🚩🚩🚩🚩🚩🚩
*जिजा माऊली गे तुला वंदना ही......*..
🚩🚩🚩🚩🚩🚩
इसवीसनाच्या शेकडो वर्षा पूर्वी पासूनच या भारतवर्षात सोन्याचा धूर निघत होता याचे पुरावे आजही या देशात आहेत .आर्थिक समृध्दता लाभलेला आपला देश सामाजिक दृष्टयासुद्धा एकसंघ होता .कला ,साहित्य,संस्कृती यामधेही पुढेच होता .सुरत बंदर मार्गे रोम ,युरोप आदी देशासोबत आपला मसाले,हस्तीदंत या सारखा व्यापर चालत असे .आजच्या भाषेत आपला GDP ग्रेड नुसार म्हटले तर A+होता असे म्हणावे लागेल .
आठव्या शतकात अरबचा सेनापती महम्मद बीन कासिम च्या रुपाने झाले .त्याने सिंधचा राजा दाहिर याचा पराभव केला .इ.स़ १० व्या शतकाच्या अखेरीस महम्मद गझनी आला .१२ व्या शतकात महम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन दिल्ली जिंकली .पहील्या आक्रमणापासून ५०० वर्षा पर्यन्त लुटीचा मुख्य उद्देश ठेवत आक्रमणानी उत्तर भारत त्रस्त होता .पुढे या आक्रमणी सत्ता दिल्लीच्या सत्तेवर आल्या .देवगिरीच्या आतिक्षय समृध्द अश्या साम्राज्याचाही अस्त झाला .१४ व्या शतकात हया सत्ता पुढे दक्षिणेकडे सरकल्या .विजयनगरचे साम्राज्य लयास गेले व बहामणी साम्राज्य आले .या सर्वामधे अंर्तगत सत्ता संघर्ष सुरु झाला .उत्तरे कडे अकबर,जहागिर,शहाजहान,औरंगजेब यांचा अंतर्गत सत्ता संघर्ष सुरुच होता .दक्षिणेतही बहामणी साम्राज्याचे विघटन होऊन जसे बहामनी साम्राज्याच्या काळात देवगिरी म्हणजे आत्ताचा दौलताबाद वर त्या प्रांताचे सुभेदार त्यांनी नेमले होते ते स्वतंत्रपणे कारभार करून पुढे १४९८ च्या काळापर्यंत निजामशाहीत रूपांतरित झाले होते .अगदी तशाच वैयक्तिक महत्त्वाकांक्षे पोटी अदिलशाही,कुतुबशाही,बरीदशाही,इमादतशाही, याशाह्या अस्तित्वात येऊन संघर्ष करू लागल्या .गुलामगिरीच्या काळोखात रयत त्रस्त होत चालली होती पाचही शाह्या सत्ता पिपासून वृत्तीने आपसात भांडत होत्या . सुरूवातीला लुटीच्या उद्देशाने आलेल्या हया परकीय सत्ता येथे स्थिरावल्या व महसूली कर, जिझिया कर,सारा,खंडनी आदी माध्यमातून ह्या सत्ता शोषण करू लागल्या .जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्याने ते स्थानिक सरदारांची मदत घेत असत त्यांना चाकरीत ठे वून या कामात त्यांना स्थानिक जमीनदार,जहागीर दार त्यांच्या पदरी आपल्या लष्करी सामर्थ्यनुसार मदत करुन त्यांच्या दरबारी राहून आपल्या पदरात पाडून घेण्यात धन्यता मानत असत .
सामान्य रयतेचे मात्र यात शोषण होत असे . शेकडो वर्षाची गुलामगिरीची जळमटे एवढी साचली की त्याचे ओझे सोसण्यातच आयुष्य संपून जात असे . सामान्य रयतेला तर वारकरी, महानुभाव, नाथ आदि संतांच्या प्रबोधन परंपरा सोडल्या तर या मातीतल्या माणसांच्या मनामध्ये कुठल्याही स्वातंत्र्याची आस उरली असावी असे दिसत नव्हते .
याच काळात देवगिरीच्या यादव साम्राज्याचे वारस या परकीय आक्रमणा मुळे देवगिरी पासून दूर राहून मनात स्वराज्याची ज्योत तेवत ठेवून होते .जदूराय म्हणजे राजे लखुजी जाधवराव .सिंदखेडराजा येथे आपली स्वतंत्रतेचीच तयारी त्यांनी सुरु केली होती .२४००० पायदळ,१५००० घोडतळ व ५२ चावडयाचे वतन सांभाळूत रयतवत्सल राजाच्या रूपाने हे जाधवराव घराणे शेकडोवर्षापासून हिरावून घेतलेल्या या मातीच्या मुक्तीसंग्रामासाठी झटत होत . आडगाव राजा ,मेहूणाराजा,देऊळगाव राजा ,किनगावराजा या सिंदखेडराजाच्या चार दिशेला असणाऱ्या गावांना(राजा) किल्ल्याचे स्वरूप देत त्या ठिकाणी आपले मजबूत असे गडकोट निर्माण करण्याचे काम सुरू करून त्या ठिकाणी आपल्या घरातील कर्तबगार जाधव रावांना नियुक्त करत त्या त्या दिशांची जणू जबाबदारीचं दिली असल्याचे जाणवते. युद्धाचा प्रसंग ज्यावेळेस नसे त्यावेळेस ही जाधव राव मंडळी रयतेत रममान होत असे. सिंदखेड राजा परिसरात त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे केलेली दिसून येतात . याच जाधवराव कुलवंशीयांच्या समकालात महाराष्ट्रात भोसले वंशीयांची मूळवस्ती झाली .मालोजी राजे या भोसले कुलवंशातील कर्तबगार पुरुष होते पुढे इंदापूरच्या लढाईमध्ये त्यांना वीर मरण आले त्यांच्या पत्नी दीपाबाई उर्फ उमाबाई या सती जाण्यासाठी निघाल्या त्यावेळेस विठूजींनी दीपाबाईंचे सांत्वन करून मुले लहान आहेत हे सांगून त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले होते. शहाजी व शरीफजी याच विठोजींच्या तालमीत तयार होऊन पुढे सिद्ध झाले होते. याच काळात म्हाळसाई आणि राजे लखुजी यांच्या पोटी स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांनी जन्म घेतला. जाधवांच्या पदरी असलेले बजरंग भाट यांचे एक कवन उपलब्ध आहे. त्यामध्ये ते म्हणतात,
जगदंबे कृपेने झाली मुलगी म्हाळसाबाईला।
तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वांना।
फसली सन १००७ पौष पौर्णिमा सूर्योदयाला।
राणी म्हाळसा महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला।
12 जानेवारी 1598 रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा पौष पौर्णिमेला सूर्योदयासमयी सकाळी सहा वाजता, गुरुवारला जन्म झाला.
अगदी बालपणापासून हातात तलवार घेणाऱ्या व रयतेत रमणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना स्वातंत्र्याची प्रेरणा येथेच मिळाली. सत्य व न्यायासाठी स्वाभिमानाने लढणे त्यांना याच संस्कारात मिळाले. मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटणाऱ्या या लखुजी जाधवांना जिजाई चे व तिच्या स्वाभिमानाचे नवल वाटे. अर्कज्ञ,सहस्त्रकरविक्रम ,महाबली अश्या नानाविध बिरुदावली इतिहाला ज्या शहाजीराजे यांना लावाव्या लागल्या . त्या महापराक्रमी शहाजीराजे यांच्यासोबत जिजाऊंचा विवाह झाला.
सा तं महाशयं प्राप्य विभ्रती व पुरुज्वलम ।
गंगेव गुणगंभीरा व्यराजत महोदधिम।।
ज्याप्रमाणे शुभ्र व खोल व गंगा सागरास मिळाली असता शोभते तशीच तेजपुंज शरीर धारण करणारी गुणवती जिजाबाई या गुणगंभीर शहाजीराजास संयोग पाहून शोभू लागत आहेत असे वर्णन शिव भारतकार दुसऱ्या अध्यायात करतो.
भोसले - जाधव या कुटुंबियांच्या बाबत बखरकारांनी ऐकिव माहितीवरून अनेक कल्पित कथा रचलेल्या दिसतात. जिजाऊ शहाजीराजे यांच्या विवाहापासून अशा कल्पित कथा रचल्या गेल्या .शिवरायांच्या समकालीन शिवभारतातही बखरकारांनी दिलेल्या कथा येत नाहीत. रंगपंचमीच्या कथा कल्पित असल्याचे अभिप्राय इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे देतात. त्याच पद्धतीने मातृतिर्थ बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ इतिहासकार संतोष बाहेकर यांचे "सिंदखेडचे जाधव आणि त्यांचे मराठ्यांच्या इतिहासातील कार्य'" या संशोधनपर प्रबंधामध्ये त्यांनी भोसले- जाधवां च्या संबंधावर सविस्तरपणे संशोधन केल्याचे दिसते. दोन कुटुंबातील निर्माण झालेले वितुष्ठ हे खंडागळे हत्ती प्रकरणातून झाले व त्याचे कारण तात्कालिक होते. निजाम पुत्र आपल्या मांडीवर बसून स्वतः सिंहासनावर आरूढ होऊन त्यांनी स्वतंत्र राज्यकारभार चालविला नाशिक, त्रंबक ,संगमनेर ,जुन्नर कोकण ताब्यात घेऊन स्वातंत्र्याचा झेंडा उभारला होता असे बादशहानामा स्पष्टपणे नोंदवतो. शिवनेरी सह अन्य गड ताब्यात घेऊन गोदावरी ,प्रवरा, नीरा, भीमा आदी नद्या काठचा प्रदेश क्रमाक्रमाने पादाक्रांत करून सह्याद्री सुद्धा ताब्यात आणला होता. दिल्ली येथील मुघल बादशहा याने शहाजीराजे यांचे महत्व जाणून आदिलशहा सोबत करार केला व शहाजीराजे यांची रवानगी कर्नाटक प्रांतात केली.
या या अगोदरच्या काळात निजामशहाच्या एका मंत्र्याने त्याचे कान भरून राजे लखुजी यांच्या विरुद्ध द्वेष निर्माण करून लखुजीराजे स्वतंत्र राज्य निर्माण करू पाहत आहे या भीतीने जाधवराव घराण्यातील राजे लखुजीरावसह त्यांचे भावंड, अमात्य आदी 40 जणांचा दौलताबाद येथे 25 जुलै 1629 रोजी निर्दयपणे रक्तपात केला गेला. प्रत्यक्ष शिवभारतात नोंद आहे की ज्यावेळी जाधव रावांचा अंत झाला त्यावेळी मेरू पर्वत जणू पडला , सूर्य जसा खाली पडला, वरुणाचा जसा दाह झाला तसा जाधरावाचा अंत अत्यंत अहितकारक झाला अशी नोंद आहे .
स्वातंत्र्याची ज्योत या या दोन्ही घराण्यात सदैव तेवत होती . एखाद्या प्रवाहासोबत वाहत जाणे त्यांना कधी जमलेच नाही.
या सर्व घटना आई जिजाऊंनी अगदी जवळून पाहिल्या होत्या . या दोन्ही कुळांचे संस्कार जिजाऊ वर होते . आपल्या डोळ्यासमोर वडील, भाऊ, दिर यांच्या चिता जळताना त्यांनी बघितल्या होत्या. याच धामधुमीच्या काळात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ,आई जिजाऊंच्या गर्भामध्येच संघर्षाचा काळ अनुभवत होते. हत्तीवर, गडावर, वाघावर आरोहण करावे. शुभ्रछत्राखाली सुवर्ण सिंहासनावर स्थिर बसावे. झेंडा उंच उभारावा व फडकवावा. धनुष्यबाण, भाला चिलखत, तलवार धारण करून लढाया कराव्यात व विजयश्री मिळवावी धर्मस्थापना करावी असे डोहाळे पडणे म्हणजेच एत्तदेशीयांचे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे संकेतच होते. शिव जन्मानंतर आई जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी बाल शिवबांना काही काळ महाराष्ट्रात आणि जवळपास बारा वर्षाचे होईपर्यंत कर्नाटकामध्ये छत्रपती होण्यासाठी जे काही संस्कार लागतात ते सर्व संस्कार बाल शिवबांवर केले म्हणजेच त्यांना "सनय" होऊन पुण्य नगरीत म्हणजेच पुणे येथे तत्कालीन राजकीय परिस्थिती नुसार जिजाऊ सह पाठविले. बेचिराख झालेले पुणे पुन्हा वसविले. लाल महाल बांधण्यात आला आणि हा लाल महाल स्वराज्याच्या स्थापनेचे क्रांतीकेंद्र ठरला. या गुलामीत खितपत पडलेल्या समाजाला तारण्यासाठी जिजाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले.आईजिजाऊ साहेबांचे स्वराज्याचे स्वप्न व शहाजीराजे यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी बऱ्याच गोष्टीचा त्याग करत योग्य नियोजनासह त्यांनी सत्यात उतरविले .ही गोष्ट काही सामान्य नव्हती .गुलामीची जाणिव करून देत ,प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला .अन्याय ,अत्याचार,असत्य या विरोधात शेकडो वर्षाची मनावरील जळमटे काढून लढायला शिकवले. स्वराज्यासाठी दोन महान छत्रपती घडविले. या सोबतच लखुजीराजे यांच्या निधनानंतर त्यांनी आई म्हाळसाबाई व अचलोजी यांची विधवा पत्नी तथा त्यांचा पुत्र सृजनसिंह उर्फ संताजी याला आपल्यासोबत ठेवले. संताजी वर देखील आई जिजाऊंची खूप मोठी माया होती. संभाजी राजे सोबत संताजी उर्फ सृजनसिंह हे अगदी सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत असायचे संताजी हा संभाजी राजे सोबत एका युद्धात मारले गेले. त्यानंतर संताजींची बायका मुलं आई जिजाऊ यांच्या सोबत होती याच संताजींचा मुलगा शंभू सिंह उर्फ संभाजी जाधव हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जीवाला जीव देऊन स्वराज्यासाठी लढत होता. अफजलखानाच्या प्रसंगी संभाजी जाधव यांनी शिवरायांच्या अंगरक्षकाची जबाबदारी पार पडली होती. 13 जुलै 1660 रोजी पावनखिंडीच्या लढाईत महाराजांच्या रक्षणार्थ संभाजी उर्फ शंभू सिंह जाधव हे सिद्धी जौहरचा जावई सिद्धी मसुद यांच्यासोबत लढत असताना धारातीर्थी पडले होते. या शंभूसिंहासही घडविण्यात आई जिजाऊंचा महत्त्वाचे योगदान होतं. एवढं जाधव भोसले कुळाचं नातं आई जिजाऊ जपत होत्या. पुढील काळात धनाजी जाधव यांचे सुद्धा स्वराज्यकार्यात मोठे योगदान राहिले. संकट समई प्रसंगी हातात तलवार घेऊन त्या लढण्यासही सज्ज झाल्या.
या लोककल्याणकारी ,रयतेच्या राज्यासाठी त्या काळच्या व्यवस्थेविरुध्द रयतेची एकजूट करुन त्यांच्या मन,मस्तक अन मनगटाला बळ दिले.
माता,मातृभूमी व माणसे हे तीन मकार लोककल्याणकारी राज्याची स्थापना करून मना मनात रुजविले . दुर्ग दुर्गेश्वर रायगडी पुत्र शिवरायांना सिंहासनाधीश्वर पाहून राजमाता धन्यता पावली.
स्वराज्यजननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
➖➖➖➖➖➖
संजय खांडवे
बुलढाणा,९०११९७११२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा