*मायभूमीशी नाळ जुळलेला : दै महाभूमी*
शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते शब्द ही शस्त्र आणि अस्रही असतात . या शब्दाचे महात्म्य याच भूमीत म्हणजे महाराष्ट्र भूमीत जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी जनसामान्याच्या मुखा -मुखात रूढ केले . कोणे एकेकाळी ज्या शब्दज्ञानाने आमचा नाश केला होता त्याच शब्दांना शस्त्र करण्याचा मार्ग आम्हाला तुकाराम महाराजांच्या गाथेतून मिळाला . हीच या महाराष्ट्र भूमीची शिकवण आहे . या मातीत जन्मलेला प्रत्येक जण या पवित्र माती प्रति निश्चितच कृतज्ञ असतों . हीच शिकवण आहे . महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी राहिली आहे याच संत परंपरेतून वारकरी संप्रदाय उदयास आला या मातीत जन्मलेल्या अगदी शेवटच्या व्यक्तीच्या उन्नती आणि उद्धारासाठी त्याच्या कल्याणार्थ वारकरी विचारधारेने काम केले. संत नामदेव - संत ज्ञानेश्वर -संत एकनाथ - संत सावता - संत गोरोबा काका - संत चोखोबा अन - संत तुकोबा पर्यंत हातात टाळ मृदुंग घेऊन गावागावात अन घराघरात अभंग - भारुडे अनओवीच्या रूपाने मुखदगत होऊन ही शब्दरूपी शस्त्रे पोहोचत गेली अन समाजप्रबोधन होऊन जनसामान्यांना जगण्याचा सोपा मार्ग मिळाला . परमेश्वरापर्यंत सहज पोहोचणारा भक्तिमार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी दूर होऊन सामान्य माणूस अगदी सहजपणे कुठलीही आडकाठी न घेता भक्ती मार्गावर मार्गस्थ झाला .
आजच्या काळात शब्द हे प्रमाण मानले जाते. विश्वासअर्हता आणि लोकमान्यता मिळाली की शब्दाची किंमत अधिकच वाढते आणि या शब्दाची नाळ जर मायभूमीशी जुळलेली असेल तर मग यासाठी शब्दच नाही ! असं म्हणावे लागेल .याच लोकप्रबोधनाचा आणि लोककल्याणाचा प्रामाणिक वसा घेऊन दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक तथा संस्थापक सुरेश देवकर यांनी जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फुटावी म्हणजे त्यांचे शब्द हे प्रखरतेने प्रत्येक जबाबदार व्यवस्थेकडे पोहोचावेत, त्यांच्या व्यथा आणि संघर्ष सर्वांना कळावा याचबरोबर या मातीत जन्मलेल्या लेखक , कवी, समिक्षक तथा संशोधक यांचे शब्द विचार घराघरात पोहोचावे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुखातील शब्द व्यवस्थेने जाणावे, कर्तबगार संघर्ष कन्या आणि महिला तथा यशस्वी उद्योजकांची प्रेरणा जिजाऊंच्या महा भूमीत प्रत्येक महिलेने घ्यावी हा मानस त्यांनी ठेवला . शिक्षण अन अर्थक्रांती घडवून आणण्यासाठी या आपल्या मराठी मुखपत्रातून या मातीच्या कल्याणार्थ झटणारी युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील अन कृतिशील होऊन दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यात दैनिक महाभूमीचा जन्म झाला .
संस्थापक तथा मुख्य संपादक यांचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे . प्रसंगी काळ्या पाषाणातूनही पाणी काढण्याचे सामर्थ्य त्यांनी याच महाभूमीत जन्मलेल्या महापुरुषांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घेतले आहे . प्रचंड वाचन आणि त्याचे विश्लेषण करून यथायोग्य आचरण हा त्यांचा स्वभाव गुण . माता-मातृभूमी आणि आपली माणसे ही त्यांची बलस्थाने .या तीन मकारांसाठी ते सदैव तत्पर असतात या शुद्ध विचारातून त्यांचा उत्तम व्यवहार आपसूक लोकांपुढे येतो म्हणून आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा तथा जालना - छत्रपती संभाजीनगर - जळगाव - मुंबई आदी जिल्ह्यातून सहकार क्षेत्रात एक विश्वास निर्माण केला आहे .
दैनिक महाभूमीस आज एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षातच मराठवाडा विदर्भ या दोन प्रांतांना जोडणारे विश्वास अर्ह मराठी मुखपत्राच्या रूपाने ते समोर आले आहे आजही ग्रामीण मराठवाडा अन वऱ्हाड ही त्यांची विशेष असलेली एकूण १२ पानापैकी सकाळीच त्या त्या प्रांतातील वाचकांसाठी एक पर्वनीच ठरत आहे .खेड्यापाड्यात अन वाडी वस्तीवरही महाभूमी शब्द रूपाने पोहोचला आहे ही मातृभूमीशी असलेली नाळ अतूट आहे .निर्मळ - निकोप अन निपक्ष असलेल्या महाभूमीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन हे शब्दरूपी शस्त्र अंन धन जनमान्यात वाटण्याचे पवित्र कार्य अखंड अविरत चालू राहो हीच शुभेच्छा .
संजय खांडवे
9011971122
बुलढाणा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा