बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

स्वांतत्र्य एक जबाबदारी

 स्वांतत्र्य एक जबाबदारी*


इसवी सन पूर्व 300 च्या काळात चक्रवर्ती सम्राट अशोक एक प्रियदर्शी राजा होऊन गेला . त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात संपूर्ण भारतासह आजूबाजूचा बहुतांश प्रांत काबीज केला होता .भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघायचा तो हाच काळ होता . आज आपली भारतीय राजमुद्रा आपण पाहतो की प्रत्यक्षात चार सिंहमुख असलेल्या अशोक चक्राच्या खाली "सत्यमेव जयते " हे ब्रीद आहे .यावरून सदैव सत्याचा विजय असणारे , सत्याच्या बाजूने असलेले अत्यंत प्रगत असे लोककल्याणकारी साम्राज्याचे मौर्य सम्राट अशोक हे लोकशासक होते हे सिद्ध होते .सातवाहन, वाकाटक हे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत भारतामध्ये प्रगत शासकापैकी एक .पुढील काळात तिसऱ्या ते पाचव्या शतकामध्ये अत्यंत समृद्ध असा गुप्त काळ आला या काळात साहित्य ,कला ,संस्कृती तथा व्यापार याला सम्राट अशोकाच्या काळा प्रमाणेच अधिक वाव मिळाला.इतिहासाच्या संदर्भावरून सम्राट अशोकांच्या काळात लोककल्याणार्थ अनेक कामे झाली असे दिसून येते .परंतु यानंतर मात्र साधारणपणे 9 व्या 10 व्या शतकापासून भारत खंडास परदेशी आक्रमणाची संकटे सतत भेडसावू लागली .या काळात अनेक आक्रमणे उत्तरेकडून भारतावर होऊ लागली पुढील काळात मोघलांनी शेकडो वर्ष आपल्या या भारतभूमीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले .17 व्या शतकात मात्र राजे लखुजी जाधव , शहाजीराजे भोसले , राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी राजे यांच्या रयतवत्सल भावनेने त्यांच्या संघर्ष व त्यागातून एतद्देशियांचे स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य उभे राहिले .  स्वराज्य हे या मातीत जन्मलेल्या तथा मातीसाठी स्वाभिमान आपल्या उरात बाळगणाऱ्या मावळ्यांचे राज्य होते .त्यांच्या स्वाभिमानाने त्यांना स्वातंत्र्याची ओढ लावून दिली .अठरापगड जाती-धर्माचे वज्रमूठ बांधून स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष याची जाणीव त्यांना झाली . परस्परांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान देणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने उभे होत गेले .रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य ही निरपेक्ष भावना प्रत्येक मावळ्याच्या मनात निर्माण झाली. स्वराज्यासाठी लढणारा मावळा ही ओळख मिळाली हीच स्वातंत्र्य , समता व बंधूतेची  नांदी होती .यातूनच स्वराज्य न्याय देणारे ठरले पुढे शिवरायांच्या आणि छत्रपती शंभुराजांच्या निर्वाणानंतर दिडशे वर्षापर्यंत मावळे स्वराज्यासाठी मोठ्या स्वाभिमानाने स्वातंत्र्यासाठी लढत राहिले ते कधीही झुकले नाही हीच प्रेरणा इंग्रजांशी लढताना भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महावीरांना मिळाली .

     एका चर्चेमध्ये तथागत गौतम बुद्ध अंम्ब ट्ठाला म्हणतात "अंम्बट्ठा छोटीशी चिमणी देखील स्वतःच्या घरट्यात स्वच्छंदपणे चिव चिव करीत असते . " यामधून स्वातंत्र्याचा अर्थ प्रतीत होतो . स्वातंत्र्याची व्याप्ती कळते .डॉ . बाबासाहेबांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अखंड मानव जातीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली . "आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण स्वातंत्र्याचे रक्षण करू असा आपण निश्चय केला पाहिजे " असे त्यांनी आपल्या 25 नोव्हेंबर 1949 च्या संविधान सभेतील भाषणात सांगितले होते . स्वातंत्र्य ही खूप मोठी आनंददायी बाब आहे त्यासाठी सामाजिक लोकशाही आपण जपली पाहिजे . आपल्या हक्क  , अधिकारासाठी तथा आपले सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करण्यासाठी घटनात्मक मार्गाने गेले पाहिजे हा संदेश त्यांनी संविधानातून दिला . शिवरायांनी जसे "रयतेचे राज्य " म्हटले तसेच भारतीय संविधानाने "आम्ही भारताचे लोक " या वाक्याने संविधानाची सुरुवात केली . शिवरायांच्या स्वराज्यातील लढणाऱ्या विरास "मावळा " म्हटले गेले संविधानाने आपली ओळख आपल्याला "आम्ही भारताचे लोक " अशी करून दिली ही ओळख कुठलाही जात - धर्म -पंथ दर्शवणारी नव्हती सार्वभौम , समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य न्याय ,स्वातंत्र्य , समता व बंधुता याची रुजवन करणारे आहे त्यामुळे स्वाभिमान जागृत होतो व समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाचे मन - मस्तक आणि मनगट मजबूत होते .


    स्वातंत्र्य म्हणजे मी कुणाचाही अंकित नाही . मी पूर्णपणे सर्वांगाने मुक्त आहे . स्वैर आहे कोणाचाही देणेदार नाही . मानवतेची मूल्य जोपासत मी मानवधर्मास जपणारा स्वतंत्र मानवतावादी आहे . स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच स्वातंत्र्यात मानवीमूल्य जोपासत जगणे ही आपली जबाबदारी ठरते .स्वातंत्र्याचा खरा अर्थ तर मानव कल्याणार्थ झटणे , दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणे तथा त्याच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे असाच होतो . दया , क्षमा , शांती ,समता , बंधुता याचे भान ठेवत कृतघ्न न होता कृतज्ञ राहणे असाच आहे . आज आपण स्वातंत्र्यात जगत आहोत आपल्याला काहीही करावे लागत नाही असा समज आपला सुखी जीवन जगत असताना आहे , पण येणाऱ्या काळात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे याचाही वेध घेण्याची कुवत आपल्यात असली पाहिजे तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील .शहीद भगतसिंह यांची " जेल डायरी "

  मधील पान 19 वरील जेम्स रसेल लॉवेल या अमेरिकन तत्त्ववेत्याने "स्वातंत्र्य " या विषयावर लिहिलेली कविता या ठिकाणी नमूद करावीशी वाटते .


*मर्दानो , फुशारक्या मारता तुम्ही ,*


 *मर्दुमकी आणि स्वातंत्र्याच्या,*


 *परंतु ,खरंच आहे का,*


 *तुमच्यात धमक आणि  तुम्हाला स्वातंत्र्य ?*


*साखळदंडात कुजणाऱ्या बांधवांच्या वेदना जाणवत ,*


 *तुम्ही मुक्त असताना कोणी गुलामीत मरत असेल,*


 *तर तुम्ही सुद्धा षंढपणा पांघरलेले गुलामच नाही का ?*


 *मुक्त वावरण्याच्यातुम्हाला हक्क तरी काय ?*


*फक्त स्वतःला मुक्त कर विणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *मानवजातीप्रती जबाबदारी विसरणे,*


 *यालाच का खरे स्वातंत्र्य म्हणतात ?*


 *खरे स्वातंत्र्य तर त्याला म्हणावे,*


 *जिथे प्रत्येकाने दुसऱ्याच्या गुलामीचा भार ,*


 *अखंड मानवजात मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा*


 *जे गुलामगिरीच्या विरोधात उभे राहू शकत नाही,*


 *त्यांना खरे गुलाम म्हणावे ,*


 *उपहास आणि तिरस्काराच्या भीतीने जे शांत बसतात,*


 *त्या गुन्हेगारांना गुलाम म्हणावे ,*


 *केवळ संख्या कमी आहे म्हणून सत्याच्या बाजूने उभे राहायला जे घाबरतात,*


 *त्या नामर्दांना गुलाम म्हणावे .*  



संजय खांडवे

इतिहास अभ्यासक

बुलढाणा

9011971122

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...