*समरभूमी -उंबरखिंड*
ता खालापूर जि रायगड
पुणे पासून १०५ कि.मी. खालापूर -पाली मार्गावर शेंबडी फाट्या पासुन ४ कि मी
पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज सुखरूप विशालगडी पोहचतांना गजापूरच्या पावनखिंडीत स्वराज्याच्या स्वामिनिष्ठतेचा थरार सिद्धीच्या सैन्याने अनुभवला होता . स्वामिनिष्ठतेच प्रतीक ठरलेल्या पावनखिंडी नंतर खिंडीत झालेली शिवचरित्रातील लढाई म्हणजे उंबरखिंडची लढाई आहे . मोगली झेंडा हाती घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान हा पाऊन लाखाची फौज घेऊन दक्षिणेकडे निघाला होता. २८ जाने .१६६० ला तो औरंगाबादला पोहचला होता. अहमदनगर मार्गे तो ९ मे १६६० ला लाल महाल पुणे येथे आला .हडपसर , सासवड , चाकण आदि भागातील सर्व लहान मोठे वाडे , गढ्या इत्यादि वर त्याने ताबा केला . चाकणचा संग्रामदुर्ग घेण्यास मात्र त्याला ५६ दिवस लागले . हजारो मोगल विरुध्द पाच सहा शेकडयात असलेले फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वात मराठे प्राणाची बाजी लावून लढले होते . शाहिस्ता तीन वर्ष स्वराज्यात ठान मांडून होता . याच काळात मोगली सरदार कारतलब खानाने परांडयाची म्हणजे प्रचंडपूरची विजयी मोहिम पूर्ण केली होती . या मोहिमेने शाहिस्ताखान त्याच्यावर खुष होता म्हणून त्याने सहयाद्री जिंकला म्हणजे शिवाजी राजाचे स्वराज्य कमकुवत होईल या उददेशाने सह्याद्री उतरुन कोकण जिंकावा या हेतूने कारतलब खानास कल्याण,भिवंडी , चौल, पनवेल, नागोठाणा घेण्यासाठी मोहिम सोपविली . देशावरून कोकणात उतरण्यास अनेक घाट वाटा आहेत . कारतलब खान भोर घाटातून कोकणात उतरेल असा अंदाज होता त्यावेळी महाराज राजगडी होते . शत्रूने मात्र पवन मावळातून तिकोना , तुंग , लोहगड , विसापूर ह्या सरक्षक दुर्गाच्या मधून 30 हजाराचे सैन्य घेऊन कुच केले वरील गडावरुन प्रतिकार होत नाही हे पाहून त्याचा आत्मविश्वास तर अजूनच वाढला होता या पवना खोऱ्यातून कुरवंडे गावातून हा घाट उतररुन उंबरखिंडीतील घनदाट जंगल पार करत लोणावळा परिसरातीत अंबेनळीच्या मार्गाने जावे लागते .
हिंदवी परिवाराच्या मदतीने हा १५ ते १८ कि . मी चा उंबरखिंड पर्यन्तचा ट्रेक पूर्ण करता आला ज्या वाटेने हे सैन्य उतरले तो मार्ग आजही घनदाट अरण्य व जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेला आहे . लोणावळयातून कुरवंडे गावात वाहने सोडून ट्रेक सुरु होतो . गावातून उंच टेकडीवर पोहचल्यावर समोर उंच डोंगरी टोक दिसते तोच नागफणी डोंगर आहे एका तासाची चढाई याची आहे . त्याच्या खालीच इंद्रायणी मातेचे उगम स्थान आहे . नागफणी टेकडीवर महादेव मंदिर आहे . पण आम्ही उंबरखिंडीत उतरत असल्याने टेकडीच्या पायथ्याशी डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने कडे डोंगर कड्यांचा आसरा घेत घटदाट जंगल पार करत दोन तासात एका पठारावर पाहचलो व तेथून पुन्हा घनदाट व जाळी मधून वाट काढत उतरून नदीच्या पात्रात उतरलो व समोर चावणी गाव दिसले . तेथुन पुढे पकक्या वाटेने उंबरखिंडीत पोहचता येते .हा ६ ते ७ तासाचा प्रवास आहे . हाच रस्ता पुढे शेंबडी फाट्यावर जाऊन पाली महामार्गाला मिळतो .
शिवभारतात परमानंद या लढाईचे वर्णन करतो यात तो म्हणतो की शाहिस्ता खानाने कारतलब खाना सोबत महाबलवान महापराक्रमी कछप व चव्हाण , अमरसिह , मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे , अजिक्य रायबाधिन ( माहूरची जहागिरी यांच्याकडे होती मेहकर पर्यन्त हदद होती ) जसवंत कोकाटे , महाबाहू जाधव असे सेनानायक पाठवत आहे अस म्हणतो . त्याच बरोबर तुर्कताज खान, लोदी खान , गयासुद्दीन खान , हौद खान , राजा प्रद्युघ्न व अनिरुद्ध , सुराजी गायकवाड, दिनकर काकडे , कमळाजी गाढे असे बलाढय सरदार स्वराज्यावर चालून आलेत . पुण्यात लाखा भराचं सैन्य दाखल आहे आणि हे तीस हजाराचे सशस्त्र सैन्य अनेक मातब्बर सरदार घेऊन कोकणावर जात आहे . मराठ्यांच सैन्य केवळ हजार दोन हजाराचं होत .शिवभारतात परमानंद शत्रू सैन्याचं वर्णन करतांना कळते की या लढाईत मावळयांचा पराक्रम किती मोठा आहे . कुरवंडे गाव ओलांडतांना त्यांना अडविले नाही जेव्हा शत्रु सैन्य दरीत घनदाट जंगलात उतरले तेव्हा गनिमी काव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला . या नियोजनात बर्हिजी नाईकांचा मोठा वाटा होता . प्रत्यक्ष आम्ही ज्या वेळेस उंबर खिंडीत उतरलो त्यावेळेस दोन्ही बाजूनी उंच टेकड्या व घनदाट जंगल यामधून अचानक सपा- सप बाणांचा वर्षाव झाल्याने शत्रु हतबल झाला असावा याची प्रचीती येते . फेब्रुवारी असल्याने महाराजांच्या सैन्याने पानवठ्यावर अगोदरच कब्जा केला होता . नेताजी पालकरासह स्वतः शिवाजी महाराज या लढाईत उतरले होते . सपूर्ण चिलखती पोषाख व डोक्यावर शिरस्त्रान घालून हातात भाला कमरेस तलवार पाठीवर ढाल अन धनुष्य बाणासह शत्रुच्या वधासाठी घोड्यावर आरूढ होऊन महाराज स्वतः लढत आहे .
सावित्रीई रायबाघिणीने कारतलबास म्हणाली शिवाजी रूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे वाईट काम केले . आजपर्यन्त दिल्ली पातशहाचे यश या अरण्यात बुडविले . दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापतीने ( शाहिस्ताखान)शत्रुच्या प्रतापरूपी अग्नी मध्ये तुला सैन्यासह टाकले . कारतलबाने रामबाघिणचा सल्ला ऐकला . या अरण्यात आंधळया सारखे सैरावैर झालेले शत्रू शरण आले . कारतलब खान व त्याचे शूर महाबाहु म्हणविणाऱ्या सरदारांनी महाराजास खंडणी पाठवून स्वतः स मुक्त करून घेतले . कुणी ढाल देऊन मुक्त झाले तर कुणी तलवार , घोडा व जवळील असेल नसेल ते देवून पळाले . स्वराज्यातील हा मोठा विजय होता या वेळी युद्ध सामुग्री सह अनेक मौल्यवान वस्तु देखील मिळाल्या .२ फेब्रु १६६१ ला उंबरखिंडीतल्या समरभूमीवर हा रणसंग्राम घडला .
आज या समरभूमीच्या खिंडीत नदीच्या पात्रात विजयस्तंभ उभारला आहे . कुठलेही स्वराज्याचे नुकसान न होऊ देता हजार पटीतील सैन्य हतबल करून शरण आणले व स्वराज्य अधिक मजबूत झाले . हा संदेश येथे मिळतो . या स्मारकावर ढाल , तलवार, धनुष्य, भाला, भगवाध्वज सर्वोच्च असून महाराजांचे शिवभारतातील वर्णनाप्रमाणे शिल्प कोरले असून इतर बाजूस लढाईचा सक्षिप्त माहीती सह व आज्ञापत्र कोरले आहे . या खिंडीत कुरवंडे गावातून उतरतांना स्थानिक जाणकार व तज्ञा सोबतच समूहाने उतरावे .चार चाकी गाडीने शेंबडी फाटयावरुन जाणे सुरक्षित आहे .
संजय खांडवे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा