मंगळवार, १७ जून, २०२५

निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी ➖➖➖➖➖➖

 



निर्सगाचा अप्रतिम अविष्कार - सांधण दरी

➖➖➖➖➖➖

स्थान : ता अकोले जि . अहिल्यादेवी नगर 

➖➖➖➖➖➖➖

     आपल्या महाभूमितील उत्तर दक्षिण पसरलेली सह्याद्री पर्वत  रांग ही महाराष्ट्राचा भूगोल आहे पण या महाभूमिच्या भूगोलावरच ज्ञात असलेला हजारो वर्षा पासूनचा अत्यंत समृद्ध व प्रेरणादायी असा इतिहास उभा राहिला आहे. हाच सहयाद्री इतिहासातील अनेक क्रांतीचा क्रांतिकेंद्र ठरलाय .  याच सहयाद्रिच्या कुशीत  जीवनदायी ठरलेल्या अनेक नदयांचा उगम होतो . नानाविध दुर्मिळ व उपयोगी वनस्पतीच्या अभयारण्यात विविध जीव- सजीवांचा अधिवास आहे . पशु -पक्षांचा  संचारही तेवढाच मुक्तपणे आढळून येतो . माणसापासून कोटयावधी जैवविध सजीवांची श्रृखंलाच सहयाद्री च्या कुशीत आपले जीवनचक्र पूर्ण करतांना दिसतात . कोट्यावधी वर्षापूर्वी ज्वाला मुखीच्या उद्रेकातून तप्त लाव्हारसातून दख्खनच्या पठारासह मजबूत बेसॉल्ट खडकापासून सहयाद्री पर्वत रांग निर्माण झाली . बेसॉल्ट हा जणू काही मजबूत कणाच बनला . आपण ज्याला उडदया खडक म्हणतो की ज्यात पांढरे , हिरवे खनिजे दिसतात काही ठिकाणी याच उड़दया खडकात छोटे - छोटे रिकामे बुडबुडेही दिसतात व त्या पेक्षाही पूर्ण बेसॉल्ट म्हणजे अगदी काळा पाषाण अशी मजबूत खडकांचा  कणा सहयाद्रिस अधिक ताठर बनवितो . शेकडो जागतिक वारसा ठरलेली लेणी समूह व मंदिरे निर्माण कार्यात याच सहयाद्रीने आपले योगदान दिले .सातवाहनापासून निर्मित होत असलेल्या गड कोटास आपल्या शिरावर घेतले . शिव काळात यात अधिकच भर पडत गेली व शिखरा - शिखरावर त्याग व प्रेरणेचा प्रतिक ठरलेला भगवा डौलात फडकविण्यास प्रेरणा दिली . 

          या मातीतल्या माणसास सहयाद्रिचे सौदर्य केवळ डोळ्यात साठवण्यापुरते नसून ते मनाशी जोडलेले ठरले आहे . निर्सगानेही सह्याद्रिस अनेक चमत्कारीक अविष्कार निर्मितीतून त्याच्या सौदर्यात अधिक भर घातलेली दिसून येते . हरिशचंद्र गडावरील असलेला अर्धचंद्राकृती कोकणकडा हा हवा व पाण्याचा अविष्कारच आहे . माळशेज घाट तर वर्षाऋतुत वर -वधू सारखा सजून बसलेला असतो . जीवधन किल्ल्याचा वानरलिंगी सुळका खालून अरे व्वा ! अन वर गेल्यावर अरे बापरे ! नक्कीच वदवून घेतो . अलंग , मदन , कुलंग सारखे बहुतेकांनी न पाहिलेले अन साहस नसेल तर कधीच बघायला न मिळणारे प्राचीन किल्ले नुसते चित्रातूनही धडकी भरवतात . रतनगडाचं नेढं पाहून हे कुणी अन कशासाठी केल असेल म्हणून प्रश्न विचारायला भाग पाडते .त्याच्या शेजारचा अंगठया सारखा डोंगरही अचंबीत करतो . पन्हाळ्या जवळील  शिव पद स्पर्शाने पावन झालेले विस्तिर्ण मसाई पठारही अचंबीत करते . नाना विध दुर्मिळ फुलांनी सजनारे कास पठारही वेगळ्याच वनस्पती शास्त्राच्या दुनियेत घेवून जाते . महाभूमित सर्वोच्च शिखर कळंसूबाई जसा गगणास भेदतो तसाच त्याच परिसरात जमीनीत खोलात असलेली आशिया खंडांतील दुसऱ्या क्रमांकाची असलेली सांधण दरी हा निर्सगाचा एक अदभूत अविष्कारच आहे . सादन किंवा सांधण असेही या दरीस म्हणतात . घळ किंवा घळईसारखी असलेली २०० ते 300 फुट खोल आणि दोन कि .मी लांब अशी ही दरी आहे . सततच्या खडकाच्या क्षरणाळे किंवा भूगर्भिय हालचाली मुळे अश्या घळई निर्माण होतात . पाण्याच्या प्रवाहाने सतत झीज होत राहून दरी तयार होते होते . हिमालयातून उगम पावणाऱ्या सिंधू , सतलज , ब्रम्हपुत्रा यांच्या प्रवाहाने अनेक खोल दऱ्यातून  त्या उसळत जातात . भारतातील नर्मदा नदीने भेडाघाटात संगमरवरी खडकातून तयार केलेली घळई प्रसिध्द आहे . सांधण दरी याला अपवाद नाही . त्यात रतनगड , भंडारदरा धरण , कळसूबाई ही सौदर्यात अधिक भर घालतात . क्रतिवीर राघोजी भांगेरे जलाशय म्हणजे भंडारदरा धरणाला संपूर्ण वेढा घालून हा थरार अनुभवता येतो . शेंडी या गावातून मुरशेत - पांजरे - उडदावने- साम्रद या अगदी छोटया गावात पोहचून वाहने त्या ठिकाणी उभी करून एक दिड कि .मी चालत जाऊन या दरीत महाकाय दगडाच्या मधून मार्ग काढत जावे लागते . दोन कि. मी . पर्यत ह्या दरीचे दोन्ही कडे जनू एकमेकांशी संधान बांधत अगदी निमुळती होत जातात . वर पाहताच  लांबट खिंडीतून केवळ आकाश दिसते . सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हाच त्याचे दर्शन येथून होते . वर्षभर या घळीत काही ठिकाणी पाणी असतेच बहुतेक ठिकाणी पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागते . साहसी प्रवासातून दरीच्या शेवटच्या टोकावर पोहचून आजोबा डोंगराचे दर्शन होते . सांधण दरीत पर्यटन करायचे असल्यास पावसाळ्यात येणे टाळावेच. पावसाळयात ही दरी अत्यंत धोकादायक आहे . साम्रद गावात घरघुती जेवणाची व्यवस्था होते .  पुणे -मुंबई - नाशिक व आता समृद्धीमुळे संभाजीनगर काही तास अंतरावर असल्याने सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी या परिसरात असते .पर्यटकांनी हा परिसर अगदी फुलुन जातो.  मुंबईकर कल्याण -कसारा घाट - इगतपुरी - घोटी - शेंडी व पुणे व छ .संभाजी नगरकरांना संगमनेर अकोले -राजूर - शेंडी असे या ठिकाणी पोहचता येते . पुढे ह्याच वाटेने धरणाला वळसा घालत गोदावरीत विलिन होणाऱ्या प्रवरेचा उगम असलेल्या रतनवाडीचे प्राचीन अमृतेश्वर मंदिर की ज्या ठिकाणी एक अत्यंत सुंदर पुष्करणी आहे पुढे - नेकलेस फॉल - कोलटेंभे - मुतखेल या मार्गाने पुन्हा भंडारदरा धरणावरुन गोल फेरा मारून शेंडीला पोहचता येते .



संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...