*क्रांतिची प्रेरणा :शहीद भगतसिंह*
➖➖➖➖
आजचा पाकिस्तानचा भाग असलेला ल्यालपूर बंगा येथे 28 सप्टेंबर 1907 रोजी भगतसिंहाचा जन्म झाला . आई विद्यावती कौर आणि वडील किशनसिंह यांच्या संस्कारातून भगत सिंहासारख्या महापुरुषाची जडणघडण झाली . देशभक्तीचे वातावरण त्यांच्या घरातच होते त्यांच्या आजोबापासून प्रत्येक जन क्रांतिकारी चळवळीशी जुळलेले होते . यावरून लक्षात येते की भगतसिंह ज्या गोतावळयात वाढले त्यात क्रांती केवळ बोलण्याचा विषय नसून तर प्रत्यक्ष कृतीचा विषय येतो . संघर्ष , त्याग, बलिदान या गोष्टी तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी जगण्याची प्रेरणाच होती . त्यांचे काका स्वर्णसिंह आणि अजितसिंह यांच्या देशभक्तीच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता .आजही भगतसिंहाचे नाव जरी उच्चारले तरी मानवतेशी जुळलेल्या चेतना ज्यांच्या हयदयात आहे त्यांची देशभक्ती आपसूकपणे जागृत होते . देशासाठी अन मानवतेसाठी काहीतरी करावं ही भावना मनात तयार होते . भगतसिंहाचे चरित्र तरुणांसाठी एक आदर्श आहे स्वातंत्र्यासाठी आणि मानवाच्या कल्याणार्थ स्वाभिमान कसा जागृत ठेवावा आणि त्यासाठी संघर्ष कसा करावा ,याचबरोबर त्यागाचे ही सर्वोच्च प्रेरणास्थान भगतसिंह ठरतात . अगदी बालपणापासून त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती किती ओत प्रत भरलेली आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसून येते .एकदा मेहता आनंद किशोर हे क्रांतिकारक भगतसिंहाच्या घरी आले होते . तेव्हा चार वर्षाचा भगत लाकडी बंदुका शेतात चिखलात फिरत होता . मेहतांनी विचारले, "काय करतोस ? "तेव्हा भगतने उत्तर दिले कि, "मी बंदुका पेरतो आहे ,उद्या या झाडांना बंदुका लागतील आणि त्या घेऊन मी ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावेल . " चार वर्षाच्या भगतसिंहामध्ये हा अलौकिक आत्मविश्वास कोठून निर्माण झाला ? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांच्या कुटुंबीयापुढे आणि त्यांनी केलेल्या संस्कारापुढे आपसूकपणे आपण नतमस्तक होतो .ही त्याग अन देशाप्रती समर्पित होण्याची भावना त्या बालकाच्या मनात निर्माण होणे ही त्यांच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या मातृभूमी प्रति असलेल्या उच्च कोटीच्या असामान्य देशभक्तीचीच प्रचीती आहे .
देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर काढून स्वतंत्र करणे हा त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता . गुलामगिरीत खितपत पडणे त्यांना कदापिही मान्य नव्हते . स्वातंत्र्यासाठी ते आयुष्यात कोणतीही किंमत मोजण्यास तयार होते .आपला देश गुलामगिरीत आहे आणि आपण स्वस्थ बसायचं हे त्यांना अजिबात मान्य नव्हते . भगतसिंह जेलमध्ये असताना देखील ते कधीच थांबले नाही त्या ठिकाणी सुद्धा वाचन ,चिंतन आणि लेखनाचा विडा त्यांनी उचलला होता .1929 मध्ये भगतसिंहांना अटक झाल्यावर ते जवळपास अडीच वर्ष तुरुंगात होते .त्यांना फाशीची शिक्षा झालेली असून सुद्धा ते किंचितही विचलित झाले नव्हते . कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांना जाणवत नव्हते .अलौकिक आत्मविश्वासासह अगदी निर्भीडपणे शिस्तबध्द तेने त्यांनी आपला वेळ तुरुंगात असताना अभ्यासात ,वाचनात अन लेखणात घालविला .713 दिवसाच्या तुरुंगवासात इंग्रजी ,हिंदी ,बंगाली , उर्दू भाषेतील 302 ग्रंथ वाचून काढले .या वाचनातून आपले क्रांतिकारी विचार त्यांनी पुढे लेखनबद्ध केले .तत्कालीन परिस्थितीचा विचार करत देशाच्या च नव्हे तर जगाच्या सुद्धा सामाजिक, राजकीय ,धार्मिक ,आर्थिक ' सांस्कृतिक विषयांची तर्कसंगत पद्धतीने विचार करून त्याची मांडणी केली . साम्राज्यवाद , सामंत शाही ,लोकशाही , भांडवलशाही या विषयावरही भाष्य केले . जगातील सर्वच महत्वाच्या राजकीय क्रांतीचा अभ्यास केला . स्वातंत्र्याच्या महानकार्यासाठी , मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदानाचे महत्त्वही त्यांनी आपल्या लिखाणातून विषद करत धर्माचा ही तुलनात्मक अभ्यास करून नास्तिकतेची परिभाषा त्यांनी या बंदीवासात असताना केली आहे .या काळात त्यांनी चार ग्रंथ लिहून काढले . यामधील "Why I am an Atheist " हा लेख प्रत्येक भारतीय तरुणांनी वाचलाच पाहिजे असा आहे .भारतीय तरुणांपुढे भगतसिंहांचा आदर्श आहेच, पण फोटो पाहून आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्टेटस ठेवण्यापुरता किंवा "इन्कलाब जिंदाबाद ! " एवढंच म्हणण्यापुरता नसावा .तर भगतसिंहांनी लिहिलेले तुम्हा आम्हा सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे भगतसिंहाचे साहित्य प्रत्येकाने वाचलेच पाहिजे .
त्यांच्या जेल डायरीमधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .
*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*
*मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*
*परंतु ,खरंच आहे का,*
*तुमच्यात धमक आणि तुम्हाला स्वातंत्र्य ?*
*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*
*तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*
*तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*
*मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*
*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*
*यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*
*खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*
*जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*
*अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*
*जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*
*त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*
*उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*
*त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*
*केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*
*त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*
यावरून लक्षात येते की शहीद भगतसिंह हे स्वातंत्र्य आणि गुलामगिरी याबद्दल काय म्हणत होते . सत्याच्या बाजूने उभे राहणे हे 17 व्या शतकातील महाराष्ट्रातील पहिले मराठी लोककवी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्या काव्यातून सांगितले होते "सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानिअले नाही बहुमता ॥" तेच पुढे 19 व्या शतकात जेम्स रसेल आपल्या काव्यातून मांडतात व पुढे सत्याची अन सत्यासाठीची त्याग अन समर्पनाची क्रांतिकारी धार भगतसिंह आपल्या क्रांतीतून दाखवून देतात .ते म्हणत मानवतेला प्रभावित करणाऱ्या सर्वच गोष्टीशी माझा संबंध आहे .त्यांना लाभलेल्या अत्यल्प आयुष्यातही प्रतिकूल परिस्थितीत सखोल वैचारिक चिंतन घडवून एक आदर्श नव तरुणांपुढे उभा केला .आपल्या देशाचे उज्वल भविष्य कोठे आहे हे त्यांनी जाणले होते म्हणून त्यांचे विचार हे मानवतेच्या कल्याणार्थ आजही लागू पडतात .
*तुझे जब़ह करने की खुशी मुझे मरने का शौक,*
*मेरी भी मर्जी है , जो मेरे सैय्याद की है ।*
हसत हसत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतिकारी वीर शहीद भगतसिंहास विनम्र अभिवादन .
➖➖➖➖➖🌷
संजय खांडवे
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा