*वर्षा पर्यटन करताय ! काळजी घ्या !*
आता पावसाळा सुरू झालाय नदी , नाले, छोटे मोठे धबधबे त्यातच धरतीमाईने डोंगर - दऱ्या अन पठारावर पांघारलेला हिरवा शालू हा पर्यटकाला निश्चितच आकर्षक बनवितो . महाभूमित वर्षा पर्यटनांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक आप आपल्या सोईने बाहेर पडतात . सोशल मिडियावरही रिल्स , सेल्फीच्या महापूराने सर्वत्र भूरळ घालतात . लोणावळा , भीमाशंकर , जुन्नर परिसर , नाणेघाट , माळशेज घाट , कळसूबाई , भंडारदरा , नाशिक परिसर , हरिशचंद्रगड ,महाबळेश्वर , मावळ , आंबेगाव , खेड , मुळशी, भोर, इंदापूर अशी कितीतरी पर्यटनक्षेत्र पर्यटकांनी फुलुन जातात .आपण राहतो त्या परिसरात देखील अशी अनेक लहान मोठी पर्यटन स्थळे असतात व त्या ठीकाणी परिसरातील पर्यटक पोहचत असतात . सुटी अन शनिवार - रविवार या काळात तर जत्राच भरते. निर्सग जेवढा आल्हाददायी अन आनंद देणारा आहे तेवढाचं आपण काळजी घेतली नाही तर वेळ प्रसंगी रौद्र ठरू शकतो . गेल्या वर्षी भुशी डॅम मध्ये एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती पाण्याचा प्रचंड प्रवाह एकदाच आला त्याचा अंदाज त्यांना घेता आला नाही व ही पाचही व्यक्ती दगावली . मागच्या आठवड्यात मावळ मधील कुंडमळा या इंद्रायणी मधील साकवं पूल पर्यटकांच्या गर्दीत तुटला व त्यातही मोठी जीवितहानी झाली . आपल्या परिसरातही पाण्याचा अंदाज न आल्याने जीवितहानी झाल्याचा अनेक बातम्या आपण ऐकतच असतो . हौशी पर्यटक काळ आणि वेळ न बघता बेत आखतात एक - दोन कुंटुब कोणतीही पूर्वतयारी न करता पावसाळी ट्रेक वा पर्यटनास निघतात व अश्या घटना घडतात . प्रशासन याची खबरदारी घेते धोकादायक ठिकाणी तशी फलक योजना देखील असते . अवघड ठिकाणी लोखंडी कठडेही असतात पण अति उत्साही पर्यटक या नियमावली बाहेर जातांना दिसतात . यावर्षी जून च्या पहिल्या आठवडयात हरिशचंद्र गडावर जातांना पाचनई गावाच्या वर घळई मधील धबधब्या वरील पठारावरील कुंडाजवळ प्रशासनाने सावधानतेचा इशारा फलक लावलेला असतांनाही त्या कुंडात अगदी लहान मुले घेऊन पर्यटक जल विहार करत होते . कोकणकडयावरही मुक्तपणे हजारो फुट खोल दरीत पाय लांबवत सेल्फी अन रिल्स काढत होते .आपल्याकडे सार्वजनिक जीवनात आपत्ती व्यवस्थापनाची जागृती फार कमी असंल्याने असे प्रकार दिसून येतात . रितसर प्रशिक्षण अन साहित्यासह शास्त्रशुद्ध पद्धतीने पर्यटन केल्यास धोका शून्य होतो . पण आजकाल ट्रेकरने एखाद-दुसरा ट्रेक केला की तो आपला हौशी गृप करून ट्रेकिंगला सुरुवात करतो . अज्ञान व अतिसाहसामधे असे स्वताःहून गेलेले हौशी पर्यटक वन्यजीव , रस्ता भटकणे व इतर अपघात आदिचे बळी ठरतात . मागे पुण्याचे काही मित्र असेच हरिशचंद्र गडावर भटकले अन थंडी, पाऊस अन उपासमारीचे बळी ठरले होते . शेवटी नाईलाजाने प्रशासन अश्या भागात वर्षाऋतु मध्ये बंदी घालावी लागते .१६३ सारखी कलम लागू करावी लागतात तशी परिस्थिती आता मावळ , लोणावळा ,भूशी डॅम , मुळशी या परिसरात झाल्याची दिसून येते . त्यामुळे पर्यटनात एक आदर्श पर्यटक म्हणून निर्सगाचा मनमुरादआनंद लुटता आला पाहिजे तरच पर्यटनास अर्थ आहे .
*वर्षा पर्यटनात हे करा*
♦️ साहसी ठीकाणी शासनमान्यता प्राप्त संस्था , गृप सोबत पर्यटन करा .
♦️ चांगले ग्रीफ असलेले बुट वापरा . एकदम नवीन बुट घालू नका त्या बुटांचा आठ दहा दिवस सराव असावा .
♦️सर्व अंग झाकले जाईल असे कपडे घाला .
♦️ सेल्फी , रिल्स साठी अतिसाहस टाळा .
♦️ वाहत्या पाण्यात उतरणे टाळा .
♦️ हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा .
♦️ डोंगरावर काळे ढग आल्यावर धबधबे व दरीत थांबू नका .
♦️ स्थानिक किंवा वाटाड्याची मदत घ्या . एकटयाने माहीत नसलेल्या वाटेने जाऊ नका .
♦️ स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा जाण्या अगोदर प्राथमिक अभ्यास ठेवा .
♦️ धबधब्याच्या धारेखाली थांबू नका घरंगळत येणारे दगड अपघात करु शकतात .
♦️ उंचावर हवेचा जोर व धुक्याचा अंदाज घ्या .
♦️ प्रथमोचार व आवश्यक औषधे सोबत ठेवा .
♦️ सुखा मेवा व इतर फास्ट फुड सोबत असू द्या .
♦️ तोंडाने श्वास टाळा . तहान लागल्यास गटा गटा पाणी पिणे टाळा .
♦️ उंच ठिकाणावर , दरीत शेवाळलेल्या ठिकाणी काळजी घ्या .
♦️ चढ - उतारात काठीचा वापर करा .
♦️ गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका .
♦️ निर्सगात कुठलेही व्यसन करू नका .
♦️ सुगंधी तेल व परफ्युम लावणे टाळा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा