बुधवार, २५ ऑक्टोबर, २०२३

विजयादशमी :एक प्राचीन परंपरा* 〰️〰️〰️〰️〰️

 *विजयादशमी :एक प्राचीन परंपरा*

〰️〰️〰️〰️〰️


धन्य आजि दिन ।

जाले संतांचे दर्शन।।

 जाली पापातापा तुटी।

 दैन्य गेले उठाउठी।।

 जाले समाधान।

 पायी विसावले मन।।

 तुका म्हणे आले घरा। तो चि दिवाळी दसरा।।



 संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात दिवाळी, दसरा या दोन्ही सणाचा उल्लेख येतो .यामध्ये जगद्गुरु म्हणतात संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्यतेचा असतो. सगळी पाप- ताप  नाहीसे होत असतात आणि आपल्या जीवनातील दिनवाण्या  गोष्टी  दूर होतात आणि या संतांच्या पायी मन विसावलं की त्यामुळे आपल्याला समाधान प्राप्त होतं. जीव सुखावतो . त्यांचं घरी येणं म्हणजे तोच आपला दिवाळी आणि दसरा आहे. प्राचीन काळापासून दिवाळी आणि दसरा हे सर्वात मोठे सण मानले जात होते. संतांचे घरी येणे याचा संमंध जगद्गुरुंनी दिवाळी आणि दसरा या सणाची जोडला आहे. यावरून आपल्याला प्राचीन काळातील चालत आलेल्या या सणांचे महत्त्व समजते. मुळात भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सव हे कृषी परंपरेशी निगडित आहेत जवळपास सर्वच सण हे कृषीशी नाळ जोडलेले आपल्याला दिसतात. सण आणि उत्सव हा समृद्धीच्या आणि भरभराटीच्या काळातील एक कौटुंबिक व समाज जीवनाशी समरस असलेला भाग आहे. अश्विन प्रतिपदे पासून सुरू होणारा नवरात्र उत्सव म्हणजे शक्ती पूजेचा कालखंड मानला जातो. शरद ऋतूमध्ये येणारा हा शक्ती पूजेचा उत्सव म्हणजे या काळात सृष्टी अत्यंत प्रसन्न झालेली असते. वर्षाकाळ संपून गेलेला असतो शेतकऱ्याच्या शेतात समृद्धी आणि संपन्नता ही ओतप्रत भरलेली असते सर्व बाजूने आनंदच आनंद असतो हा सर्वकाळ सुखाचा असतो. शेतीचा शोध स्त्रीने लावला. तिने तिच्या निरीक्षणातून हे संशोधन घडवून आणले. नवरात्रात नऊ दिवस मातीमध्ये नऊ प्रकारचे धान पेरून एक प्रकारे त्या धानाची उगवण क्षमता तपासली जाते की काय असेच वाटते.  स्त्री व माता म्हणजे भूमाता या सृजनतेच्या प्रतीक मानल्या गेल्या. नवनिर्मितीचा हा काळ मातृ शक्तीशी जोडणे सहाजिकच आहे. कोल्हापूरची अंबाआई, तुळजापूरची भवानी आई, पुण्याची जोगेश्वरी, आंबेजोगाईची जोगाई, माहूर, वणी ही जशी आपली शक्तीपीठे आहेत तशीच प्रत्येक गावागावात जाखाई,भोनाई, जोखाई, डोंगराई, मसाई, वांजाई, सोजाई, खामजाई, रेणुकाई, काली, मातृका, यल्लमा, मरीआई ,मरदडी, तेलाई, पोलरमा, शिवाई ,तुकाई,आजुबाई अशी प्रत्येक गावोगावी देवीची दैवत आपण अनादी अनंत कालापासून पूजत आलो. या दैवतांच्या सानिध्यात राहून आपण आपले कौटुंबिक संस्कार जसे लग्न ,मुंज ,जावळे ओटी भरणे, जोगवा मागणे जणूकाही त्यांच्या उपस्थितीतच करत आहोत असे जाणवते. त्या गावची लेक बाळ एकदा का होईना बाळ जन्मल्यानंतर त्याचं मस्तक  आईच्या पुढे टेकून आणते . आईचं ओटी भरणे आणि दहीभाताच बोनं देणे ही ती माऊली कधीही विसरत नाही. या परंपरा आपल्याला हेच दर्शवितात म्हणून नवरात्र हा शक्तीच्या कृतज्ञतेचा उत्सव मानला जातो.

        आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा या नवरात्रातील दहाव्या दिवशी येणारा महत्त्वाचा सण मानला जातो.

" दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा."

       बालपण चा प्रसंग आठवतो एकत्रित कुटुंब पद्धतीत आम्ही त्या काळात दसरा साजरा करण्यासाठी आमच्या आई-वडिलांसोबत आम्हीही गावाकडे सर्व एकत्रित यायचो. सर्वांनी नवीन कपडे घेतल्याचं कुतूहलही असायचं. त्यावेळेस  अगदी दुपारपासूनच घरच्या बैलगाड्या सजवण्याची लगबग सुरू होत असे. लाकडी बैलगाड्यांना गेरूच्या रंगाने रंगवून त्यावर चुन्याचे ठिपके मारून बैल जोडी अगदी पोळ्या मधल्या बैलांसारखी सजवून आम्हाला कामावरचा गडी त्या बैलगाडीत बसून शेताकडे शिलंगण खेळण्यासाठी घेऊन जायचा.गावातील पाच पन्नास गाड्या त्या वाटेने धुराळा उडवत धावत जायच्या आणि आपल्या शेतात असलेल्या आपट्याच्या झाडाची पानं तोडून सोनं म्हणून आम्ही ती लुटायचं याशिवाय शेतात असलेल्या ज्वारीची पानं आणि कंणस सोनं म्हणून घरी घेऊन यायचो. घरी आल्याबरोबर ती आपल्या दैवतापुढे ठेवून घरी ओवाळणी केली जायची व सर्वप्रथम मारुतीला हे सोन अर्पण करून सायंकाळी घरातील व शेतीच्या उपयोगी असणाऱ्या शस्त्रांचे पूजन करायचे. संपूर्ण गावभर आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांच्या आशीर्वाद साठी आम्ही फिरायचो असा हा आम्ही अनुभवलेला दसरा सण अजूनही स्मरणातून जात नाही.

       विजयादशमी या सणाला काही पौराणिक सांस्कृतिक व ऐतिहासिक सुद्धा महत्त्व आहे. विजयादशमी ही साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जातो . धार्मिक मान्यतेनुसार अश्विन शुद्ध दशमीला याच दिवशी रामाने रावणाला हरवून विजय प्राप्त केला होता. महाभारतात पांडवांनी याच दिवशी आपला अज्ञातवास संपल्या नंतर शमीच्या झाडाच्या डोलीत ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून ती सर्व शस्त्रे स्वच्छ करून  पूजनानंतर धारण केली होती. म्हणून शमीच्या झाडांची म्हणजेच आपट्याच्या झाडांची पाने याला विजयादशमीच्या सणामध्ये विशेष महत्त्व आहे. दशमीचे दिवशी पुरुषांनी ईशान्य दिशेला जाऊन शमीच्या वृक्षाखाली अपराजिता देवीची यथाचीत पूजन करावे म्हणजे  अपराजिता आपल्याला विजयाचा आशीर्वाद देते. अशी ही एक परंपरा काही ठिकाणी बघायला मिळते की त्या शमीच्या वृक्षाची पूजन केल्यानंतर वृक्षाच्या मुळाशी असलेली ओलसर माती पूजेच्या अक्षतासह घ्यावी  व ती वाजत- गाजत घरी आणावी. असेही शमी पूजन काही ठिकाणी केले जाते. विजयादशमीला शस्त्र पूजनाला विशेष असे महत्त्व असते.आपापल्या व्यवसायाशी निगडित असलेली साहित्याची पूजन त्या काळामध्ये केले जाते. पावसाळा संपला की शरद ऋतुला प्रारंभ होत असतो म्हणून  लढवय्यांच्या अंगी  उत्साह संचारत असे. लढाईसाठी लागणारी शस्त्रे पावसाळ्याच्या काळामध्ये वापरात येत नसत म्हणून ती आता बाहेर काढून सीमाल्लोघन करण्यासाठी स्वच्छ करून सज्ज ठेवत असत.

        आपल्या भारतात हिमालयापासून अगदी कन्याकुमारीपर्यंत विजयादशमी साजरा होत आलेली आहे. एवढेच नव्हे तर नेपाळमध्येही नवरात्र व दसरा साजरा केला जातो .तामिळनाडूमध्ये नवरात्र सण हा मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. म्हैसूर मधील दसरा हा जगप्रसिद्ध आहे. चामुंडा देवीने महिषासुराचा वध केला अशी दंतकथा या म्हैसूरच्या बाबतीत सांगितली जाते. म्हैसूर राज्याची कुलदेवता असलेली चामुंडेश्वरी ही म्हैसूर मधील चामुंडी डोंगरावर वसलेली आहे. त्या ठिकाणी तिचे भव्य मंदिर आहे.  शहराच्या नावाची रूपे अशाच पद्धतीने बदलत गेली महेश मंडळ मग महेश पूर आणि आताचे म्हैसूर असे महिषासुरमर्दिनीचे निवासस्थान म्हणून म्हैसूर शहराला मानले जाते. बेळगाव मध्ये ही दसरा साजरा करण्याची जुनी परंपरा आहे. राजस्थान हा शक्ती व शौर्याचा उपासक असलेला प्रदेश आहे. राजस्थानमध्ये ही नवरात्राला विशेष असे महत्त्व आहे येथे 'खडग' स्थापनेची परंपरा आहे. नऊ दिवस या खडगापुढे  दीप स्थापना करून ती परंपरा जपली जाते. हा नंदादीप अखंड नवरात्रीमध्ये तेवत ठेवला जातो .या काळात व्रत व खानपनाची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी आहे. उत्तर भारतात विजया दशमी व नवरात्र या काळात रामलीलाचे आयोजन केले जाते. मध्य प्रदेशांमध्ये 'नौरता' म्हणजेच नवरात्र 'गरभा' या भावना आविष्कारातून  हा विजयादशमी पर्यंत साजरा करण्याची परंपरा आहे . गुजरात मध्ये विशेष करून विविध प्रकारचा गरभा या काळामध्ये खेळला जातो .आंध्र प्रदेश मध्ये जवळपास महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दसरा साजरा केला जातो तीच परंपरा आपल्याला दिसते. बुंदेलखंडामध्ये याला 'सुअरा' असे म्हणतात. हिमाचल प्रदेशातील 'कल्लूचा' दसरा आहे. मनाली येथे विजयादशमीचे कार्य 'हिडंबा' देवी शिवाय पूर्ण होत नाही अशी परंपरा आहे. याच हिडिंबा देवीचा भाद्रपद शुद्ध द्वितीया मासारंभामध्ये मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पारध या गावी मोठा उत्सव होत असतो.

      तुळजापूरची तुळजाभवानी आई व कोल्हापूरची अंबाई मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून तर दशमी पर्यंत मोठ्या प्रमाणात विविध परंपरेंची रेलचेल असते नवरात्रात गोमुखाजवळ पाच घट आणले जातात . एक सभा मंडपाच्या ईशान्येला दुसरा देवी समोरील शिव मंदिराजवळ तिसरा तिसरा  त्रिशूलाचा ओवरीत आणि इतर टोळ भैरव मंदिर आणि मातंगी मंदिर याजवळ हे घट बसविले जातात. ही तुळजाभवानी मंदिराची परंपरा आहे असेच घट हे अंबाबाईच्या मंदिरातही बसवले जातात यामध्ये सोने-चांदी, रत्न अगदी सात नद्यांचे पाणी आधी टाकले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या राज्याभिषेकप्रसंगी  अशाच प्रकारच्या घटांची रचना सिंहासनाजवळ केली होती. त्यामध्ये दूध, मध माणिक, मोती आदींची रेलचेल करून त्या घटाच्या काठावरती रेशमी सुशोभन केले होते. थोडक्यात घट रचनेला आपल्या भारतीय परंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आदि मायेची रुपे असलेली ह्या देवींना चंडी ,दुर्गा ,काली, अन्नपूर्णा, आधी रूपांमध्ये नवरात्रात पुजले जाते आणि मग दशमीला म्हणजेच विजयादशमीला याचा समारोप होतो. शौर्य आणि मातृशक्तीला कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्याला असत्याकडून -सत्याकडे, तमाकडून- तेजाकडे, अमंगला कडून- मंगलाकडे अस्थिरते कडून  स्थिरतेकडे घेऊन जाण्याचे काम करतो. प्रत्येक जण आंतरिक तळमळीतून हा विजयादशमीचा सोहळा आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर साजरा करताना दिसतो. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपण  येणाऱ्या काळात अज्ञान, अंधश्रद्धा ,अनारोग्य, भ्रष्टाचार ,अन्याय, अत्याचार यावर विजय मिळवू या. मानवतेचे, एकात्मतेचे, बंधूभावाचे, समानतेचे सोने जनमानसात वाटू या. हीच आपली खरी विजयादशमी.


संजय खांडवे

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

साकेगाव चा साकेश्वर

 *साकेगावचा साकेश्वर खुणवतोय!*




वेदकाळात उपासना व पूजन हा भक्तीमार्ग यज्ञ याग विधि च्या माध्यमातून होत असे , वेद आणि ब्राम्हण ग्रंथामधे विविध यज्ञीय क्रियांचा उल्लेख मिळतो .वेदकाळानंतर प्रचलित  यज्ञरूपी भक्तीमार्ग देवप्रतिकांची उपासना करण्यात परावर्तीत होत गेल्याचे दिसते .देवतांच्या पाषाण अथवा धातुच्या साकार झालेल्या मूर्ती पूजा प्रचलित झाली .या देवप्रतिमासोबत देवालय निर्माणचा उल्लेख अर्थर्ववेदात येतो .मूर्तिपूजनाचे प्रमाणरुप सिंधू संस्कृतीच्या काळातही दिसते .माता,पशूपतीनाथ,योनी,वृक्ष,शिवलिंग यांना पवित्र मानले जायचे .वेदातही शिवाला पशूपतीनाथ हा उल्लेख वारंवार येतो .

 भारताच्या पूर्व भागात शिव -रूद्र उपासनेचे विशेष महत्व आहे .तेवढेच महत्व आपल्या महाराष्ट्रातही दिसते . अगदी गुप्त काळापासून शिल्पकौशल्यावर आधारीत अनेक सुंदर शिव मंदीराचे निर्माण झाले .मराठवाडा तसेच विदर्भातही असे अनेक मंदिरे आहे .विदर्भातील मार्केण्डय मंदिर वगळता सर्व मंदिरे काळ्या दगडात बांधलेली आढळतात .त्यापैकीच एक साकेगावचे साकेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आजही दिमाखदारपणे उभे आहे .चिखली वरून धाड कडे जातांना सहा -सात किलोमिटर अंतरावर, बुलढाणा शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर  एका डोंगराच्या पराड्यात मुख्य रस्त्यावरूनच या मंदिराचे मोहक रूपाचे दर्शन घडते .बुलढाणा जिल्यात लोणार, धोत्रानंदई,मढ,सातगाव(विष्णु मंदिर)कोथळी येथे  या प्रकारची मंदिरे आहेत . मंदिराला प्राचीन काळी संपुर्ण तटबंदी असल्याचे दिसते .तटबंदीला एक प्रवेशद्वार आहे . दगडी शिळा पासून तयार केलेलं सुंदर असं गोपूर आपल्याला दिसते. या गोपुराच्या उंबरठ्यावर आपल्याला दोन कीर्ती मुखे कोरलेली दिसतात. या कीर्तीमुखां बाबत पुराण कथेमध्ये असे सांगितले जाते की, येणाऱ्या भाविकांचे पाप खाण्यासाठी याची रचना शिवाने मंदिरावर केली आहे .हे कीर्तीमुख म्हणजे राक्षस आणि त्या राक्षसाची भूक एवढी होती की त्याने त्याचं संपूर्ण शरीर खाऊन घेतल्यावरही ती भागली नाही म्हणून शिवाने त्याला वरदान दिले आपल्या मंदिरावर त्याला जागा देऊन त्या ठिकाणी भक्तीसाठी येणाऱ्या भाविकांचे पापे खाण्याचे काम त्याच्याकडे दिलं अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून मंदिरावर याचे निर्माण केल्या जाऊ लागलं. मंदिराला नंदीमंडप ,गूढमंडप व गाभारा असे भाग आहेत .

नंदीमंडपात तीन नंदीशिल्प आहेत . मंदिरात आत प्रवेश करताना दगडी द्वाराच्या वर गणेश शिल्प कोरलेले आहे संपूर्ण द्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. आत प्रवेश करताच आपल्याला मंदिरातील कला शिल्पांचा अप्रतिम भाग नजरेच्या समोर येतो. आजही तो शाबूत आहे. सभामंडपाचे छत चार मुख्य खांबावर आधारलेले आहे.अंतराळातील दोन स्तभावर एक स्त्री चर्तुभूज असून चर्तुभूज गणेश विराजमान आहेत . सभा मंडपाचे खांब भार वाहक यक्षाने तोलून धरलेले आहे. मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अन्वा येथील शिव मंदिरात ज्याप्रमाणे गणपती हा भार वाहकाचे काम करतो तसेच या मंदिरातही भारवाहक गणेशाचे सुंदर शिल्प आपल्याला बघायला मिळते. याशिवाय खांबाच्या अगदी तळाशी देखील गणेशाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. छतावर सुंदर नक्षीकाम केलेले असून दगडी गोल झुंबर वर कोरलेले आहे सभामंडपापेक्षा चार फुट खोल गाभारा आहे. गाभाऱ्यात उतरण्या अगोदर डाव्या आणि उजव्या बाजूला देव कोष्टकामध्ये गणेश व कुबेराची मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या दारावर प्रतिहारी,मागल्यविहग,घटपल्लव आहेत . गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर अगदी मधोमध गणेशाची मूर्तीही आपल्याला दिसते. पाप खाणारी कीर्तीमुखे सुद्धा याद्वारावर आहेत. याचा अर्थ गाभाऱ्यापर्यंत पोहोचताना ही कीर्तीमुखे माणसाला त्याची पापे खाऊन पुण्यवान बनवून शिवलिंगापर्यंत पोहोचविण्याची रचना प्राचीन मान्यतेनुसार असावी. गाभाऱ्यात पूर्ण चंद्राकार शिवलिंग प्रतिष्टापित केलेले आहे. मंदिराचा अंतर्भाग जेवढा मनमोहक आहे तेवढाच तो बाह्य भागही आपल्याला आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही.  मंदिराची मुख्य गाभार्‍यावरील कळसाची रचना ही हुबेहूब अमृतेश्वराच्या मंदिरासारखीच भासते. नागरशैलीतील ही रचना असलेलं  शिखरी शिखर प्रकारातील आहे .त्यावर विविध लता आमल काच्या खालील भागात कोरलेल्या आहेत. शिखरावर आधारभूत अशी छोटी छोटी शिखरे आपल्याला भासतात. कळसावरील सुंदर नक्षीकाम आजही मनमोहक आहे .त्याकाळातील प्रगत शिल्पकलेची साक्ष देत ते आजही उभे आहे . मंदिराच्या वरील भागात ब्रम्हा,शिव पार्वती ,महिषासूरमर्दिनीचे शिल्प आहेत.एका भागात कुस्तीचा प्रसंग आहे .गाभाऱ्याच्या बाह्य भागावर पाठीमागील शिवाची तांडवमुद्रेतील शिल्प आहेत . देव कोष्टात तयार केलेल्या मूर्ती शिल्पाचा दगड हा मंदिरात वापरलेल्या दगडापेक्षा थोडा वेगळा वाटतो. आपण प्राचीन मंदिरांना भेट देतो .त्या मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतो मंदिर निर्माण हे केवळ एवढ्या गोष्टीसाठी नसून यामागे एक गुढ असा अर्थ दडलेला असतो. थोडक्यात मंदिरावर निर्माण केल्या गेलेल्या प्रत्येक शिल्पाचा  अर्थ असतो. मंदिरावर घडविण्यात आलेल्या छोट्याशा कलाकृतीतही फार मोठा अर्थ दडलेला असतो यासाठी त्याचा अर्थ बोधन होणं आवश्यक आहे आणि हे अर्थबोधन अभ्यासातूनच साध्य करता येते. प्राचीन मंदिरे व मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बा. देगलूरकर यांच्या अभ्यासातून त्यांनी हे सिद्ध केलंय . ते म्हणतात

आपण वेरूळच्या कैलास लेणीत गेल्यास एक शिल्प अवश्य बघावं. आपण कोणत्याही प्राचीन मंदिरात मूर्ती पाहिल्यावर ती आपल्याला अर्धीच कळत असते मूर्तीच्या संपूर्ण अंतरंगात गेलो तर मूर्तीचा उलगडा होत असतो. यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सामाजिक बाबी असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला मूर्तीचे स्वरूप कळते.  पार्वती साधना करतांनाचे  शिल्प आहे मग ती ही साधना किंवा तपश्चर्या कशासाठी करत आहे यासाठी आपल्याला पुराणाच्या गोष्टीकडे वळावे लागते. मग लक्षात येते की शिवासाठी ती या ठिकाणी तप करत आहे. हे या मूर्तीवरून या ठिकाणी कळते इथपर्यंत ठीक आहे पण ही पार्वती कोण आहे? पती, पशु,पाश या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी  यामध्ये  दिसतात .पती हा शिव आहे. पाश म्हणजे हे सर्व प्राणी आहेत पार्वती हा जीव आहे आणि तो पती करता या ठिकाणी तपश्चर्या करतो आहे. म्हणजे जीव हा शिवा करिता तपश्चर्या करत आहे. हे या मूर्तीतून कळते हे या मूर्तीचा अर्थ बोधन आहे. "कल्याण सुंदर मूर्ती "शिवपार्वतीचा विवाह दाखवणारी मूर्ती ही पुढची मूर्ती या लेण्यांमध्ये आपल्याला दिसते. पार्वती शिवाचा हात हातात घेतलेला आहे, वास्तविक पाहता शिवाने पार्वतीचा हात हातात घेणे अपेक्षित आहे पार्वती शिवाकरिता तप करते मग तिला शिवाची प्राप्ती झाली. याच्यापुढे बघितल्यास आपल्याला अर्धनारी श्वराची मूर्ती दिसते. तप, प्राप्ती ,विवाह या तीन अवस्था या शिल्पामधून आपल्याला दिसल्या. म्हणजे "जीवाला शिवाची" प्राप्ती झाली आणि त्यासाठी पार्वतीने तपश्चर्या केली आणि त्याचे पुढचे शिल्प जे आहे ते  अर्धनारीश्वराचं म्हणजे

  "जीव ब्रह्मा एवं ना पर: " 

या तीनही मूर्तीचा बोध अशा प्रकारे आपल्याला घ्यावा लागतो या मूर्ती स्वतंत्रपणे घेतल्या तर त्याचा वेगळा अर्थ निघतो फक्त अर्धनारीश्वराची मूर्ती म्हणजे " प्रकृती आणि पुरुष" यांचे एकत्रीकरण हे सांख्यदर्शन यामध्ये आपल्याला दिसते.

   इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे पार्वती ही पर्वत कन्या ती निश्चयी तसेच कठोर हृदय असते. तिचा निश्चय हा तिच्या श्रद्धेचा मापदंड आहे. तिला शिव हवा आहे. तिला त्याने आपले डोळे उघडायला हवे आहेत त्यांनी तिला प्रेमालिंगन द्यावे आणि विश्वाची मैत्री करावी असे तिला वाटते. इतर तपस्येपेक्षा पार्वतीची तपस्या वेगळी आहे अनेक असुर, देव व मार्कंडे यासारखे ऋषी तपचर्या करतात आणि ईश्वराला प्रसन्न करतात ते त्यांच्या स्वतःसाठी लाभदायक ठरतील असे वर मागतात परंतु पार्वती इतरांचे कल्याण होईल असा वर शिवाकडे मागते. तिला शिव हवा आहे तो केवळ तिच्या वैयक्तिक सुखासाठी नसून साऱ्या विश्वाला लाभदायक ठरावा म्हणून हवा आहे तिच्या साधने पासून शिवची दर्याद्र बुद्धी आणि त्याच्या मनातील कणव जागृत व्हावी म्हणून ती निकराचे प्रयत्न करते. शिव नसेल तर सारे जिवंत प्राणिमात्र निसर्गाशीच जखडले जातात ,पण तो त्यांना त्यातून मुक्त करू शकेल गुरुत्वाकर्षणामुळे ते अडकलेले आहेत तो त्यांना त्यांच्या कृपादृष्टीने त्यातून सोडवू शकेल. 

           याशिवाय त्यांनी शिवाच्या चतुष्पाद सदाशिव या शिवाच्या चार पाय असलेल्या मूर्ती बाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे ही मूर्ती गडचिरोली येथील मार्कंडेश्वराच्या मंदिरात आढळते बहुदा चार पाय असलेली शिव शंकराची मूर्ती नसते .मूर्ती आपण बघितल्यास दोन पाय खाली सोडलेले असून दोन पायांनी मांडी घातलेली आहे. डॉ. देगलूरकरांनी हे चार पाय आपल्याला शैव सिद्धांताकडे नेतात असे म्हटले आहे कारण शैव सिद्धांत चार प्रमेयावर  उभा आहे. ही चार प्रमेय म्हणजे चर्यापाद, क्रियापाद, ज्ञानपाद, व योगपाद होय. या सिद्धांतानुसार त्याचा अर्थ लावावा लागतों. सदाशिव स्वरूपातील या मुर्त्या खजुराहो येथे दोन आहेत आणि मार्कंडेश्वर येथे एक आहे असे सांगितले जाते. इतर अभ्यासकांनीही या मूर्तीचा अर्थ लावलेला दिसतो या स्वरूपातील शिव चतुष्पाद असणे म्हणजे शिवाचे अस्तित्व आणि प्रभाव सत्य, द्वापर, त्रेता आणि कली या चारही युगात आहे. त्यांचा प्रत्येक पाय एकेका युगाशी संबंधित आहे. अभ्यासकांच्या नजरेतून अशा पद्धतीने या दोन शिल्पांचा अर्थ आपण पाहिला अशी अनेक शिल्पे मंदिरावर असतात या प्रत्येकाचा काही ना काही अर्थ असतो आज साकेश्वराच्या मंदिरावर अशी अनेक शिल्पे आहेत की, जी अभ्यासाच्या प्रतीक्षेत आहेत.बाहेर अस्ताव्यस्त शिळाही आहेत की ज्या आजही संशोधनाच्या प्रतिक्षेत आहेत.मंदिराच्या वरच्या भागात सिता नान्ही म्हणून एक छोटी बारवही आहे .या बारवेत जीवंत पाणी आढळते .या प्राचीन पाणवठयाला मात्र आता आधुनिक मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोत  अडथळा ठरत आहेत .

एक वेळ अवश्य या प्राचीन वास्तुस अवश्य भेट देऊन याचे जतन होण्यासंदर्भात आपले योगदान असू दया ! साकेश्वर आपल्याला खुणवतोय!

                 


संजय खांडवे

बुलढाणा

९०११९७११२२

➖➖➖

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

 मूर्तिशास्त्राची प्रयोगशाळा , अन्वा येथील शिवमंदिर

➖➖➖➖➖➖➖

सर्व देवामधे श्रेष्ठ......

 मस्तकी चंद्र धारण केलेला......

सर्व लोकांचा एकच अधिपती......... मानवी मनातील भयगंड मोडून काढणारा....

देव,दानव व सिद्धी ज्यांच्या सदैव सेवेत असतात .....

असे देवादिदेव महादेव म्हणजेच 'शिव '

  महाराष्ट्रात शिवाची अत्यंत प्राचीन मंदीरे आहेत .असेच एक अकराव्या शतकात बांधले गेलेले प्राचीन शिव मंदीर ,शिल्पकलेचा अप्रतिम  अविष्कार, नव्हे तर मूर्ती शास्त्र अभ्यासकांसाठी ही एक अभ्यास शाळाच म्हणता येईल.हे मंदीर बुलढाणा शहरापासून धाड -पारध -पिंपळगाव या मार्गावर केवळ ६० किमी अंतरावर आहे . छत्रपती संभाजीनगर वरूनही याचं अंतर केवळ शंभर किलोमीटर आहे. जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यात हे गाव येते .मुख्य रस्तासोडून जिल्हा परिषद शाळेच्या समोरुन गेल्यावर जवळच मंदीर दिसते .सिमेंट मातीच्या जंगलात ही वास्तु दिसताच क्षणी मनाचा सारा क्षीण घालविते .लाखातून एखादाच असेल की जो या मंदीराला पाहताच क्षणी तोंडातून त्याबद्दल उदगार निघत नसतील .

     मूर्तिशिल्प व वास्तुशिल्पाचे अप्रतिम दर्शन येथे घडते .मूर्तिचे घडणीवरुन प्रमुख चार प्रकार पडतात त्यापैकी चौथा प्रकार 'शस्त्रोंत्कीर्णा 'हा येतो .या प्रकारात आनखी सात उपप्रकार पडतात त्यापैकी 'शैलजा' 'हा प्रकार म्हणजे पाषाणात अतिक्षय प्रमाणबद्ध कोरीव काम करुन केलेली मूर्ति होय .या प्रकारातील मूर्तीचे दर्शन घडते . या मंदिराचे निर्माण होत असताना दोन प्रकारचे दगड वापरलेले दिसतात आज च्या घडीला ज्या दगडांचा दर्जा चांगला होता त्या दगडावर घडवलेले नक्षीकाम व शिल्पे ही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु जो दगड कमकुवत निघाला आज त्या दगडाचा मुरुमा मध्ये रूपांतर होतांना दिसत आहे. हे मंदिराचे निरीक्षण केल्यावर दिसते .

      पूर्वमुखी असलेल्या या मंदिराला तीन ते चार मिटर उंचीचे उपपिठ आहे त्यावर हे मंदीर उभे आहे .उपपिठाला आठ पायऱ्या असून त्या पायऱ्याच्या बाजूला कोनाड्यात जय व विजय शिल्प आहेत .

उपपिठावर गेल्यावर मुख्य मंडप लागतो . नक्षत्राकृती असलेल्या सभामंडपात गेल्यावर अप्रतिम सूक्ष्म अश्या प्रमाणबद्ध शिल्प व कोरीव कामाचे दर्शन घडते .बहुतेक शिल्पे ही धातूची आहेत की काय म्हणून हाताळण्याचा मोह प्रत्येकाला  होतोच.

या मंदीराला ५०  गोलाकार स्तंभ आहेत .१२ मुख्य स्तंभावर हे मंदीर उभे आहे . शिवाची स्वायत्तता व त्याचे सामर्थ्य याचे द्योतक असलेला नंदी वर्तुळाकृती रंगशिलेत मध्यभागी स्थित आहे . या मंदिराच्या रंगशिलेला कक्षासन आहे .मुख्य गाभाऱ्याच्या उजव्या बाजूचे कक्षासन आजही शाबूत आहे त्याच्या बाह्य भागावरील शिल्पाचे निरीक्षण केल्यास त्यावर आलाप व गायन करताना ची शिल्पे दिसतात. रंगशिलेच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला विविध सूर सुंदरी यांची शिल्पे कोरलेली आहेत .यामध्ये बासरीवादीका, मृदुंगवादीका, खंजिरी वादिका ,मंजिरीवादिका, वीणावादिका, शालभंजिका आदी सूर सुंदरीची शिल्प काढलेली दिसतात.


*कांस्य बंन्सी विणा शंख मृदुंग खंजरी।* *विविधा वादिन्न वश्या च क्वचित नृत्य नायका।।*


 यावरून त्या काळात कलेला किती महत्त्व होते याची जाणीव होते. शिल्प शास्त्रामध्ये अशा 32 प्रकारच्या देवांगनांची माहिती येते यामध्ये काही नृत्यांगना आहेत आणि काही वाजंत्रीधारीनी आहेत. उपपिठाच्या समोर चौरसाकृती गाभारा व त्यात पूर्ण चंद्र आकाराचे शिवलिंग आहे .गाभाऱ्याच्या दगडी द्वारावर सुंदर असे चित्र तोरण आहे . गर्भ गृहाच्याद्वारा वरील अप्रतिम शिल्पे  ही चालुक्य, होयसळ कालीन पद्धतीचे वाटतात. मंडपामधे वेदीकेवर बारीक नक्षीकाम केलेले दिसते . द्वारावर गणेश पट्टी आहे या द्वाराच्या वर छताला बघितल्यास अप्रतिम असे भौमितिक आकृतीमध्ये निर्माण झालेली दोन झुंबर आजही आपलं मन आकर्षित करून घेतात. हे मंदिर मध्यम नवतालातील उपपिठावरील चार फुटी सोडलेल्या जागेत खजूराहो येथील कंदारिया महादेव पीठाची आठवण करुन देते .मंदीराच्या बाह्यभागावरील शिल्पे सुद्धा मन मोहून घेतात .मंदिराचे शिखर आयताकार की वर्तुळाकार असेल हे नेमके कळत नाही वरील भाग आताच्या काळात सिंमेन्टने भरलेला दिसतो . राज्य पुरातत्त्व विभागाकडे हे मंदिर सध्या संरक्षित असल्याने याची बऱ्यापैकी डागडुगी व निगा राखली जाते.

   विदर्भातील मंदिर व मूर्ती शास्त्राचे अभ्यासक विवेक चांदुरकर यांच्या सोबत अनेकदा या मंदिराचा अभ्यास दौरा केला .त्यांच्या सोबतच दौरा करत असताना यशवंत महाविद्यालय नांदेड येथील मंदिर व शिल्प अभ्यासात डॉ अरविंद सोनटक्के त्याचबरोबर सातारा येथील मंदिर व मूर्ती शिल्प अभ्यासक आदित्य फडके यांच्याकडूनही या मूर्ती शास्त्राची प्रयोगशाळा असलेल्या मंदिराची अभ्यासपूर्ण पाहणी करता आली. यावेळी पुरातत्त्व अभ्यासक तथा पुरातत्व संस्था सदस्य डॉ कामाजी डक हे सुद्धा सोबत होते .संपूर्ण भारतामध्ये अन्वा येथील एकमेव शिव मंदिर आहे की ज्या ठिकाणी आपल्याला विष्णूची 24 शक्ती रुपे ही मूर्तीच्या स्वरूपात बघायला मिळतात शैव व वैष्णव या दोन्हीचा समन्वय मंदिराच्या शिल्परचनेतून आपल्याला दिसतो. जेवढे अंतर्भागामध्ये आपल्याला मूर्ती शिल्प व नक्षीकाम दिसते तेवढेच बाह्यभागावरही संपूर्ण मंदिराची परिक्रमा केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी शिल्पे नजरेस पडतात. या शिल्पांमध्ये उपपीठावर असलेल्या थरावर थर रचत गेलेल्या या मंदिर बांधकामात हंस पट्ट्या, कीर्तीमुख पट्ट्या व इतर भौमितिक आकार असलेल्या पट्ट्या दिसतात. मंदिराच्या बाह्य भागातही अनेक सुरसुंदरी व नर्तिका यांची सुंदर अशी शिल्प आजही दिसतात. यासोबतच साधकांच्या रूपामध्ये उभे असलेली मूर्ती रूपातील साधक आपल्याला मंदिरात जातांना उजव्या बाजूच्या बाह्य भागातील कोनाड्यात दिसतात. गाभाऱ्याच्या बाह्य भागामध्ये आपल्याला देवकोष्टकांची रचना दिसते आणि या अनेक मुर्त्या आहेत.  मंदिराच्या उजव्या बाजूला देवकोष्टकामध्ये असलेला गजांतकशिव आपल्याला दिसतो या शिवाला चार हात आहेत परंतु ते आता भग्न झालेले दिसतात.  पायाखाली हत्ती  आहे व हत्तीची  आता सोंड तुटलेली आहे. दक्षिण भारतात अशा स्वरूपाच्या मूर्ती बघायला मिळतात अशा मूर्ती या पाषाण आणि धातू स्वरूपातही निर्माण झाल्या आहेत या स्वरूपाच्या मूर्तीची निर्मिती पल्लव ,चालुक्य चौल आणि होयसळ यांच्या राजवटीत झाली आहे.  यांच्या कालखंडात या स्वरूपाची मूर्ती अत्यंत लोकप्रिय होती. प्राणी रूप धारण केलेल्या असुराचा वध जेव्हा देव करत असत त्या समयी तो असुर त्या विशिष्ट प्राण्याप्रमाणे धिप्पाड आणि शक्तिमान आहे किंवा होता असे लक्षात घ्यायचे असते . त्याचे नामोहरम करणारा देव व देवता त्यापेक्षा अधिक शक्तिमान होती असा त्यातून अर्थ बोध होत असतो .गजासुर संहार ही एक रूपक कथा असून त्यातून शिवाची शक्तिमानता प्रगट होते. अशाच देवकोष्टकामध्ये शिवनटेश्वर, वराहमूर्ती अशी अनेक रूपे असलेल्या मूर्ती सुद्धा आपल्याला बघावयास मिळतात त्याच सोबत आपल्याला विष्णूची 24 स्त्री शक्ती सुद्धा याच भागात दिसतात. मंदिराच्या उत्तर बाजूला गाभाऱ्याच्या बाहेर भागावर आपल्याला गणेशमूर्ती  नजरेस पडते. डाव्या सोंडेचा असलेला हा गणेश आहे. या मंदिराचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असाच एक गणपती आपल्याला भारवाहक यक्षा सोबत भारवाहक गणेश म्हणून मंदिराच्या आतील बाजूस खांबाला तोलून धरताना दिसतो. तो भारवाहक गणेश आहे ज्याची सोंड सध्या तुटलेली आहे. याच भागात खांबावर दोन नाग शिल्पे सुद्धा आहेत. कामशास्त्राचे मूर्ती अभ्यासक डॉ अरविंद सोनटक्के यांनी या मंदिरावर असलेल्या काम शिल्पाचा अभ्यास केला आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस एका खांबावर दोन ठिकाणी हे काम शिल्पे आहेत त्यांनी वाचता येण्याच्या कामसूत्रातून काही संदर्भ घेऊन या शिल्पाचा अभ्यास सुरु आहे याविषयी ही माहिती प्रत्यक्षपणे त्यांनी दिली. ही अत्यंत दुर्मिळ शिल्पे आहेत असे त्यांचे मत आहे. असे मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले हे शिवमंदिर अजूनही पर्यटकांपासून वंचितच आहे. आता या मंदिराच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रभरातून अभ्यासक येत आहेत बऱ्याच अभ्यासकांनी या मंदिरावर पीएचडी करण्याचे कामही सुरू केले आहे आपल्या भागात असलेले हे सुंदर शिवमंदिर आपण जरूर एकदा आपल्या नजरेखालून घालावे. पुराण कथाचे अभ्यासक देवदत्त पटनायक आपल्या शिवाची सात रहस्ये मध्ये म्हणतात की "मनात कसलीही कपटी भावना नाही म्हणून यांना भोलेनाथ म्हटले जाते ".शिवपार्वतीचा संयोग सत्तेच्या जोरावर नाही, कुणी विजेता नाही , विजय नाही दोघेही एकमेकांना सत्ता गाजविण्याची संमती देतात. एकमेकांवर शिरजोरी करण्याचा कधीच प्रयत्न करत नाही हेच ते प्रेम आहे." मूर्तीशिल्पाच्या भावार्थ मधून हेच दिसून येते आणि आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या एवढ्या मोठ्या वैभवाचा आपण निश्चितच अर्थ लावला पाहिजे या शास्त्रामध्येच त्या काळाचे तत्त्वज्ञान व विचार दडलेले आहेत जे आपल्याला दिशा देणारे ठरतात.



संजय खांडवे

9011971122

बुलढाणा

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

रतनवाडीचा अमृतेश्वर*

 *रतनवाडीचा अमृतेश्वर*


भारतात मूर्तिपूजेची सुरुवात कधीपासून झाली यामध्ये संशोधकांचे अनेक मतप्रवाह आहेत. मूर्ती पूजेचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून आपल्याला काल निश्चितीसाठी मदत होते. हडप्पा व मोहेंजोदडो मधील सापडलेले अनेक अवशेष आपल्याला याची साक्ष देतात .मध्य एशियामधील पर्वतमय प्रदेशातील सुमेरियन या संस्कृतीमध्ये मानव देहधारी देवतांचा उल्लेख मिळतो. ही संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतीपैकी एक मानली जाते. प्राचीन मेसोपोटोमियातील संस्कृतीमध्येही पुरातत्त्व अवशेषावरून मूर्ती व शिल्पे आदींचे निर्माण झाल्या विषयाची माहिती मिळते. ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजेस सुरुवात झाली, स्वाभाविकच आहे त्या अगोदरच मूर्ती शिल्प बनविण्याच्या कलेचा विकास झाला असावा. मेसोपोटोमिया मध्ये इसवीसन पूर्व 15 शतकात मिश्र लोकांनी त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती भव्यसमारंभात विधीपूर्वक आणली होती. ही घटना मूर्ती पूजेच्या त्या काळापासून असलेल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पतंजलीभाष्य, कौटिल्यांचे अर्थशास्त्र, महाभारत, आदिग्रंथामध्ये मूर्ती शिल्पे ,मंदिरे याचा उल्लेख आढळतो. पाणिनी देखील आपल्या ग्रंथात त्याचा उल्लेख करतात.

बौद्ध धर्मात लेणी निर्माणाची सुरुवात केली गेली त्या काळात शैलाश्रये ही ध्यान साधनेसाठी वापरली जात असत. हीनयान लेणीमध्ये स्तूपांची चैत्यगृहाची निर्मिती झाली ,पुढे महायानांनी मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये बुद्ध मूर्तीचे निर्माण केले. महाराष्ट्रात जवळपास शेकडो च्या वर लेण्या आढळतात या लेण्या प्रामुख्याने बौद्ध ,जैन व हिंदू आहेत. राष्ट्रकूटांच्या काळात कोरले गेलेले वेरूळ येथील कैलास लेणे हे अप्रतिम मानले जाते. भारतात गुप्त काळात मूर्तिकलेचा अधिक विकास झाला आपल्या देशात जवळपास सर्व धर्मात मूर्तिकलेला व शिल्पकलेला फार महत्त्व दिले गेले व यामधून मूर्ती पूजनासही सुरुवात झाली. शिव उपासनेला भारतात विशेष महत्त्व आहे. गुप्तकाळात मूर्तिकलेच्या दृष्टीने ठरलेला सुवर्णकाळ हा शिवाच्या मानव रुपी मूर्ती निर्माणास पोषक ठरला अशा मूर्तींची संख्या कमीच आहे पण लिंगमूर्ती ची संख्या अधिक निर्माण झाली. यामध्ये एकमुखी, बहुमुखी, द्विमुखी, पंचमुखी,  अष्टमुखी असे प्रकार आहेत पण गुप्तकाळात एकमुखी लिंग अधिक निर्माण झालेले आढळते. जीवाला शिवाची प्राप्ती आणि प्रकृती व पुरुष या प्रतीकांच्या रूपाने लिंग पूजेस प्रारंभ झाला. याचे आणखीही काही प्रकार आहेत यामध्ये स्वयंभू लिंग की जे नैसर्गिक भूमी मधून निघालेले असते .बाणलिंग  काकडी किंवा अंड्याच्या आकाराचे असते व ते पवित्र नदी मधून प्राप्त होते.


*छत्रभं त्रपुषाकारं कुक्कुं टाण्डनिभं तथा ।*

*अर्धेंन्दु सदृशं चाथ बुब्दुदाभं पंचमम्।।*


शिल्परत्नाच्या उत्तर भागात, दुसऱ्या अध्यायात छत्राप्रमाणे, काकडी प्रमाणे, कोंबडीच्या अंड्याप्रमाणे तसेच अर्धचंद्र सदृश्य आणि जल थेंबाप्रमाणे अशा पाच प्रकारचा लिंगाचा वरचा भाग असतो असे म्हटले आहे. राजलिंग ,घटितलिंग मानुषलिंग ही बसवून तयार केली जातात .याचा आकार मोठा असतो.  राज लिंगामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक मुखी ,बहुमुखी असे प्रकार असतात घटित लिंगामध्येही अष्ठेत्तर लिंग, सहस्रलिंग असेही प्रकार येतात. 

 नवव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अनेक शिवमंदिरांचे निर्माण झाले. ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर  यासारखी ज्योतिर्लिंगे तर आपण ओळखतोच. याशिवाय महाराष्ट्राच्या अनेक भागात शिव मंदिरांचे निर्माण झाले मार्कंडेश्वर ,धुपेश्वर, माणकेश्वर, सिद्धेश्वर पाताळेश्वर ,हरिश्चंद्रेश्वर अमृतेश्वर ,असे अनेक मंदिरे सांगता येतील अशापैकीच एक अमृतेश्वर या शिवमंदिरास भेट देण्याचा योग आला नावाप्रमाणेच निसर्गाच्या सौंदर्यातून सतत अमृत वर्षाव होत रहावां असंच हे ठिकाण .अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रतनवाडी या ठिकाणी हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या गंगेत सामावणाऱ्या प्रवरेचा उगम याच स्थानावरून होतो हेच ते शिवस्थळ आहे. प्राचीन मंदिराच्या पाठीमागे पाठीराखा सारखा वाटणारा प्रचंड असा प्राचीन रतनगड आपल्याला दिसतो.

  सानंददरी ,कळसुबाई, हरिश्चंद्रगड ,अलंग, मदन कुलंग ही सह्याद्रीची वैभव संपदा याच अमृतेश्वराच्या परिसरात आहे. पुण्यावरून 200 तर मुंबईवरून 180 किलोमीटर अंतरावर हा अमृतेश्वर येतो .संगमनेर- अकोले -राजुर - भंडारदरा मार्गे देखील पोहोचता येते. कळसुबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भागात हे मंदिर आहे.  भंडारदरा धरणाच्या बॅक वॉटरवर येणाऱ्या या मंदिराचे सौंदर्य अत्यंत मनमोहक आहे. भूमीज प्रकारातील नागरशैलीमधील सुमारे 1300 वर्षांपूर्वीच्या या काळ्या दगडात अप्रतिम नक्षीकाम असलेल्या प्राचीन मंदिराचे निर्माण झाले आहे. मुख्य मंदिरावर शिखरी-शिखर प्रकारातील छोटी छोटी शिखरे अगदी सूक्ष्म शिल्पकलेतून साकारलेली दिसतात. आमलकापर्यंत दोन्ही बाजूने चौकोनाकार लता कोरलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मंदिरासमोर नंदी मंडपात नंदी विराजमान आहे त्यासमोरच गाभारा आहे.  गाभाऱ्यातून पुढे सभामंडपात जाता येते.  सभामंडपातील खांबावरील कोरीव काम 1000 वर्षांपूर्वीच्या शिल्पकलेच्या सुवर्ण युगाची आठवण करून देते. या सभा मंडपात आपण हरवून जातो. जणू काही पुन्हा त्या काळात गेलो की काय असा भास होतो भूमिती- बीजगणिताच्या कसोटीच्याही पलीकडे असणाऱ्या भौमितिक रचना, मूर्तिकाम, शिल्पपट ही आजच्या विज्ञान युगातील तंत्रज्ञानाला मागे टाकताना दिसतात.

यक्ष ,भारवाहक, प्राणी, पक्षी, वेदिका,  देव, दानव, अप्सरा, सुरसुंदरी आदी शिल्प येथे कोरलेली आहेत.  मंदिरावर काम शिल्पे देखील आहेत. पुराणातील समुद्रमंथनाचा देखावा येथे शिल्पीत केला आहे. गर्भगृहाच्या वर कीर्तीमुख, शंख व कमळ वेली आहेत बाहेरच्या भागातही कीर्ती मुख्य कोरलेली आहेत .प्रकाश योजनेसाठी दगडी जाळ्या आहेत. गाभाऱ्यात शिवलिंग स्थापित आहे. प्रत्येक प्राचीन मंदिराजवळ पाण्याची व्यवस्था म्हणून पुष्करणी अथवा बारावाची व्यवस्था ही मंदिर स्थापत्यचा एक भाग असतो या ठिकाणी सुद्धा जवळच  20 फूट लांब-रुंद पुष्करणी आहे. यात चारही बाजूला देवकोष्टके आहेत.त्यात गणेश व विष्णूची मूर्ती स्थापित केलेली दिसते. बारावातील पाणी हे अमृतेश्वरासारखेच अमृतमय व नितळशार आहे. समुद्रमंथनातील प्राप्तरत्नांपैकी एक अशी ही पुष्करणी असल्याची कथा सांगितली जाते. समुद्रमंथनातून प्राप्तरत्नांपैकीच हा अमृतेश्वराचा निसर्गाचा परिसर आहे की काय असंच वाटायला लागतं. येथून काढता पाय घ्यावा असं कधी मुळी वाटतच नाही. इथेच अमृतेश्वराच्या कुशीत रमावं असंच वाटतं. पश्चिमेकडून रतनगड अडवतो त्याचा अंगठा ही आनंदाचा संकेत देत इथेच थांबा असं म्हणतो. पूर्वेकडील निळाशार भंडारदरा गारवा देत हेच म्हणतो  की तुम्हीही एकदा या अमृतेश्वराच्या दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या अमृततुल्य जीवनात या अमृत रुपी निसर्गाचा आस्वाद घ्या.

जगात कुठेही जा सह्याद्रीचं सौंदर्य तुम्ही अगदी सूक्ष्मपणे न्याहाळा  असे सौंदर्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही.



संजय खांडवे

९०११९७११२२

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

Obc

 *मंडल दिनाच्या निमित्ताने...*

➖➖➖➖➖

आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातून जात असताना इतर मागासवर्गाच्या संदर्भात १९७८ मध्ये गठीत मंडल आयोगाची व त्याच्या संघर्षाची निश्चितच आठवण येते. आजच्याच दिवशी ७ ऑगस्ट १९९० ला मंडल आयोग इतर मागास प्रवर्गातील समुदायाला लागू करण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केली. निमित्ताने या दिवसाची आठवण म्हणून देश भऱ्यात 'मंडल दिन' साजरा केला जातो. 


भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४० अन्वये देशातील इतर मागास प्रवर्गासाठी आयोग गठन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोगाची स्थापना २९ जानेवारी १९५३ रोजी करण्यात आली होती. ३० मार्च १९९५५ ला या पहिल्या आयोगाचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला. या  आयोगासाठी १८२ प्रश्नाच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून व व्यापक दौऱ्यातून हा रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या मागासवर्गाच्या अहवालात २३९९ इतर मागास जातीचा समावेश करण्यात आला. पुढे हा आयोग चर्चेच्या माध्यमातून कसोटीवर टिकू शकला नाही. इतर मागास प्रवर्गात असलेल्या मोठ्या समुदायाची पुढील काळात सुद्धा असेच संघर्षाची शृंखला सुरूच होती. 


इतर मागास प्रवर्गात येणारा भारतामधील हा समुदाय प्रचंड मोठा होता. याची व्याप्ती संपूर्ण भारतभरामध्ये होती. कलम ३४० अन्वये यांना त्यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक बाबींचा अभ्यास करून त्यांना प्रगतीच्या प्रवाहामध्ये घेण्यासाठी विविध उपाय योजनांच्या माध्यमातून जोडणे अत्यंत आवश्यक होते.


*"समानता केवल समान लोगो के बीच होती है! असमान को समान के बराबर रखना असमानता को स्थिरता प्रदान करना है!"*

*

२० डिसेंबर १९८७ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एक आयोग गठित केल्याची घोषणा केली. हा आयोग म्हणजेच दुसरा मागासवर्गीय आयोग होता. या आयोगामध्ये पाच लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल होते. त्यामुळेच यांची या योगाची ओळख मंडल आयोग म्हणून सर्विकडे झाली. या आयोगामध्ये इतर चार सदस्य म्हणून दिवाण मोहनलाल, आर. आर. भोले, दिन बंधू साहू, के. सुब्रमण्यम, या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष बिंदेश्वरी प्रसाद मंडल हे बिहार राज्यांमध्ये संसद सदस्य होते. १९६७ ते ७० व पुढे १९७७ ते १९७९ हे लोकसभेचे सदस्य होते. 


या मागास आयोगाला काम करत असताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. यामध्ये दिनबंधू साहू यांनी प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा दिला. ५ नोव्हेंबर १९७९ मध्ये ते या आयोगातून बाहेर पडले. व त्यांच्या जागी एस. आर. नायक यांची नियुक्ती करण्यात आली. १९७९ मध्ये लोकसभा भंग झाल्याने, पुन्हा या आयोगाच्या कामाची गती मंद झाली. पुढील काळात तीन वेळा या आयोगाचा अवधी वाढविण्यात आला. 


या आयोगाला १ जानेवारी १९७९ रोजी गठित करून पहिली मुदत  ही ३१ डिसेंबर १९७९ पर्यंत अहवाल देण्याचे ठरले. त्यापुढेही मुदत वाढ देण्यात आली. पुढची मुदतवाढ ही ३१ डिसेंबर १९८० पर्यंत वाढवण्यात आली. १९३१ च्या जनगणनेचे आकडे नसल्याने या आयोगाला अनंत अडचणीला सामोरे जावं लागत होते. १९८० मध्ये इंदिरा गांधी सरकार आले, आणि या मंडल आयोगाचा अहवाल तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानिजैलसिंग यांना सादर केला गेला. यावेळेस ३,७४३ विविध जाती आणि समुदायाचा समावेश मागास प्रवर्गात करून ४० शिफारस करण्यात आल्या. देशातील सामाजिक व शैक्षणिक मागास जातीचा शोध घेण्यासाठी आयोगाने ११ निकषाचा अवलंब केला होता. आणि तीन प्रमुख शीर्षकांतर्गत गटबद्ध केले गेले. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या बाबी तपासल्या गेल्या. ओबीसी ओळखण्यासाठी ११ निकष विकसित केले गेले. 


आयोगाने करून दिलेले शिफारशी या निश्चितच ओबीसींना नोकऱ्या मिळवून देण्यात नाही तर ओबीसींच खचलेल मनो धैर्य उंचावणारे होते. त्यांना त्यांच्या क्षमताची जाणीव परत मिळवून देण्यासाठी त्या यशस्वीच ठरणाऱ्या होत्या. या संदर्भात मंडल आयोगाने मांडली भूमिका ही अतिशय बोलकी होती. सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाची व्याख्या ठरविणारा आणि मापदंड निश्चित करणारा हा आयोगाचा अहवाल होता. याच अहवालानुसार मागासवर्गाची ओळख यातून झाली.


*आयोगाने ओबीसींसाठी सर्वसाधारणपणे पुढील शिफारसी केल्या*


ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावे. ओबीसी वर्गातील उमेदवारांची गुन्हा अनुक्रमे खुल्या स्पर्धेत निवड झाली असेल तर त्यांचा समावेश २७% कोठ्यात करू नये. ओबीसींना सर्व स्तरातील पदोन्नतीच्या बाबतीत वरील प्रमाणातच पदोन्नती द्यावी. राखीव जागांचा भरला न गेलेला कोटा पुढे तसाच ठेवावा. आणि त्यानंतरच तो राखीव नाही असे समजावे. थेट भरती करताना अनुसूचित जाती जमातीसाठी वयाच्या कमाल मर्यादेतून सूट दिली जाते ती ओबीसीसाठी ही लागू करावी. प्रत्येक श्रेणीच्या पदासाठी ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीसाठी रोस्टर पद्धत अवलंबले जाते तशीच पद्धत ओबीसीसाठी ही स्वीकारावी. केंद्र आणि राज्य सरकारचे सार्वजनिक उद्योग राष्ट्रीयकृत बँका यांनाही सुचित केल्याप्रमाणे आरक्षण पद्धत जशीच्या तशी लागू करावे. सरकारकडून या न त्या मार्गाने आर्थिक मदत मिळालेल्या सर्व खाजगी क्षेत्रातील उद्योगांनाही सूचित केल्याप्रमाणे आरक्षणाची पद्धत लागू करावी. सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांनाही आरक्षणाच्या या कक्षेत आणावे.


७ ऑगस्ट १९९० रोजी व्ही.पी. सिंग सरकारच्या काळात हा आयोग लागू करण्यात आला. ही एक ऐतिहासिक घटना होती. देशातील बहुसंख्य असलेल्या ५२% इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या समुदायासाठी उन्नतीचा व मनोधैर्य वाढवणारा हा दिवस होता.

            आज या मंडल आयोगमुळेच विशाल समुदायात असलेला हा इतर मागास प्रवर्ग आपली शैक्षणिक सामाजिक तथा आर्थिक उन्नती साधताना दिसत आहे. देशात या कमिशनमुळे जातीय बाबी नष्ट होऊन इतर मागास प्रवर्गातील समुदायांमध्ये वर्गीय चेतना जागृत झाली. ही अशीच जागृत राहावी या अपेक्षेसह मंडल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

➖➖➖➖🙏🏻🙏🏻

-संजय खांडवे 

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य

शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

ओबीसी

 *छत्रपती संभाजी नगरातील "ओबीसी चिंतन" हे देशव्यापी  मंथनाकडे .......*

➖➖➖➖➖➖➖    संजय खांडवे,बुलढाणा



              ओ बी सी आरक्षण हा मोठा संघर्षाचा विषय आहे.या व्यवस्थेत या समुदायाला स्थान निर्माण करण्यासाठी खूप मोठा काळ गेला .आज स्वातंत्र्याच्या अमृतवर्षानंतरही परिस्थिती फारशी बदलली असे म्हणणे धाडसाचेच ठरेल . भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि या संविधानात स्वातंत्र्य ,समता, न्याय व बंधुता या वर आधारीत एक आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सखोल अभ्यासातून जगात आदर्श ठरणारी घटना आपल्याला दिली .

       या घटनेतील ३३० व ३३२ अधिनियमातून आणि १५(४) व १६(४)नुसार नोकरी मधे  एस सी ,एस टी साठी आरक्षणाची तरतुद केली गेली.त्याच बरोबर ३४० अधिनियमातील तरतूद नुसार ओबीसी आरक्षणासाठी आयोग गठीत करण्यात यावा व त्यानुसार ओबीसी प्रवर्ग ठरविण्यात यावा अशी तरतुद करण्यात आली होती .याला अनुसरुन काकासाहेब कालेलकर आयोग नेमण्यात आला होता. या नुसार त्यावेळी  ओबीसी मधे २२१८ जाती ठरविण्यात आल्या होत्या. देशात बहुसंख्येने  असलेल्या समाज वर्गाची हककाच्या लढाईचाच तो काळ होता असेच म्हणावे लागेल .१९७७ मधे  मा. मोरारजी देसाई सत्तेवर आले व त्यांनी बी.पी.मंडल कमीशनची स्थापणा केली.मोरारजी देसाई सरकार गेल्यानंतर मा  इंदिराजी गांधी सरकार सत्तेत असतांना १९८१ मधे मंडल आयोगाने आपला रिपोर्ट दिला .यानुसार ३७४३ जातींचा समावेश करण्यात आला.त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या ओबीसी चळवळीना त्या ज्ञात आहे.पुढे मा. व्ही पी सिंग पंतप्रधान असतांना मंडल कमीशन लागू झाले .त्यानंतरही क्रिमिलेअरचा संघर्ष सुरुच होता .९० च्या दशकात ओबीसी समुदाय हया संविधानाने दिलेल्या हककाचा लाभार्थी ठरला .२७% आरक्षणाने भारतातील कान्याकोपऱ्यात असलेल्या शेवटच्या घटकाचा सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत झाली .आजही बहुसंख्येने असलेला ओबीसी घटक जात- धर्म सोड्रून आपल्या न्याय्य हकक,अधिकारासाठी एकत्र येत आहे पण तो अधिक संघटीत होणे गरजेचे आहे.  

        आज ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या अधिकारी व कर्मचारऱ्यांचे अधिष्ठाण असलेली मजबूत संघटना  मा .सुनिल शेळके यांनी स्वेच्छानिवृत्तीपूर्वी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना  ही संघटना स्थापन केली होती . या संघटनाचे जाळे आता संपूर्ण राज्यात पसरले आहे. विविध आरक्षणचा गुंता, न्यायालयीन लढे यामुळे संभ्रमित इतर मागासवर्गीय समूह या बाबी लक्षात घेता संघटनेचे कार्य व मार्गदर्शनाला  येणाऱ्या काळात महत्व प्राप्त झाले आहे.  ओबीसी विदयार्थी तथा पालकांना हे संघटन एका क्लीकवर  सामावून घेवून त्याच्या विदयालयीन,महाविदयालयीन शिष्यवृत्ती,प्रवेश तथा क्रिमिलेअर विषयक समस्या अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यन्त असलेल्या बांधवाला क्षणात सोडविण्यास मार्गदर्शक ठरणार आहेत . स्वतःची स्वंतत्र वेबसाईट व यॅप या प्रसंगी सुरू होणार आहे .यामधे सर्व प्रकारचे शासकिय आदेश व माहीती मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहेत या साठी या संघटनेचे तज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत .   बेखबर असलेला ओबीसी आता सोशलमिडीया , तंत्रज्ञानाच्या व स्पर्धात्मक युगात बाखबर करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे . शिबिराचे उदघाटन प्रा. डॉ. सुरज मंडल यांच्या हस्ते होणार आहे. बहुचर्चित मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांचे ते नातू असून ‘भविष्यातील ओबीसींचे आंदोलन कसे असायला हवे?’ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. प्रमुख वक्ते तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे सचिव मंडळ सदस्य डॉ. प्रभाकर गायकवाड हे ‘सद्यस्थितीत ओबीसी अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोरील आव्हाने’ हा विषय उलगडून सांगणार आहे. दुसऱ्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सिद्धांत भरणे हे ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती व त्यातील अडचणी या उपयुक्त विषयावर मार्गदर्शन करणार आहे.

       छत्रपती संभाजीराजे नगरात या चिंतन शिबीराच्या निमित्ताने महाराष्ट्र भरातून संघटनेचे पदाधिकारी,अधिकारी हजेरी लावणार आहेत .या ऐतिहासिक नगरीमधील हे चिंतन देशभरातील ओबीसी चळवळीसाठी मंथन ठरणार आहे .


रविवार, २३ जुलै, २०२३

सुरेश देवकर सर

 *क्षितिजावरचा उगवता सूर्य.........*


एक व्यक्ती अनेक आघाड्यावर जेव्हा काम करते व त्या कामात ती आपली गुणवत्ता सिद्ध करते किंवा आपली ओळख निर्माण करते त्यावेळेस त्या व्यक्तीला "अष्टपैलू" म्हटले जाते आपण बहुदा हा शब्द क्रिकेटच्या संदर्भात अनेक वेळा वापरतो व तो त्या खेळा इतकाच मर्यादितही राहतो. त्या क्षेत्रातील विविध बाबीमध्ये निपुण असणारी व्यक्ती त्या-त्या क्षेत्रात अष्टपैलू ठरते, परंतु अनेक क्षेत्रात एक व्यक्ती आपल्याला यशश्वीवीपणे काम करताना दिसते त्यावेळेस  मात्र असे व्यक्तिमत्व अष्टपैलूच्याही पलीकडचे असते.मुळात हिऱ्याला  साधारणतः आठ पैलू  असतात .त्याला कनोरे असेही म्हणतात त्याला तासून ही बनतात व मग सर्व अंगाने अनंत काळापासून दडपलेला हिरा चमकतो.आपले अस्तित्व सिद्ध करतो . असेच व्यक्तिमत्त्व म्हणजे सुरेश देवकर सर ! पश्चीम विदर्भातील सहकार तथा सामाजिक क्षेत्रातील एक उगवता सूर्यच !

      अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले .त्यांचे वडील स्व.बाबुराव देवकर हे आर्मीमधे होते आई गीताई व बाबा सोबत मध्यप्रदेश मधील सागर या ठिकाणी  बहीण व दोघे भाऊ असा परिवार अत्यंत आनंदाने राहत होता .सरांचे दुसरी पर्यन्तचे शिक्षणही तेथेच झाले पण सेवेत असतांना बाबांना झालेल्या दुःखापतीमुळे त्यांना मूळ गावी परतावे लागले. बरेच वर्ष इलाज चालला पण त्या आजारात बाबा त्यांना सोडून गेले .मुळात देंशसेवेच्या कार्यातच अत्यंत कमी वयात बाबा सोडून गेले ,त्यावेळी सरांचे वय अकरा बारा वर्षाचे होते . आईंनी काबाड कष्ट करून त्यांना शिकवल .धामणगाव -धाड या ठीकाणी उच्चप्राथमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले.पुढे बुलढाणा येथे  श्री शिवाजी शिक्षण संस्थेत व जिजामाता महाविद्यालयात ते शिकले.वडीलांच्या शिस्तीचा आदर्श व आईचे संस्कार व सोबत आपली जिद्द,धैर्य,बुध्दीमत्ता ,विचार,स्वभाव व महत्वाची आपली मेहनत यशाच्या शिखराकडे नेत होती. सर्वप्रथम त्यांना मलकापूर तालुक्यातील आव्हा या ठिकाणी तलाठी या पदावर नियुक्ती मिळाली अत्यंत तुटपुंजा पगार असल्याने त्यांनी आपलं पुढील शैक्षणिक काम सुरूच ठेवलं होतं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला त्यांनी संधी समजून आपलं काम सुरू ठेवलं होतं.त्यांच्यासाठी ती एक -एक पायरीच होती पुढे  तलाठ्याची नोकरी सोडून त्यांनी पैठण तालुक्यात ग्रामसेवक या पदावर नियुक्ती मिळवली. यामध्ये त्यांचा थोडा का होईना पगार वाढला होता, पण तिथेही त्यांचे मन रमले नाही .पुढे आयटीआय अकोला या ठिकाणी त्यांना भाषा निर्देशक म्हणून नियुक्ती मिळवली त्या ठिकाणीही त्यांनी काही वर्ष काम केलं तेथेही ते थांबले नाहीत पुढे अजून परीक्षा देत राहिले आणि या काळातच त्यांनी आपलं बीएडचं शिक्षणही पूर्ण केलं होतं म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांना वैजापूर या ठिकाणी नियुक्ती मिळाली. या दरम्यान त्यांनी राज्यसेवेच्या ही परीक्षा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत मजल मारली होती . त्यावेळी परभणी जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षकांच्या जागा निघाल्याने त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला शेवाळा या ठिकाणी माध्यमिक शिक्षक या पदावर नियुक्ती मिळवली तेथे त्यांनी वर्षभर काम केले . जिल्हा बदलीने त्यांनी आपला स्व जिल्हा गाठला आणि स्व जिल्ह्यात त्यांनी जिल्हा परिषद प्रशाला धाड या ठिकाणी बदली करून घेतली .येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.जीवा भावाची अन विश्वासाची नाती या प्रवासात त्यांनी आपल्या  विचार- आचारातून निर्माण केली .सहकार अधिकारी असलेल्या अश्याच एका जीवाभावाच्या मित्राने सहकार क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला व सुरूवात झाली.ते नेहमी म्हणतात "एक चांगला दाना मातीत  पेरा असे हजारो  चांगली दाने मिळतात मग मी अशी चांगली माणसे अन विचार पेरण्याचा ध्यास घेतलाय़ ! आणि याची प्रेरणा मला शिवचरित्रातून मिळते "

       आज आदिती अर्बन हा वटवृक्ष उभा राहीलेला आपण पाहतो .त्याचे ब्रीदही तसेच आहे ," नाते विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे '' एक प्रचंड मोठा आदिती अर्बन परिवार त्यांनी उभा करून हजारो कुटुंबांना रोजगार उभा केला आहे .त्यांच्या संस्थेत काम करणारा प्रत्येक सदस्य ही संस्था आपली आहे याच भावनेनच काम करतो हा त्यांनी आपल्या माणसांमधे निर्माण केलेला प्रचंड विश्वास आहे हेच दाखवतो .

      सहकार क्षेत्रात तर आहेच पण त्यांचे वाचनही अत्यंत दांडगे!


हलवूनि खुंट। आधी करावा बळकट॥

 मग तयाच्या आधारे। करणे अवघेची बरे ॥


तुकोबांच्या विचारांचा त्यांचावर विशेष प्रभाव असल्याने 

 एवढ्या व्यापामधून आठवड्या महिन्याला नवीन आलेली पुस्तके विकत घेऊन वाचणे हा त्यांचा छंदच ! स्वतःचे घरातील सुसज्य ग्रंथालयाच आहे. नुसते पुस्तक वाचून ते थांबत नाहीत तर त्यावर तासंन -तास चर्चाही ,यातून चिकित्सा, तर्क आणि अनुमान आणि मग पुढे आपल्या विवेक बुद्धीवर तासणे हा त्यांचा या प्रचंड व्यापांमधील छंद आवाक करणारा आहे. इतिहास विषयक पुस्तकांची त्यांना विशेष आवड ! आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा त्यांना सार्थ अभिमान! शिवचरित्राचा अभ्यास तर त्यांचा सतत चालूच असतो. महाराजांचा विषय तर त्यांच्या चालण्या- बोलण्यातून सुरूच असतो. शिवचरित्रातील आठवणी  न काढणारा दिवस त्यांचा तर कधी उगवलाच नसेल !

          त्यांचा याच अभ्यासू व दुरदृष्टी  मधून त्यांनी त्यांच्या लक्षात की, प्रत्येक जिल्हयाला  वृत्तपत्र क्षेत्रात मुखपत्र आहे   पण आपल्याच जिल्हयाला नाही , की जे एकाच वेळी सपूर्ण जिल्हयात रोज पोहचते ,म्हणून आपल्या शहरातून सपूर्ण विदर्भात व पुढे मराठवाडयात रोज प्रकाशीत होणारे दैनिक आता आपल्या मातृतिर्थ बुलढाणा जिल्हयातून रोज प्रकाशीत होऊन ओळख निर्माण व्हावी  जनसामान्याच्या प्रश्नानां वाचा फुटावी.साहित्यिकांना,लेखकांना,कवींना संधी मिळावी हया हेतूने त्यांनी " दैनिक महाभूमि" या वृत्तपत्राचा लवकरच प्रकाशनाचा मानस योंजिला असून युद्धपातळीवर काम सुरू आहे .महीनाभरात ते वाचकांच्या हातात पडेलच !  

    यासोबतच त्यांना आनखी एक व्यासंग ! ऐतिहासिक वास्तूंना भेट देणे .त्यांचा अभ्यास करणे. तज्ञामार्फत त्या समजून घेणे .गड ,लेणी, मंदिरे ,बारव, विरगळ आदी ऐतिहासिक प्रतीके अभ्यासासह जतन व संवर्धनावर त्यांचा कृतीयुक्त जोर असतो.शिवजागर मंच सदस्य म्हणून त्यांचा या कार्यात सक्रिय सहभाग असतो .या प्राचीन वास्तुच्या सवर्धनासाठी   ते स्वतः या व्यस्ततेमध्ये सुद्धा वेळ देतात. ही गोष्ट काही सामान्य नाही.आपल्या परिसरातील अशी फार कमी ऐतिहासिक स्थळे असतील की जे त्यांनी भेट देवून पाहिले नसतील. फक्त भेटच नाही तर वेळ देऊन समजून घेण्याची त्यांची वृत्ती खरच अनुकरणीय आहे. ऐतिहासिक स्थळावर तर सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस घालवतात. एवढं करूनही कितीही दूर जावो आपण घरी नऊच्या आत पोहोचलो पाहिजे हा त्यांचा मानस असतो. वैयक्तिक जीवन मात्र त्या अत्यंत साधेपणाने जगतात.प्रचंड मित्राच्या गोतावळ्यात वावरणारा हा माणूस मित्रांना आपल्या जीवनात मोठं स्थान देतात.आपल्या माती अन माणसाप्रती प्रचंड कृतज्ञ असलेल्या या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस !

"ज्ञानाबरोबर ज्ञानाचा दर्प नव्हे ,तर सुगंध दरवळायला हवा " 

‌हा आदनिय आ. ह. साळूंखे सरांचा विचार आपणास तंतोतंत लागू पडतो .

‌हा सुंगध असाच सालो साल दरवळत राहो या शिवशुभेच्छा !

आई जिजाऊ त्यांना उदंड आयुष्य देवो!

➖➖➖➖

संजय खांडवे

9011971122

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

तुका आकाशा एवढा

 *तुका आकाशाएवढा......*

➖➖➖➖➖➖

         संजय खांडवे       9011971122


संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील संत परंपरेचे शिरोभूषण मानले जातात .वारकरी भागवत धर्माचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आजही जनमानसात तुकारामांची अभंगवाणी सतत मुखोतगत असल्याचे दिसते. "इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ दे"

 ही जशी मौखिक परंपरेतून मुखोतगत आहे अगदी तसेच तुकारामांचे असंख्य अभंग या महाराष्ट्राच्या जनमानसातून सदैव जीवंत राहिलेले दिसतात. त्यांनी अभंग लिहून ठेवले पण त्यांना ते बुडवावे लागले ही एक दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल.अगाध ज्ञानाच्या कसोटीवर तासून निर्मिलेली गाथा कर्मठ व्यवस्थेच्या पचनी न पडल्याने ती बुडविण्याची वेळ संत तुकारामांवर येणे याची कल्पनाच करणे कठीण आहे . भाबनाथाच्या (भंडारा) डोंगरावरील सामाजिक साक्षात्कारा नंतर  संत तुकारामांच्या चिकित्सेतून अभंगवाणीचा जन्म झाला .त्या अगोदर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटयाची असलेली कर्ज खाती  इंद्रायणीमध्ये बुडवली. हा त्यांना झालेला एक सामाजिक साक्षात्कारच होता .मला जर काही करायचे असेल तर सुरुवात ही माझ्यापासून केली पाहिजे ही त्या मागची  भावना होती. असा असत्याकडून सत्याकडे जाणारा मार्ग त्यांनी गाथेतून दाखविला. समाज मनात अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, अंधाराकडून -प्रकाशाकडे ,दुःखाकडून- सुखाकडे, शोषणा कडून -मुक्ततेकडे, गुलामगिरी कडून स्वातंत्र्याकडे ,जाण्याची आस निर्माण झाली. आपण सिद्धी, स्मृती, श्रृती याचे अंकित नसून सर्वसमावेशक समचरणी पाठीराखा असलेल्या विठ्ठलाचे लेकरं आहोत. त्या विठ्ठलाने आम्हाला आता प्रचंड बळ दिले आहे. हा संत नामदेवांनी अकराव्या शतकात सांगितलेला संदेश "आमुचा विठ्ठल प्रचंड"  पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चालविला. त्यांना साक्षात विठ्ठलाच्या रूपाने संत नामदेवांचा दृष्टांत झाला होता. नामदेवांनी सांगितलेल्या विठ्ठलाचा मार्ग पुढे संत तुकारामांनी चालू ठेवला.भय मुक्त होऊन विठ्ठलाचे बळ संततुकारामांना मिळाले . आपल्या अभंगातून मनामनात आणि घराघरात रुजविला. अभंग गाथेची रचना खुद्द स्वतः तुकाराम महाराजांनी  स्वहस्ताक्षरात केली. स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या वह्यांचे पुढे काय झाले हे सांगणे कठीण आहे. त्यांना त्या बुडवाव्या लागल्या हे मात्र सत्य आहे .शाईने लिहिलेला कागद आपण कधीतरी तुकारामांना समजून घेताना पाण्यात बुडून बघितला पाहिजे. असे  वाटते.

 "कोरड्या वह्या निघाल्या उदकी।

 त्या तरी लुटुनि नेल्या भाविकी।

 प्रख्यात लोंकि व्हावया ॥ "

 अशी माहिती महिपतीने दिली आहे श्री तुकाराम बुवांचे अभंगाची गाथा मधील 1950 सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की "या निवाडयाच्या दिवसानंतर तो निर्याणापर्यंत भक्तीच्या व काव्याच्या माधुरीचा ज्यांत  परिपाक उरला होता असे अनेक अभंग तुकारामाने स्वहस्ते लिहून ठेवले असले पाहिजेत. त्या हस्तलिखिताचा अद्यापही पत्ता लागलेला नाही .खुद्द तुकारामांच्या घराण्यात देहुत पूजेस ठेवलेली अशी त्यांच्या हातची म्हणून जी वही दाखवितात ती फक्त २४८ अभंगच आहे. सारांश तुकारामांच्या हातचे समग्र लिखाण गेल्या शंभर वर्षात तपास करून सुद्धा मिळाले नाही व नजीकच्या भविष्यातील ते सापडेल असा संभव दिसत नाही."

     या प्रस्तावनेनंतर आज ७२ वर्ष उलटली यात काही शंका नाही तुकारामांची समग्र गाथा हा एक वेगळा विषय आहे. पण प्रश्न असा पडतो की तुकारामांना समजून घेताना गाथा बुडवावी लागणे अन गाथा वर येणे या दोन्ही क्रिया वेगवेगळ्या आहेत. दोन्ही क्रियेकडे आपण सारख्या दृष्टीने खरंच बघतो आहोत का? "गाथा बुडविणे" याकडे आपण सहजतेने पाहतो मात्र "गाथा वर येण्याच्या " क्रियेला अलौकिक दृष्टीने पाहतो, नव्हे तर त्यावर अभिव्यक्तही होत असतो. बुडवण्याच्या क्रियेची वर येणे ही प्रतिक्रियाच आहे असेच वाटते. त्यामागे काही अलौकिकता असेल असे वाटत नाही. स्वतः प्रयत्नवादी, विज्ञानवादी, विधीचे जाणते, मेणाहूनही मऊ, वज्रालाही भेदणारे, जे पाहिजे ते देणारे ,गांडीची लंगोटी सोडून देणारे प्रसंगी नाठाळाच्या मस्तकात काठी सुद्धा मारायला मागेपुढे न पाहणारे, माय बापाहूनही मायाळू, अमृता पेक्षाही गोड, लोकजालातून सुटलो म्हणून धन्यता मानणारे, देवालाही   प्रतिप्रश्न करणारे, बुवाबाजी भोंदूगिरी आणि चमत्कार नाकारणारे, असे संत तुकारामांच्या बाबतीत अलौकिक,चमत्कार होणे मनाला पटत नाही. इंद्रायणी मध्ये डुबलेल्या अभंग गाथेला पाहत तुकाराम महाराज तेरा दिवस माईच्या काठावर उपाशीपोटी बसून होते. पंचक्रोशीतील गावोगावाहुन आलेले लोक देहुत जमले, मुखोद्गत असलेले अभंग इंद्रायणीच्या साक्षीने दुमदुमू लागले. साक्षात पांडुरंग जणू जनता जनार्दनाच्या रूपाने मदतीस आला. संताजी जगनाडे महाराजांनी हे अभंग पुन्हा लिहून काढले. हा सामाजिक प्रक्रियेचाच भाग आहे. त्यांच्या ४२ वर्षाच्या आयुष्यात  त्यांनी अनेक दुःख सोसले, ते आत्मकेंद्री बनले आणि चिंतन करू लागले .त्या काळच्या कर्मठ विचारांचा तुकारामांसह त्यांच्या कुंटुंबियांना सुद्धा  प्रचंड त्रास झाला.

" सत्य असत्याशी  मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥

 या आपल्या विचाराने निरंतर ते कार्यरत राहिले. त्यांनी सत्याची कास कधीच सोडली नाही.संत तुकारामांची गाथा आज ३५० वर्षानंतर ही जगातील कोणत्याही कसोटीवर घासून -तासून बघा ती टिकतेच. आजही जीवनातील कोणत्याही प्रश्नाची उत्तर तुकारामांच्या गाथेत सापडतात.आज आपण कथा ,दंतकथा, चित्रपट, नाटके, कादंबऱ्या यासारख्या साधनातून आपल्या महामानवांच्या चरित्राचे चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करून त्यालाच सत्य मानतो. त्यामध्येच आपली धन्यता असते. आपण चिकित्सेशिवाय ते स्वीकारणे यामुळे मोठा घोळ होतो. आज तुकाराम महाराजांनी घालून दिलेला आदर्श हा सत्यासाठी आणि संघर्षाचा आहे. तो आपण जपला पाहिजे "आता उरलो फक्त उपकारापुरता" या भावनेने जगणारे संत तुकाराम यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांनी जनसेवेतच पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाचा पर्याय या जगाला दिला. आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगणारे,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा म्हणून सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,काळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज आकाशाएवढेच आहेत !


 " अनु रेणू थोडका ।तुका आकाशाएवढा ॥

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

*महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

 *महाराष्ट्रातील लोकप्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे*

      आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्रबोधनाची अखंड परंपरा लाभलेली आहे. महात्मा फुले यांच्या रूपाने महाराष्ट्रभरात एक नवक्रांती निर्माण झाली आणि एक विचारशील क्रांती पुरुष म्हणून त्यांचे साहित्य ,विचार व कार्य पुढील काळात  मार्गदर्शक ठरले .1890 मध्ये महात्मा फुले दिवंगत झाले आणि या प्रबोधनकारी चळवळीला शाहू महाराजांच्या रूपाने पुन्हा एकदा एक नवीन नेतृत्व मिळालं. राजकीय स्वातंत्र्या बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य किती महत्त्वाचे आहे हे जाणून शाहू महाराजांनी बहुजन समाजास ''गती" व "मती " देण्याचे कार्य केले . त्याच काळात शाहू महाराजांच्या सोबत सत्यशोधक चळवळीचे लोकप्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनीही काम केले .

      17 सप्टेबर 1885 ला पनेवल कुलाबा येथे जन्मलेले प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीमधील एक निडर ,चिकित्सक ,प्रखर प्रवक्ते,साहित्यिक ,लेखक,इतिहासकार तथा संपादक होते .त्यांनी आपल्या परखड व कठोर भाषेत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न अत्यतं प्रभावीपणे नुसते  मांडलेच नाही तर प्रत्यक्ष ते सोडविण्यासाठी  निर्णायक भूमीकाही घेतल्या .त्यांनी लिहलेल्या क्रांतीकारी साहीत्यात महात्मा फुले यांचा आदर्श जाणवतो .लोकहीतवादी आगरकरांचीही प्रेरणा दिसते .महाराष्ट्राच्या  धार्मिक,सामाजिक,राजकिय,सांस्कृतिक,साहित्य क्षेत्रात आलेले वादळच म्हणता येईल  त्यांनी  ,कला,साहित्य,नाटक,चित्रपट,वृत्तपत्र,छायाचित्रकार,शिक्षक,टंकलेखक,वक्ते,विचारवंत,इतिहासकार,पटकथा संवादलेखक आदि क्षेत्रामध्ये त्या काळात फार मोठे कार्य केलेले आहे अस कोणते क्षेत्र त्या काळात तरी उरले नव्हते की ज्या मधे प्रबोधनकारांनी काम केले नसेल़.

        त्या काळात बालविवाह, विधवा केशवपन, देवळा मधील पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही, अस्पृश्यता , हुंडाबळी याविरूध्द सदैव जागृत राहत लढा दिला.माझी जीवनगाथा या समग्र आत्मचरित्रपर वाड़मयात या विषयीचे अनेक प्रसंग त्यांनी लिहले आहे .त्यांचे वाड़मय वाचत असताना आपण जी "ठाकरे शैली" म्हणतो  ती खऱ्या अर्थाने जाणवते .जणू काही प्रबोधनकार स्वतः आपल्या समोर बोलत असल्याचा भास हे वाड़मय वाचतांना प्रत्येक वाचकाला नककीच होतो .हिंदू ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील म्हणजे प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे त्यांच्यामधील तोच बाणा आणि तोच परखडपणा आमच्या पीढीने बाळासाहेबांमधे पाहिला  हे प्रबोधनकारांच्या साहित्यामधीत शैलीवरून कळते . त्यांचे  साहित्य हे महाराष्ट्रातील तळागाळातीत लोकांच्या जीवनशैलीतील एक भागच होता . आपल्या प्रभावशाली इतिहासा बरोबरच त्यांनी सामाजिक समस्याची उकलही आपल्या साहित्यातून करण्याचे अनमोल काम केले .कोदंण्डाचा टणत्कार,दगलबाज शिवाजी,देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे,खरा ब्राम्हण,भिक्षुकशाहीचे बंड,हिंदू धर्माचे दिव्य ,ग्रामण्याचा इतिहास ही त्यांची काही गाजलेली साहित्य होय . माझी जीवनगाथा हे त्यांचे खंडमय आत्मचरित्र होय.याशिवाय  उठ मराठा उठ , श्री गाडगेबाबा, संस्कृतीचा संग्राम, काळाचा काळ, शेतकऱ्यांचे स्वराज्य, कुमारीकांचे शाप, रंगो बापूजी,वत्कृत्वशास्त्र व कला, समर्थ रामदास, पंडिता रमाबाई असे विविध साहित्याची विषय त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून हाताळले आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये फार मोठी वैचारिक चळवळ उभी केली. 

          प्रबोधनकार नेहमी म्हणायचे की "मी राजकारणी नसून समाजकारणी आहे. मी पुस्तकी सुधारक नव्हे, सुधारणाग्रणीची  पुस्तके वाचून किंवा व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूच्या सुधारणा वादाकडे वळलेला नाही. माझे बालपण व तारुण्य मुळात अशा काळात गेले की त्यावेळी पांढर पेशा समाजात संताप जनक रुढी बोकाळलेल्या होत्या." प्रबोधनकारांनी त्या काळात ओळखले होते की शहरी संस्कृतीत चार दोन लोक शिकून समाजामधे जागृती करून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देवू शकतो पण माझ्या तळागाळात अनिष्ठ रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांचे काय ? शहरी भागापेक्षा त्यांचा टक्काही फार मोठा होता .अभयाने लिहणारे व बोलणारे सत्वशील इतिहास भक्त म्हणून ख्याती असलेले प्रबोधनकार ठाकरे हे यामुळेच लोकप्रबोधनकार ठरतात .  

          माझी जीवनगाथा मधे ते लिहतात "ठाकरे " मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे.तेथे आजही ठाकरे घराणे असावी , पालकर ठाकरेंशी नावापुरता संबंध आला त्यापुढे नाही ."धोडपकर" असेही त्यांचे जादा आडनाव आहे. पण त्यांचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आड वळणाला फारसे कधी गेले नाही नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते इंग्रजांनी या किल्ल्याला वेढा दिला बरेच दिवस या धोडपकरांनी त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावरचा दाना- वैरण संपला आणि त्यांनी दिलेल्या निकरीचा लढयात  ते कामी आले. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत.त्यांचे आजोबा भिकोबा धोडपकरांनी हेच आडनाव पुढं आमरण चालविले. ठाण्यावरून त्यांच्या आजोबा यांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहान घर बांधले आणि धोडपकरांचे ते "पनवेल कर "बनले. आजोबांनी आमरण जरी धोडपकर आडनाव चालवले तरी त्यांच्या वडिलांनी मात्र शाळेत त्यांचे नाव घालताना " ठाकरे" आडनावाची पुनर्घटना केली आणि ती आजवर चालत आली आहे याच " ठाकरे " नावाची छाप आजही महाराष्ट्रावर दिसते .

        दशावतारी दारिद्रय अनुभवलेल्या या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एक वेगळेच वलय दिसते .बावीस वेळा आषाढी -कार्तिकेची वारी करणारे त्यांचे आजोबा प्रचंड स्वाभिमानी ,अभयी,विज्ञाननिष्ठ होते त्यांचे अनेक प्रंसंग जीवनगाथेत आहेत. प्लेगच्या देवीचा प्रसंग प्रत्येक वाचकाने वाचावा असाच आहे.

       प्रबोधनकारांचा या पुढील ज़ीवन प्रसंग अधिकच संघर्षमय आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणाऱ्या प्रबोधनकारांवर राजर्षी शाहू महाराजांनी पुत्रवत प्रेम केले .त्याना हे कार्य करत असतांना त्रासही झाला .पुण्यात तर त्यांच्या द्यरासमोर अनेकदा मेलेले गाढवेही टाकली गेली .जीवंतपणी स्वतः प्रेतयात्राही त्यांनी पाहिली पण,घाबरतील ,डगमगतील ते "ठाकरे " कसले!

        

"समाजपरिवर्तनाची ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तीमत्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते याचा प्रत्यय या आठवणीवरून येतो " प्रारंभीच्या काळात दारीद्राचे दशावतार बघावे लागले अनेक आघात सहन करावे लागले ,अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले असे सांगतात 

    कुसुमाग्रजांनी सांगीतलेल एक वाक्य प्रबोधनकारा बाबत मनात नितांत आदर अन उर्जा देणारे वाटते ''आर्थिक विवचंना असतानाही त्यांनी आपली लेखनी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही "

        या भूमीच्या दशेच्या काळात दिशा देण्याचे काम  विचारांशी  प्रामाणिक असलेल्या निर्भिड  लोकप्रबोधनकारांनी केले .प्रत्येक तरूणांनी त्यांचे साहित्य अभ्यासावे  येवढचं त्यांच्या जयंती निमित्ताने.............!


लोकप्रबोधनकारास विनम्र अभिवादन


संजय खांडवे

9011971122

शनिवार, १८ जून, २०२२

विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर

 विदर्भाची काशी- मार्कंण्डेश्वर


नागपूर पासून सुमारे दोनशे पंधरा किलोमीटर अंतरावर असणारे मार्कंण्डेश्वराचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे या मंदिराला भेट देण्याची संधी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला मिळाली. विदर्भात उन्हाची तीव्रता एवढी की अक्षरशः अंग लाहीलाही करत घामाघूम होत होते. 45 अंश तापमानात चंद्रपूर, गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून जाताना ही तीव्रता अधिकच जाणवते. नागपुर वरून चंद्रपूरचा प्रवास

















भद्रावती मार्गे तीन तासाचा, व पुढे चंद्रपूर  शहरातून बाहेर निघतात घनदाट जंगलाचा भाग लागतो .लोहारा -घंटा चौकी- चिचपल्ली मार्गे एक दीड तासाचा प्रवास करून मूल या गावाला आपण पोहोचतो .या दरम्यान बरेच अंतर घनदाट जंगलातूनच जावे लागते .आमची भ्रमंती संपूर्ण बस किंवा खासगी सार्वजनिक वाहतूकीतून सुरू होती.या अगोदरचे तीन मुककाम आमचे चंद्रपुरात असल्याने आम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत होतो . मूल हे तालुक्याचे ठिकाण त्या ठिकाणी आम्हाला तेथील नायब तहसीलदार श्री यश पवार साहेबांची खूप मोठी मदत झाली. ते मूळचे जळगावचे असल्याने अधिकच जवळीक! मुळात या नक्षलग्रस्त जिल्ह्याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. आमच्यासोबत लोकमतचे उपसंपादक विवेक चांदुरकर व इतिहासाचे अभ्यासक प्रमोद टाले हे होते. दोघांचाही इतिहास व प्राचीन वास्तू चा गाढा अभ्यास असल्याने हा मार्कण्डेंश्वर  निश्चित पावणारच होता. तहसीलदार साहेबांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला मार्कंडे श्वराकडे चामोर्शी मागे घेऊन निघाले. मूल पासून 30 किलोमीटर अंतरावर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगेच्या तीरावर हे मंदिर आहे. चामोर्शी हा गडचिरोलीतील तालुका या तालुक्यात हे मंदिर येते. चामोर्शी पर्यंत रस्ता चांगला आहे परंतु तेथून मार्कंण्डेश्वराच्या मंदिरापर्यंत रस्ता थोडा कच्चा आहे.गावात पोहचताच 'मराठा ' धर्मशाळा दिसते . असे सांगितले जाते की, गाडगेबाबा यांच्या प्रेरणेने ही मराठा धर्मशाळा येथे उभी राहिली. राम प्रसाद महाराज जयस्वाल यांनी ती पुढे नेण्याचं काम केलं .थोडेसे समोर गेले की मंदिरांचा समूह दिसतो व समोर असलेले वैगंगेचे विस्तीर्ण पात्र आपल्या नजरेस पडते. दक्षिण वाहिनी वैनगंगा इथे वळसा घालून उत्तरवाहिनी होते. येथील वालुकामय भाग हा जणू समुद्रच भासतो. साधारणपणे भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये मोठमोठी शहरे, सांस्कृतिक व धार्मिक केंद्रे ही नदीच्या काठावरच वसलेली आहेत. त्यापैकीच एक मार्कंण्डादेव म्हणजेच मार्कंण्डेश्वराचे मंदिर ,विदर्भाची काशी !

         विदर्भातील मंदिराचा विचार केल्यास जवळपास सर्वच जिल्ह्यात प्राचीन मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे यादवकालीन किंवा त्यापुढील कालखंडातील आहेत. हे मंदिर मात्र यादव काळा पूर्वीचे आहे. साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकातील हे मंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.  विदर्भातील यादवकालीन सर्वच मंदिरे ही काळ्या दगडातील आपणास घडविलेली दिसतात, पण महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर याला अपवाद आहे. याची घडण ही लाल पाषाणातील आहे. खजुराहो शिल्प घडणीशी  या मंदिरातील शिल्पाचे साम्य आढळते. नागर शैली मधील ही मंदिरे आहेत खजुराहो मध्ये सुद्धा याच शैलीचे मंदिर आढळतात. म्हणूनच विदर्भाची काशी म्हणून या मंदिराला संबोधले जाते. केवळ ही दुर्गम भागात असल्याने या पवित्र अतिप्राचिन वास्तूकडे पर्यटक जरा कमीच दिसतात. प्राचीन पुराणकथा नुसार मुंडक ऋषिस  शिव कृपेने मार्कंण्डेय यांचा जन्म झाला मार्कंण्डेयास १६ वर्षांचेच आयुष्य लाभले होते, पण शिव कृपेने व भक्तीने ते यमा पासून  मुक्त झाले असे सांगितले जाते. पूर्वी या ठिकाणी तेवीस-चोवीस मंदिरांचा समूह होता. आता पुरातत्व विभागाने या वास्तूस संरक्षित केले असून मंदिराची झालेली पडझड ही शास्त्रीय पद्धतीने जिर्णोध्दारीत करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंदिरासह इतर काही मंदिराचे शिखर कोसळलेले आहे. बऱ्याच छोट्या मंदिरांचा केवळ सांगाडाच येथे उभा आहे. शेकडो वर्षापासून ही मंदिरे येथे उभी आहेत. या मधील काळात त्यांनी अनेक राजकीय ,सामाजिक, धार्मिक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. नैसर्गिक संकटाचा ही सामना केलेला आहे. भव्य दिव्य वैनगंगेच्या काठावर असल्याने प्रचंड महापुरे देखील सोसली असतीलच यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झालेली दिसते पण आता या मंदिराचे चांगले काम सुरू आहे.

         नदीच्या बाजूने मंदिरसुहात येण्यास एक द्वार व समोरील बाजूस एक मुख्य प्रवेशद्वार आहे द्वारावर सुंदर दगडी शिळांचे गोपूर निर्मिले आहे. आजही ते मजबूत स्थितीत उभी आहे. द्वाराच्या दगडी चौकटीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही बाजूनी छोटे-छोटे यक्ष या गोपूरास तोलून धरणारे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला संपूर्ण मजबूत तटबंदी असलेल्या या मंदिराच्या तटबंदीवर जाण्यासाठी अर्धवट दगडी जिना आपल्याला दिसतो.पूर्वी या तटबंदीवरून टेहाळणी करता येत असावी.  समोरच शिवलिंग ठेवलेले एक महाकालेश्वराचे छोटे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर देव-देवतांचे शिल्पे आहेत त्याच्याच समोरासमोर वरदविनायकाचे व तेवढेच सुस्थितीत असलेले लहान मंदिर आहे. सुरसुंदरी व गज शार्दुल शिल्पे या मंदिराच्या खालील भागात कोरलेली आहे. पुढच्या भीमाशंकर मंदिराच्या बाहेर डमरुधारी शिवपार्वती व मंदिराची ही शिल्प या मंदिरासमोर आहेत. बाजूलाच अनेक देवदेवतांची सुंदर शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आहेत .चौरंगावर बसलेल्या पार्वतीसह महादेवाचे अत्यंत सुंदर शिल्प हे सांगाडा उभा असलेल्या एका छोट्या मंदीराच्या समूहांमध्ये आपल्याला दिसून येते.

    समोरच आपल्याला मुख्य मंदिराचे दर्शन होते. तीन प्रवेशद्वार असलेले सभामंडपा सह गाभारा अशी रचना आहे. सभागृहाच्या भिंती नव्याने बांधलेल्या दिसतात.गाभार्‍याच्या द्वारावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले आहे. खांबावर साखळीत लटकवलेल्या घंटांचे शिल्प कोरलेले आहे. त्याखाली अत्यंत सुंदर अशी श्री गणेशाची मुर्ती शिल्पे सुद्धा आहेत. गाभार्‍यातही देवांगणा गजशार्दूल ही शिल्पे आहेत .मुख्य खांबावर यक्ष मंदिराचा भार सांभाळतानाच शिल्प आहे .आतील बाजूस सुंदर नक्षीकाम पट्टी आहेत. ब्रम्हा ,विष्णू महादेवाची ही सुंदर शिल्पे या सभामंडपात कोरलेली आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच नदीच्या बाजूला एक नंदीमंडप होता. आता तो तुटलेला असून त्यावरील छत सुद्धा कोसळलेले आहे नंदी साठी नदीच्या बाजूने केलेले भव्य  नंदीमंडप याठिकाणी असावा असे यावरून दिसते. मुख्य मंदिराच्या समोर एक नंदीची रचना होती मुख्य मंदिरा बाहेरील भागात चारही बाजूने कीर्तिमुखे कोरलेली आहेत. त्या किर्तीमुखा च्या खाली सुंदर असे आम्रपालीचे शिल्प एका ठिकाणी आपल्याला दिसते.  मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत सुबक अशी शिल्पे कोरलेली आहेत यामध्ये देवी-देवता, शिव ,भैरव सुरसुंदरी, नृत्य अप्सरा, अजस्त्र व्याल ,त्रिमुख ब्रम्ह ,कालभैरव, जगदंबा ,लक्ष्मी, पार्वती अष्टदिग्पाल, ब्रम्हा सरस्वती ,विष्णू ,पदम निधी ,कार्तिकेय ,नृत्य गणेश ,सूर्य आदींची शिल्पे आपल्याला या ठिकाणी दिसतात आजही ती जिवंत असल्याचाच भास आपल्याला या ठिकाणी झाल्याशिवाय नाही. या व्यतिरिक्त मंदिराच्या समूहामध्ये यमधर्म मंदिर, मुर कुंड ऋषी मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ध्यान मंदिर, मृत्युंजय मंदिर ,उमा शंकर मंदिर ,दशावतार मंदिर ,गणेश मंदिर, आदिशक्ती महिषासूर्मर्दिनी मंदिर, महाकालेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर आधी देवदेवतांची स्वतंत्र मंदिरे आहेत बहुतेक मंदिरावर आमलक व कळस आजही दिमाखात उद्या असलेले आपल्याला दिसतात मुख्य मंदिर मात्र याला अपवाद आहे मुख्य मंदिराच्या द्वारा समोरच आता भैरवाच्या उभ्या स्थितीतले भव्य दोन शिल्प लावण्यात आलेली आहेत त्यामधील नक्षीकाम हे जिवंत असलेले जाणवते उभ्या भैरवाच्या मुकुटा मधील कीर्तिमुख स्पष्ट दिसतो मुंडन माला धारण केलेल्या या दोन शिल्पांमध्ये कमालीचे साम्य जाणवते ती एकाच शिल्पकाराने घडविली असावे असे वाटते .

     महिषासुर मर्दिनी मंदिराच्या सरळ रांगेत आठ छोट्या मंदिरांचा समूह आहे .यांच्या कळसाची रचना पिरॅमिड स्वरूपाची आहे. यामध्ये या परिसरातील अनेक देव देवतांची शिल्पे  सुरक्षित ठेवलेली दिसतात. काम सुरू असल्याने प्रत्येक शिल्प पाहणे शक्य नव्हते, या शिल्पांमध्ये सुरसुंदरी, देवांगना, मातृका, नृसिंह, वर्धमान ,वराह देवता आदी शिल्पे आहेत बाहेरील काम सुरू असल्यामुळे मंदिराच्या प्रत्येक शिळेला व शिल्पाला नंबर कोडिंग करून योग्य त्या ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे .पडलेल्या अवशेषांमध्ये मंदिरांचे आमलक ,उदयता, विर जा ,जागृता ,गजा कांता शिल्पे अजूनही जिवंत वाटतात मकरीका सिंहाचे म्हणजे व्यालाचे भाग मकरासारखे असलेली सिंह असे सिंह पुढच्या भागात स्थापित केलेले असतात अशी शिल्पे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. शिवलिंग सुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये आहेत वीरगळ असलेले शिल्प सुद्धा येथे आढळते. यापैकीच एक दंतेश्वरी स्तंभ आहे सर्वात वरच्या भागात कीर्तिमुख त्याखाली श्रीकृष्णाचे शिल्प शिल्प एका बाजूस आपल्याला बघावयास मिळतात अनेक मोठमोठ्या दगडी शिळा देखील या ठिकाणी दिसतात.रामायणातील जटायु प्रसंग,राम रावण युद्धाचे सुंदर शिल्पे एका पट्टीत कोरलेले आहेत .गजशार्दूलाचे अनेक शिल्पे आहेत .

      एवढे वैभव शेकडो वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात होते .ज्या काळात राज्यात राजकीय स्थैर्य व आर्थिक सुबद्धत्ता असते त्याच काळात अशी उच्च कोटीची कला असलेली महान कार्य होत असतात. विद्या व कलेचा हा अभूतपूर्व संगम म्हणजे ही वास्तू होय .पुराणकाळात एकूण 32 विद्या आणि चौसष्ठ कला सांगितले आहेत याच कलेच्या माध्यमातून हे निर्माण झाले या निर्माण यामागील भाव शोधणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक शिल्प हे आपल्याला एक स्वतंत्र संदेश देते. प्रत्येकाच्या निर्माण यामागे एक भाव एक विचार एक तत्वज्ञान एक संदेश आहे. हे आज आपण शोधून आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करणे गरजेचे आहे. एवढी आशा आपण आपल्या प्राचीन वारसा कडून निश्चितच घेऊया व आपल्या पूर्वजांनी या अशा महान वास्तू निर्माण केल्या त्या केवळ आणि केवळ आपल्याला काहीतरी चांगला संदेश देण्यासाठी आहेत .याचा शोध आपण निश्चितच घेतला पाहिजे अन्यथा काळाच्या ओघात या अशाच झिजत राहतील आणि आपण मात्र यापासून वंचित राहू !

आपल्या प्राचीन वारशाला न्याहाळत असताना प्रचंड उन्हातही त्याचा त्रास जाणवला नाही याचं कारण एकच जे बघत होतो ते अलौकिक होते .



➖➖➖➖➖➖➖

संजय खांडवे

बुलढाणा 

9011971122

➖➖➖➖➖

बुधवार, १ जून, २०२२

अहिल्याबाई होळकर

 *लोककल्याणकारी मातोश्री अहिल्यादेवी*


२२०० वर्षापूर्वी नर्मदातटापासून दक्षिणमार्गावर सातवाहनांचे अत्यंत प्रगत व आर्थिक संपन्न असलेले राज्य होते याची साक्ष आपणास आजही या प्रदेशातील प्राचीन वास्तु पाहिल्यावर लक्षात येते .त्याकाळात शैलगृहे,लेण्या व पहारेकरी म्हणून गडकोट व मार्ग,पाणवठे हया वास्तु आजही अवशेष रूपाने कमी अधिक आपले अस्तीत्व टिकवून उभी आहेत. हया सातवाहनांची महत्वाची स्त्री नागनिका हीचा नाणेघाटातील  शिलालेख  आजही उपलब्ध आहे .त्या काळातील गौतमीपुत्र सातकर्णी,वसिष्ठापुत्र पुलुमावी,यज्ञश्री सातकर्णी या कर्तबगार महिलांचे राज्यव्यवस्थेतील व समाजजीवनावर असलेले प्रभूत्व लक्षात येते .हजारो वर्षानंतर पुन्हा असेच म्हणावे लागेंल की होळकर साम्राज्यास देवी अहिल्या च्या रूपाने याच भागात एक आदर्श राज्यकर्ती या रूपाने म्हणून जनमानसात एकरूप झाल्या. त्यांच्या काळातही भव्य दिव्य अशा मंदिराचे निर्माण तथा जीर्णोद्धाराचे कार्य झाले. संपूर्ण भारतभर विहिरी, पाणवठे,बारव, धर्मशाळा, तलाव,मार्ग आदी समाजपयोगी वास्तूचे निर्माण केले गेले. त्यांच्या धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक व राजकीय कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे .*''मी जे काही करणार आहे ते राज्याच्या आणि प्रजेच्या हितासाठीच असेल ."* या वाक्यातून त्यांच्या  लोककल्याणकारी कार्याची  प्रचीती येते. सामाजिक बंधने असतानासुद्धा अहिल्यादेवींच्या सर्वगुणसंपन्नते विषयी तसेच त्यांचे शौर्य, धाडस, बुद्धिमत्ता, प्रशासन ,मुत्सद्दीपणा,  निर्भीडपणा, ज्ञानलालसा,  औदार्य, सामान्य आचरण, स्वाभिमान, जिद्द ,अचूक न्यायदान ,प्रजाहितदक्ष ता, निर्सगवात्सल,भूतदया,सावधानता,निर्णयक्षमता या गुणांचे विवेचन होणे तेवढेच आवश्यक वाटते.

      *होळकर वंशींयांचा आधारवड मल्हाराव होळकर*

पुणे शहरापासून जवळच नीरा नदीचा एक ओहळ  त्या ठिकाणी असलेले हे .'होळ 'गाव आणि या गावात राहणारी होळकर. मल्हाररावांचे पितृछत्र  लहानपणीच हरवले. त्यांच्या वाट्याच्या जमीनीवरही भाऊ बंधकीची नजर त्यांना त्रासदायक झाली .त्यांची आई मल्हाररावांना घेऊन  भाऊ भोजराज बारगळ यांच्याकडे घेऊन आल्या. त्यांचे मामा हे तळवडे गावचे अधिकारी होते. त्यांना मामांचा आधार मिळाला. पुढे आपली मुलगी गौतमी यांच्याशीच त्यांनी मल्हाररावांचा विवाह लावून दिला. आपल्या गुणांच्या जोरावर स्व पराक्रम मल्हाररावांनी गाजवले. आपल्या मामासोबत त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली .मोहिमेतील पराक्रमामुळे व मावळ प्रांतातील विजयामुळे पेशव्यांनी त्यांना मावळ प्रांताची जबाबदारी दिली. मराठा साम्राज्याचा होळकर घराणे एक मोठे आधारस्तंभ बनले. त्यांची कर्तबगारी, पराक्रम, मुत्सद्दीपणा यामुळे त्यांना बरेच दचकून राहत असत. उत्तर भारतात मल्हाररावांचे सैन्य 30 कोसावर असतानाच "मल्हार आया ! मल्हार आया ! "अशी भययुक्त घोषणाच शत्रू देत सुटायचा . एवढा त्यांचा दरारा होता. आपला पुत्र खंडेराव यांच्यासाठी माणकोजी शिंदे यांची कन्या त्यांनी निवडली. त्यांच्या पहिल्याच भेटीत अहिल्येला ओळखले. हा  भविष्याचा वेध घेणारा पारखीपणा मल्हाररावांच्या व्यक्तीमत्वात होता .होळकर साम्राज्याची तारणहार म्हणून पुढच्या काळात त्या पुढे आल्या. मल्हारराव अत्यंत प्रेमळ, आई गौतमी आणि मल्हारराव यांनी पुत्रवत प्रेम  अहिल्येवर केले त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ही त्यांनी मोठी मेहनत घेतली .सून  म्हणून ते कधीच अहिल्येसोबत वागत नसत. लढाईच्या निमित्ताने मल्हाराव बहुतेक बाहेर असत. त्यावेळी त्यांच्या सूचनेप्रमाणे अहिल्यादेवींनी राज्य चालविले त्यांनी पाठवलेल्या पत्रांच्या आदेशानुसार त्या कार्य करत .बऱ्याच वेळा त्या त्यांच्या सोबत युद्धातही जात असत .आपल्या पराक्रमी सासऱ्याचा अवमान होईल असे कृत्य आपल्याकडून कधीही घडू नये याची त्यांनी कटाक्षाने दक्षता घेतलेली दिसते. मल्हाररावांचे जेवढे प्रेम आपल्या प्रजेवर होते तेवढेच त्या देखील आपल्या प्रजेला जपत असत. भारतीय संस्कृतीचे आदर्श उदाहरण म्हणजे मल्हाररावांचे कुटुंब होते. पेशव्याकडे मल्हाररावांना मोठा मान होता त्यांनी आपल्या भाऊ बंदास पुढे इंदूरला आणले व आपला प्रचंड दबदबा निर्माण केला. १७६६ मध्ये प्राण सोडला.


*आदर्श लोक माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी*

जी माणसे सत्याची साथ देतात दुर्बल, असाह्य लोकांच्या बाजूने उभे राहतात त्यांचा इतिहास लिहिला जातो. अहिल्यादेवी च्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासूनच संघर्षांची मालिका होती. त्यांना अनंत संकटांना तोंड द्यावे लागले. एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात जात असताना ,कुटुंबा सोबतच आपण एका राज्याचे महत्वाचे घटक,एका कर्तबगार पुरूषाची सून तथा भविष्य आहोत याची जाणीव त्यांना होती. त्यावेळी त्यांचे वय केवळ 8-9 वर्षांचे होते *आदर्श पत्नी, आदर्श सून ,आदर्श राजमाता* असा त्यांचा पुढचा प्रवास लोकाभिमुख आदर्श राज्यकर्ते असण्याची साक्ष देतो. रणांगणावर पराक्रम गाजविणारे खंडोजी हे आदर्श माता गौतमी कर्तबगार पराक्रमी मल्हाररावांच्या छत्रछायेत वाढले. रणभूमीवर त्यांनी पराक्रम गाजविले पण इतिहासाने त्यांचे पान पुढच्या काळात तुमच्या आमच्या सत्यशोधनासाठीच  सोडून दिले की काय  असे वाटते. सुरजमल जाट यासोबत लढतांना खंडोजीरावास वीरमरण आले .वयाच्या 29व्या वर्षीच अहिल्यादेवींना वैधव्य आले .त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपल्या आप्तांचे असंख्य मृत्यू पाहिले, पण त्या स्थितप्रज्ञ राहिल्या. कधीही त्यांनी आपल्या दुःखाचे भांडवल केले नाही. उलट त्या हे घाव सोसत अधिकच कणखर बनत गेल्या. ज्या काळात विधवा स्त्रीचे दर्शनही अपशकुन मानले जायचे त्या काळात त्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. खंडोजी पाठोपाठ सती जाण्याच्या अहिल्येला  मल्हाररावांनी रोखले. *"होळकरांचे मावळा साम्राज्य आपल्या प्रयत्नाने मोठे झाले आहे. जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करायचे आहे. हे आपणच म्हणाले होते" "अहिल्या "!* आपल्याला या राज्यासाठी या प्रजेच्या हितासाठी थांबावेच लागेल. तेव्हा त्यांनी सती न जाण्याचा निश्चय केला आणि शुभ्र वस्त्र धारण करून होळकर साम्राज्याची दोर आपल्या हातात घेतली.   1766 मध्ये मल्हारराव त्यांना सोडून गेले .अहिल्यादेवीना मालेराव नावाचे एकमेव पुत्र होते .21 वर्षी त्यांना सरदारकी मिळाली   1767 मध्ये मालेरावही गेले त्या पाठोपाठ जावाई यशवंतराव फणसे सुद्धा कॉलरने गेले .मुलगी मुक्ता देखील सती गेल्या, एवढा प्रचंड दुःख या लोक मातेने सहन केले केवळ प्रजेसाठी अन प्रजेच्या कल्याणासाठी आपण खंबीर राहणे ही काळाची गरज आहे . ही मल्हाररावांची शिकवण त्यांच्या सोबत होती.

      आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी लावले . प्रशासनात त्या अगदी चाणाक्ष व प्रसंगी कठोरही असत .एकदा त्यांचे पती खंडेराव यांनी सरकारी खर्चाची रक्कम व्यक्तिगत खर्चासाठी काढली. त्यावेळी त्यांनी खतावणी पाहून त्यांना लेखी जवाब मागितला होता. सोबत 25 मोहराच्या दंडही केला होता.प्रत्यक्ष नातं सुद्धा त्यांनी राज्यहिताच्या आड येऊ दिले नाही .कित्येक वेळी त्यांनी मल्हाररावांना सुद्धा सूचीत केल्याच्या घटना आहेत .  खंडणीदाराच्या प्रगतीमध्ये आपल्या राज्याची प्रगती आहे. याची जाण त्यांना होती त्या कधीही खंडणीदारांना विनाकारण त्रास देत नसत. त्यामुळे कोणी टाळाटाळही करत नसे. पण असे आढळल्यास त्या प्रसंगी पत्र पाठवून ताकीदही देत असत. खरगोन गावातील तापी दास व बनारसीदास हे दोन सावकार होते. दोघेही निपुत्रिक होते. त्या दोघांचाही अचानक मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने निर्णय घेतला आता आपल्याकडे असलेले दोन लाख रुपये राज्याच्या रक्षणार्थ अहील्यादेवीस द्यावे ,पण अहिल्यादेवींनी ते पैसे नाकारले हा पैसा तुम्ही दान- धर्मात व लोकांच्या समाज उपयोगा मध्ये खर्ची घाला. असे सांगितले याचा अर्थ आपल्या राज्याचा कोष विधायक मार्गानेच वाढवला गेला पाहिजे हे त्यांचे धोरण होते.

   आपल्या राज्यात शांतता कशी नांदेल यावर त्यांचा भर अधिक असे युद्ध आदी गोष्टी त्यांनी होईल तोपर्यंत टाळलेले दिसतात. अवास्तव सैन्य वागविणे व अगदी दुर्लक्षही करणे याचा समतोल त्यांनी साधला.लष्कराचा त्यांवर प्रचंड विश्वास होता .आपल्या मायेचे छत्र त्या धरून होत्या . महिलांना शिक्षित करून त्यांची स्वतंत्र फौज उभारणाऱ्या त्या काळातील  पहिल्याच राज्यकर्त्या म्हणावे लागेल. परंपरेला चिकटून राहून त्यांनी कधीच काम केले नाही. संभाव्य धोक्याची कल्पनाही त्यांना लगेच येत असे. वसई घेण्याचा डाव इंग्रजांचा होता हा धोका त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पेशव्यांना संदेश दिला व आम्ही मदत करायला तयार आहोत असे सांगितले. समस्त संस्थांनीकांनी एकत्र येऊन आपण इंग्रजांशी लढले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी केल्या .*"इंग्रजांचा वार म्हणजे अस्वलांच्या गुदगुल्या, व्याघ्रदि श्वापदे व युक्तीप्रयुक्तीने मारतील ; परंतु अस्वलाचे मारणे फार कठीण आहे .सुरत धरून मारले तरच मरेल. नाही तर अस्वलाचा चपेटीत कुणी सापडले तर गुदगुल्या करूनच त्यास अस्वल मारील",*

 पण या सूचनेकडे कोणी लक्ष दिले नाही याचे परिणाम पुढे दोनशे वर्ष या देशाने भोगले.

       युद्धनीती मधील एक निर्भीडपणा चा प्रसंग सांगता येईल पुत्र मालेराव यांच्या मृत्यूनंतर होळकर गादीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गंगोबातात्या ने देखील अहिल्यादेवींची साथ सोडून पेशव्यास जाऊन मिळाला.  राघोबा पेशवा पुण्यातून सैनिक घेऊन होळकराचा राज्यावर निघाला होता. ही माहिती सदैव तत्पर असलेल्या होळकर साम्राज्याच्या गुप्तहेर खात्याने दिली . खंबीरपणे संकटास तोंड देण्यास उभे राहून तुकोजी होळकरनां पत्र लिहिले *"पिंडाला कावळा शिवला".* शिंदे, पवार ,गायकवाड या मराठा सरदारांना पत्र पाठवले *"जेवत असाल तर हात धुण्यास महेश्वरी या"* होळकरांच्या लोककल्याणकारी मातोश्रीच्या मदतीस ही मंडळी सदैव तत्पर असत .

   राघोबा पेशव्यास त्यांनी पत्र लिहिले *"आमच्या पूर्वजांनी लाचार होऊन हे राज्य मिळविले नाही .आपल्या रक्ताचे पाणी करून त्यांनी हे उभं केलंय. मला अबला असह्य समजण्याची चूक करू नका .आमच्या राज्याकडे कुणी डोळा वर करून पाहिले तर आमची तलवार चालेल. आम्ही हरलो तर एका स्त्रीच्या शौर्याचा इतिहास  लिहिल्या जाईल; पण आपण हरलात तर एका स्त्रीने हरविले असा इतिहास लिहिला जाईल. आपण तोंड दाखविण्याच्या योग्यतेचे राहणार नाही."*

 आपल्या राज्या शेजारील राज्यांची सुद्धा त्यांचे संबंध सलोख्याचे होते दिवाळी, भाऊबीजीला त्यांना बहिण म्हणून भेटही पाठवत असत.

     समाजातील अनिष्ट रूढी वर त्यांनी कृतीतून प्रहार केले. *जी परंपरा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते ती परंपरा आम्हाला मान्य आहे. प्रकाशाकडून अंधाराकडे नेणाऱ्या परंपरेस त्यांनी अंधश्रद्धा म्हटले .*  स्वतःची मुलगी मुक्ता ही राजकन्या होती त्यांचा त आंतरजातीय विवाह  लावून दिला . भिल्ल रामोशी लोक त्या काळी लूटमार करत त्यांचा बंदोबस्त करणाऱ्यास जावई करण्याची घोषणा त्यांनी केली होती. यशवंतराव फणसे यांनी ती पार पाडली त्यांचा बंदोबस्त केला त्यावेळी भिल्ल रामोशी यांना पगारी सेवेत त्यांनी घेतले. त्या काळात या जमातीच्या विकासाठी  प्रगतीसाठी भरीव आर्थिंक तरतूद करुन त्यांना सन्मानपूर्वक समाजाच्या प्रवाहात आणले. *हुंडाबंदी, बालविवाह बंदी, सती जाणे बंदी ,केशवपन वर बंदी , पडदा पद्धतीवर बंदी विधवा विवाहास प्रोत्साहन, मुले दत्तक घेण्यास मान्यता*, आदी समाज सुधारणा घडवून त्यांनी अलगदपणे या समाजातून बाजूला काढल्या.

     दान धर्माच्या बाबतीत त्यांचे कार्य अलौकिकच मानावे लागेल. *या हाताने दिलेले दान त्या हाताला सुद्धा त्यांनी समजू नये अशी त्यांची निर्मळ भावना होती.* त्यांनी केलेल्या दानाचा वाजागाजा सुद्धा कधी त्यांनी केलेला दिसत नाही.  गौतमी बाई यांच्या खाजगी जहागिरी पुढे त्यांनी अहील्यादेवीस दिली . यामधून म्हणजे आपल्या खाजगी निधीमधून त्यांनी ही समाज उपयोगी धार्मिक दानधर्माचे काम केले. कोट्यावधी रुपयाच्या केलेल्या खर्चाची माहिती सुद्धा आकडा रूपाने इतिहासाला माहीत नाही; पण कार्य मात्र संपूर्ण भारतभर झालेले दिसते.  सर्व रयतेकडे त्या समदृष्टीने बघत. यामध्ये गरीब-श्रीमंत कृषक मजूर किंवा संकुचित धर्मभावना देखील त्यांनी ठेवले नाही आपल्या राज्यात मंदिर ,मशीद  व दर्गा आदींसाठी सुद्धा त्यांनी द्रव्य खर्च केलेले दिसते.

यासाठी देणगी स्वरूपाचा भार त्यांनी कधीच रयते वरती टाकलेला दिसत नाही.

      *काशी,सोमनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, नाशिक, गया, जगन्नाथपुरी ,अमरकंटक, आनंद कानंन,वेरूळ, मथुरा ,रावेर ,रामेश्वर, द्वारका, निळकंठ महादेव, कोल्हापूर, अलमपुर, जेजुरी, पैठण, गंगोत्री ,केदारनाथ ,भैरव, अन्नपूर्ण ,महेश्वर* या संपूर्ण भारतभर असलेल्या ठिकाणी त्यांनी मंदिर जीर्णोद्धार तसेच नवनिर्माण कार्य केले . पशुपक्षी प्राणी तसेच मानवी कल्याणार्थ त्यांनी बारवविहिरी, कुंड, घाट, धर्मशाळा, मार्ग, तलाव ,अन्नछत्रे या गोष्टींसाठी सुद्धा खर्च केला. या कार्यामागचा उद्देश त्यांचा खूप मोठा होता या माध्यमातून मोठा रोजगार लोकांना निर्माण झाला . कलाकुसरी करणाऱ्या हातांना त्यांची कला दाखवून काम मिळाले. पर्यटनास चालना मिळाली .त्या त्या परिसरातील उद्योग व्यवसाय वाढले. पर्यायाने राज्याचे उत्पन्न वाढले ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे  देशाच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत प्रवास करताना लोकांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक ऐक्य टिकण्यास मोठी मदत झाली .संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. त्यांचा उद्देश नवनिर्माणाचा होता जीर्ण तुटलेल्या शिळा त्यांना नवनिर्माण करण्यास खुणवत होत्या. तोडून मोडून नवनिर्मिती त्यांना मान्य नव्हती,या साठी होणारा खर्च खाजगी कोषातून हा एक आदर्शच होता .

       नर्मदा नदीच्या तीरावर त्यांनी महेश्वर हे भव्यदिव्य नगर वसविले. व्यापारपेठ निर्माण केली. सोनार, कुंभार, विणकर वसविले. महेश्वरी येथील वस्त्रे आजही प्रसिद्ध आहेत. कुटीर उद्योगाला चालना मिळाली. मंदिरे, घाट तयार केली. जंगलतोडीला विरोध करून वृक्षलागवडीस प्रेरणा दिली. महिलांसाठी शिक्षण खुले केले.आरोग्य क्षेत्रातही भरीव काम माहेश्वरी नगरीत झाले . आजही महेश्वर ला गेल्यावर वैभव आपणास दिसते . *पुण्याचे पुण्य द्वार म्हणजे महेश्वर* असे पेशवे म्हणत. पेशव्यांनीही *मातोश्री अहिल्यादेवी* या आदराने त्यांना सन्मान दिलेला दिसतो. अनेक समकालीन कवींनी अहिल्यादेवींची आपल्या काव्यात स्तुती केलेली आहे. कवी मोरोपंत आपल्या आर्या या काव्य प्रकारात म्हणतात 

*श्री भक्ता अहिल्ये वरा धरा भूषा*

हरिपंत कवी

*देवी अहिल्या शुद्धमती तू सर्वांची माता ।*


*ईश्वर आला तुझे स्वरूपे होऊनी आता ।*

 कवी अनंत फंदी सुद्धा अहिल्यादेवीची आपल्या साहित्यातून गुणगौरव गाताना दिसतात. एवढंच सांगावसं वाटतं आजही या *गंगाजल निर्मल* तेजस्विनी लोकमातेचा इतिहास जाणून घेण्यासाठी साहित्य अपुरी आहेत,हे त्यांची माहीती मिळवतांना लक्षात आले . हा इतिहास समोर आला पाहिजेत आजही मातोश्रींचे होळकर साम्राज्य या जिर्णोध्दारीत वास्तू तुमच्या संशोधनात्मक लेखन इकडे आस लावून आहेत. 



*संजय खांडवे,बुलढाणा*

9011971122

बुधवार, ६ एप्रिल, २०२२

पितळखोरा लेणी

 *पितळखोरे लेणी- महाराष्ट्रातील प्राचीन अविष्कार*


लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली .हा कालखंड इस पूर्व ४९१ ते ४५९ हा आहे म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षा अगोदर ह्या शैलगृहाच्या निर्मितीस सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो. नागार्जुन , सीतामढी येथे सुद्धा इस. पूर्व 252 ते 200 या कालखंडात लेण्या खोदल्या गेल्या. सुदामा, विश्वमित्र, कर्णकौपर, लोमेश ऋषी या लेण्या आहेत यापैकी सुदामा ही प्राचीन आहे त्याला न्युग्रोध गुंफा म्हणतात.

           यानंतर इ स पूर्व दुसऱ्या शतकात नर्मदा पार करून   महाराष्ट्रात पितळखोरा या ठिकाणी पहीला प्रयोग झाला .अनेक दिवसापासून या लेणीबद्दल प्रचंड आतुरता होती की ही लेणी करावी .लेणी बघणे व समजून घेणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत .त्यामुळे या आपल्या प्राचीन वारश्याला समजून घेण्यासाठी कुणीतरी जाणकारच लागेल यात शंकाच नाही .नवी मुंबई येथील सूरज रतन जगताप या लेणी अभ्यासकांशी माझा संपर्क झाला .विशेष म्हणजे "पितळखोरा "हा त्यांचा मुख्य अभ्यासाचा विषय होता .गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे या लेणीवर सवर्धनासह काम सुरु आहे .त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभरातून या आपल्या प्राचीन वारश्यावर प्रेम करणारे अभ्यासकासह एकत्र आलो व गौताळा अभयराण्यातील पितळखोरा या ठिकाणी एकत्र येऊन दिवसभर जगताप सराच्या सोबत राहून लेणी समजून घेतली .महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पण आजही दुर्लक्षितच असलेली दिसते .पुरातत्व खात्याचे काम आता बऱ्यापैकी दिसते पण पर्यटनाच्या बाबतीत आजही ही महत्वाची लेणी मागेंच आहे .आमची टिम त्या लेणी परिसरात पोहचताच आगे मोहळ उठल्याची आवई आम्हाला कळाली पण अभ्यासकांच्या अनुभवावर आम्ही पुढे निघालो परत येणारे दोन हौशी पर्यटक भेटले आणि ती आवईच ठरली .या लेणीचा उल्लेख टॉलमीच्या मेट्रीला या ग्रंथात आढळतो.महामयुर या बौद्ध ग्रंथातही 'पितलांग्य' असा उल्लेख आढळतो .सोपारा,कल्याण ,भरूकच्छ यासारख्या देशार्तगत बंदराला जोडणाऱ्या पैठण व तेर या व्यापारी मार्गावर आहे .उज्जैन वरून पूर्वी याच मार्गाने प्रतिष्ठाणशी संपर्क होता व पुढच्या काळात तो अजिठा ,घटत्कोच या मार्गाने वाढला व दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा घटली व पितळखोऱ्याचा विकास कमी होऊन अजिंठा अधिक विकसित होत गेले याचे दुसरे कारण पितळखोऱ्याचा दगड असावा असेही दिसते .याच भागात सातवाहन कालिन भोकरदन (भोगवर्धन)हे शहरही व्यापारी दृष्टया फार प्रगत होते .नुकतेच सम्राटअशोक कालिन भोन येथील प्रगत अश्या शहराचे संशोधन सुरू आहे ते सुध्दा या स्थानापासून जास्त दूर नाही .

    पितळखोरा लेणी ही हीनयान लेणी आहे.या लेणीच्या समकालिन अंजिंठयातील ९ व १० क्रमाकाची लेणी आहे .ही लेणी सुद्धा अजिंठयासारखीच नालाकृती आहे .अरुणा नदीच्या उगम प्रवाहावर याचे निर्माण झाले .सध्या पुरातत्व विभागाने कन्नडच्या बाजूने घाटमाथ्यावरून पायरी मार्ग तयार केला आहे जुना मार्ग आजही चाळीसगाव कडून पाटणदेवी मार्गाने अभयरण्यातून वाट आहे पण येण्यासाठी दोन तीन तास पायी यावे लागते .

    पायरी मार्गाने खाली उतरताच अरुणा नदीची खोल दरी दिसते व उजव्या बाजूला नऊ लेण्याचा समूह दिसतो व समोरच्या बाजूस चार लेण्या खाली उतरल्यावर पूर्ण नजरेस पडतात .

      जेम्स विलसन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५३ मधे इथे पहीले पाऊल ठेवले .या ठिकाणी कुणीही जात येत नव्हते.याठिकाणच्या चैत्यगृहा समोरील सपूर्ण भाग कोसळून हे चैत्य गृह संपूर्ण झाकलेले होते.हेन्री कझेन्स हा इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला त्याने सुद्धा हा ढिगारा पाहीला .जेम्स बर्जर्स यांनी येथील शिलालेखाचा अर्थ शोधला . झ्ग्रंजांनी या लेणीचे मोजमाप सुध्दा केले आहे .सूरज जगताप सरांनी त्या काळचे सर्व फोटोग्राफ मिळवून ते सोबत आणले होते .म गो दिक्षित हे इतिहास संशोधक १९४१ साली येथे आले होते.त्यांनी येथील चार लेण्याचा शोध लावला.त्यांनी सुध्दा या लेणीवर संशोधन केले आहे .१९५३ साली पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून सरक्षित केले .१९५७ -५८ मधे या ठिकाणचा मोठा ढिग काढण्यात आला .या ढिगाऱ्याखाली प्राचीन परंपरेचा उलगडा करणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तु ,शिल्पे सापडली याचा सचीत्र उलगडा अभ्यासकांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जे शिल्प होते त्या ठिकाणी आम्हाला घेऊन  केला .

      आता पर्यन्त आम्ही जेवढया लेण्या पाहील्या तेवढया लेण्यात पाण्याची व्यवस्था ही पानपोढी च्या माध्यमातून केलेली दिसते म्हणजे दगडात कोरुन मोठ मोठे हौद तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवणे .पण या ठिकाणी तशी रचना दिसली नाही याचे कारण तेथील प्रस्तराचा पोत होय हा प्रस्तर एकसंघ असणे आवश्यक असतो .त्यातून पाणी न झिरपणे ,ठिसूळ नसणे गरजेंचे असते पण या ठिकाणी मात्र येथील प्रस्तर एकसंघ नसल्याने व खडक बेसॉल्ट असल्याने मात्र या लेणीचे पुढील काळात खूप नुकसान झाले .

     पाण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन म्हणता येईल असा पाण्याचा बंधारा या ठिकाणी २२०० वर्षापूर्वी  ठिकाणी बांधण्यात आला आजही त्याचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अरुणा नदीचा मुख्य प्रवाह लेणीच्या वरच्या बाजूस अडविण्यात आला व त्या ठिकाणी 22 लाख लिटर पाणी थांबवता येईल अशी बांधणी करण्यात आली आजही नदीतील पात्रात दगडांमध्ये एका सरळ रेषेत लाकडी थांब उभे करण्यासाठी दगड गोल ओंडक्याच्या आकाराचा कोरलेला आहे त्याला सहाय्यक म्हणून दोन्ही बाजूला छोटे छोटे  खाची केलेली आहेत. या मुख्य लाकडांच्या आधाराने दगड व मातीचे लेपन करून हा बंधारा बांधला गेला असावा असे दिसते. पानपोढी ऐवजी या बंधाऱ्याचे पाणी या लेणी समूहात राहणारे बौद्ध भिक्खू वापरत असत.

खाली उतरतात उजव्या बाजूला आपल्याला विहार नजरेस पडते. विहार म्हणजे त्याकाळी बौद्ध भिक्खू साठी ही निवासाची व ध्यानधारणेसाठी ची जागा होती. आजही आपल्याला त्या ठिकाणी लाकडी रिप बसवण्यासाठी ची दगडात कोरलेली खोबणी दिसतात या माध्यमातून त्याकाळी लाकडी कंपार्टमेंट करून ही निवासस्थाने तयार केलेली दिसतात. खोल दरीच्या बाजूने ही आजच्या काळात ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला पॅरापिट करतो अगदी तशीच रचना दरीच्या बाजूने केली असल्याचे जाणवते. त्याकाळी ही लाकडी रचना आपल्याला आता दिसत असलेल्या दगडातील कोरीव कामावरून सहज लक्षात येते.

      हिनयान पंथीय बौद्ध भिक्खू उपासक चैत्यगृह मध्ये आपली प्रार्थना ध्यानधारणा करण्याचे काम करत असत पुढच्या भागात विहाराच्या समोरच एक सुंदर भव्य असे   गजपृष्ठाकार आकाराचे चैत्यगृह नजरेस पडते. आत गेल्यानंतर या चैत्यगृहात स्तुप आहे . प्रस्तर एकसंघ नसल्याने हा स्तूप सध्या अर्धवट दिसतो .छत्रावली,यष्टी,हर्मिका हा भाग दिसत नाही .यापूर्वी यावर दगडी बांधकाम करून पूर्ण केल्याचे जाणवते ज्यावेळी चैत्यगृहात पडझड झाली त्यावेळेस या बौद्ध स्तूपाचे नुकसान झाले असावे. भाचे येथील चैत्यगृहात  असलेला स्तुप हा जवळपास समकालिन असावा असे अभ्यासकाचे मत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिव अवशेषांवर गया, सारनाथ ,नालंदा, या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्यात आले होती . त्यांनी वापरलेल्या वस्तूवर ही स्तूप बांधले जाऊ लागले त्यांना परिभाषिक स्तुप असे म्हणतात. पितळखोरा येथील चैत्यगृहात त्याचे पावित्र्य जपत सर्वांनी बुद्ध वंदना पार पडली . एकूण 37 खांबावर उभा असलेला हा चैत्यगृह आहे सध्या बरीच खांब पडलेली आहे. कृत्रिम रित्या दगडाचा वापर करून खांबाची ची निर्मिती निजामाच्या त्यांनी दिलेल्या मदतीतून त्या काळात केली गेली असे संशोधकांनी सांगितले या विषयावर संशोधनही सुरू आहे. मिथिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दगडी भिंती व खांब अत्यंत गुळगुळीत केलेले दिसतात. या चैत्यगृहाचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की हिनयान चैत्यगृहात नंतरच्या काळात बुद्ध चित्रांची निर्मिती केली गेली अजिंठा मध्ये ज्या पद्धतीची चित्रशैली आहे अगदी तशीच परंतु त्यापूर्वीची अशी ही चित्रशैली दिसते अजिंठ्यातील चित्रशैलीत जातक कथांचा चित्रांचा समूह दिसतो परंतु या ठिकाणी मात्र केवळ बुद्धांच्या चित्रांचा समूह आहे यामध्ये कमल पुष्पात उभे असलेले तथागत बुद्ध त्याच पद्धतीने ध्यानस्थ असलेले बुद्ध तसेच डोळे उघडे असलेले बुद्ध या चित्र समूहात दिसतात.प्रत्येक बुद्धचित्राच्या मागे प्रभामंडळ काढलेले आहे . काजळी वापरून लिहिलेला लेख आजही येथे बघायला मिळतो. चैत्यगृहात गजपृष्टा कार आकाराच्या स्तूपाच्या वरील भागात लाकडी कमानीचा वापर केलेला दिसतो या लेणीत दगडावर विशिष्ठ प्रकारच्या चुना - मातीचा-इतर घटकाचा लेप लावून त्यावर चित्रकाम केलेले दिसते. आज तेथील लाकडी काम गळून पडलेली आहे ज्या ठिकाणी हे काम होते तो भाग आता बिना लेप लावलेला व चित्र काम न केलेला आहे. याच चैत्या तील दहाव्या व अकराव्या खांबावर दोन ब्राम्ही लिपि मधील शिलालेख आहेत . षटकोनी आकारात तासलेल्या या खांबावर अत्तर बनविणाऱ्या  मितदेवाचे दान आहे दुसऱ्या खांबावर संघकाचे दान आहे हे दोघेही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथील आहेत. या दोन्ही खांबावरील चित्र कामाचा लेप गळून पडल्यामुळे हा शिलालेख उघडा पडला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करता आले. लेणीच्या अभ्यासकांच्या मते या चैत्यगृहातील चित्राखाली अजूनही असे शिलालेख असू शकतात. ज्याच्या दानातून ज्या लेणीच्या ज्या भागाची निर्मिती व्हायची त्या भागावर बहुतेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला  शिलालेख आढळतो. असे शिलालेख इतिहास समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडतात.दोन्ही बाजूने दोन ,दोन ढेरपोटया यक्षाने पायरी तोलून धरण्याचे शिल्प आहे .आजही त्या यक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव जीवंत वाटतात .'यक्ष ' हा बौध्द-हिंदू-जैन या सर्व धर्माच्या विवेचनात आढळतो .त्याला या तीनही धर्मात महत्वाचे स्थान आहे . याच ठिकाणी डोक्यावर भार घेत दोन्ही हाताने तो भार पकडलेला फेटाधारी यक्षाचे पूर्ण शिल्प उत्खलनात सापडले आहे .''संकरीन यक्ष " असे त्याचे नाव असून त्याचा उल्लेख महामयुरी या ग्रथात येतो .आज हे अप्रतीम शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय सरक्षण केद्रात ठेवण्यात आले आहे .

     चैत्यगृहातून बाहेर पडताच.सोंड  तुटलेला नऊ हत्ती दिसतात.हा एका विहाराचा भाग आहे वरील प्रस्तर या हत्तीशिल्पावर कोसळले व ही शिल्पे तुटली .नऊ हत्तीच्या समोर पूर्णाकृती नऊ माहुतांची शिल्पे होती त्यांच्या पायाचे अवशेष आजही दिसतात .हत्ती सुद्धा पूर्णणे अलंकृत आहेत .तुटलेल्या माहुतांचे शीर,धड व हत्तीचे सोंडीचे अवाढव्य अवशेष दरीच्या काठावर आजही पडून आहेत .पाठीमागे असलेले विहार या हत्तीच्या रथावर आरूढ आहे अश्या प्रकारचे हे भव्यदिव्य विहाराची ही वास्तु होती. या विहारात वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक दरवाजा पायऱ्यासह कोरलेला आहे .या ठिकाणी पूर्वी लाकडी द्वार होते हे तेथील कोरीव कामावरून दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे या द्वारावर सहा फुट उंच असे हातात भाला घेतलेले द्वारपाल आहेत .यापैकी एका द्वारपालाचे शिल्प अलीकडच्या काळात  तोडल्याचे दिसते .बर्जेस,फग्र्युसन,पर्सी बाऊन या पाश्चात्य जाणकाराच्या मते ग्रीक,इजिप्त ,इराण आदी शिल्प शैलीचा प्रभाव काही अंशी प्राचीन लेणी समूहात जाणवतो याची प्रचीती या द्वारपालाच्या पोषाखावरुन येते .याशिवाय विहारातील बहुतेक द्वारावर पंख असतेले घोडे,हत्ती आदि प्राण्याचे शिल्पे आहेत .उतुंग भरारी घेणारे आवेशपूर्ण शिल्पे ही ग्रीक,रोम,इराणी वास्तुकलेची छाप जाणवते .या भागातून ग्रीक व रोमशी सातवाहन काळात नाणेघाट _कल्याण या मार्गाने सागरी व्यापार चालतच होता .

     या द्वाराच्या डाव्या बाजूला पंचफणी नागाचे शिल्प आहे.या शिल्पाचा उठावदार पणा आता दिसत नाही या नागाच्या पाचही मुखातून आजही पाणी येते .खडकाच्या प्रस्तरात मुरलेले पाणी एकत्रीत करून भूमीगत पध्दतीने या नागफणी पर्यन्त आणले गेले आहे .कोरीव काम करून पाण्याची नहर भूमीगत आहे .जागोजागी छोटे मॅन होल ठेवून त्यात घडीव दगड बसविला गेला आहे जेणे करुन त्यामधे साचलेला गाळ काढता येईल .पूर्वी पूर्णतः दबावाने हे पाणी येत असावे .कारंज्याच्या रूपाने ते नागफणीतून बाहेर पडत होते .मुख्यद्वारावर असल्याने विहारात जाण्या अगोदर स्वच्छतेसाठी असावे .इस पूर्व दुसऱ्या शतकातील जलव्यवस्थापण आजही लाकडी बंधारा व या भूमीगत पाणी रचनेतून दिसून येते .याच द्वाराच्या वर एक आयताकृती रिक्त चौकट दिसते म्हणजे त्यामधील घडीव दगडी  पैनल हा खाली  ढिगाराखाली सापडला होता आज या पैनल वरील शिल्प छत्रपती शिवाजी महाराज म्युझीअम मुंबई येथे बघायला मिळते .या शिल्पात दोन्ही बाजूने ह्त्ती व मधे स्त्रीचे शिल्प आहे.अभ्यासक या शिल्पास महामायादेवी संबोधतात काही या शिल्पास गजलक्ष्मी म्हणतात .अशी शिल्पे जुन्नर परिसरात अनेक भागात आढळतात .डाव्या बाजूला असलेल्या चार लेण्यामधे विहार कोरलेली आहे .वर्षानुवर्ष हा एकसंघ नसलेला प्रस्तर सतत ढासळत राहील्याने अरुणा नदीच्या दरीत मोठमोठया दगडांचा खच पडलाय ,नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने सततच्या माऱ्याने त्यावरील कोरीव काम नाहीसे झालय .एके काळी सुवर्णकाळ ठरलेला हा आपला वारसा आजही आपली वाट पाहतोय .सूरज जगताप सरांसारखी माणसे शेकडो किलोमिटर अंतरावरून येवून येथील अजूनही न उलगडलेल्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेत या प्राचीन ठेव्याची माहीती लोकांना करुन देत आहेत .असे हजारो वर्षापूर्वीचे आपल्।या पूर्वजांचे असंख्य ठेवे आपल्या परिसरात आहेत त्याचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे .हा वारसा आपल्याला सदैव प्रेरणाच देत राहील.



संदर्भ

-लेणी महाराष्ट्राची _डॉ दाऊद दळवी

-लेणी अभ्यासक सूरज जगताप (मुंबई)यांच्या सोबत प्रत्यक्ष अभ्यास दौरा



संजय खांडवे

बुलढाणा

9011971122

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...