मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )



शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन : किल्ले विश्रामगड (पट्टागड )

➖➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता . अकोले जि. अहमदनगर
उंची : १३९१ मी
मार्ग :  समृध्दी महामार्गावरून सिन्नर किंवा भारवीर इंटरचेंज जवळून उतरून, किंवा संगमनेर वरून अकोले - राजूर मार्गे जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्सगाचं अप्रतीम सौदर्य हे सहयाद्रीत च बघायला मिळते . याच कुशीत अहमदनगर व नाशिकच्या अकोले तालुक्यात उत्तर दक्षिण दक्षिण पसरलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगेत हा किल्ला येतो .संगमनेरवरुन जातांना अकोले-राजूर-वाकी-मानेरे-देवगाव -खिरवडी मार्गे या विश्रामगडावर जाता येते .दुसरा ठाणगाव मार्गे सिन्नरवरुनही जाता येते .याच परिसरात महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसूबाई शिखरही आहे .दुर्गप्रेमीसाठी अत्यंत अवघड श्रेणीत येणारे गिरिदुर्ग अलंग,मदन,कुलंग याच डोंगर रांगेत येतात .हरिशचंद्रगड ,रतनगड,भंडारदरा धरण,सानंददरी याच परिसरात येतात . सर्वतीर्थ जटायु मंदिर टाकेद व सिन्नर येथील प्राचीन गोंडेश्वर  मंदीर जवळच आहेत . एका भल्या मोठ्या लांब पट्टया सारखा दिसणारा हा गिरीदुर्ग पट्टा गड मन प्रसन्न करतो . शिवाजी महाराजांनी या किल्यावर काही दिवस विश्रांती केली होती म्हणून याचे नाव विश्रामगड पडले . वरील मार्गाने आपण पट्टावाडी जवळ पोहचलो की डांबरी रोडने थोडे पुढे गेले की आधुनिक काळातीत एक सिमेन्टची कमान दिसते . या ठिकाणी चौकी आहे .नाम मात्र प्रवेश फी भरून प्रवेश मिळतो . वनखात्याच्या माध्यमातून या परिसरात सवंर्धनाचे काम झालेले दिसते . समोरच एक तोफ व आताच्या काळात बसविलेला हत्ती दिसतो . समोरच किल्याच्या माहिती विषयीचे नकाशासह फलक दिसून येतात यावर नजर फिरवून गेले म्हणजे भ्रमंती करतांना किल्ला चांगला समजून घेता येतो . वळणदार चढाई करत गेले की वन खात्याने बनविलेला पायऱ्या लागतात वाटेतच आताच्या काळात बनविलेला एक दरवाजा वजा स्वागत कमान लागते . तटबंदीचे अवशेषही नजरेस येतात . या वाटेने चढाई करत असतांना काताळात कोरलेल्या लहान मोठ्या गुफांचा समूहच आहे . सैनिकांच्या निवाऱ्या साठी वापरला जात असावा असे दिसते . यामधे एक लक्ष्मणस्वामी गुफा आहे  बाहेर देवदेवतांची सुंदर शिल्पे आहेत .येथूनच आपल्याला दोन काताळाच्या मध्ये असलेल्या चीऱ्यात भव्य तटबंदी बांधलेली दिसते . पुढे वर  चढत आल्यावर एक प्रशस्त गुफा आहे २५ ते ३० व्यक्ती राहू शकतील अशी आहे . थोड्याच अंतरावर एक छोटा भुयारी मार्ग आहे आत पाणी साचलेले दिसते . उजव्या बाजूला मजबुती ने उभा असलेला त्र्यंबक दरवाजा आहे . या वाटेने पट्टावाडीत उतरता येते . काळ्या दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून गेले की एक पाण्याचे टाके आहे .या टाक्याचे दोन भाग आहेत अगदी शिवनेरीवरील साखळी मार्गा जवळ असलेल्या टाक्यासारखे आहे . अष्टभूजाधारी पट्टादेवी मंदिर या टाक्याच्या परिसरात आहे . 
              पठारावर पोहचत आलो की मेघडंबरी मधे असलेला शिवरायांचा अर्धाकृती पुतळा पाहिल्यावर येणाऱ्या  मावळयाचा थकवा नाहीसा होतो अन प्रत्येकजन जय जिजाऊ जय शिवराय अश्या घोषणा देत आपसूकच नतमस्तक होतो . पाठीमागे अंबरखाना दिसतो . किल्यावरी ही वास्तु सुस्थितीत आहे आत शिवचरित्रातील अनेक प्रेरणादायी प्रसंग उठावदार शिल्पामधे आहे . शिवराज्याभिषेकाचा प्रसंग जीवंत वाटणाऱ्या मूर्ती रूपाने उभारला आहे .अंबरखान्याच्या आजू बाजूला जुन्या वाडे व वास्तुचे अवशेष आढळतात . हा किल्ला नैर्सगीक कातळाची तटबंदी लाभलेला आहे हे प्रचंड लांबलचक पठारावर गेल्यावर  कळते . येथून सोन टेकडी व त्याच्या विरुध्द बाजूस जाता येते . पाण्यासाठी अनगिणत टाके हजारो वर्षापूर्वी येथे निर्माण केले गेले व ते आजही वापरात आहेत .
     कोकणवाडीच्या बाजूला कडेलोट दरवाजा आहे . त्याच्या पुढे कोकण दरवाजा आहे दोन्हीचेही आता फक्त अवशेष दिसतात . शिवकालिन बंधारा आजही पाणी साठवून ठेवण्याचे काम करतो . त्याच्या खाली सुद्धा अजून एक तलाव आहे म्हणजे पट्टा किल्या वरील थोड देखील पाणी वाया जात नाही त्याच्या बाजूला तटबंदी व बुरुज दिसतात . पठारावर काताळात कोटलेल्या अजस्त्र पाण्याच्या टाकी आहेत . समोरच बारा टाके समुह आहे . बरेच टाके भूमीगत पद्धतीने आतुन जोडलेली आहेत पाणी अत्यंत शुद्ध व थंड आहे . बारा टाकी समुहा पेक्षा आकाराने मोठ्या  सात टाक्यांचा समूह आहे . यासोबतच अनेक गुहा किल्यावर आहेत त्यापैकी एक धान्यकोठार म्हणून आहे .ऐसपैस जागा असलेल्या या गुहेत जमीनीत धान्यसाठवणी साठी दोन खोल राजंणा सारखे कोठ्या आहेत प्राचीन काळापासून याचा उपयोग होत असावा .
          किल्यावरील सर्वात उंच भाग म्हणजे सोनटेकडी या टेकडीकडे जातांना डाव्या बाजूला कातरकडा आहे सुरक्षेसाठी लोखंडी रिलिंग आहे . सोनटेकडीच्या सर्वोच्च शिखरावर सुरक्षित केलेला व्हयु पॉईन्ट आहे . वारा प्रचंड वाटत असल्याने काळजी घ्यावी लागते .सोनटेकडी वरुन टेहाळनी करतांना C आकाराची कातरकडा दिसते . समोरच औंढा किल्ला दिसतो .या टेकडीवर जातांना काळजी घ्यावी लागते प्रचंड वेगाने वारे वाहतात व बाजूला खोल दरी आहे .सुरक्षा म्हणून लोखंडी कटघरे लावली आहे .पण काळजी घेणे महत्वाचे आहे .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे .पण शिवचरीत्रात या किल्ल्याचे वेगळे महत्व आहे , १६७२ मध्ये मोगलाकडून हा किल्ला मोरोपंत पिगळे यांनी स्वराज्यात आणला होता .शिवरायांच्या १८३०६ दिवसाच्या आयुष्यात त्यांनी अहोरात्र रयतेच्या सुखासाठी सतत घोडदौड  केली .त्यांच्या आयुष्यात  थोडी देखील उसंत त्यांनी घेतलीच नाही .या किल्यावर मात्र शिवरायांनी १६७९ मध्ये १७ दिवस विश्रामासाठी वास्तव्य केले कारणही तसेच होते , शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या किल्यास विशेष महत्व आहे . महाराजांनी१६ ते १९ नोव्हेंबर १६७९ मध्ये जालनापूरवर स्वारी करून लुटले . महाराजांनी व्यकोजीराजे यांना लिहलेल्या पत्रात याचा उल्लेख येतो .मुघल मुलुखाच्या या स्वारीत त्यांनी चांंगला वचक बसविला त्यावेळी शहजादा मुअज्जम हा औरंगाबादातच होता . त्याला वळसा घालून महाराज संगमनेरकडे निघाले त्यावेळी अहमदनगरहून येणाऱ्या  रणमस्तखा, आसिकखान व जाबताखान यांच्या ८ ते १० हजार फौजेने महाराजांच्या सैन्यावर हल्ला  केला . त्यावेळी सिदोजी निंबाळकर , हंबीरराव मोहिते , संताजी घोरपडे , मानाजी मोरे हे महाराजा सोबत होते . सिदोजी व हंबीररावांनी रणमस्तखा सोबत लढाई केली व महाराजांना स्वराज्य कार्यासाठी लागणारी लूटीच्या सर्व सामानासह पट्टा किल्याकडे पाठविले या लढाईत सिदोजीराव धारातीर्थी पडले स्वराज्य कार्यासाठी इतरही सरदारांनी जीवाची पर्वा न करता लढाई जिंकली या महान बलीदानानेच महाराजांना पुढे जाणे शक्य झाले .ही लढाई पावनखिंडच्या लढाईची आठवण करून देते . महाराज बर्हीर्जी नाईकांच्या सुचविलेल्या मार्गानुसार म्हाळुंगी नदीच्या काठाने 30 नोव्हेंबर १६७९ रोजी  पट्टा किल्यावर पोहचले . या ठिकाणी ते १७ दिवस होते . हा किल्ला अत्यंत मजबूत होता मुबलक पाणी ,तटबंदीची व घनदाट जंगलाची सुरक्षितता व मोठी शिबंदी ह्या कारणाने महाराज येथे थांबले . रमणीय निर्सग व आरोग्यास उत्तम असे वातावरणाने महाराज समाधानी झाले असावे . महाराजांच्या आयुष्यातील ही शेवटची मोहीम ठरली . या किल्यावर केलेली विश्रांती यामुळे या किल्यास विश्रामगड असे नाव पडले. 



संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...