लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली पाण्याची विहिर
➖➖➖➖➖➖➖➖
स्थान - पांढरेपाणी , ता . शाहूवाडी , जि . कोल्हापूर
पाणी.......!! हा जगभरातील प्राचीन संस्कृतीच्या भरभराटी मधील मुख्य गाभा आहे . यामुळे हजारो वर्षापूर्वीच्या अनेक ज्ञात - अज्ञात संस्कृती या नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाल्या . सुपीक जमीन , दळणवळण आदि बाबी हया नदीच्या परिसरात मानवी जीवन अधिक सुखकर बनवितात व यापुढे जाऊन व्यापार वाढतो संस्कृतीचे देवान घेवान होऊन कला , साहित्य , स्थापत्य याचा विकास होत जातो . मेसोपोटामिया सभ्यता ही नील नदीच्या कुशीत वाढली . सिंधू नदीच्या खोऱ्यात अत्यंत प्रगत अश्या सिंधू संस्कृती जन्मास आली . पीली नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृती वाढली असे जगभरात अनेक सभ्यता सांगता येतील त्याचा मूळ आधार पाणी हाच राहीला आहे . भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात प्राचीन काळापासून असलेले अवशेष आजही सापडतात . भिमबेटका हे ठिकाण त्याच परिसरात येते . माणूस भटक्या अवस्थेत होता तेव्हाचे अवशेष आजही तेथे चित्ररूपाने कायम आहेत . गंगा , ब्रम्हपुत्रा आदि नदयांच्या खोऱ्यातही हजारो वर्षापासून असेच होते . नदीच्या प्रलयात अनेक अज्ञात अवशेष हजारो वर्षापासून जमीनीत गडप झालेले आहेत. सिंधु नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो ' हडप्पा या ठिकाणी उत्खलनात प्राचीन शहरे वर आली . त्यांची त्या काळची नगर रचना , पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था ही आजही आदर्श मानली जाते . २९ x २३ फुट असलेले पाण्याचे कुंड हा त्या ठिकाणचा पाण्याचा पाणवठा हा विशेष आहे . ४०० वर्षापूर्वी दक्षिणेचे प्रवेशद्वारा असलेल्या बऱ्हाणपूर या शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी कुण्डी भंडारा हया वास्तुचे निर्माण झाले .
*रहीमन पानी राखिये ,बीन पानी सब सून*
*पानी गये ना ऊबटे,मोनी मानुष चून ।।*
पाण्याची जपून साठवण करा ,पाण्याविना काहीच नाही,पाणी गेल तर माणसाचं काही खर नाही या गोष्टीचा विचार करून त्याने शहराच्या भरभराटीसाठी " कुण्डी भंडारा " ही योजना पूर्णत्वास नेली.
सातपुड्यातील पर्वतरांगेतून प्राकृतिक पध्दतीने पाण्याचे संग्रहण केले .भूमीगत पाण्याचा स्तोत्र शोधला त्याला एकत्र केले व हे पाण्याचे स्तोत्र नहर रूपाने जमीनीत ८० फुट खोलावरून वाहत शहराकडे आणले यासाठी १०० कुंडी तयार केल्या. आजही ती योजना बऱ्याच अंशी कार्यान्वित आहे . पूर्वीचे औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेली पवनचक्की व या शहरातून काढलेल्या जमिनीतून भूमिगत असलेल्या प्राचीन पाण्याच्या नहरी हे त्याकाळच्या प्रगत व्यवस्थेचे उदाहरण म्हणावे लागेल . कन्नड तालुक्यातील पितळखोरा या लेणीमध्ये देखील डोंगर उतारावरून वाहत आलेले पाणी एकत्रित करून त्याचा वापर कसा करावा याचे वास्तुशिल्प आजही त्या ठिकाणी जिवंत आहे .
जागतिक दर्जाचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या ठिकाणी असलेले गोमुखातून पडणारे पाणी हा देखील त्या काळातील वास्तुशिल्पाचा तसेच प्रगत जल व्यवस्थापनाचा अद्भुत नमुना आहे असे लहान मोठे अनेक गोमुख रचना असलेले पाण्याचे स्त्रोत महाराष्ट्रात आहेत . याची भूमिगत रचना अजूनही आपच्या स्थापत्यशास्त्रास पूर्णपणे समजू शकली नाही .
शिवजन्म पूर्व काळ आणि शिव जन्मानंतरच्या काळातही महाराष्ट्रात पाणी या स्त्रोतासाठी फार महत्त्व दिले गेले . गडकोटावर गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारे पाणी असो किंवा जनसामान्यांच्या रोज रहाटी साठी लागणारे पाणी असो या दोन्हीचे व्यवस्थापन त्या काळातील जाधव -भोसले वंशियामधील रयत वत्सल लोकांनी केले .
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांचे जन्मस्थळ असलेले राजे लखोजी राजे जाधव यांच्या सिंदखेडराजात पाणी व्यवस्थापनाचे अनेक उदाहरणे सापडतात त्या ठिकाणी निर्मिलेल्या वास्तु ह्या केवळ राजवंशीयांसाठी नसून त्या जनसामान्यांच्या उपयोगात कशा येतील याची व्यवस्था केलेली दिसते . यामध्ये चांदणी तलाव, सजना बारव, मोती तलाव , पुतळा बारव ही आजही जिवंत अवस्थेतील पाणी व्यवस्थापनाच्या वास्तू जनतेच्या सेवेत दिसून येतात . १६०६ मध्ये मालोजीराजे भोसले यांनी पाणी व्यवस्थापणार्थ शिंगणापुरी तळे बांधिले असा उल्लेख आढळतो . आक्टो . १६५४ मध्ये दक्षिण भारतात मल्लसमुद्र शिलेवर मोजे . मुंदुवाडी ता . कोलार येथे संभाजीराजे यांच्या प्रतिनिधिने तलाव बांधण्यासाठी जमीन दिल्याचा उल्लेख येतो. स्वराज्यात 350 च्या वर गडकोट किल्ले होते त्यापैकी अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले व अनेक किल्ल्यांचा डागडुगी करून ते अधिक बळकट करण्याचे काम महाराजांनी केले . गड किल्ल्यावर पाण्याचे व्यवस्थापन म्हणजे शिवकालीन पाणीसाठवण योजना ही अत्यंत काटेकोरपणे पाळली जायची . दुर्ग दुर्गेश्वर रायगड आपण जर बघितला तर यावर गंगासागर तलाव, हत्ती तलाव ,कोळींबतलाव, त्याचबरोबर कुशावर्त तलाव यासह बारा टाकी समूहासारखी अनेक प्राचीन पाण्याची स्त्रोत रायगडावर आहेत . अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही रायगडावर पाणी शिल्लक असल्याची दाखले आढळतात . वाघ दरवाज्याच्या बाजूने असलेला कुशावर्त तलाव त्याची भिंत जर आपण बघितली तर त्या भिंतीच्या मधोमध खाली गोमुख बसवलेले आहे . ही रचना अजूनही आपल्या विचार कक्षेच्या पलीकडची आहे .एखाद्या गावात जर थांबले तर पाणवठ्या वरचे पाणी गरजे पेक्षा जास्त घेऊ नका... वापरू..... नका अशी सक्त ताकिद महाराजांनी आपल्या मावळयांना दिलेली होती .
रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात सांगितले आहे . "तैसेच गडावरी आधी उदक पाहून किल्ला बांधावा . पाणी नाही आणि ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे ऐसी मजबूत बांधावी .गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीही पुरते, म्हणून तितक्यावर निश्चिती न मानिता उद्योग करावा . कीनिमित्त की, जुझामध्ये भांडियाचे आवाजा खाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो , तेव्हा संकट पडते . याकरिता तैसे जागा जकिरियाचे पाणी म्हणोन ,दोन-चार तळी टाकी बांधोन ठेवून त्यातील पाणी खर्च होऊ द्यावे . गडाचे पाणी बहुत जतन राखावे . " एवढे सूक्ष्म नियोजन शिवरायांचे होते महाराज जलतज्ञ होते त्यांना भूगर्भाचाही तेवढाच अभ्यास होता . भूगर्भानुसार कोणत्या ठिकाणी कोणती पाण्याची योजना राबवावी हे त्यांना ज्ञात होते .
रयतेच्या कल्याणार्थ झटणाऱ्या छत्रपतींना राज्य व्यवस्था सांभाळतांना युद्धादि धामधुमितही रयतेच्या प्रश्नाची जाण होती . याची प्रचीती पावनखिंड जवळच असलेल्या पांढररेपाणी गावात असलेल्या एका छोटयाश्या विहिरीवरून येते . पन्हाळयाच्या वेढ्यातून रात्रीच्या प्रहरी बाहेर पडून मसाई पठार - धनगरवाडी या मार्गाने महाराज सकाळी तांबड फुटतांना या गावात पोहचले होते . येथून चार-पाच किलोमीटर अंतरावर पावनखिंड आहे त्या पावनखिंडीतच स्वराज्याच्या मावळ्यांनी स्वामीनिष्ठतेची कसोटी दिली आणि स्वराज्यासाठी महान बलिदान देवून महाराजांना सुखरूप विशालगडी पाठवले . पांढरपाणी गावात पावनखिंडीकडे जात असताना गावातुन उजव्या बाजूला शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली विहीर असा फलक दिसतो. तेथून थोडं खाली गेल्यानंतर ती विहीर दिसते विहीर अगदी छोटी आहे परंतु दगडाने मजबूत अशी बांधलेली ही विहीर पाणी घेण्यासाठी खाली उतरण्यास गोलाकार पायऱ्या सुद्धा आहेत . आजही त्या विहिरीचे स्वच्छ सुंदर निर्मळ पाणी महाराजांचे आठवण करून देते . स्थानिकांनुसार अशी आख्यायिका सांगितली जाते की महाराज एकदा विशाल गडी जात असताना या गावात थांबले असता एका वृद्ध महिलेने महाराजास भाकरी खाण्यास दिली त्यावेळेस महाराजांनी त्या वृद्ध महिलेस काय पाहिजे आहे हे विचारले असता तिने सांगितले की ,महाराज उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई आहे म्हणून पाण्याची काही तरी व्यवस्था करावी .महाराजांनी विशालगड घेतल्यानंतर त्या ठिकाणी ही विहीर बांधून दिली असे सांगितले जाते . स्वराज्यातील लेखी बाळींना पाण्यासाठी वन वन करायला लागू नये म्हणून महाराजांनी स्वतः ही विहीर बांधून दिली आणि या भागातील ले की बाळींचा पाण्याचा प्रश्न सोडवला . पावनखिंड मोहिमेवर जाणाऱ्या प्रत्येक मावळ्याने या विहिरीस जरूर भेट द्यावी आणि महाराजांच्या जनसामान्यांसाठी असलेल्या पाणी व्यवस्थापनाचे हे वैश्विक स्थापत्य सर्वांना ज्ञात करून आपले राजे हे रयतेच्या अगदी शेवटच्या घटकाचाही विचार किती सूक्ष्म पद्धतीने करायचं हे दाखवून द्यावे .
संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा