,*पालीच्या बल्लाळेश्वराजवळील - सरसगड*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
स्थान - ता - सुधागड (पाली ) जि . रायगड , पुणे - लोणावळा - खोपोली ११ ८ कि. मी ., मुंबई वरून - पनवेल - नागोठाना मार्गे ११० कि .मी .
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर मंदिराच्या पूर्वेस अगदी लागून प्रचंड महाकाय दिसणारा पर्वत मला अनेक वेळा खुणवत होता. हा गड आहे हे बऱ्याच पर्यटकांना कळतही नाही दुर्ग भ्रमंतीच वेड लागल्यावर याची चढाई करण्याची संधी हिंदवी परिवाराचा सदस्य म्हणून मिळाली . पाली या ठिकाणी भक्त निवासात थांबण्याची चांगली सुविधा आहे.सकाळीच उठून जवळच 3 किं मी अंतरावर असलेल्या उन्हवरे या गरम पाण्याच्या झऱ्यात अंघोळ करून पालीच्या गणेशाचे दर्शन करून मार्गस्त होता येते . मंदीराच्या बाजूने पूर्व दिशेने गावा बाहेर जाणा-या रस्त्याने आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत पोहचतो . तेथून पायवाटेचा मार्ग छोटया बाण खुणांनी दर्शविलेला आहे. गडाच्या माहीतीचा फलकही येथे दिसतो . झाडी -झुडपा मधून चढणीची वेडी वाकडी पाऊल वाट दहा पंधरा मिनिटाच्या चढाईने आपल्याला गडाचे दर्शन घडविते . काळ्या पाषाणातील महाकाय सरसगड अधिकच लक्ष वेधून घेतो . झाडा - झुडपातून जाणारी घसरंडीची पायवाट जशी जशी आपल्याला उंचावर घेऊन जाते तसे तसे पाली शहराचे सुंदर दर्शन होत जाते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .पूर्वी येणारे - जाणारे व चौकी पहारेकऱ्यांसाठी अशी टाकी गडाच्या चौफेर असत . चालत राहिल्यावर चढाई अधिक तीव्र होत जाते . पुढे दगडात कोरलेल्या खाचे असलेल्या पायऱ्या लागतात . ही चढाई सावधतेने करत जावे लागते . खाली खोलगट भाग असल्याने काही ठिकाणी एकमेकांना सरक्षण देत वर चढत जावे लागते . आपण पहील्या कातर पाषाणा जवळ पोहचल्यावर त्या ठिकाणी एक गुहा दिसते . चौकोनी असलेली ही गुहा आत निमुळती होत जाते व पुढे यात एक छोटी खोली आहे सैन्याच्या आश्रयासाठी ही व्यवस्था होती . येथूनच दोन भव्य पाषाणातून वर जाणाऱ्या घळीतून पायरी मार्ग आहे . खालून चालत आलेल्या साठी अगदी दमछाक करणाऱ्या हया ९६ पायऱ्या आहेत . याची उंची दोन फुटाची आहे . वर जातांना येथे मोठा थरारक अनुभव येतो ,शरीराचा तोल पुढे ठेवतच वर चढावे लागते . पुढे आपल्याला दिसतो दोन बुरुजामधे एकाच पाषाणात कोरलेला दिंडी दरवाजा हजारो वर्षापासून शाबुत असलेली ही वास्तु एक अदभूत वास्तुशास्त्राचे वैभव आहे . आत प्रवेश केल्याबरोबर सैनिकासाठी काताळात कोरलेल्या ऐसपैस देवड्या आहेत . उजवीकडे वळण घेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याने आपण बुरुजावर पोहचतो तेथून खाली घळीतीत पायऱ्याचे दृष्य कॅमेऱ्यात टिपल्या शिवाय कुणीही पुढ जात नाही येथून वर चढल्यावर बाले किल्ल्याचा भव्य कातळ कडा दिसतो याला गोल फेरा मारता येतो व यावर बालेकिल्ला आहे . तरबंदी मजबूत आहे पण फिरतांना काळजी घ्यावीच लागते .याच्या कुशीत काताळात पाण्याची असंख्य टाकी कोरलेली आहेत . उत्तरेकडे चालत जातांना या काताळात भव्य व विर्स्तीर्ण गुहा आहेत . याचा उपयोग निवास , भांडार , दारूगोळा आदि साठी होत असे . अशी मान्यता आहे की या गुहेत पांडवांनी वास्तव्य केले आहे. कोरीव शैलगृहावरून हा गड अत्यंत प्राचीन आहे . प्राचीन काळी देशावर व्यापार चालायचा बंदरावरून जाणारा माल या भागातून जात असे तेव्हा पासून चौकी पहारा आदि साठी हा गड महत्वाचा होता .निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदने कोकणाकडे आल्यावर सुधागड , घनगड , कोरीगड सोबतच सरसगडही घेतला होता . नारो मुकुंद यांनी हा गड स्वराज्यात घेतला होता .त्यांच्या कडे या गडाची सबनिशी होती . पेशवाई नंतर हा गड भोर संस्थानाकडे गेला .१८१८ नंतर इंग्रजांचा ताब्यात होता .
गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहे दक्षिणेकडून दिंडी दरवाज्यातून येणारा मार्ग व दुसरा उत्तरे कडून महादरवाज्यातून येणारा दुसरा मार्ग होय होय . या दरवाज्याच्या वर एक उध्वस्त इमारतीचा पाया व त्याच्या समोर एक बुरुज आहे . या इमारतीच्या बाजूनेच बालेकिल्ल्यावर जाण्यास मार्ग आहे . चढाई करतांना थोड़ा अवघड मार्ग असल्याने शिस्तीने व काळजी घेत जावे लागते . वाटेत एक पाण्याचे टाके आहे .बालेकिल्ल्यावर पोहचताच इमारतीचे अवशेष दिसतात उंच गवता मधून पायवाटेन पुढं आपणास पीर दिसतो . या बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे . या ठिकाणी प्राचीन मंदिराच्या खांबाचे व इतर अवशेष दिसतात .सतीशीळा देखील आहेत . हे मंदिर बांधीव तलावात आहे या तलावातील पाणी आटत नाही एवढ्या उंचावरही पाण्याची सुविधा हे सरसगडचे मुख्य वैशिष्ट्येच म्हणावे लागेल या तलावात कमळाची फुले देखील आहेत .व बालेकिल्ल्या वरून सुधागड , कोरीगड, माणिकगड कर्णाळा व इंद्रायणी नदीचा उगमस्थान जवळील नागफणी टेकडी येथून दृष्टीस पडते . अंबा नदीचे विस्तीर्ण खोरे व वळण घेत येणारा प्रवाह मनमोहक दिसतो .
सरसगड हा अवघड चढाईचा आहे . पाली गावातून निघतांना पाणी सोबत ठेवावे . अवघड ठिकाणी फोटो व सेल्फीचा मोह टाळावा . गडउतार होतांना उत्तरेकडील महादरवाज्याने खाली आलो लॉकडाऊन मधे हा मार्ग कुणी वापरला नसल्याने गवत वाढलेले होते . हिंदवी परिवाराच्या मोहिमेत गवत काढत खाली उतरलो वाटेत गवतात सापही दिसले त्यामुळे काळजी घ्यावीचं लागते . बहुतेक ठिकाणी दोरखंड वापरून उतरावे लागले या मार्गाने उतरतांना माहीती घेवूनच उतरावे पुढे जंगलातून एका डांबरी रस्त्याला लागून रामअळीतून पाली गावात पोहचता येते .
संजय खांडवे






































