*सत्यशोधक येतोय.......!!!*
➖➖➖➖➖➖
राष्ट्रपिता महात्मा फुले यांचे कार्य एवढे मोठे आहे की त्यांच्या कार्यावर कितीही साहित्य निर्माण झाले तरी ते त्यांच्या कार्यापुढे कमीच म्हणावे लागेल. आज परिस्थिती अशी झाली आहे की वाचायला कुणाकडे वेळ नाही. सर्वांना आयते हवे आहे. चित्रपटे, नाटके, सिरीयल्स, वेब सिरीज एवढीच माध्यमे काय ती उरलीत की काय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ! असे वाटायला लागले आहे. अन यातही सत्य असत्याचा मेळ बघावाच लागतो नाहीतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच नाटके, कथा ,कादंबरी , चित्रपटातून विकृत मांडणी होत राहणार. पण आता ते शक्य नाही त्यानंतर अनेक इतिहासकारांनी आपले आयुष्य खर्ची घालून सत्यशोधनाचे काम केले आहे आणि आता त्या सुपीक भूमीत अनेक नवतरुण अभ्यासक त्यांचा प्रचार व प्रसार करताना आजकाल दिसतात. मग अनैतिहासिक बाबी महापुरुषांच्या चित्रपट, नाटकांमधून जोडण्याची हिंम्मत आता तरी मात्र कुणाची उरली नाही. मागच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा चिकित्सकपणे अभ्यास करून छत्रपती संभाजी राजे हे छोट्या पडद्यावर मांडले. तळागाळात ते पोहोचल्याने चिरकाल लक्षात राहण्यासारखे आहे. बरीच आपली माणसे छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनाशी संबंधित घटनांची चर्चा करताना अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे या सिरीयल मध्ये दाखविलेल्या बाबीवर चर्चा करताना अन संदर्भ देतांना दिसून येत होती. नाटके आणि चित्रपटाच्या माध्यमातून सत्य मांडणी झाली तर ते प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून राहते.
सामाजिक दायित्व समोर ठेवून महापुरुषांचे विचार जनमानसात पोहोचले पाहिजे याच उद्देशाने सत्यशोधक हा महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर 1950- 52 मध्ये प्र .के. अत्रे दिग्दर्शित पहिला चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटाच्या मुहूर्ताला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, शाहीर अमर शेख स्वतः उपस्थित होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात स्वतः संत गाडगेबाबांनी अभिनय केला होता. पण हा चित्रपट पडद्यावर टिकू शकला नाही. जवळपास 70 वर्षानंतर निलेश जळमकर दिग्दर्शित, प्रवीण तायडे, सुनील शेळके ,आप्पा बारोटे, भीमराव पट्टेबहादूर ,विशाल वाहूर वाघ यांनी निर्मित केलेला सत्यशोधक चित्रपट हा 5 जानेवारीला म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी, मुक्ता साळवे यांच्या जयंतीला प्रदर्शित होतोय. 2016 मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली प्रचंड अभ्यास व माहिती घेऊन या सर्व टीमने महात्मा फुले यांचा सत्य इतिहास या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाला प्रदर्शित होण्याअगोदरच दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे. जर्मनीचा बेस्ट डायरेक्टर पुरस्कारही या चित्रपटाला मिळालेला आहे.
सत्यशोधक हा चित्रपट सत्याच्या अगदी जवळ नेणारा ठरणार आहे यात शंकाच नाही. महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांनी निर्मिलेल्या चळवळीचा, सत्याच्या आग्रहाचा, समाजोध्दारार्थ निर्मिलेल्या साहित्याचा, परिवर्तनाच्या विचारांचा अन त्यांनी केलेल्या संघर्षाचा, त्यांच्या वरील झालेल्या आघातांचा हा चित्रपट त्या प्रसंगांना जीवंतपणा निर्माण करणारा असणार आहे.
1855 ला तृतीय रत्न या नाटकातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितलं .अज्ञानातून अस्तित्व संपते आणि गुलामगिरी येथे हा संदेश त्यांनी या साहित्यातून दिला. सार्वजनिक सत्यधर्म यामधून संवादात्मक शैलीतून व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चिकित्सा करत प्रस्थापित व्यवस्थेवर प्रचंड घाव घातले. स्त्री- पुरुष समानतेचा मंत्र देऊन संपूर्ण देशभर मानव समूहाच्या जातपात विरहित समाज जागृतीचे कार्य केले. कृषीच्या आधुनिकीकरणाचा आग्रह धरत जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला .आजही शेतकऱ्यांचा संघर्ष काळात या महात्म्याच्या आसुडाचा आवाज कानात कडाडतांना दिसतो. निश्चितच समता फिल्म्स निर्मित व अभिता फिल्म प्रस्तुत या चित्रपटात या महात्मा फुले यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा समावेश असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यावर कुळवाडी भूषण हा पोवाडा रचून रायगडावरील महाराजांच्या समाधीचा शोध लावला. "श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा ट्रेलर मधील शिवरायांचा जयघोष सर्व काही सांगून जातो. आदर्श पती कसा असावा व पत्नी धर्म काय असतो हे या चित्रपटाचे सार मानावे लागेल. सावित्रीबाईंची ज्योतिरावांना मिळालेली आयुष्यभराची साथ व या प्रस्थापित व्यवस्थेत विद्रोहाची भूमिका घेऊन समाजातील शूद्र अति शुद्रांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा संघर्ष ,स्त्री शिक्षणासाठी घेतलेला ध्यास थरार निर्माण करणारा असणार आहे. त्यातच वस्ताद लहुजी साळवे यांची भूमिका ही चित्रपटातील त्यांच्या संवादावरून लगेच लक्षात येते की हा सत्यशोधकाचा सत्य इतिहास प्रेक्षकांना संपूर्ण तीन तास खेळवून ठेवणारा असणार आहे. या माध्यमातून या संघर्षमय इतिहासाचं जागरण निश्चितच होणार आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी हा चित्रपट "संस्काराची शाळा" आहे असे म्हटले आहे. मग विद्यार्थ्यांनी अवश्य बघावा असा हा चित्रपट आहे. ज्ञानाने स्वयंप्रकाशित असलेल्या ज्योतिबांनी अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी क्रांती केली ही क्रांती फुले वाहणारा प्रत्येक जन निश्चितच प्रेरित होणार आहे. शिक्षणाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व जाणणार आहे .अविद्येने अज्ञानाच्या अंधारात चाचपडत बसलेल्यांची गुलामगिरी तोडणार आहे. शेतकऱ्यांच्या हातातील आसूड कडाडणार आहे. अशी खात्री या चित्रपटाच्या निमित्ताने वाटते. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने हा चित्रपट सहकुटुंब आपल्या मित्र परिवारासह बघावा असाच हा चित्रपट आहे. सत्याची कास धरणारा महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस ताकदीने या विचारामागे उभा राहणार आहे. निश्चितच या चित्रपटाच्या पडद्यापर्यंत खेड्यापाड्यातूनही माणसं येतीलच, या मातीशी प्रामाणिक राहून प्रत्येक सत्यशोधकी अनुयायाचे हे सामाजिक दायित्व आहे. आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याची सत्यशोधकी चळवळीशी जवळचे नाते आहे. 1882 साली याच विचारांनी प्रेरित होऊन "स्त्री- पुरुष तुलना" हा क्रांतीकारक ग्रंथरचना करणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील आपल्या बुलढाण्याच्याच! महात्मा फुले यांचे पहिले चरित्र लेखन करणारे सत्यशोधक पंढरीनाथ सिताराम पाटील की ज्यांनी विदर्भात सत्यशोधकी चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षण क्षेत्रातही फार मोठी क्रांति केली ते देखील या मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्याचेच! त्यांच्यासोबतच पुढील काळात बुलढाणा जिल्ह्यात अनेक सत्यशोधकी विचारवंतांनी समाजासाठी आपला देह झिजवण्याचे काम केले आहे . चित्रपटाचे निर्माते बुलढाणा येथील अभिता फिल्म्स प्रोडक्शन लिमिटेड चे सुनिल शेळके हे सुद्धा आपले सामाजिक दायित्वाचे भान ठेवत महापुरुषांचे विचार पोहोचण्याचे काम करत आहे. या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा.
➖➖➖➖➖♾️
संजय खांडवे, बुलढाणा
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा