रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

*गिरिदुर्ग व भूदुर्गचा संगम : वैशागड (जंजाळा किल्ला )*

➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. सिल्लोड , जि . छत्रपती संभाजी नगर
उंची : ६२५ मी.
बुलढाण्यावरून धाड - पिंपळगाव रे - गोळेगाव - अंभई मार्गे ९० कि मी., सिल्लोड किंवा अंजिठ्या वरुन गोळेगावला येवून जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
छत्रपती संभाजी नगर जिल्हयात सात महत्वाचे किल्ले आहेत . यामधील देवगिरी हा इतिहास प्रसिद्ध किल्ला सोडला तर इतर किल्ले हे दुर्लक्षितच वाटतात .त्यापैकीच एक म्हणजे वैशागड होय .याला जंजाळा किल्ला किंवा तालतम किल्ला असेही म्हणतात . छत्रपती संभाजीनगर - अजिंठा रोड वरील गोळेगाव पासून उंडणगाव अंभई मार्गाने जंजाळा गावात पोहचता येते व पुढे कच्च्या वाटेने दोन तीन किलोमीटर शेतातून पाऊल वाटेने जावे लागते . दुसरा मार्ग सोयगाव वरून जरांडी गावातून पुढे पाऊल वाटेने पश्चिमेतील जरांडी दराज्यातून गडावर पोहचता येते . जंजाळा गावातून जाणारा मार्ग सोपा वाटतो . दुर्गाचे गिरिदुर्ग , जलदुर्ग, भूदुर्ग, वनदुर्ग असे प्रकार पडतात पण जंजाळा म्हणजे गिरिदुर्ग व भूदुर्ग प्रकाराचा संगम आहे . दक्षिण बाजूस भूदुर्ग व इतर बाजूस गिरिदुर्ग प्रकारात येतो . अजिंठा डोंगर रांगेत असलेला हा दुर्ग विस्ताराने खुप मोठा आहे . यावर भ्रमंती करायची म्हणजे दोन अडीच तास लागतात .  गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने जंजाळा गावातून पाणी सोबत घ्यावे . पाऊल वाटेने तासाभरात गडाच्या बुरुजा पर्यन्त पोहचतो ही बाजू भुदुर्गाची असल्याने पूर्व - पश्चिम मोठा खंदक त्या काळी खोदून मजबूत तटबंदी दुहेरी बुरुजासह उभी केलेली आहे . सपाट भूप्रदेशावरून येणारे दोन तीन किलो मीटर अंतरावरील शत्रू टेहाळता येतो व माऱ्याच्या कक्षेत येतो . आता या बुरुजाची तटबंदी फोडून किल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी  मार्ग केलेला दिसतो  . पूर्व बाजूची तटबंदी आजही अस्तीत्वात आहे . या तटबंदीत एक छोटा कमानीचा दरवाजा आजही अस्तीत्वात आहे .पश्चिमेस खोल दरी असल्याने काही गरज असलेल्या ठिकाणी तटबंदी दिसते . या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जागोजागी बुरुज बांधलेले आहेत . पूर्वेकडील तटबंदी वरून खोल दरीत वाकाटकांच्या काळात पाचव्या शतकात कोरली गेलेली घटत्कोच लेणी समूह दिसतो व समोरच वेताळवाडी धरण व त्या पलिकडे वेताळ वाडी किल्ला नजरेस पडतो . आता या किल्ल्याचे संवर्धनाचे काम सुरु आहे . या तटबंदी खाली उतरून पाऊल वाटेने चालत गेलो की दरवाजा दिसतो . हा महादरवाजा  घटकोत्कोच लेणीच्या दरीत जातो . आता मात्र हा रस्ता वापरात नाही .प्रथम दर्शनी दूर वरून पाहिले की हे दोन बुरुज वाटतात पण दोन बुरुजाच्या मध्ये हा आजही कमानीच्या वर नगारखाना व दुमजली इमारतीच्या पडक्या भिंतीसह संवर्धनाच्या प्रतिक्षेत दिसतो  .या दरवाज्यातून येणाऱ्या व्यक्तीवर व त्याच्या हालचाली वर  चौफेर नजर ठेवता येते .सैनिकांच्या राहण्या साठी व चौकी साठी सुंदर कमानीच्या देवड्या चांगल्या स्थितीत आहेत . खाली कोरीव नक्षीकाम केलेले अनेक दगड पडलेले आहेत .दरवाज्यातून वर आल्यावर उजव्या बाजूला दारुगोळा कोठारा सारखी आजही भक्कम मजबूत असलेली मोठी दगडी इमारत आहे . संपूर्ण किल्ल्यावर जागो जागी सिताफळे व इतर तत्सम झाडे मोठ्या प्रमाणात आहेत व या मधेच किल्ल्यातील अनेक महत्वाच्या इतर इमारती झाकल्या गेल्या आहेत . पठारावर चार पाच तलाव आहेत त्यापैकीच हा दक्षिण बाजूच्या पठारावरील मातीचा गोल तलाव आहे . पूर्वी या किल्ल्यावर मोठी मानवी वस्ती असावी हे त्या ठिकाणा वरील अवशेषावरून कळते . या तलावाच्या पश्चीम दिशेला थोडे चालत गेले की जरांडी दरवाजा आहे .किल्ल्याच्या पायथ्यापासून हा बुरुज भासतो कारण याचे द्वार उत्तर दिशेला आहे . या ठिकाणी एक पारशी शिलालेख आहे . या दरवाज्यात पोहचणेही अडचणीचे आहे . पश्चीम बाजूस एक समोर आलेल्या डोंगर कड्याच्या टोकावर एक बुरुज आहे . या बुरुजावरून उत्तर - पश्चीम भागातील बऱ्याच प्रदेशावर नजर ठेवता येते . किल्ल्याच्या मध्यभागी झुडपात एक कमान दिसते व आतमधे अनेक पडक्या भिंती आहेत  . हा शाहीमहल असावा असे दिसते बाजूला दोन मोठे बुरज आहेत बुरुजावर इमारत असावी असे अवशेष आहेत . हा बालेकिल्ला आहे . या बुरुजावर दगडात कोरलेले सिंहच्या पंजात  हत्ती असल्याचे क्षरभ चिन्ह आहे .पडक्या राणी महलापासून पुढे गेलो, दाट झाडीमधे छत कोसळलेला सहा खोल्यांचा वाडा दाट सिताफळाच्या झाडी उगवलेल्या अवस्थेत दिसतो . तेथून पूर्वेला प्रचंड दोन झाडे भिंतीवर घेऊन उभी असलेली एक चांगल्या स्थितीमधील इमारत दिसते थोडी वाट शोधतच तेथे पोहचावे लागते .थोड चालत गेल्यावर उंच टेकडीवर पूर्व दिशेला तोंड असलेले प्रचंड नक्षीकाम केलेले ते प्रार्थनास्थळ आहे . ही इमारत अजूनही चांगल्या स्थितीत आहे .समोरच गडावरील आणखी एक तलाव दिसतो . पूर्वकडील पठारही खूप मोठे आहे त्या बाजूला देखीत काही बुरुज व तटबंदी नजरेस पडते . सोयगाव - वेताळ वाडी  या दिशेने दोन बुरुजाच्या मध्ये पडझड झालेल्या इमारती सह दरवाजा आहे . कामकाज व चौकशी साठी दोन्ही बाजूनी दोन कमानीच्या  इमारती आहे पूर्वी त्यावर छत होते आता दगडांचा ढाचा शिल्लक दिसतो .
          टेकडीरून उजव्या बाजूला पाऊल वाटेने सय्यदपीर बाबाच्या दर्ग्या पर्यन्त येतो बाजूलाच मोठा खोदलेला तलाव आहे या तलावाला बालेकिल्ल्या च्या बाजूने पायऱ्या दिसतात .दर्गा परिसरात दोन दगडी शिलालेख आहेत . असा हा विस्तीर्ण किल्ला पावसाळयात अगदी हिरवळीने नटलेला असतो .
          उत्तरेचे प्रवेशद्वार  असलेले ऐतिहासिक बऱ्हाणपूर शहर हे जवळ असल्याने या डोंगर रांगेतीत अंतुर , जंजाळा , वेताळवाडी हे किल्ले मध्ययुगीन इतिहासात महत्वाचे होते .१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाननिजामशहाने हा जिंकला व त्यानंतर १६३१ मध्ये शहाजहानने जिंकला अशी माहीती मिळते . या किल्ल्या वरून उत्तरेतीत मोठ्या भूभागावर टेहाळणी करत पहारा ठेवता  येत असे हे आजही कळते . या परिसरात रुद्रेश्वर लेणी , वेताळवाडी किल्ला ,घटत्कोच लेणी , अंभई व अन्वा येथील प्राचीन मंदिर या ठिकाणांना भेटी देता येतात .


संजय खांडवे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...