शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*
(भाग -१ )
स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग
१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप भूमीमध्ये अफजली संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.
या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला. हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .
२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता.
महाराज पन्हाळयावरून राजदिंडी दरवाज्यातून १३ जुलै १६६० च्या रात्री पालखीतून बाहेर पडले . पुढे विशाल गडापर्यन्तचा किर्र जंगलात दऱ्या खोऱ्यातून जाणारा मराठयांच्या शौर्यभूमि वरील शौर्यमार्ग ज्या वाटेने आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री धो-धो कोसळणाऱ्या काळ्या कुट्ट अंधारात राजदिंडी दरवाज्यातून म्हाळुंगी व पुढे मसाई पठारावरून - पांढरपाणी मार्गे महाराज मावळ्या सह वेढ्यातून बाहेर पडले होते या शौर्य मार्गाचा साक्षीदार होत हिंदवी परिवाराच्या नियोजनबद्ध मोहिमेतून ह्या मार्गावरून चालण्याची संधी मिळाली . वीर शिवाजी काशिदांच्या बलिदानासह बाजीप्रभू देशपांडे सह ३०० बांदल मावळ्यांचा स्वराज्यनिष्ठेसाठी दिलेले बलिदान व इतर अवस्मरणिय आपल्या वैभशाली इतिहासाच्या पाउल खुणा पावनखिंडीतून पुढच्या भागात.......!!
संजय खांडवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा