शुक्रवार, ४ जुलै, २०२५

बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

 



बलदंड विंचूकडयाची साथ लाभलेला - लोहगड

➖➖➖➖➖➖➖

स्थान - ता .मावळ जि . पुणे , पुण्यावरून ६० कि.मी., उंची -३३८९ फुट

➖ .➖➖➖➖➖➖➖

     सहयाद्रीच्या भूगोलात फिरतांना महाभूमिचा प्रेरणादायी अन नवचैत्यन्य निर्माण करणारा इतिहास आपसुखच डोळ्यासमोर उभा राहतो . माय भूमिच्या रंध्रा - रंध्रात त्याग अन संघर्षाच्या आठवणी साठवल्या गेल्या आहेत . प्रत्यक्ष त्या स्थळी गेल्यावर जागृत झाल्या सारख्या वाटतात . जणू त्या घटनेचे आपण कधी काळी साक्षीदारच होतो की काय असा भास होतो . सह्याद्रीच्या मातीतच ही खरी जादू आहे .

          कुरवंडयातील नागफणी टेकडी पासून पवना अन इंद्रायणीच्या साक्षीने लोहगड , तिकोना ( वितंडगड ) , तुंग ( कठीणगड ) , विसापूर सोबतच प्राचीन भाजे , कार्ला , बेंडसे यासारख्या बौद्ध लेणी समुहात लोणावळा परिसराचं निर्सग सौदर्य अत्यंत फुलून जाते . पावसाळ्यात तर हा परिसर पुणे - मुंबईकरांनी हाऊसफुल होतो . या परिसरातील नावाप्रमाणेच अंगीभूत लोहा सारखा प्रचंड कणखर असलेला लोहगड पर्यटकांनी फुलून गेलेला असतो . पुण्यावरून लोणावळा मुंबई महामार्गाने जातांना मळवली पासून डाव्या बाजूस वळावे लागते . पुण्यावरून रेल्वेमार्गाने मळवली स्टेशनवरही उतरता येते . येथून  भांजे लेणी समूहाजवळून रस्ता पुढे अत्यंत चढाई व वळणाचा घाट चढून गायमुखखिंडीतून लोहगडवाडीत पोहचतो. पुण्यावरून देखीत कामशेत- पवनाजलाशयाच्या काठाने येणाऱ्या मार्गाने लोहगडवाडीत पोहचता येते . लोहगडाची दाट जंगलातून संपूर्ण परिक्रमा साहसी व प्रशिक्षित गिर्यारोहक करतात त्यांना या परिक्रमेत लोहगडच्या कठीण काताळात अनेक लहान गुफे सारखे लेणीसमूह व टाके आढळले आहेत . सामान्य पर्यटकाने हे साहस करू नये .  हजारो वर्षा पूर्वीचे बौध्द -जैन लेणी समूह या परिसरात आहे . लोहगड - विसापूर सारखे दुर्ग हे लष्करी तळा सारखे ज्या - त्या राजवटीच्या काळात सज्ज असल्यासारखे होते व आजही तसेच ताठ मानेने उभे आहेत .

         लोहगडवाडीतून पायरी मार्गाने गड चढाईस सुरुवात होते . दाट झाडी मधून दोन चार वळणे घेत वर गेले की वर प्रचंड मोठ्या बुरुजाचे दर्शन होते . या मधून निमुळती वाट काढत गेले की पहिला दरवाजा लागतो .हा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा , दोन्ही बाजूने गणेशाची मूर्ती शिल्प कोरली आहेत वर सुंदर कमान व तेवढेच आकर्षक नक्षीकाम नगाखाण्यासह दिसून येते . थोडे चालत गेले की समोरच एक तुटतेल्या तोफेसह चार तोफा आहेत व बाजूलाच एक देवनागरी लिपिमधील शिलालेख आहे . बाजूलाच एका बुरुजावर दगडी रेखीव घुमटासह मजबूत अशी खोली आहे यातून खाली नजर ठेवण्यास चऱ्या आहेत निवडक सैनिकासाठी विश्राम व्यवस्था येथे असावी . बाजूला मजबूत अशी तटबंदी आहे .वर नजर फिरवताच एकमेकांच्या सुरक्षेच्या कक्षेत येणाऱ्या बुरजांची रचना दिसून येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गडाच्या नावा प्रमाणे लोह धातू सारखी मजबूत अन रेखीव अशी आजही आहेत . पुढे काही पायऱ्या चढून सैनिकांच्या गस्तीसाठी मोठा मोकळा भाग दिसून येतो . प्रंचड मजबूत तटबंदी अन येथून एक भुयारी मार्ग देखील आहे व बाजूच्या कोपर्यातून एक चोर दरवाजा देखील आहे . ऐसपैस असलेल्या तटबंदीवर महादरवाज्याच्या रक्षणार्थ अर्ध गोलाकार बुरुज अगदी मधोमध वर जाणाऱ्या दगडी पायऱ्या हा येथील स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमुना आहे . येथून उजव्या बाजूला तटबंदी सह निमुळता मार्ग वर जातो व वळणावर काताळात दोन पाण्याची टाकी आहेत आजही अगरी काचासारखे स्वच्छ पाणी या टाक्यात आहे. पुढे नजरेस पडतो तो नारायण दरवाजा, याच्या दोन्ही बाजूस देवळ्या आहेत . शिवनेरी सारखी दरवाज्यावर दरवाजे व मजबूत तटबंदी अशी रचना या दुर्गाची आहे . सर्वात शेवटी व सर्वात मोठा हनुमान दरवाजा आपले लक्ष वेधून घेतो . शेवटी जर शत्रू या दरवाज्या समोर पोहचलाच तर चारही बाजूच्या तटबंदीच्या रचनेत त्याचे लढणे अशक्य आहे . हनुमान दरवाज्याच्या दोन्ही बाजूस सरक्षक देवता हनुमंताचे शिल्प आहे . दरवाज्याचे नक्षीकाम अप्रतिम आहे . आत आल्यावर इंग्रजी एल आकारात इमारतीचा भाग आहे .या ठिकाणी गडावर येणारे - जाणारे तथा इतर प्रशासकिय काम चालत असावे . उजव्या बाजूस पुन्हा एक कमान आहे व या कमानीतून वर आल्यावर एक घुमटाकार इमारत आहे . त्याच्या बाजूलाच शिवकालिन सभागृह (सदरेची ) इमारतीचा ओटा आहे त्यावर आता दोन तोफा आहे . संपूर्ण गडाला अगदी तटबंदी वरून फेरा मारता येतो . विसापूर किल्ल्याच्या दिशेने चालत गेल्यास इमारतीचे काही अवशेष दिसून येतात . त्याच्या समोरच काताळात कोरलेली घोड्याची पागा आहे . चारा - पाणी व्यवस्थेसाठी आत छोटे हौद आहेत . या पुढे असे चालत गेले की लक्ष्मी कोठीची गुहा आहे समोर मोठा हॉल व आत तीन ते चार टप्प्यात खोल्या कोरल्या आहेत . एकाच वेळी शंभरच्या जवळपास लोक या गुहेत आसरा घेऊ शकतात . या कोठी वरून गडाचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी सातवाहन काळापर्यन्त या गडाचा इतिहास पोहचतो . गुप्त, चालुक्य, राष्टकुट, यादव, बहामनी , निजामशाही, आदिलशाही, मोगल, शिवरायांचे स्वराज्य , पेशवाई व इंग्रज या सर्व राजवटीत लोहगडाची लोहाची भूमिका होती . १६४८ च्या आसपास लोहगड महाराजांनी घेतला होता . पुढे राजकिय तडजोडीत पुरंदरच्या तहात २३ किल्ल्यात लोहगड पण होता . १६७० मध्ये पुन्हा महाराजांनी त्याला स्वराज्यात घेतले . कारतलब खान , अमरसिह, रायबाधिन हे स्वराज्यावर चाल करत कोकणाच्या स्वारीवर जातांना याच जंगलातून कुरवंडे गावातून उंबरखिंडीत उतरतांना महाराजांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. १६६४ मध्ये सूरतेची केलेली लुटीतील खजाना नेतोजी पालकरांच्या नेतृत्वात या गडावर याच लक्ष्मी कोठीत ठेवला गेला होता . समोर गेल्यावर गायमुख खिंडीच्या वर एक दर्गा आहे . गडाच्या मध्यभागी उंच माथा आहे याला फेरा मारत निसर्ग निर्मित प्रंचड भिंती सारख्या विंचूकड्याकडे पोहचतो . पंधराशे मीटर लांब व तीस मीटर रुंद विंचवाचा सोंडेसारखा गडाच्या उंचीच्या थोडा खाली आहे . या बलदंड विंचूकडयाची साथ सदैव गडास राहीली आहे येथून सर्वदूर नजर ठेवता येते . माचीवर आयाताकृती पाण्याचे टाके आहे . अगदी टोकावर मजबूत चिलखती बुरुज आहे . खाली भुयारी मार्गाने या बुरुजास गोल फेरा मारता येतो . माचीवरून फिरतांना बहुतेक ठिकाणी काळजी घ्यावी लागते . परत हनुमान दरवाज्याच्या दिशेने जातांता काताळात कोरलेते अनेक पाण्याची टाकी आहेत . एका छोट्या टाकीत पिण्यायोग्य अत्यंत गार पाणी आम्हाला पिण्यास मिळाले . १६ कोनी प्रचंड मोठा पाण्याचा दगडी तलाव त्यात उतरण्याचा पायरी मार्ग सोबतच पाणी वर काढणे व सोडण्याची प्राचीन प्रणाली या वास्तुत बघायला मिळते . बाजूलाच वरच्या दिशेने एक छोटे शिवमंदीर आहे व त्याच्या पाठीमागे सुद्धा एक दगडी बांधकाम केलेला पाण्याचा सुंदर तलाव आहे . गडावर पाण्याची व्यवस्था अगदी चांगली असल्याने या गडाची प्राचीन राजकीय कारकिर्द ही महत्वाचीच राहिली आहे . इतर छोटे तलावही आहेत पण आता ते गाळात गाळले गेले आहेत . विविधरंगी रानफुले अन गवतामुळे याचे सौदर्य अधिकच मोहक दिसते . लोहगड  उतरतांना समोर दिसणारा तुंग , तिकोणा अन विसापूर , पवनेचे अप्रतिम निसर्ग सौदर्य आनखी पुढचे मुककाम वाढवा असेच खुणवत असतो .



संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...