*
*दुर्ग दुर्गेश्वराशी साम्य असलेला- सुधागड*
स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली - पाली १३८कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना - पाली मार्गे १३०कि .मी . उंची -२०३० फुट
दुर्गदुर्गेश्वर रायगड हे एकमेव असे तीर्थ आहे की त्या ठिकाणी नतमस्तक झाल्यावर आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटते . हे आपल्या स्वातंत्र्य अन स्वाभिमानाचे ते क्रांतिकेंद्रच आहे . महाभूमितील अठरा परगड जाती धर्माच्या लोकांची वज्रमूठ बांधून ' हिंदवी स्वराज्य ' येथेच साकारले .स्वराज्याची दुसरी राजधानी असलेल्या रायगड़ाशी बहुतेक बाबी मध्ये साम्य असलेला गड म्हणजे सुधागड होय . हा गड पाहतांना रायगडाची झलक जाणवते . महाराजांनी सुद्धा काही अंशी राजधानी साठी या गडाचा विचार केला होता . नयाने युक्त असलेल्या छत्रपती शिवरायांना अभेद्य राजधानी कुठे व कशी असावी याचे ज्ञान होते म्हणून दुर्गदुर्गेश्वर रायगडाचे निर्माण करविले .
पाली गावाच्या पूर्वेस असलेल्या सरसगडाच्या पायथ्यापासून एक रस्ता सुधागडाकडे जातो . या गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत पहिला पाश्चापूर - ठाकूरवाडीतून व दुसरा धोंडसे गावातून महादरवाज्या पर्यन्त घेवून जाणारा मार्ग आहे . आम्ही हिंदवी परिवाराच्या मोहिमेत या दोन्ही मार्गाचा वापर केला . धोंडसे गावात वाहने उभी करून अत्यंत दाट झाडी मधून हा मार्ग जातो .नदीचा पुल ओलांडल्यावर असाव्यस्त पडलेले मोठ -मोठे धोंडे व त्या दाट झाडीतून जाणारी वाट ही भुलभुलैय्या ठरू शकते त्यामुळे स्थानिकांच्या सहकार्याविना धाडस करणे योग्य नाही.सुधागडाच्या जवळ दोन हजार वर्षापूर्वीच्या ठाणाळे, खडसांबळे बौद्ध लेणी आहेत यावरून या गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते. या वाटेने गडाच्या भव्य पठारावर पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात .
या वाटेत पुढे आपल्या परंपरेत प्रसिद्ध असलेल्या सरक्षक देवतेचा मारोती पार लागतो . थोड़े पुढे वर चढाई करत गेल्यावर तानाजी टाके लागते काळ्या पाषणात हे भूयारात कोरलेले दोन टाके असून पिण्यायोग्य पाणी यात असते. बाजूला तलवार व ढाल हातात घेतलेला वीर योध्याची दगडी शिल्प कोरलेले आहे . गडावरील वास्तुचे तासीव दगड खाली या वाटेत पडलेले दिसतात . चौकी पहारे साठी उभारलेली एक उध्वस्त वास्तू पाहून पुढे गेले की पुन्हा काही पाण्याची टाकी आहेत .या पुढे मार्ग काढत गेल्यावर आपल्याला भली मोठी तटबंदी सारखा भाग दिसतो . जवळ गेल्यावर दोन बुरुजांच्या मधे असलेला गोमुखी महादरवाजा दिसतो . दोन क्षरभ चिन्ह व त्यावरील नक्षीकाम व आतील वळण घेणारा मार्ग रायगडाच्या महाद्वाराची आठवण करून देतांना थोडावेळ आपण रायगडी पोहचल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. गडाखालील वाटेवर अचूक मारा करणाऱ्या बुरुजाचा फेरा मारून पायरी वाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूस भोराई देवीचे मंदिर आहे . या गडाचे पुर्वीचे नाव भोरपगड हे या मातृदेवते वरूनच पडले . स्वराज्यात आल्यावर याचे नाव महाराजांनी सुधागड ठेवले . या ठिकाणी गडावर मुक्काम झाल्यास थांबता येते . प्राचीन मोठी घंटा व लाकडी वाघाची मूर्ती येथे आहे . भोर संस्थानाची ही कुलदेवता होती . बाहेर दगडी दिपमाल आहे . समोरच अनेक सती शीळा व विरगळ येथे आहे . बाजूलाच अनेक नक्षीकामासह असलेल्या दगडी समाधींचा समूह आहे.
पुढे चालत गेल्यावर गडवरील भव्य पठारावर अनेक इमारतीचे अवशेष दिसतात . थोड्या पराड्या सारख्या भागात दाट झाडी आहे व उजव्या बाजूला पायवाटेने खाली उतरल्यावर एक पाण्याचे पिण्यायोग्य पाणी असलेले टाके आहे . लांब अशी तटबंदी या ठिकाणी नजरेस पड़ते . तटबंदीत L आकारात एकच व्यक्ती जाईल अशी अंधारलेली बुरुजातून गेलेली वाट आहे काळजी घेत गेल्यावर यातून आपण भव्य तटबंदीच्या खाली येतो येथून पूर्वी गड उतार होता येत असे पुढे हा मार्ग दाट जंगलात जातो आता मात्र कुणी इकडे जात नाही . हा याचा चोरदिंडी दरवाजा आहे . असाच रायगडास साम्य असलेला वाघ दरवाजा आहे .
येथून पुन्हा वर आल्यावर उजव्या बाजूस पंत सचिवाचा वाडा आहे .पेशवेकाळात बांधला गेलेला हा चौरसाकृती मजबुत वाडयात प्राचीन दगडी उखळ व जाती आहेत . आजही हा वाडा चांगल्या स्थितीत आहे . छत्रपती राजाराम महाराजानी शंकराजी नारायण यांना पंतसचीव ही पदवी देऊन सन्मान दिला होता . भोर संस्थानाची मुहर्तमेढ येथेच रोवली गेली . इंग्रजानंतर काही काळ हा गड भोर संस्थानाच्या देखरेखीत होता .
थोडे वर पुन्हा आपणास भव्य पठार दिसते या ठिकाणी सुद्धा अनेक इमारतीचे अवशेष आहे पूर्व बाजूस खाली छोटी पायवाट आहे या वाटेत पुढे दोन मोठी पाण्याची टाकी आहे . पठारावर एक तलाव दिसून येतो पुढे सारख्या आकाराच्या चार इमारती आहेत ही धान्यकोठार आहेत .या गडास रायगडा प्रमाणे बहुतेक बाजूने नैसगिक तरबंदी लाभली आहे . दुसरे एक विलक्षण साम्य म्हणजे टकमक टोक अगदी रायगडा प्रमाणे टोकदार व उंच व खाली प्रचंड खोल दरी व दाट झाडी मधील जंगली भाग अशीच ही केवळ रायगडची भव्यता सोडली तर निर्सगाची जुळी रचनाच म्हणावी लागेल . करवंदाच्या जाळीतील मुबलक रानमेवा व त्यातून दरवळणारा फुलांचा सुगंध तेथून मनमोहक दिसणारा तैल - बैलाची डोंगर शिळा व छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीतून पाय निघतच नाही पण संध्याकाळ होत चालल्याने घाई करावीच लागते म्हणून पाश्चापूर दरवाज्याकडे जाणाऱ्या मार्गाकडे वळलो . गडाच्या पश्चीमेस सिद्धेश्वर महादेवाचे मंदीर उजव्या बाजूस आहे . या मंदिरा बाहेर दगडी गणेश शिल्प व नंदी आहे . बाजूलाच पाण्याने भरलेला कमल तलाव आहे . परिसरात दगडी पाण्याची टाकी देखील आहेत .
पाश्चापूर मार्गाने खाली उतरतांना पूर्व व पश्चीम बाजूस दोन चिलखती बुरुज आहे. या बुरुजात जाण्यास एक मार्गी पायऱ्या असून पुढील भागात पूर्ण वाकून जावे लागते . बुरुजाची ही दुहेरी सरक्षण यंत्रणा या मार्गाची प्राचीन सुरक्षा व्यवस्था किती अभेद्य होती हे दर्शविते . दगडी पायऱ्या वरील शत्रू येथून सहज माऱ्यात घेता येतो. पूर्वी येथे द्वार असावे ते आता कोसळलेले आहे . या मार्गाने खाली उतरतांना लोखंडी पायऱ्या व रिलिंग वनविभागाने लावल्या आहे . चढ - उतर करतांना काळजी घ्यावी लागते कारण दोन्ही बाजूने खोल दऱ्या व घनदाट जंगल आहे . दिड दोन तासात आपण ठाकूरवाडीत पोहचतो . या ठिकाणी पायथ्याशी असलेल्या पाश्चापूर गावात औरंगजेबचा बंडखोर पुत्र अकबराची छावणी होती त्यावेळी तो स्वराज्यात शरण आला होता .छत्रपती संभाजीराजे व त्याची भेट याच गावात झाली होती .छ छत्रपती संभाजी महाराज यांचेही वास्तव्य या गडावर होते . याच परिसरात परळीचा माळ आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि चिटणीस बाळाजी, आवजी, सोमाजी दत्तो, हिरोजी व त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिले होते आज त्या ठिकाणी बाळाजी आवजी चिटणिसांची समाधी देखील आहे. हा परिसर प्राचीन काळापासून इतिहातील अनेक घरामोडी चा साक्षीदार आहे म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा वाटतो .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा