गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

तुका आकाशा एवढा

 *तुका आकाशाएवढा......*

➖➖➖➖➖➖

         संजय खांडवे       9011971122


संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील संत परंपरेचे शिरोभूषण मानले जातात .वारकरी भागवत धर्माचा कळस जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आजही जनमानसात तुकारामांची अभंगवाणी सतत मुखोतगत असल्याचे दिसते. "इडापिडा टळो बळीचे राज्य येऊ दे"

 ही जशी मौखिक परंपरेतून मुखोतगत आहे अगदी तसेच तुकारामांचे असंख्य अभंग या महाराष्ट्राच्या जनमानसातून सदैव जीवंत राहिलेले दिसतात. त्यांनी अभंग लिहून ठेवले पण त्यांना ते बुडवावे लागले ही एक दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल.अगाध ज्ञानाच्या कसोटीवर तासून निर्मिलेली गाथा कर्मठ व्यवस्थेच्या पचनी न पडल्याने ती बुडविण्याची वेळ संत तुकारामांवर येणे याची कल्पनाच करणे कठीण आहे . भाबनाथाच्या (भंडारा) डोंगरावरील सामाजिक साक्षात्कारा नंतर  संत तुकारामांच्या चिकित्सेतून अभंगवाणीचा जन्म झाला .त्या अगोदर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाटयाची असलेली कर्ज खाती  इंद्रायणीमध्ये बुडवली. हा त्यांना झालेला एक सामाजिक साक्षात्कारच होता .मला जर काही करायचे असेल तर सुरुवात ही माझ्यापासून केली पाहिजे ही त्या मागची  भावना होती. असा असत्याकडून सत्याकडे जाणारा मार्ग त्यांनी गाथेतून दाखविला. समाज मनात अज्ञानाकडून- ज्ञानाकडे, अंधाराकडून -प्रकाशाकडे ,दुःखाकडून- सुखाकडे, शोषणा कडून -मुक्ततेकडे, गुलामगिरी कडून स्वातंत्र्याकडे ,जाण्याची आस निर्माण झाली. आपण सिद्धी, स्मृती, श्रृती याचे अंकित नसून सर्वसमावेशक समचरणी पाठीराखा असलेल्या विठ्ठलाचे लेकरं आहोत. त्या विठ्ठलाने आम्हाला आता प्रचंड बळ दिले आहे. हा संत नामदेवांनी अकराव्या शतकात सांगितलेला संदेश "आमुचा विठ्ठल प्रचंड"  पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चालविला. त्यांना साक्षात विठ्ठलाच्या रूपाने संत नामदेवांचा दृष्टांत झाला होता. नामदेवांनी सांगितलेल्या विठ्ठलाचा मार्ग पुढे संत तुकारामांनी चालू ठेवला.भय मुक्त होऊन विठ्ठलाचे बळ संततुकारामांना मिळाले . आपल्या अभंगातून मनामनात आणि घराघरात रुजविला. अभंग गाथेची रचना खुद्द स्वतः तुकाराम महाराजांनी  स्वहस्ताक्षरात केली. स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या या वह्यांचे पुढे काय झाले हे सांगणे कठीण आहे. त्यांना त्या बुडवाव्या लागल्या हे मात्र सत्य आहे .शाईने लिहिलेला कागद आपण कधीतरी तुकारामांना समजून घेताना पाण्यात बुडून बघितला पाहिजे. असे  वाटते.

 "कोरड्या वह्या निघाल्या उदकी।

 त्या तरी लुटुनि नेल्या भाविकी।

 प्रख्यात लोंकि व्हावया ॥ "

 अशी माहिती महिपतीने दिली आहे श्री तुकाराम बुवांचे अभंगाची गाथा मधील 1950 सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की "या निवाडयाच्या दिवसानंतर तो निर्याणापर्यंत भक्तीच्या व काव्याच्या माधुरीचा ज्यांत  परिपाक उरला होता असे अनेक अभंग तुकारामाने स्वहस्ते लिहून ठेवले असले पाहिजेत. त्या हस्तलिखिताचा अद्यापही पत्ता लागलेला नाही .खुद्द तुकारामांच्या घराण्यात देहुत पूजेस ठेवलेली अशी त्यांच्या हातची म्हणून जी वही दाखवितात ती फक्त २४८ अभंगच आहे. सारांश तुकारामांच्या हातचे समग्र लिखाण गेल्या शंभर वर्षात तपास करून सुद्धा मिळाले नाही व नजीकच्या भविष्यातील ते सापडेल असा संभव दिसत नाही."

     या प्रस्तावनेनंतर आज ७२ वर्ष उलटली यात काही शंका नाही तुकारामांची समग्र गाथा हा एक वेगळा विषय आहे. पण प्रश्न असा पडतो की तुकारामांना समजून घेताना गाथा बुडवावी लागणे अन गाथा वर येणे या दोन्ही क्रिया वेगवेगळ्या आहेत. दोन्ही क्रियेकडे आपण सारख्या दृष्टीने खरंच बघतो आहोत का? "गाथा बुडविणे" याकडे आपण सहजतेने पाहतो मात्र "गाथा वर येण्याच्या " क्रियेला अलौकिक दृष्टीने पाहतो, नव्हे तर त्यावर अभिव्यक्तही होत असतो. बुडवण्याच्या क्रियेची वर येणे ही प्रतिक्रियाच आहे असेच वाटते. त्यामागे काही अलौकिकता असेल असे वाटत नाही. स्वतः प्रयत्नवादी, विज्ञानवादी, विधीचे जाणते, मेणाहूनही मऊ, वज्रालाही भेदणारे, जे पाहिजे ते देणारे ,गांडीची लंगोटी सोडून देणारे प्रसंगी नाठाळाच्या मस्तकात काठी सुद्धा मारायला मागेपुढे न पाहणारे, माय बापाहूनही मायाळू, अमृता पेक्षाही गोड, लोकजालातून सुटलो म्हणून धन्यता मानणारे, देवालाही   प्रतिप्रश्न करणारे, बुवाबाजी भोंदूगिरी आणि चमत्कार नाकारणारे, असे संत तुकारामांच्या बाबतीत अलौकिक,चमत्कार होणे मनाला पटत नाही. इंद्रायणी मध्ये डुबलेल्या अभंग गाथेला पाहत तुकाराम महाराज तेरा दिवस माईच्या काठावर उपाशीपोटी बसून होते. पंचक्रोशीतील गावोगावाहुन आलेले लोक देहुत जमले, मुखोद्गत असलेले अभंग इंद्रायणीच्या साक्षीने दुमदुमू लागले. साक्षात पांडुरंग जणू जनता जनार्दनाच्या रूपाने मदतीस आला. संताजी जगनाडे महाराजांनी हे अभंग पुन्हा लिहून काढले. हा सामाजिक प्रक्रियेचाच भाग आहे. त्यांच्या ४२ वर्षाच्या आयुष्यात  त्यांनी अनेक दुःख सोसले, ते आत्मकेंद्री बनले आणि चिंतन करू लागले .त्या काळच्या कर्मठ विचारांचा तुकारामांसह त्यांच्या कुंटुंबियांना सुद्धा  प्रचंड त्रास झाला.

" सत्य असत्याशी  मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥

 या आपल्या विचाराने निरंतर ते कार्यरत राहिले. त्यांनी सत्याची कास कधीच सोडली नाही.संत तुकारामांची गाथा आज ३५० वर्षानंतर ही जगातील कोणत्याही कसोटीवर घासून -तासून बघा ती टिकतेच. आजही जीवनातील कोणत्याही प्रश्नाची उत्तर तुकारामांच्या गाथेत सापडतात.आज आपण कथा ,दंतकथा, चित्रपट, नाटके, कादंबऱ्या यासारख्या साधनातून आपल्या महामानवांच्या चरित्राचे चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण करून त्यालाच सत्य मानतो. त्यामध्येच आपली धन्यता असते. आपण चिकित्सेशिवाय ते स्वीकारणे यामुळे मोठा घोळ होतो. आज तुकाराम महाराजांनी घालून दिलेला आदर्श हा सत्यासाठी आणि संघर्षाचा आहे. तो आपण जपला पाहिजे "आता उरलो फक्त उपकारापुरता" या भावनेने जगणारे संत तुकाराम यांनी जनसेवेचे व्रत घेतले. त्यांनी जनसेवेतच पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाचा पर्याय या जगाला दिला. आंतरिक शुद्धता जपत धर्माचे खरे अधिष्ठान अंतःकरणाच्या शुद्धतेत असते असे सांगणारे,उत्तम व्यवहारातून प्रपंचासाठी धन जोडा म्हणून सांगणारे,भिक्षापात्र झिडकारणारे,सुखात हुरळून न जाता दुःखातही न खचणारे, मावळ्यांसाठी पाईकांचे अभंग रचियेता  असलेले स्वराज्याचे अध्यात्मिक गुरु,भेदाभेद अमंगळ आहे हे सांगणारे,देवाने मला कुणबी केले म्हणून धन्यता माणनारे,कुणालाही कधीही टोचून न बोलणारे ,सम ब्रम्हाची जाणिव करुन देणारे ,सोवळया ओवळ्या पासून निराळे असणारे,सर्व दिशा अन काळ  सदैव शुभच आहेत हे सांगणारे,नेहमी समाजात एकरूप होऊन राहणारे,प्रपंच परमार्थ सोबत करणारे,समाजासोबत तितकीच आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे,शोषण करणाऱ्याचे तोंड फोडा म्हणून सांगणारे,किर्तनाचा विकरा करणाऱ्यावर रोख ठोक बोलणारे,शेती,पर्यावरण,कुंटुंब,जन्म,मृत्यु,बालपण,म्हातारपण,राग,लोभ,मत्सर,चित्त,चिंता,पशू,पक्षी,प्राणी,मन,धन,पाणी,परिस,सोने,माती,कथा,दंतकथा,काळ,नवस,तीर्थ,जप,तप,व्रत,मंत्र,तंत्र,योग,याग,सिद्धी,मोक्ष,इंद्रिय,समाधी,संसार,गुरू ,शिष्य,युद्ध,शस्त्र,शद्ब, अश्या असंख्य विषयावर भाष्य करणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज आकाशाएवढेच आहेत !


 " अनु रेणू थोडका ।तुका आकाशाएवढा ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रवास वर्णन

 माझी दुर्गदुर्गेश्वर रायगडाची परिक्रमा ➖➖➖➖➖➖➖➖➖ परिक्रमा म्हणजे फेरा मारणे असा अर्थ होतो हे शाळेत भूगोलाच्या गुरुजी कडून शिकलो होतो. तसे ध...