गुरुवार, १ मे, २०२५

जंजीरा

 





















































शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड* (भाग -3 )

 



*शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*


(भाग -3 )


स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग


महाराजांना फाजल खान न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या  पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्‍यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी मी शिवाजी काशीद !"

" सोंगातल शिवाजी झालं म्हणून काय झालं तो काय पडणार आहे,  तो काय पाठ दाखवणार आहे, अरे खोट्या शिवाजीची पाठ पाहू शकत नाही तर खऱ्या शिवाजीची पाठ बघण्याचा विचार तू सोड " असं म्हणताच त्याने शिवाजी काशिदांच्या छातीत तलवार खुपसली रक्ताची चिरकांडी उडाली, जखम दाबत तो डेऱ्याचा खांब पकडत खाली पडला, भयानक वेदना सहन करत म्हणाला " राजे काही क्षणासाठी का होईना तुमची वस्त्र घातलेला सोंगातला शिवाजी सुद्धा पाठ दाखवणार नाही राजे "मुजरा राजे! मुजरा! वीराच्या थाटात हे बलिदान या शौर्य मार्गावर अगदी पन्हाळयाच्या पायथ्याशीच झाले .

   वेळेचा अपव्यय झालेला होता . आता सिद्धीच्या हेराच्या खबरे नुसार महाराज मसाई पठारामार्गे म्हणजे आताच्या कुंभारवाडी- खोतवाडी- आंबेवाडी- लिंगेवाडी यामार्गे गेल्याच्या बातम्या आल्या. मसूद पुन्हा त्याच वेगाने २००० घोडदळ व १००० पायदळ घेऊन निघाला. महाराजांच्या पालखीचे भोई फक्त आपली खांदेपालट करतायेत.एक थकला की दुसरा सर्व काही मॅरेथॉन पद्धतीने सुरु होत . क्षणभरही पालखी कोठे टेकली नाही स्वराज्याच्या छत्रपतीचं ओझआपल्या खांद्यावर पेलत, गुडघाभर चिखलातून, नदी नाल्यातून ,किर्रऽर्रऽर्र अंधारातून जात आहे या मार्गात दिवसासुध्दा अंधारलेले असे जंगल आजही आहे . पाऊस वाऱ्याने चौताळलेले वाघ ,जंगली श्वापदे,साप ,विंचू याचे तर भयही त्यांना नव्हते. सकाळी तांबडं फुटण्याच्या वेळेला महाराज आपल्या मावळ्यासह पांढरपाणी या गावात पोहोचले तोच पाठीमागून हेरांनी खबर आणली की सिद्दी मसूद जवळच पोहचला नव्या दमाचे सैन्य त्याच्यासोबत आहेत.

      पांढरपाणी गावापासून जवळच गजापूरची खिंड आहे त्यापुढे सहा कोसावर विशाल गड ! महाराजांच्या सोबत हिरडस मावळ प्रांतातील बांदल मंडळी आहेत त्यांना या भागाची पूरेपूर माहीती होती. त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ,रायाजी बांदल , शंभुसिंग जाधव ,विठोजी काटे हे शूर सरदार आहेत.आता महाराज विशालगडी सुखरूप पोहचणे हे सर्वाच्या मनात होते .गजापूरच्या खिंडीत आल्यावर नरवीर बाजीप्रभू देशपांडे,हिरडस मावळ प्रांतातील सिंद हे त्यांचे गाव ,चांद्रसेनिय कायस्थ प्रभू  अत्यंत शू२ व स्वामिनिष्ठ ! महाराजांना म्हणाले " आम्ही  गनिमास येथे दोन प्रहरात पर्यंत रोखून ठेवतो, प्राण असेपर्यंत गनिमास खिंड चढू देणार नाही आपण विशालगडी जावे व  तोफांच्या इशारती देऊन  कळवावे.महाराजांचे पाऊल पण पुढे सरसावत नव्हते . मसूदचे सैन्य जवळ येताना दिसले .महाराज निवडक ३०० मावळ्यासह विशालगडाकडे निघाले .बाजीप्रभू,फुलाजी प्रभू,शंभूसिह जाधवासह ३०० बांदल मावळे गजापुरच्या खिंडीत थांबले दोन्ही बाजूंनी उंच डोंगर रांगा मध्ये 500 फूट खोल खिंड की जी सरळ विशाल गडाकडे जाते. गोफणी, भाले, तलवारी बाण,डोगरउतारावर दगड गोटे घेऊन बांदल मावळे झाडा झुडपात लपून बसले. नव्या दमानं सिद्दी मसूद व फाजलखान आपल्या तीन हजाराच्या फौजेसह खिंड उतरू लागला. गनीमावर सपासप मारा होऊ लागला . पहिल्या प्रहरात शत्रूचे हजारो सैन्य आपले शूर मावळ्यांनी पावन खिंडीत पाडले. लढत असताना शंभू सिंह जाधव स्वराज्यासाठी कामी आले. शंभू सिंह जाधव म्हणजे राजे लखुजी जाधव यांचे पुत्र अचलोजीं व त्यांचे  पुत्र संताजी की जे संभाजीराजेसोबतच एका लढाईत धारातिर्थी पडले होते .त्यांचेच पुत्र हे वीर शंभू सिंह जाधव होय ही जाधव मंडळी सुद्धा स्वराज्याच्या कार्यात अगदी सावलीसारखी महाराजांच्या सोबत आपल्या इतिहासाच्या पानापानात दिसतात.

      अक्षरशः रक्तामासाच्या सडा पडला दुसरा प्रहर लागला बाजीप्रभू मोठ्या पराक्रमाने लढत होते प्रचंड स्वामीनिष्ठता, स्वराज्यावरील प्रेम त्यांच्या पराक्रमातून दिसत होते .सहा तास झाले लढाई सुरू आहे . ९१ कलमी बखरी नुसार प्रहर दिड प्रहर ही लढाई चालली .सतत १७ -१८ तासाचा या बांदल मावळ्यांचा संघर्ष नव्या दमाच्या सिद्धीच्या सैन्यासोबत होता विशालगडा कडून येणाऱ्या आवाजाकडे सर्वांचे कान होते कारण हाआवाज आपल्या धन्याची खुशाली सांगणारा होता. क्षणाक्षणाला एक एक मावळा कामी येत होता. अंग रक्तबंबाळ झाले होते .कुणाचे हात निकामी ,कोणाचे पाय निकामी तरीसुद्धा रयतेच्या राजा साठी ही माणसं शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. बाजीप्रभूंचा आवेश तर शत्रूंना पाहूनच भयभीत करणारा होता प्रत्यक्ष यमराजालाही या नरविराने  थांबवून ठेवले . जनू यमालाही ते म्हणत आहेत ,"अरे थांब! आधी माझ्या राजाला सुखरूप पोहोचू दे  ! मग माझा प्राण घे !" विशाल गडाकडे जाणारा महाराजांचा प्रवास चार-पाच कोसाचा पण त्या ठिकाणी विशाल गडालाही वेढा घालून बसलेले आदिलशाही चाकरीतील  सूर्यराव सुर्वे व जसवंत दळवी यांनी महाराजांचा मार्ग अडवला. महाराजांसह सैन्य चालून चालून थकलेल असतांना पुन्हा नव्या दमाच्या सैन्यासोबत लढावं लागतंय. हा वेढा महाराजांना फोडावा लागला. यात पुन्हा हा वेळेचा अपव्यय झाला होता . मोठ्या शर्तीने हा वेढा फोडून महाराज धावत धावत गडावर गेले आणि त्या ठिकाणाहून पूर्वेकडे तोफांच्या इशाराती दिल्या. बाजीप्रभूंच्या कानी हे तोफांचे आवाज पडताच आपला धनी सुखरूप पोहोचला हे समजून नरवीर बाजीप्रभूंनी या पावनखिंडीत आपला देह ठेवला. त्याच्या समवेत त्यांचे बंधु फुलाजी प्रभू देशपांडे,शंभूसिह जाधव व ३०० बांदल मावळे या ठिकाणी धारातिर्थी पडले . काय ही  स्वामीनिष्ठता म्हणावी काय हे स्वराज्यप्रेम ! 

   इतिहासात महाराजांचे युद्धतंत्र हे जगालाही वेड लावणारे आहे .जगात ही अशी एकमेव लढाई आहे की जी आपल्या स्वामीच्या रक्षणासाठी एका खिंडीत लढली गेली व त्यांच्या बलिदानाने ती खिंड पावन ठरली .ही शेकडो वीरांची बलिदाने मराठा साम्राज्याची प्रेरणास्थानेच आहेत . 

वरिल संघर्षमय इतिहास ज्या भूमीत घडला त्या भूमीत प्रत्यक्ष पदभ्रमंती करून लक्षात येते की आज तरी रस्ते पाऊल वाटा आहेत त्यावेळी काय होतं ? हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचा सदस्य म्हणून ही संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष शौर्य भूमीवर जाऊन सत्य इतिहास संदर्भाच्या आधारे समजून घेता येतो आपणही प्रत्येक वर्षी ११,१२ व १३जुलै या तीन दिवसात महाराज ज्या मार्गाने पन्हाळ्यावरुन विशाळगडावर गेले त्या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन अनुभव घ्यावा .






संजय खांडवे


9011971122

बुधवार, २३ एप्रिल, २०२५

करवंड गुणवंताबाई राणीसाहेबांच्या स्मारकाच्या प्रतिक्षेत.....

 



करवंड गुणवंताबाई राणीसाहेबांच्या स्मारकाच्या प्रतिक्षेत.....


स्वराज्यजननि राजमाता राष्ट्रमाता जिजाबाईसाहेबांचे माहेर सिंदखेडराजा हे विदर्भातील बुलढाणा जिल्हयात येते . मातृतिर्थ जिल्हा म्हणून बुलढाणा जिल्हयास ही ओळख आपल्या समृद्ध व गौरवशाली इतिहासामुळे प्राप्त झाली आहे . देवगिरीच्या यादवांचे वंशज राजे लखुजीराव जाधव यांनी आपल्या रयतवत्सल कार्य कर्तुत्वाने स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. जिजामातेच्या जन्म प्रसंगी याच विदर्भभूमीत हत्तीवरुन साखर वाटली गेली होती . पुढे जिजाऊ साहेबांच्या पोटी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शेकडो वर्षाची गुलामगिरी या शिवतेजाने मोडीत काढत रयतेमध्ये स्वातंत्र्य, स्वाभिमान जागृत करणारे स्वराज्य उभारले .

           स्वराज्याचं विदर्भाशी नातं फार जुनं आहे . आज भारतभरातून मातृतिर्थ सिंदखेडराजास १२ जानेवारीस लाखो स्वराज्य प्रेमी राजमाता जिजाऊ जन्मस्थळावर व जिजाऊ सृष्टीवर नतमस्तक होण्यासाठी येतात .बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड हे गाव देखील जाधव - भोसले वंशीयांच्या नाते संमधातील महत्वाचे आहे . आज हे आपण एक गाव म्हणून बघतो पण कधी काळी५२ बुरुजी करवंड म्हणून ओळख असलेले आता केवळ अवशेष घेऊन शेवटच्या घटका मोजत आहे . छत्रपती शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या . जिजाऊआई साहेबांनी महाराजांचे आठ विवाह घडवून आणले . आईसाहेबांची पूर्वानुमान या मागे  होते . फलटणच्या  निंबाळकर घराण्यातील सईबाईसाहेब (१६४०) ह्या पहिल्या पत्नी होय . त्यानंतर शिर्के घराण्यातील सगुणाबाईसाहेब (१६४१),मोहिते घराण्यातीत सोयराबाईसाहेब(१६५० ), मोहिते घराण्यातीत पुतळाबाईसाहेब(१६५३ ), विचारे घराण्यातील लक्ष्मीबाईसाहेब (१६५६ ),गायकवाड घराण्यातील सकवारबाईसाहेब (१६५७ ), जाधव घराण्यातील काशीबाईसाहेब(१६५७), इंगळे घराण्यातीत गुणवंताबाईसाहेब (१६५७) असे विवाह महाराजांचे झाले . या मध्ये महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार घराण्याशी भोसलेवंशीयांचे नातेसंमध निर्माण झाले होते व स्वराज्य कार्यास त्याचा हातभारही लागत होता . करवंड येथील इंगळे घराण्या मधीत गुणवंताबाई राणीसाहेबांशी महाराजांचा विवाहामुळे करवंड ही छत्रपती शिवरायांची सासुरवाडी ठरते .इतिहासाची अशी सोनेरी किनार ती पण छत्रपती शिवरायांशी निगडीत असल्याने  फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे .येवढेच नाही तर महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे भोसले यांच्या राणीसाहेब दिपाबाईसाहेब ह्या देखील करवंडच्या इंगळे घराण्यांच्याच आहे म्हणजेच राजमाता जिजाउंच्या दोन सूना ह्या आपल्या विदर्भातील करवंड या गावच्याच आहेत .शिवरायांच्या राज्यभिषेका प्रसंगी रायगडावर दिड महिना अगोदर पासून व्यंकोजी राजे सोबत दिपाराजे यांचे वास्तव्य होते .

              समकालिन शिवभारतात परमानंदाने वर्णिलेली स्वराज्यातील पहिली मोठी  लढाई शिरवळ ठाणे , सुभान मंगल किल्ला व बेलसर छावणी परिसरातील  लढाई फतेहखाना सोबत झाली होती.बाजी पासलकरांच्या नेतृवात  मोठा विजय प्राप्त झाला होता . स्वराज्यनिष्ठेसाठी बाजी पासलकरांचे पहिले मोठे बलिदान या लढाईत झाले . या वेळी शिवरायांचे वय केवळ १८ वर्षाचे होते या लढाईचे परमानंद शिव भारतात वर्णन करतांना "शृंगारस्यगरांगानामिंगालकुलसंभव " यमाप्रमाणे भयंकर युद्धांगाचा शृंगार ज्याचे भाल्याचे टोक असे शिवाजी इंगळे असा उल्लेख करतो . या पराक्रमी सरदाराचा उल्लेख करतांना त्यांचा अतुलनिय पराक्रम  दिसून येतो .  दुसऱ्या एका श्लोकात  इंगळे यांनी २५ , पोळांनी  १२, चोरांनी १४ , घाटग्यांनी २३, वाघाने १६ असे वीर एका क्षणात ठार मारिले असे वर्णन करतो .या लढाईत गोदाजी जगताप , भिमाजी वाघ , संभाजी काटे , भिकाजी चोर , वीर कावजी या शूर वीरांनी आपले शौर्य दाखविले . आदिलशाहिला वचक बसविणाऱ्या या लढाईत शिवाजी इंगळे या सरदाराची भूमिका महत्वाची होती .या शिवाय अफजलखान प्रसंगा वेळी शिवरायांच्या दहा अंगरक्षकांच्या स्थानी अभिमानी काताजी इंगळे हे देखील नाव येते .परमानंद     "कावुकियेनकंकाभ्यामिंगालेनाभिमानिना" या शद्बात वर्णन करतो .संभाजी कावजी , येसाजी कंक , कोंडाजी कंक , जीवा महाला, विसाजी मुरंबक , संभाजी करवर , सुरजी काटे, कृष्णाजी गायकवाड व इब्राहिम सिंद्धी यांच्या सोबत त्यांनी शिवरायांचे अंगरक्षक म्हणून रक्षण केले या वीरा पैकी जीवा महाला यांच्या सतर्कतेने  महारांजांचे पुढील २१ वर्ष स्वराज्यास मिळाले . अजून असे अनेक संदर्भ इतिहासात मिळू शकतात .निश्चीतच स्वराज्याप्रति स्वामिनिष्ठ असलेल्या या इंगळे घराण्याचा इतिहास उलगडणे अधिक महत्वाचे वाटते .तीनशे वर्षापूर्वी हे इंगळे राजवंशीय तंजावर स्थलांतरीत झाल्यामुळे येथील वतन हे दुर्लक्षित राहीले .५२ बुरुजी या करवंड वतनातील परीसरात अनेक संदर्भ सापडू शकतांत . या परिसरात अशी कागदपत्रे वा अन्य भौतिक संदर्भ साहित्य असल्यास स्वतःहून समोर येणे गरजेचे आहे . यातून  स्वराज्याच्या एका मोठ्या निष्ठावान घराण्याचा इतिहास विदर्भातून समोर येऊ शकतो . जिजाऊ मातेच्या या दोन कर्तुत्ववान सूनांचे माहेर आजही उपेक्षितच आहे . या दोनही राणी साहेबांचे  स्मारक या ठिकाणी उभे राहिले पाहिजे त्याच बरोबर आता शेवटच्या घटका मोजणाऱ्या गढी, बुरुज व तेथील समकालिन अवशेष संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहेत . या कार्यासाठी बुलढाणा येथे सुनिल जंजाळ यांनी बावन्न बुरजी करंवंड बचाव समितीच्या माध्यमातून इतिहासप्रेमी संघटन उभे केले आहे . हरिरुद्र राजे इंगळे आता तंजावरहून मूळ वतनी येऊन या मोहीमेत काम करत आहे .गणेश निकम, संजीवनी शेळके , अरविंद बापू  हे स्थानिकांच्या मदतीने जनजागृती करत आहे . प्रा जगदेवराव बाहेकर ,जयश्रीताई शेळके पाठपुरावा घेतांना दिसतात . नुकतेच प्रा . जगदेवराव बाहेकर यांनी मा . जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री यांना सविस्तर पत्रव्यवहार देखील केला आहे .कर्तुत्ववान व महापराक्रमी व छत्रपती भोसले वंशीयांचे ऋणानुंबंध या मातीशी असल्याने या भूमीचा आम्हास सार्थ अभिमान आहे आणि वाटत राहील .













संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड* (भाग - २ )

 


शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*




(भाग - २ )




स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग


विजापूरकरांच्या तोफा ह्या पन्हाळ्यावर सरळ मारा करण्यास अक्षम ठरत होत्या तेव्हा इंग्रज हेन्री रिव्हिग्टनने दारु गोळा पुरविला फिलिफ गिफाड हा इंग्रज अधिकारी त्यांच्यासोबत होतां. या तोफांनी गडाचे मोठे नुकसान केले म्हणजे लढाई केवळ विजापूरकरांच्या विरोधात नव्हती तर इंग्रजही त्यांच्यासोबत होते एकाच वेळी दोन शत्रूशी महाराजांना लढावं लागत होतं. पुढे इंग्रजांचा हिशोबही महाराजांनी बाकी ठेवलेला दिसत नाही १६६१ मध्ये  इग्रजांच्या राजापूरच्या वखारीला वर हल्ला करून सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना कैद करुन त्यांना रायगडावर आणले होते .

पावसाने आपले रौद्र रूप धारण केले . गडावरून पाण्याचे लोट वाहू लागले नदी नाले तुडूंब झाली पण वेढा अजून मजबूत झाला. महाराजांनी विचार केला की शत्रूवर सरळ हल्ला करून काहीच साध्य होणार नाही उलट यात आपली माणसे कामी येतील. या वेढयातून निसटायचंच हा बेत महाराजांनी पक्का केला.१२ जुलै १६६०च्या सकाळी गडाच्या पूर्वेकडील दरवाजा पहिल्यांदा उघडला गेला या दरवाज्यातून चार माणसे बाहेर आली ती म्हणजे गंगाधर पंत, त्र्यंबकपंत व त्यात सैनिकाच्या वेषात दोन गुप्तहेर . पांढरं निशाण घेऊन ती खाली येत होती ते पाहून सिद्धीला आनंद झाला शिवाजी राजे शरण येत आहेत हा या पांढऱ्या निशाणाचा याचा अर्थ होता." आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास राजी आहोत आमच्या जीवास काहीएक धोका नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरिता येतो".

असा निरोप पंताच्या हस्ते पाठविला तेवढ्याच वेळात सोबत आलेल्या दोन गुप्तहेर सिद्दीच्या सैन्यात मिसळून त्यांनी अशी अफवा पसरवली की शिवाजी राजे व सिद्दी जोहर यांच्यात आदिलशहा विरुद्ध संगनमत झाले आहे. सिद्धी स्वामिनिष्ठ नव्हता हे त्याच्या सैन्याला चांगलेच माहित होते या कारणाने का होईना सतत चार महिने बायको पोरांपासून दूर असलेले ते सैनिक आता लवकरच घरी जायला मिळणार या कल्पनेने गाफिल झाले.

     १२ जुलै १६६० हा दिवस गडावर खूप महत्त्वाचा होता आता वेढ्यातून कसे बाहेर पडायचे याची खलबतं सुरू झाली. छत्रपतींचं एक तत्व व होतं की ते कोणतीही मोहीम आखतांना आपल्या विश्वासू लोकांना सोबत घेऊन चर्चा करत , त्यांची मतं जाणून घेत यात ।लहान-मोठा असा भेद कदापिही नसे. त्याच दिवशी सायंकाळी गडावरील तीन मजली इमारत म्हणजे सज्जा कुटी या ठिकाणी मसलते सुरू झाली यात खुद्द छत्रपती समवेत नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभू सिंह जाधव रायाजी बांदल, विठोजी काटे, शिवाजी काशीद व बांदल सरदार उपस्थित होती. कुणी सांगितलं महाराजांनी पुसाटी  बुरुजाकडून जावे. कुणी म्हणत होतं दुतोंडी बुरुजाकड्रून जावे. मग एक सूर समोर आला की महाराजांनी पालखीत बसून बाहेर पडावं व या दोन पालख्या असाव्यात एका पालखीत खरे शिवाजी व दुसऱ्या पालखीत सोंगातले शिवाजी! सोंगातले शिवाजी म्हटल्याबरोबर सर्वांच्या नजरा वळाल्या त्या शिवाजी काशीदांकडे! अगदी हुबेहूब शिवरायांसारखे दिसणारे शिवाजी काशिद या बैठकीस उपस्थित होते. महाराजांची आणि त्यांची ओळख अवघ्या दोन चार महिन्यापूर्वीची ! पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या  नेबापुर गावातील सामान्य न्हावी कुटुंबातील हे शिवाजी काशीद . शिवरायांच्या स्वराज्याचं वेड लागलेले शरीरयष्टीने अगदी महाराजांसारखे केशभूषा ही अगदी तशीच ! हा वीर लाखाच्या पोशिंदयासाठी एका क्षणात सर्वस्व ओवाळायला तयार झाला आपले काय होणार याची स्पष्ट जाणीव शिवाजी काशीद यांना होती शिवरायांनी प्रजे मध्ये निर्माण केलेला विश्वास एक- एक नरवीर जन्माला घालत होता त्यापैकीच एक शिवाजी काशीद. मग ठरले दोन पालख्या सजल्या व राजदिंडी मार्गे गडा बाहेर पडण्याचे ठरले. महाराजांचा अंगरखा, शेला, शिरस्त्राण व रत्नजडित तलवार सर्वात महत्त्वाचं महाराजांची आई भवानीचा प्रसाद असलेली कवड्याची माळ घालून शिंवाजी काशिद अगदी आरश्यात प्रतिबिब दिसावे असे एकमेंकांना भासू लागले .रात्री दहाच्या सुमारास पालख्या निघाल्या . वाहून नेणाऱ्या भोयांनाही माहीत नव्हत की खरे शिवाजी कोणत्या पालखीत बसलेत ! आषाढ शुद्ध पौर्णिमा, काळेकुट्ट ढग दाटून आलेले धो -धो कोसळणारा पाऊस या अंधारातून मार्ग काढत जायचे होते गुप्तहेर व वाटाडयांनी समोर अगोदर मार्ग शोधून ठेवले होते या किर्र अंधारात शत्रूला भनक न लागता निघायचे होते. वीज चमकल्यावर आपण दिसतो की काय या विचारांने त्यांच्या मनात धडकी भरायची.

      आज ज्या ठिकाणी तुरुकवाडी गाव आहे त्या गावाच्या सुमारास या दोन्ही पालखी आल्या.किर्र अंधारात झुडूपात हालचाल झाली ,शत्रूच्या हेराना सुगावा लागल्याची खात्री झाली .ती वेळ मार्गस्थ होण्याची होती पाठलाग करण्याची नव्हती.  या ठिकाणाहून पुढे मलकापूर मार्गे विशालगडावर जाणारा राजमार्ग होता.  शिवाजीराजेंनी शिवाजी काशिदांची गळाभेट घेतली व ३०० मावळे सोबत देऊन शिवाजी काशिदांची पालखी मलकापूर या नेहमीच्या सोप्या मार्गे पाठविली.त्याच ठिकाणाहून माळुंगे मार्गे मसाई पठारावरून अवघड वाटेने महाराजांची पालखी निघाली .जंगलातून जाणारा तो मार्ग होता .

   सिद्दीच्या छावणीत खबर पोहोचली शिवाजी राजे वेढ्यातून सुटले सिद्धी चौताळला त्याने आपला जावई सिद्धी मसूद याला पालखीच्या रोखाने पाठवले महाराज विशालगडावर जातील या हेतूने त्याने मलकापूर मार्गे पाठलाग सुरू केला. महाराजांचे युद्धनीती तील कौशल्य या ठिकाणी दिसून येते. नव्या दमाने तीन हजाराचा घोडदळासह ताफा घेऊन मसूद घोड्यावर निघाला त्याने शिवाजी काशिदांच्या पायी जाणाऱ्या पालखीला गाठले. हात घाईची लढाई झाली पण लढाईत स्वारस्य नव्हते, त्याला शिवाजी हवे होते. शिवाजी हाती आले म्हणून मसूद जाम खुश झाला व ही पालखी घेऊन तो छावणीत आला. आल्याबरोबर जोहरने शिवाजीराजास पहिले त्याने जसे ऐकले होते तसेच अगदी तसेच शिवाजी राजे त्याच्यासमोर होते तोच रुबाब ,तोच बाणेदारपणा, तोच थाट, मृत्यूचे यत्किंचित सुद्धा भय चेहऱ्यावर नव्हते. शिवरायांची शिनात्ख करेल अशी एकच व्यक्ती त्या ठिकाणी होती ती म्हणजे फाजल खान . आपल्या बापाच्या वधाच्या वेळी प्रत्यक्ष त्याने राजेंना बघितले होते . ओळख परेड सुरू झाली . महाराजांना तो न्याहळून बघू लागला. काय त्याच्या मनात शंका आली आणि त्याने महाराजांचे शिरस्त्राण एका हाताने सरकवले आणि जोरात ओरडला धोका हुआ ! ये शिवाजी नही है ! कारण त्याला माहीत होतं प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्णी सोबत लढतांना महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती हे त्याच्या  पक्क लक्षात होतं. मग शिवाजी काशीदांना विचारणा सुरू झाली पण मृत्यूचं भय थोडादेखील त्यांच्या चेहर्‍यावर नव्हतं खात्री तर तेव्हाच पटली होती की जेव्हा शिवाजी काशीद पालखीत बसले होते पण लाखाचा पोशिंदा साठी लाखांचे बलिदान झाले तरी चालेल ही भावना त्या नरवीरांच्या मनात होती. सिद्धी चवताळला "बोल कोण आहेस तू ?'' पुन्हा तेच उत्तर आले "शिवाजी!'' जेव्हा लक्षात आले ती सत्य आता बाहेर आलाच आहे तेव्हा बाणेदारपणे म्हणाले" मी ऽ ऽमी शिवाजी काशीद !" ( क्रमशः )


संजय खांडवे

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*

 शौर्यभूमि - पन्हाळा ते गजापूरची पावनखिंड*


(भाग -१ )


स्थान : जि . कोल्हापूर , पन्हाळा ते पावनखिंड ५५ ते ६० कि.मी पायी मार्ग




१० नोव्हेबर १६५९ , शिवप्रताप  भूमीमध्ये अफजली  संकट गाडून संपूर्ण जगाला संदेश दिला की, आमची माती व माणसे याकडे वाकडी नजर केल्यास काय परिणाम होतो. स्वराज्यातील स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या  संघर्षाला या प्रसंगाने अधिक बळकटी मिळाली होती. विजापूरची आदिलशाही या घटनेने धास्तावली होती. आता शिवाजीराजांना शह कोण देणार ? या चिंतेने शोधाशोध सुरू झाली होती अफजलखानाचा पुत्र फाजल खान हा बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चवताळला होता अशा परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याची विजयी घोडदौड सुरूच ठेवली. अफजलखानाचा बंदोबस्त केल्याबरोबर अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११नोव्हेंबर १६५९ ला सातारा मार्गे कोल्हापूर परिसर पादाक्रांत करण्यासाठी शिवराय निघाले.महाराजांना १८३०६ दिवसाचे आयुष्य लाभले या  दिवसात महाराजांनी विजयाचा आनंदोत्सव किंवा विश्राम या गोष्टीला रयतेच्या कल्याणाचा पुढे  कधीच स्थान दिलेली दिसतच नाही. हे शिवचरित्रातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होय.१८ किल्ले अवघ्या २० दिवसात घेतले .१ डीसेंबर १६५९ ला पन्हाळ्यावर भगवा फडकला महाराजांना बहुतेक किल्ले बिनाहरकत मिळाले पण रांगणा खेळणा हे किल्ले छापे मारून घ्यावे लागले याच खेळणा किल्ल्याला विशेष प्रयत्न करावे लागले म्हणून महाराजांनी विशाल गड असे नाव दिले. विजापूरकरांच्या अंमलात असलेल्या भागात शिवाजी राजे यांची वेगळीच धाक व दरारा निर्माण झाला. अनेक सरदार नुसते नाव ऐकून घाबरू लागले विजापुरी दरबार शिवाजी महाराजांचे बंड कसे मोडावे या फिकरीत पडलेला होता. कोणताही मातब्बर विजापुरी सरदार समोर येत नव्हता कित्येकांचे मत होते की आदिलशहाने स्वतः मोहिमेवर जावे त्यांच्या पदरच्या कोणत्याही सरदारावर भरवसा ठेवणे बरोबर नाही. बरेच सरदारांचे मत आदिलशहाने जाऊ नये असे होते कारण शिवाजी महाराजांनी आपल्या धाडस, बुद्धिमत्ता व पराक्रमाने जरबच तशी बसवली होती.


या परिस्थितीत सिद्दी जोहर हा तेलंगणा मधील कर्नूल प्रांतातील सरदार समोर आला.  हा हबशी असून पराक्रमी होता त्याचा बादशदहा सोबत पूर्वी बेबनाव होता पण पुन्हा माफी मागून तो बादशहाच्या  सेवेत होता. मागील घटना वरून त्याची स्वामीनिष्ठता ही संशय घेणारी होती .त्याच्यासोबत फाजल खानही आपल्या बापाचे उसने घेण्याकरता तयारच होता. अफजलखानाच्या दुप्पट एवढे सैन्य घेऊन मोठ्या लव्या जमाने तो स्वराज्यावर चालून आला .याच वेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने कोकण भागात स्वारी करावी असे बादशहाने सांगितले . सिद्धी जोहर, फाजल खान, सिद्दी मसूद व अनेक सरदारासह ते स्वराज्याच्या दिशेने निघाले. ज्यावेळेस सिद्धी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी महाराज हे मिरजेचे वेढयात होते मिरजेच्या भुईकोट किल्ल्याला महाराज वेढा देऊन होते त्यांनी संपूर्ण आयुष्यात दोन वेळा वेढे दिले पहिला वेढा हा मिरजेचा दुसरा तंजावर, वेल्लोर या तामिळनाडू प्रांतातील आहे. सिद्धी चाल करून येत आहे हे पाहून महाराज स्वराज्यातील दक्षिण भागातीत त्या वेळचे  सर्वात शेवटचे टोक आणि नुकताच घेतला पन्हाळा या कोल्हापूर प्रांतातील किल्ल्यावर येऊन थांबले. बऱ्याच वेळी सांगितले जाते की महाराज वेढयात अडकले होते पण महाराजांनी प्रत्यक्षात स्वतःला अडकवून घेतले होते असेच म्हणावे लागेल. दहा महिन्यापूर्वीच अफजल खाना सारखा बलाढ्य सरदार स्वराज्यात घुसून, नासधूस करत रयतेला त्रास देत स्वराज्याची मोठी हानी करणारा ठरला होता.तसे पुन्हा व्हायला नको हयाची काळजी महाराज घेत होते .कारण सिध्दीचे सैन्यबळ आता त्यावेळच्या अफजलखानाच्या सैन्या पेक्षा दुप्पट होते . मिरजेतून महाराज सुरक्षितपणे रायगड ,राजगड किंवा प्रतापगड या ठिकाणी जाऊ शकत होते पण महाराजांनी तसं केलं नाही याचं कारण असे की महाराज आज या ठिकाणी गेले असते तर सिद्दीने आपला मोर्चा तिकडे वळविला असता या ठिकाणावर पोहचण्यासाठी तो स्वराज्यातून गेला असता व यामुळे सामान्य रयतेची पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले असते म्हणून केवळ आपल्या रयतेसाठी शिवरायांनी स्वतःला या वेढ्यात अडकून घेतलं असंच म्हणावे लागेल.यामुळे सिध्दी हा पन्हाळा परिसरातच थबकला .


२ मार्च १६६० सिद्दीने पन्हाळा या रांगड्या किल्ल्यास चारी बाजू कडक वेढा दिला एक मुंगी सुद्धा आत बाहेर जाणार नाही असा तो  वेढा होता याच वेळी स्वराज्यात कल्याण भागात आबाजी सोनदेव, वाडीच्या सावंतासाठी बाजी पासलकर व घाटावर मोरोपंतास आसपासच्या मुलखावर कडेकोट बंदोबस्तास सांगितले. नेताजी पालकरांना बाहेरून जोहरच्या सैन्यावर छापे घालून हैरान करावयास सांगितले भर उन्हाळ्यात हा वेढा सिद्दीने अधिक मजबूत केला महाराजांचा अंदाज होता सिद्धी किती दिवस वेढा ठेवेल ? पन्हाळ्याच्या धो- धो पावसात हा वेढा एक दिवस ढिला पडेल. पण सिद्धी चा अंदाज त्याहीपेक्षा वेगळा होता, राजे किती दिवस गडावर राहतील एक दिवस दाना -पाणी संपलं कि आपोआप शरण येतील दोघांच्याही अंदाजाप्रमाणे चार महिने हा वेढा कायम होता . सिद्धी तसूभरही हल्ला नाही त्याला  वाटू लागले की शिवाजी राजे आपल्याला हळू हळू शरण येतील जे कुणालाही जमलं नाही हे यश मला मिळेल व आपल्याला विजापूर दरबारात मोठी बढती मिळेल.अखंड सावधानता जोपासणारे शिवराय त्यांनी गडावर दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा दारुगोळा भरून ठेवला होता सिद्धी ने कितीही गराडा घातला तरी काही होणार नव्हते पण प्रश्न होता स्वराज्याचा! आपण एका जागी तर असेच अडकून पडलो तर आपला कोंडमारा होईल स्वराज्यातील इतर प्रशासनाची व सुरक्षिततेची चिंता शिवरायांना होती म्हणून या वेढ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे हे शिवरायांना चांगलंच माहीत होतं .त्याचवेळी दिल्लीकडून  शाहिस्तेखान लाखभर फौज घेऊन चाल चाल करून येण्याच्या बेतात होता.

          महाराज पन्हाळयावरून राजदिंडी दरवाज्यातून १३ जुलै १६६० च्या रात्री पालखीतून बाहेर पडले . पुढे विशाल गडापर्यन्तचा किर्र जंगलात दऱ्या खोऱ्यातून जाणारा मराठयांच्या शौर्यभूमि वरील शौर्यमार्ग  ज्या वाटेने आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री धो-धो कोसळणाऱ्या काळ्या कुट्ट अंधारात राजदिंडी दरवाज्यातून म्हाळुंगी व पुढे मसाई पठारावरून - पांढरपाणी मार्गे महाराज मावळ्या सह वेढ्यातून बाहेर पडले होते या शौर्य मार्गाचा साक्षीदार होत हिंदवी परिवाराच्या नियोजनबद्ध मोहिमेतून ह्या मार्गावरून चालण्याची संधी मिळाली . वीर शिवाजी काशिदांच्या बलिदानासह बाजीप्रभू देशपांडे सह ३०० बांदल मावळ्यांचा स्वराज्यनिष्ठेसाठी दिलेले बलिदान व इतर अवस्मरणिय आपल्या वैभशाली इतिहासाच्या पाउल खुणा पावनखिंडीतून पुढच्या भागात.......!!



संजय खांडवे

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

आमच्या लेखणीस धार आली.......

 आमच्या लेखणीस धार आली.......



जिजाऊ रथयात्रा २०२५ विशेष



प्रियः प्रजानां दातैव  न पुनर्द्रविणेश्वर: ।

आगच्छन्काड्र.क्ष्यते   लोकैर्वारिदो  न वारिधिः।


         छत्रपती संभाजी राजे आपल्या प्रकिर्ण नीति मध्ये म्हणतात की प्रजेला देणारच प्रिय असतो. संपत्तीचा स्वामी किंवा संपत्ती साठवणारा प्रिय नसतो. पाणी घेऊन येणाऱ्याचे म्हणजे मेघाची तो अपेक्षा करत असतो .तशी पाणी साठवणाऱ्या सागराची तो कधीही अपेक्षा करत नाही. प्रकांड पंडित असलेले संभाजी राजे यांनी त्या काळात ही प्रकिर्ण नीतिची मांडणी केली म्हणून छत्रपती संभाजी राजे एक महान विचारवंत ठरतात.

       आज चौथ्या दशकात काम करत असताना मराठा सेवा संघ हा देणाराच ठरला आहे काळाची गरज ओळखत मराठा सेवा संघाने मन ,मस्तक आणि मनगट मजबूत करत विचारवंतांची एक फळीच निर्माण केली आहे बहुजनांच्या मुलांच्या मेंदूची मालिश हो करून देणारी संघटना म्हणजे मराठा सेवा संघ.

         कर्मवीर भाऊराव पाटिल यांनी दिलेला संदेश सेवा संघाने पुढे चालवला .

*"एका वर्षाची बिदागी हवी असल्यास धान्य पेरा;शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास माणसं पेरा; व पाच हजार वर्षाची बिदागी हवी असल्यास विचार पेरा.*

      मराठा सेवा संघाने गत चार दशकात हेच विचार जोडण्याचं काम केलं .विचारांनी माणसाची मन जोडली. मराठा सेवा संघ हा विचार आहे आणि हा विचार आज आपल्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देश -विदेशातही दृढ झाला.शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच मराठा सेवा संघाचे ध्येय आहे. तरुणांना योग्य दिशा दाखऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम या माध्यमातून सतत सुरू आहे. मराठा सेवा संघ हे एक विचारांचे संघटन असल्याने मानवतावादी मूल्य रुजविण्याचे कार्य न्याय , स्वातंत्र्य , समता व बंधुता हा महामानवांचा विचार प्रबोधनाचा जागराचे शिवकार्य  गेल्या अनेक वर्षापासून करत आहे . चिकित्सक व विवेक बुद्धीचा वापर करण्याची सवय असल्याने महाविद्यालयीन काळापासून  आमच्या सारखे नवतरुण सपूर्ण महाराष्ट्र भरातून पहिल्या जिजाऊ रथ यात्रेत मोठ्या संख्येने जोडल्या गेलो. आपल्या विचारधारेची आपली माणसं आपल्या महापुरषांच्या सत्य विचारांच्या पेरणी साठी सोबत असतांना पाहून अधिकच बळ आले . त्या काळात तरुणांमधील  वैचारीक प्रबोधनाचा आलेख चढता होता . सामाजिक माध्यमे नसल्याने वाचनाकडे कल अधिक होता .

"आता आमच्या धडावर आमचेंच डोके असेल"

वीस वर्षापूर्वी हे पुस्तक आमच्या वाचण्यात आले अन खऱ्या अर्थाने आमच्या विचार करण्याच्या शैलीत अधिकच बदल झाला .अन जीवनाकडे चिकित्सक दृष्टीकोनाने बघु लागलो .प्राचिविदयाप्राप्त,संस्कृतचे गाढे अभ्यासक,जगातील जवळपास सर्व सस्कृतींचे अभ्यासक,संत साहित्यावर अगाध लेखन असलेले  ऋषीतुल्य डॉ आ . ह . साळुंखे   सरांचे "विद्रोही तुकाराम " वाचले व विद्रोहाचा अर्थ समजला,जगतगुरुचे सपूर्ण जीवनचरित्र कळाले व तुकोबाच्या या पुस्तकाने माझ्या वाचनछंदाला बळ मिळाले . आज त्यांनी सांगितलेले शब्दरुपी धनाने कुबेराचा शेजारीच झालो की काय अस कधी कधी वाटत अन शब्द रुपी शस्त्रे सदैव सत्याच्या लढाईत सोबत आहेत . रोज लेखणरूपी तलवार घासण्याचे काम याच विचार धारेतून मिळाले .


सांगावे ते बरे असते हे पोटी ।

दुःख देते खोटी बुद्धी मग ॥

आपला आपण करावा वेव्हार ।

जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥  

     गाथेतून ही वैचारिक ताकद मिळणे सुरु आहे.

     "बळीवंश" मधून तर आपली ५००० वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती सरांच्या गाढया अभ्यासातून,आपण कल्पणाही करु शकत नाही येवढी मेहनत ,संस्कृतचे गाढे अभ्यासक ,सर्व प्राचीन ग्रंथाचे अभ्यासपूर्ण विवेचन करुन केलेली मांडणी विचार करायला लागणारी आहे

  "पुस्तक लिहतांना सरांनी वापरलेली सदर्भ सूची ,ग्रंथ याचेच एक पुस्तक बनते हे महत्वाचे "

      जाणण्याची इच्छा ही जीवन अधिक सुदर बनविते हे यातूनच कळाले .

         सरांनी मांडलेले चार्वाक समजून घेतांना सर्व सदर्भ जुळत गेले ,अन चार्वाकापासून वैचारिक प्रवासाला सुरूवात झाली आणि ती शिव - शाहू - फुले अन बाबासाहेबापर्यन्त आम्हाला कळाली . आ ह सरामुळे तर लाखों बहुजनांना  खऱ्या अर्थाने तथागत कळाले " सर्वोत्तम भूमीपूत्र गोतमबुद्ध"

या पुस्तकामुळे आम्हाला बुध्दविचार कळाले येवढच नाही तर बुद्धसाहित्य जाणण्याची ओढ वाढली. त्यांनी विचारांची चिकित्सा तर केलीच पण  त्या चिकित्सेची चिकित्साही केली व त्याचे लिखान सर्वापुढे मांडले ,बहुतेक लेखक लिखान करतात व त्यावर केलेली चिकित्सा मात्र त्यांना मांडता येत नाही ,उत्तरे देता येत नाही ,सदर्भही जुळत नाही. 

" देव माणता की नाही याही पेक्षा माणूसपण जपता की नाही हे महत्वाचे "

        जगत असतांना ही "माणूसपणाची शिकवण व उच्चकोटीतील नम्रपणा " सरांचे अगाध साहित्य सांगून जाते . त्यांच्या ह्या आदर्शातून आमच्या सारख्यांच्या लहान - लहान लेखणीच्या तलवारी रोज घासण्याच बळ मिळत राहते . कॉम्रेड शरद पाटलांच्या साहित्याची ओळख झाली अन समजून घेण्याचे काम आम्ही करतोय .प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळचं  होते . त्यांच्या समग्र साहित्यातून डोळ्यात अंजन घातल्या गेले .प्रा डॉ अशोक राणा सरांच्या सहवासात तर मिथकशास्त्र समजून घेऊन आम्ही त्यावरही लिहायला शिकलो . मंदिर, लेणे  अन गडकोटाची ओढ लागून जतन अन संवर्धनाचं महत्वही कळाले . मुलुख मैदानी तोफ गंगाधर बनबरे सरांकडून परखडपणा व चळवळीतील सातत्य शिकलो . अनेक चांगली माणसे भेटत गेली .हे केवळ घडलं क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी उभारलेल्या मराठा सेवा संघाच्या वटवृक्षामुळेच ' ! स्वराज्यजनि राजमाता व महाबली शहाजीराजे यांच्या त्याग व संघर्षातून विश्ववंदनिय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्यात अभितप्रेत असलेला मराठा हाच मराठा सेवा संघाचा मूळ आधार आहे . असंघटित असलेल्या या घटकाला एकत्रित करून प्रबोधनाच्या माध्यमातून एक शोषणमुक्त , विज्ञाननिष्ठ , स्वाभिमानी व उत्पादक समाज व्यवस्था उभी करण्यासाठी मराठा सेवा संघाने आकार घेत देशभरात या विचाराने अनेक मोठी माणसे घडविली

त्यांना  लढायला शिकविले......

सत्यासाठी.....

वाचायला शिकविले....

चिकित्सेसाठी.......

बोलायला शिकविले .....

न्यायासाठी.......

आज जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्ताने " मराठा जोडो अभियानातून " सर्वांनी सर्व अंगाने एकत्र यावे हीच अपेक्षा .


 



संजय खांडवे

बुलढाणा जिल्हाध्यक्ष  इतिहास कक्ष मराठा सेवा संघ

9011971122

पुस्तकांसाठी जगणारा अवलिया.......!!!*

 *पुस्तकांसाठी जगणारा अवलिया.......!!!*


📕📕📗📕📗📕📗📕📗📕

              आताच्या काळात फार कमी लोक असतील की जे पुस्तकाच्या विश्वात रममान होतात. कदाचित आमच्याकडे पुस्तके ही नसतील एवढी स्वतः च्या घरात त्या पुस्तकांसाठी कपाट असलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद टाले सर ! पुस्तकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी या व्यक्तिमत्त्वाची असते . अगदी दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तक कुणाकडे आहे असे जरी कळाले तरी त्या पुस्तकास खरेदी करण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी टाले सरांची असते . विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे म्हणून बुलढाणा शहरात पुस्तके बघण्यासाठी गेलेले  सर ! ज्यावेळेस अशी पुस्तके मिळत नाहीत त्यावेळेस त्यांनी खचून न जाता आता आपणच छत्रपती शिवरायांवरील चरित्र ग्रंथ तथा संदर्भ ग्रंथ तथा संदर्भ साधने एकत्रित केली पाहिजे हा ध्यास त्यांना लागला आणि त्यातूनच हे मातृतिर्थ बुलढाणा नगरीमध्ये भव्यदिव्य असे मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय उभे राहिले .

               मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय बुलढाणा सारख्या शहरात उभे राहणे ही काही सामान्य गोष्ट नाही कारण ज्यावेळेस त्यांच्या संपूर्ण ग्रंथालयामधील पुस्तकांवरून आपण नजर फिरवली तर असे लक्षात येते की जी पुस्तके आपण कधी बघितली देखील नाही अशी दुर्मिळातील दुर्मिळ आणि जुन्यात अत्यंत जुनी असलेली पुस्तके सर संग्रहित करत आहेत . छत्रपती शिवरायांवरील जवळपास सर्वच चरित्र ग्रंथ त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची शिवकालीन असलेली पत्रकार संग्रह पेशवेकालीन पुस्तक संग्रह मराठ्यांचा समग्र इतिहास अगदी वि का राजवाडे यांच्यापासून तर डॉ आह साळुंखे सरांची सर्वच पुस्तके त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत . इंग्रजांनी लिहिलेले संदर्भ ग्रंथ त्याचबरोबर मोगलकालीन कालखंडावर असलेले संदर्भ ग्रंथ , संत साहित्यावरील प्रचंड साहित्याचा साठा त्यांच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे . विष्णुपुराण ,शिव पुराण आदी सर्वच पुराणांसह अत्यंत दुर्मिळ काळात लिहिली गेलेली पुराणग्रंथ त्याचबरोबर रामायण महाभारत यावर आधारलेले संपूर्ण ग्रंथ सार आदरणीय सरांच्या वाचनालयामध्ये आहेत . भारतरत्न डॉ बाबासाहेबांवरील चरित्र ग्रंथ , अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य तथा दलित साहित्य ग्रंथालयात उपलब्ध आहेत .

        महिनाभरात आठ ते दहा हजाराची पुस्तके स्वखर्चातून सर विकत घेत असतात आम्ही सरांच्या संपर्कात राहून निश्चितच या संदर्भ ग्रंथालयाचा लाभ घेत आहोत जे संदर्भ आम्हाला कधी सापडले नाहीत जे ग्रंथ आम्हाला कधी अगदी डोळ्यानेही बघायला मिळाले नाही ते केवळ आणि केवळ टाले सरांच्या या अलौकिक असामान्य कार्यामुळे आम्हाला बघायला मिळत आहे .छत्रपती शिवरायांचा छत्रपती, संभाजी राजांचा सत्य इतिहास संदर्भासह याच ठिकाणी आम्ही शोधत आहोत विविध गड किल्ल्यावरील असलेले अत्यंत दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह त्याचबरोबर विविध ग्रंथातील संदर्भ आम्ही आमचे लिखाण करत असताना त्यामधून घेत आहोत आणि निश्चितच यामुळे नवनवीन माहिती जगाच्या समोर येत आहे एक ज्ञानाचा भंडार म्हणून सरांनी उभं केलेलं हे ग्रंथालय बुलढाणाकरांसाठी भूषणवह आहे .आतापर्यंत जवळपास 25 ते 30 लाखांची पुस्तके सरांच्या घरांमध्ये त्या वाचनालयामध्ये आहेत याचबरोबर इतरही छंद सर जोपासतात यामध्ये दुर्मिळातील दुर्मिळ नाण्यांचा संग्रह असेल किंवा इतिहासकालीन एखादी संदर्भ असलेली वस्तू जरी सरांना दिसली तर सर त्या वस्तूची वाटेल ती किंमत मोजतात आणि आपल्या इतिहासाप्रती आपल्या पुर्वजाप्रती कृतज्ञ राहून त्यांची सेवा करत असल्याची भावना ते व्यक्त करतात आणि या मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाचा फायदा उपयोग हा बुलढाणा करांनी घेतला पाहिजे अशी भावना ती यातून व्यक्त करतात खरंच पुस्तकांसाठी जगणारा अवलिया आपल्या मातृतिर्थ शहरात आहे आणि त्यांचा सहवास आम्हाला लाभतो आहे म्हणून त्या परिसराच्या सानिध्यात राहून आमचं सोनंच होत आहे . आज आदरणीय सरांचा वाढदिवस सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा !

       मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्या महामानवांचा सत्य इतिहास जगासमोर येऊ या सदिच्छासह आदरणीय सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

📕📕📕📕📕📕📕📕♦️

संजय खांडवे

बुधवार, २ एप्रिल, २०२५

बौध्द,जैन व हिंन्दूचे प्राचीन शिल्पग्राम - भद्रावती

 बौध्द,जैन व हिंन्दूचे प्राचीन शिल्पग्राम - भद्रावती


स्थान : ता. भद्रावती जि . चंद्रपूर , चंद्रपूर वरून २५ कि.मी.व नागपूर पासून १२५ कि.मी.



बौध्द ,जैन  व हिन्दू धर्मियांचे प्राचीन वारसा लाभलेले विदर्भातील अत्यंत महत्वाचे शहर म्हणजे भद्रावती होय . खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भद्रावतीच्या भूमित अनेक राजवटी होऊन गेल्या यामधे सातवाहन , वाकाटक, राष्ट्रकुट, मौर्य, गुप्त , चालुक्य, यादव, गोंड या सर्वाची अगदी दोन अडीच हजार वर्षा पासूनचे प्राचीन भौतिक संदर्भ हया शहराच्या भ्रंमती मधून दिसून येतात . जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील प्रचंड उकाड्यात आम्ही भद्रावती परिसरात होतो . इतिहासकार तथा प्राचीन लेणी मंदिरे व शिल्प या विषयातील प्रकांड अभ्यास असलेले आमचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व डॉ अशोक राणा सर सोबत चंद्रपुरात असतांना अगोदरचे तीन दिवस विवेक चांदुरकर व प्रमोद टाले हया अभ्यासकांसोबत भद्रावती विषयी बरीच चर्चा झाली होती म्हणून आम्हाला भद्रावतीची विशेष ओढ लागली होती .

               महामार्गापासून शहरातील  बाजारपेठेमधून शहराच्या अगदी पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला विजासन बौद्ध लेणी टेकडी आहे . पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी या लेणीचे संवर्धन झाले आहे . वर जाणाऱ्या पायऱ्याने आपण या लेणीमध्ये जातो. बाह्य भागात बऱ्याच देवड्या आहेत यामध्ये काही शिल्प देखील बघायला मिळतात जाताना उजव्या बाजूच्या देवळीत हीनयान कालखंडातील बौद्धस्तुप उठावदार शिल्पात कोरले आहे अशा स्वरूपाचे एकमेव शिल्प बघायला मिळते या शिल्पात छत्रावली, यष्टी ,हर्मिका, अंड, वेदिका आणि मेधी असे सर्व भाग असलेले  स्तुप कोरलेले दिसते . उजव्या बाजूस अस्पष्ट असा शिलालेख आहे .आत जाताना गजपृष्टाकार छत असलेली कमानीतून समोर ' ध्यान मुद्रेतील बौद्ध मूर्ती दिसते . आठ ते दहा फूट रुंद व 50 ते 60 फूट लांब अशी ही आत मधली साधारणतः रचना आहे . लेणीच्या डाव्या व उजव्या बाजूस देखील अशाच स्वरूपाची आणखी आत मध्ये गजपृष्ठाकार आकारात कोरलेली लेणी असून त्यामध्ये देखील भगवान गौतम बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा कोरलेली आहे . हीनयान व महायान पंथाचा समन्वय या लेणीमध्ये दिसून येतो त्यामुळे या लेणीचा कालखंड हा दोन हजार वर्षापूर्वीचा असावा . विदर्भात फार कमी लेण्या बघायला मिळतात सालबर्डी, पातुर यासारख्या ठिकाणी लेण्या आहेत . विजासन टेकडीच्या पुढे  देखील अशा स्वरूपाची काही शैलगृहे आहेत . गौराळा वरदविनायक हे भद्रावती पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले मंदिर आहे या मंदिरात भव्य अशी गणेश मूर्ती असून हे मंदिर देखील प्राचीन आहे या मंदिराच्या बाहेर एक सुंदर छोटी लेणी आहे . या छोट्याशा लेणीत विष्णूचे वराह ,नृसिंह अवतार शिल्पे कोरलेली आहेत . लेणी बाहेर देखील बरीच शिल्पे आहेत .लेणीत स्पष्टपणे पायथ्याशी भारवाहक यक्ष या छोट्याशा लेणीचा भार तोडून धरताना दिसतात मंदिराच्या आत मध्ये प्राचीन उमाशंकर , नंदी शिल्प तथा शिवलिंग देखील बघायला मिळते .

           भद्रावती शहराचे नाव ज्या ग्रामदैवतेवरून पडले त्या भद्रनाग देवतेचे मंदिर शहराच्या अगदी मध्यभागी आहे . शेष नागाचे स्वतंत्र असलेले एकमेव मंदिर या शहरात आपल्याला बघायला मिळते .नऊ फण्याची शेषनागाची मूर्ती गाभार्‍यात विराजमान  आहे. 36 खांबावर असलेले हे प्राचीन मंदिर आणि प्रत्येक खांबाच्या पायथ्याशी असलेला भारवाहक यक्ष दिसून येतो . या मंदिरात एक शिलालेख देखील आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या छोट्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूने विष्णू मूर्ती स्थापित केली असून दरवाजावर भारवाहक यक्ष आपले स्वागत करतो. मंदिराच्या आत मध्ये शेषशायीअसलेली भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती आहे . मंदिर परिसरात  पायऱ्यांची दगडी चिरेबंदी  भव्य विहीर आहे . या परिसरात एक विरगळ देखील दिसून येते. शहरात एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आहे . मंदिर अगदी लहान असून या मंदिराच्या समोर प्राचीन दगडी खांब उभा केलेला आहे या दगडी खांबावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत . हा मंदिर समूह व दगडी खांब आता सिमेंटीकरण्याच्या प्रचंड अशा सभा मंडपाच्या आत घेण्यात आलेला आहे .

               भद्रावती शहराचे आणखी एक वैभव म्हणजे शहराच्या पश्चिम भागात असलेला भुईकोट किल्ला याला भांदकचा किल्ला देखील म्हणतात . पूर्व बाजूस भव्य असे कमानीचे प्रवेशद्वार या किल्ल्याला आहे लाल दगडात बांधलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला आहे . साधारणपणे किल्ल्याचे बुरुज हे गोलाकार स्वरूपाचे असतात मात्र या किल्ल्याचे बुरुज हे चौकोनी आहेत दरवाजा देखील दोन चौकोणी बुरुजाच्या मध्ये आपल्याला दिसतो असे आठ बुरुज या किल्ल्यास आहे . आत मध्ये साधारणपणे तीन साडेतीन एकरचा भाग असून तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असून बुरुजाच्या आणि प्रवेशद्वाराच्या वरील भागात जंग्या आहेत . पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने बऱ्यापैकी संवर्धन सुरू आहे . किल्ल्याच्या आत मध्ये अनेक इमारतींचे वाड्यांचे अवशेष दिसून येतात.  किल्ल्यामध्ये असलेली पायऱ्यांची विहीर अजूनही चांगल्या स्थितीत आहे L आकारात असलेल्या पायऱ्या असून मजबूत अशा पाषाणात बांधलेली ही विहीर या किल्ल्यास पाणी पुरवण्याचे काम करत असे . विहिरीत उतरण्यासाठी तीन ठिकाणी मधून पायऱ्या मार्ग आहे . जसा पाण्याचा स्तर असेल तसा या पायऱ्यांचा उपयोग होत असे प्रचंड असा तीन मजली महाल या विहिरीत दिसून येतो .सुंदर असे कमानी वरील नक्षीकाम व या कमानीवरील सुंदर कोरीव पट्ट्या आपले मन मोहून घेते या विहिरीच्या वरच्या भागावर मोट बसविलेली असायची त्याचे अवशेष आता दिसून येतात वरील बाजूस तीन मोठे हौद असून दगडी पन्हाळाच्या माध्यमातून संपूर्ण किल्ल्यास व येथील बाग बगीचा देखील पाणी पुरवले जात असल्याचे दिसून येते . संपूर्ण दगडी चिरेबंदी बांधकामात असलेल्या विहिरीच्या मात्र एका बाजूस नंतरच्या काळात केलेले विटाचे बांधकाम आढळते हे एक या विहिरीचे गुढ आहे . विहिरीच्या तळात बाहेर आलेला एक महाकाय दगड दिसतो असे सांगितले जाते की हया दगडाच्या पलीकडून एक भुयारी मार्ग विजासन लेणे भागात निघतो . पश्चिम बाजूस एक छोटे द्वार देखील या भुईकोटस आहे याचे मुख दक्षिण बाजूस केले आहे या छोट्या प्रवेशद्वारावर एक मुख मुद्रा कोरलेली आहे . भद्रावती शहर हे शिल्पांचे शहर मानले जाते या परिसरात असलेले अनेक प्राचीन लेणी व मंदिरे  परिसरातील आढळलेले मूर्ती शिल्प या  कोटात ठेवण्यात आलेली आहे . मासा भेदनारा अर्जुन हा भिंतीवरील शिल्पात कोरलेला आहे त्या परिसरामध्ये शीर तुटलेला ढेरपोट्या कुबेराची मूर्ती हातात साप व धनाचे हंडे त्याच्यासोबत आहेत त्याचबरोबर शंकर पार्वती , महिषासुर मर्दिनी ,भगवान महावीर ,गौतम बुद्ध नृसिंह अवतार, वराह अवतार गदा चक्रधारी भगवान विष्णू , गणेश तथा नर्तकी वीरगळ आणि कधीही न पाहिलेल्या बऱ्याचश्या अनाकलनिय मूर्ती शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात .

          जैन धर्माचे 23 वे तीर्थंकर केसरीया भगवान पार्श्वनाथ यांचे सुंदर मंदिर या ठिकाणी आहे . हे मंदिर नवनिर्मित असून संपूर्ण संगमरवरी दगडांमध्ये बारीक शिल्प कला मध्ये बांधण्यात आले आहे . या मंदिर संस्थानाकडून अनेक सेवाभावी उपक्रम चालविले जातात त्याची प्रचिती या मंदिराला भेट दिल्यानंतर येते . भगवान पार्श्वनाथाची अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरामध्ये आहे या पद्मासन स्थितीत असलेल्या मूर्तीची उंची 152 सेंटीमीटर असून अत्यंत मनमोहक ही मूर्ती आहे पार्श्वनाथ भगवानचे वाहन नागफणा आहे. ही फणायुक्त अत्यंत सुबक अशी मूर्ती शिल्प केवळ भद्रावती येथेच दिसून येते .

बुधवार, २६ मार्च, २०२५

तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर


 तुकोबारायांना सामाजिक साक्षात्कार -भांबनाथाचा डोंगर

स्थान : ता . हवेली जि . पुणे , चाकण ते तळेगाव महामार्गावर उत्तरेकडे २ कि.मी ,देहू पासून ६ कि.मी.


जगतगुरू तुकोबारायांचे जन्मगाव देहू हे इंद्रायणी माईच्या काठावर वसलेले आहे .लोणावळ्याच्या नागफणी डोंगरातून उगम पावणारी इंद्रायणी देहू पुढे आळंदी मार्गक्रमण करत तुळापूर तेथून भिमा नदीच्या रुपाने भूवैकुंठ पंढरीस चंद्रभागा बनते .तुकोबारायांच्या कर्जखाती अन वैश्वीक गाथा या माईनं जवळून पाहिल्या . आळंदीसही माऊंली समाधिस्त होतांना माईने अनुभवले . शंभू राजांच्या वेळी तर या माईने तुळापूरी आपल्या लेकरांचं स्वराज्यासाठीचं बलिदान कसं सोसलं असेल ती ही इंद्रायणी माईचं जाणते . जगातील सर्वच संस्कृतींच्या मूळ स्थानी नदी असते . सुख , समृद्धी , संकट ' संघर्ष या सर्व काळात आईच्या रुपात ही प्रत्येकाच्या सोबत असते .
             जगतगुरु तुकोबाराय याच माईच्या कुशीत रमले . जगाला वैश्वीक संदेश देणारी गाथा याच पवित्र भूमित रचली गेली .मराठी मायबोली भाषेच्या आदय महाकवींनी जन सामान्याच्या ह्यदयापर्यन्त पोहचून आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगत ,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा हे सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,कळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराजांची गाथा संपूर्ण विश्वाला तारणारी ठरली आहे .
          देहू पासून ६ कि.मी. अंतरावर असलेला भांबनाथाचा डोंगर म्हणजेच भंडारा डोंगरावर जाऊन तुकोबारायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमिस नतमस्तक व्हावे या उद्देशाने देहूवरून अगदी सकाळीच निघालो . चाकण - तळेगाव महामार्गावर उजव्या बाजूस डोंगराकडे जाणारा दुपदरी रस्ता दिसतो . घाट चढून पाच मिनिटात या डोंगरावर सहज पोहचता येते . आता या ठिकाणी संगमरवरी दगडात तुकोबारायांचे भव्य मंदिर निर्माण कार्य सुरु आहे . सुंदर नक्षी काम असलेल्या भव्य सभामंडपासह हे मंदिर उभे राहत आहे . विठोबा - रखुमाई , गणपती तथा शिवलिंग असलेले मंदिर येथे आहे . राहण्यासाठी धर्मशाळेची सोय देखील येथे आहे . आम्ही दर्शन घेऊन या डोंगरावर असलेल्या लेणी व गुफे कडे जाणारा मार्ग शोधू लागलो . जवळ पास बरीच वारकरी मंडळी दर्शनासाठी आल्याने त्यांनाही माहीत नव्हते . मग गुगल मॅप चा वापर करत आम्ही पुन्हा थोड आलो त्या मार्गाने पाच मिनिटच्या अंतरावर  खाली आलो व डोंगरावरीलच भंडारा हॉटेलच्या पश्चीम दिशेला पार्कीगच्या बाजूने डोंगर उतारावरुन अंधुक अशी पाऊल वाट दिसली .आम्ही भंडारा डोंगर या बाजूस खाली उतरतांना पायथ्याशी घनदाट जंगल दिसत होते . डोंगर उतार व पराड्या मधून कडे कडेने जातांना समोर काताळात पाण्याचे टाके दिसले . तेथेच काताळात कोरलेली गुफा होती . आता त्याला लाकडी दरवाजा बसविला गेला आहे . आत ही चौकोनी आकारात कोरली असून उजव्या बाजूने देवडी कोरली आहे एका व्यक्तीच्या विसाव्या येवढी जागा त्यात आहे . गुफा आतुन रंगविण्यात आली असून मध्य भागी अगदी समोर विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे. गुफे बाहेरही दोन देवड्या दोन्ही बाजूने होत्या आता मात्र त्याचे केवळ अवशेष दिसतात . अशी शैलगृहे ही वर्षावास म्हणून प्राचीन काळी असतं . कातळाच्या कपारीने पुढे अजून पाण्याची टाके आहेत वरच एक अर्धवट कोरलेली गुफा दिसते व बाजुलाच एक घुमटाकार बौद्ध स्तुप दिसतो वर चढण्यासाठी पायऱ्या पूर्वी होत्या असे अवशेष दिसतात . स्तुपा भोवती पूर्ण गोलाकार फिरता येते . पूर्वी यासाठी लाकडी छत असावे असे दिसते . या स्तुपाचा वरील भाग आता तुटलेला आहे वर छत्रावली नाही त्याखाली असलेली यष्टी नाही, हर्मिका पण तुटलेली आहे घुमटाकार भाग असून त्या खाली सुंदर नक्षीदार वेदिका पटटी असून त्या खाली गोलाकार मेधी आहे . हिनयान कालखंडातील हा बौद्ध लेणी समुह आहे . भाचे , कार्ले, ठाणाळे ,पितळखोरा, कान्हेरी व अजिंठा  मधील १० क्रमांकाचे लेणे हे हिनयान आहेत . पुढे अजून दोन लेणे बघायला मिळतात ही चौकोनी असून त्यात दोन- तीन व्यक्ती वास्तव्य करु शकतील येवढी जागा आहे . प्राचीन काळा पासून बौध्द अनुयायांचे धर्म चिंतनासाठी वास असे . ४०० वर्षा पूर्वी याच भंडारा डोंगरावर जगतगुरु तुकोबारायांचे वास्तव्य होते . निश्चितच या शांत व रमणिय ठिकाणी त्यांनी चिंतन केले असावे . सात दिवस महाराज या डोंगरावर होते . या ठिकाणी त्यांची पत्नी जिजाबाई ह्या त्यांना भाकरी घेवून यायच्या या संदर्भात त्यांच्या पायात रुतलेला काटा साक्षात पांडुरंगाने काढला अशी अख्यायिका सांगितली जाते . या डोंगरावरून त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना देहूस घेऊन आले . ते घरी न जाता इंदायणी माईच्या काठावर आले अन कान्होबास कर्जखाती घेवून येण्यास सांगितली . त्यांचा परिवार हा अनेक पिढ्या पासून सावकारी मध्ये होता .तुकोबारायांनी त्यांच्या हिश्याची कर्ज खाती इंदायणीत बुडविली .  तुकोबारायांना भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला होता तो गुढ गहन व अध्यात्मिक स्वरुपाचा नव्हता तर तो सामाजिक स्वरूपाचा होता . संतत्वाची खरी कसोटी त्यांनी अगोदर स्वतः स लावली . समाजातील अन्याय , शोषण दुर करून मानवता प्रस्तापित केल्या शिवाय खरा निर्मळ ईश्वर मार्ग निर्माण होतो ही त्यांची धारणा होती .डॉ आ.ह. साळुंखे सर म्हणतात " श्वासोच्छवास जितक्या सहजतेने घडतो तितक्या सहजपणे त्यांनी कर्जखाती बुडविली होती " हे उच्च नैतीकतेचे जाणिवेतून उचललेले पाऊल ही उच्च कोटीची मानवता होती .
         महाभूमिच्या वारश्यातील भंडारा डोंगर हा सामाजिक साक्षात्काराचे क्रांतिस्थळ आहे .


संजय खांडवे

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

समरभूमी -उंबरखिंड*

 *समरभूमी -उंबरखिंड*


ता खालापूर जि रायगड

पुणे पासून १०५ कि.मी. खालापूर -पाली मार्गावर शेंबडी फाट्या पासुन ४ कि मी



 पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज सुखरूप विशालगडी पोहचतांना गजापूरच्या पावनखिंडीत स्वराज्याच्या स्वामिनिष्ठतेचा थरार सिद्धीच्या सैन्याने अनुभवला होता . स्वामिनिष्ठतेच प्रतीक ठरलेल्या पावनखिंडी नंतर खिंडीत झालेली शिवचरित्रातील लढाई म्हणजे उंबरखिंडची लढाई आहे . मोगली झेंडा हाती घेऊन औरंगजेबाचा मामा शाहिस्ताखान हा पाऊन लाखाची फौज घेऊन दक्षिणेकडे निघाला होता. २८ जाने .१६६० ला तो औरंगाबादला पोहचला होता. अहमदनगर मार्गे तो ९ मे १६६० ला लाल महाल पुणे येथे आला .हडपसर , सासवड , चाकण आदि भागातील सर्व लहान मोठे वाडे , गढ्या इत्यादि वर त्याने ताबा केला . चाकणचा संग्रामदुर्ग घेण्यास मात्र त्याला ५६ दिवस लागले . हजारो मोगल विरुध्द  पाच सहा शेकडयात असलेले फिरंगोजी नरसाळा यांच्या नेतृत्वात मराठे प्राणाची बाजी लावून लढले होते . शाहिस्ता तीन वर्ष स्वराज्यात ठान मांडून होता . याच काळात मोगली सरदार कारतलब खानाने परांडयाची म्हणजे प्रचंडपूरची विजयी मोहिम पूर्ण केली होती . या मोहिमेने शाहिस्ताखान त्याच्यावर खुष होता म्हणून त्याने सहयाद्री जिंकला म्हणजे शिवाजी राजाचे स्वराज्य कमकुवत होईल या उददेशाने सह्याद्री उतरुन कोकण जिंकावा या हेतूने कारतलब खानास कल्याण,भिवंडी , चौल, पनवेल, नागोठाणा घेण्यासाठी मोहिम सोपविली . देशावरून कोकणात उतरण्यास अनेक घाट वाटा आहेत . कारतलब खान भोर घाटातून कोकणात उतरेल असा अंदाज होता त्यावेळी महाराज राजगडी होते . शत्रूने मात्र पवन मावळातून तिकोना , तुंग , लोहगड , विसापूर ह्या सरक्षक दुर्गाच्या मधून 30 हजाराचे सैन्य घेऊन कुच केले वरील गडावरुन प्रतिकार होत नाही हे पाहून त्याचा आत्मविश्वास तर अजूनच वाढला होता या पवना खोऱ्यातून कुरवंडे गावातून हा घाट उतररुन उंबरखिंडीतील घनदाट जंगल पार करत लोणावळा परिसरातीत अंबेनळीच्या मार्गाने जावे लागते .

        हिंदवी परिवाराच्या मदतीने हा १५ ते १८ कि . मी चा उंबरखिंड पर्यन्तचा ट्रेक पूर्ण करता आला ज्या वाटेने हे सैन्य उतरले तो मार्ग आजही घनदाट अरण्य व जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेला आहे . लोणावळयातून कुरवंडे गावात वाहने सोडून ट्रेक सुरु होतो . गावातून उंच टेकडीवर पोहचल्यावर समोर उंच डोंगरी टोक दिसते तोच नागफणी डोंगर आहे एका तासाची चढाई याची आहे . त्याच्या खालीच इंद्रायणी मातेचे उगम स्थान आहे . नागफणी टेकडीवर महादेव मंदिर आहे . पण आम्ही उंबरखिंडीत उतरत असल्याने टेकडीच्या पायथ्याशी डाव्या बाजूच्या पाऊल वाटेने कडे डोंगर कड्यांचा आसरा घेत घटदाट जंगल पार करत दोन तासात एका पठारावर पाहचलो व तेथून पुन्हा घनदाट व जाळी मधून वाट काढत उतरून नदीच्या पात्रात उतरलो व समोर चावणी गाव दिसले . तेथुन पुढे पकक्या वाटेने उंबरखिंडीत पोहचता येते .हा ६ ते ७ तासाचा प्रवास आहे . हाच रस्ता पुढे शेंबडी फाट्यावर जाऊन पाली महामार्गाला मिळतो .

             शिवभारतात परमानंद या लढाईचे वर्णन करतो यात तो म्हणतो की शाहिस्ता खानाने कारतलब खाना सोबत महाबलवान महापराक्रमी कछप व चव्हाण , अमरसिह , मित्रसेन व त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे , अजिक्य रायबाधिन ( माहूरची जहागिरी यांच्याकडे होती मेहकर पर्यन्त हदद होती ) जसवंत कोकाटे , महाबाहू जाधव असे सेनानायक पाठवत आहे अस म्हणतो . त्याच बरोबर तुर्कताज खान, लोदी खान , गयासुद्दीन खान , हौद खान , राजा प्रद्युघ्न व अनिरुद्ध , सुराजी गायकवाड, दिनकर काकडे , कमळाजी गाढे असे बलाढय सरदार स्वराज्यावर चालून आलेत . पुण्यात लाखा भराचं सैन्य दाखल आहे आणि हे तीस हजाराचे सशस्त्र सैन्य अनेक मातब्बर सरदार  घेऊन कोकणावर जात आहे . मराठ्यांच सैन्य केवळ हजार दोन हजाराचं होत .शिवभारतात परमानंद शत्रू सैन्याचं वर्णन करतांना कळते की या लढाईत मावळयांचा पराक्रम किती मोठा आहे . कुरवंडे गाव ओलांडतांना त्यांना अडविले नाही जेव्हा शत्रु सैन्य दरीत घनदाट जंगलात उतरले तेव्हा गनिमी काव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला . या नियोजनात बर्हिजी नाईकांचा मोठा वाटा होता . प्रत्यक्ष आम्ही ज्या वेळेस उंबर खिंडीत उतरलो त्यावेळेस दोन्ही बाजूनी उंच टेकड्या व घनदाट जंगल यामधून अचानक सपा- सप बाणांचा वर्षाव झाल्याने शत्रु हतबल झाला असावा याची प्रचीती येते  . फेब्रुवारी असल्याने महाराजांच्या सैन्याने पानवठ्यावर अगोदरच कब्जा केला होता . नेताजी पालकरासह स्वतः शिवाजी महाराज या लढाईत उतरले होते . सपूर्ण चिलखती पोषाख व डोक्यावर शिरस्त्रान घालून हातात भाला कमरेस तलवार पाठीवर ढाल अन धनुष्य बाणासह शत्रुच्या वधासाठी घोड्यावर आरूढ होऊन महाराज स्वतः लढत आहे .

         सावित्रीई रायबाघिणीने कारतलबास म्हणाली शिवाजी रूपी सिंहाच्या आश्रयाखाली असणाऱ्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे वाईट काम केले . आजपर्यन्त दिल्ली पातशहाचे यश या अरण्यात बुडविले . दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापतीने ( शाहिस्ताखान)शत्रुच्या प्रतापरूपी अग्नी मध्ये तुला सैन्यासह टाकले . कारतलबाने रामबाघिणचा सल्ला ऐकला . या अरण्यात आंधळया सारखे सैरावैर झालेले शत्रू शरण आले . कारतलब खान व त्याचे शूर महाबाहु म्हणविणाऱ्या सरदारांनी महाराजास खंडणी पाठवून स्वतः स मुक्त करून घेतले . कुणी ढाल देऊन मुक्त झाले तर कुणी तलवार , घोडा व जवळील असेल नसेल ते देवून पळाले . स्वराज्यातील हा मोठा विजय होता या वेळी युद्ध सामुग्री सह अनेक मौल्यवान वस्तु देखील मिळाल्या .२ फेब्रु १६६१ ला उंबरखिंडीतल्या समरभूमीवर हा रणसंग्राम घडला .

             आज या समरभूमीच्या खिंडीत नदीच्या पात्रात विजयस्तंभ उभारला आहे . कुठलेही स्वराज्याचे नुकसान न होऊ देता हजार पटीतील सैन्य हतबल करून शरण आणले व स्वराज्य अधिक मजबूत झाले . हा संदेश येथे मिळतो . या स्मारकावर ढाल , तलवार, धनुष्य, भाला, भगवाध्वज सर्वोच्च असून महाराजांचे शिवभारतातील वर्णनाप्रमाणे शिल्प कोरले असून इतर बाजूस लढाईचा सक्षिप्त माहीती सह व आज्ञापत्र कोरले आहे . या खिंडीत कुरवंडे गावातून उतरतांना स्थानिक जाणकार व तज्ञा सोबतच समूहाने उतरावे .चार चाकी गाडीने शेंबडी फाटयावरुन जाणे सुरक्षित आहे .




संजय खांडवे

मंगळवार, ११ मार्च, २०२५

पवन मावळातील मावळा - किल्ले तिकोना

 पवन मावळातील मावळा - किल्ले तिकोना



स्थान : ता . मावळ जि पुणे , उंची १०९१मी ., पुणे वरून ६० कि.मी., मुंबई वरून १२०कि.मी.



अर्कज्ञ शहाजीराजे यांनी राजमाता जिजाऊ व बाल शिवबा व विश्वासु सरदार व अमात्यासह भगवा ध्वज व राजमुद्रा देऊन स्वराज्य स्थापनेसाठी पुणे प्रांतात पाठविले . राजमातांच्या मार्गदर्शनात सनय असलेल्या शिवरायांनी पुणे परिसरातील १२ मावळ प्रांतावर आपले लक्ष केंद्रित केले होते . त्या काळात मावळ म्हणजे ही नदीच्या खोऱ्यात वसलेली अनेक गावांची मिळून असलेली जनू एक प्रशासकिय विभागाच असायची .आंदर मावळ,कानद खोरे ,'कोरबारसे मावळ ,गुंजन मावळ,नाणे मावळ ,पौड खोरे,मुठा खोरे ,मोसे खोरे ,रोहिड खोरे ,वळवंड खोरे,हिरडस मावळ या सोबतच पवन मावळ हा भाग होता . पवना नदीच्या खोऱ्यात असलेला हा प्रांत असल्याने याला पवन मावळ म्हणत . या भागात असलेल्या कारले , भाजे , बेडसे ,भंडारवाडी,शेलारा या प्राचीन लेण्यावरून प्राचीन इतिहासात या भागाला खूप महत्व होते . हिनयान बौद्ध लेण्या असल्यामुळे कालखंडही लक्षात येतो . या परिसरातील हा व्यापारी मार्गही होता . त्याच्या रक्षणार्थ लोहगड,विसापूर , तुंग व तिकोना म्हणजे वितंडगड या सारखी मजबूत किल्ले अजूनही धिप्पाड छाती समोर करून उभी असलेली दिसून येतात .लोहगड , तिकोना व उंच निमुळता होत गेलेल्या तुंग किल्ल्याच्या मधून पवना नदी जाते आता या नदीवर मोठे धरण असल्याने त्या ठिकाणचा जलाशय आता अधिक मनमोहक वाटतो . पुणे - मुंबई जवळ असल्याने अनेक पर्यटक या भागात भेट देतात . पुण्याहून मुंबईकडे जातांना लोणावळ्याच्या अलीकडेच डाव्या बाजूला लोहगड व विसापूरच्या किल्ल्याचे दर्शन होते . तिकोना व तुंग अगदी जवळ असला तरी दोन्ही किल्ल्या पलिकडे असल्याने या महामार्गारुन     दिसत नाही .

         बहामणी नंतर निजामशाहीत मलिक अहमद निजामशहा असतांना त्याने या भागातील इतर किल्ल्यासह तिकोना देखील निजामशाहीत घेतला होता . काही काळ आदिलशाही व पुढे १६५७ मध्ये महाराजांनी हा स्वराज्यात घेतला . तेव्हा पासून पवन मावळातील हा मावळा स्वराज्य रक्षणासाठी ताठपणे उभा राहीला . पुरंदरच्या तहात स्वराज्य रक्षणार्थ हा मावळा मुघलांकडेही एक प्रकारे ओलीस राहिला होता. पण पुढे महाराजांनी पुन्हा स्वराज्यात घेतले . या किल्ल्यावर तिकोना वाडीमधून जाण्यासाठी पाऊलवाट आहे . या वाडीपर्यन्त सर्व प्रकारची वाहने पोहचतात व वाहनतळ देखील आहे . दाट जंगाला मधून पाऊल वाट सुरू होते व हळूहळू चढाई वाढत जाते . खडकाच्या खाच खळग्या मधून नागमोडी वळणे घेत जाणारी पाऊलवाट माथ्यावरील एका टेकडीवर घेऊन जाते . पलीकडच्या भागातील घनदाट जंगल नजरेस पडते . उजव्या हाताला वळन घेत गडाचा दिशेने पुन्हा चढाईची वाट सुरु होते दोन्ही बाजूचा परिसर न्हाहळता  येतो . यावरून या किल्ल्याचे महत्व समजते . वळण घेत पुढे गेल्यावर कृत्रीम पध्दतीने एका टेकडीस फोडून मधून मार्ग काढलेला दिसतो पूर्वी येथे मेटे म्हणजे चौकी असावी असे दिसते . समोरच आपल्याला काताळात कोरलेला पहीला दरवाजा दिसतो . साधरणतः ७ फुट उंच असलेल्या दरवाज्यातून आत जाताच डाव्या बाजूला अगदी दरवाज्या वरील छतासह अखंड पाषाणात कोरलेली मोठी देवडी आहे . येथून पायऱ्याने थोड चालत गेलो की आपण दोन बुरुजामधे असलेल्या वेताळ दरवाज्यात येतो आता मात्र हे बुरुज अर्धवट आहे आजू बाजूला इमारतीचे अवशेष दिसून येतात . पुढे याच वाटेने गेल्यावर डाव्या बाजूला गडाची सरक्षक देवता असलेली संपूर्ण पाषाणातून साकारलेली मोठी  चपेटदान मारोतीची मूर्ती आहे.हे सर्व वैभव पाहून पाय आपोआपोच बालेकिल्ल्याकडे खेचले जातात सवय नसलेल्यांना मात्र दमछाक होते . पुढे काही वाड्याचे अवशेष लागतात . त्याच्या समोरच काताळात कोरलेल्या अनेक गुफा आहे त्या समोर मोठे पाण्याचे टाके असून खाली उतरण्यास पायऱ्या आहे पाषाणात तळजाई देवीच्या मंदिरात नक्षीकामसुध्दा दिसून येते. येथून उजव्या बाजूस एक वाट जाते ही महादरवाज्या कडे जाते पूर्वी या मार्गाचा वापर होत असे .दोन बुरुजात कमानीचा दरवाजा असून तटबंदी व काही इमारतीचे अवशेष आहे . एका चोर वाटेने खाली गेल्यावर काही पाण्याचे खांब टाकी आहे . येथून पुन्हा परत यावे लागते व चुन्याच्या घाण्या पासून पुढे पायऱ्या दिसतात याची चढाई मोठी आहे येथून एका बुरुजात असलेल्या दरवाज्यातून वर जातो उजव्या हाताला काताळात कोरलेले मोठे जीवंत पाण्याचे टाके व त्यावर गुफा आहे . या ठिकाणी अर्ध गोलाकार बुरूज असून तो टेहाळणी साठी असे पुढे ८५अंशात असलेला पायरी मार्ग आहे सुरक्षेसाठी दोन्ही बाजुला लोखंडी जाड दोरखंड जोडला आहे समोरच पुन्हा एक दरवाजा  लागतो हा दरवाजा चांगल्या स्थितीत आहे . वर आल्यावर मोठा बुरुज आहे व बरीच मोकळी जागा असून या बुरजाला सुरक्षा व टेहाळणी साठी खिडक्या व चऱ्या आहेत . बाजूलाच एक पाऊलवाट काताळातील पाण्याची टाके समूह व गुफा असलेल्या भागात घेऊन जाते. या ठीकाणी काळजी घ्यावी लागते . पुन्हा परत येवून डाव्या बाजूला एका दगडाच्या वाटेने बालेकिल्यावरील वितंडेश्वर महादेव मंदिरा समोर पोहचतो येथेही वर येतांना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूस खोल दरी आहे . या मंदिराच्या खालीच अनेक खांब असलेले मोठे पाण्याचे टाके आहे . पाठीमागे इमारतीचे अवशेष असून तीन टोकास तीन बुरुज आहे त्यापैकी एका बुरुजावर आता ध्वज लावला आहे या बुरुजावरून गडाच्या सर्वात उंच भागावर पोहचता येते येथे आयाताकार इमारतीचे अवशेष बघायला मिळतात . खालच्या बुरुजावर प्रचंड मोठे पाण्याचे टाके आहे . खालून हा किल्ला लहान जरी वाटत असला तरी याचा व्याप खूप मोठा आहे . पाण्याची जागो जागी व्यवस्था व बालेकिल्ल्यावरील सदैव उपलब्ध असलेले पाणी हे तिकोण्याचे विशेषच आहे. येथून पवना जलाशयाचे व मावळ प्रांताचे सुंदर दृष्य बघायला मिळते .या गडाच्या पोटात अनेक गुफा व पाण्याचे टाकी आहेत पण दाट जंगली भाग असल्याने काळजी घ्यावीच लागते . जंगली प्राणी देखील या जंगलात आहेत त्याबाबतही सतर्क असावे उंच ठिकाणावर फोटो - सेल्फी आदिच्या बाबतीत काळजी घ्यावी . गडावर जातांना पुरेसे पाणी देखील सोबत असावे . प्लास्टीकादि कचरा आजीबात करु नये दिसल्यास गडावरुन खाली घेवून यावा .



संजय खांडवे

रविवार, २ मार्च, २०२५

तळागड - दुर्गेश्वराचा पहारेकरी

 

तळागड - दुर्गेश्वराचा पहारेकरी


ता. तळा जि. रायगड

पुणे वरून ताम्हणी घाट मार्गे १३० कि.मी , मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर पासून पश्चिमेस १६ कि.मी. ,उंची १००० फुट


प्राचीन काळापासून किल्ला हा सामान्य रयतेसाठी फार मोठा आधार असायचा स्वराज्यात तर रयतेचे आश्रयस्थान म्हणून किल्याची मुख्य भूमिका असायची . आप आपल्या कालखंडात राजे - महाराजे राज्याच्या सुरक्षतेसाठी मिलट्री बेस कॅम्प सारखे या किल्ल्याना महत्व देत असत . किल्ल्याचा एक बुरुज एक  शताग्नी म्हणून काम करायचा म्हणजे १०० शत्रू सैन्याशी एकाच वेळी लढण्याची त्या एका बुरुजाची क्षमता असायची . मग किल्ल्याला जेवढे मजबुत बुरुज व तटबंदी तेवढेच त्याची शत्रुशी लढण्याची शक्ती मोठी असायची . गडावरील पाणी व्यवस्थापण ,धान्यसाठवण व दारूगोळाशस्त्रागारादि बाबी अधिक बळकट बनविण्याचे काम करायचे .

शिव भारतात एक श्लोक आहे .


न दुर्ग दुर्गमित्येव दुर्गम मन्यते जनाः ।

तस्य दुर्गमता सर्व यत्प्रभुस्तस्य दुर्गमः॥

प्रभुणां दुर्गमं दुर्ग प्रभू दुर्गेण दुर्गमः ।

अदुर्गमत्वा दुभयोर्विदवीपेन दुर्गमः॥


गड केवळ अवघड आहे म्हणून लोक त्याला दुर्गम मानत नाही . दुर्गाचा स्वामी दुर्गम असणे ही गडाची खरी दुर्गमता आहे . किल्ल्या मुळे राजा जिंकण्यास कठिण होतो व राजामुळे किल्ले अजिंक्य होतात . किल्ला आणि राजा याचा सहसंमंध परमानंद येथे विषद करतो . रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातही गड किल्याचे निकष सांगितले आहे. 

          कोकणात असलेला तळागड हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा एक अभेदय पहारेकरी सारखा उभा आहे . इंदापूर पासून १६ कि मी असलेला हा किल्ला पुरंदरच्या तहात  महाराजांनी १२ किल्ले जवळ ठेवतांना तळागड देखील स्वराज्यात ठेवला होता .मिर्झा राजे जयसिंगाच्या तपशिला प्रमाणे रायगडा सोबत इतर ११ किल्ल्यामधे तळागड होता . हा किल्ला चढाईस फारसा वेळ लागत नाही . तळे हे गाव या किल्ल्याच्या भोवती वसलेले आहे. या गावात अन परिसरात छोटी मोठी तळे आहेत ह्या तळ्यांचा अन गावाच्या नावाचा संमंध असावा . गावातूच अगदी मुख्य रस्त्यावरून गडाचे दर्शन होते .  दोन्ही टोकाकडे निमुळता होत गेलेला लांब जहाजा सारखा हा किल्ला दिसतो . त्याच्या दिशेने गावातील सिमेन्ट रस्ता आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याशी घेऊन जातो . गावातील गावदेव  म्हसोबा देवता या ठिकाणी विराजमान आहे . येथून वळणा - वळणाचा रस्ता वरच्या दिशेने घेऊन जातो लाकडी चाकावर बसविलेली तोफ असलेल्या एका सपाट उंचवटयावर जातो . तटबंदीचे वलय येथूनच दिसायला सुरु होतात . कमीत कमी जागेत अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी तटबंदी वर दुहेरी तटबंदी बांधलेली दिसते . पुन्हा थोडे वर दगडी पायऱ्या ने चढत गेल्यावर एक पडझड झालेला प्रवेशद्वारा सारखा भाग दिसतो . याठीकाणी देखील एक तोफ बघायला मिळते . थोड़े पुढे चालत गेले की एक व्यक्ती चालत जाईल येवढ्या जागेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याच्या अगदी खाली एक मार्ग दिसतो पण तो आता बंद आहे . त्या ठिकाणी एक चौकी सारखी गोलाकार दगडी इमारत होती आता केवळ चौथरा आहे . समोरच काताळाच्या उतारावर भुयारा सारखी . कोरलेली पाण्याची  खांब टाके दिसून येतात . त्या वरच्या वाटेत उजव्या बाजूस काताळावर वीर हनुमानाची मुर्ती कोरली आहे बाजूलाच आनखी एक भुयारात कोरलेले पाण्याचे टाके आहे . या ठिकाणी हनुमान दरवाज्याचे अवशेष दिसून येतात .या दरवाज्यावर असलेले क्षरभशिल्प हनुमान मुर्ती जवळ ठेवलेले आहे . समोर चालत जातांना डाव्या बाजूला पाया मजबूत असलेली तटबंदी आहे व पुढील मोकळ्या जागेत तीन तोफा आहेत . वळण घेत पुढे वर चालत जातांना दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताला मजबुत तटबंदी आहे. वाटेत डाव्या बाजूस तटबंदीला अर्धवर्तुळाकार बुरुज आहे या ठिकाणी आता एक तोफ ठेवलेली आहे . आता आपण अगदी गडाच्या पठारावर पोहचतो या ठिकाणी देखील एक दरवाजा पूर्वी काळी होता चार स्तरावर तोफा अन चौकीची योजना या वाटेने तिहेरी तटबंदीच्या स्थापत्यात दिसून येते . गडाच्या या पठारावर फारशी मोकळी जागा नाही अनेक इमारतीचे अवशेष दिसून येतात पण किल्याच्या काताळावर तंतोतंत बांधलेली मजबूत तटबंदी अगदी आजही त्याच अवस्थेत आहे . गडाच्या पूर्वेस उजव्या बाजूला ध्वजस्तंभ दिसतो व या ठिकाणी वाडया सारखी इमारत असून त्यावर टेहाळणी बुरुज आहे . बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत . या इमारती मधील जंग्या व खिडक्या मधून सर्वदूर नजर ठेवून मारा करता येतो . निमुळत्या जहाजासारख्या असणाऱ्या अगदी मध्यभागावर पाण्याची तीन टाकी कोरलेली आहे यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी समोरच एक उध्वस्त वास्तु आहे तिला लक्ष्मी कोठी म्हणतात . बाजूलाच तरबंदी मध्ये शौचकुप आहे . त्याच्या समोर पुन्हा पाण्याची सात टाके कोरलेली आहेत . पाण्याच्या टाकी समुहा समोर छत नसलेले शिवमंदिर आहे गाभाऱ्यात शिवलिंग आकाराचे काताळात कोरले आहे आता त्या ठिकाणी नवीन शिवलिंग आहे . पुढं हा किल्ला अधिक निमुळता होत जातो व मजबुत अशी तटबंदी दिसून येते . समोरच अगदी टोकावर एक बुरुज आहे . वर चढण्यास काही पायऱ्या आहेत बुरुजाची स्थिती चांगली असून चऱ्या व जंग्या दिसून येतात हे या गडाचे अगदी शेवटचे टकमक टोकासारखे टोक आहे . या गडाला चढण्यास पाऊण तास व फेर फटका मारण्यास अर्धा - पाऊण तास लागतो .

         या गडावरून उत्तरेकडे घोसळगड दिसतो . पूर्वेस सावित्री नदीचे पात्र आहे पश्चिमेस समुद्र खाडी आहे. जवळच कुडे -मांदाडच्या बौध्द लेण्या असून आता त्या ठिकाणी विकासकामे सुरु असल्याची दिसतात . रायगड,हरिहरेश्वर , काशीद बीच , मुरुड जंजीरा , दिघी बंदर ही पर्यटन स्थळे या गडापासून जवळच आहे . प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर तळागडचे विशेष महत्व तर होतेच पण स्वराज्यात हा किल्ला रायगडाचा पहारेकरी म्हणून होता . १६४८ च्या काळात हा स्वराज्यात आला होता . अफजली संकट काळात सिद्धीनं या किल्ल्यास वेढा दिला होता पण त्याला घेता आला नाही . महाराजांच्या महानिर्वाणानंतर मात्र सिद्दीनं हा किल्ला ताब्यात घेतला होता .



संजय खांडवे

पुणे वरून ताम्हणी घाट मार्गे १३० कि.मी , मुंबई गोवा महामार्गावरील इंदापूर पासून पश्चिमेस १६ कि.मी. ,उंची १००० फुट


प्राचीन काळापासून किल्ला हा सामान्य रयतेसाठी फार मोठा आधार असायचा स्वराज्यात तर रयतेचे आश्रयस्थान म्हणून किल्याची मुख्य भूमिका असायची . आप आपल्या कालखंडात राजे - महाराजे राज्याच्या सुरक्षतेसाठी मिलट्री बेस कॅम्प सारखे या किल्ल्याना महत्व देत असत . किल्ल्याचा एक बुरुज एक  शताग्नी म्हणून काम करायचा म्हणजे १०० शत्रू सैन्याशी एकाच वेळी लढण्याची त्या एका बुरुजाची क्षमता असायची . मग किल्ल्याला जेवढे मजबुत बुरुज व तटबंदी तेवढेच त्याची शत्रुशी लढण्याची शक्ती मोठी असायची . गडावरील पाणी व्यवस्थापण ,धान्यसाठवण व दारूगोळाशस्त्रागारादि बाबी अधिक बळकट बनविण्याचे काम करायचे .

शिव भारतात एक श्लोक आहे .


न दुर्ग दुर्गमित्येव दुर्गम मन्यते जनाः ।

तस्य दुर्गमता सर्व यत्प्रभुस्तस्य दुर्गमः॥

प्रभुणां दुर्गमं दुर्ग प्रभू दुर्गेण दुर्गमः ।

अदुर्गमत्वा दुभयोर्विदवीपेन दुर्गमः॥


गड केवळ अवघड आहे म्हणून लोक त्याला दुर्गम मानत नाही . दुर्गाचा स्वामी दुर्गम असणे ही गडाची खरी दुर्गमता आहे . किल्ल्या मुळे राजा जिंकण्यास कठिण होतो व राजामुळे किल्ले अजिंक्य होतात . किल्ला आणि राजा याचा सहसंमंध परमानंद येथे विषद करतो . रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रातही गड किल्याचे निकष सांगितले आहे. 

          कोकणात असलेला तळागड हा दुर्गदुर्गेश्वर रायगडाचा एक अभेदय पहारेकरी सारखा उभा आहे . इंदापूर पासून १६ कि मी असलेला हा किल्ला पुरंदरच्या तहात  महाराजांनी १२ किल्ले जवळ ठेवतांना तळागड देखील स्वराज्यात ठेवला होता .मिर्झा राजे जयसिंगाच्या तपशिला प्रमाणे रायगडा सोबत इतर ११ किल्ल्यामधे तळागड होता . हा किल्ला चढाईस फारसा वेळ लागत नाही . तळे हे गाव या किल्ल्याच्या भोवती वसलेले आहे. या गावात अन परिसरात छोटी मोठी तळे आहेत ह्या तळ्यांचा अन गावाच्या नावाचा संमंध असावा . गावातूच अगदी मुख्य रस्त्यावरून गडाचे दर्शन होते .  दोन्ही टोकाकडे निमुळता होत गेलेला लांब जहाजा सारखा हा किल्ला दिसतो . त्याच्या दिशेने गावातील सिमेन्ट रस्ता आपल्याला गडाच्या अगदी पायथ्याशी घेऊन जातो . गावातील गावदेव  म्हसोबा देवता या ठिकाणी विराजमान आहे . येथून वळणा - वळणाचा रस्ता वरच्या दिशेने घेऊन जातो लाकडी चाकावर बसविलेली तोफ असलेल्या एका सपाट उंचवटयावर जातो . तटबंदीचे वलय येथूनच दिसायला सुरु होतात . कमीत कमी जागेत अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी तटबंदी वर दुहेरी तटबंदी बांधलेली दिसते . पुन्हा थोडे वर दगडी पायऱ्या ने चढत गेल्यावर एक पडझड झालेला प्रवेशद्वारा सारखा भाग दिसतो . याठीकाणी देखील एक तोफ बघायला मिळते . थोड़े पुढे चालत गेले की एक व्यक्ती चालत जाईल येवढ्या जागेत दगडात पायऱ्या कोरलेल्या आहेत . या पायऱ्याच्या अगदी खाली एक मार्ग दिसतो पण तो आता बंद आहे . त्या ठिकाणी एक चौकी सारखी गोलाकार दगडी इमारत होती आता केवळ चौथरा आहे . समोरच काताळाच्या उतारावर भुयारा सारखी . कोरलेली पाण्याची  खांब टाके दिसून येतात . त्या वरच्या वाटेत उजव्या बाजूस काताळावर वीर हनुमानाची मुर्ती कोरली आहे बाजूलाच आनखी एक भुयारात कोरलेले पाण्याचे टाके आहे . या ठिकाणी हनुमान दरवाज्याचे अवशेष दिसून येतात .या दरवाज्यावर असलेले क्षरभशिल्प हनुमान मुर्ती जवळ ठेवलेले आहे . समोर चालत जातांना डाव्या बाजूला पाया मजबूत असलेली तटबंदी आहे व पुढील मोकळ्या जागेत तीन तोफा आहेत . वळण घेत पुढे वर चालत जातांना दगडी पायऱ्या आहेत डाव्या हाताला मजबुत तटबंदी आहे. वाटेत डाव्या बाजूस तटबंदीला अर्धवर्तुळाकार बुरुज आहे या ठिकाणी आता एक तोफ ठेवलेली आहे . आता आपण अगदी गडाच्या पठारावर पोहचतो या ठिकाणी देखील एक दरवाजा पूर्वी काळी होता चार स्तरावर तोफा अन चौकीची योजना या वाटेने तिहेरी तटबंदीच्या स्थापत्यात दिसून येते . गडाच्या या पठारावर फारशी मोकळी जागा नाही अनेक इमारतीचे अवशेष दिसून येतात पण किल्याच्या काताळावर तंतोतंत बांधलेली मजबूत तटबंदी अगदी आजही त्याच अवस्थेत आहे . गडाच्या पूर्वेस उजव्या बाजूला ध्वजस्तंभ दिसतो व या ठिकाणी वाडया सारखी इमारत असून त्यावर टेहाळणी बुरुज आहे . बुरुजावर जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत . या इमारती मधील जंग्या व खिडक्या मधून सर्वदूर नजर ठेवून मारा करता येतो . निमुळत्या जहाजासारख्या असणाऱ्या अगदी मध्यभागावर पाण्याची तीन टाकी कोरलेली आहे यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध होते . अगदी समोरच एक उध्वस्त वास्तु आहे तिला लक्ष्मी कोठी म्हणतात . बाजूलाच तरबंदी मध्ये शौचकुप आहे . त्याच्या समोर पुन्हा पाण्याची सात टाके कोरलेली आहेत . पाण्याच्या टाकी समुहा समोर छत नसलेले शिवमंदिर आहे गाभाऱ्यात शिवलिंग आकाराचे काताळात कोरले आहे आता त्या ठिकाणी नवीन शिवलिंग आहे . पुढं हा किल्ला अधिक निमुळता होत जातो व मजबुत अशी तटबंदी दिसून येते . समोरच अगदी टोकावर एक बुरुज आहे . वर चढण्यास काही पायऱ्या आहेत बुरुजाची स्थिती चांगली असून चऱ्या व जंग्या दिसून येतात हे या गडाचे अगदी शेवटचे टकमक टोकासारखे टोक आहे . या गडाला चढण्यास पाऊण तास व फेर फटका मारण्यास अर्धा - पाऊण तास लागतो .

         या गडावरून उत्तरेकडे घोसळगड दिसतो . पूर्वेस सावित्री नदीचे पात्र आहे पश्चिमेस समुद्र खाडी आहे. जवळच कुडे -मांदाडच्या बौध्द लेण्या असून आता त्या ठिकाणी विकासकामे सुरु असल्याची दिसतात . रायगड,हरिहरेश्वर , काशीद बीच , मुरुड जंजीरा , दिघी बंदर ही पर्यटन स्थळे या गडापासून जवळच आहे . प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर तळागडचे विशेष महत्व तर होतेच पण स्वराज्यात हा किल्ला रायगडाचा पहारेकरी म्हणून होता . १६४८ च्या काळात हा स्वराज्यात आला होता . अफजली संकट काळात सिद्धीनं या किल्ल्यास वेढा दिला होता पण त्याला घेता आला नाही . महाराजांच्या महानिर्वाणानंतर मात्र सिद्दीनं हा किल्ला ताब्यात घेतला होता .



संजय खांडवे

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

प्रवरेचा उगम - अमृतेश्वर मंदिर*

 *प्रवरेचा उगम - अमृतेश्वर मंदिर*




स्थान :

ता. अकोले, जि .अहिल्यादेवी नगर

संगमनेर - अकोले - भंडारदरा ,समृद्धी महामार्गावरून भारवीर इंटरचेंज जवळून उतरून जाता येते .





भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.


बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी,  अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग  काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.




*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*


*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*




शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो.  राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात. 


 नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर  यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.


  सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे.  भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे.  गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते.  सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.


यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका,  देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत.  मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच  20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो  की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.


जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा  असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.






संजय खांडवे


९०११९७११२२

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

 *स्वराज्याच्या शौर्याचे प्रतिक- रामशेज*

🔸🔸🔸🔸🔸🔸

स्थान : ता. दिंडोरी जि. नाशिक


उंचीः ३२७०फुट


नाशिक वरून १५ किमी.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

महाभूमित शेकडो वर्षानंतर हिंदवी स्वराज्याच्या रुपानं रयतेचं राज्य उभं राहिलं होतं . राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेनं अन अर्कज्ञ शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेचं एक महान ऐतिहासिक महापर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीमत्ता , शौर्य ,साहस, धाडस अन पराक्रमातून स्वांतत्र्य ,स्वाभिमान जागृत करत " हिंदवी स्वराज्या " च्या रुपाने उभं राहिले . सहयाद्रीने पदोपदी शिवरायांना अन त्यांच्या स्वाभिमानी मावळ्यांना स्वराज्यउभारणीत साथ दिली . या सह्याद्रीच्या कुशीत असलेला एक अन एक गड कोट स्वराज्याच्या रक्षणार्थ छातीठोकपणे येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यास तप्तर होता . सहयाद्री सोबत मराठ्यांच्या युक्ती-शक्ती पुढे मोगलशाही , आदिलशाही , इंग्रज - डच - पोर्तुगीजही हतबल झाले होते . अश्या अभेद्य अन अनेक वर्ष अजिक्य ठरलेल्या गडा पैकीच असलेला गड म्हणजे रामशेज आहे 

 नाशिक जवळ असलेला हा गड त्याच्या नावा वरुनच त्याचे पौराणिक व धार्मिक महत्व सांगून जातो . राम शेज या मध्ये शेज म्हणजे झोपण्याचे किंवा आराम करण्याची जागा असा अर्थ होतो . पौराणिक कथेनुसार प्रभु श्रीराम सितेच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करत असतांना या डोंगरावर थांबले होते . या ठिकाणी त्यांनी बंधु लक्ष्मणासह विश्रांती घेतली होती म्हणून या वास्तुला रामशेज असे नाव पडले असे सांगितले जाते . प्राचीन काळा पासून सपाट भूप्रदेशात असलेल्या या डोंगरावरील गड म्हणजे एक पहारेकरी म्हणूनच काम करत होता . मुघलांनी अनेक वेळा या गडावर आक्रमणे केली .प्रभु श्रीरामांनी जशी या गडावर विश्रांती केली तशीच जालना स्वारी नंतर काही काळ शिवरायांनी विश्रांती केलेला विश्रामगड हा देखील याच नाशिक परिसरात येतो हा एक योगा योगच म्हणावा लागेल .

             नाशिक पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले या रामशेज गडावर पोहचण्यासाठी मुख्य मार्गापासून आशेवाडी या गावातून रस्ता आहे . वाहने पार्क करण्यासाठी पायथ्याशी जागा आहे येथून पायी चढाई करत जावे लागते . अर्ध्या - पाऊन तासात आपण या वाटेने गडाच्या पठारावर पोहचतो . या वाटेने वर जात असतांना उजव्या बाजूस एक गुफा आहे यामधे आता शिवपिंड आहे .चोर वाटेचे एक छोटे छिद्र वरच्या भागात दिसून येते. डाव्या बाजूने खडकात कोरलेल्या वाटेने श्रीराम मंदिरा पर्यन्त जाता येते या मंदिरात प्रभू श्रीरामा सह लक्ष्मण व हनुमंताची मुर्ती आहे . येथून वर पठारावर पोहचतांना दोन बुरुजा मधील दरवाज्याचे अवशेष दिसतात . लांब निमुळता असलेला हा गड या ठिकाणी निमुळता आहे . समोरच एक छोटा दरवाजा आहे .समोर पठारावर अगदी टोकावर एक भगवा ध्वजस्तंभ लावलेला आहे . या परिसरात काही पाण्याचे टाकी व भग्न अवस्थेतील इमारतीचे अवशेष आहे . पुन्हा परत फिरत गडाच्या उंच भागाकडे जात असतांना ज्या ठिकाणापासून आपण वर आलो त्याच्या अगदी बाजूला काताळात कोरलेल्या मोठ्या पायऱ्या दिसतात अगदी बारवेत उतरण्या साठी जशी रचना असते तश्या पायऱ्या आपल्याला खाली दरवाज्या पर्यन्त घेवून जातात . काताळ पाषाणात कोरलेला हा दरवाजा आहे . दरवाज्यावर सुंदर नक्षीकाम दिसून येते थोडे समोर गेले की आणखी चोर दरवाज्या सारखी वाट खोल काताळात जाते व समोर मात्र मार्ग संपतो व खडकाच्या फटीतून फक्त हात जाईल अशी लांब चिऱ्या सारखी कोर आहे . यातून फक्त नजर बाहेर पडू शकते . येथून पुन्हा परत येतांना असे दिसते की बाहेरील बाजूस शत्रूस केवळ हा डोंगराचा कडा दिसतो पण यात दरवाजा लपलेला आहे .पठारावर येताच त्याच्या विरूध्द बाजूसही पुन्हा खोलगट भागात पाच - सहा पायऱ्या उतरून छोटासा दरवाजा आहे . हा पुन्हा दुसऱ्या बाजू करील शत्रूची टेहाळणी करतो ,येथूनही खाली उतरता येत नाही पण बाजूला खडकात कोरलेले खांब असलेले पाण्याचे टाके आहे .

                     गडाच्या उंच असलेल्या भागाकडे जात असतांना गोल चुन्याचा घाना दिसतो व समोरच रामशेज वरील सर्वात मोठा बांधीव तलाव दिसून येतो . बाजूलाच आनखी खडकात कोरलेल्या पाण्याचा टाकींचा समुह आहे . गडावर फेर फटका मारतांना अशी अनेक पाण्याची टाकी आहेत . पाण्याची चोख व्यवस्था स्थापत्य करतांना ठेवलेली दिसते आणि गडाच्या अजिक्य ठरण्यात हे महत्वाचं काम करते . समोरच गडावरील देवीचं मंदिर आहे . गणेशाची दगडी मुर्ती देखील या परिसरात स्थापित केलेली दिसते . छत्रपतींची मुर्ती देखील आता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे . जय जिजाऊ जय शिवराय ! हा पर्यटकांचा आवाज या ठिकाणी सतत दुमदुमत असतो . गडाच्या उंच शिखरावर काही उध्वस्त इमारती आहेत . डाव्या बाजूस खाली उतरत गेल्यावर एक दरवाजा आहे ."किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब(दोष)आहे,याकरिता गड पाहून एक-दोन-तीन दरवाजे तसेच चोरदिंड्य़ा करुन ठेवाव्यात" असे  आञापत्रात लिहले आहे. नेमके या चोर दरवाज्याला पाहून आज्ञा पत्रात सांगितलेले महत्व कळते .जवळ जाईपर्यन्त  तर दरवाजा आहे हे समजतही नाही गडा खाली उभे असलेल्यानां तर आजीबात लक्षात येत नाही .

           शहाजहानच्या आजारपणामुळे औरंगजेब दख्खनेच्या जहागिरीतून १६५६ ला परत फिरला होता . छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर १६८१ ला मराठा साम्राज्य संपविण्यासाठी दख्खनेकडे वळला . रामशेज घेण्यासाठी शहाबुददीन खान १०००० सैन्य घेऊन वेढा बसविला . मराठ्यांच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही . नंतर फतेह खान आला त्याला देखील अपयशच आले होते . कासम खान याने देखील रामशेज घेण्यासाठी प्रयन्त केले . पण मराठ्यांच्या केवळ ६०० मावळ्यापुढे हजारोच्या संख्येत आलेले मोगली सैन्य हतबतच ठरत होते . गड घेण्यासाठी अनेक प्रयत्न मोगलांनी केले तोफा डागल्या , गडा येवढी लाकडी मचाने उभारली या बाबत मुघलांच्या दरबारी असलेला भिमसेन सक्सेना या औरंगजेबाचा चरित्रकारने तारिखे-दिल्कुशा मधे या लढाईचे वर्णन केले आहे . हा गड जरी मराठ्यांच्या हातून गेला असला तरी साडे पाच वर्ष मोघलांना मोठा संघर्ष करावा लागला होता . मराठ्यांचा एक किल्ला जिंकण्यासाठी एवढा काळ लागतो तर पुढे इतर किल्ले घेण्यास किती काळ लागेल याच विवंचनेत मोगली सैन्य असावे .


संजय खांडवे

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...