बौध्द,जैन व हिंन्दूचे प्राचीन शिल्पग्राम - भद्रावती
स्थान : ता. भद्रावती जि . चंद्रपूर , चंद्रपूर वरून २५ कि.मी.व नागपूर पासून १२५ कि.मी.
बौध्द ,जैन व हिन्दू धर्मियांचे प्राचीन वारसा लाभलेले विदर्भातील अत्यंत महत्वाचे शहर म्हणजे भद्रावती होय . खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भद्रावतीच्या भूमित अनेक राजवटी होऊन गेल्या यामधे सातवाहन , वाकाटक, राष्ट्रकुट, मौर्य, गुप्त , चालुक्य, यादव, गोंड या सर्वाची अगदी दोन अडीच हजार वर्षा पासूनचे प्राचीन भौतिक संदर्भ हया शहराच्या भ्रंमती मधून दिसून येतात . जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रचंड उकाड्यात आम्ही भद्रावती परिसरात होतो . इतिहासकार तथा प्राचीन लेणी मंदिरे व शिल्प या विषयातील प्रकांड अभ्यास असलेले आमचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व डॉ अशोक राणा सर सोबत चंद्रपुरात असतांना अगोदरचे तीन दिवस विवेक चांदुरकर व प्रमोद टाले हया अभ्यासकांसोबत भद्रावती विषयी बरीच चर्चा झाली होती म्हणून आम्हाला भद्रावतीची विशेष ओढ लागली होती .
महामार्गापासून शहरातील बाजारपेठेमधून शहराच्या अगदी पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला विजासन बौद्ध लेणी टेकडी आहे . पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी या लेणीचे संवर्धन झाले आहे . वर जाणाऱ्या पायऱ्याने आपण या लेणीमध्ये जातो. बाह्य भागात बऱ्याच देवड्या आहेत यामध्ये काही शिल्प देखील बघायला मिळतात जाताना उजव्या बाजूच्या देवळीत हीनयान कालखंडातील बौद्धस्तुप उठावदार शिल्पात कोरले आहे अशा स्वरूपाचे एकमेव शिल्प बघायला मिळते या शिल्पात छत्रावली, यष्टी ,हर्मिका, अंड, वेदिका आणि मेधी असे सर्व भाग असलेले स्तुप कोरलेले दिसते . उजव्या बाजूस अस्पष्ट असा शिलालेख आहे .आत जाताना गजपृष्टाकार छत असलेली कमानीतून समोर ' ध्यान मुद्रेतील बौद्ध मूर्ती दिसते . आठ ते दहा फूट रुंद व 50 ते 60 फूट लांब अशी ही आत मधली साधारणतः रचना आहे . लेणीच्या डाव्या व उजव्या बाजूस देखील अशाच स्वरूपाची आणखी आत मध्ये गजपृष्ठाकार आकारात कोरलेली लेणी असून त्यामध्ये देखील भगवान गौतम बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा कोरलेली आहे . हीनयान व महायान पंथाचा समन्वय या लेणीमध्ये दिसून येतो त्यामुळे या लेणीचा कालखंड हा दोन हजार वर्षापूर्वीचा असावा . विदर्भात फार कमी लेण्या बघायला मिळतात सालबर्डी, पातुर यासारख्या ठिकाणी लेण्या आहेत . विजासन टेकडीच्या पुढे देखील अशा स्वरूपाची काही शैलगृहे आहेत . गौराळा वरदविनायक हे भद्रावती पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मंदिर आहे या मंदिरात भव्य अशी गणेश मूर्ती असून हे मंदिर देखील प्राचीन आहे या मंदिराच्या बाहेर एक सुंदर छोटी लेणी आहे . या छोट्याशा लेणीत विष्णूचे वराह ,नृसिंह अवतार शिल्पे कोरलेली आहेत . लेणी बाहेर देखील बरीच शिल्पे आहेत .लेणीत स्पष्टपणे पायथ्याशी भारवाहक यक्ष या छोट्याशा लेणीचा भार तोडून धरताना दिसतात मंदिराच्या आत मध्ये प्राचीन उमाशंकर , नंदी शिल्प तथा शिवलिंग देखील बघायला मिळते .
भद्रावती शहराचे नाव ज्या ग्रामदैवतेवरून पडले त्या भद्रनाग देवतेचे मंदिर शहराच्या अगदी मध्यभागी आहे . शेष नागाचे स्वतंत्र असलेले एकमेव मंदिर या शहरात आपल्याला बघायला मिळते .नऊ फण्याची शेषनागाची मूर्ती गाभार्यात विराजमान आहे. 36 खांबावर असलेले हे प्राचीन मंदिर आणि प्रत्येक खांबाच्या पायथ्याशी असलेला भारवाहक यक्ष दिसून येतो . या मंदिरात एक शिलालेख देखील आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या छोट्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूने विष्णू मूर्ती स्थापित केली असून दरवाजावर भारवाहक यक्ष आपले स्वागत करतो. मंदिराच्या आत मध्ये शेषशायीअसलेली भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती आहे . मंदिर परिसरात पायऱ्यांची दगडी चिरेबंदी भव्य विहीर आहे . या परिसरात एक विरगळ देखील दिसून येते. शहरात एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आहे . मंदिर अगदी लहान असून या मंदिराच्या समोर प्राचीन दगडी खांब उभा केलेला आहे या दगडी खांबावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत . हा मंदिर समूह व दगडी खांब आता सिमेंटीकरण्याच्या प्रचंड अशा सभा मंडपाच्या आत घेण्यात आलेला आहे .
भद्रावती शहराचे आणखी एक वैभव म्हणजे शहराच्या पश्चिम भागात असलेला भुईकोट किल्ला याला भांदकचा किल्ला देखील म्हणतात . पूर्व बाजूस भव्य असे कमानीचे प्रवेशद्वार या किल्ल्याला आहे लाल दगडात बांधलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे . साधारणपणे किल्ल्याचे बुरुज हे गोलाकार स्वरूपाचे असतात मात्र या किल्ल्याचे बुरुज हे चौकोनी आहेत दरवाजा देखील दोन चौकोणी बुरुजाच्या मध्ये आपल्याला दिसतो असे आठ बुरुज या किल्ल्यास आहे . आत मध्ये साधारणपणे तीन साडेतीन एकरचा भाग असून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असून बुरुजाच्या आणि प्रवेशद्वाराच्या वरील भागात जंग्या आहेत . पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी संवर्धन सुरू आहे . किल्ल्याच्या आत मध्ये अनेक इमारतींचे वाड्यांचे अवशेष दिसून येतात. किल्ल्यामध्ये असलेली पायऱ्यांची विहीर अजूनही चांगल्या स्थितीत आहे L आकारात असलेल्या पायऱ्या असून मजबूत अशा पाषाणात बांधलेली ही विहीर या किल्ल्यास पाणी पुरवण्याचे काम करत असे . विहिरीत उतरण्यासाठी तीन ठिकाणी मधून पायऱ्या मार्ग आहे . जसा पाण्याचा स्तर असेल तसा या पायऱ्यांचा उपयोग होत असे प्रचंड असा तीन मजली महाल या विहिरीत दिसून येतो .सुंदर असे कमानी वरील नक्षीकाम व या कमानीवरील सुंदर कोरीव पट्ट्या आपले मन मोहून घेते या विहिरीच्या वरच्या भागावर मोट बसविलेली असायची त्याचे अवशेष आता दिसून येतात वरील बाजूस तीन मोठे हौद असून दगडी पन्हाळाच्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्यास व येथील बाग बगीचा देखील पाणी पुरवले जात असल्याचे दिसून येते . संपूर्ण दगडी चिरेबंदी बांधकामात असलेल्या विहिरीच्या मात्र एका बाजूस नंतरच्या काळात केलेले विटाचे बांधकाम आढळते हे एक या विहिरीचे गुढ आहे . विहिरीच्या तळात बाहेर आलेला एक महाकाय दगड दिसतो असे सांगितले जाते की हया दगडाच्या पलीकडून एक भुयारी मार्ग विजासन लेणे भागात निघतो . पश्चिम बाजूस एक छोटे द्वार देखील या भुईकोटस आहे याचे मुख दक्षिण बाजूस केले आहे या छोट्या प्रवेशद्वारावर एक मुख मुद्रा कोरलेली आहे . भद्रावती शहर हे शिल्पांचे शहर मानले जाते या परिसरात असलेले अनेक प्राचीन लेणी व मंदिरे परिसरातील आढळलेले मूर्ती शिल्प या कोटात ठेवण्यात आलेली आहे . मासा भेदनारा अर्जुन हा भिंतीवरील शिल्पात कोरलेला आहे त्या परिसरामध्ये शीर तुटलेला ढेरपोट्या कुबेराची मूर्ती हातात साप व धनाचे हंडे त्याच्यासोबत आहेत त्याचबरोबर शंकर पार्वती , महिषासुर मर्दिनी ,भगवान महावीर ,गौतम बुद्ध नृसिंह अवतार, वराह अवतार गदा चक्रधारी भगवान विष्णू , गणेश तथा नर्तकी वीरगळ आणि कधीही न पाहिलेल्या बऱ्याचश्या अनाकलनिय मूर्ती शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात .
जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर केसरीया भगवान पार्श्वनाथ यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे . हे मंदिर नवनिर्मित असून संपूर्ण संगमरवरी दगडांमध्ये बारीक शिल्प कला मध्ये बांधण्यात आले आहे . या मंदिर संस्थानाकडून अनेक सेवाभावी उपक्रम चालविले जातात त्याची प्रचिती या मंदिराला भेट दिल्यानंतर येते . भगवान पार्श्वनाथाची अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरामध्ये आहे या पद्मासन स्थितीत असलेल्या मूर्तीची उंची 152 सेंटीमीटर असून अत्यंत मनमोहक ही मूर्ती आहे पार्श्वनाथ भगवानचे वाहन नागफणा आहे. ही फणायुक्त अत्यंत सुबक अशी मूर्ती शिल्प केवळ भद्रावती येथेच दिसून येते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा