेच्या चौथऱ्यावर राजाचे राहण्याचे ठिकाण निर्माण करावे .तिसऱ्या चौथऱ्यावर धर्माध्यक्षाचे स्थान असावे .चौथ्या चौथऱ्यावर अग्रभागी गोपुरांची रचना करावी .अश्या स्वरूपाची चौरस, आयताकृती किंवा गोलाकार अशी तीन प्रकारची नगरचना करून घ्यावी असे संभाजी राजे सांगतात .

*अर्धचंद्रप्रकारं च वज्रकारं च कारयेत्*


शेवटी त्रिकोन यामधे याप्रमाने अर्धचंद्राकार किंवा वज्र आकाराची रचना करावी .

       राजवाडयाच्या दक्षिण दिशेला कोशागार करणे योग्य आहे व त्या कोशागाराच्या दक्षिण भागात गजशाळा म्हणजे हत्तीशाळा असावी .धनरक्षणाची ही रीत प्रशंसनिय आहे .अशी रचना ही संभाजी राजे यांच्या दुरदृष्टी व वास्तु विशारद असल्याचाच भाग म्हणावा लागेल .

       दुर्गावरील यज्ञशाळेचे मुख हे गजशाळेच्या पूर्वेस किंवा उत्तरेस करावे .दक्षिणपूर्वमध्य म्हणजे आग्नेय दिशेला आयुधागार बनविणे योग्य आणि तेथेच शेजारी रथ,शकटशास्त्र,धर्मज्ञ व दुसऱ्या कर्मशाळा असाव्यात .थोडक्यात या दिशेला सर्व औद्योगिक विभाग असावा .पुरोहीताचे घर राजवाड्याच्या डाव्या बाजूला करावे त्या भागात मंत्री ,ज्योतिषशास्त्र वेत्ता आणि राजवैदयाचे निवासस्थान असावे .महाभागांची निवासस्थानेही तयार करावीत .गाईचे गोठे,द्योडयाच्या पागा तयार कराव्यात .अश्वशाळा उत्तराभिमुखी असावी .राजाने अश्व रात्रभर नजरेखाली ठेवावेत व त्या अश्व शाळेत कोंबडे ,वानर,ठेवावीत .

गाई,हत्ती,घोडे इ.च्या मलाचे उत्सर्जन,देवदैवादिक कृत्ये सूर्य मावळल्यानंतर  करू नये असे संकेत दुर्ग निरूपणात संभाजी राजे देतात .

    योद्धे,शिल्पशास्त्रज्ञ अशा सर्वांना उत्तर घरे द्यावीत आणि मंत्रविदयाजाणकार व ज्योतिषांना तसेच घरे द्यावी .किल्यामधे मोठमोठे रोग उद्भवतात .राजाने गाई ,घोडे,हत्ती यांच्या रोगाचे निदान करण्यासाठी व रोगस्वरूप त्यांचे परिणाम यांचा सर्व अंदाज व्यक्त करून त्यावरील औषधांचे जाणकार वैद्याना किल्यात राहण्यास जागा  द्यावी .कुशल शीलवान ब्राम्हणांना दुर्गामध्ये स्थान असावे पण काही काम नसलेल्यांनी तेथे गर्दी करू नये .असे संभाजी राजे सांगतात .बुधभूषण या ग्रंथाच्या द्वितिय अध्यायातील दुर्ग निरुपणातील या बाबी संभाजीराजे एक कुशल योद्धा,सर्वश्रेष्ठ युवराज,थोर साहित्यीक,विचारवंत,तत्ववेत्ता त्याचबरोबर वास्तुज्ञास्त्र विशारद असल्याचेही स्पष्ट होते .दुर्गशास्त्राचे असलेले ज्ञान व त्यांनी केलेली बुधभूषण मधील दुर्गाविषयीची संपूर्ण मांडणी याचे शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास करून मांडणी केल्यास अधिक स्पष्टता येईल.


संदर्भ


 बुधभूषण

 लेखक - छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले





संजय खांडवे

शुक्रवार, ४ जुलै, २०२५

बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

 



बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

➖➖➖➖➖➖➖

स्थान - ता .मावळ जि . पुणे , पुण्यावरून ६० कि.मी., उंची -३३८९ फुट

➖ .➖➖➖➖➖➖➖

     सहयाद्रीच्या भूगोलात फिरतांना महाभूमिचा प्रेरणादायी अन नवचैत्यन्य निर्माण करणारा इतिहास आपसुखच डोळ्यासमोर उभा राहतो . माय भूमिच्या रंध्रा - रंध्रात त्याग अन संघर्षाच्या आठवणी साठवल्या गेल्या आहेत . प्रत्यक्ष त्या स्थळी गेल्यावर जागृत झाल्या सारख्या वाटतात . जणू त्या घटनेचे आपण कधी काळी साक्षीदारच होतो की काय असा भास होतो . सह्याद्रीच्या मातीतच ही खरी जादू आहे .

          कुरवंडयातील नागफणी टेकडी पासून पवना अन इंद्रायणीच्या साक्षीने लोहगड , तिकोना ( वितंडगड ) , तुंग ( कठीणगड ) , विसापूर सोबतच प्राचीन भाजे , कार्ला , बेंडसे यासारख्या बौद्ध लेणी समुहात लोणावळा परिसराचं निर्सग सौदर्य अत्यंत फुलून जाते . पावसाळ्यात तर हा परिसर पुणे - मुंबईकरांनी हाऊसफुल होतो . या परिसरातील नावाप्रमाणेच अंगीभूत लोहा सारखा प्रचंड कणखर असलेला लोहगड पर्यटकांनी फुलून गेलेला असतो . पुण्यावरून लोणावळा मुंबई महामार्गाने जातांना मळवली पासून डाव्या बाजूस वळावे लागते . पुण्यावरून रेल्वेमार्गाने मळवली स्टेशनवरही उतरता येते . येथून  भांजे लेणी समूहाजवळून रस्ता पुढे अत्यंत चढाई व वळणाचा घाट चढून गायमुखखिंडीतून लोहगडवाडीत पोहचतो. पुण्यावरून देखीत कामशेत- पवनाजलाशयाच्या काठाने येणाऱ्या मार्गाने लोहगडवाडीत पोहचता येते . लोहगडाची दाट जंगलातून संपूर्ण परिक्रमा साहसी व प्रशिक्षित गिर्यारोहक करतात त्यांना या परिक्रमेत लोहगडच्या कठीण काताळात अनेक लहान गुफे सारखे लेणीसमूह व टाके आढळले आहेत . सामान्य पर्यटकाने हे साहस करू नये .  हजारो वर्षा पूर्वीचे बौध्द -जैन लेणी समूह या परिसरात आहे . लोहगड - विसापूर सारखे दुर्ग हे लष्करी तळा सारखे ज्या - त्या राजवटीच्या काळात सज्ज असल्यासारखे होते व आजही तसेच ताठ मानेने उभे आहेत .

         लोहगडवाडीतून पायरी मार्गाने गड चढाईस सुरुवात होते . दाट झाडी मधून दोन चार वळणे घेत वर गेले की वर प्रचंड मोठ्या बुरुजाचे दर्शन होते . या मधून निमुळती वाट काढत गेले की पहिला दरवाजा लागतो .हा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा , दोन्ही बाजूने गणेशाची मूर्ती शिल्प कोरली आहेत वर सुंदर कमान व तेवढेच आकर्षक नक्षीकाम नगाखाण्यासह दिसून येते . थोडे चालत गेले की समोरच एक तुटतेल्या तोफेसह चार तोफा आहेत व बाजूलाच एक देवनागरी लिपिमधील शिलालेख आहे . बाजूलाच एका बुरुजावर दगडी रेखीव घुमटासह मजबूत अशी खोली आहे यातून खाली नजर ठेवण्यास चऱ्या आहेत निवडक सैनिकासाठी विश्राम व्यवस्था येथे असावी . बाजूला मजबूत अशी तटबंदी आहे .वर नजर फिरवताच एकमेकांच्या सुरक्षेच्या कक्षेत येणाऱ्या बुरजांची रचना दिसून येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गडाच्या नावा प्रमाणे लोह धातू सारखी मजबूत अन रेखीव अशी आजही आहेत . पुढे काही पायऱ्या चढून सैनिकांच्या गस्तीसाठी मोठा मोकळा भाग दिसून येतो . प्रंचड मजबूत तटबंदी अन येथून एक भुयारी मार्ग देखील आहे व बाजूच्या कोपर्यातून एक चोर दरवाजा देखील आहे . ऐसपैस असलेल्या तटबंदीवर महादरवाज्याच्या रक्षणार्थ अर्ध गोलाकार बुरुज अगदी मधोमध वर जाणाऱ्या दगडी पायऱ्या हा येथील स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना आहे . येथून उजव्या बाजूला तटबंदी सह निमुळता मार्ग वर जातो व वळणावर काताळात दोन पाण्याची टाकी आहेत आजही अगरी काचासारखे स्वच्छ पाणी या टाक्यात आहे. पुढे नजरेस पडतो तो नारायण दरवाजा, याच्या दोन्ही बाजूस देवळ्या आहेत . शिवनेरी सारखी दरवाज्यावर दरवाजे व मजबूत तटबंदी अशी रचना या दुर्गाची आहे . सर्वात शेवटी व सर्वात मोठा हनुमान दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो . शेवटी जर शत्रू या दरवाज्या समोर पोहचलाच तर चारही बाजूच्या तटबंदीच्या रचनेत त्याचे लढणे अशक्य आहे . हनुमान दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सरक्षक देवता हनुमंताचे शिल्प आहे . दरवाज्याचे नक्षीकाम अप्रतिम आहे . आत आल्यावर इंग्रजी एल आकारात इमारतीचा भाग आहे .या ठिकाणी गडावर येणारे - जाणारे तथा इतर प्रशासकिय काम चालत असावे . उजव्या बाजूस पुन्हा एक कमान आहे व या कमानीतून वर आल्यावर एक घुमटाकार इमारत आहे . त्याच्या बाजूलाच शिवकालिन सभागृह (सदरेची ) इमारतीचा ओटा आहे त्यावर आता दोन तोफा आहे . संपूर्ण गडाला अगदी तटबंदी वरून फेरा मारता येतो . विसापूर किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास इमारतीचे काही अवशेष दिसून येतात . त्याच्या समोरच काताळात कोरलेली घोड्याची पागा आहे . चारा - पाणी व्यवस्थेसाठी आत छोटे हौद आहेत . या पुढे असे चालत गेले की लक्ष्मी कोठीची गुहा आहे समोर मोठा हॉल व आत तीन ते चार टप्प्यात खोल्या कोरल्या आहेत . एकाच वेळी शंभरच्या जवळपास लोक या गुहेत आसरा घेऊ शकतात . या कोठी वरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी सातवाहन काळापर्यन्त या गडाचा इतिहास पोहचतो . गुप्त, चालुक्य, राष्टकुट, यादव, बहामनी , निजामशाही, आदिलशाही, मोगल, शिवरायांचे स्वराज्य , पेशवाई व इंग्रज या सर्व राजवटीत लोहगडाची लोहाची भूमिका होती . १६४८ च्या आसपास लोहगड महाराजांनी घेतला होता . पुढे राजकिय तडजोडीत पुरंदरच्या तहात २३ किल्ल्यात लोहगड पण होता . १६७० मध्ये पुन्हा महाराजांनी त्याला स्वराज्यात घेतले . कारतलब खान , अमरसिह, रायबाधिन हे स्वराज्यावर चाल करत कोकणाच्या स्वारीवर जातांना याच जंगलातून कुरवंडे गावातून उंबरखिंडीत उतरतांना महाराजांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. १६६४ मध्ये सूरतेची केलेली लुटीतील खजाना नेतोजी पालकरांच्या नेतृत्वात या गडावर याच लक्ष्मी कोठीत ठेवला गेला होता . समोर गेल्यावर गायमुख खिंडीच्या वर एक दर्गा आहे . गडाच्या मध्यभागी उंच माथा आहे याला फेरा मारत निसर्ग निर्मित प्रंचड भिंती सारख्या विंचूकड्याकडे पोहचतो . पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद विंचवाचा सोंडेसारखा गडाच्या उंचीच्या थोडा खाली आहे . या बलदंड विंचूकडयाची साथ सदैव गडास राहीली आहे येथून सर्वदूर नजर ठेवता येते . माचीवर आयाताकृती पाण्याचे टाके आहे . अगदी टोकावर मजबूत चिलखती बुरुज आहे . खाली भुयारी मार्गाने या बुरुजास गोल फेरा मारता येतो . माचीवरून फिरतांना बहुतेक ठिकाणी काळजी घ्यावी लागते . परत हनुमान दरवाज्याच्या दिशेने जातांता काताळात कोरलेते अनेक पाण्याची टाकी आहेत . एका छोट्या टाकीत पिण्यायोग्य अत्यंत गार पाणी आम्हाला पिण्यास मिळाले . १६ कोनी प्रचंड मोठा पाण्याचा दगडी तलाव त्यात उतरण्याचा पायरी मार्ग सोबतच पाणी वर काढणे व सोडण्याची प्राचीन प्रणाली या वास्तुत बघायला मिळते . बाजूलाच वरच्या दिशेने एक छोटे शिवमंदीर आहे व त्याच्या पाठीमागे सुद्धा एक दगडी बांधकाम केलेला पाण्याचा सुंदर तलाव आहे . गडावर पाण्याची व्यवस्था अगदी चांगली असल्याने या गडाची प्राचीन राजकीय कारकिर्द ही महत्वाचीच राहिली आहे . इतर छोटे तलावही आहेत पण आता ते गाळात गाळले गेले आहेत . विविधरंगी रानफुले अन गवतामुळे याचे सौदर्य अधिकच मोहक दिसते . लोहगड  उतरतांना समोर दिसणारा तुंग , तिकोणा अन विसापूर , पवनेचे अप्रतिम निसर्ग सौदर्य आनखी पुढचे मुककाम वाढवा असेच खुणवत असतो .



संजय खांडवे

सोमवार, २३ जून, २०२५

वर्षा पर्यटन करताय ! काळजी घ्या !

 



*वर्षा पर्यटन करताय ! काळजी घ्या !*



आता पावसाळा सुरू झालाय  नदी , नाले, छोटे मोठे धबधबे  त्यातच धरतीमाईने डोंगर - दऱ्या अन पठारावर पांघारलेला हिरवा शालू हा पर्यटकाला निश्चितच आकर्षक बनवितो . महाभूमित वर्षा पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक आप आपल्या सोईने बाहेर पडतात . सोशल मिडियावरही रिल्स , सेल्फीच्या महापूराने सर्वत्र भूरळ घालतात . लोणावळा , भीमाशंकर , जुन्नर परिसर , नाणेघाट , माळशेज घाट , कळसूबाई , भंडारदरा , नाशिक परिसर , हरिशचंद्रगड ,महाबळेश्वर , मावळ , आंबेगाव , खेड , मुळशी, भोर, इंदापूर अशी कितीतरी  पर्यटनक्षेत्र पर्यटकांनी फुलुन जातात .आपण राहतो त्या परिसरात देखील अशी अनेक लहान मोठी पर्यटन स्थळे असतात व त्या ठीकाणी परिसरातील पर्यटक पोहचत असतात . सुटी अन शनिवार - रविवार या काळात तर जत्राच भरते. निर्सग जेवढा आल्हाददायी अन आनंद देणारा आहे तेवढाचं  आपण काळजी घेतली नाही तर वेळ प्रसंगी  रौद्र ठरू शकतो . गेल्या वर्षी भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याचा प्रचंड प्रवाह एकदाच आला त्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही व ही पाचही व्यक्ती दगावली . मागच्या आठवड्यात मावळ मधील कुंडमळा या इंद्रायणी मधील साकवं पूल पर्यटकांच्या गर्दीत तुटला व त्यातही मोठी जीवितहानी झाली . आपल्या परिसरातही पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानी झाल्याचा अनेक बातम्या आपण ऐकतच असतो . हौशी पर्यटक काळ आणि वेळ न बघता बेत आखतात एक - दोन कुंटुब कोणतीही पूर्वतयारी न करता पावसाळी ट्रेक वा पर्यटनास निघतात व अश्या घटना घडतात . प्रशासन याची खबरदारी घेते धोकादायक ठिकाणी तशी फलक योजना देखील असते . अवघड ठिकाणी लोखंडी कठडेही असतात पण अति उत्साही पर्यटक या नियमावली बाहेर जातांना दिसतात . यावर्षी जून च्या पहिल्या आठवडयात हरिशचंद्र गडावर  जातांना पाचनई गावाच्या वर घळई मधील धबधब्या वरील पठारावरील कुंडाजवळ प्रशासनाने सावधानतेचा इशारा फलक लावलेला असतांनाही त्या कुंडात अगदी लहान मुले घेऊन पर्यटक जल विहार करत होते . कोकणकडयावरही मुक्तपणे हजारो फुट खोल दरीत पाय लांबवत सेल्फी अन रिल्स काढत होते .आपल्याकडे सार्वजनिक जीवनात आपत्ती व्यवस्थापनाची जागृती फार कमी असंल्याने असे प्रकार दिसून येतात . रितसर प्रशिक्षण अन साहित्यासह शास्त्रशुद्ध पद्धतीने पर्यटन केल्यास धोका शून्य होतो . पण आजकाल ट्रेकरने एखाद-दुसरा ट्रेक केला की तो आपला हौशी गृप करून ट्रेकिंगला सुरुवात करतो . अज्ञान व अतिसाहसामधे असे स्वताःहून गेलेले हौशी पर्यटक वन्यजीव , रस्ता भटकणे व इतर अपघात  आदिचे बळी ठरतात . मागे पुण्याचे काही मित्र असेच हरिशचंद्र गडावर भटकले अन थंडी, पाऊस अन उपासमारीचे बळी ठरले होते . शेवटी नाईलाजाने प्रशासन अश्या भागात वर्षाऋतु मध्ये बंदी घालावी लागते .१६३ सारखी कलम लागू करावी लागतात तशी परिस्थिती आता मावळ , लोणावळा ,भूशी डॅम , मुळशी या परिसरात  झाल्याची दिसून येते . त्यामुळे पर्यटनात एक आदर्श पर्यटक म्हणून निर्सगाचा मनमुरादआनंद लुटता आला पाहिजे तरच पर्यटनास अर्थ आहे .



*वर्षा पर्यटनात हे करा*


♦️ साहसी ठीकाणी शासनमान्यता प्राप्त संस्था , गृप सोबत पर्यटन करा .

♦️ चांगले ग्रीफ असलेले बुट वापरा . एकदम नवीन बुट घालू नका त्या बुटांचा आठ दहा दिवस सराव असावा .

♦️सर्व अंग झाकले जाईल असे कपडे घाला .

♦️ सेल्फी , रिल्स साठी अतिसाहस टाळा .

♦️ वाहत्या पाण्यात उतरणे टाळा .

♦️ हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा .

♦️ डोंगरावर काळे ढग आल्यावर धबधबे व दरीत थांबू नका .

♦️ स्थानिक किंवा वाटाड्याची मदत घ्या . एकटयाने माहीत नसलेल्या वाटेने जाऊ नका .

♦️ स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा जाण्या अगोदर प्राथमिक अभ्यास ठेवा .

♦️ धबधब्याच्या धारेखाली थांबू नका घरंगळत येणारे दगड  अपघात करु शकतात .

♦️ उंचावर हवेचा जोर व धुक्याचा अंदाज घ्या .

♦️ प्रथमोचार व आवश्यक औषधे सोबत ठेवा .

♦️ सुखा मेवा व इतर फास्ट फुड सोबत असू द्या .

♦️ तोंडाने श्वास टाळा . तहान लागल्यास गटा गटा पाणी पिणे टाळा .

♦️  उंच ठिकाणावर , दरीत शेवाळलेल्या ठिकाणी काळजी घ्या .

♦️ चढ - उतारात काठीचा वापर करा .

♦️ गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका .

♦️ निर्सगात कुठलेही व्यसन करू नका .

♦️ सुगंधी तेल व परफ्युम लावणे टाळा .

मंगळवार, १७ जून, २०२५

निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी ➖➖➖➖➖➖

 



निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी

➖➖➖➖➖➖

स्थान : ता अकोले जि . अहिल्यादेवी नगर 

➖➖➖➖➖➖➖

     आपल्या महाभूमितील उत्तर दक्षिण पसरलेली सह्याद्री पर्वत  रांग ही महाराष्ट्राचा भूगोल आहे पण या महाभूमिच्या भूगोलावरच ज्ञात असलेला हजारो वर्षा पासूनचा अत्यंत समृद्ध व प्रेरणादायी असा इतिहास उभा राहिला आहे. हाच सहयाद्री इतिहासातील अनेक क्रांतीचा क्रांतिकेंद्र ठरलाय .  याच सहयाद्रिच्या कुशीत  जीवनदायी ठरलेल्या अनेक नदयांचा उगम होतो . नानाविध दुर्मिळ व उपयोगी वनस्पतीच्या अभयारण्यात विविध जीव- सजीवांचा अधिवास आहे . पशु -पक्षांचा  संचारही तेवढाच मुक्तपणे आढळून येतो . माणसापासून कोटयावधी जैवविध सजीवांची श्रृखंलाच सहयाद्री च्या कुशीत आपले जीवनचक्र पूर्ण करतांना दिसतात . कोट्यावधी वर्षापूर्वी ज्वाला मुखीच्या उद्रेकातून तप्त लाव्हारसातून दख्खनच्या पठारासह मजबूत बेसॉल्ट खडकापासून सहयाद्री पर्वत रांग निर्माण झाली . बेसॉल्ट हा जणू काही मजबूत कणाच बनला . आपण ज्याला उडदया खडक म्हणतो की ज्यात पांढरे , हिरवे खनिजे दिसतात काही ठिकाणी याच उड़दया खडकात छोटे - छोटे रिकामे बुडबुडेही दिसतात व त्या पेक्षाही पूर्ण बेसॉल्ट म्हणजे अगदी काळा पाषाण अशी मजबूत खडकांचा  कणा सहयाद्रिस अधिक ताठर बनवितो . शेकडो जागतिक वारसा ठरलेली लेणी समूह व मंदिरे निर्माण कार्यात याच सहयाद्रीने आपले योगदान दिले .सातवाहनापासून निर्मित होत असलेल्या गड कोटास आपल्या शिरावर घेतले . शिव काळात यात अधिकच भर पडत गेली व शिखरा - शिखरावर त्याग व प्रेरणेचा प्रतिक ठरलेला भगवा डौलात फडकविण्यास प्रेरणा दिली . 

          या मातीतल्या माणसास सहयाद्रिचे सौदर्य केवळ डोळ्यात साठवण्यापुरते नसून ते मनाशी जोडलेले ठरले आहे . निर्सगानेही सह्याद्रिस अनेक चमत्कारीक अविष्कार निर्मितीतून त्याच्या सौदर्यात अधिक भर घातलेली दिसून येते . हरिशचंद्र गडावरील असलेला अर्धचंद्राकृती कोकणकडा हा हवा व पाण्याचा अविष्कारच आहे . माळशेज घाट तर वर्षाऋतुत वर -वधू सारखा सजून बसलेला असतो . जीवधन किल्ल्याचा वानरलिंगी सुळका खालून अरे व्वा ! अन वर गेल्यावर अरे बापरे ! नक्कीच वदवून घेतो . अलंग , मदन , कुलंग सारखे बहुतेकांनी न पाहिलेले अन साहस नसेल तर कधीच बघायला न मिळणारे प्राचीन किल्ले नुसते चित्रातूनही धडकी भरवतात . रतनगडाचं नेढं पाहून हे कुणी अन कशासाठी केल असेल म्हणून प्रश्न विचारायला भाग पाडते .त्याच्या शेजारचा अंगठया सारखा डोंगरही अचंबीत करतो . पन्हाळ्या जवळील  शिव पद स्पर्शाने पावन झालेले विस्तिर्ण मसाई पठारही अचंबीत करते . नाना विध दुर्मिळ फुलांनी सजनारे कास पठारही वेगळ्याच वनस्पती शास्त्राच्या दुनियेत घेवून जाते . महाभूमित सर्वोच्च शिखर कळंसूबाई जसा गगणास भेदतो तसाच त्याच परिसरात जमीनीत खोलात असलेली आशिया खंडांतील दुसऱ्या क्रमांकाची असलेली सांधण दरी हा निर्सगाचा एक अदभूत अविष्कारच आहे . सादन किंवा सांधण असेही या दरीस म्हणतात . घळ किंवा घळईसारखी असलेली २०० ते 300 फुट खोल आणि दोन कि .मी लांब अशी ही दरी आहे . सततच्या खडकाच्या क्षरणाळे किंवा भूगर्भिय हालचाली मुळे अश्या घळई निर्माण होतात . पाण्याच्या प्रवाहाने सतत झीज होत राहून दरी तयार होते होते . हिमालयातून उगम पावणाऱ्या सिंधू , सतलज , ब्रम्हपुत्रा यांच्या प्रवाहाने अनेक खोल दऱ्यातून  त्या उसळत जातात . भारतातील नर्मदा नदीने भेडाघाटात संगमरवरी खडकातून तयार केलेली घळई प्रसिध्द आहे . सांधण दरी याला अपवाद नाही . त्यात रतनगड , भंडारदरा धरण , कळसूबाई ही सौदर्यात अधिक भर घालतात . क्रतिवीर राघोजी भांगेरे जलाशय म्हणजे भंडारदरा धरणाला संपूर्ण वेढा घालून हा थरार अनुभवता येतो . शेंडी या गावातून मुरशेत - पांजरे - उडदावने- साम्रद या अगदी छोटया गावात पोहचून वाहने त्या ठिकाणी उभी करून एक दिड कि .मी चालत जाऊन या दरीत महाकाय दगडाच्या मधून मार्ग काढत जावे लागते . दोन कि. मी . पर्यत ह्या दरीचे दोन्ही कडे जनू एकमेकांशी संधान बांधत अगदी निमुळती होत जातात . वर पाहताच  लांबट खिंडीतून केवळ आकाश दिसते . सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हाच त्याचे दर्शन येथून होते . वर्षभर या घळीत काही ठिकाणी पाणी असतेच बहुतेक ठिकाणी पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागते . साहसी प्रवासातून दरीच्या शेवटच्या टोकावर पोहचून आजोबा डोंगराचे दर्शन होते . सांधण दरीत पर्यटन करायचे असल्यास पावसाळ्यात येणे टाळावेच. पावसाळयात ही दरी अत्यंत धोकादायक आहे . साम्रद गावात घरघुती जेवणाची व्यवस्था होते .  पुणे -मुंबई - नाशिक व आता समृद्धीमुळे संभाजीनगर काही तास अंतरावर असल्याने सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी या परिसरात असते .पर्यटकांनी हा परिसर अगदी फुलुन जातो.  मुंबईकर कल्याण -कसारा घाट - इगतपुरी - घोटी - शेंडी व पुणे व छ .संभाजी नगरकरांना संगमनेर अकोले -राजूर - शेंडी असे या ठिकाणी पोहचता येते . पुढे ह्याच वाटेने धरणाला वळसा घालत गोदावरीत विलिन होणाऱ्या प्रवरेचा उगम असलेल्या रतनवाडीचे प्राचीन अमृतेश्वर मंदिर की ज्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर पुष्करणी आहे पुढे - नेकलेस फॉल - कोलटेंभे - मुतखेल या मार्गाने पुन्हा भंडारदरा धरणावरुन गोल फेरा मारून शेंडीला पोहचता येते .



संजय खांडवे

सोमवार, ९ जून, २०२५

महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

 



महाभूमितील माऊंन्ट एव्हरेस्ट - कळसूबाई

➖➖➖➖➖➖➖➖

स्थान - जि . अहिल्यादेवी नगर ता. अकोले ,समृद्धी महामार्गाच्या भारवीर पॉईन्ट पासून ४८ कि.मी

➖➖➖➖➖➖➖➖➖

        निऋत्तीने सर्व प्रथम शेतीचा शोध लावला . नवनिर्मिती व सृजनशीलतेचे प्रतीक ही स्त्रीच आहे . माणुस भटक्या अवस्थेत असतांना स्त्रीवरच सर्व जबाबदारी असायची व ती सक्षमपणे पार पाडत असतांना अनेक शोध लागत गेले . निसर्गातील निरिक्षणातून शेती व संगोपणातून वनस्पती औषधी सारखे शोध स्रीनेच लावले . भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

        जगातील अनेक प्राचीन संस्कृतीत नदीला मातेचे रूप मानत पूजन केले जाते. नदिचे स्री रुपातील शिल्पे देखील प्राचीन लेणी मंदिरात दिसून येतात .मातृपरंपरेत जलदेवता , सप्तमातृका म्हणजे साती आसरा , गावाबाहेर , चौरस्त्यावर , नदिकाठी असलेल्या मातृ देवता आदि भूमातांचे पूजन आपल्या कृषी परंपरेत होत आलेले दिसते . माय किंवा आई या नामस्मरणातून सुरक्षितता व जगण्याची प्रेरणा मिळत गेली . सटवाई, इंगलाई , कडजामाई, कमळाजाई, कानुबाई,कृष्णाई, खेडजाई , गडीआई ,चौंडाई, शिवाई ,हरणाई ,  शितलाई , शिरकाई , रेणुकाई, रंभाई, येडाई, मसाई, मुंबादेवी अशी अनेक मातृदैवते मोठ्या भक्ती भावे पूजली जातात . माय धुरपता या ग्रंथात संजीव भागवत यांनी तळेगावची राजमाय( नांदेड ) रामपुरीतील भागामाय(परभणी )शेलगावची यमुनामाय( नांदेड) इरळद - नळरदची देवयमाय ( परभणी ) दैठाण्याची विठामाय( परभणी ) अशी अलीकडच्या काळातील मातृ देवतांची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या लोकसंस्कृतीचा परंपरेने चालत आलेल्या गाणी यावरून अभ्यासपूर्ण अशी माहीती या ग्रंथातून दिली आहे .

      महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर कळसूबाईचे मंदिर आहे .कळसू नावाच्या मुलीची दंतकथा या शिखराशी जोडली जाते . सर्वांना मदत करणारी दुःख निवारण करणारी आईचे म्हणजेच मातृदैवताचे नाव ह्या सर्वोच्च शिखरास आहे . या ठिकाणी कळसू आईचा तांदळा मंदिरात स्थापित केलेला दिसतो . याची उंची १६४६ मी. आहे महाराष्ट्रात त्या खालोखाल असलेले साल्हेर (१५६७ मी), गळदेव(१५२२ मी), हरिशचंद्रगड तारामती (१४२४मी) ही शिखरे येतात . पुणे ,मुंबई , नाशिक ही महानगरे येथून जवळच आहेत आणि आता समृद्धी महामार्गामुळे कळसूबाई महाभूमिशी कमी वेळात जोडली गेली आहे . साहसी ट्रेक म्हणून नेहमीच पर्यटकांची प्रचंड गर्दी येथे दिसून येते . साधारणतः सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यन्तचा काळ हा ट्रेक साठी अनुकुल मानला जातो . पर्यटक अगदी मध्यरात्री नंतर पर्यटक येथून ट्रेकला सुरवात करून कुठेही दिसणार नाही असा सुर्योदय अनुभवतात . कळसूबाई  सर करण्यासाठी सर्वात सोर्ईस्कर वाट ही बारी गावातून जाते बारी हे गाव भंडारदरा - घोटी महामार्गावर आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनही येथून जवळ आहे. बारी गावात सायं पर्यन्त पोहचले तर गावात मुककामाची सोय होते शिवाय ट्रेक वरील मार्गावर छोट्या हॉटेल असून स्थानिकांचा टेन्ट सह जेवण - चहा-नास्ता मिळतो यातून त्यांना रोजगार मिळतो . भात शेतीतून मार्ग काढत दाट जंगलातून चढाई करत पाऊल वाटेने जावे लागते आम्ही सकाळीच पाच वाजता ट्रेक चालू केल्याने  करवंदींच्या गर्द जाळीतून अंधारात काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाचा आनंद घेत जाता आले . स्थानिकाची मदत घेऊनच अंधारातून बॅटरीच्या मदतीने चालावे कारण जंगलातून अनेक वाटा आहेत व त्या रात्रीच्या अंधारात लवकर लक्षात येत नाही .पायथ्याशी डोंगर उतारावर भात शेती करतात . पायथ्याशी कळसू आईचे छोटे मंदिर आहे . समोर कमान लागते पायऱ्या - पायऱ्याची भात शेती, दाट जांभुळ ,करवंदी , आंबा आदि दाट झाडीतून प्रचंड चढाईचा मार्ग लागतो . लोंखडी सरक्षक कठडे केले असल्याने सुरक्षित पणे चालता येते काही ठिकाणी दगडी पायऱ्या व कोरलेल्या पायऱ्या आहेत . सर्वात अवघड लोखंडी पायरीचा मार्ग लागतो या ठिकाणी काळजी पूर्वक चालावे लागते . येथून निर्सगाचं अप्रतिम सौदर्य न्याहळता येते . कळसूबाईचे मुख्य शिखरही येथून नजरेस पडते . मोठ मोठ्या शिळा मधून प्रवास करत पहिल्या घाट माथ्यावर पोहचतो या ठिकाणी पाण्याची एक विहिर आहे व स्थानिकांची छोटी हॉटेल आहेत . समोरच उंच शिखर दिसते . लोखंडी रिलिंग व मुख्य शिखरावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत येथून लक्ष पूर्वकच चढाई करावी लागते . मग आपण पोहचतो मुख्य शिखरावर येथून समग्र अंशातून  निसर्ग फुललेला दिसतो अगदी विमानात बसल्याचा अनुभव येतो प्रचंड वारा आणि  ढगात गेल्याचा अनुभव मिळतो .शिखराच्या मध्यभागी कळसुबाईचे देऊळ आहे भगवा रंग आणि गोल घुमट असलेलं मंदिर आपलं  लक्ष्य वेधून घेते, मंदिरा शेजारी त्रिशुंलं आणि काही घंटा बांधलेल्या आहेत ..मंदिराच्या आत बसून देवीचं दर्शन घेतलं एका वेळेस दोन जण बसतील एव्हढीच जागा  आहे. या ठिकाणी एक साखरदंड असून तो खाली सोडून पुन्हा वर ओढला की कळूसआई आपली मनोकामना पूर्ण करते अशी भावना आहे .कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये मोठे घनदाट अभयारण्य आहे. येथे बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर, नीलगाय, ससे, भेकरे, सांबर, हरीण, शेकरू मांजर, रानमांजर, चिंकारा, उदमांजर, तरस असे अनेक प्राणी आढळतात. शिवाय मोर, पोपट, दयाळ, ससाणा, कृष्ण गरुड, शिंपी, सुगरणी, बगळे, करकोचे, खंड्या, याशिवाय स्थानिक तसेच परदेशी पक्षांचा मुक्त विहार येथे असतो . येथून साणंददरी , अमृतेश्वर मंदिर ,रतनगड,  भंडारदरा धरण , हरिशचंद्रगड, रंधा फॉल ही पर्यटन स्थळे जवळच आहेत .



संजय खांडवे

सोमवार, २ जून, २०२५

राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*

 




*राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० आणि भारतीय ज्ञान प्रणाली*


➖➖➖➖➖➖➖➖➖

*२१ व्या शतकातील आव्हाने स्वीकारणारा सक्षम नागरीक घडविण्याचे उद्दीष्ट आपल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात अनेक मोठी आव्हाने आपण संधी रुपाने स्वीकारण्यासाठी विदयार्थ्यांचा बोधात्मक , भावात्मक व कौशल्याधिष्ठीत विकास साधून त्यांची बलस्थाने ,आवडी - निवडी व छंद याचा विचार करून AI तंत्रज्ञानाच्या साहयाने समग्र मूल्यांकन पद्धतीतून  शिक्षणक्रांती घडविणार आहोत .*

➖➖➖➖➖➖➖➖

 व्यक्ती पासून कुटुंब बनते व अनेक कुटुंबापासून समाज व या विविध समाजापासून राष्ट्र बनते . राष्ट्राचा विकास हा शिक्षणाचा दर्जा कसा आहे यावरून ठरतो. स्वामी विवेकानंदाच्या मते माणुस घडविणे म्हणजे शिक्षण. शिक्षण हे केवळ ज्ञान किंवा पदव्या मिळविण्या येवढे मर्यादित नसून यातून घडलेला माणुस हा स्वतः च्या बौध्दीक , शारीरिक , भावनात्मक व व्यावसायिक कौशल्या बरोबरच राष्ट्राच्या निर्मिती साठी हातभार लावण्याची क्षमता प्राप्त करून राष्ट्राचा दर्जा उंचावतो .

       भारतातीत शैक्षणिक क्रांतीचा मागोवा घेतल्यास १९६४ - ६६ या काळात शिक्षणाच्या विकासासाठी कोठारी आयोगाची स्थापना झाली . त्यानंतर १९६८ च्या शैक्षणिक धोरणात शैक्षणिक समानतेचा विचार करत राष्ट्रीय धोरण आखले गेले .१९८६ च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर भर दिला गेला . १९९२ मधे या धोरणाचे अधिक अभ्यास करून महिला शिक्षणासह अधिकच्या सुधारणा केल्या गेल्या .१९९७ मध्ये स्मार्ट पी .टी . शिक्षक क्षमता समृद्धी सारखे कार्यक्रम राबवत दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रीकरणावर भर दिला गेला .१ ली पासून इंग्रजी विषयावर भर दिला गेला . प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून २००९ शिक्षणाचा अधिकार अधिनियम पारित केला गेला .ऑगष्ट २०१० च्या शासन निर्णयाने सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची योजना सुरु झाली इय्यत्तावार अध्ययन निष्पतीवर भर दिला गेला व आज आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पोहचत आहोत .

         राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश केला गेला आहे . यानुसार भारतीय परंपरेचा पाया असलेला'पंचकोश विकास ' ही संकल्पना समोर ठेवून काम केले आहे . अगदी पायाभूत स्तरावरून विद्यार्थ्याचा विचार करून समग्र शिक्षणाची योजना याद्वारे आखली गेली आहे . ही पंचकोश म्हणजे पाच आवरणे आहेत .

१ ) अन्नमय कोश

२) प्राणमय कोश

३ ) मनोमय कोश

४ ) विज्ञानमय कोश

५) आनंदमय कोश

   या पंचकोशाचे भाष्य तैतरिय उपनिषदात केले आहे . पिता वरून समोर भृगुऋषीने याचे निरुपण केले आहे .७व्या भागात शिक्षावल्ली मधे या कोशा विषयीचा उल्लेख येतो . अन्न कोश हे शारीरिक आवरण आहे यामधे शारीरिक व इंद्रिय विकास येतो प्राणमय कोश हा पुढचा टप्पा जीवन शक्ती देणारा व उर्जा वाढविणारा आहे . मनोमय कोश हे मनाशी संमधीत भाव -भावना विकसित करण्या संदर्भात आहे . विज्ञानमय कोश हा बौध्दीक विकासाशी सलग्न आहे .आनंदमय कोश हा आंतरीक स्व ची जाणिव करुण देणारा आनंद , प्रेम , करुणा ,उस्फुर्तता , स्वातंत्र्य, सौदर्य विषयक जाणिव निर्माण करून देणारा आहे . शरीर व मन यांच्या समन्वयातून मानवाचे आकलन व अनुभव या पंचकोशातून परिपूर्ण होतात . 'घोका आणि ओका ' ह्या अध्ययन -अध्यापन व्यवस्थेत आमुलाग्र बदल या भारतीय ज्ञान प्रणालीच्या पंचकोशातून होतांना दिसतो .

      शारीरीक ,मानसिक, बौद्धीक व अध्यात्मिक विकासातून एक सक्षम भारतीय नागरीक ह्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून होणार आहे . भारतीय ज्ञान परंपरेचा इतिहास आपण पाहिला तर संत परंपरेतून आलेला विचार आपण आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करून बौद्धीक ,मानसिक व अध्यात्मिक विकास साधू शकतो. तुकोबारायांचे " मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण " ज्ञानेश्वर माऊलींचे " भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे " या पसायदान व इतर वारकरी संत साहित्यात अगाध आनंदमय कोश व विज्ञान मय कोश दडलेला आहे . स्वराज्याची स्थापणा करणारे छत्रपती शिवरायांची शहाजी राजे यांनी कर्नाटकात केलेली शिक्षण व्यवस्था ,छत्रपती शिवरायांचे गड स्थापत्य , शिवकालिन पाणी साठवण व्यवस्था , स्वराज्यातील आर्थिक , सांस्कृतिक व सामाजिक व्यवस्था, शेतकरी विषयक धोरण , पर्यावरण विषयक महाराजांचे धोरण , कुशल प्रशासन व्यवस्था आदि विषयावर महाराजांचे अनेक शिवकालिन पत्रे देखील उपलब्ध आहेत .ही भारतीय ज्ञान प्रणालीची उत्तम विषय ठरू शकतात . भारतीय संविधानाची संविधानिक मूल्ये , या शिवाय अगदी सातवाहन , वाकाटक , चालुक्य , गुप्त , यादव आदि राजवंशीयांचे  जागतिक दर्जाचे स्थापत्य लेणी व मंदिर समुहातून आपल्या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत या अलौकिक वारश्यांचा समावेश अभ्यासक्रमात निश्चितच भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून होऊ शकतो .



संजय खांडवे

शिक्षक

दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा

 



दुर्गदुर्गेश्वर पायथ्याशी नतमस्तक - रायगड परिक्रमा*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

स्थान :-  दुर्ग रायगड , संपूर्ण रायगडास घनदाट जंगलातून १६ कि.मी. पदभ्रमंती

➖➖➖➖➖➖➖➖➖

परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो . हिंदू ,बौद्ध , शीख , मुस्लीम , जैन या धर्माच्या प्राचीन परंपरा आपण अभ्यासल्या तर परिक्रमेस एक पवित्र असे महत्व आहे . गणेश पुराणा मध्ये गणेशाची एक कथा येते, सर्व देवता मध्ये प्रथम पूजन कोणत्या देवतेचे व्हावे म्हणून भगवान शिव देवतांना एक परिक्षा सांगतात की जी देवता पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून अगोदर येईल त्या देवतेचा पूजनाचा मान पहिला असेल मग बंधू भगवान कार्तिकेय सह सर्व देवता पृथ्वी प्रदक्षिणे साठी निघतात पण बुद्धीची देवता गणेश आपल्या माता पित्यास प्रदक्षिणा घालून केवळ शिव पार्वतीच हे विश्व आहे हे सिद्ध करून मान मिळवितात . हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मंदिर प्रदक्षिणा , नदी प्रदक्षिणा ,वटवृक्ष प्रदक्षिणा तसेच विवाह संस्कारातील सात फेरे ही पवित्र मानली जातात . चार्तुमासाच्या शेवटी हजारो वर्षा पासून नर्मदा माता परिक्रमेस एक वेगळे महत्व आहे . बहुधा ही ओंकारेश्वर वरून कठिण तपश्चर्यने सुरुवात करून हजारो कि मी चे अंतर पायी भाविक पूर्ण करत असतात . नाशिक मधील ब्रम्हगिरी परिक्रमेला देखील एक धर्मिक महत्व आहे . पवित्र श्रावण मासामध्ये हजारे भक्त ही परिक्रमा पूर्ण करतात . बौद्ध हिनयान लेणी मधील प्राचीन चैत्यस्तुपाला सुद्धा गोल असा परिक्रमा मार्ग प्राचीन लेणी समूहात दिसून येतो .इस्लाम धर्मा मध्ये आयुष्यातून एकदा तरी  हजयात्रे साठी मक्का -मदिना या पवित्र धार्मिक स्थळी जावे अशी परंपरा आहे . मक्का या ठिकाणी इस्लाम मान्यतेनुसार जगाचा मध्य समजला जातो या ठिकाणी असलेलेल्या काबा  या पवित्र स्थळास सात वेळा प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे . अश्या विविध जाती धर्मात परंपरा आढळतात या परिक्रमे वेळी प्रत्येक भाविक आपल्या धर्म परंपरेच्या मान्यतेनुसार आपली देवतेसमोर नतमस्तक होत असतात .

            आताच्या काळात रायगडास परिक्रमेचे शिवकार्य अनेक शिवप्रेमी मोठ्या उत्साहात करतात .भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात असे फार कमी  शासक असतील की ज्यांना रायगड माहीत नव्हता . इंग्रज , डच , पोर्तुगीज सारख्या परकियांनी देखीत रायगडाची धास्ती घेतली होती . युरोपीय लोक तर रायगडास पूर्वेकडील जिब्राल्टर म्हूणून संबोधतात . अठरा - परगड जाती धर्माची एक वज्रमूठ बांधून एतद्देशिंयांचे हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतीस याच रायगडी राज्यभिषेक होऊन समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचा पालन हार म्हणून लोकमान्यता मिळाली होती . हिंदवी परिवाराच्या मदतीने रायगड चरणी घनदाट जंगलातून गडाच्या अगदी पायथ्याशी चहूदिशांनी नतमस्तक होणाची संधी रायगड परिक्रमेच्या मोहिमेच्या रुपाने मिळाली . हदयात छत्रपती घेऊन त्यांच्या अन मावळ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून चालण्याची संधी ही आयुष्यातील एक अवस्मरनिय प्रसंग होता . १६ ते १८ कि. मी ची ही परिक्रमा स्थानिक अन मान्यता प्राप्तसंस्थेसहच करावी . एकट्यानं वा कुटुंबाने किंवा मित्र समूहाने हे धाडस करु नये .

           पाचाड या राजमाता  जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नमन करून वाहनाने चित दरवाज्याच्या पायरी मार्गा पर्यन्त पोहचता येते  . वर दिसणारा बुरूज हा खुबलढा बुरूज असून त्या बाजूस आता तुटलेला चित दरवाजा आहे. परिक्रमा मार्ग मात्र टकमक टोक दिसते त्या बाजूने थोडे पुढे जाऊन जंगलातून पाऊल वाटेने सुरु होतो . येथून रायगड वाडी  पासून येणारा रस्ता पुढे वर नानात (नाणे) दरवाजा कडे जातो हा पुढे महादरवाज्या कडे जातो .याच मार्गाने मुंबई इंग्रज कर हेन्री ऑक्झेंडन राज्याभिषेक प्रसंगी या मार्गाने रायगडावर जाण्याची नोंद करतो . परिक्रमेचा मार्ग मात्र पायथ्याला लागून दाट जंगलातून सुरु होतो सकाळचे साडे आठ वाजले तरी प्रचंड महाकाय रायगडाच्या सावलीतूनच चालावे लागत होते सूर्य दर्शन होण्यास तास दिड तास तरी लागणार होता . रायगड हा सह्याद्री पर्वत रांगेत असून मध्यभागी स्वतंत्र महाकाय असा दिसतो त्यामुळे संपूर्ण परिक्रमा पूर्वेकडील खिंड सोडली तर उंच सखल भागातून अत्यंत घनदाट जंगलातून होते .  टकमक टोक व हिरकणी बुरुजावरून रायगड अगदी दूर वरून सहज ओळखता येतो . हिरकणी बुरुज - महादरवाजा - टकमक टोक याच्या अगदी पायथ्यापासूनचा हा परिक्रमा मार्ग हा रायनाकच्या समाधी पर्यन्त घेऊन जातो .अत्यंत किर्र असे जंगल आंबा ,फणस , वड करवंदी व इतर अश्या घनदाट जाळीतून सुर्य प्रकाशही जमीनी पर्यन्त पोहचत नाही .तास - दिड तास चालून झाल्यावर टकमक टोकाच्या पायथ्याशी येतो .या ठिकाणा हून कडेलोट झालेला आरोपी दाट झाडीत वरच जाळीतच अडकत असावा येवढी ही दाट झाडी आहे .थोड़े पुढं चालत गेल्यावर दोन चार घरे असलेली टकमक वाडी लागते या वाडीला गाव म्हणून कोणत्याच सुविधा नाही .  शिवकाळापासून आमचे पूर्वज स्वराज्यासाठी काम करत असत असे हे आदिवासी बांधव मोठ्या अभिमानाने सांगतात . येथून पुढचा रस्ता अजून अवघड होत जातो मोठ मोठी वृक्ष कोसुळून त्यावर जाळी -झुडपे वाढलेली आहेत बहुतेक ठिकाणाहून खाली बसत , सरपटतही जावे लागते . रायगडाच्या कडा वरून कोसळलेले महाकाय दगडही वाटेत दिसतात . डाव्या हाताला दोन कोसावर लिंगाना किल्ला दिसतो . भवानी बुरुजाच्या बाजूची असलेली खिंडीच्या वाटेची चढाई सुरु होते . ही चढाई खूप अवघड आहे एकेरी व दाट झाडीतून दुपार एक वाजे पर्यन्त आम्ही त्या खिंडीत पोहचलो . अर्धी परिक्रमा येथे पूर्ण होते . खिंडीतून खाली उतरणीची वाट पुन्हा अवघड आहे काही ठिकाणी अगदी बसूनही खरकत -खरकत ही जावे लागते हाती काठी असल्यावर पायावर जास्त तान पड़त नाही . अत्यंत घनदाट जंगलातून  दोन -अडीच तासाचा प्रवास बाकी राहतो . निर्सगाच अप्रतिम कधीही न पाहिलेले सौदर्य अनुभवत झाडाझुडपातून खिंड मिळेल तेथून रायगडास चौफेर न्याहळता येते . होळीच्या माळाच्या खाली असलेल्या कुशावर्त तलावातून उगम पावत वाघ दरवाज्या जवळून खाली कोसळणारी जलधारेचे नदीचे स्वरूप या दाट जंगलात अक्राळ -विक्राळ दगडी शिळाचा नदीपात्रातील रुप पाहून वेगळाच अनुभव येतो . "किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे याकरीता एक दोन तीन दरवाजे तसेच चोरदिंड्या करून ठेवाव्यात" असे रामचंद्रपंत अमात्य 'आज्ञापत्र' या ग्रंथात सांगतात. येथून दिसणारा रायगडाचा दक्षिणेकडीत वाघ दरवाजा याची साक्ष देतो . शौर्य , साहस , बुद्धी या बरोबर पूर्वानुमानाचे अलौकिक कौशल्य शिवरायांमधे होते . स्वराज्यासाठी असलेली अखंड सावधानता त्यांच्या प्रत्येक गोष्टीत होती . वाघ दरवाजा त्याचीच साक्ष देतो . शंभू महाराजांच्या बलिदानानंतर झुल्फिकार खानाचा वेढा रायगडास बसला . त्याला केवळ एकच दरवाजा माहित होता बाकी अजस्र रायगडा पुढे तो वेढा दिल्या शिवाय काहीच करु शकत नव्हता . त्यावेळी घनदाट जंगलात कातळा अवतरण करूनच या दरवाज्याचा मार्ग होता . खरच वाघाचं काळीज असणाराच हजारो फुट कातळ कडा उतरु शकतो . त्यावेळी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज , ताराराणी साहेब व त्यांचे सहकारी याच मार्गाने वेढयातून बाहेर पडले होते. दाट अंधारलेल्या झाडीमधून चढाईची वाट तासाभरात पूर्ण करतांच डांबरी रस्ता पाहताच हायसे वाटते . डाव्या बाजुस श्रीगोंदे टोक दिसते येथून पश्चिमेकडे डाबरी रस्ता रोप - वे पर्यन्त पोहचतो याचे अंतर दोन किं मी . पर्यान्तचे आहे . दक्षिणे कडील रायगडाचे महाकाय रूप अगदी जवळून स्पष्टपणे न्याहळता येते . परिक्रमा पूर्ण झाल्याचे समाधान रोप वे पाहताच जाणवते .  साधणतः सतत आठ तासाचा पायी प्रवासातून ही परिक्रमा पूर्ण होते .



संजय खांडवे

रविवार, २५ मे, २०२५

महायान लेणी समूहातील पहिली - घटत्कोच लेणी


 महायान लेणी समूहातील पहिली - घटत्कोच लेणी

➖➖➖➖➖➖➖

स्थान :- ता .सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर ,बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .

➖➖➖➖➖➖➖


 छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा महाराष्ट्रात असा एकमेव जिल्हा आहे की त्या जिल्हयास जागतिक वारसा स्थळे ठरलेली अजिंठा - वेरुळ सारख्या लेणी समूहाचा वारसा लाभलेला असून जागतिक स्तरावर त्याची ओळख निर्माण झाली आहे . या सोबतच अगदी सुरुवातीस निर्माण झालेल्या पितळखोरा व घटत्कोच लेणी समूह देखील याच जिल्हयात आहे . पितळखोरा हा पहिला प्रयोग होता हे हिनयान लेणी समूह असल्याचे दिसून येते . त्यानंतर महायानांनी त्यामधे अत्यंत मनमोहक व सामाजिक , सास्कृतिक , धार्मिक  चित्र उभे करणारे व सर्वात महत्वाचे बुद्धांच्या विविध मुद्रेतील चित्रे काढण्यात आली . त्यांनंतर महायानांनी पहिला लेणी समूह  घटत्कोच लेणी समूहाच्या रुपाने निर्माण केला ही महायानांची पहिली लेणी असावी असे दिसते . अजिंठा लेणी समूहातील १६ क्रमांकाची लेणी याच लेणी सोबत निर्माण झाली .

           महामार्ग व वास्तु याचे फार जवळचे नाते आहे प्राचीन काळात मार्ग तयार झाल्यावर त्या मार्गावर वास्तु निर्माण केल्या गेल्या. आधुनिक काळ हा समिश्र स्वरुपाचा आहे आताच्या काळात वास्तुच्या सोईने मार्ग निर्माण झालेले आहे पण मार्गाचा मुख्य उद्देश व्यापार व दळणवळणाच्या सोईने असतो . उत्तर -मध्य भारतातीत उज्जैन या प्राचीन शहरा पर्यन्त पोहचणारे प्राचीन मार्ग आपण पाहीले तर उज्जैन - (महिष्मती ) महेश्वर- बऱ्हाणपूर - घटत्कोच लेणी - अजिंठा - भोकरदन - औरंगाबाद - पैठण- तेर असा मार्ग होता . यात घटत्कोचच्या बाजूला पितळखोरा - बाजुला नाशिक असा व्यापरी संपर्क दिसून येतो . भोकरदन - वेरुळ -पैठण - नेवासा - भांजे - सोपारा असाही मार्ग होता .नाणे घाटातून येणारा जुन्नर - भोकरदन - पैठण असे हे प्राचीन मार्गाचे जाळे होते . बऱ्हाणपूर -भोपाळ - सांची असाही प्राचीन मार्गांचा संपर्क होता . या मार्गात घटत्कोच लेणी समूह आपण पाहीला तर असे लक्षात येते की या ठिकाणी सुद्धा अजिंठा-वेरुळ लेणी समूहा सारखी भव्य वास्तु उभी राहिली असती पण त्या ठिकाणच्या दगडाच्या दर्जा पाहून काम सोडलेले दिसते. जंजाळा गावातून उत्तरेला पाऊल वाटेने दोन शेतांचा बंधारा ओलांडून डोंगर उतारावरून पुरातत्व खात्याने तयार केलेल्या पायरी मार्गाने खाली उतरत जातांना अगदी अजिंठा लेणी प्रमाणे डोंगराच्या मध्यात ही लेणी नजरेस पडते . या लेणीत तीन वेळेस भेट दिली पण लॉकडाऊन काळात इतिहास अभ्यासक विवेक चांदुरकरांसोबत गेलो असता वर्षभर पर्यटक न गेल्याने या मार्गावर प्रचंड पाला पाचोळा जमा झाला होता संपूर्ण जंगल निर्मणुष्य होते लेणी जवळ जाऊनही आमची आत जाण्याची हिम्मत झाली नव्हती शिवाय लेणीचे लाकडी द्वार तुटलेले असल्याने आम्ही आत जाणे टाळले होते आता मात्र पर्यटक ये - जा सुरु असते .  विविध अंगाने नटलेल्या निर्सगाच्या सानिध्यात लेणी समुहाचा अभ्यास करताना भेटीचा दिवसही अपुर्ण पडतो . लेणीत पोहचताच डोळे मूर्ती शिल्पाकडे एकवटतात जणू काही त्या देखील आपल्याला काहितरी सांगतात याची जाणिव होते आणि ते सत्य आहे . प्राचीन काळात अनेक लहान मोठ्या शिल्पाची निर्मिती ही दिखाऊ किंवा भव्य दिव्यतेच्या दर्शनासाठी मुळीच नव्हती तर त्या प्रत्येक शिल्पात एक गहन तत्व- विचार - संदेश दडलेला असे . या लेणीचे वैशिष्ट्ये म्हणजे तथागतांची विविध मुद्रेतील अनेक शिल्पे येथे आहेत . लेणीजवळ पोहचताच उजव्या बाजूस वर पायऱ्या चढून गेल्यावर हात तुटलेले नागराजाचे सुंदर शिल्प आहे . अलंकृत केलेल्या दोन खांबाच्या कमानीत सुंदर नक्षी काम दिसून येते त्याच्या खालीच एक जीवंत पाण्याचे टाके आहे त्यावरही असेच तुटलेल्या  खांबासह सुंदर नक्षीकाम दिसून येते. मुख्य लेणीच्या डाव्या व उजव्या कोणाड्यात दोन खोल्या आहेत . डाव्या बाजुच्या खोलीच्या वर एक ब्राम्ही लिपित शिलालेख आहे आता हा अर्धाच उरला आहे . इ .स .४ थ्या - ५ व्या शतकात वाकाटक  नरेश हरिसेन याचा प्रधान वराहदेव याने या लेणीचे निर्माण केले असे समजते . या सोबतच त्याने अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या लेणीचे निर्माण केले होते . लेणीच्या मुख्य दरवाज्यावर चार चौकटीत कोरीव काम दिसते . दोन्ही बाजूस स्वागतासाठी द्वारपाल आहे.मुख्य चौकटीस्तंभावर दोन्ही बाजुस स्त्री शिल्पे आहे . दरवाज्याच्या वर तीन ध्यानस्त बुद्धशिल्पासह नक्षी काढलेले आहे .

    लेणीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला भिंतीमध्ये उठावदार पद्धतीने कोरलेले बौद्धस्तुप आहे . खाली बसलेल्या यक्षाने ते एका हातावर उचलून धरले आहे . त्यावर गोलाकार घुमटाखाली बुद्धांची प्रभावळी असलेली ध्यानस्त मूर्ती आहे . उभी असलेली अभय मुद्रेतील व आसनस्त असेल्या अनेक बुद्धमूर्ती शिल्पे या ठिकाणी दिसून येतात .२० अष्टकोनी व अलंकृत केलेल्या खांबावर हा प्रशस्त असा चौकोनी आकाराचा सभामंडप आहे . पाठीमागे तीन गर्भगृहे आहेत त्यात मध्यभागी मुख्य गर्भगृहात दहा फुट उंच असलेली तथागतांची धम्म चक्र मुद्रेतील भव्य मुर्ती आहे . दोन्ही बाजूने दोन चामरधारी सेवेकरी आहेत वरच्या बाजूस विद्याधर ,यक्ष असून पायथ्याशी अनेक बौद्ध उपासकांची शिल्पे आहे . हरिण व वृषभ शिल्पदेखील आहेत . मुख्य गर्भ गृहाच्या चौकटीवर नागराजाचे शिल्प असून त्यावर स्त्री पुरुषांचे शिल्पे काढलेली आहेत . लेणीच्या आत डाव्या बाजूस सात व उजव्या बाजूस पाच बौद्ध भिक्कू साठी गुफा आहेत . आत असलेल्या काही खांबाचे नक्षीकाम अपूर्ण दिसून येते . काही कारणास्तव त्या काळी काम थांबले असल्याचे दिसते .  मुख्य दरवाज्या सह दोन गवाक्ष व इतर दोन लहान दरवाजे आहेत . या लेणीच्या बाजूला आणखी काही लेणी निर्माणचा प्रयत्न झाला पण दगडाचा दर्जा हा निकृष्ठ असल्याने तो थांबल्याचे दिसते . लेणी समोर प्रचंड खोल दरी आहे. या समोरील काताळावरही काही छोट्या गुफा दिसतात पण पोहचता येत नाही त्यावर समोर जंजाळा किल्ला दिसतो . पावसाळ्यात या लेणीला भेट द्यावी या ठिकाणी वाहणाऱ्या धबधब्यामुळे ही लेणी अधिक आर्कर्षित करते .



संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...