*शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*
(भाग -3 )
स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग
महाराजांना फाजल खान न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी मी शिवाजी काशीद !"
" सोंगातल शिवाजी झालं म्हणून काय झालं तो काय पडणार आहे, तो काय पाठ दाखवणार आहे, अरे खोट्या शिवाजीची पाठ पाहू शकत नाही तर खऱ्या शिवाजीची पाठ बघण्याचा विचार तू सोड " असं म्हणताच त्याने शिवाजी काशिदांच्या छातीत तलवार खुपसली रक्ताची चिरकांडी उडाली, जखम दाबत तो डेऱ्याचा खांब पकडत खाली पडला, भयानक वेदना सहन करत म्हणाला " राजे काही क्षणासाठी का होईना तुमची वस्त्र घातलेला सोंगातला शिवाजी सुद्धा पाठ दाखवणार नाही राजे "मुजरा राजे! मुजरा! वीराच्या थाटात हे बलिदान या शौर्य मार्गावर अगदी पन्हाळयाच्या पायथ्याशीच झाले .
वेळेचा अपव्यय झालेला होता . आता सिद्धीच्या हेराच्या खबरे नुसार महाराज मसाई पठारामार्गे म्हणजे आताच्या कुंभारवाडी- खोतवाडी- आंबेवाडी- लिंगेवाडी यामार्गे गेल्याच्या बातम्या आल्या. मसूद पुन्हा त्याच वेगाने २००० घोडदळ व १००० पायदळ घेऊन निघाला. महाराजांच्या पालखीचे भोई फक्त आपली खांदेपालट करतायेत.एक थकला की दुसरा सर्व काही मॅरेथॉन पद्धतीने सुरु होत . क्षणभरही पालखी कोठे टेकली नाही स्वराज्याच्या छत्रपतीचं ओझआपल्या खांद्यावर पेलत, गुडघाभर चिखलातून, नदी नाल्यातून ,किर्रऽर्रऽर्र अंधारातून जात आहे या मार्गात दिवसासुध्दा अंधारलेले असे जंगल आजही आहे . पाऊस वाऱ्याने चौताळलेले वाघ ,जंगली श्वापदे,साप ,विंचू याचे तर भयही त्यांना नव्हते. सकाळी तांबडं फुटण्याच्या वेळेला महाराज आपल्या मावळ्यासह पांढरपाणी या गावात पोहोचले तोच पाठीमागून हेरांनी खबर आणली की सिद्दी मसूद जवळच पोहचला नव्या दमाचे सैन्य त्याच्यासोबत आहेत.
पांढरपाणी गावापासून जवळच गजापूरची खिंड आहे त्यापुढे सहा कोसावर विशाल गड ! महाराजांच्या सोबत हिरडस मावळ प्रांतातील बांदल मंडळी आहेत त्यांना या भागाची पूरेपूर माहीती होती. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ,रायाजी बांदल , शंभुसिंग जाधव ,विठोजी काटे हे शूर सरदार आहेत.आता महाराज विशालगडी सुखरूप पोहचणे हे सर्वाच्या मनात होते .गजापूरच्या खिंडीत आल्यावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे,हिरडस मावळ प्रांतातील सिंद हे त्यांचे गाव ,चांद्रसेनिय कायस्थ प्रभू अत्यंत शू२ व स्वामिनिष्ठ ! महाराजांना म्हणाले " आम्ही गनिमास येथे दोन प्रहरात पर्यंत रोखून ठेवतो, प्राण असेपर्यंत गनिमास खिंड चढू देणार नाही आपण विशालगडी जावे व तोफांच्या इशारती देऊन कळवावे.महाराजांचे पाऊल पण पुढे सरसावत नव्हते . मसूदचे सैन्य जवळ येताना दिसले .महाराज निवडक ३०० मावळ्यासह विशालगडाकडे निघाले .बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधवासह ३०० बांदल मावळे गजापुरच्या खिंडीत थांबले दोन्ही बाजूंनी उंच डोंगर रांगा मध्ये 500 फूट खोल खिंड की जी सरळ विशाल गडाकडे जाते. गोफणी, भाले, तलवारी बाण,डोगरउतारावर दगड गोटे घेऊन बांदल मावळे झाडा झुडपात लपून बसले. नव्या दमानं सिद्दी मसूद व फाजलखान आपल्या तीन हजाराच्या फौजेसह खिंड उतरू लागला. गनीमावर सपासप मारा होऊ लागला . पहिल्या प्रहरात शत्रूचे हजारो सैन्य आपले शूर मावळ्यांनी पावन खिंडीत पाडले. लढत असताना शंभू सिंह जाधव स्वराज्यासाठी कामी आले. शंभू सिंह जाधव म्हणजे राजे लखुजी जाधव यांचे पुत्र अचलोजीं व त्यांचे पुत्र संताजी की जे संभाजीराजेसोबतच एका लढाईत धारातिर्थी पडले होते .त्यांचेच पुत्र हे वीर शंभू सिंह जाधव होय ही जाधव मंडळी सुद्धा स्वराज्याच्या कार्यात अगदी सावलीसारखी महाराजांच्या सोबत आपल्या इतिहासाच्या पानापानात दिसतात.
अक्षरशः रक्तामासाच्या सडा पडला दुसरा प्रहर लागला बाजीप्रभू मोठ्या पराक्रमाने लढत होते प्रचंड स्वामीनिष्ठता, स्वराज्यावरील प्रेम त्यांच्या पराक्रमातून दिसत होते .सहा तास झाले लढाई सुरू आहे . ९१ कलमी बखरी नुसार प्रहर दिड प्रहर ही लढाई चालली .सतत १७ -१८ तासाचा या बांदल मावळ्यांचा संघर्ष नव्या दमाच्या सिद्धीच्या सैन्यासोबत होता विशालगडा कडून येणाऱ्या आवाजाकडे सर्वांचे कान होते कारण हाआवाज आपल्या धन्याची खुशाली सांगणारा होता. क्षणाक्षणाला एक एक मावळा कामी येत होता. अंग रक्तबंबाळ झाले होते .कुणाचे हात निकामी ,कोणाचे पाय निकामी तरीसुद्धा रयतेच्या राजा साठी ही माणसं शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. बाजीप्रभूंचा आवेश तर शत्रूंना पाहूनच भयभीत करणारा होता प्रत्यक्ष यमराजालाही या नरविराने थांबवून ठेवले . जनू यमालाही ते म्हणत आहेत ,"अरे थांब! आधी माझ्या राजाला सुखरूप पोहोचू दे ! मग माझा प्राण घे !" विशाल गडाकडे जाणारा महाराजांचा प्रवास चार-पाच कोसाचा पण त्या ठिकाणी विशाल गडालाही वेढा घालून बसलेले आदिलशाही चाकरीतील सूर्यराव सुर्वे व जसवंत दळवी यांनी महाराजांचा मार्ग अडवला. महाराजांसह सैन्य चालून चालून थकलेल असतांना पुन्हा नव्या दमाच्या सैन्यासोबत लढावं लागतंय. हा वेढा महाराजांना फोडावा लागला. यात पुन्हा हा वेळेचा अपव्यय झाला होता . मोठ्या शर्तीने हा वेढा फोडून महाराज धावत धावत गडावर गेले आणि त्या ठिकाणाहून पूर्वेकडे तोफांच्या इशाराती दिल्या. बाजीप्रभूंच्या कानी हे तोफांचे आवाज पडताच आपला धनी सुखरूप पोहोचला हे समजून नरवीर बाजीप्रभूंनी या पावनखिंडीत आपला देह ठेवला. त्याच्या समवेत त्यांचे बंधु फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व ३०० बांदल मावळे या ठिकाणी धारातिर्थी पडले . काय ही स्वामीनिष्ठता म्हणावी काय हे स्वराज्यप्रेम !
इतिहासात महाराजांचे युद्धतंत्र हे जगालाही वेड लावणारे आहे .जगात ही अशी एकमेव लढाई आहे की जी आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी एका खिंडीत लढली गेली व त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन ठरली .ही शेकडो वीरांची बलिदाने मराठा साम्राज्याची प्रेरणास्थानेच आहेत .
वरिल संघर्षमय इतिहास ज्या भूमीत घडला त्या भूमीत प्रत्यक्ष पदभ्रमंती करून लक्षात येते की आज तरी रस्ते पाऊल वाटा आहेत त्यावेळी काय होतं ? हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य म्हणून ही संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष शौर्य भूमीवर जाऊन सत्य इतिहास संदर्भाच्या आधारे समजून घेता येतो आपणही प्रत्येक वर्षी ११,१२ व १३जुलै या तीन दिवसात महाराज ज्या मार्गाने पन्हाळ्यावरुन विशाळगडावर गेले त्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन अनुभव घ्यावा .
संजय खांडवे
9011971122















