महाराष्ट्र बारव मोहिम
पाणी हे जगातील सर्वात मोठी समस्या आहे . त्यातच शुद्ध पिण्यायोग्य पाणी ही त्याही पेक्षा मोठी समस्या आज जगापुढे सर्वात मोठे संकट उभे करत आहे .संयुक्त राष्ट्रांचा जागतिक जल विकास अहवाल 2024 नुसार पाणी हे समृद्धी आणि शांतीसाठी आपल्या जीवन आणि उपजीविकेसाठी व्यापक महत्त्व अधोरेखित करते. जगातील अर्ध्या लोकांना वर्षातून केव्हा ना केव्हातरी पाण्याच्या समस्येला तोंड द्यावेच लागते अशी परिस्थिती आहे जलवायू परिवर्तनामुळे जगात जलचक्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुष्काळ अतिवृष्टी यासारख्या संकटाला येणाऱ्या काळात सामोरे जावे लागेल . कोणत्याही राष्ट्रात त्या राष्ट्राची जलसमृद्धी ही त्या राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करते त्याच बरोबर त्या राष्ट्राचा आर्थिक , विकास शेतीचा विकास , उद्योगधंद्याचा विकास हा अधिक वेगाने होतो आणि ही जलसमृद्धी म्हणजे त्या राष्ट्रांमधील एक प्रकारची प्रगत जलसाक्षरताच असते . अश्या प्रकारची जलसाक्षरता प्राचीन काळापासून दिसून येते .सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अशी सिंधू संस्कृती उदयास आली . या संस्कृतीमधील पाणी व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाचे आहे . खरी जलसाक्षरता ही त्या संस्कृतीला कळाली होती . अगदी सांडपाण्याच्या व्यवस्थापनापासून पाणी साठवण्याच्या व्यवस्थापनापर्यंत उत्खलनामध्ये अनेक पुरावे आढळलेले आहेत . साती आसरा या आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पानवट्याच्या ठिकाणी आढळतात तळे, नदी नाले, कुंड , झरे, बारव आधी ठिकाणी साती - आसराचे अस्तित्व आढळून येते . मनोभावे स्थानिक त्यांची पूजा करतात पर्यायाने ह्या जलदेवता आहे . जलसंरक्षण हे त्याचे चालत आलेले कार्य आहे . सिंधू संस्कृतीच्या पुष्करणी मध्ये देखील यांचे अस्तित्व दिसून आले आहे अगदी सातवाहन काळापासून साती - आसरांना विशेष असे महत्त्व दिसून येते . दोन हजार वर्षा पूर्वी पासून गडकोट किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापनाचे अचूक नियोजन ठेवले जात असे . आजही आपण गडकोट -किल्ल्यावर गेल्यावर अत्यंत उंच अशा ठिकाणी दगडी कातळात पाण्याची अनेक टाकी कोरलेली दिसतात . किल्ले चावंड या ठिकाणी सात टाक्यांचा भव्यसमूह आणि त्या टाक्यांच्या बाजूला प्राचीन शिवमंदिराची एक पुष्करणी आजही दिसून येते . एवढ्या उंचावरही प्रचंड उन्हाळ्यातही पाण्याचे अस्तित्व दिसून येते हे त्या काळच्या पाणी व्यवस्थापनाचे अत्यंत समृद्ध असे उदाहरण आहे . अनेक प्राचीन लेण्यांमध्ये देखील कुंड व पानपोढी याची व्यवस्था केलेली दिसून येते . या लेण्यांमध्ये अनेक लोकांनी पानपोढी तयार करण्यासाठी दान दिल्याचेही माहिती मिळते . शिवकाळातील पाणी व्यवस्थापन महाराजांनी अत्यंत चोखपणे केलेले दिसून येते . रायगडाची बांधणी करताना रायगडावरील गंगासागर तलाव कुशावर्त तलाव हत्ती तलाव आणि इतर पाणी टाक्यांचा समूह हे त्याचे उदाहरण आहे . पुढच्या काळात थोरले शाहू महाराज व राजर्षी शाहू महाराजांनी देखील पाणी व्यवस्थापणाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते.
गंगाजलनिर्मल लोक कल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांनी तर त्यांच्या काळात अनेक पाणवठे , नदी घाट , बारव यांची नव निर्मिती केली . बहुतेक ठिकाणी जोर्णोद्धारही केला . सरकारी तिजोरीवर कसलाही भार पडू न देता अगदी स्वखर्चातून अहिल्यादेवींनी हे निर्माण कार्य घडविले . प्राचीन काळातील मुख्य रस्ते यावर देखील अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी बारव किंवा पानवठे आदींची निर्मिती केल्याचे उल्लेख आहेत . महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी एक गोमुखी धारेची पुष्करणी आहेत . जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पुष्करणी मधील गोमुखी धार हे प्राचीन पाणी व्यवस्थेचे आजही एक जिवंत असलेले उदाहरण आहे . मराठवाड्यातील वालूर येथील चक्राकार बारव त्याचबरोबर चारठाणा येथील पुष्करणी हे आजही आपल्याला खुणवते . महाराष्ट्रातील अशी कितीतरी सुंदर सुंदर बारवांचे उदाहरणे देता येतील . हे प्राचीन भारतातील त्या कालच्या पाणी व्यवस्थापनाचे मुख्य साधन होते . गाव -वाडी वस्ती त्या परिसराला पाणी पुरवण्याचे काम त्या काळात केले जायचे व काही ठिकाणी आजही होत आहे . त्याकाळच्या तंत्रज्ञानाने जमिनीतील पाण्याचा प्रवाह शोधून ही पुष्करणी / बारव तयार केली जायची . आज आपण पाहतो बहुतेक ठिकाणच्या बारव स्थानिकांनी कचराकुंडी म्हणून उपयोगात आणलेल्या दिसतात. काही ठिकाणच्या बारव या काळाच्या ओघात गाडल्या गेले आहेत .
रोहन काळे या मुंबईच्या नव-तरुणाने या बारवांचे महत्त्व जाणले . आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर महाराष्ट्र बारव मोहीम या रूपाने एक लोक चळवळ उभी केली या चळवळीच्या माध्यमातून बारवांचा शोध घेण्याचं काम रोहन काळे यांनी केले . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आतापर्यंत दोन हजाराच्या वर बारव त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बारवांचे गुगल मॅपिंग केले . स्थानिक लोकांमध्ये जाऊन लोकप्रबोधनाच्या माध्यमातून लोक जागृती केली आणि त्या परिसरातील बारवांची स्वच्छता मोहीम राबवली . बहुतेक बारव ह्या गाळाने गाळवटल्या होत्या त्या बारवांमधील गाळ काढणे ही फार मोठी कसरत होती स्थानिक लोकांच्या मदतीने हे फार मोठे कार्य रोहन काळे यांच्या प्रेरणेनेने सुरू झाले . वालूरची बारव ही स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना असलेली वास्तू कचऱ्याच्या विळख्यातून बाहेर आली आणि आज पोस्टाच्या तिकिटावर ती झळकत आहे . या लोकजागृतीची दखल मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमात घेण्यात आली 87 व्या भागामध्ये महाराष्ट्र बारव मोहिमेचा उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला आणि या स्वच्छता मोहिमेच्या चळवळीस शुभेच्छा देऊन ही लोक चळवळ झाली पाहिजे असे सांगितले . पुढे मन की बात च्या शंभराव्या भागातही रोहन काळे यांना प्रत्यक्ष आमंत्रित करण्यात आले होते . संपूर्ण महाराष्ट्रभर महाशिवरात्रीला बारवांची स्वच्छता करून त्या ठिकाणी दीपोत्सव देखील स्थानिकांच्या मदतीने रोहन काळे यांनी घडून आणले . आज बारव /पुष्करणी आदींच्या बाबतीमध्ये जी जागृती झाली ती या मोहिमेच्या माध्यमातून झाल्याची दिसून येते याचबरोबर बहुतेक बारवांचे मॅपिंगसह , दस्ताऐवजीकरणाचे काम आर्किऑलॉजिकल कॉलेजच्या मदतीने त्या बारवांचे मोजमाप घेऊन त्यांचा इतिहास शोधण्याचे काम देखील या मोहिमेच्या माध्यमातून हाती घेतले गेले आहे .
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री निमित्ताने महाराष्ट्र बारव दीपोत्सव.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या ३०१ वी जयंती निमित्ताने ३०१ बारव वर दीपोत्सव साजरा केला जाणार आहे . आपल्या गावात परिसरात अशा प्रकारची बारव अथवा पुष्करणी असल्यास त्या परिसरातील नव तरुणांनी समोर यावे . याशिवाय त्या परिसरातील सेवाभावी संस्था तथा प्रतिष्ठान यांनी देखील या कार्यात आपला हातभार नोंदवावा आणि आपल्या परिसरातील आपल्या पूर्वजांनी फार मेहनतीने व त्यांच्या तंत्रज्ञाने उभे केलेल्या या ऐतिहासिक वास्तूची स्वच्छता करून संवर्धन करावे आणि या भव्य दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी व्हावे असे अपेक्षा या महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून केली जात आहे .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा