*शरद पौर्णिमा: एक महोत्सव*
चंद्र आणि पृथ्वी या दोघांचं अतूट नातं आहे. पृथ्वीतलावर राहणारे जीव या चंद्राशी अनादी अनंत काळापासून जुळलेले आहेत. पृथ्वीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी चंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचे सौंदर्य हे चंद्रा मुळेच बहरले गेलं आणि या पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारे सौंदर्य हे तर फार मोठे विलोभनीय! हा झाला विज्ञानाचा भाग, अनादी अनंत काळा पासून जगातील जवळपास सर्वच धर्मामध्ये चंद्राला फार महत्त्व आहे. काल गणना देखील चंद्राच्या कलेशी संबंधित आहे. डोंगर, दऱ्यात ,वाडी, वस्तीमध्ये विकसित होत जाणारे आमचं लोकजीवन हे चंद्राच्या अमावस्या आणि पौर्णिमा यावर चालत आले आहे. आपले आजे- पंणजे हे त्यांच्या जीवनातील घडलेल्या महत्त्वाच्या घटना कालबद्ध करत असताना पौर्णिमेच्या अगोदर इतके दिवस पौर्णिमेच्या नंतर तितके दिवस अशा स्वरूपामध्ये संचित ठेवायचे. आपले बहुतेक सण आणि उत्सव हे पौर्णिमा किंवा अमवश्या या सणाशी संबंधित आपल्याला दिसतात यामध्ये राखी पौर्णिमा ,वटपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा तशीच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा येते. कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात. शरद ऋतूमध्ये येणारी ही अद्वितीय पौर्णिमा आहे. आपण साजरे करत असणारे सण हे कृषी परंपरेशी आपली नाळ जोडणारे आपल्याला दिसतात. त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा देखील आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. अश्विन शु. पौर्णिमा म्हणजे निरभ्र, निकोप, स्वच्छ ,सुंदर वातावरणात निसर्ग खुलून दिसावा असा हा क्षण ! धरती मातेने मानवाला धन धान्याच्या रूपात दिलेला प्रसाद म्हणजे घरे धन -धान्याने रूपाने भरभरून गेलेली आहे. निसर्ग आनंदी आहे आणि माणूसही आनंदी आहे. गाई -म्हशी दूध -दुपत्यांनी युक्त झालेल्या आहेत. नदी- नाले प्रचंड तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रही अगदी स्वच्छ झाले आहे. निसर्गात चोही बाजूंनी सुगंध दरवळत आहे. चांदणी रात्र ,निरभ्र आकाश सर्वकाही आल्हाददायक आहे. या आनंदी वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करत , उत्सव साजरा करणारा सण म्हणजे "कोजागिरी पौर्णिमा", अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारतीय परंपरेत या सणाला विशेष असे महत्त्व आहे .उद्यान, एखाद्या मोकळ्या जागी किंवा उंच ठिकाणी सर्व जण एकत्रित येऊन रात्रीचे जागरण करत हा सण साजरा केला जातो. दूध- दुपत्यांचा काळ असल्यामुळे संथ आहारावर दूध आटवत या निरभ्र चांदण्या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशात हे दूध आटवले जाते आणि गप्पागोष्टी, प्रबोधन, गाणी, लोकगीते ,प्रवचन ,कीर्तन या माध्यमातून ही रात्र जागवली जाते. गुजरात मध्ये गरबा उत्सवाच्या माध्यमातून जागरण करून ही पौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या भारतीय धार्मिक परंपरेनुसार रात्री लक्ष्मी माता घरोघरी जाणार आणि कोण कोण जागी आहे ? याची विचारणा करणार." को जागर्ति" म्हणजेच कोण कोण जागे आहे? याची विचारणा करणे असा अर्थ होतो. मानवाच्या कृतीशीलतेची ही चाचपणी या ठिकाणी होते .अश्विन प्रतिपदे पासून ते दशमी पर्यंत स्त्री- शक्तीचे महत्त्व आपल्या सण -समारंभामधून दिसते तेच पुढे या अश्विन पौर्णिमेत सुद्धा प्रतीत होताना दिसते .येथेही स्त्रीशक्ती रूपानं लक्ष्मी मातेचे आगमन होऊन ती आपल्या प्रजाजनांची विचारणा करते. दारात उभी राहून त्यांना दर्शन देते, दारात आलेली लक्ष्मी परत जाऊ नये म्हणून हा जागरणाचा उत्सव आपण प्राचीन कालापासून करत आलेलो आहोत. त्या दिवशी लक्ष्मीपूजनालाही महत्व असते. प्राचीन पुरानानुसार महिषासुर मर्दिनी मातेची देखील कथा याबाबतीत सांगितली जाते. महिषासुरमर्दिनीचे जागरण या दिवशी केले जाते. आपल्या पूर्वजांनी लक्ष्मीचा अर्थ केवळ धन,दौलत अशा भौतिक बाबी किंवा सुख, समृद्धी असा नसून तो आपल्या जीवनमानाशी देखील संबंधित आहे. आपण जीवन जगत असताना कोणताही मोह ,माया, द्वेष ,मत्सर आदी च्या अधीन जाऊ नये. त्यापासून मुक्त असावे चंद्रा प्रमाणे शितल आणि स्वच्छ असावे. आपण चंद्राप्रमाणेच देणाऱ्याची भूमिका आपल्या जीवनात पार पाडावी. ऋतू परिवर्तनाचा मध्य साधणारा हा सण एक बौद्धिक , कला व विकास सामाजिक विकास साधणारा आहे. आपल्या प्राचीन लोकसंस्कृतीचा अभ्यास करत या लोकसंस्कृतीच्या खुणा जर आपण शोधू शकलो तर ही कृषी परंपरा आपल्या धार्मिक परंपरे ला कशी सलग्न आहे हे स्पष्टपणे जाणवते. 16 कलेमधून जाणारा हा चंद्र देवादिदेव आधी योगी महादेवांच्या शिरावर शोभून दिसतो. प्रकाशमान असलेला चंद्र त्याच्या शीतलतेतून आमच्याही जीवनमानामध्ये शितलता निर्माण करतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा