सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*

*त्र्यंबक डोंगर रांगेतील :भास्करगड (बसगड)*


➖➖➖➖➖➖➖➖
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः१०८६ मी.
नाशिक पासून त्र्यंबकेश्वर मार्गे ४७ किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
➖➖➖➖➖➖➖➖➖
नाशिक जिल्हयात ५० पेक्षा अधिक लहान मोठे किल्ले आहेत . यामधील बरीच ही गिरीदुर्ग प्रकारात असून बहुतेक किल्ले अत्यंत दुर्गम आहेत . चढाई करण्यासही अवघड आहेत . सहयाद्रीची विस्तिर्ण पर्वत रांग जिल्हयाच्या पश्चिम भागात उत्तर दक्षिण पसरलेली आहे .  सेलबारी , हिंदबारी, घोलबारी , सातमाळ , अजिंठा , त्र्यंबक आदि डोंगर रांगा आहेत . नाशिक जिल्हात प्राचीन लेणी समूह देखील या डोंगर रांगेत आढळतात . आकाशा सोबत स्पर्धा करणारी उंच आणि महाकाय डोंगर निर्सगाचे सौदर्य अधिकच वाढवतात . याशिवाय त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तीलिंगा पैकी एक हे नाशिक मधेच आहे . दर १२ वर्षानी या ठिकाणी सिहस्थ कुंभमेळा भरतो . रामायण , महाभारत या पौराणिक ग्रंथात नाशिक व त्या परिसरातील उल्लेख येतो मध्ययुगीन कालखंडात हा प्रदेश म्हणजे अत्यंत धामधुमीचा होता . या परिसरात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या हे या परिसरातील गडकोटावरून दिसून येते , पण या ऐतिहासिक घटना अजूनही पडदया आड गेलेल्या दिसतात . याचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी याच त्र्यंबक रांगेतून उगम पावते .
        याच त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हा एक महत्वाचा किल्ला आहे . उंच डोंगरावर खालून टोपीच्या आकाराचा दिसणारा हा किल्ला पाहताच क्षणी मन वेधून घेतो . गोंडे घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्लयाची निर्मिती झाली . त्रिंबक वरून गोंडे घाटातून उतरून प्राचीन काळी कोकणातून दाभोसा - खानवेल - वापी - गणदेवी - सूरत असा व्यापारी मार्ग असावा . म्हणूनच त्यावेळी या परिसरातील किल्ल्याना विशेष महत्व होते .भास्कर गडावर पोहचण्यासाठी त्र्यंबकेश्वर वरून निर्गुडपाडा येथे पोहचता येते तसेच मुंबई - नाशिक महामार्गावरून सुदधा या पाडया पर्यन्त पोहचता येते .निर्गुडपाड्या वरून हरिहरगडावर सुद्धा जाता येते . या पाड्यात जेवणाची चांगली व्यवस्था होते . निर्गुडपाड्या वरून जांभुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने चारचाकी वाहनाने नागफणी टेकडी व भास्करगडच्या खिंडीत वाहने उभी करून डाव्या बाजूला जंगलातून जाणारी पायवाट आपल्याला भास्करगडावर घेवून जाते .या गडावर भ्रमंती करतांना अत्यंत महत्वाचे म्हणजे आपण समुहाने भ्रमंती करावी . पाऊल वाट दाट झाडी मधून जाते करवंदीच्या दाट किर्र करणारी जाळी मधून वाट काढत पुढे जावे लागते . फणसादि सारखी काही मोठी वृक्ष असल्याने गडाची निश्चीत दिशा न समजल्याने भूलभुलैय्या सारख्या पाऊल वाटा आपला मार्ग भटकवू शकतात . दुर्ग प्रेमीनी वाटेवर केलेल्या खुणा समजून घेत जावे लागते त्यामुळे शक्यतो स्थानिकांची मदत जरूर घ्यावी . दिड ते दोन तास गडाच्या पठारावर पोहचण्यासाठी लागतात . वाटेत व गडावरही पिण्याच्या पाण्याची सोय नाही . त्यामुळे सोबत पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे . तासाभराची पायपीट केल्यावर दाट झाडी मधून आपण छोटया मोकळ्या पठारावर येतो तेव्हा समोर गडाचे कातळ टोक दिसते . पाठीमागे डाव्या बाजूला आपल्याला नागफणी डोंगर व हरिहर गड दिसतो व त्या पाठीमागे त्र्यंबक गड ही दिसतो . पुन्हा थोडी चढाई केली की गडाच्या कातळाच्या जवळ पोहचतो .हा जहानासारखा समोर आलेला त्रिकोणी भाग आहे . याच्या डाव्या बाजूला कातळ पाय वाटेने गेले की एक भली मोठी गुफा आहे व या गुफेत ग्रामदेवता आहे . गडावर जायचे असल्याने आपल्याला डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूने पुढे कातर कड्याला लागून पाऊलवाटेने चालत जावे लागते वर उंच सरळ कडा व खाली खोल दरी आहे . बहुतेक ठिकाणी दरड कोसळल्याने दगड पडलेली आहे काही ठिकाणी काळजी घ्यावी लागते . हरिशचंद्र गडावर जातांना सुद्धा अशीच वाट लागते . कपारात नैसगीक गुहा तयार झालेल्या दिसतात . हिवाळ्यात गेल्यावर हा ट्रेक करताना जाणवणाऱ्या थंडीची म जाचं वेगळी वाटते चालून घामही येतो अन थंडीही जाणवते . पक्षांचा किलबिलाट अन मंजूळ वाहणारा वारा सुखावून टाकतो . पुढे आपल्याला दिसतात काताळात कोरलेल्या पायऱ्या अगदी हडसर किल्लयावर जश्या आहेत त्या पद्धतीच्याच ह्या पायऱ्या आहेत . प्रचंड मोठी दगड या मधे पडलेली आहे . थोडे वर गेल्यावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो . पूर्वी अर्धा हा दरवाजा माती दगडांनी भरलेला होता पण गडवाट तथा शिवछत्रपती परिवार व इतर दुर्गप्रेमींनी या ठिकाणी हा रस्ता व गडावरील पाण्यांची टाकी गाळातून मुक्त करण्याचे काम केले आहे व अजूनही करत आहेत . वळण घेवून जावे लागते त्यामुळे अगदी जवळ जाईपर्यन्त दरवाजा दिसत नाही . पायरीसह  सर्व ढाचा एकाच दगडात कोरलेला आहे . दरवाज्यावर दोन्ही बाजूने चक्राकार दोन फुले कोरलेली आहेत दरवाज्याची उंची मध्यम आहे आत मध्ये देवळ्या कोरलेल्या आहेत .
                     दरवाज्या पासून थोडे वर चालत आले की दोन मार्ग आहे . किल्ल्याच्या विस्तीर्ण पठारावर दोन्ही वाटेने जाता येते . या ठिकाणी अनेक उध्वस्त इमारतीचे केवळ अवशेष दाट गवतामधे दिसतात . संपूर्ण पठारावर फेर फटका मारतांना किल्ल्याची जागोजागी उध्वस्त झालेली तटबंदी नजरेस पडते . ७ ते ८ पाण्याची टाकी आढळतात . एका दगडी समाधी ची शिळा देखील या किल्ल्यावर आहे . एका तलावाच्या बाजूला वीर हनुमानाची शेंदूर लावलेली दगडी मूर्ती आहे मंदिराला पडलेल्या दगडांची चार पाच फुटांची भिंत रचलेली आहे आत काही कोरीव दगडवरून त्या ठिकाणी छोटे मंदिर असावे असे दिसते . समोरच कातरकड्याची खोल दरी आहे अश्या ठिकाणी निश्चितच काळजी घ्यावी लागते .
          हा किल्ला अत्यंत प्राचीन आहे . यादव ,बहामणी , मुघल , मराठे, इंग्रज आदि शासकांचे या किल्ल्यावर राज्य होते . शहाजी राजें यांनी देखील हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता . १८१८ नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला . दिड दोन तास जंगलातून पायपीट करत जाऊन गडावरील पायऱ्यामधील गाळ व मोठमोठी दगड हटविण्याचे काम करणाऱ्या तथा पठारावरील गाळाने  गच्च भरलेल्या दगडी कोरीव पाण्याच्या टाक्या गाळातून मुक्त करणाऱ्या सर्व गड किल्ले संवर्धन करणारे विविध सेवाभावी संस्थाचे मावळे हे खऱ्या अर्थाने शिवरायांचे सच्चे मावळे म्हणून काम करतांना दिसतात हे या भागाचे विशेष .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*

 *प्रयत्नवादाचा साक्षात्कार म्हणजे सुरेश देवकर सर*            यशाचं असामान्य शिखर गाठणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या यशामागचं गमक समजण्य...