मराठा सेवा संघ : एक विचार
१ सप्टेबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची स्थापना युग पुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांनी अकोला येथे केली . विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार होता . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघ हा आकार घेत होता . याच उद्देशांने शासकिय ,निमशासकिय ' कार्पोरेट अधिकारी , कर्मचारी तथा इतर खाजगी क्षेत्रात काम करणारे पगारदार लोकांचे संघटन, "मी या समाजाचा घटक आहे आणि त्याचे मला काही देणे लागते " या कृतज्ञतेच्या भावनेने समाजभिमुख लोकांचे संघटन आदरनिय साहेबांच्या प्रेरणेने कामास लागले व आज आपण त्याचा वटवृक्ष झालेला आपण पाहत आहोत . मातृशक्तीची ताकद किती प्रचंड असते हे जिजाऊंच्या रूपाने संपूर्ण जगाने बघितले. एका कर्तृत्ववान स्त्रीने जर ठरवले तर ती असाध्याचे साध्य करू शकते. स्त्रीशक्ती मधील प्रचंड आत्मविश्वास, जिद्द ,स्वाभिमान जागृत झाल्यावर युग परिवर्तनाचे सामर्थ्य त्या शक्तीमध्ये निर्माण होते . मुळात जगातील प्रत्येक संस्कृतीच्या मुळाशी स्त्रीच असते हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे .विश्ववंदनीय ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या एत्तद्देशियांच्या हिंदवी स्वराज्याची खरी प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ठरते हे वैश्विक सत्य आहे, त्याला कुणीही नाकारू शकत नाही. मराठा सेवा संघाने राजमाता जिजाऊ यांचे चरित्र, विचार व कार्य हा आदर्श ठेवून मातृशक्तीच्या प्रेरणेने मातृतीर्थ सिंदखेड राजा जगाच्या नकाशावर आणण्याचे महान कार्य केले .इतिहासाचा शास्त्र म्हणून अभ्यास करण्याची प्रेरणा मराठा सेवा संघाने या मातीतल्या माणसाला दिली . राजमाता जिजाऊंचा दैदीप्यमान इतिहासही अनंत काळापर्यंत काळाच्या पडद्याआडच होता. जिजाऊ जन्मापासून बखरकारांनी अनेक कल्पित कथांचे मनोरे उभे केले अनेक दंतकथा रचल्या गेल्या .ज्यांना कुठलाही तर्कशुध्द आधार नाही समकालिन विश्वासअर्ह साधन साहित्याचा पुरावाही नाही .अर्कज्ञ शहाजीराजे भोसले , राजे लखुजीराव जाधव , छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे यांचा अत्यंत पराक्रमी इतिहास मराठा सेवा संघाच्या तालमित घडलेल्या अनेक इतिहासकारांनी तथा अभ्यासकांनी समोर आणण्याचे मोठे ऐतिहासिक काम केले आणि आजही ते होत आहे . महात्मा बसवेश्वरांनी जातीअंताची चळवळ सुरु केली त्यानंतर मानवी मनांची साखळी जोडणारे समतेचे सेतू संत श्रीचक्रधर स्वामी ठरले त्यानंतर संतशिरोमणी संत नामदेवांनी उभारलेली प्रबोधनाची भगवी पताका पुढच्या काळात वारकरी संत परंपरेने पुढे चालवत आणली . अनेक भाषिक अन सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून उपेक्षित व शोषित समाजाला उभारणी देण्याचं काम केले . सकलशस्त्रशास्त्र कोविद छत्रपती संभाजीराजे यांनी लिहलेल्या बुधभूषणम या संस्कृत ग्रंथातील एक महत्वाचा श्लोक इथे सांगावासा वाटतो ,
प्रियः प्रजानां दातैव न पुनर्द्रविणेश्वर: ।
आगच्छन्काड्र.क्ष्यते लोकैर्वारिदो न वारिधिः।
छत्रपती संभाजीराजे आपल्या या महान ग्रंथातील प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.
देत राहणाऱ्यांची प्रचंड मोठी श्रृंखला आपल्या पवित्र भूमिची आहे मग ती धन संपत्ती असो की ज्ञान ! संतांनी मेघाप्रमाणे देण्याचेच काम केले . जगतगुरू तुकाराम महाराजांनी तर आपल्या जवळील धना सोबतच आयुष्य भर शब्द रुपी धन वाटण्याचे काम निर्भिडपणे केले .याच महान संत व महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी म्हणून मराठा सेवा संघ आपले काम करत आहे .आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ होय . महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपली वैचारीक बैठक मजबूत असणारा हाडामासाचा सच्चा मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता हा लाखा येवढा ठरतो . तो कधीही आपल्या विचारापासून दूर जात नाही . कधीही आपली चिकित्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन तो सोडत नाही .आज मी सेवा संघाच्या विचाराचा आहे असे बोलतांना अनेकदा ऐकतो . त्याचे कारण हेच आहे . आज आपल्या 33 कक्षाच्या माध्यमातून जगभर आपले विचारांचे जाळे विणले आहे . कृषी, उदयोग , कला , साहित्य, क्रिडा , संशोधन , विज्ञान आदि विविध क्षेत्रात काम करत समाजातीत अगदी शेवटच्या घटका पर्यन्त संधी निर्माण करून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे .
कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश मराठा सेवा संघाने पुढे चालवला .
"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा. "
मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला. मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे जागतीक स्तरावरील जिजाऊ जन्मोंत्सवाच्या निमित्ताने लाखो जिजाऊ प्रेमी एकत्र येवून जिजाऊ चरणी नतमस्तक होतात . विचारांची देवाव घेवाण होऊन करोडो रुपयांची केवळ पुस्तकाची उलाढाल होते .शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. या देशातील ऐतखाऊ व्यवस्था नष्ट करून उत्पादक समाज व्यवस्थेला समाजात त्याचे स्थान निर्माण करून देणे . तथा तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. तरुणांच्या हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक देण्याचे काम सेवा संघ करत आहे . कोणत्याही व्यवसायाची लाज न बाळगता तरुणांनी बुट पॉलिश ते तेल मालिश पर्यन्तचा कोणताही व्यवसाय करण्याची तयारी ठेवली पाहीजे . विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील होणारे सततचे परिवर्तन तरुणांनी लक्षात घेऊन त्यामधे संधी शोधली पाहीजे . शेतात काय पिकत या पेक्षा बाजारात काय विकतं याच भान ठेवत शेतकर्यांनी आधुनिक तत्रज्ञानाची कास धरली पाहीजे . तरुणांनी आपले स्वहीत तथा राष्ट्रहीत जपत आजच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत त्याचा शोध घेतला पाहीजे . असे कुटुंब अन आपोआपच मग समाज घडविण्याचे काम मराठा
सेवा संघ करत आहे .
हे एक विचारांचे संघटन असल्याने खेड्यापाड्यातही आज हा विचार घराघरात पोहोचलेला आहे.
आमच्यासारख्याच्या दृष्टिकोनातून मराठा सेवा संघ काय आहे, तर मराठा सेवा संघ
एक दिशा.......एक परिवर्तन.......एक विचार.......एक मार्ग.......मन -मस्तक अन मनगट मजबूतीचं .........!!!!
नतमस्तक व्हायला शिकलो.....विचार आणि आदर्शा पुढे......!!! लढायला शिकलो......सत्यासाठी......!!
वाचायला शिकलो....चिकित्सेसाठी.......!!
बोलायला शिकलो ....न्यायासाठी.......!!
🌿🌿🌿🌿🌿
॥ तुमच आमचं नातं काय,जय जिजाऊ जय शिवराय॥
🌿🌿🌿🌿🌿
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
🌿🌿🌿🌿
संजय खांडवे
बुलढाणा जिल्हाध्यक्ष इतिहास कक्ष
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा