*
गोदावरीचे उगमस्थान- ब्रम्हगिरी*
(भाग - १ )
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
स्थान : ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक
उंचीः ४२४८ फुट
नाशिक वरून ३६किमी., मुंबई- नाशिक महामार्गावरून घोटी मार्गे सुद्धा जाता येते .
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
त्र्यंबक डोंगर रांगेमधे ब्रम्हगिरी , अजनेरी , राजनगिरी ,गडगडा , बहुला व सर्वात उंच उतवड या सोबत असलेला बसगड म्हणजे भास्करगड हे महत्वाचा किल्ले येतात . त्र्यंबकेश्वराच्या पश्चिमेस दिसणारा महाकाय पर्वत म्हणजे ब्रम्हगिरी होय . याला त्र्यंबकगड असेही म्हणतात . उत्तरेस दिसणारा भंडारदुर्ग हा त्याचाच उपदुर्ग आहे . त्र्यंबकेश्वर हे ज्योर्तिलिंग असून या ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन होते . पुराणामध्ये विविध पौराणिक कथेत याचा उल्लेख येतो ब्रम्हगिरी पर्वताचेही दक्षिण गंगेच्या उगमासह पुरानकथेनुसार वेगळे महत्व आहे . येथून उगम होणारी दक्षिण गंगा गोदावरीचे सातवाहन काळातील " गाथा सप्तशती " मध्ये उल्लेख आढळतो .ब्रम्हगिरी पर्वताची खडतर २० कि.मी ची परिक्रमा शिवभक्त आजही मनोभावे करतात याला देखील धार्मिक महत्व आहे . तेथे दुर्ग वसविले गेल्याने ऐतिहासिक महत्व देखील तेवढेच आहे .
ब्रम्हगिरीवर पोहचण्यासाठी मुख्य दोन मार्ग वापरले जातात . त्यापैकी एक त्र्यंबकेश्वर शहरातून जाणारा पायरी मार्ग की ज्याचा वापर नियमित होतो व दुसरा मार्ग दक्षिणे कडून किल्ल्याला वळसा घालून हत्ती मेट कडून घळीतून असलेला हत्ती दरवाजा मार्ग होय हा मार्ग सहसा वापरात नाही .अत्यंत अवघड असा हा मार्ग आहे . या ठिकाणास हत्ती मेट असे नाव प्रचलीत आहे आणि मेट म्हणजे पूर्वीच्या काळची चौकी असायची . या मेटेच्या प्रमुखास मेटकरी म्हणत . खडकवासला (पुणे ) येथील प्रा नंदकिशोर मते यांनी सिंहगडावर PHD केली .त्यांनी सिहगडास सात मेंटे होती असे सांगितले त्यापैकी आमरीचे म्हणजे अमृतेश्वराचे मेट येथील खंडोजी नाईक कोळी या मेटकऱ्यास विश्वासात घेऊनच तानाजी मालुसरे लढले होते . त्याच तानाजी कड्याच्या खाली हे मेट येते . गडावर येण्यासाठी ज्या वाटा असायच्या तेथे हे मेट असत . गडाची चौकी पहारे म्हणजे आताच्या काळातील चेक पोष्ट सारखे ते काम करायचे .तसेच हे हत्ती मेट असावे . या परिसरात असे अनेक मेट आहेत .हिंदवी परिवामुळे मोहिमेतून या मार्गाने ब्रम्हगिरी अभ्यासता आला .
महाकाय हत्ती सारखा पुढे आलेला बेसाल्ट खडकाच्या कड्या खालून पाय वाटेने पुढे जात दाट झाली मध्ये मंदिराचा भगवा ध्वज नजरेस पडतो . जवळ गेल्यावर त्या ठिकाणी रेणुका मातेचे मंदिर दिसते .त्या परिसरात अनेक वीरगळ व सतीशिळांचा समूह आहे . तेथून वर चढणारी दाट झाडी मधून जाणारी पायवाट आहे ही पायवाट घळीकडे वळन घेत चढाई वाढवत जाते . महाकाय पर्वताची झिज होऊन मोठ मोठे दगड या घळीत पडलेले दिसतात . दरड कोसळत असल्याने ही या भागातील आताची मोठी समस्या बनली आहे . महत्वाच म्हणजे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरनेच हे उगमस्थान आहे.त्याच घळीतून हा प्रवास आहे .अर्ध्या तासाची चढाई झाल्यावर घळीत प्रचंड मोठे दगड कोसळलेले दिसतात . तुरळक हौसी व जानकार भ्रमंती करणारे अन जंगली प्राणी व लाल माकडं याशिवाय इकडे कुणी सहसा भटकत नाही . हत्ती दरवाजा पूर्णपणे दगड मातीत गाडला गेलेला असल्याने बाजुने पंधरा वीस फुटाची लोखंडी शिडीला धरून वर पोहचता येते. डाव्या बाजूला उंच कपारीवर चिलखती तटबंदी सारखा भाग आहे पुढं एक छोटी गुहा व छोटे शिवमंदीर आहे येथून या मार्गाने येणाऱ्या शत्रूवर सहज मारा करता येतो . त्यासाठी सैनिकाच्या निवाऱ्या साठी येथील छोट्या गुहेची रचना आहे . येथे जातांना काळजी घ्यावी लागते कारण खाली खोल दरीचा भाग आहे . परत येऊन चढाई करण्यासाठी लवकर मार्गच सापडत नाही . मोठे मोठे दगड असल्याने रस्ता सुचत नाही . हिंदवी परिवाराच्या पायलट ट्रेकीग मुळे मात्र अशी साहसी मोहिम सहज शक्य होण्यास मदत होते .
या भूलभुलैय्याच्या मार्गात थोड वर आले की या काळया दगडात कोरलेला दरवाजा नजरेस येतो विशेष म्हणजे कोणतेही बांधकाम न करता हा अखंड एकाच दगडात आहे .यात भले मोठे दगड फसलेले आहेत व अर्धा दरवाजा गाळात गाडला गेला आहे . या तासीव व कमानीच्या दरवाज्यावर सुंदर नक्षी काम आहे दोन्ही बाजूने दोन सिंहाची शिल्पे मध्यभागी लटकलेली घंटा कोरलेली असून त्या खाली गणेश शिल्प आहे . याच नळीच्या मार्गात भितीवर वीर हनुमानाची मोठी मूर्ती कोरलेली आहे .ही मुर्ती देखील अर्धी गाळात आहे . हा किल्ल्याचा भाग अत्यंत दुर्लक्षीत असून संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे . या दरवाज्याचं मुख वळण घेतल्यानं पूर्व दिशेस येते व समोर पुन्हा प्रचंड मोठे ब्रम्हगिरीचे नजर न पोहचणारे शिखर दिसते . या समोरील बाजूस पुन्हा चिलखती व प्रचंड मजबूत तटबंदी आहे ज्या ठिकाणी कुणी सहसा जात नाही तसा जाणारा मार्गही सापडत नाही .हत्ती दरवाज्यातून या दुसऱ्या दरवाज्या पर्यन्त शत्रू प्रचंड संघर्ष करून पोहचलाच तर तो वरील तटबंदीवरील सैन्याच्या टप्प्यात येतो अन इथेच थांबतो .अशी ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून असलेली ही प्राचीन गड स्थापत्य शैली या नाशिक परिसरातील किल्ल्यावर विशेष आढळते .
दरवाज्यातून जाण्यास मार्ग नसल्याने या दरवाज्याच्या वरील कपारीने पायवाट आहे . ही पायवाट उंच गवतातून व दाट झाडीमधून गोदावरी नदीच्या उगम स्थानाकडे जाते . ब्रम्हगिरीचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे या गडास जवळ पास सर्वच बाजूस नैर्सगीक कातरकडा आहे आणि हा शेकडो फुट प्रचंड खोल असून खाली दाट जंगल आहे . या बाजूची पायवाट काही ठिकाणी अगदी कड्याच्या अगदी जवळून जाते मधे काही झुडपे व झाडांची जाळी असल्याने धोका कमी होतो . वाटेत दोन ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहे . वरील महाकाय पर्वतामधील पाणी खाली झिरपत असल्याने हे जीवंत वाहते पाणी पिण्यायोग्य असते . या पाण्याची चव अत्यंत गोड वाटते . येवढी चढाई केल्यावर आम्ही आमच्या सोबत असलेले पाणी झाडांना टाकून निर्सगाने गार व चवीला गोड बनविलेल्या पाण्याने बाटल्या भरून घेतल्या व पुढे निघालो .
ब्रम्हगिरीच्या कडयावरून पाऊल वाटेने जातांना उजव्या बाजूस ब्रम्हगिरीचे भव्य डोंगर दिसतो . पुढे आल्यावर श्रीचक्रधर स्वामी मंदिर व त्याच्या समोर दक्षिण गंगा गोदावरीचे उगमस्थान आहे . दगडी मंडपात एका लहान कुंडातून हा उगम होतो . पुढे गेल्यावर एक दगडी कमान असलेले दगडी बांधकामातील बारव आहे . त्याच्या समोरच ब्रम्हगिरी मंदिर आहे त्यामध्ये एक लहान कुंड असून गोमुखातून पाणी त्या कुंडात पडते व या गोमुखाच्या वर गंगा गोदावरी मुर्ती आहे . मंदिराच्या पाठीमागे प्रचंड खोल कातळकडा आहे येथून हरीहर व भास्करगड दिसतो .
देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात हा गड होता . त्र्यंबकेश्वरमुळे १२ व्या शतकात या भागास धार्मिक महत्वही तेवढेच होते . पुढे बहामनी व नंतर निजामशाही मधे असतांना १६३६ च्या काळात शहाजी राजे यांनी याच भागातून राज्य कारभाराचा स्वंतंत्र अंमल करून या महाभूमिस स्वातंत्र्याचे वेड लावले होते .
संजय खांडवे






































