ब्रम्हगिरीचा उपदुर्ग - दुर्गभंडार
(भाग - २ )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः ४२४८ फुट
नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
दुर्गवैभवाच्या दृष्टीने महाराष्ट्र संपन्न आहे . भारतातील एकूण किल्ल्या पैकी जवळपास १ /३ किल्ले केवळ महाराष्ट्रात आहेत . दुर्ग निर्माणाचा कालखंड हा हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे . महाराष्ट्रात असे अनेक किल्ले येतात की ज्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे . त्याच्या निर्माण शैली वरून त्याचा कालखंड लक्षात येतो . ब्रम्हगिरी देखील असाच एक पुराण काळापासून धार्मिक तथा ऐतिहासिक वारसा जपत रोपी लाव्हा खडकावर उभा असलेला एक अभेदय किल्ला आहे . नैसगिक हजारो फुट खोल कातळ कडेची तटबंदी व भव्यता हे ब्रम्हगिरीचं प्रमुख वैशिष्ट आहे . त्याचा एक उपदुर्ग असलेला अत्यंत अवघड व चित्तथरारक अनुभव देणारा दुर्गभंडार हा ब्रम्हगिरीच्या उत्तरेकडील टोकावर निमुळता होत जातांना दिसतो . राजगड आपण पाहिला तर त्याचा भव्यतेनुसार तो चार भागात विभागलेला दिसतो असाच ब्रम्हगिरी वरील दुर्गभंडार आहे . तो त्र्यंबकगडाचा उपदुर्ग आहे .
" ज्यांना दुर्गाचे सरक्षण आहे त्यांना उच्छेद होत नाही . असे दिसून येते कारण दुर्गाची प्राप्ती झाली आहे म्हणजे स्वतः च्या प्रदेशाचे सरक्षण व शत्रूचा प्रतिकार करता येतो जो राजा निर्सग निर्मित हल्ला करण्यास अवघड आणि कमी खर्चात बांधून होणारा दुर्ग बांधून घेतो तो इतरावर मात करतो " असे इ. पूर्व ४ थ्या शतकात कौटिल्य लिहतो . दुर्गभंडाराची रचना अत्यंत अवघड आहे . निर्सगदत्त अभेदयता त्यामधे आहे याची रचना कोणत्या राजाने केली हे निश्चित सांगता येणार नाही मात्र देवगिरीचे यादव , बहामणी , निजाम व मोगलासह स्वराज्यातही हा किल्ला होता व पुढे इंग्रजांच्या ताब्यात गेला .
पवित्र ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेऊन पाठीमागे दिसणारा ब्रम्हगिरी प्रत्येकास आर्कर्षित करतो त्यामुळे ब्रम्हगिरीवर नेहमी पर्यटकांची गर्दी असते . त्र्यबकेश्वर शहरातून जाणारा मार्ग पर्यटक वापरतात कारण हा पायरी मार्ग असल्याने चढाई करण्यास फारसा अवघड नाही .गडाच्या कातळास लागून अत्यंत गर्द झाडी आहे यामधून रस्ता काताळात कोरलेल्या पायऱ्या कडे जातो . वाटेत पर्यटकासाठी अनेक स्टॉल आहेत . उजव्या बाजूला एक दगडी इमारत लागते ही धर्मशाळा होती . यासारख्या जुन्या इमारती वाटेत लागतात .त्याच्या जवळच एक दगडी बारव आहे .विशेष म्हणजे या बारवेचे बांधकाम शैली खूप सुंदर असून तळापर्यन्त उतरण्यास पायऱ्या आहेत . पुढे प्रंचड मोठ्या एक संघ असलेल्या काळया खडकात कोरलेला पायरी मार्ग सुरु होतो . ८० ० पेक्षा अधिक असलेला हा मार्ग जीण्या प्रमाणे वळणे घेत वर घेऊन जातो . मधे लोखंडी रिलिंग असल्याने ये -जा करण्यासाठी स्वंतत्र एकरी मार्ग तयार केला आहे. वाटेत दोन दरवाजे लागतात . अखंड कोरीव असल्याने कुठेही बांधकाम नाही व आत दोन्ही बाजूने कोरलेल्या देवड्या आहेत . वाटेत काही गुफा लागतात वीर हनुमंताची सुंदर मुर्ती तथा ऋषी - मुनींचे शिल्प कोरलेले आढळतात . येथे महत्वाची काळजी घ्यावी लागते ती माकडापासून दूर राहण्याची त्यांना खाण्यास दिल्याने ते मागावरच असतात काही वेळा चावायला ही मागे पुढे बघत नाही .
हा मार्ग पार केल्यावर आपण थोड पठारावर येतो .गडाची ही कातळकडा इतर कडा पेक्षा कमी उंचीची आहे . येथून समोर अंजनेरी पर्वत दिसतो . थोड़ी चढाई केली की मोठ्या पठारावर येतो . एका बाजुला सुंदर त्र्यबकेश्वराच्या मंदिरासह शहराचे व दुसऱ्या बाजूला हर्षगड आपल्या नजरेस येतो . या पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते .पश्चीमेकडून पठारावरून खाली एक रस्ता गोदावरी नदीच्या उगमाकडे जातो . पृथ्वी , आप , तेज , वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत . यामधे जल हे सर्वोत्तम मानले जाते व यामधे गंगाजल हे श्रेष्ठ व पवित्र मानले जाते ही गंगा गौतम ऋषीने पृथ्वीलोकी आणली होती अशी मान्यता आहे . गोदावरी ही दक्षिण गंगा मानली जाते . उत्तरेकडे जाण्याऱ्या पाय वाटेने आपण जटा मंदिराकडे जातो . या मंदिरा जवळ पाण्याचे टाकी आहेत . दगडी मंदिरात शिवाच्या जटा खडकात दिसतात . भगवान शिवाने येथे जटा आदळल्याचे शिव पुराणात आहे . धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र जागा मानली जाते . या मंदिराच्या पाठीमागून एक पाऊलवाट १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर असलेल्या दुर्गभांडाराच्या पायऱ्या लागतात . या वांटेने जातांना दाट धुके असल्यास काळजी घ्यावी कारण डाव्या बाजूस हजारो फुट खोल दरी आहे . हवा सुद्धा प्रचंड वेगाने वाहते .दुर्गभांडाराचा खरा चित्तथरारक अनुभव या खोल चरी सारख्या कोरलेल्या पायऱ्या पासून सुरु होतो . या ठिकाणी देखील सरक्षक देवता वीर हनुमंताची मूर्ती काताळात कोरलेली आहे .दोन तीन फुट रुंद व जवळपास १०० फुट खोलात हा मार्ग पुढे वळण घेवून छोटया दरवाज्यातून नैर्सगिक दगडी पुलावर जातो . प्राचीन स्थापत्य शैलीचा हा अप्रतीम नमुना व त्यापेक्षाही निर्सगाच एक वेगळं रुप या जागेवरून बघायला मिळते . दोन्ही बाजूने हजारो फुट खोल दरी व अत्यंत अरुंद पायवाट हा थरार अनुभवतांना खूप काळजी घ्यावी लागते . दाट धुके व प्रचंड वेगाने वाहणारा वारा येथे सावध करतो . काही ठिकाणी तर अत्यंत अरुंद वाट आहे . हा निर्सगाचा दगडी पुल ओलांडून पुन्हा एक छोटा कोरलेता दरवाजा लागतो व पुन्हा तशीच घळीत कोरलेला पायरी मार्ग दुर्गभंडारावर घेऊन जातो . वरील पठार अगदी लहान आहे . पिण्यायोग्य पाण्याची दोन टाकी यावर आहेत . पाच-दहा मिनिटात यावर फिरुन होते . या ठिकाणावरुन निर्सगाच अप्रतीम सौदर्य अनुभवता येते सहयाद्री ची भव्यता येथे आल्यावरच कळते .थोडे पुढे गेल्यावर पुन्हा काताळातील पायऱ्या शेवटच्या टोकावर घेऊन जातात . खडकात कोरलेता एक छोटा बुरुज या ठिकाणी आहे . चिलखती बुरुजासारखा हा आहे . या बुरुजावरून अगदी ३६० अंशात सर्व भागावर अगदी दुर पर्यन्त शत्रूवर नजर ठेवता येते . जटा मंदिरापासून सुरु होणारा हा प्रवास या बुरुजावर संपतो या मार्गात झालेली छोटीशी चुक देखील आपलं अस्तीत्व क्षणात संपवू शकते .हुल्लडबाजी ,अतीसाहस व सेल्फी आदि गोष्टीवर संयम ठेवण्याची क्षमता अंगात असेल तरच या दुर्गभंडारा कडे यावे असे वाटते .
संजय खांडवे


























