हरिश्चंद्र पर्वतावरील - श्री हरिश्चंद्रेश्वर
➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . अकोले जि . अहिल्यादेवी नगर , संगमनेर - अकोले - राजुरवरुन पुढे २७ कि.मी.
➖➖➖➖➖➖➖➖
अनेक पुराण ग्रंथामध्ये सह्याद्री मधील हरिश्चंद्र पर्वताचा उल्लेख आढळतो . मत्स्यपुराणात तर पुण्यक्षेत्र म्हणून हा पर्वत मानला गेला आहे . कळसुबाई - साल्हेर - महाबळेश्वर नंतर हरिश्चंद्रपर्वताचा महाभूमितील सर्वोच्च गिरिशिखरात क्रम लागतो . तारामती - रोहिदास व बालेकिल्ला ही या पर्वताची उंच शिखरे गगणभेदी आहेत . या पर्वतावर असलेले हरिश्चंद्रेश्वराचे प्राचीन शिव मंदिर ही या पर्वताची ओळख आहे .निर्सगाचं अप्रतिम सौदर्य लाभलेल्या या ठिकाणास हरिश्चंद्रगड या नावाने या नावाने ओळखले जाते . रोज हजारो पर्यटक या स्थळास भेट देतांना दिसून येतात . हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात येणाऱ्या या महाकाय पर्वतावर हरिश्चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी पोहचण्यासाठी सहा वाटा आहेत . राजूर या गावातून २७ कि.मी डोंगर रांगा ओलांडत घनदाट जंगलातून पाचनई या पायथ्याच्या गावात पोहचता येते .या गावात मुक्कामास देखील राहता येते . येथून चढाईस सुरुवात होते दाट जंगलातून चढाई करत कड्या कपाऱ्यातून निर्सगाचा मनमुराद आस्वाद घेत दोन अडीच तासात गड सर करता येतो . चढाई फारशी अवघड नाही पण सराव आवश्यक आहे व बहुतेक ठिकाणी काळजी घेत जावे लागते . छोटे मोठे धबधबे हे सतत स्वागतासाठी वाटेत जागोजागी हजर असतात . डोंगर माथ्यावर पोहचताच एका पराड्यात हरिश्चंद्रेश्वराच्या कळसाचे दर्शन होते .एवढा प्रचंड डोंगर चढूनही पुढे तारामती शिखराचे महाकायरुप दर्शन देते . त्याच्या पायथ्याशी स्थानिकांच्या पर्यटकांच्या सोईसाठी छोट्या घरघुती हॉटेल आहेत . येथून मंदिराकडे चालत जात असताना प्रत्येक जण चौफेर दिसणारा निसर्ग न्याहाळतच मंदिरात जवळ येऊन पोहोचतो . सुरुवातीस कातळात कोरलेल्या काही पाण्याची टाकी निदर्शनास येतात त्याच्या समोरच निळ्याशार पाण्याने भरलेली चौरसाकृती सप्ततीर्थ पुष्कर्णी दिसते . याचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येते की ही पूर्वी पूर्णपणे भिंतीने बंदिस्त होती . दोन ठिकाणी उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत व तारामती शिखराच्या बाजूने 14 देव कोष्टके आहेत या देवकोष्टकामध्ये बघितल्यास मूर्ती ठेवण्यासाठी ची दगडांमधे खाच या ठिकाणी करण्यात आलेली आहे बहुतेक कोष्टकामध्ये मूर्ती आता शिल्लक नाहीत व पाठीमागेच तारामती शिखरातून उगम पावणारी मंगल गंगा वाहत येते . परिसरात छोटी उध्वस्त मंदिर समुह दिसून येतात . काताळात खोल पाण्याची टाकी खोदलेली आहेत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत . तेथून समोर गेल्यावर आपण हरिश्चंद्रेश्वराच्या गोपुरा समोर पोहचतो . पाठीमागे देखील दोन छोटी दगडी मंदिर आहे परिसरात अनेक मूर्तिशिल्पे दिसून येतात . हरिश्चद्रेश्वराचे मंदिर या खोल घळीत आहे . हजारो वर्षा पूर्वीच्या दगडी पुला खालून मंगळगंगा केदारेश्वर गुफेकडे वाहत जाते . बाहेर दोन किर्तिमुखे आहेत व देवनागरी लिपि मधील शिलालेख दिसून येतो आत देखील मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या लेणीच्या दर्शनी खांबावर शिलालेख आहे . याच खांबावर डावी कडील बाजूस देखील एक शिलालेख आहे .संपूर्ण मंदिरास पूर्वी चारही बाजूने सुरक्षात्मक योजना होती समोरून दरवाज्यातून खाली उतरल्यावर डाव्या बाजूस श्री विष्णू मंदिर व पाठीमागे जमीनीत पाण्याची टाकी व त्यावर लेणी समूह आहे . या टाक्यामधील पाणी अत्यंत थंड व पिण्यायोग्य आहे . ११ व्या १२ व्या शतकात या मंदिराचे निर्माण कलचुरी घराण्याच्या काळात झाले असावे असे जाणकारांचे मत आहे . सर्वतोवज्ञ या प्रकारात येणाऱ्या मंदिरास चारही बाजूने दरवाजे असतात . या मंदिरास समोरा -समोर दोन दरवाजे व मधे शिवलिंग आहे . इतर दोन बाजूस दगडी लाकडी दरवाज्या सारखी भासणारी दरवाज्यांची अप्रतिम प्रतिकृती दिसून येते . मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर द्वारपालाचे शिल्प आहे . चारही बाजूने कोनाड्यात हत्ती व माहुताचे उठावदार शिल्प असूून एका ठिकाणी माहूतास सोंडेत पकडल्या सारखे दिसते . अनेक यक्ष, गंधर्व शिल्प मंदिरावर आहेत . डाव्या बाजूस एक छोटे मंदिर व त्या बाजूस सुंदर गणेशाची मूर्ती आहे पूर्वी यास दगडी मंडप होता आता केवळ नक्षीयुक्त खांब उभे आहे . गाभाऱ्याच्या मागच्या दरवाज्यासमोर सुंदर नक्षी युक्त खांब व दोन्ही बाजूस ७ फुट उंच स्वतंत्र दगडात कोरलेल्या मुर्ती असून लागुनच लेणी आहे व त्या कमानीत नंदी शिल्प आहे . या गुफे मधे राहून संत ज्ञानेश्वरांचे बंधू योगीराज वटेश्वर चांगदेव यांनी तपश्चर्या केली . येथेच त्यांनी "तत्वसार" या महाकाव्याची रचना केली . त्यांचे शिलालेखही याची साक्ष देतात . या काव्यात ते म्हणतात
*हरिश्चंद्र नामु पर्वतु तेथ महादेओ भक्तु, सुर सिद्धगणी विख्यातु सेविजे जो, हरिश्चंद्र देवता मंगळ गंगा सरित सर्व तीर्थ पुरविता सप्तस्नान.*
मंदिरा मागे असलेल्या गुफा , पाण्याची टाकी व पुष्करणी मधील दगड या मंदिरा साठी वापरलेले आहेत . द्रविडी शैलीचा प्रभाव मंदिरावर दिसतो १६ मीटर पर्यन्त उंच गालाऱ्यावरील मंदिर शिखर व त्यावर दगडी आमलक व आता स्थापीत असलेला धातु कलश आहे .
येथून खाली वाहत जाणारी मंगळगंगेच्या सुंदर धबधब्याच्या बाजूला केदारेश्वर गुफा मंदिर आहे या केदारेश्वर गुफेला सुंदर अशा पाच सुंदर नक्षी युक्त कमानी आहे आत शिरताच भव्य असे पाच मीटर उंचीचे शिवलिंग नजरेस पडते या शिवलिंगाला चार स्तंभ दिसून येतात त्यापैकी तीन स्तंभ आता तुटलेले आहेत एका स्तंभावर जणू काहीही गुफा उभी आहे असे जाणवते प्रशस्त अशा गुफेमध्ये असलेले पाणी अत्यंत थंड असून या पाण्यात उतरल्यानंतर पुन्हा वर येतो तेव्हा पाय सुन्न होतात . डाव्या बाजूला भिंतीवरती शिवपार्वतीचे शिल्प कोरलेले आहे . गुफे समोरून वाहत जाणारी मंगळ गंगा पुढे पाचनई गावातून जाते . या ठिकाणी पर्यटन करतांना काळजी घ्यावी स्थानिकांची मदत घ्यावी व हे करत असतांना निर्सगाच पावित्र्य जपावे .भगवान शिव कि जे आदिनाथ आहेत , आदय गुरु आहेत . कल्याणकारी तथा ज्ञान - भक्ती - वैराग्य हे सार त्यांच्यात सामावलेले आहे. मानवी जीवनास योग व अध्यात्माची प्रेरणा शरणागतवत्सल , त्रिगुणातीत, जितेंद्रिया कडून मिळत राहते त्या दयासिंधू चरणी नतमस्तक होण्यास हरिश्चंद्रगडा शिवाय दुसरी कुठे जागा असेल असे मला तरी वाटत नाही .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा