*पितळखोरे लेणी- महाराष्ट्रातील प्राचीन अविष्कार*
लयनम् हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली .हा कालखंड इस पूर्व ४९१ ते ४५९ हा आहे म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षा अगोदर ह्या शैलगृहाच्या निर्मितीस सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो. नागार्जुन , सीतामढी येथे सुद्धा इस. पूर्व 252 ते 200 या कालखंडात लेण्या खोदल्या गेल्या. सुदामा, विश्वमित्र, कर्णकौपर, लोमेश ऋषी या लेण्या आहेत यापैकी सुदामा ही प्राचीन आहे त्याला न्युग्रोध गुंफा म्हणतात.
यानंतर इ स पूर्व दुसऱ्या शतकात नर्मदा पार करून महाराष्ट्रात पितळखोरा या ठिकाणी पहीला प्रयोग झाला .अनेक दिवसापासून या लेणीबद्दल प्रचंड आतुरता होती की ही लेणी करावी .लेणी बघणे व समजून घेणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत .त्यामुळे या आपल्या प्राचीन वारश्याला समजून घेण्यासाठी कुणीतरी जाणकारच लागेल यात शंकाच नाही .नवी मुंबई येथील सूरज रतन जगताप या लेणी अभ्यासकांशी माझा संपर्क झाला .विशेष म्हणजे "पितळखोरा "हा त्यांचा मुख्य अभ्यासाचा विषय होता .गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे या लेणीवर सवर्धनासह काम सुरु आहे .त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभरातून या आपल्या प्राचीन वारश्यावर प्रेम करणारे अभ्यासकासह एकत्र आलो व गौताळा अभयराण्यातील पितळखोरा या ठिकाणी एकत्र येऊन दिवसभर जगताप सराच्या सोबत राहून लेणी समजून घेतली .महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पण आजही दुर्लक्षितच असलेली दिसते .पुरातत्व खात्याचे काम आता बऱ्यापैकी दिसते पण पर्यटनाच्या बाबतीत आजही ही महत्वाची लेणी मागेंच आहे .आमची टिम त्या लेणी परिसरात पोहचताच आगे मोहळ उठल्याची आवई आम्हाला कळाली पण अभ्यासकांच्या अनुभवावर आम्ही पुढे निघालो परत येणारे दोन हौशी पर्यटक भेटले आणि ती आवईच ठरली .या लेणीचा उल्लेख टॉलमीच्या मेट्रीला या ग्रंथात आढळतो.महामयुर या बौद्ध ग्रंथातही 'पितलांग्य' असा उल्लेख आढळतो .सोपारा,कल्याण ,भरूकच्छ यासारख्या देशार्तगत बंदराला जोडणाऱ्या पैठण व तेर या व्यापारी मार्गावर आहे .उज्जैन वरून पूर्वी याच मार्गाने प्रतिष्ठाणशी संपर्क होता व पुढच्या काळात तो अजिठा ,घटत्कोच या मार्गाने वाढला व दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा घटली व पितळखोऱ्याचा विकास कमी होऊन अजिंठा अधिक विकसित होत गेले याचे दुसरे कारण पितळखोऱ्याचा दगड असावा असेही दिसते .याच भागात सातवाहन कालिन भोकरदन (भोगवर्धन)हे शहरही व्यापारी दृष्टया फार प्रगत होते .नुकतेच सम्राटअशोक कालिन भोन येथील प्रगत अश्या शहराचे संशोधन सुरू आहे ते सुध्दा या स्थानापासून जास्त दूर नाही .
पितळखोरा लेणी ही हीनयान लेणी आहे.या लेणीच्या समकालिन अंजिंठयातील ९ व १० क्रमाकाची लेणी आहे .ही लेणी सुद्धा अजिंठयासारखीच नालाकृती आहे .अरुणा नदीच्या उगम प्रवाहावर याचे निर्माण झाले .सध्या पुरातत्व विभागाने कन्नडच्या बाजूने घाटमाथ्यावरून पायरी मार्ग तयार केला आहे जुना मार्ग आजही चाळीसगाव कडून पाटणदेवी मार्गाने अभयरण्यातून वाट आहे पण येण्यासाठी दोन तीन तास पायी यावे लागते .
पायरी मार्गाने खाली उतरताच अरुणा नदीची खोल दरी दिसते व उजव्या बाजूला नऊ लेण्याचा समूह दिसतो व समोरच्या बाजूस चार लेण्या खाली उतरल्यावर पूर्ण नजरेस पडतात .
जेम्स विलसन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५३ मधे इथे पहीले पाऊल ठेवले .या ठिकाणी कुणीही जात येत नव्हते.याठिकाणच्या चैत्यगृहा समोरील सपूर्ण भाग कोसळून हे चैत्य गृह संपूर्ण झाकलेले होते.हेन्री कझेन्स हा इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला त्याने सुद्धा हा ढिगारा पाहीला .जेम्स बर्जर्स यांनी येथील शिलालेखाचा अर्थ शोधला . झ्ग्रंजांनी या लेणीचे मोजमाप सुध्दा केले आहे .सूरज जगताप सरांनी त्या काळचे सर्व फोटोग्राफ मिळवून ते सोबत आणले होते .म गो दिक्षित हे इतिहास संशोधक १९४१ साली येथे आले होते.त्यांनी येथील चार लेण्याचा शोध लावला.त्यांनी सुध्दा या लेणीवर संशोधन केले आहे .१९५३ साली पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून सरक्षित केले .१९५७ -५८ मधे या ठिकाणचा मोठा ढिग काढण्यात आला .या ढिगाऱ्याखाली प्राचीन परंपरेचा उलगडा करणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तु ,शिल्पे सापडली याचा सचीत्र उलगडा अभ्यासकांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जे शिल्प होते त्या ठिकाणी आम्हाला घेऊन केला .
आता पर्यन्त आम्ही जेवढया लेण्या पाहील्या तेवढया लेण्यात पाण्याची व्यवस्था ही पानपोढी च्या माध्यमातून केलेली दिसते म्हणजे दगडात कोरुन मोठ मोठे हौद तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवणे .पण या ठिकाणी तशी रचना दिसली नाही याचे कारण तेथील प्रस्तराचा पोत होय हा प्रस्तर एकसंघ असणे आवश्यक असतो .त्यातून पाणी न झिरपणे ,ठिसूळ नसणे गरजेंचे असते पण या ठिकाणी मात्र येथील प्रस्तर एकसंघ नसल्याने व खडक बेसॉल्ट असल्याने मात्र या लेणीचे पुढील काळात खूप नुकसान झाले .
पाण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन म्हणता येईल असा पाण्याचा बंधारा या ठिकाणी २२०० वर्षापूर्वी ठिकाणी बांधण्यात आला आजही त्याचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अरुणा नदीचा मुख्य प्रवाह लेणीच्या वरच्या बाजूस अडविण्यात आला व त्या ठिकाणी 22 लाख लिटर पाणी थांबवता येईल अशी बांधणी करण्यात आली आजही नदीतील पात्रात दगडांमध्ये एका सरळ रेषेत लाकडी थांब उभे करण्यासाठी दगड गोल ओंडक्याच्या आकाराचा कोरलेला आहे त्याला सहाय्यक म्हणून दोन्ही बाजूला छोटे छोटे खाची केलेली आहेत. या मुख्य लाकडांच्या आधाराने दगड व मातीचे लेपन करून हा बंधारा बांधला गेला असावा असे दिसते. पानपोढी ऐवजी या बंधाऱ्याचे पाणी या लेणी समूहात राहणारे बौद्ध भिक्खू वापरत असत.
खाली उतरतात उजव्या बाजूला आपल्याला विहार नजरेस पडते. विहार म्हणजे त्याकाळी बौद्ध भिक्खू साठी ही निवासाची व ध्यानधारणेसाठी ची जागा होती. आजही आपल्याला त्या ठिकाणी लाकडी रिप बसवण्यासाठी ची दगडात कोरलेली खोबणी दिसतात या माध्यमातून त्याकाळी लाकडी कंपार्टमेंट करून ही निवासस्थाने तयार केलेली दिसतात. खोल दरीच्या बाजूने ही आजच्या काळात ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला पॅरापिट करतो अगदी तशीच रचना दरीच्या बाजूने केली असल्याचे जाणवते. त्याकाळी ही लाकडी रचना आपल्याला आता दिसत असलेल्या दगडातील कोरीव कामावरून सहज लक्षात येते.
हिनयान पंथीय बौद्ध भिक्खू उपासक चैत्यगृह मध्ये आपली प्रार्थना ध्यानधारणा करण्याचे काम करत असत पुढच्या भागात विहाराच्या समोरच एक सुंदर भव्य असे गजपृष्ठाकार आकाराचे चैत्यगृह नजरेस पडते. आत गेल्यानंतर या चैत्यगृहात स्तुप आहे . प्रस्तर एकसंघ नसल्याने हा स्तूप सध्या अर्धवट दिसतो .छत्रावली,यष्टी,हर्मिका हा भाग दिसत नाही .यापूर्वी यावर दगडी बांधकाम करून पूर्ण केल्याचे जाणवते ज्यावेळी चैत्यगृहात पडझड झाली त्यावेळेस या बौद्ध स्तूपाचे नुकसान झाले असावे. भाचे येथील चैत्यगृहात असलेला स्तुप हा जवळपास समकालिन असावा असे अभ्यासकाचे मत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिव अवशेषांवर गया, सारनाथ ,नालंदा, या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्यात आले होती . त्यांनी वापरलेल्या वस्तूवर ही स्तूप बांधले जाऊ लागले त्यांना परिभाषिक स्तुप असे म्हणतात. पितळखोरा येथील चैत्यगृहात त्याचे पावित्र्य जपत सर्वांनी बुद्ध वंदना पार पडली . एकूण 37 खांबावर उभा असलेला हा चैत्यगृह आहे सध्या बरीच खांब पडलेली आहे. कृत्रिम रित्या दगडाचा वापर करून खांबाची ची निर्मिती निजामाच्या त्यांनी दिलेल्या मदतीतून त्या काळात केली गेली असे संशोधकांनी सांगितले या विषयावर संशोधनही सुरू आहे. मिथिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दगडी भिंती व खांब अत्यंत गुळगुळीत केलेले दिसतात. या चैत्यगृहाचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की हिनयान चैत्यगृहात नंतरच्या काळात बुद्ध चित्रांची निर्मिती केली गेली अजिंठा मध्ये ज्या पद्धतीची चित्रशैली आहे अगदी तशीच परंतु त्यापूर्वीची अशी ही चित्रशैली दिसते अजिंठ्यातील चित्रशैलीत जातक कथांचा चित्रांचा समूह दिसतो परंतु या ठिकाणी मात्र केवळ बुद्धांच्या चित्रांचा समूह आहे यामध्ये कमल पुष्पात उभे असलेले तथागत बुद्ध त्याच पद्धतीने ध्यानस्थ असलेले बुद्ध तसेच डोळे उघडे असलेले बुद्ध या चित्र समूहात दिसतात.प्रत्येक बुद्धचित्राच्या मागे प्रभामंडळ काढलेले आहे . काजळी वापरून लिहिलेला लेख आजही येथे बघायला मिळतो. चैत्यगृहात गजपृष्टा कार आकाराच्या स्तूपाच्या वरील भागात लाकडी कमानीचा वापर केलेला दिसतो या लेणीत दगडावर विशिष्ठ प्रकारच्या चुना - मातीचा-इतर घटकाचा लेप लावून त्यावर चित्रकाम केलेले दिसते. आज तेथील लाकडी काम गळून पडलेली आहे ज्या ठिकाणी हे काम होते तो भाग आता बिना लेप लावलेला व चित्र काम न केलेला आहे. याच चैत्या तील दहाव्या व अकराव्या खांबावर दोन ब्राम्ही लिपि मधील शिलालेख आहेत . षटकोनी आकारात तासलेल्या या खांबावर अत्तर बनविणाऱ्या मितदेवाचे दान आहे दुसऱ्या खांबावर संघकाचे दान आहे हे दोघेही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथील आहेत. या दोन्ही खांबावरील चित्र कामाचा लेप गळून पडल्यामुळे हा शिलालेख उघडा पडला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करता आले. लेणीच्या अभ्यासकांच्या मते या चैत्यगृहातील चित्राखाली अजूनही असे शिलालेख असू शकतात. ज्याच्या दानातून ज्या लेणीच्या ज्या भागाची निर्मिती व्हायची त्या भागावर बहुतेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला शिलालेख आढळतो. असे शिलालेख इतिहास समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडतात.दोन्ही बाजूने दोन ,दोन ढेरपोटया यक्षाने पायरी तोलून धरण्याचे शिल्प आहे .आजही त्या यक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव जीवंत वाटतात .'यक्ष ' हा बौध्द-हिंदू-जैन या सर्व धर्माच्या विवेचनात आढळतो .त्याला या तीनही धर्मात महत्वाचे स्थान आहे . याच ठिकाणी डोक्यावर भार घेत दोन्ही हाताने तो भार पकडलेला फेटाधारी यक्षाचे पूर्ण शिल्प उत्खलनात सापडले आहे .''संकरीन यक्ष " असे त्याचे नाव असून त्याचा उल्लेख महामयुरी या ग्रथात येतो .आज हे अप्रतीम शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय सरक्षण केद्रात ठेवण्यात आले आहे .
चैत्यगृहातून बाहेर पडताच.सोंड तुटलेला नऊ हत्ती दिसतात.हा एका विहाराचा भाग आहे वरील प्रस्तर या हत्तीशिल्पावर कोसळले व ही शिल्पे तुटली .नऊ हत्तीच्या समोर पूर्णाकृती नऊ माहुतांची शिल्पे होती त्यांच्या पायाचे अवशेष आजही दिसतात .हत्ती सुद्धा पूर्णणे अलंकृत आहेत .तुटलेल्या माहुतांचे शीर,धड व हत्तीचे सोंडीचे अवाढव्य अवशेष दरीच्या काठावर आजही पडून आहेत .पाठीमागे असलेले विहार या हत्तीच्या रथावर आरूढ आहे अश्या प्रकारचे हे भव्यदिव्य विहाराची ही वास्तु होती. या विहारात वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक दरवाजा पायऱ्यासह कोरलेला आहे .या ठिकाणी पूर्वी लाकडी द्वार होते हे तेथील कोरीव कामावरून दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे या द्वारावर सहा फुट उंच असे हातात भाला घेतलेले द्वारपाल आहेत .यापैकी एका द्वारपालाचे शिल्प अलीकडच्या काळात तोडल्याचे दिसते .बर्जेस,फग्र्युसन,पर्सी बाऊन या पाश्चात्य जाणकाराच्या मते ग्रीक,इजिप्त ,इराण आदी शिल्प शैलीचा प्रभाव काही अंशी प्राचीन लेणी समूहात जाणवतो याची प्रचीती या द्वारपालाच्या पोषाखावरुन येते .याशिवाय विहारातील बहुतेक द्वारावर पंख असतेले घोडे,हत्ती आदि प्राण्याचे शिल्पे आहेत .उतुंग भरारी घेणारे आवेशपूर्ण शिल्पे ही ग्रीक,रोम,इराणी वास्तुकलेची छाप जाणवते .या भागातून ग्रीक व रोमशी सातवाहन काळात नाणेघाट _कल्याण या मार्गाने सागरी व्यापार चालतच होता .
या द्वाराच्या डाव्या बाजूला पंचफणी नागाचे शिल्प आहे.या शिल्पाचा उठावदार पणा आता दिसत नाही या नागाच्या पाचही मुखातून आजही पाणी येते .खडकाच्या प्रस्तरात मुरलेले पाणी एकत्रीत करून भूमीगत पध्दतीने या नागफणी पर्यन्त आणले गेले आहे .कोरीव काम करून पाण्याची नहर भूमीगत आहे .जागोजागी छोटे मॅन होल ठेवून त्यात घडीव दगड बसविला गेला आहे जेणे करुन त्यामधे साचलेला गाळ काढता येईल .पूर्वी पूर्णतः दबावाने हे पाणी येत असावे .कारंज्याच्या रूपाने ते नागफणीतून बाहेर पडत होते .मुख्यद्वारावर असल्याने विहारात जाण्या अगोदर स्वच्छतेसाठी असावे .इस पूर्व दुसऱ्या शतकातील जलव्यवस्थापण आजही लाकडी बंधारा व या भूमीगत पाणी रचनेतून दिसून येते .याच द्वाराच्या वर एक आयताकृती रिक्त चौकट दिसते म्हणजे त्यामधील घडीव दगडी पैनल हा खाली ढिगाराखाली सापडला होता आज या पैनल वरील शिल्प छत्रपती शिवाजी महाराज म्युझीअम मुंबई येथे बघायला मिळते .या शिल्पात दोन्ही बाजूने ह्त्ती व मधे स्त्रीचे शिल्प आहे.अभ्यासक या शिल्पास महामायादेवी संबोधतात काही या शिल्पास गजलक्ष्मी म्हणतात .अशी शिल्पे जुन्नर परिसरात अनेक भागात आढळतात .डाव्या बाजूला असलेल्या चार लेण्यामधे विहार कोरलेली आहे .वर्षानुवर्ष हा एकसंघ नसलेला प्रस्तर सतत ढासळत राहील्याने अरुणा नदीच्या दरीत मोठमोठया दगडांचा खच पडलाय ,नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने सततच्या माऱ्याने त्यावरील कोरीव काम नाहीसे झालय .एके काळी सुवर्णकाळ ठरलेला हा आपला वारसा आजही आपली वाट पाहतोय .सूरज जगताप सरांसारखी माणसे शेकडो किलोमिटर अंतरावरून येवून येथील अजूनही न उलगडलेल्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेत या प्राचीन ठेव्याची माहीती लोकांना करुन देत आहेत .असे हजारो वर्षापूर्वीचे आपल्।या पूर्वजांचे असंख्य ठेवे आपल्या परिसरात आहेत त्याचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे .हा वारसा आपल्याला सदैव प्रेरणाच देत राहील.
संदर्भ
-लेणी महाराष्ट्राची _डॉ दाऊद दळवी
-लेणी अभ्यासक सूरज जगताप (मुंबई)यांच्या सोबत प्रत्यक्ष अभ्यास दौरा
संजय खांडवे
बुलढाणा
9011971122
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा